गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...
अाठवणीतला हॉलीवुड/ पाच-ग्रीर गारसनची स्पष्टवादिता
मिस्ट्रेस म्हणून नायिका कामावर रूजू होते, आपल्या स्वभावाने ती घरच्या मंडळींचं मन जिंकून घेते. नायकाचं तिच्यावर प्रेम जडतं व ‘ती’ चक्क त्या घराची गृह स्वामिनी होते. सुखान्त असलेल्या या विषयावर बरेच हिंदी चित्रपट आले, येताहेत. हाॅलीवुडला देखील हा विषय वर्ज्य नाही...पण चित्रपट सुखान्त करायचाच...ही सक्ती नसल्यामुळेच त्या चित्रपटांचं वेगळेपण ठळकपणे नजरेत भरतं.
1945 सालचा एमजीएमचा (मेट्रो गोल्डविन मेयर) चित्रपट होता-‘दि वैली आफ डिसीजन.’ दिग्दर्शक होता-टे गार्नेट. पीट्सबर्ग शहरातील स्कॉट मिलचा मालक म्हणजेच डोनाल्ड क्रिस्प. या स्कॉट महाशयांच्या सहा मजली ऐसपैस घरांत मिस्ट्रेस म्हणून रूजू होते-मिस मेरी म्हणजेच ग्रीर गारसन. त्या घरातील सर्वात मोठा मुलगा-पॉल (ग्रेगरी पैक). मेेरीचे वडील (लियोनाल बेरीमोर) पायांनी अधू असून सतत व्हीलचेयर वर वावरतात, ते यूनियनचे कट्टर पुरस्कर्ते. चित्रपटाची पार्श्वभूमी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुआतीची.
मेरीच्या वडिलांचं अख्खं आयुष्य मालकांशी झगडण्यांत गेलेलं, अन् तिकडे मेरी स्कॉट परिवारचं मन जिंकून घेते. पॉल तर तिच्या प्रेमातच पडतो. तो जेव्हां तिला रीतसर मागणी घालतो, तेव्हां ती आनंदाने अक्षरश: फुलून जाते...पण तिला हे माहीत अाहे की पॉल करितां स्कॉट महाशयांनी मित्राची मुलगी पसंत केलेली आहे. म्हणून ती पॉल ला निक्षून सांगते की आपली भेट होणं शक्य नाही, तू मला विसरून जा. याच दरम्यान पॉलच्या बहिणीचं लग्न होतं व मेरी तिची मिस्ट्रेस बनून लंडनला निघून जाते. (हे दृश्य बघतांना नकळत सोहराब मोदींच्या ‘शीशमहल’ ची आठवण झाली, कारण त्यात नसीम बानो देखील मालकाच्या मुलीचं खलनायकापासून (प्राण) रक्षण करते. त्यांत सोहराब मोदींनी वडिलांची भूमिका केली होती.)
इकडे मिस्टर स्कॉट आपल्या मित्राच्या मुली सोबत पॉल चं लग्न ठरवतात. पण त्याचं तिकडे लक्ष्यच नसतं. एके दिवशी मिस्टर स्कॉट पॉल ला जाब विचारतात-
‘तुझा विचार काय आहे..., कामाकडे देखील हल्ली तुझं लक्ष्य नसतं...पण जिच्या सोबत तुला आयुष्य काढायचंय, तिच्याकडे तरी लक्ष देत जा की...!’
स्वत:चं उदाहरण देत ते सांगतात-‘अरे, तुझ्या वयाचा असतांना मी तुझ्या आईचा प्रत्येक शब्द उचलून धरला, विचार तुझ्या आईला... म्हणूनच आज आमचा संसार सुखाचा आहे...’
यावर पॉल उत्तरतो-‘मला त्या मुलीशी कर्तव्य नाही...’ आणि निघून जातो.
स्त्ब्ध उभे मिस्टर स्कॉट बायकोला विचारतात-‘कुणी दुसरीच आहे कां याच्या मनांत...?’
त्या सांगतात-‘हो...,ती दुसरी कुणी नसून आपली मेरी आहे...’
ते आश्चर्यचकित होतात. नंतर पत्र पाठवून ते मेरीला लंडनहून परत बोलावतात. तिला रिसीव करण्यासाठी स्टेशनावर जातात व वाटेत तिला पॉल शी लग्न करण्याची विनंती करतात, हे ऐकून मेरी भारावून जाते.
मध्यंतरीच्या काळात मिलमधे संप असल्यामुळे उत्पादन ठप असतं. मेरी लंडनहून परतल्यावर एके दिवशी मिस्टर स्कॉट आणि पॉल मधे मिलच्या संदर्भात चर्चा होते. यूनियनच्या सर्व मागण्या मानून घेण्यावर सहमती झाल्यावर बाप-लेक मिलकडे निघतात. तिकडे शेवटच्या लढाईसाठी मेरीचे वडील, तिचा भाऊ व कामगार हे सर्वजण मिलकडे निघतात. मिस्टर स्कॉट कामगारांच्या सर्व मागण्या मंजूर देखील करतात...पण एका छोट्याशा गफलतीमुळे झालेल्या चकमकीत मेरीचे वडील मिस्टर स्कॉट वर गोळ्या झाडतात. उलटून झालेल्या गोळीबारांत त्यांचा देखील करूणांत होतो. ही घटना मेरीच्या समोर घडते, परिणामी ती पॉल सोबत लग्न करण्यास नकार देते व आपल्या निर्णयावर ठाम राहते.
खरं म्हणजे चित्रपट इथेच संपायला हवा. पण नाही...वडिलांच्या मित्राच्या मुलीशी पॉल लग्न करतो, ती फारच गर्विष्ठ आहे. स्कॉट मिल तिला नकोशी झालेली आहे. ती पॉलला मिल विकून टाकायला सांगते, तो नकार देतो. याच दरम्यान पॉलची विधवा आई आपल्या जवळ असलेले मिलचे शेयर मेरीच्या नावाने करून तिच्या मांडीवरच मान टाकते. आई गेल्यावर भाऊ-बहिण एकत्र जमतात, तेव्हां पुन्हां मिल विकण्याचा विषय निघतो. तेव्हां मेरी त्या सर्वांना स्कॉट मिलचे महत्व पटवून सांगते व स्कॉट परिवार गुण्या-गोविंदाने नांदू लागतो.
नायिकेचा ठामपणा...
या चित्रपटांत नायिकेने दाखविलेला ठामपणा हिंदी चित्रपटांत कधीच दिसला नाही. पॉल आणि मेरी, दोघांच्या वडिलांचा मिलमधे झालेल्या चकमकीत करूण अंत होतो. नंतर पॉल मेरी जवळ लग्नाचा आग्रह धरतो, तेव्हां ती त्याला नकार देते. पॉल तिला झालं-गेलं ते विसरून पुन्हां नव्या आयुष्याची सुरवात करण्याचा आग्रह करतो. पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहून स्पष्ट शब्दांत त्याला सांगते-
‘मी तुझ्याशी लग्न करुं शकत नाही...कारण मिसेस स्कॉट माझ्या समोर येता क्षणी मला आठवेल की त्यांच्या या स्थितीला, त्यांच्या वैधव्याला मीच जवाबदार आहे. माझ्या वडिलांच्या एका अविवेकी निर्णयामुळेच मिसेस स्कॉटची ही अवस्था झालीय. मनांत अपराधीपणाची ही भावना घेऊन मी स्कॉट घराण्यांत सुखानं कधीच नांदू शकणार नाही...’
पॉल निरुत्तर होतो व वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न करून मोकळा होतो.
बाॅलीवुडच्या चित्रपटांमधे दोन घराण्यांतील खानदानी दुश्मनी ठरलेली. घरातील मुला-मुलींचं प्रेम, त्यासाठी खून-खराबा...पण इतकं सगळं झाल्यावर देखील त्यांत शेवटी दाखवतात की नायिका, नायकाच्या घरांत सुखाने नांदू लागली...या पार्श्वभूमी वर ‘दि वैली आफ डिसीजन’ मधील ग्रीर गारसन चा स्पष्टवक्तेपणा ठळकपणे जाणवला...आठवणीत कायम घर करून गेला...
‘शीशमहल’ देखील अपवाद नाही
सोहराब मोदींचा चित्रपट होता-‘शीशमहल.’ त्यांत सोहराब मोदी, प्राण, उल्हास, नसीम बानो होते. मोदी जहागीरदार असून शीशमहलचे मालक असतात. कफल्लक झाल्यामुळे त्यांचं शीशमहल नीलाम होतं. आता घराची स्थिति बेताची म्हणून ते पेंटिंग बनवून घर चालवतात, हेका मात्र कायम. त्यांची मुलगी रंजना (नसीम बानो) नोकरी करते ती थेट शीशमहल मधे. प्राण शशिकला ला फसवूं बघतो, तेव्हां ती तिचं रक्षण करते. सोहराब मोदींना कळतं की माझी मुलगी शीशमहल मधे नोकरी करते, तर ते खानदानी तलवार घेऊन शीशमहला कडे धाव घेतात. तिथे घडणारया घटनांमुळे त्यांचे डोळे उघडतात, मग ते त्याच तलवारी ने आत्महत्या करतात, पण नसीम मात्र डोळ्यां देखत बापाने आत्महत्या केल्यानंतर देखील शीशमहलची सून म्हणून वावरते.
---------------
प्रतिक्रिया
5 Jul 2016 - 7:06 am | तुषार काळभोर
हिचा फोटो पाहिल्यावर नर्गिसची आठवण येते.
5 Jul 2016 - 7:55 am | महामाया
बिलकुल सही।
5 Jul 2016 - 6:03 pm | सिरुसेरि
ग्रेगरी पैकचे "मॅकेन्नाज गोल्ड " , "द ओमेन" आठवतात .
5 Jul 2016 - 6:54 pm | महामाया
ग्रेगरी पैक चे गन्स ऑफ नेवरोन, रोमन हॉलिडे, स्पेल बाउंड, दि ब्वायज फ्राॅम ब्राजील देखील आठवतात....
5 Jul 2016 - 7:00 pm | यशोधरा
ग्रेगरी पेकवर एक वेगळा लेख येऊ देत की प्लीज.
6 Jul 2016 - 11:39 am | बोका-ए-आझम
एकतर ही कादंबरी अप्रतिम आहे. त्यावरचा हा चित्रपटही सुंदर आहे. अॅटिकस फिंचच्या भूमिकेतला ग्रेगरी पेक is just perfect!
5 Jul 2016 - 7:13 pm | पद्मावति
+१
5 Jul 2016 - 8:44 pm | महामाया
Ok...
6 Jul 2016 - 11:36 am | बोका-ए-आझम
अजूनही अबाधित आहे बहुतेक. सलग पाच (एकूण ७) आॅस्कर नामांकनं मिळवायचा. प्रत्यक्ष आॅस्कर एकदाच मिळालं - मिसेस मिनिव्हर साठी.
7 Jul 2016 - 1:40 am | महामाया
1940 ते 1950 या दशकातील अभिनेत्री ग्रीर गारसन ला हॉलीवुडची ‘फर्स्ट लेडी ऑफ दी स्क्रीन’ म्हटलं जातं...तिला तिच्या समाजकार्या बद्दल देखील ओळखलं जातं...
1903 साली जन्मलेल्या ग्रीर ने लंडनच्या किंग्ज कॉलेज सोबत फ्रांसच्या यूनिवर्सिटी ऑफ ग्रेनोब्ले मधे फ्रेंच व 18व्या शतकातील साहित्या चा अभ्यास केला. तिला शिक्षिका व्हायचं होतं...पण ती थिएटर कडे वळली...
1932 साली तिने पहिल्यांदा बर्मिंघम मधील रेपेटोरी थिएटर मधे स्टेज वर काम केलं. 1937 साली तिने शेक्सपियर च्या ट्वेल्थ नाइटच्या टेलीविजन रुपांतरण मधे डोरोथी ब्लैक सोबत काम केलं...हे प्रस्तुतीकरण एलेक्सेंड्रा पैलेस हून केल्या गेलेल्या बीबीसीच्या प्रायोगिक स्वरुपाचा एक भाग होतं. टेलीविजन वर आलेलं शेक्सपियरचं हे पहिलं नाटक होतं.
1937 साली लुईस बी. मेयर नी ग्रीर ला एमजीएम सोबत करारबद्ध केलं. 1942 साली तिला ‘मिसेज मिनीवर’ साठी बेस्ट अभिनेत्रीचा आॅस्कर एकेडमी एवार्ड मिळाला. हा पुरस्कार घेतांना तिने दिलेलं भाषण तब्बल पाच मिनिटे तीस सेकेंदाचं होतं...याची नोंद गिनीज बुक मधे आहे...या नंतरच एकेडमी ने ऑस्कर विजेत्यांच्या भाषणाची ची वेळ मर्यादित केली...
तीन लग्न केले...
ग्रीर ने तीन लग्न केले. पहिलं लग्न 1933 साली एडवर्ड एलेक एबॉट स्नेलसन (नंतर सर एडवर्ड, हा ब्रिटिश सिविल सर्वेंट होता, जो पुढे इंडियन अफेयर्स चा एक्सपर्ट व जज झाला) सोबत केलं...हा एडवर्ड नागपूर ला होता म्हणे...पण हे लग्न फक्त हनीमून पर्यंत टिकलं कारण रंगभूमी आणि चित्रपटांची ओढ ग्रीर ला परत घेऊन गेली...
तिनं दुसरं लग्न 39 व्या वर्षी रिचर्ड ने (Richard Ney) सोबत केलं. हा रिचर्ड 27 वर्षांचा असून तिच्या हून 12 वर्षे लहान होता. तसंच ‘मिसेज मिनीवर’ मधे त्याने ग्रीरच्या मुलाची भूमिका केली होती. 1947 मधे दोघांचा डायवोर्स झाला...
1949 साली ग्रीर ने टेक्सासच्या ऑयलमेन आणि हार्स ब्रीडर ई.ई. ‘बडी’ फोगेल्सन सोबत आपलं तिसरं लग्न केलं. हा बड़ा आसामी होता...1955 नंतर ग्रीर नी समाजकार्याकडे आपला मोर्चा वळवला...
रेंडम हार्वेस्ट म्हणजेच एक मुसाफिर एक हसीना...
1942 सालचा ग्रीर गारसन चा चित्रपट होता-रेंडम हार्वेस्ट. यात तिच्या सोबत रोनाल्ड कोलमन होता. हा चित्रपट बघतांना नकळत साधना आणि जाॅय मुखर्जी असलेला 1962 सालचा ‘एक मुसाफिर एक हसीना’ हा चित्रपट आठवत हाेता.
वाल्टर पिजन सोबत केले 8 चित्रपट
ग्रीर ने वाल्टर पिजन सोबत 8 चित्रपटांत काम केलं...चित्रपट होते-
1. ‘ब्लाज्मस इन दि डस्ट’ (1941),
2. ‘मिसेस मिनीवर’ (1942),
3. ‘मैडम क्यूरी’,
4. ‘मिसेज पर्किंग्टन’,
5. ‘जूलिया मिसबिहेव्ज’ (1948),
6. ‘दैट फोरसाइट वूमन’ (1949) (That Forsyte Woman),
7. ‘दि मिनीवर स्टोरी’ (1950) आणि
8. ‘स्कैंडल एट स्कूरी (1953) (Scandal at Scourie).
--------------------
8 Jul 2016 - 6:05 pm | पगला गजोधर
लिहित रहा...
8 Jul 2016 - 10:48 pm | अभिजीत अवलिया
सुन्दर ...