मला त्या गावी जायचेय...

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in जनातलं, मनातलं
13 Jun 2016 - 2:20 pm

शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी...
स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी..
श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी..
महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा..
मला त्या गावी जायचेय...

उजव्या भिंतीपलीकडल्या खोलीत पु.ल. राहत असावेत…
सकाळी त्यांच्याच पेटीने जाग यावी..
नळावरील भांडणे, शाळेची गडबड, नोकरदारांची घाई आम्ही दोघांनी एकत्र पाहावी..
पु.लं.नी प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करावी..व मी मनसोक्त हसावे..
बटाट्याच्या चाळीतील सगळी मंडळी तिथेच वास्तव्यास असावी...
तीच दृश्ये, तेच सण, त्याच चर्चा आज भाईंसमवेत अनुभवाव्यात
मला त्या गावी जायचेय...

चाळीच्या समोर ते 'चौकोनी कुटुंब' बंगल्यात राहत असावे..
उन्हाळ्याच्या सुट्टीत अंतूशेटांच्या पोफळीच्या बागेत विसावा घ्यायचाय..
नंदा प्रधानच्या गाडीवर बसून मरीन ड्राइव्ह पाहावा...
त्याने केलेले मुलीचे वर्णन याची देही अनुभवावे..
रोज पानवाला बघतो... आज भाईंबरोबर त्याला भेटावे..
मला त्या लग्नात जायचेय जिथे नारायणाचा मुरारबाजी झालाय..
मला त्या गावी जायचेय...

खूप शिवाजयंत्या पाहिल्या... आज भाई आणि हरितात्यांसोबत राज्याभिषेक पाहायचाय..
उभे राहावे लागले तरी चालेल, पण त्या 'म्हैस'वाल्या STमध्येच चढायचेय..
अगदी पु.लं.च्या शेजारी नाही.. पण मागे तरी राहायचेय..
कुंभारलीचा घाट उतरून चिपळुणात विसवायचेय..
आमच्याच चाळीत शेजारी येणार्‍या सखाराम गटण्याला एकदा घरी चहाला बोलवायचेय..
मला त्या गावी जायचेय...

मुंबईला जाताना पेस्तनकाकांबरोबर गप्पात रमायचेय..
पु.ल. आणि पेस्तनकाका यांच्या गप्पांमधून खूप काही अनुभवायचेय..
लक्ष्मणांच्या 'कॉमन मॅन'ला घरी राहायला बोलवायचेय..
तो जाईल तिथे.. जाईल तेव्हा त्याच्याबरोबर हिंडायचेय..
मला त्या गावी जायचेय...

खूप इच्छा आहे 'चितळे मास्तरांना' एक नवीन चप्पल जोडी घेऊन द्यायची..
कितीही त्रासदायक असले, तरी शत्रुपक्षाच्या ट्रीपचे फोटो बघायला जायचेय..
फोटो बघत असताना त्यांचीच चाललेली चर्चा ऐकून खूप बोअर व्हायचेय
एखाद्या इमारतीचे बांधकाम बघायला भाईंना आग्रह करायचाय..
एखाद्या कार्यक्रमाला भाईंसोबत प्रमुख पाहुणा म्हणून मिरवायचेय...

मला त्या गावी जायचेय...

अगदी जपान-युरोपची सहल नको..
फक्त दुपारच्या चहाला पु.लं.च्या तोंडून ते ऐकायचेय..
जपानी पंखा असो की युरोपियन दारू.... त्याचा अनुभव भाईंच्या प्रत्यक्ष वर्णनातून घ्यायचाय
जन्मावरून पुणेकर असलो, तरी मुंबईकर आणि नागपूरकरपण व्हायचेय
कॉमन मॅनसारखे डोळे करून.. पु.लं. आणि अत्र्यांना गप्पा मारताना ऐकायचेय..
मला त्या गावी जायचेय...

'बालगंधर्व'च्या उद्घाटनात पु.लं.चा श्रोता व्हायचेय
सुनीताबाईंच्या व्याघ्रदर्शनाला कॅमेर्‍याशिवाय जायचेय
आमच्या चाळीतल्या लोकांबरोबर 'त्या' पुण्याच्या प्रवासाला जायचेय.
गच्चीच्या चळवळीत घोषणा द्यायला जायचेय..
मला त्या गावी जायचेय...

काल्पनिक असलो तरी चालेल..
पण R.K.चा तो कॉमन मॅन बनून पु.लं.च्या संपूर्ण प्रवासात एक सहप्रवासी व्हायचेय..

...फक्त एकदाच मला त्या गावी जायचेय...

d

हृषिकेश पांडकर

रेखाटनविचार

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Jun 2016 - 2:27 pm | पद्मावति

अतिशय सुरेख!!!

जगप्रवासी's picture

13 Jun 2016 - 2:29 pm | जगप्रवासी

एकदम मस्त

अभ्या..'s picture

13 Jun 2016 - 2:35 pm | अभ्या..

चांगली आयड्या है पण जरा शुध्दलेखनाची लैच एक केलीय हो.
सुनीताबाईंचा डोळा फार कडक हो ह्याबाबतीत. येऊ देणार नाहीत तुम्हाला शेजारी. ;)

साहित्य संपादक's picture

13 Jun 2016 - 4:22 pm | साहित्य संपादक

योग्य त्या सुधारणा केल्या आहेत.

प्रणवजोशी's picture

13 Jun 2016 - 2:58 pm | प्रणवजोशी

खरच खुपच छान

सुधांशुनूलकर's picture

13 Jun 2016 - 3:57 pm | सुधांशुनूलकर

खूपच छान.

भन्नाट. आइडीयाच आवाडली एकदम.

सामान्य वाचक's picture

13 Jun 2016 - 4:54 pm | सामान्य वाचक

आजच राजू परुलेकरची पोस्ट वाचली चेपू वर
कि पु ल कसे थोर ई ई नव्हते
आणि आत्ता तुमचा हा लेख वाचला

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 6:31 pm | टवाळ कार्टा

अस्तात ओ...आंबा न आवडणार्या लोकांतले आहेत ते...बाकी आंबा न आवडणार्या लोकांना पु.ल.सुध्द्दा इतके काही खास वाटत नैत हा योगायोग समजावा का? ;)

सामान्य वाचक's picture

13 Jun 2016 - 7:44 pm | सामान्य वाचक

मला दोन्ही आवडतात, मध्यमवर्गीय असल्यामुळे

प्रचेतस's picture

13 Jun 2016 - 7:44 pm | प्रचेतस

आंबा आवडत नै असं कोण, कधी म्हटलं?

इशा१२३'s picture

13 Jun 2016 - 4:59 pm | इशा१२३

मस्त!

इशा१२३'s picture

13 Jun 2016 - 4:59 pm | इशा१२३

मस्त!

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 6:30 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम

विवेकपटाईत's picture

13 Jun 2016 - 7:54 pm | विवेकपटाईत

मस्त आवडले.

ईआ's picture

13 Jun 2016 - 7:57 pm | ईआ

मस्तच...

दुर्गविहारी's picture

13 Jun 2016 - 8:05 pm | दुर्गविहारी

फारच सुन्दर. पु.ल. च्या पुण्यतिथीची उत्तम आदरान्जली

स्मिता_१३'s picture

13 Jun 2016 - 10:28 pm | स्मिता_१३

सुरेख , मनस्वी !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2016 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

प्रफ's picture

14 Jun 2016 - 3:11 pm | प्रफ

"खूप इच्छा आहे 'चितळे मास्तरांना' एक नवीन चप्पल जोडी घेऊन द्यायची.." वाचुन पाणीच आल डोळ्यात..!!

खुपच सुंदर लेखन. मला न्याल तुमच्या सोबत त्या गावाला??

सत्याचे प्रयोग's picture

14 Jun 2016 - 3:24 pm | सत्याचे प्रयोग

मस्तच त्या साठ कुटुंबांच्या चाळीत माझीही एक खोली असावी..