सविता कोर्कू... भाग - २ शेवटचा.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 6:03 pm

सविता कोर्कू... भाग - १
दुसरा लिहून झालाय आत्ताच. म्हणून लगेचच टाकला आहे... :-)
....‘‘देशमुख, मी म्हणतो तुम्ही कशाला असल्या मित्रांच्या नादी लागता ? तुमच्या गावात शेतीवाडी असेल ना ? ती कसा, सुखात रहा. या अशा वागण्यात तुमचे काही भले नाही...!’’

त्याच्या नजरेत काहीतरी वेगळीच चमक दिसली मला. तो एकदम म्हणाला, ‘काका मी फौजेत भरती होणार बस्स !’’ असे म्हणून तो उठला आणि एकदम चालू लागला......

थोड्याच वेळात सविता आली. मी तिला काय घडले ते सांगितले.

‘‘जाऊ दे काका !’’ ती म्हणाली.. थोड्याच वेळात आम्ही खोखो हसत सुटलो....

‘‘चला जाऊया आता घरी...’’

‘‘हो मलाही उशीर झालाय ! बोलणी बसणार आज...’’ सविता म्हणाली. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी मोठ्या अभिमानाने नजर टाकली व गाडीला स्टार्टर मारला....

या शर्यतीला सात आठ महिने झाले असतील. मुलीबरोबर स्काईपवर गप्पा मारताना सविताचा विषय निघाला. म्हणजे आमच्या सौं.नीच काढला. मुलीने एक बातमी सांगितली. अर्थात ती ऐकून आम्हाला काही धक्का वगैरे बसला नाही. सविता एका मुलाबरोबर फिरत असते असे तिला तिच्या एका मैत्रिणीकडून कळले होते. ते नैसर्गिक व स्वाभाविकही होते. तो विषय तेवढ्यावरच संपला.

‘‘काय गं, सविता बरेच महिन्यात दिसली नाही रेसकोर्सवर ! नाही ? आणि तिच्याबरोबर पळणाऱ्या मुलीही दिसल्या नाहीत.’’ मी म्हणालो.

‘‘हो ! ना ! अहो ती पतियाळाला जाणार होती ना ? ’’ इति सौ.

‘‘पण तिचे कोच दिसले होते मला एकदा. कदाचित त्यांनी ट्रॅक बदलला असेल.’’ मी.

थोडे महिने असेच गेले आणि रेसकोर्सवर सविताची मैत्रीणीची गाठ पडली. त्या अनोख्या शर्यतीच्या आठवणी निघाल्याच पण त्याहूनही धक्कादायक बातमी कळली म्हणजे सविताने देशमुखबरोबर लग्न केले होते.

‘‘काका तिला तिच्या नवऱ्याने रेल्वेची नोकरी सोडायला लावली व साताऱ्याला नेऊन ठेवले. बरं नेऊन ठेवले तर ठेवले पण तिला कोच म्हणून चांगली नोकरी आली होती तीही करुन दिली नाही. असे ऐकले आहे की ती आता शेतावर राबते व तिचा सासरी फार छळ होतो. मूल नाही ना तिला. ’’ त्या मुलीने बातम्या दिल्या.

’‘अणि देशमुख ? तो कुठे आहे ? त्याला माहीत नाही का हे सगळे ?’’

‘‘काका कसला तो देशमुख ? शर्यतीनंतर पुढच्याच महिन्यात तो जवान म्हणून फौजेत भरती झाला.’’ लग्नाच्या पहिल्याच दिवशी आमच्यासमोर त्याने सविताला सांगितले की तो त्या शर्यतीचा सूड उगवून तिची घमेंड उतरवणार आहे. आम्हाला वाटले तो चेष्टा करतोय. पहिल्याच रात्री म्हणे तो खूप दारु पिऊन आला व सविताला बरीच मारहाण केली. काका सगळ्यात वाईट म्हणजे त्याच्या धाकट्या भावानेही सवितावर हात टाकला.

सगळा प्रकार विचित्रच झाला म्हणायचा. सविताच्या या परिस्थितीला मीही थोडाफार कारणीभूत होतो.

‘‘तिला मला भेटायचे आहे. तिचा पत्ता वगैरे काही आहे का ? ’’

’‘नाही तिचा आता कोणाशीही संबंध उरला नाही. तिनेच तोडले सगळे. तिच्या सासरचेही तिला शेत सोडून इतर ठिकाणी सोडत नाहीत. तिला शेतावरच एक झोपडी बांधून दिली आहे म्हणे. एकदा आमच्यापैकी काही नांदेडला तिच्या घरी गेले होते त्यावेळी तिच्या आईने सांगितलेली ही हकिकत. तिच्या घरच्यांची परिस्थिती आता फारच वाईट झाली आहे काका ! पार भिकेलाच लागले ते घर. पण तिने पाठवलेले एक पत्र माझ्याकडे आहे. त्यावर बहुधा तिचा पत्ता असावा.’’

‘‘मला देशील का ते पत्र ?’’

‘‘हो ! उद्याच देते.’’ असे म्हणून तिने माझा निरोप घेतला.

त्या रात्री मला काही झोप आली नाही. डोळ्यासमोर सारखा तिचा लहानपणीचा चेहरा आठवत होता. काय करावे ? काय करावे... माझ्या मनातील चलबिचल सौं.नी ओळखली.

‘‘अहो असे नुसते तळमळत बसून काय होणार ? तुमचा एकही दिवस धड जाणार नाही. त्यापेक्षा एकदा सोक्षमोक्ष लावून टाका त्या प्रकरणाचा.’’ बायको अगदी माझ्या मनातीलच बोलली. मनातील चलबिचल एकदम थांबली.

त्या मुलीकडून ते पत्र घेऊन सविताचा साताऱ्यातील पत्ता शोधण्यास काही फार वेळ लागला नाही. माझा एक अधिकारी (मेजर सुनील पवार) साताऱ्यात स्थायिक झाला होता. त्याने तो पत्ता तर शोधलाच पण तिची गाठही घेऊन आला. त्याने सांगितलेली हकिकत अंगावर काटा आणणारी होती. सविताला शेतातील त्या झोपडीत जवळजवळ कोंडून ठेवण्यात आले होते. तिच्या डोळ्यात आता वेडसर झाक दिसत होती. सगळ्यात नीचपणा म्हणजे तिच्यावर राखण करण्यासाठी देशमुखच्या धाकट्या भावाला ठेवण्यात आले होते. तिच्यावर कसला प्रसंग ओढावला असेल याची मला कल्पना आली. तिला भेटायला जाणे म्हणजे तिच्या हालात भर टाकण्यासारखे होते. तिची भेट घ्यायची म्हणजे तिच्या त्या दिराला तेथून काही काळ तरी बाहेर काढायला हवे.

ती जबाबदारी माझ्या मित्राने आनंदाने त्याच्या शिरावर घेतली. हे सगळे त्यांना कसलाही संशय न येऊ देता पार पाडायचे होते.

अखेरीस एके दिवशी मित्राचा दूरध्वनी आला.

‘‘उद्याच संध्याकाळी पाच वाजता तू तिला भेटू शकतोस. पण ती तुला ओळखेल याची खात्री देता येत नाही. मला वाटते तिला तेथून बाहेरच काढावे लागेल. पण पोलिसात तक्रार वगैरे होणार. त्याची तयारी आहे ना तुझी ?’’

‘‘माझी सगळ्याला तयारी आहे सुनील ! पण यार हे जमविलेस कसे ?’’

‘‘अरे माझ्या रमच्या दहा एक बाटल्या खर्च झाल्या त्याच्यार्यंत पोहोचण्यास. ते सगळे कुटुंब बदनाम आहे. हे कसले देशमुख? यांची वृत्ती नीच, करणी नीच...त्याने दुसरे लग्नही केले आहे म्हणे...यांना कोणाच्याच अब्रूची कसलीही चाड नाही...पण त्यावर आपण सविस्तर भेटल्यावर बोलू. पोलिसांचे काय करायचे ते सांग.’’

‘‘पुण्याचा एसिपी आपल्याच रेजिमेंटचा आहे. आपल्याला ज्युनिअर आहे, मागच्याच रेजिमेंट डे’ला भेटला होता. त्याची काही मदत मिळते का ते बघतो.’’

नशिबाने शुक्रवार होता व एसिपी शिंदेही भेटले. याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेतल्यामुळे पाच वर्षात निवृत्त होऊन पोलिस दलात प्रवेश केला होता. (त्या काळी तशी सवलत होती. फक्त दोनच पेपर देऊन परिक्षा उत्तीर्ण होता येत असे. मला वाटते आय एस् लाही तशी सवलत होती.) त्याने त्याच्या सहकाऱ्याला साताऱ्याला फोन करुन सगळ्या प्रकरणाची कल्पना दिली, त्याने आम्हाला प्रथम त्याच्या कार्यालयात बोलावले. हे दुसरे लग्न देशमुखला भारी पडणार होते हे निश्चित.
सकाळीच निघून साताऱ्याला १० वाजता पोहोचलो. सुनीलच्या घरुन पोलिस ठाण्यात जायचे होते. सुनीलचे घर शेतात, गावाबाहेर असल्यामुळे गाडीत बोलण्यास भरपूर वेळ मिळाला.

‘‘हं बोल !’’ मी म्हणालो.

‘‘काय बोलू? असली नालायक माणसे मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीत. मी सगळी माहिती काढली आहे. त्याने सविताशी लग्न केले आणि ते अर्थातच घरच्यांना ती अदिवासी असल्यामुळे मान्य नव्हतेच. पहिल्या दिवसापासून सासरी तिचा छळ सुरु झाला. त्याचा परिणाम आपण तिला भेटू तेव्हा तू पाहशीलच. या तुझ्या नालायक देशमुखने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले, तिला फशी पाडले. मला कळलेली बातमी अशी की तो तिला घरदार दाखविण्यास साताऱ्याला घेऊन गेला होता. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी केली, का दोघांच्या संमतीने ते झाले याची कल्पना नाही पण ती फसली हे खरे. जेव्हा हे तिला कळले तेव्हा तिला त्याच्याबरोबर लग्न करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अर्थात तसेही ती त्याच्याशी लग्न करणारच होती. लग्न झाले नांदेडला एका खेडेगावात...कुठे ते मला माहीत नाही....जेव्हा जोडपे परत साताऱ्यात आले, तेव्हापासून सविताची रवानगी शेतावर झाली.’’

‘‘पण युनिटमधे काही कळले नाही ?’’

‘‘याने काही सांगितले नसणार ! अरे यार आजकाल एवढा पर्सनल टच कुठे राहिलाय युनिटमधे ?’’

‘‘कुठल्या रेजिमेंटमधे आहे तो ?’’

‘’१० महार !’’

‘‘कोणी आहे का आपल्या ओळखीचे ?’’

‘‘ते शोधूया नंतर ! आधी हिचे काय करायचे ते पहावे लागेल. फारच वाईट परिस्थिती आहे रे तिची. काय होणार देवाला माहीत. मला नाही वाटत ती फार काळ जगेल !’’

ते ऐकल्यावर मीही जरा खचलोच. माझ्या मनात प्रथम रागाने थैमान घातले. मग त्याची जागा हळूहळू सूडाने घेतली. नंतर सूडाची जागा एका व्यवहारी विचाराने घेतली. चिडून चालणार नव्हते...

‘‘ठीक आहे !’’ मी मनाशी म्हटले. ‘‘याचे काय करायचे ते नंतर बघता येईल.’’

अखेरीस दुपारी देशमुखच्या शेतावर जायची वेळ आली. मला खरे तर जायचेच नव्हते पण अपराधाची टोचणी आत कुठेतरी भोके पाडत होती. माझी घालमेल पाहून सुनीलही म्हणाला,

‘‘हे बघ आता माघार घेऊन चालणार नाही ! जे काही समोर येईल त्याला तोंड द्यावेच लागेल. अरे कुठल्यातरी गोळीवर आपले नाव लिहिले आहे हे आपल्याला अगोदर माहीत असतेच, तरी पण आपण सगळ्या गोळ्यांना सामोरे जातोच ना ? तसेच समज....चल.. चिअर अप...’’ सुनीलला आयुष्यातील कुठल्याही प्रकरणांचा थेट गोळ्यांशी संबंध जोडण्याची वाईट सवय होती.

मग मीही स्वत:ला सावरले व मनाची तयारी करुन गाडीत बसलो. सातारा शहर पार करुन गाडी शेंदरे फाट्यावर उजवीकडे वळाली आणि हिरवीगार शेतं डोळ्यात भरु लागली. हिरवाईचा एक मस्त सुगंध असतो त्याने मनाला एक सुगंधित भुरळ घालण्यास सुरुवात केली. अशा वातावरणात शेती असणारा माणूस असली हिडीस कृत्ये करु शकतो यावर माझा विश्वास बसेना. पण माणसाचे काही सांगता येत नाही. हिटलरच्या डोंगरावरील घरात जेथे निसर्गाने आपले परमोच्च नितांत सुंदर स्वरुप उधळले होते त्याच वातावरणात त्याच्या मनात ज्यूंचे निर्दालन करण्याची योजना तयार झाली होती. निसर्ग माणसाच्या मनावर फुंकर घालू शकतो पण निर्दय हृदयावर नाही. हा देशमुख बुद्धिमान होता पण सैतान होता. आणि बुद्धिमान सैतान हा नेहमीच जास्त धोकादायक असतो. नशीब देशमुखची रेजिमेंट सियाचीनवर तैनात होती. पण त्याचे भाऊबंध तितकेच धोकादायक होते. वेशले गावाअलिकडे एका शेतात गाडी थांबली.

सुनील म्हणाला, ‘‘तू येथेच थांब जरा ! मी पाहून येतो.’’

तो गेल्यावर मी एकटाच गाडीत उरलो. गाडीबाहेर येऊन मी बॉनेटला टेकून सिगरेट शिलगावली. जेव्हा कोणी आसपास नसते तेव्हा काळ थांबतो, झाडे स्तब्ध होतात, वारा पडतो आणि वातावरण अनोळखी होते. क्षणभर मी भूतकाळात गेलो. माझ्या मनात देशातील समाजाविषयी एक अनोळखी भावना दाटून आली. स्त्रियांचे या पुरुषप्रधान संस्कृतीत पुढे काय काय हाल होणार आहेत देव जाणे ! बोटाला जळणाऱ्या सिगरेटचा चटका बसल्यावर मी भानावर आलो. मेंदू विचार करु लागला. तेवढ्यात सुनील माझ्या दिशेला येताना दिसला. त्यांच्या चालण्यातूनच मी ओळखले की प्रकरण गंभीर आहे.
मी त्या पाऊलवाटेने त्या झोपडीपर्यंत गेलो. ते एक फर्लांगाचे अंतर मला मैलभर वाटत होते. तेथे पोहोचल्यावर आत डोकावून बघण्याचे मला धाडस होईना.

जे दिसले त्याचे वर्णन करणे शक्यही नाही आणि शत्रूचीही अशी अवस्था होऊ नये. सविताचे केस पिंजारलेले होते. तिच्या कुरळ्या केसांच्या जटा झाल्या होत्या. सगळीकडे कुबट वास पसरला होता. तिने किती दिवस आंघोळ केली नव्हती कोण जाणे ! ती स्वत:शीच बडबडत होती, मधेच हसत होती. तिच्या नजरेत कुठलाच भाव दिसला नाही. तिने एकदम वर पाहिले आणि ती भेसूरपणे रडली. ते ऐकून आमचाही थरकाप उडाला. मी स्वत:ला सावरले व तिच्या समोर गेलो. आश्चर्य म्हणजे मला तिच्या डोळ्यात थोडीशी ओळख दिसली. मला पाहताच ती खाली कोसळली. तिच्या अंगात उभे राहण्याचीही शक्ती उरली नव्हती. तिला सावरुन मी तिच्या अंगावर दोरीवरची फाटकी साडी टाकली. मग आम्ही त्या जागेचे व सविताचे सेलफोनवर फोटो काढले. तिला आधार देत आम्ही तिला गाडीपर्यंत घेऊन आलो. तिला गाडीत शिरायचे नव्हते. हाताला हिसडे मारुन ती पळायचा प्रयत्न करु लागली. शेवटी सुनीलने तिच्या एक थोबाडीत दिल्यावर ती निमूटपणे गाडीत बसली. ती एकदम गप्प झाली ती सातारा येईपर्यंत. साताऱ्यात तिला पोलीस चौकीत आम्ही घेऊन आलो तेव्हा मात्र माझ्या डोळ्यात पाणी आले.
पुढचे सगळे सोपस्कार पार पाडून आम्ही तिला एका समाज केंद्रात भरती केले व लवकरच तिला घेऊन जाऊ अशी लेखी हमीही दिली. पुण्याला येण्याआधी तिच्या वैद्यकीय उपचारांची सोय करुन मी सगळ्यांचा निरोप घेतला.

‘‘सुनील जरा तिच्याकडे लक्ष ठेव. पैशाची काळजी करु नकोस. मला वाटते तिला पोलीस संरक्षणाची जरुरी भासेल. पुण्याहून काही मदत लागली तर कळव. मी पुण्याला जाऊन काय करता येते ते पाहतो. मला वाटते तिला कर्वे स्त्रीसंस्थेमधे भरती करावे. काहीतरी शिकून स्वत:च्या पायावर उभी तरी राहील. रेल्वे खात्याकडेही पत्र लिहून पहावे म्हणतो.’’

‘‘ ठीक आहे ! मी जरा त्याची युनीटमधे चौकशी करता येते का ते बघतो. आपल्या बॅचमधे एक जाधव म्हणून होता तो आठवतोय का ? त्याचा जावई १० महारमधेच आहे असे मला वाटते. सरदारजी आहे. बघू त्याची काही मदत होते आहे का ! काय ?’’

‘‘यस ! थँक्स सुनील, थँक्स ! याबाबतीत कुठेही काही बोलू नकोस प्लीज. आणि त्या इन्स्पेक्टरला सांगून मिडीयाला यापासून दूर ठेवता आले तर बघ. अजून काही महिने तरी.’’

‘‘ते करता येईल. काळजी नको.’’ सुनील...

मी पुण्याला परतलो. आणि १० महारच्या चौकशीला लागलो. जी काही माहिती पाहिजे होती ती मिळाल्यावर मी सियाचीनच्या बेसकँपला भेट द्यायचे ठरवले. पण जाधवच्या जावयाचा फोन आला की ‘‘ सर बेसकँपपे आने की कोई जरुरत नही. हम लेहमे आपको मिल सकते है ! मी दर मंगळवारी लेहला येतो.’’ सरदारजी चांगले मराठी बोलत होता. बायको मराठी, शिवाय पुण्यात एन् डी ए मधे चार वर्षेही काढली असणार त्याने.

‘‘ ठीक आहे. मी त्याप्रमाणे माझी भेट प्लॅन करतो’’ असे म्हणून मी फोन ठेवला. या माणसाचे नाव मी देऊ शकत नाही. पण त्याचे उपकार मी कधीच विसरु शकत नाही. असो.

मी इकडे रेल्वेशी पत्रव्यवहार चालू केला. तिचा फंड, व इतर फायदे मिळण्यासाठी मला बराच खटाटोप करावा लागला. परत नोकरी मिळेल का यावर कसलेच आश्वासन मिळाले नाही. पण या प्रकरणात रेल्वे खात्यात बऱ्याच ओळखी झाल्या, त्यांचे कायदे कानून माहीत झाले. चला हाही एक फायदाच झाला म्हणायचा.

आता साताऱ्याहून सविताला पुण्याला घेऊन यायचे काम शिल्लक होते. तेही मी त्याच आठवड्यात पार पाडले व तिला एका स्त्रीस्वास्थ्य संस्थेत ठेवले. त्याच दिवशी मी रात्री मुलीला या सगळ्याची कल्पना दिली. तिनेही या सगळ्याला मान्यता दिली.

‘‘ आम्ही पुढच्या वीस तारखेला लेहला जाणार आहोत जरा विश्रांतीसाठी’’ मी म्हटले. कन्येनेही जरुर जा असा सल्ला दिलाच.

फोनवरुन कॅप्टन ‘क्ष’ला कल्पना देऊन आम्ही रविवारीच लेहला पोहचू अशा बेताने विमानाने प्रस्थान ठेवले. रविवारी
पोहोचल्यावर आराम करुन कॅप्टनला फोन केला. मंगळवारी संध्याकाळी ऑफिसर्स मेसमधे भेटायचे ठरले. मी प्रथम सगळ्या घटना क्रमवार लिहून काढल्या. त्याचा त्याच्याशी बोलताना उपयोग होणार होता. शिवाय देशमुखची व त्याच्या घराची कुंडलीही मांडली.

मंगळवार उजाडला आणि मी पुण्याला फोन करुन सविताची खबरबात घेतली. नशिबाने तिची तब्येत आता खूपच सुधारली होती आणि मुख्य म्हणजे तिला सगळं आठवत होते. नारीशक्तीच्या आधाराने ती पोलिसात तक्रार नोंदविण्यासही तयार झाली होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिला दिवस गेले होते. ते मूल कोणाचे होते याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन ती त्याला जन्म देणार होती. ते ऐकून मला तिचे कौतुक वाटले. मातृत्वाच्या पुढे बिजाचे निसर्गाला बहुधा काही महत्व वाटत नसावे....नाहीतर अनेक स्त्रियांनी असा निर्णय घेतला नसता. तिच्या या निर्णयाचा पुढे फारच उपयोग झाला...

संध्याकाळी आमची भेट झाली. सौं.ना हॉटेलवरच ठेवले. ती येते म्हणत होती पण काही गोष्टी बाप्यां बाप्यांच्यातच झालेल्या बऱ्या असे मी म्हटल्यावर तिने फार काही हट्ट केला नाही. सियाचीनवरील गप्पागोष्टी झाल्या. तेथील आयुष्य किती खडतर आहे हे मलाही माहीत होतेच. मीही तेथे एक वर्ष काढले होतेच. त्याच्या सासऱ्यांच्या व आमच्या काळातील आठवणींनी त्या थंडीतही आमच्या मनात थोडी ऊब आणली. मग मी मुख्य विषयाला हात घातला. त्याने सांगितलेल्या माहितीवरुन देशमुखांची युनीटमधील वागणूकही काही ठीक नव्हती. एकदा त्याने पेट्रोलिंगच्या वेळी चक्क पळ काढला होता. थोडक्यात तो भेकड होता. नुसते अंगाने तगडे असून चालत नाही तर त्या शरीराचा व शक्तीचा उपयोग करायला मनाची तयारी लागते. चाकू हातात असून चालत नाही. तो चालवायला हिंमत लागते व त्याने झालेल्या जखमेतून वाहणारे रक्त पहायलाही हिंमत लागते. ती हिंमत त्याच्यात नव्हती हेच खरे. मग मी त्याला सविस्तरपणे त्याने काय केलंय हे सांगितले. एका खेळाडूची त्याने कशी वाट लावली, इ इ..सगळी हकिकत वर आलेलीच आहे, ती मी परत उगाळत नाही....नंतर आम्ही बराच वेळ त्याचा कसा बंदोबस्त करता येईल यावर चर्चा केली. तो सुटीवर आल्यावर तो पोलीसात तक्रार दाखल करणार मग कोर्ट कचेऱ्या होणार....

‘‘ कॅप्टन, (आपण या अधिकाऱ्याला कॅप्टन म्हणूनच संबोधू) होऊ देत कोर्ट कचेऱ्या... मी सांभाळीन ते सगळे. मला फक्त एकाच गोष्टीत तुझी मदत हवी आहे. यावर्षी त्याला सुट्टी मिळायला नको. पुढे राहू देत नाहीतर बेसकँपवर पाठव पण घरी नको...’’

‘‘नही नही सर, इससे कुछ होनेवाला नही ! त्याने काही प्रश्न सुटणार नाही.... मी बघतो काय करायचे ते !’’ कॅप्टन उद्वेगाने म्हणाला.

पुढचे दोन दिवस लेहमधे हिंडून आम्ही पुण्याला परतलो. एक दोन दिवसाने आम्ही सविताची गाठ घेतली. तिच्यात खूपच सुधारणा झाली होती. ती चक्क खुषीत होती. अर्थात त्या कैदेतून सुटका झाल्यावर कोणाला आनंद नाही होणार ? देशमुखची वाट न पाहता त्याच्या धाकट्या भावाने पोलिसात तक्रार दाखल करुन आमच्या मागे चौकशीचे बालंट लाऊन दिले होते..पण मला त्याची विशेष काळजी नव्हती. सविताच्या पोटात देशमुखांचे मूल वाढत होते... त्याच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीच्या वाटणीचा फायदा घेऊन देशमुखांचा आवाज बंद करण्यास वेळ लागला नसता. शिवाय त्या मुलाच्या/मुलीच्या नावे घसघशीत रक्कमही उकळता आली असती. तेवढाच त्यांना आधारही झाला असता..... असा सगळा विचार करुन आम्ही देशमुखच्या भावाची व बापाची गाठ घेतली. म्हटले सामोपचाराने प्रकरण मिटले तर बघुया... पण बैठकीत चर्चेला वेगळेच वळण लागले....

‘‘कर्नलसाहेब, ह्यो मूल तर आमच्या मुलाचे नाहीच. तो लगीन झाल्यावर लगच युनीटला परत गेला ना. नंतर सहा महिन्याने हिला दिवस गेलते. मी तवाच म्हटलं व्हतं तिला की पाडून टाक ते पाप. पोरगी तसलीच छिनाल आहे असं म्हणत व्हता तो...’’

‘‘मी तुमच्या त्या मुलाचे मूल म्हणत नाही देशमुख ! या ऽऽ या नालायकाच्या मुलाबद्दल बोलतोय !’’ मी त्याच्या धाकट्या मुलाकडे बोट दाखवून म्हणालो. ते ऐकताच बापाची कानशिले गरम झाली. पोराचा चेहरा पडला. झाले ! त्यांच्यात तेथेच जुंपली. बापाने आमच्या देखत मुलाच्या कानाखाली घुमणारा आवाज काढला तर पोराने पायातील वहाण काढली. ते कुटुंबच तसले होते. गिधाडांचे !

‘‘कशाहून ?’’ पोरग्याने विचारले पण त्या विचारण्यात दम नव्हता.

‘‘डी एन ए टेस्टवरुन आता सगळं कळतंय....’’ मी म्हणालो...

चरफडत ते दोघेही बाहेर पडले....
त्यानंतर एक दोन महिने शांततेत गेले. बहुधा युद्धापूर्वीची शांतता असावी ती.

पण तेवढ्यात एक वाईट बातमी देशमुखांच्या घरी आली. सियाचीनमधे एका पेट्रोलिंगच्यावेळी जवान देशमुखचा एका बर्फाच्या वादळात सापडून मृत्यु झाला होता. पेपरमधे बातमी आली. गावभर फ्लेक्स फडकले, राष्ट्रध्वजात गुंडाळलेल्या शवपेटीतून देशमुखांचे शव घरी आले. बंदुंकींच्या सलामीत शवाला भडाग्नी देण्यात आला. सविताला आम्ही काही गावाकडे सोडले नाही, म्हणजे तिलाच जायचे नव्हते. सविताच्या भानगडीतून मी आता जरा बाजूला होण्याचे ठरविले. तीही आता पूर्ण बरी झाली होती. काय चांगले काय वाईट आता तिला कळत होते. एक दिवस मी तिची एका चांगल्या वकिलाशी गाठ घालून दिली व त्या प्रकरणातून पूर्ण बाजूला झालो. वीरपत्नी म्हणून सविताला परत रेल्वेच्या नोकरीत सहानुभूतीपूर्वक घेण्यात आले. तिने तिची बदली नांदेडला करुन घेतली.... माझ्या दृष्टीने हे प्रकरण येथेच संपायला हरकत नव्हते पण सविताची आणि आमची अजून एकदा भेट व्हायची होती... ती झाली पाच का सहा वर्षाने.... परत रेसकोर्सवर....

तिसरी भेट....
असेच नेहमीप्रमाणे आम्ही रेसकोर्सवर चालून, दमून भागून बाकावर वारा खात बसलो होतो. एकाच वेळी आकाशात चंद्र व सूर्य कसे यावर आमचा वाद चालला होता तेवढ्यात आम्हाला दोघांना ती दिसली... ‘‘सविता’’ ! आमच्या दोघांच्या तोंडातून एकदमच तिचे नाव वाहेर पडले. पण आता तिच्या मागे एक छोटा मुलगा पळत होता. नशिबाने पळण्याच्या बाबतीत तरी आईवर गेला होता... आम्हाला पाहताच ती त्याला घेऊन आमच्याकडे आली.

‘‘मागचे काही बोलू नकोस हं’’ मी बायकोच्या कानात कुजबुजलो.

‘‘छे ! हो ! मी कशाला काही बोलतेय ?’’ इति सौ. आजकाल आम्ही साधे बोललो तरी त्याला लगेचच वादाचे स्वरुप येते. पण आता आमची तीच करमणूक असते. ते आमच्या वयांच्या माणसांनाच कळू शकते. पण मी हे काय सांगत बसलो?
नमस्कार चमत्कार झाल्यावर ... आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. कितीही ठरविले तरीही आठवणींच्या खपल्या निघाल्याच...

‘‘इकडे कशी काय सविता तू ? आणि कशी आहेस ?’’ मी

‘’ऑफिसच्या कामासाठी एक आठवडा येथेच आहे. साईच्या होस्टेलवर राहिले आहे याला घेऊन...मॅडम आहेत ना अजून !’’
इतर गप्पा मारुन झाल्यावर ती एकदम म्हणाली,

‘‘काका पण एक झाले, हे शहीद झाल्यामुळे आमचा गावात बराच मान वाढलाय. आमच्याशी आता सगळे बरं वागतात. ’’

‘‘अगं ते इस्टेटीची वाटणी जाऊ नये म्हणून असेल..’’ मी म्हणालो.

‘‘नाही काका आता फक्त हा एकच वारस उरलाय जमिनीला व इस्टेटीला !’’ सविता त्या मुलाकडे पाहून म्हणाली.

‘‘काय नाव ठेवले आहेस याचे ?’’

‘‘शौर्य’’ सविता म्हणाली....

‘‘वा,,, वा....’’ मी तिचे तोंड चुकवत म्हणालो...

तुम्ही म्हणाल आता तिच्यासाठी एवढे केल्यावर तोंड चुकवायला काय झाले यांना ?
हं ऽऽऽ तुम्हाला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे....कारण तुम्हालाच काय, दोन माणसांशिवाय कोणालाच एक गोष्ट माहीत नाही....अगदी माझ्या बायकोलाही नाही...

‘‘देशमुख शहीद नाही झाला ..त्याला शहीद केला गेला होता....सियाचीनमधे त्या वादळात....जेथे अरुंद शिडीवर एक छोटा धक्काही पुरेसा होतो...फक्त अगोदर कॅराबिनर सोडवून ठेवली की बास...

एखाद्या सैनिकाची मानसिक अवस्था युद्धात काय असते ? तो का माणसे मारतो ? हा एक संशोधनचा विषय आहे. अनेक वैज्ञानिकांनी यावर काम केले आहे आणि अजूनही करत आहेत. मला एकदा एकाने विचारले, तुम्हाला पाप लागत नाही का ? मी त्याला म्हणालो,

‘‘अरे बाबा बकरं कापताना तो खाटीक काय करतो ? तुम्हाला विचारतो ‘साहेब कापू का ?’ तुम्ही हो म्हणाला तरच तो बकरं कापतो. कारण त्याच्या कल्पनेनुसार आता तो फक्त एका सुऱ्याची भूमिका पार पाडणार असतो. चालविणारा मात्र मांस विकत घेणारा.. जे काही पाप लागायचे ते त्या गिऱ्हाईकालाच.. तसेच आहे ते. सैनिक हा फक्त सुरा आहे... चालविणारे राजकारणी आणि त्यांना निवडून देणारी जनता.... ’’

या न्यायाने मी या पापाची सगळी जबाबदारी माझ्या शिरावर घेतली आहे. गेलो नरकात तर पाहता येईल तेथे काय करायचे ते ! पण उरलेले येथे आनंदात निर्धोकपणे आयुष्य जगतील तरी..

इतरजण आता पापमुक्त झाले असे मी मानतो...

जयंत कुलकर्णी.
समाप्त.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त.... पाप कसले पुण्यंच लागेल!!

विअर्ड विक्स's picture

9 May 2016 - 6:32 pm | विअर्ड विक्स

जबरदस्त शेवट …. कथा आवडली

मराठी कथालेखक's picture

9 May 2016 - 6:46 pm | मराठी कथालेखक

कथा आवडली आणि सांगण्याची शैलीही

एकदम कलाटणी! भारी लिहिलंय!

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 6:49 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम

आदूबाळ's picture

9 May 2016 - 7:04 pm | आदूबाळ

एक नंबर काका, एकच नंबर!

(एक बारीकशी तक्रार म्हणजे तुम्ही तुमच्या कथेतल्या पात्रांना बागडायला पुरेसा वाव देत नाही. यातल्या कॅप्टनचं पात्र अजून तपशिलात रंगवलं असतं तर बहार आली असती. असो.)

सौंदाळा's picture

9 May 2016 - 7:12 pm | सौंदाळा

नेहमीप्रमाणेच उच्च लिखाण
__/\__

अभ्या..'s picture

9 May 2016 - 7:30 pm | अभ्या..

ताकतवान लेखन काय असते ते जयंतकाकांचे लेखन पाहून पटते. कॅरेक्टर्स, प्लॉट, भाषा, संवाद सारे काही अगदी जागच्या जागी. परफेक्ट.
सलाम तुमच्या लेखणीला आणि अर्थात ह्या परफेक्शनला.

मधुरा देशपांडे's picture

9 May 2016 - 7:38 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम!!

फेरफटका's picture

9 May 2016 - 7:55 pm | फेरफटका

मस्त जमलीये कथा!

विवेकपटाईत's picture

9 May 2016 - 9:16 pm | विवेकपटाईत

कथा आवडली. यात सत्य असण्याची संभावना आहे.

जव्हेरगंज's picture

9 May 2016 - 9:45 pm | जव्हेरगंज

जब्बरदस्त!

एका अद्भुत अनुभवातून गेल्यासारखे वाटले!

कथा सांगण्याची स्टाईल विशेष आवडली!!

बोका-ए-आझम's picture

9 May 2016 - 10:59 pm | बोका-ए-आझम

शेवटचा - देशमुखला शहीद केल्याचा टच तर मस्तच!

जयंत कुलकर्णी's picture

10 May 2016 - 1:04 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

अप्रतिम कथा. आणि शेवट विशेष आवडला !

गौतमी's picture

10 May 2016 - 1:25 pm | गौतमी

मस्त...

मेघना मन्दार's picture

10 May 2016 - 1:43 pm | मेघना मन्दार

मस्तच जमलिए कथा !! सगळी पात्र डोळ्यासमोर आली वाचताना ..

+१
मला तर पिक्चर दिसत होता.

पैसा's picture

10 May 2016 - 5:17 pm | पैसा

जबरदस्त कथा!

प्रचेतस's picture

10 May 2016 - 5:20 pm | प्रचेतस

दोन्ही भाग वाचले.
उत्कृष्ट लेखन.

नाखु's picture

10 May 2016 - 5:31 pm | नाखु

गेल्या दोन वर्षातील पेपर बातम्यांमुळे मला ही अजिब्बात काल्पनीक वाटली नाही आणि खरेच कुठे अशी सविता असेल तर तीला असेच काका भेटोत ही बाप्पाकडे प्रार्थना..

फक्त दंडवत _/|\__ नतमस्तक नाखु

यशोधरा's picture

10 May 2016 - 5:37 pm | यशोधरा

कथा आवडली.

एकनाथ जाधव's picture

10 May 2016 - 6:08 pm | एकनाथ जाधव

_/\_ हुच्च कथा

प्राची अश्विनी's picture

10 May 2016 - 6:26 pm | प्राची अश्विनी

अप्रतिम कथा.

लाल टोपी's picture

11 May 2016 - 5:33 am | लाल टोपी

जयंतजी, नेहमीप्रमाणेच कसदार आणि मनाला भावणारे लेखन आवडले!

कानडाऊ योगेशु's picture

11 May 2016 - 7:01 am | कानडाऊ योगेशु

हेच म्हणतोय.
बाकी कथेला "सविता कोर्कू" असे नाव का द्यावेसे वाटले.? "देरसु उझाला" इफेक्ट तर नसेल!

जयंत कुलकर्णी's picture

11 May 2016 - 7:05 am | जयंत कुलकर्णी

नांदेडच्या पलिकडे कोर्कू नावाची एक आदिवासी जमात आहे. म्हणून तिचे आडनाव कोर्कू केले... बाकी देरसूच्या इफेक्टबद्दल काय बोलावे. तो सगळीकडे आहेच ! :-)

यशोधरा's picture

11 May 2016 - 2:43 pm | यशोधरा

काका, देरसू आले का पुस्तकांच्या दुकानात?

जयंत कुलकर्णी's picture

11 May 2016 - 3:31 pm | जयंत कुलकर्णी

१६ मेपासून मिळेल. त्यानंतर मिळाले नाही तर मात्र मला प्लीज कळवा.

यशोधरा's picture

11 May 2016 - 3:40 pm | यशोधरा

चालेल.

अतिशय छान कथा! कथाभागात अगदी मस्त वळण घेतलं. शेवट ही आवडला. _/\_

जगप्रवासी's picture

11 May 2016 - 2:34 pm | जगप्रवासी

जबराट

मुक्त विहारि's picture

11 May 2016 - 3:48 pm | मुक्त विहारि

हे असे काका सगळ्यांना भेटू देत.

सविता००१'s picture

11 May 2016 - 5:00 pm | सविता००१

कथा
मस्तच___________/\__________

विवेक ठाकूर's picture

11 May 2016 - 8:49 pm | विवेक ठाकूर

तुमचं एकूण डिटेलींग आणि निरिक्षण शक्ती आवडली.

ग्रेट !
हिप्नॉटीक अ‍ॅन्ड ब्रिलीयंट !!!
मला तुमच्या क्रिएटीव्हीटीचा अचंबा वाटतो
धन्यवाद या साठी

अर्धवटराव's picture

12 May 2016 - 7:47 am | अर्धवटराव

पण कथा एकदम सरळधोप वाटली.

संजय पाटिल's picture

12 May 2016 - 6:04 pm | संजय पाटिल

दोन्ही भाग एकदमच वाचले, आवडले..

जयंत कुलकर्णी's picture

13 May 2016 - 7:06 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना आणि पुढे काही प्रतिसाद आले तर त्या प्रतिसादकर्त्यांनाही धन्यवाद !

रातराणी's picture

14 May 2016 - 9:09 am | रातराणी

_/\_ अप्रतिम!!

किसन शिंदे's picture

14 May 2016 - 10:03 am | किसन शिंदे

दोन्ही भाग वाचले. अतिशय उत्कृष्ट कथा.

हॅट्स आॅफ जकु सर.

अभिजीत अवलिया's picture

17 May 2016 - 8:17 pm | अभिजीत अवलिया

शेवट आवडला ...