फेसबुक – एक वसाहत

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
18 Mar 2016 - 4:54 pm

(फेसबुक वर असेच एकदा वेगेवेगळी सेटिंग्स तपासात होते. काही सेटिंग्स बदलून view as करून पण बघत होते. तेव्हा स्वत:चाच प्रोफ़ाइल आपले वेगवेगळे रूप दाखवू लागला. जणू नवीन कपडे आणल्यावर एक एक घालून दाखवावे अगदी तश्शीच fashion parade चालली होती. तेव्हा काल्पनिक, काहीसे विनोदी (फार काही नाही अगदीच थोडे बर्र का) लेखन सुचले ते असे आहे.)

हल्ली वास्तव जगाचा भाग बनलेलं एक आभासी विश्व आहे. आंतरजाल विश्व. ह्या विश्वात रमलात की कधी कधी वास्तवतेचे भानही रहात नाही. ह्या विश्वातील अनेक वसाहतींचा फेरफटका मारता मारता दमछाक होते जणू. तरीही ‘टेढा है पर मेरा है’ म्हणत म्हणत त्यात रमून जायचे असते.

अशीच एक वसाहत तुमची, आमची, सर्वांची अगदी ओळखीची ती म्हणजे फेसबुक. हे हौसिंग प्रोजेक्ट तसे खूप अवाढव्य आणि भारी पॉप्युलर बुवा! त्याचे काय आहे इथे एन्ट्री फ्री असल्यामुळे अगदी कोणीही आपले घर बांधू शकतात. ‘सेकंड होम’ म्हणा ना! ते सुद्धा अगदी एन्ट्री घेतल्या घेतल्या टेन्ट पासून महाला पर्यंत! फक्त अमेरिकन सुपीक डोक्यातून हे प्रोजेक्ट जन्माला आले असल्यामुळे इथे झोपडीला मात्र वाव नाही. पssण भारतीय लोकांचा प्रभाव म्हणा की प्रेम म्हणा इथे चक्क चाळ संस्कृतीला भरपूर वाव आहे. मस्त ना! तर प्रत्येक जण आपल्या स्वभाव-प्रवृत्ती प्रमाणे आपले घर बांधतो. मनात येईल तसे बदलतही असतो.

सुरवातीला बरेच जण आपले टेन्ट मधेच रहात असतात. नवीन असतात हो! माहिती नसते ना! मोकळा स्वभाव असला तर किंवा अज्ञानात म्हणा काही जण तर कायमच टेन्ट मध्ये राहणे पसंत करतात. टेन्ट मध्ये राहिल्यामुळे फारशी गोपनीयता ठेवता येत नाही. परंतु बहुतेक जण लौकरच दुसरे घर बघतात.

चाळीत दोन प्रकारची घरे असतात. काही घरांचे दरवाजे कायम बंद असतात. (Add Friend Without Follow) तुम्ही बेल वाजवल्यावर सुद्धा उघडतील याचा नेम नाही. पण एकदा उघडले की मात्र एकदम ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ असते बघा! माझे घर असे आहे :) काही जणांनी दरवाजे कायम उघडे ठेवलेले असतात. (Add Friend With Follow) त्यांचे म्हणजे ‘अतिथी देवो भव!’ पण अर्थात जिवाभावाची मैत्री मात्र खास लोकांशीच बर्र का!

काही आपले अपार्टमेंट मध्ये राहतात. सगळे कसे बंद बंद. बेल वाजवल्यावर खात्री करतील ओळखीचे आहात का? तरच दरवाजा उघडतील नाहीतर बेल पण बंद करतील. (Mark as Spam) मग बसा बाहेर बोंबलत!

काही तर अशा घरात राहतात की तुमच्या ओळखीच्यांना बरोबर घेतल्यशिवाय तुम्हाला साधी बेल पण वाजवता येत नाही. मध्ये मला पण वाटले की राहू या आपण पण अशाच एका घरात! म्हणून एक दिवस गेले राहायला. पण मग वाटले की जुने कोणी ओळखीविना आले तर मला कसे भेटणार? म्हणून मग परत चाळीतल्या घरात आले झालं.

महालात राहतात त्यांची बेल वाजवायची सोयच नसते. काही ठिकाणी बाहेर पेटी असते त्यात हवे तर निरोपाचे पत्र टाकू शकता. काही तर तेवढी पण सोय नाही ठेवत. काय तरी बाई म्हणावे ह्या लोकांना? केवढा तो ताठा! अशा महालात राहणारे तर काही चक्क अज्ञातवासातही जातात. म्हणजे तुम्हाला त्यांचा महाल शोधून सापडत नाही.

मधूनच काही ओसाड घरे पण असतात. हो! म्हणजे घर घेतात आणि मग फिरकतच नाहीत. त्यांना ही वसाहत रुचत तरी नसावी अथवा यायला वेळ नसावा. काहींच्या तर चाव्यासुद्धा हरवून जातात. बिचारे! किती मुकतात ते ‘ह्या वैश्विक’ सुखाला! :P :D

इथे तुम्हाला स्वत:ला अपडेट ठेवायला मस्त सोय आहे. तत्वज्ञान, पाकशास्त्र, बातम्या, मनोरंजन इत्यादिशी संबंधित लोक आपले दुकान थाटून असतात. तुम्ही नाव नोंदवलत की अगदी घरपोच माहिती मिळते. खूप सारे क्लब्ज असतात. तुम्ही तिथे जाऊ शकता. काही सर्वांसाठी खुले असतात तर काही ठिकाणी एन्ट्री पास असतो.

पण एकंदरीत इथे धम्माल असते बुवा. कुठेही कसेही राहायला जा. केव्हाही बस्तान हलवा. मजेत राहा. वय, जात, धर्म, प्रांत, देश, आर्थिक स्थिती ह्या कशाच्याही सीमा नसतात. तुम्ही सभ्यतेने राहिलात, वागलात तर हे विश्व तुम्हाला आपलेपणाने सामावून घेईल.

कोई शक?

-उल्का कडले

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

सप्तरंगी's picture

18 Mar 2016 - 8:38 pm | सप्तरंगी

काही बेल वाजवतात, दरवाजा उघडताच ठाण मांडून बसतात, जागा अडवतात , डोकावत राहतात पण नंतर मात्र कधीच निरोपाचे पत्र काय बोटभर चिट्ठी पण टाकत नाहीत

छानच लिहिले आहे, काहीतरी वेगळे. मी correlate करू शकले.

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2016 - 8:57 am | श्रीरंग_जोशी

लेखनशैली आवडली.

एक संपर्काचं उत्तम माध्यम बाकी काही नाही.चाळ/ब्लॅाक/बंगला ?

पैसा's picture

24 Mar 2016 - 7:50 pm | पैसा

चांगलं लिहिलंय. मात्र फेसबुकवर सावध असले पाहिजे.

उगा काहितरीच's picture

25 Mar 2016 - 1:12 am | उगा काहितरीच

आमचे एक सर म्हणायचे, "फेसबुक म्हणजे चौकात बसून भाकरी खाणं !"

विवेकपटाईत's picture

25 Mar 2016 - 4:41 pm | विवेकपटाईत

गर्दीत एकटेपणा म्हणजे फेसबुक