कुण्या देशीचे पाखरू
तारुण्यात पदार्पण करतांना युवतीच्या मनांत एक नवी हुरहुर सुरू होते. शालेय मैत्रीणींच्या सोबतीतले रम्य दिवस आता थोडे मागे जात असतात. नवीन काय मिळणार आहे, आपला शोध काय ? याचाही पुरता अंदाज आलेला नसतो. नवीन मित्र जोडलेले नसतात. पण त्यांच्याबद्दल, प्रेम.... नाही प्रेम म्हणता येणार नाही, ओढ म्हणावी कां ? तसच काही तरी म्हणा पाहिजे तर. " जायेंगे कहॉ सुझता नही !
चल पडे मगर रास्ता नही !
क्या तलाश है, कुछ पता नही !!
अशा विभ्रमावस्थेतली अस्फुट मनोवस्था कवी सुधीर मोघे यांनी पुढील कवितेत अतिशय तरल, हळुवार शब्दात पकडली आहे.
कुण्या देशीचे पाखरु, माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे
माती कोठल्या धरेची, त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती, त्याच्या उरात साठली
आणि कोठले आकाश, त्याने सर्वांगा माखले
कुठे पिऊन घेतले, त्याने मेघातले जळ
दिली वार्याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे, कुण्या जन्मीचे भेटले
माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ पाऊस
माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले
कवी शब्द वापरतो "पाखरू". एका अ-लौकिक, धुक्यात दडलेल्या, भावनेला शब्दरूप द्यावयाचे आहे. पाखरू... शब्द छान वाटतो नाही ? लहानशी चोच. काळे डोळे. छातीवर निळसर रंग, करडे पंख, स्वप्नातलेच एक छोटे पाखरू डोळ्यासमोर येते. स्वप्नातलेच, पण इथे म्हटले आहे " कुण्या देशीचे " नेहमीचे, माहितीचे पक्षी नकोत, हे पाखरू अनामिक देशातून आले आहे. काल कुठे होते, उद्या कुठे जाणार काही सांगता येत नाही,.. आज तिच्या अंगणात आले.. अहो भाग्यं !. तिला मान्य आहे की त्याचे पंख अनोळखी आहेत ओळख पटत नाही; माहीत आहे.. नाही..सगळेच अंधुक अंधुक पण तरीही पण त्याचे डोळे मात्र तिला ओळखीचे वाटतात. अनोळखी व्यक्तीची ओळख पटते त्याच्या डोळ्यावरूनच. थेट हृदयात पोचावयास तोच मार्ग असतो. तुम्हीच विचार करा. अनोळखी व्यक्ती भेटल्यावर तुम्ही त्याच्याकडे पहाता, तेव्हा प्रथम काय पहाता ? डोळेच की नाही ? आणि हे डोळे जर ओळखीचे असतील तर .. तर ते पाखरू आता तुमचेच झालेले असते.
कल्पना नाही पण आता ती त्याच्यात गुंतत चालली आहे. तिला हे आपल्या अंगणात येण्यापूर्वी कुठे होते, काय करत असावे याची माहिती नाही पण आता तिला अंदाजच बांधावयाचे आहेत पाखरू आकाशातच उडणार; पण त्याला केव्हा तरी जमीनीवर टेकावेच लागणार पाय मातीत मळणारच. पण ती जमीन म्हणत नाही; आधार देणारी "धरा" म्हणत आहे. धरा ...काय सुरेख निवड आहे शब्दाची. ही आश्वासक, प्रेमळ धरा तिचे पाय मळवत नाही, माती लागली, ती लागणारच होती पण, फक्त नखांना लागली. आणि धरा आपली माया, हिरवी, कोवळी हिरवळ म्हणा ना, आईने लहान मुलीला द्यावी त्या प्रमाणॆ पाखराला देत आहे, उरात साठवून ठेवावयाला
.धरेने इतके केले म्हटल्यावर आकाश मागे का रहाणार आहे ? त्याने तर पाखराचे सर्वागच माखून टाकले. सर्वांगा माखले...आकाश तर सर्व जगालाच व्यापते पण येथे त्याने चिमुकल्या पाखरासाठी कष्ट घेतले आहेत.
आता पाळी जलाची. या लाडल्यासाठी त्याने जमिनीवरील पाणी देण्या ऐवजी मेघाची योजना केली. स्वच्छ, शीतल, ताजे पाणी. आकाशात भरारी घ्यायला, हिच्या अंगणात येऊन पोचायला उभारी पाहिजे असेल तर असेच पाणी पाहिजे. पण खरी कमाल वार्याचीच. त्याने पाखराच्या चोचीतच शीळ भरली. शीळ ... वारा वेळूच्या बनातून फिरतो तेव्हा ऐकू येणारी शीळ. दोन प्रेमिकांना, एकमेकासमोर नसतांनाही भेट घडवणारी शीळ शीळ अशी की त्या लकेरीतून जे गाणे बाहेर पडले ते तिला पूर्वजन्मांतील एक्मेकांच्या भेटीची आठवण करून देते.
पाखरू आता अनोळखी नाही. त्याने जन्मजन्मांतरीतील गाठीभेटींची आठवणुक जागी करून दिली आहे. या चिमुकल्या संदेशवाहकासाठी तिचा ऊर भरून आला या अंगणात आलेल्याकरिता आपल्या ओंजळीचे मऊ, राजस घरटे बनविले. ओंजळ--घरटे विलक्षण साम्य.( परत नकळत आपल्या सौंदर्य़ाचा उल्लेख.). आकाशाने माखू घातले असले तरी न्हाऊ घलण्यासाठी तिच्या डोळ्यातील पाणी. या पाण्याला "काजळ पाऊस" म्हणण्यात काय सौंदर्य भरले आहे ! पाखराला झुलवायला झोपाळा नको आहे, त्याला फांदीच हवी. मनाचीच फांदी मनासारखीच तरल उपमा.
पंचवीस वर्षे झाली. अनुराधा पौडवाल (व संगीत :श्रीधर फडके ) यांनी या गाण्याला जो "न्याय" दिला तो...लाजबाब ! कारुण्यमय न करता गीतातील हुरहुर, आर्तता दाखवून देणे सोपे नव्हते. केवळ अप्रतिम
https://youtu.be/gUAl_aCh58g
शरद
.
प्रतिक्रिया
28 Feb 2016 - 6:40 pm | पैसा
खूप सुरेख कविता आहे ही! रसग्रहणही फार आवडलं.
28 Feb 2016 - 8:53 pm | माहितगार
वॉव मस्तच सुरेख कविता छानसे रसग्रहण
दिली वार्याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे, कुण्या जन्मीचे भेटले
ओळी वाचताना पक्षांचा आजूबाजूला किलकिलाट नसताना सुद्धा शीळ ऐकतो आहोत असे वाटते. मस्तच. धन्यु.
28 Feb 2016 - 10:38 pm | मितान
अप्रतिम गाणं आहे ! सुरेख रसग्रहण !!
29 Feb 2016 - 8:24 am | यशोधरा
सुरेख!