तुझे भुल जाना जाना...

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
15 Sep 2008 - 9:44 am

शुक्रवारची संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. पण संधीप्रकाशाचा कुठेही मागमुस नव्हता. अगदी लख्ख उजेड होता. इकडे कॅलिफोर्नियामध्ये रात्रीचे नऊ वाजले तरीही उजेड असतो. आपल्याकडे असं नसतं ना. सहा साडे सहा झाले की अंधार पडायला सुरुवात होते. आणि सात वाजता तर अंधार होऊनच जातो. आपल्याकडेही जर इकडच्या प्रमाणे रात्री आठ वाजता दिवस मावळतीला जाऊ लागला तर...

अरमानचं आताच साहीलशी जिमेलवर बोलुन झालं होतं. साहील त्याचा ओरकुटवरचा मित्र. कुठूनतरी "फ़्रेंड ऑफ फ़्रेंड" असं करत त्या दोघांची मैत्री जुळली होती. अर्थात आभासीच. इंग्रजीत सांगायचं तर व्हर्चुअल. जिमेलवर बोलताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोघेही गद्धेपंचविशीच्या आत बाहेर असल्यामुळे गप्पांचा ओघ मुलींकडे कधी वळला हे कळलंच नाही. अर्थात दोघेही लग्नाच्या वयाचे असल्यामुळे वायफळ बडबड न करता त्या गप्पा आयुष्याचा जोडीदाराबद्दल होऊ लागल्या. बोलत बोलता साहीलने त्याला विचारले की त्याला कशी मुलगी हवी. अरमानने त्याला वेडावून दाखवणारी स्माईली पाठवली आणि लिहिलं, "असा काही माझा 'क्रायटेरिया' वगैरे नाही रे. हा, आता एव्हढं मात्र नक्की की मुलगी मराठीच असायला हवी" आणि अचानक साहीलने विचारलं, मुलीला मराठी येतं पण ती मराठी कुटुंबातील नसेल तर... अरमान दचकला. स्वताशीच विचार करू लागला. "अरेच्चा, हा विचार कधी आपण केलाच नाही की". सांगुन टाकलं त्याने साहीलला तसंच. म्हटलं, "मला विचार करायला हवा रे".

रात्रीचे नऊ वाजले होते. जेवायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याने साहीलचा निरोप घेतला. जिमेल लॉग ऑफ केलं. बाहेर व्हरांड्यात आला. आपल्याकडे साडे सहा सातला जसा संधी प्रकाश असतो तसंच काहीसं बाहेर झालं होतं. घरासमोरच्या तलावात एक बदकांची जोडी छान इकडून तिकडे पोहत होती. त्या मनसोक्त विहरणार्‍या त्या बदकांना पाहून तो मनाने कधी भारतात पोहोचला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. भारतात पावसाळा चालू असेल. छान पाऊस पडत असेल आपल्याकडे. त्याच्या नजरेसमोरून अविनाश ओगलेंची ती तरल कविता सरकू लागली...

खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या
तसा मी खिडकी बंद करायला धावलो...
तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला!
दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस.
पावसात भिजलेली तू
तुझी आर्जवी ओंजळ
ओंजळीत विरघळणा‍र्‍या गारा...
मी पहातच राहिलो-
पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते!

पापण्यांसमोर वर्षाधारा बरसू लागल्या. अरमानला अविनाशच्या "तू" मध्ये "ती" दिसायला लागली. अशीच भिजत असेल नं ती पावसात. पावसात भिजताना कशी दिसत असेल ती ? खुप अवखळपणा करत असेल नं सतरा अठरा वर्षांची असुनही... ती आपली नाहीये. किंबहुना ती आपली व्हावी अशी भावनाही मनात नाही... मग का विचार करतो आपण तिचा ? मनाच्या गर्द रानात जेव्हा आठवणींची रिमझीम बरसात होते तेव्हा पापण्यांमध्ये का ती उभी राहते ? आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. कदाचीत हे प्रश्नसुद्धा त्यापैकीच असावेत...

सात आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट असावी. अरमान तेव्हा भारतात होता. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. तरीही दिवाळीचा हँगओव्हर काही अजून गेला नव्हता. तो काहीसा मरगळलेल्या मनानेच मुंबईमध्ये ऑफिसला जाऊ लागला होता. एक आठवडा संपला. शुक्रवारच्या संध्याकाळी ऐनवेळी तो प्रोजेक्टच्या ज्या मोड्युलवर काम करत होता त्यामध्ये गडबड आहे असं त्याच्या लक्षात आलं. आता ती चुक दुरुस्त करुनच जाऊ म्हणजे शनिवार रविवार निवांत राहता येइल म्हणून त्याने काम चालू केलं आणि काम हातावेगळं करता करता रात्रीचे अकरा वाजले. हाताखाली काम करणार्‍या ज्युनियरला, अमेरिकेतून डोक्यावर मिर्‍या वाटणार्‍या सिनियरला मनातल्या मनात शिव्या घालत तो ऑफिसच्या गेट्मधून बाहेर पडला आणि...'पल पल तेरी याद सतायें' अशा सुमधुर आवाजात मोबाइलमधून फाल्गुनी पाठक गाऊ लागली. आता रात्री अकरा वाजता कोण आपल्या आठवणीने व्याकुळ झालं आहे हे पाहण्यासाठी त्याने तो कॉल अटेंड केला.

"नमस्कार कुलकर्णी साहेब, मी पुण्यावरुन शिंदे बोलतोय".

आपल्या सारख्या पंचवीस वर्षांच्या पोराला दुनिया कुलकर्णी साहेब का म्हणते हा प्रश्न त्याला खुप दिवसांपासुन सतावत होता. शिंदे काका पुण्याचे इस्टेट एजंट. घरांच्या खरेदी विक्रिच्या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करतात. अरमानने त्याला पुण्यात घर पाहण्यासाठी सुरुवात केली होती तेव्हा त्याच्या बाबांचे एक मित्र त्यांना शिंदे काकांकडे घेऊन गेले होते. आणि तेव्हापासुन तो घराच्या निमित्ताने शिंदे काकांच्या संपर्कात होता. त्यांनी अरमानला एक घर पाहण्यासाठी पुण्याला बोलावलं होतं. अरेरे, काय छान प्लॅन केला होता दोन दिवस झोपा काढण्याचा. आता पुण्याला जावंच लागणार होतं. आणि तेही आधी खोपोलीला घरी जाऊन. सगळाच विचका झाला होता. शनिवारी सकाळी तोंडही न धुता त्याने वाशीवरून पुण्याकडे जाणारी बस पकडली आणि घरी आला. घरी आल्यावर आईने सांगितलं, बाबा दोन दिवसांसाठी बाहेर गेलेत. म्हणजे आता त्याला एकट्याला पुण्याला जावं लागणार होतं. आणि कहर म्हणजे बाबा त्याची लाडकी हीरो होंडा पॅसियन प्लस घेऊन गेले होते. मोटारसायकल घेऊन गेले होते. बसने पुण्याला जायचं या कल्पनेनंच अंगावर शहारे आले होते पण जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं त्यामुळे त्याने मुकाट्याने सॅक उचलली आणि तो पुण्याच्या वाटेला लागला.

...घर खुप छान होतं. अरमानला अगदी मनापासून आवडलं होतं. थोडक्यात वैतागत का होइना पण पुण्याला एक फेरी टाकण्याचं सार्थक झालं होतं. व्यवहाराच्या गोष्टी हा आपला प्रांत नाही हे माहीती असल्यामुळे बाकी सगळं बाबा बघून घेतील असं शिंदे काकांना सांगून तो समीरकडे, आपल्या कॉलेजच्या दिवसांमधल्या मित्राकडे निघून गेला...

अरमान दुसर्‍या दिवशी सकाळी स्वारगेटला आला. मुंबईला जाणार्‍या गाड्या ज्या फलांटांवर लागतात तिकडे येवून पाहिलं अन् तो हादरला. इतकी गर्दी की विचारू नका. या मुंबईच्या लोकांना पुण्यात काय जेवण वाढलेलं असतं देव जाणे. आणि एव्हढया ट्रेन्स मुंबई आणि पूण्याच्या मध्ये धडधड करत धावत असतात तरीही बसला एव्हढी गर्दी का हे त्याला कळेना. मुंबईला जाणारी पुढची गाडी कधी आहे हे विचारण्यासाठी तो कंट्रोलरच्या खिडकीकडे जाऊ लागला. त्याच वेळी एक सतरा अठरा वर्षांची मुलगीही त्याच खिडकीकडे येत होती. पण तिच्या आधीच अरमानने कंट्रोलरला मुंबईला जाणारी पुढची गाडी कधी आहे हे विचारलं. आणि त्या मुलीने ते ऐकलं आणि ती मागे फिरली. अरेच्चा या छोटीला काय झालं ? अरे ही काहीच न विचारता परत कशी गेली ? ओहो... म्हणजे तिलाही मुंबईला जायचं आहे तर...

समीरही खोपोलीचा, त्याचा गाववाला. पण वर्षभर पुण्यात राहील्यामुळे त्याला मुंबईला जाणार्‍या गाडयांची अवस्था माहीती होती. त्याने शहाण्यासारखं अरमानसाठी तात्कालमध्ये आरक्षण केलं. आणि अगदी खच्चून भरलेल्या बसमध्येही बसण्याचं भाग्य अरमानला मिळालं. ती मघाची छोटी एक सीट सोडून पाठीमागे उभी होती. स्वारीला बसायला मिळालं नव्हतं तर. बस चालू झाली. त्याच्या बाजुची सीटही आरक्षीत होती. पण ती माणसं चिंचवडला चढणार होती. तेव्हढा वेळ तरी बसून घ्यावं असं म्हणून ती छोटी त्याच्या बाजुच्या सीटवर येऊन बसली. बोलता बोलता कळलं ती छोटी त्याच्याच कॉलेजला पहिल्या वर्षाला आहे. त्याच्याच कॉलेजला म्हणजे कर्जतच्या कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात. तीन वर्षांपुर्वी याच कॉलेजमधून तो इंजिनियर झाला, एका सेमिस्टरसाठी लेकचररशीप केली. ती खुप मोकळ्या स्वभावाची आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. ती छोटी खोपोलीला तिच्या मोठ्या बहिणीकडे जाऊन नंतर कर्जतला जाणार होती. चिंचवड आलं. त्या सीटवरची माणसं आली. त्याच्या नव्या छोटया शेजारणीला तिथून उठावं लागलं. त्याने खुप आग्रह केला तिला आपल्या सीटवर बसण्यासाठी पण नाही बसली ती. संस्कारही चांगले आहेत तर...

गाडी लोणावल्याला आली. कंडक्टरने गाडी पंधरा मिनिटे थांबेल असं सांगितलं. अरमान खाली उतरला. तिथल्याच एका हॉटेलमध्ये शिरला. ती छोटीही त्याच हॉटेलमध्ये आली. ती नको नको म्हणत असताना त्याने तिला एक मँगोला घेवून दिला. ती घटाघटा ते पीवू लागली. आणि तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहीला. कीती निरागस दिसते ही. अगदी आजही फ्रॉक घालून शाळेत गेली तर सातवी आठवीच्या वर्गात सहज बसू शकेल. गाडी चालू झाली. आता मात्र त्याने उभं राहून तिला आपल्या सीटवर बसायला लावलं. गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली...

... गाडी खोपोलीचा घाट उतरली. अरमान आता त्या छोटीच्या बाजुलाच उभा राहीला. ती त्याच्याकडे पाहून छानसं हसली. ती त्याच्याशी गप्पा मारू लागली. आणि एका खळाळत्या झर्‍याच्या तुषारांनी तो चिंब भिजून गेला. थोडयाच वेळाने खोपोली बस स्टॅंड येणार होता. काही करून तिचा मोबाइल नंबर घ्यायला हवा असं राहून राहून अरमानला वाटू लागलं. तरीही नंबर मागायचा कसा हा प्रश्न होताच. शेवटी आपलाच मोबाइल तिच्या हातात दिला. आणि तिचा नंबर त्यात टाकायला सांगितला. तिनंही तिचा नंबर काहीही आढेवेढे न घेता मोबाइलमध्ये सेव्ह केला. एरव्ही मुलींसमोर ततपप करणारे आपण आज असा अचानक धीट कसे झालो हे त्याचं त्यालाच कळेना. तिने सेव्ह केलेला नंबर हा तिचा आताचा नंबर नसुन तिचा नविन नंबर आहे जो अजुन आठवडाभराने चालू होणार आहे हेही तिने सांगितले. अरमानला स्वताचंच हसायला आलं. आतापर्यंत ना त्यानं तिचं नाव विचारलं होतं ना तिला आपलं नाव सांगितलं होतं. तिचं नाव तिने त्याच्या मोबाइलमध्ये नंबर सेव्ह केल्यामुळे त्याला कळलं होतं. नावही खुप गोड होतं. अगदी तिच्यासारखंच. त्यानेही मग तिला आपलं नाव सांगून टाकलं. खोपोली आली. दोघेही उतरले. ती तिच्या मावशीकडे जायला रीक्षात बसली. जाताना बाय वगैरे म्हणेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. लहान आहे ती असं त्याने स्वतःलाच समजावलं. आणि तोही घराच्या दिशेने चालू लागला...

सोमवार आला. अरमान मुंबईला आला. नेहमीचंच सॉफ्टवेअर इंजिनियरचं कॉपी पेस्टचं रुटीन सुरु झालं. तिचा नंबर सुरु झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अधूनमधून तिचा नंबर तो डायल करू लागला. आठवडा गेला तरी तिचा नंबर काही सुरु झाला नव्हता. का कोण जाणे पण त्याला थोडंसं चुकल्यासारखं वाटू लागलं. त्याला राहून राहून वाटत होतं की आपण तिचा सध्याचा नंबर घ्यायला हवा होता. त्याला सर्वात मोठा प्रश्न हा पडला होता की तिचा तो नंबर लागत नाही तर आपण एव्हढे अस्वस्थ का झालो आहोत ? ती आपल्याला आवडते का, असं तो स्वतःलाच विचारत होता आणि नाही असं उत्तरही स्वताच देत होता. ते कसं शक्य आहे ? आपण आपल्या हाताखालच्या पोराने लिहिलेला चार ओळींचा फॉर लूप सुद्धा लॉजिकली बरोबर आहे की नाही हे पाहून घेतो. इथे तर मुलगी आवडण्याचा प्रश्न होता. असं जेमतेम अडिच तीन तासांच्या प्रवासातल्या सहवासाने ती मुलगी आपल्याला आवडू शकते का ? याही प्रश्नाचं उत्तर नाही असंच आलं. मग ही मनाची तगमग का होत आहे ? या प्रश्न्नाचं उत्तर मात्र काही केल्या त्याला मिळत नव्हतं. ती अस्वस्थता सोबत घेऊनच तो शनीवारी घरी यायला निघाला...

रविवारची नोव्हेंबर महिन्यातली संध्याकाळ. अरमानने स्लीपर्स पायात सरकवल्या आणि संध्याकाळची मोकळी हवा खाण्यासाठी तो गावाबाहेर पडला. सुर्य नुकताच मावळत होता. सारा आसमंत आरक्त झाला होता. आणि त्या कातरवेळी पुन्हा एकदा त्याच्या मनात तिच्या विचारांची गर्दी होऊ लागली. त्याने नकळत तिचा नंबर डायल केला. रींग झाली. पलिकडून तिचा हळूवार आवाज आला. त्याच्या मनाची अस्वस्थता कुठल्याकुठे पळून गेली होती. पंधरा वीस मिनिटे ती अखंड बालिश बडबड करत होती आणि तो मंत्रमुग्ध होऊन तिचे शब्द कानात साठवत होता. तिचे शब्द जणू सुर्यास्तानंतरच्या आरक्त आभाळाच्या पार्श्वभूमीवर नाचणार्‍या स्वर्गीय अप्सरेच्या पायातील पैंजणांप्रमाणे मधुर नाद करत होते...

त्यानंतर त्याचं वरचेवर तिच्याशी फोनवर बोलणं होऊ लागलं. तिची पहिल्या सत्राची परीक्षा चालू झाली होती. तरीही ती वेळ काढून त्याच्याशी बोलायची. खुप काही विचारायची. स्वतःबद्दलही खुप काही सांगायची. ती उच्च मध्यम वर्गीय घरातली मुलगी होती. कॉन्व्हेंट्मध्ये शिकलेली. सर्वात मोठ्या बहीणीचं लग्न झालं होतं. पुण्यात असते ती. दुसरी मोठी बहीण पुण्यालाच बी जे मेडिकल कॉलेजला वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिलाही मेडीकललाच जायचं होतं परंतू बारावीला कमी गुण मिळाल्यामुळे नाईलाजाने अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा लागला होता तिला. अशी खुप काही सांगत बसायची ती. एकदा तीला वर्गातील हजेरी कमी पडल्यामुळे दंड भरावा लागला तेव्हा ती कशी दिवसभर रडत होती हे ती अगदी इमोशनल होऊन सांगत होती. आणि त्याचवेळी अरमान मात्र आपलं हसू आवरण्याचा प्रयत्न करत होता. असंच एकदा ती तिच्या हॉस्टेलच्या रेक्टरबद्दल बोलत होती. बाइसाहेब बोलताना खुप जोशात आल्या होत्या. 'त्या टकल्याला कसं कळत नाही. आम्ही आता शाळेतल्या मुली आहोत का. सारखं हे करु नका, ते करु नका म्हणत असतो'. तिचं ते बोलणं ऐकलं आणि अरमानला हसू अनावर झालं. ती ज्या रेक्टरला 'टकल्या' म्हणत होती ते सर तो कॉलेजला लेक्चरर असताना त्याचे वरीष्ठ सहाध्यायी होते. त्यांचा मुलगा तेव्हा त्याचा विद्यार्थी होता. हे त्याने तिला सांगताच तीही खळाळून हसायला लागली...

दिवस खुप छान चालले होते. ती आपल्याला आवडते का वगैरे विचार मनात येणं केव्हाच बंद झाले होते. ती आपली अगदी जिवाभावाची मैत्रिण आहे एव्हढीच जाणीव आता अरमानच्या मनाला व्यापून राहीली होती. त्याला आता तीची सवय झाली होती. ती सोबत नसली तरीही ती आपल्या सभोवताली ती वावरते असंच हल्ली वाटायला लागलं होतं. तसंही ती कधी स्वतःहून फोन करत नाही या गोष्टीचं त्याला कधी कधी वाईट वाटायचं. पण आपण फोन केल्यानंतर ती अगदी मनमोकळ्या गप्पा मारते यावर तो समाधानी होता. एकदा सहज म्हणून त्याने तिला विचारलं, की परीक्षा संपल्यावर तिला त्याला भेटायला यायला जमेल का म्हणून. आणि तिने हो म्हणताच, मनातल्या पाखरांनी आभाळात झेप घेतली होती...

तीची परीक्षा चालूच होती. एके दिवशी सकाळीच त्याने तिला फोन केला. त्या दिवशी तिला सुट्टी होती हे त्याला माहिती होतं. बराच वेळ बोलत राहीली ती. अगदी तिला पेपर्स कसे चांगले जात नाहीत इथपासून ते तीची आई तीला भेटायला येणारआहे इथपर्यंत सारं सांगुन टाकलं तिने. तिच्या रूममधुन तिच्या मैत्रिणींचा आवाज येत होता. सहज म्हणून त्याने तिला तसं विचारलं तर तिच्या मैत्रिणी अभ्यास करायला आल्या आहेत असं तिने सांगुन टाकलं. बराच वेळ बोलत असल्यामुळे दोन दिवसांनी फोन करेन असं तिला सांगुन त्याने फोन ठेवून दिला. तीचा मॅथ्सचा पेपर ज्या दिवशी होता, त्याच दिवशी संध्याकाळी त्याने तिला फोन केला. बराच वेळ रींग वाजत राहीली. शेवटी एक्स्चेंजचा, समोरुन प्रतिसाद मिळत नाही असा रेकॉर्डेड मेसेज ऐकला आणि त्याने फोन ठेवून दिला. अरमान थोडासा अपसेट झाला. संध्याकाळी रूमवर आला. पुन्हा एकदा तीला फोन केला. पुन्हा तेच. काहीतरी गडबड आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. एकतर तिच्या फोनमध्ये काही गडबड असावी किंवा कॉलेजमधला एयरटेलचा टॉवर तरी शांत झाला असावा. खात्री करावी म्हणून त्याने कॉलेजमधल्या एक स्टाफमधल्या मित्राला एयरटेलची अवस्था विचारली. त्याने एयरटेलचं नेटवर्क अगदी व्यवस्थीत चालू आहे असं सांगितलं. म्हणजे तिच्या फोनमध्ये काहीतरी गडबड असावी किंवा... किंवा मग ती जाणुनबुजुन आपला फोन उचलत नसावी. तो विचार मनात येताच थोडंसं वाईट वाटलं. त्याने खात्री करुन घ्यायचं ठरवलं...

दुसर्‍या दिवशी त्याने तिला मोबाइलवरुन मेसेज केला आणि त्याच वेळी आपल्या मित्राच्या मोबाइलवरुन कॉल केला. हाही कॉल तिने घेतला नाही. संध्याकाळी मित्र घरी गेला. अरमान थोडं काम असल्यामुळे ऑफिसमध्ये थांबला. साधारण आठच्या सुमारास त्या मित्राने फोन करुन सांगितलं की त्याला एका मुलीचा फोन आला होता आणि तिने अरमानला तिला फोन करायला सांगितलं आहे. अरमानने मित्राला त्या मुलीचं नाव विचारलं. तर ते तिने सांगितलंच नाही असं म्हणाला. छान, म्हणजे आपल्याला तिला फोन करायचा आहे हे तिने सांगितलं पण ती कोण हे नाही सांगितलं. तो फोन तीचाच होता हे उघड होतं म्हणून त्याने तीला पुन्हा फोन केला. आणि आताही तेच झालं. तिने फोन घेतलाच नाही. आता काय करायचं या विचारात तो पडलेला असतानाच एक विचार मनात चमकून गेला. हॉस्टेलला फोन केला तर ? कॉलेज सोडून तीन वर्ष होऊनही मुलींच्या हॉस्टेलचा नंबर आपण विसरलो नाही या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याने फोन केला. तिला बोलावलं. आणि फोनवर तीने जे सांगितलं त्यावर त्याचा मुळीच विश्वास बसला नाही. तिचा मोबाइल म्हणे तिने तिच्या कुठल्या बहीणीला दिला होता. ती खोटं बोलत होती हे उघड होतं. तिला आपल्याशी बोलायचं नव्हतं हे त्याला कळून चुकलं होतं. त्याने तिला कशी आहेस वगैरे विचारून फोन ठेवून दिला...

...खुप वाईट वाटलं त्याला. त्याच्या मनात विचारांची आवर्तनं चालू झाली. असं काय झालं असेल की ज्यामुळे तिला आपल्याशी बोलणं बंद करावंसं वाटलं. आणि मुळात तिच्यासारख्या समजुतदार मुलीनं असं का करावं हे त्याला समजेनासं झालं. फॉर वॉटेव्हर रिझन, तिला आपल्याशी बोलायचं नव्हतं तर तिने तसं मोकळेपणाने का सांगितलं नाही ? कदाचीत आपण तिला तुला माझ्याशी का बोलायचं नाही असंही विचारलं नसतं. ती आपली मैत्रिण होती. तिला आपल्याशी बोलायचं नाही या तिच्या मताचा आपण नक्कीच आदर केला असता...

त्याचं आयुष्य तिच्याविनाही चालूच राहिलं. तो मोबाइल नंबर तिच्याकडेच आहे हे माहीती असल्यामुळे एक दोन वेळा त्याने तिला मेसेज केला. पण काहीच प्रतीसाद मिळाला नाही. तिच्या मनाची दारं तिने आपल्यासाठी बहुतेक कायमची बंद केली होती असं त्याला वाटू लागलं होतं. पण नेमकं काय झालं असावं ज्यामुळे तिनं आपल्याशी बोलणं बंद केलं हा प्रश्न काही केल्या त्याच्या मनातून जायला तयार नव्हता. तो स्वताशीच विचार करू लागला. आपल्याला तिच्याबद्दल ओढ वाटत होती का ? आपल्या बोलण्यातून तिला तसं काही जाणवलं असावं का ? पण मग तिने तसं आपल्याशी मोकळेपणाने बोलायला काय हरकत होती ? आणि समजा आपल्याला जर तिच्याबद्दल ओढ वाटत असेल तर त्यात वावगं काय होतं ? आपण तिच्याशी फोनवर बोलताना कधीही मर्यादा तर सोडल्या नव्हत्या ना ? जर आपण तिच्या प्रेमात वगैरे पडलो आहे असा तिचा समज झाला असेल आणि तिला ते मान्य नसेल तर तिने तसं मोकळेपणाने सांगायला काय हरकत होती ? एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. उत्तर मात्र कुठल्याच प्रश्नाचं मिळत नव्हतं. एक दोन वेळा तो वर्किंग डे ला कॉलेजला काही कामानिमित्त गेलो होता. तेव्हा तिला भेटायचं असा विचार त्याच्या मनात येऊन गेला होता. पण तो त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि माजी लेक्चरर असल्यामुळे तिला भेटणं खुप अवघड आहे हे त्याला लगेच जाणवलं होतं. आणि एक निरागस मैत्री तुटली होती...

पुढे कामानिमित्त तो अमेरिकेला आला. नवी दुनिया. नविन माणसं. एका नव्या जगाशी जुळवून घेण्यासाठी त्याचा संघर्ष चालू झाला. काम करत असतानाच भारतातली एखादी आठवण चेहर्‍यावर स्मित फुलवू लागली. आई, बाबा, भावंडं, मित्रमंडळी या सार्‍यांची किंमत घरापासून दुर आल्यावर कळायला लागली. शंकर महादेवनचं 'तारे जमीनपर' चित्रपटातील 'मा' हे गाणं ऐकताना पापण्यांवर पाणी जमा होऊ लागलं. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तो जिमेल आणि ओरकूट यांच्या माध्यमातून आपल्या मातीशी 'कनेक्टेड' राहू लागला...

एक दिवस सहज म्हणून त्याने तिच्या नावाने ओरकूटमध्ये शोध घेतला. अनपेक्षीतपणे तिचं प्रोफाईल सापडलं. फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. स्क्रॅप टाकला. तिचा काहीच प्रतीसाद नाही. त्याने चिकाटी सोडली नाही. अधुनमधुन तिला स्क्रॅप टाकत राहिला. शेवटी एक दिवस तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्याला स्क्रॅपही टाकला. एकमेकांची विचारपुस होऊ लागली. पण त्यात पुर्वीचा जिव्हाळा नव्हता. कधी कधी त्याला वाटायचं की ती केवळ औपचारीकता म्हणून आपल्याला स्क्रॅप टाकते. त्याने एक दोन वेळा आडून आडून तेव्हा काय झालं होतं हे विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने उत्तर देणं टाळलं. त्यानेही मग तिच्या भावनांचा आदर ठेऊन तिला स्क्रॅप टाकणं कमी केलं...

जेमतेम सहा महिन्याच्या टाइम स्पॅन मधील वरील सार्‍या घटना. ती पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवर त्याला दिसते काय, बसमध्ये तिच्याशी ओळख काय होते, तिच्याशी मैत्री काय होते आणि ही मैत्री ती तडकाफडकी तोडून काय टाकते. सारंच आश्चर्यकारक. आज जेव्हा तटस्थपणे तो या सार्‍या घटनांकडे पाहतो तेव्हा त्याला स्वतःवरच हसायला येतं. आपण तेव्हा कितीही नाही म्हणत होतो, अगदी तिच्या प्रेमात वगैरे पडलो नव्हतो तरीही ती आपल्याला आवडली होती याची जाणिव त्याला होते. त्याशिवाय का एक पंचवीशीमधला स्थिरावलेला संगणक अभियंता एका अभियांत्रिकिच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणार्‍या सतरा अठरा वर्षांच्या मुलीला दोन दिवसांआड तिला फोन करायचा, संध्याकाळी तिच्याशी बोलून झाल्यावर दिवसभराचा सारा त्रास विसरायचा. त्याला जाणवतं की तशीही ती आजही आपल्याला आवडते . कुणालाही आवडावी अशीच आहे ती. गोड, निरागस आणि सरळ साधी. आजही वाटतं की तिला जे काही वाटलं होतं, जाणवलं होतं ते ती मोकळेपणाने बोलली असती तर ? मूळात ती आपल्याला आवडते असं आपण तिला कधीही बोलून दाखवलं नव्हतं. कारण आपल्याला स्वतःलाच तेव्हा त्या भावनांची जाणीव नव्हती. आणि तिलाही ते असं अचानक कसं जाणवलं हा प्रश्न होताच. मुलगी असल्यामुळे कदाचीत तिला ते आपल्या बोलण्यातून तसं जाणवलंही असेल. कदाचित आपण तिला खुप फ्रिक्वेंटली फोन करतो हे कळल्यानंतर तिच्या मैत्रीणींनी तिला वेडेवाकडे सल्ले दिले असतील. पण म्हणून काय असं वागायचं असतं ? एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते आणि हे त्या मुलीला मान्य नसेल तर म्हणून काय त्या मुलीने त्या मुलाशी मैत्री तोडायला हवी असंच काही नाही. निदान तो मुलगा समजुतदार असेल, तिच्याबद्दल त्याला आदर असेल तेव्हा तर नक्कीच नाही ना ? असं तडकाफडकी बोलणं बंद करण्यापेक्षा तिनं आपल्यासमोर मन मोकळं केलं असतं तर ? तिनं म्हटलं असतं तर आपण स्वतःहून तिच्याशी बोलणं बंद केलं असतं...

...तशीही ती लहान आहे. एव्हढी विचारांची परिपक्वता कदाचित तिच्याकडे नसेल. जेव्हा तिला वाटलं असेल की ती आपल्याला आवडते किंवा आपण तिच्या प्रेमात पडलो आहे तेव्हा तिच्या वयानुसार जे तिला योग्य वाटलं तसं ती वागली असेल. तसाही आपला तिच्यावर राग नाही. कदाचित आपण तिच्या वयाचे किंवा तिच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठे असतो तर 'ती मला आवडते' या वाक्याला आपण 'मी तिच्या प्रेमात पडलो आहे' असं नक्कीच रुपांतरीत केलं असतं आणि तिला आपलीशी करण्यासाठी जिवाचं रान केलं असतं. नव्हे आपल्या त्या वयाने ते करायलाच लावलं असतं. पण आपण तिच्यापेक्षा सहा सात वर्षांनी मोठे आहोत याची जाणिव आपल्याला आहे. त्यामुळे तिच्या मनात नसताना तिच्या प्रेमात पडण्याचा वेडेपणा आपण नक्कीच करणार नाही. पण म्हणून काही ती मनातून निघून जाणार नाही. तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्‍यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल,
'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...'

सतिश गावडे
(आम्ही इथेही उजेड पाडतो : मी शोधतो किनारा... )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

15 Sep 2008 - 9:56 am | अनिल हटेला

एकच शब्द ~~~~

सही ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ऋचा's picture

15 Sep 2008 - 10:09 am | ऋचा

अप्रतिम!!!
खुपच छान!!
आणि खोपोलीचा उल्लेख आल्याने अगदीच जवळच वाटलं

आवांतर : मी खोपोलीलाच शाळेत होते इयत्ता १ली - पोस्ट ग्रॅजुएट म्हणजे जवळ-जवळ १७-१८ वर्ष.
आणि मी रहातेही अगदी जवळ तिथुनच खालापूर!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

शैलेन्द्र's picture

15 Sep 2008 - 4:55 pm | शैलेन्द्र

छानच.........

जैनाचं कार्ट's picture

15 Sep 2008 - 5:10 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मनातील भावना एकदम व्यवस्थीत पध्दतीने तुम्ही उलघडून दाखवल्या आहेत... कोठे ही विस्कळीत पणा नाही आहे हेच तुमचं यश !
वेग देखील व्यवस्थीत ठेवला गेला आहे त्यामुळे एका दमात वाचली गेली कथा !!

मनापासून आवडली !!!

तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्‍यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल,
'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...'

कळतं नकळंत तुम्ही माझ्या मनातील भावनाच येथे व्यक्त केल्या की काय असे क्षण भर वाटून गेले व डोळे पाणावले !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सहज's picture

15 Sep 2008 - 5:18 pm | सहज

फटू चांगले लिहले आहेस रे!

अंतु बर्वा's picture

15 Sep 2008 - 10:51 pm | अंतु बर्वा

खूपच छान......

विद्याधर३१'s picture

15 Sep 2008 - 11:14 pm | विद्याधर३१

सतिश
सुरेख... आवडेश..
प्रेमात हीच भावना ठेवली तर मग काही त्रास होत नाहि.....
विद्याधर

प्राजु's picture

16 Sep 2008 - 1:09 am | प्राजु

भावनाविष्कार सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

16 Sep 2008 - 1:27 am | शितल

खुप छान लिहिले आहे.
:)

मिरा's picture

3 Oct 2008 - 4:20 pm | मिरा

हा ले़ख अगदी मनापासुन आवड्ला !

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:53 am | विसोबा खेचर

पण म्हणून काही ती मनातून निघून जाणार नाही. तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्‍यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल,
'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...'

सुंदर लेखन...!

तात्या.