वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो.
"सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले.
"धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं. सरांनी गाडीचा दरवाजा लावताच मी अॅक्सलरेटरवरचा पाय दाबला आणि संचेतीच्या दिशेने गाडी हाकू लागलो. गाडी चालत असताना दोन अडीच तासांपूर्वी घडलेला प्रसंग नजरेसमोर तरळू लागला.
साहित्य संमेलनातील उत्साह ओसंडून वाहत होता. कुठे कवितावाचन चालू होते, कुठे परीसंवाद चालू होता. प्रवेशिकेच्या दोन्ही हातांना असलेल्या पुस्तक प्रदर्शनांमधून गर्दी वाहत होती. प्रा. डॉ. त्यांच्या मित्राचा सहभाग असलेल्या एका परिसंवादाला गेले होते. मी आणि प्रचेतस भल्या मोठया पुस्तक प्रदर्शनात पुस्तकं चाळत फीरत होतो.
अचानक वारा घोंघावल्याचा आवाज आला. प्रदर्शनाचा मंडप खुपच उंच होता. आणि त्यावर बहुधा पत्रे नुसतेच टाकून ठेवले असावेत. मंडपाच्या प्रवेशद्वारातून वारा आत शिरला. काही भाग खांबांसकट अचानक वर उचलला गेला. लोकांच्या ते लक्षात येताच एकच पळापळ सुरू झाली. वर उचलला गेलेला मंडप खाली आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रदर्शनाच्या तेव्हढया भागातील लोक सैरावैरा पळू लागले. त्या लोकांमध्ये मी आणि प्रचेतसही होतो. लोक मागे पुढे न पाहता जीव खाऊन पळत होते. ईतक्यात माझ्या उजव्या पायातील फ्लोटर पुढून निघाला. मागच्या पटटा तसाच राहिल्याने मी अडखळून खाली पडलो. लोक जीवाच्या आकांताने पळत होते. मी दुर्दैवाने अशाच लोकांच्या पायाखाली आलो. मला लोक तुडवून जात असल्याने उठताच येईना. माझी पँट गुडघ्यावर कपडयाच्या चिंध्या फाडाव्या तशी फाटली. दोन्ही गुडघे आणि तळहात सोलवटून निघाले. शेवटी कसाबसा जीवाच्या आकांताने उठलो. आणि उजव्या पायातून अर्धवट निघालेल्या चपलेसह पळत सुटलो.
माझ्या पाच सहा फुट पुढे प्रचेतस पळत होता. त्याच्या आणि माझ्या मध्ये अजून एक जण होता. ईतक्यात वरून एक पत्रा दाणकन खाली आदळला. आणि तो पत्रा नेमका मी आणि प्रचेतस यांच्यामध्ये असणार्या व्यक्तीच्या डाव्या हातावर कडेने लागला. त्याच्या हाताचे हाड बहूधा मोडले असावे. ती व्यक्ती "आई माझा हात मोडला, आई माझा हात मोडला" असे गुरासारखे ओरडत पळत सुटली. मी थोडक्यात वाचलो. जरा पुढे असतो तर त्या पत्र्याने मलाही प्रसाद दिला असता.
मी सुन्न झालो होतो. तोंडातून शब्द निघत नव्हता. प्रचेतसने मला एका चहाच्या स्टॉलवर नेले. एक कप चहा प्यायलो तेव्हा मला हायसे वाटले. आणि आता पहिल्यांदा माझे माझ्या फाटलेल्या पँटकडे आणि सोलवटलेल्या गुडघ्यांकडे आणि तळहाताकडे गेले. उजवा गुडघा बराचसा रक्ताळला होता. जोरात ठणकाही लागला होता. प्रचेतस आणि मी संमेलनाची वैद्यकीय सेवा कुठे आहे हे शोधू लागलो. थोडी शोधाशोध केल्यानंतर उभी असलेली अँब्युलन्स दिसली. त्यांच्याकडे गेलो. पत्रे उडण्याचा प्रकार त्यांच्या कानावर गेला होताच. त्यांनी मला अँब्युलन्समध्ये बसवून प्रथमोपचार केले आणि बाजूलाच असलेल्या डॉक्टरांना दाखवायला सांगितले.
मी डॉक्टरांकडे जाताच त्यांनी त्या हात मोडलेल्या मुलाला नुकताच हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे सांगितले. "तू थोडक्यात वाचलास" असं हसत सांगितलं. मी ही कसंनुसं हसलो. डॉक्टरांनी जखमेवर मलमपट्टी केली आणि काही औषधांच्या गोळ्या दिल्या. मी घाबरून डॉक्टरांना पुन्हा पुन्हा हाड सांध्यावरून सरकले नाही ना, गुडघ्याची वाटी ब्रेक झाली नाही ना असे विचारत होतो. आणि डॉक्टर असं काही झालं नसावं म्हणून सांगत होते. जखम फक्त त्वचेवर झाली असावी असं त्यांचं म्हणणं होतं.
प्रा. डॉ. परिसंवाद संपवून येताच प्रचेतसचा निरोप घेऊन मी आणि प्रा. डॉ. शिवाजीनगरला निघालो. इतक्यात प्रचेतसने यशोधरा साहित्य संमेलनाला आली असून तिला प्रा. डॉ. ना भेटायचे आहे असे सांगितले. तिची धावती भेट घेऊन आम्ही निघालो. जरी गुडघे प्रचंड दुखत होते तरी मी गाडी चालवू शकत होतो ही चांगली गोष्ट होती.
.. घरी येताच नेटवरून जवळपास कुणी हाडांचे डॉक्टर आहेत का हे शोधले. दोन डॉक्टरांचे क्लिनिक जवळच होते. मात्र तो दिवस रविवार होता हे माझ्या डोक्यातच नव्हते. मी पाच मिनिटांत एक हाडांच्या डॉक्टरांकडे पोहचलो. डॉक्टर एका पेशंटला तपासून बाहेर पडण्याच्या बेतात होते.
"अहो, आज रविवार आहे. मी पेशंट घेत नाही रविवारी" डॉक्टरांनी मी क्लिनिकच्या आत पाऊल टाकायच्या आधीच मला दाराबाहेर पाहताच सांगितले.
"डॉक्टर प्लिज, मी बाईकवरून पडलोय आणि माझ्या गुडघ्यांना लागलंय" मी डॉक्टरांनी नसत्या चवकशा करू नयेत म्हणून साहित्य संमेलन प्रकरण त्यांना सांगितलेच नाही.
"अहो हे आमचे नेहमीचे पेशंट आहेत म्हणून दवाखाना उघडला होता. बरं या आता आलाच आहात तर." माझा केविलवाणा चेहरा पाहून त्यांना माझी दया आली असावी.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली.
"कुठे राहता?" डॉक्टरांनी विचारले.
"इथेच तुमच्या शेजारीच." मी उत्तर दिले.
"ठीक आहे. मी रविवारी पेशंट तपासण्याचे पाचशे रुपये घेतो. मात्र तुम्ही शेजारी असल्यामुळे तुमच्याकडून मी तिनशे रुपयेच घेईन. ती माझी रेग्युलर फी आहे." डॉक्टरांनी असे म्हणताच मी मान डोलावली.
मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली.
"तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली.
"मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला.
"किती खर्च येईल त्याला?"
"साडे पाच सहा हजाराच्या आसपास. किंवा थोडासा जास्त. माझ्या ओळखीचे एक सेंटर आहे स्वारगेटला. त्यांच्याकडे जा. मी त्यांना तुला डिस्काउंट दयायला सांगतो."
डॉक्टर एव्हढे बोलून थांबले नाहीत तर चक्क त्यांनी एमाराय सेंटरच्या प्रिस्क्रिप्शनवर "प्लिज गिव्ह टेन पर्सेंट डिस्काउंट टू माय पेशंट" असं स्पष्टपणे लिहिलं होतं. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. साधारण वर्षभरापूर्वी मी डॉ. अरुण गद्रे लिखित कैफियत नावाच्या वैद्यकिय क्षेत्रातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकणार्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. तिथे तज्ञ डॉक्टरांची या विषयावरची भाषणे ऐकली होती. अगदी डॉ. प्रकाश आमटेही भरभरून बोलले होते. हे दहा टक्के सवलत प्रकरण मला चांगलंच खटकलं होतं. मात्र तिथे त्या डॉक्टरांना काहीच म्हटलं नाही. डॉक्टरांनी दिलेलं ते एमाराय आणि इतर औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन मी घरी आलो.
घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार अथपासून इतिपर्यंत सांगितला. त्याने "मी घरी येऊन पाहतो. तोपर्यंत तू काहीही औषधं विकत घेऊ नको किंवा एमाराय करायला जाऊही नको." असे सांगितलं. भावाने संध्याकाळी येऊन माझा पाय तपासला.
"गाडी तूच चालवत आला का?"
"हो."
"काही त्रास जाणवला का?"
"तसा त्रास नाही. मात्र उजवा गुडघा ठणकत आहे"
"ठीक आहे. मला वाटत नाही काही प्रॉब्लेम असावा. तरीही आजची रात्र जाऊ दे. जर काही गंभीर असेल तर रात्री पाय सुजेल. काही गंभीर नसेल तर सकाळपर्यंत यू विल बी परफेक्टली फाईन. रात्री पाय सुजलाच तर आपण माझ्या ओळखीतल्या दुसर्या हाडांच्या डॉक्टरांकडे जाऊ."
सकाळ झाली. दोन्ही गुडघ्यावरील जखमांनी खपली धरली होती. ठणका पुर्ण थांबला होता. सूज वगैरे अजिबात आली नव्हती. भावाला फोन करून अपडेट्स दिले. त्याने एमाराय करण्याची मुळीच आवश्यकता नाही असे सांगितले. फक्त अॅलोपथी डॉक्टरकडे जाऊन प्रिकॉशन म्हणून टीटीचे इन्जेक्शन घे असे सांगितले.
या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.
प्रतिक्रिया
26 Feb 2016 - 3:00 pm | प्रकाश घाटपांडे
आपण सेकंड ओपिनियन पहिल्या डॉक्टरच्या नकळत घेतले व त्याला ते नंतर समजले तर तो डूख धरेल अशी भीती काही लोकांना वाटते. डॉक्टर समंजस असेल तर असे होणार नाही. पण एखाद्या डॉक्टरला आपल्या पेशंट ने सेकंड ओपिनियन घेतले तर ते आपल्यावर अविश्वास दाखवल्यासारखे वाटू शकते.