निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात.
आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात. कधी-कधी एकदम घुम्म मौसम. नाममात्र वारही नाही. अश्या घुम्म वेळी छोट्या-मोठ्या पतंगांना आकाशात उड्डाण भरणे अशक्यच. अश्या पावसाळी मौसमात उस्ताद पतंगबाजाच तग धरू शकतात. इथे पतंग पेच लढविण्यासाठीच उडवितात. पतंगबाजाचा D-Day अर्थात १५ ऑगस्टला तर सतत ‘आई बो काटा’ हि विजयी आरोळी सकाळपासूनच वातावरणात दुमदुमू लागते.
माझे बालपण जुन्या दिल्लीतच गेले. १९८०च्या पूर्वी आम्ही ज्या वाड्यात भाड्यावर राहायचो तो पूर्वाभिमुख होता. मध्ये बेडा (आंगण) आणि तिन्ही बाजूला बांधकाम. भलीमोठी गच्ची होती. पावसाळ्यात वारे हि पूर्वेचे असतात. त्यामुळे भरपूर पतंगा लुटायला मिळायच्या. पतंगा विकत घेण्याची गरज पडत नसे. या शिवाय गच्चीच्या मागे काबुली गेटची सरकारी शाळा होती. शाळेच्या गच्चीवरच्या पतंगा हि आमच्या नशिबी.
काबुली गेट वरून आठवले. पूर्वी शाळेच्या जागी मैदान होते व पुढे काबुली दरवाजा . पण १८५७च्या क्रांतीत, अंग्रेजांच्या तोफांच्या मार्याने हा दरवाजा नष्ट झाला. इथे भयंकर युद्ध झाले होते. हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षांचे सैनिक आणि अधिकारी शहीद झाले होते. काहींच्या मते आज हि अमावस्येच्या घुप्प रात्रीत घोड्यांच्या टापांचे आवाज आणि सैनिकांचे विव्हळणे ऐकू येतात. आमच्या राहत्या खोलीची खिडकी शाळेच्या बाजूला होती. कधी हि काही ऐकू आले नाही. फक्त हिवाळी रात्रीत शाळेची इमारत माकडांची झोपण्याची जागा होत असेल. त्यांच्या माकड चेष्टांमुळे (अर्थात तोडफोड, दंगा-मस्ती) लोकांना असे भास होत असावे. असो.
मोठे पतंगबाज शर्त(पण) लाऊनच पेच लढवितात. किमान ७०-८० गज पतंग उंच उडल्यावरच पेच लागत असे. अशी कटून आलेली पतंग लुटायला मिळाली कि किमान १०० गज मांजा मुफ्त मिळत असे. आमच्या सारख्यांच्या पूर्ण सीजन साठी पुरेसा असे. हा मांजा अत्यंत मजबूत हि असायचा. नेहमीच बोटे कापल्या जायची. तरीही त्या साठी दररोज संध्याकाळी आकाशात टक लाऊन पाहत असू, कुठे उंच आकाशात तरंगत जाणारी कटलेली पतंग दिसते आहे का?
दिल्लीत पतंग उडविणे हि जिगरीचे काम. पतंग उडविण्यासाठी पहिले पतंगाचे कन्ने बांधावे लागतात. नंतर कन्न्याला मांजा बांधताना एक गाढ मारावी लागते. हीच ती कमजोर कडी. जवळ-जवळ घरे असल्यामुळे एकाच वेळी आकाश्यात भरपूर पतंगा उडताना दिसतात. पतंग उडविणार्या पतंगबाज्यांची नजर बाज पक्षी सारखीच असते. पतंगबाजांची आकाशात उडत असलेली पतंग, बाज पक्षी प्रमाणे खाली घेप घेणार आणि नुकत्याच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करणार्या पतंगाचे कन्ने कापणार हे ठरलेलेच. अश्यावेळी संधी साधून, चौफेर पाहून, ५-१० सेकंदात पतंग आकाशात ४०-५० गज उंच उडवावी लागत असे. एकदा कि पतंग ५०-६० गज उंच उडाली कि मग चिंता नसे.
मी पेच लढविण्याचा एकच नियम पाळीत असे. दुसर्याला पेच साठी लालच देणे. पण स्वत: त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही. पेच लागताना ज्या दिशेला वारा वाहतो आहे, ठीक मध्य भागी पतंग ठेवायची, मग मांजा थोडा कमजोर असेल तरी हि ९०% दुसर्यांची पतंग कापण्यात यश मिळणारच. पेच लागताना जर पतंग वार्याच्या दिशेला नसेल तर ९०% टक्के पतंग कापल्या जाईलच. अर्थातच नेहमीच हे जमत असे नाही. शिवाय दुसर्याचा मांजा जास्त मजबूत आणि पतंग मोठी असेल तर त्याचा फायदा त्याला मिळणारच.
दिल्लीचे पतंगबाज देशात मशहूर आहेतच. पण गुजरातचे पतंगबाज हि काही कमी नाही. दिल्लीकर पतंगबाज्यांशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. संक्रांतीच्या दिवशी तिथे हि दिल्ली सारखेच पेच लढविल्या जातात. पण आपले मुंबईकर मात्र पतंगबाजीत फिसड्डीच. गज्जू भाई सहज त्यांच्या पतंगा कापतात. एक नवखा पतंगबाज गुजराती उस्तादकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला आणि इथल्या भल्या-भल्या पतंगबाज्यांच्या पतंगा त्यांनी सहजच कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे एकछत्र राज्य आहे. असो.
सर्व पतंगबाज्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा.
प्रतिक्रिया
14 Jan 2016 - 2:27 pm | पैसा
छान लिहिलंय. पतंग उडवायचे प्रयोग केलेत पण ते आपले काम नव्हेच!
14 Jan 2016 - 3:18 pm | राजेंद्र मेहेंदळे
आम्ही उडवलेले पतंग म्हणजे बिगिनर टाईपचे २५ पैसे लहान पतंग, १ रुपया २ रुपये ढोल आणि १०-२० रुपये मांजा.
अन्सारी चौकात खोटाल किंवा काद्रीच्या दुकानात पतंगाच्या दिवसात झुंबड उडायची पोरांची. बिगिनर लोक बदामी तारी मांजा, मग गुलाबी तारी आणि एक्स्पर्ट लोक्स काळा तारी वापरायचे.
वावडी नावाचा वेताच्या कामट्यांनी बनवलेला पतंग असतो काही ठिकाणी म्हणे. पण कधी बघितला नाही.
14 Jan 2016 - 6:41 pm | आदूबाळ
कल्याणचे काय हो तुम्ही?
14 Jan 2016 - 6:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
पारनाका
14 Jan 2016 - 3:30 pm | होबासराव
एक नवखा पतंगबाज गुजराती उस्तादकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला आणि इथल्या भल्या-भल्या पतंगबाज्यांच्या पतंगा त्यांनी सहजच कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे एकछत्र राज्य आहे. असो.
चौकार मारलात =))
14 Jan 2016 - 3:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
काही बोललो असतो पण असो आता!
14 Jan 2016 - 4:03 pm | कैलासवासी सोन्याबापु
पतंगीची नावे भारी असतात गावागावानुसार आमच्याकडे प्रसिद्ध म्हणजे
२५ पैसे किंमत वाली "डुग्गी" ही पतंग म्हणजे घरचा पुड्याचा दोरा गुंडाळून बारकी पोरे चड्डी सावरत घेऊन धावत रस्त्याने ती होय
७५ पैसे ते २ रु किमतीचे चौकोनी पतंग म्हणजे
"रॉकेट "अन खालुन गोलाकार असलेले "गेंडे"
५ रु कीमतीचे मोठे गेंडे अन रॉकेट त्याला एक सामान्य नाव "भप्पल"
प्लास्टिकच्या पतंगाला म्हणत "झिलायटीन" (जिलेटिन पेपर)
मांजा म्हणला की "नौतारी बरेलीच" (नऊतारी बरेली मांजा) घरी घोटायचा असला तर दाभण भांडे पासुन सगळे काही जय्यत तयारी लागे साबुदाणा अन पाणी एकत्र कालवुन शिजवायचे त्यात रंग काचपूड घालायची ते शिजायला लागले की त्यात रंग शिरस अन समुद्रफेस घालायचा (एक प्रकारचे पांढरे प्रवाळ) मग प्रॉपर नऊतारी दोर्याचे बंडल (गन छाप किंवा संकल छाप) आणून ते त्या रुद्दी/लुद्दी मधे घोटायचे भरपुर कुटाने अन फूल मजा असे!!!
14 Jan 2016 - 4:33 pm | होबासराव
जय्यत तयारी लागे साबुदाणा अन पाणी एकत्र कालवुन शिजवायचे त्यात रंग काचपूड घालायची ते शिजायला लागले की त्यात रंग शिरस अन समुद्रफेस घालायचा
लुद्दीत म्या तर काच बी घरीच कुटयाचो टुबलाईट फोडुन कारन भायेरच्या काचात त निरा रांगोळि टाकेल असे.
मांजाचे बि २ प्रकार एक खैचु अन दुसरा ज्याले ढील द्या लागे. बरेली आनत जाव कच्छी मस्जिद जौळुन.
लय ल्हान असताना त राजा फाटेल पतंगी चा ताव घेउन गोल गोल आकराचे तुकडे करत होतो मंग त्याचेत दगड गुंडाळुन वर फेक्याचा तो डग्गा मस्त हवेत ऊडत येत जाय. त्या मांजाले दगड गुंडाळुन त्याचा लंगोट कर्याचा आन वर लटकेल पतंग काढ्याचि. कधि कधि तशाच दगडाले मांजा गुंडायुन काटा काटी खेळ्याचि... डुग्गी, राकेट, भप्पल, सब्ब्ल, लंगोट काय शब्द होते राजा. संक्रांति च्या सकाळ पासुन गच्ची वर निरा ढणाणा डेक लाव्याचा..आन पंतग समोरच्याची कटो का आपली जोरात अल्डावायच ये गय्या, * काव बोने खेयशिल का पोराइत
हैत राजा लय आठवणि हायत आन आठवुन चांगल बि वाट्टे अन त्रास बि होते..कारन आता अथिसा हे सार मिस करतो.
काव बोने खेयशिल का पोराइत* :- गल्लीत एक दत्त्या होता सारे पोट्टे टपेलच असत का हीचि पंतग कवा वरच्या हवेत जाते, निरा गलका होत जाय मंग पेच खेळ्याले...जशी दत्त्याची पंतग कटे क पोट्ट्यायच सुरु होय ये गय्या, * काव बोने खेयशिल का पोराइत
14 Jan 2016 - 4:53 pm | होबासराव
वर्हाडी भाषेत लिहिलय पण समजेल सगळ्यांना =))
हा सोन्या बाप्पु असला धाग्यात की वर्हाडी लिहायचा मोह आवरत नाहि.
14 Jan 2016 - 4:53 pm | पैसा
एरवीही वर्हाडी भाषेत लिहा हो!
14 Jan 2016 - 4:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
बापा!!! आम्ही तर सामूहिक मांजा सुतने करत जाओ उमरी मधे आमच्या साऱ्या घरुन एक एक डिम होयल लाइट अन जथुन ट्यूबलाइट भेटन तथुन ट्यूब आणली का सुताच्या थैलीत टाकून बंडे मारू मारू कूटत जाऊ मंग धोतराच्या कापड़ातनी ते काच गायने वगैरे कामं असत समुद्रफेस आन्याले जठारपेठ चौकात रूपेश वाल्या म्हावरे लंगड़ा मामा पतंगीचं दूकान लावत जाय तटीसा पयत जात जाओ मोठ्या उमरीतनं तो समुद्रफेस टाकल्यानं मांजा शाइन वाला अन चोपड़ा होते म्हणत लोकं सारे इच्चक कामं करत जाओ एक दिवस आधी मंग दूसरा दिवस निरा डेक वर धिंगाने "ढील पे ढील" "रख के सटाक" पतंगा उडवायले मजा येत जाय!! गोते मरणाऱ्या पतंगीले झाप द्यायले अन कन्नी बांधायले डोके लावा लागते म्हणून त्या रोजी बुडी कितीक कनारली तरी डोक्याले तेल न लावता बिंग गच्चीवर पयत जाओ
14 Jan 2016 - 4:56 pm | प्रचेतस
वा...बाप्पू आणि होबासराव, मजा आयली.
14 Jan 2016 - 5:38 pm | अजया
:)
14 Jan 2016 - 5:03 pm | होबासराव
आम्हिबि सामूहिक मांजा सुतत जाव्..उमरी च्या थोड पुढ एकतर गुढदी ले चाळिस क्वार्टर जोळ नाय तर थेट चाचोंडि ले.
आपले भारत विद्यालयातले सारे दोस्त (बदमास ग्रुप) थिकडेच र्हायत, रणपीसे नगरातुन तथी जात जाव. आता मांगच्या सालि गेल्तो राजा तिकडे, सार बदलल. एक प्लॉट खालि नाहि न हो...आम्ही शाळेत होतो तवा ते जे मोठ्या उमरितलि फरशि (नाला) हाय त्याच्या पुढ काहिच नव्हत.. त्यानंतर सायकल पम्चर (पंक्चर) झालि त तोडा तंगड्या गुढधि लोक्...गेले ते दिस राजा
14 Jan 2016 - 9:50 pm | चतुरंग
सगळे शब्द तसेच आहेत. आम्ही नगरवाले हो बाप्पू. पतंगी आमच्याकडं बी लै फेमस! :)
(नगरी)रंगा
14 Jan 2016 - 4:14 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त लिवल्या हाय! एंडिंग ला एकदम पेज मारली राव तुम्मी.. खापदीशी गुल केलाय येकदम!
पुण्याच्या नवी पेठेत मांजा तयार केलेला:- आत्मुपतंगी मांजेवाला !
14 Jan 2016 - 4:48 pm | उगा काहितरीच
लहानपणी खूप उडवले पतंग. संक्रांतीच्या दिवसात सुट्टी असेल तर सकाळी सात पासून संध्याकाळी सात पर्यंत गच्चीवरच रहात असे. आई ताट घेऊन वर येत असे. मग जेवण ! मस्त दिवस होते ते.
14 Jan 2016 - 4:51 pm | प्रचेतस
पतंग उडवायला जमत नै आणि आवडतही नै. बाकी लेखन आवडले.
15 Jan 2016 - 3:48 pm | नाखु
असहमत (प्रतीसादाच्या) आवडतो पण स्वतंत्र पतंग ऊडवला नाही (का उडला नाही?) आणि लेखन फर्मास आठवणीची अत्तरकुपी शाबुत ठेवल्याबद्दल विशेष धन्यवाद..
(कटलेल्या पतंगीवाला) नाखु
14 Jan 2016 - 5:53 pm | सूड
तुमचं लिखाण आणि होबासराव-सोन्याबापूंच्या पुरवण्या, दोन्ही छान!!
14 Jan 2016 - 6:58 pm | मुक्त विहारि
ह्यांचे प्रतिसाद दोन्ही आवडले.
पतंग उडवायला कधी जमले नाही पण दरवर्षी तितक्याच जोमाने आणि नेटाने प्रयत्न करायचो.
आता तर आमच्या इमारतीला शेड घातल्यामुळे पतंग उडवणे जमत नाही. (पतंंग उडवता येइना, गच्चीवर शेड....अशीही म्हण वापरता येईल.)
14 Jan 2016 - 9:44 pm | चतुरंग
होबासराव आणि सोन्याबापूंच्या पुरवण्याही मजेदार.
आमचा हा लेख आठवून अं.ह. झालो! :)
(गोत घेणारा पतंगबाज)रंगा
15 Jan 2016 - 3:30 pm | आंबट गोड
तथीच माहं घर हाये ना..बिर्ला च्या रामा पाशी. रेल्वे गेट हाये ना, तथीसा. येऊन जाजो एकदा. बिंग पतंग उडवू.
15 Jan 2016 - 8:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
बापा अजुन एक गाववाले!!! लेक मले वाटते पुऱ्या अकोल्यातले बिलाट पोट्टे अन पोरी अटीसा हायत!! आता काय सांगा मालक सोता आपलेच गाववाले हाय लेक!
15 Jan 2016 - 5:28 pm | विवेकपटाईत
आज संक्रांत, सकाळपासूनच वातावरण ढगाळ आहे. कालपासून दिल्लीत थंडी सुरु झाल्या सारखी वाटते आहे. थोडी तब्येत ठीक कालपासून सुट्टी वर आहे. तरीही तिळगुळ आणि तीळगुळाची पोळी पोटाच रिचवली. जुनी दिल्ली सोडल्यानंतर पुन्हा कधी पतंग उडविली नाही. मांजा वैगरे बनविण्याचा प्रकार हि केले होते. प्रतिसाद वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सर्वाना धन्यवाद. पुन्हा जालावरच, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. (मधुमेह झाला असेल तर कडू बोलायला हि हरकत नाही).