विश्वाचे आर्त - सिंहावलोकन

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
3 Jan 2016 - 5:59 am

ही लेखमाला लिहिण्यामागचा उद्देश काय, तिचा आवाका काय, तीमधून मला काय सांगायचं आहे, ती कधी संपणार असे काही प्रश्न उपस्थित झाले. आत्तापर्यंत दहा भाग प्रसिद्ध करून झालेले आहेत. तेव्हा काही काळ थांबून मागे वळून पाहात या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही वेळ योग्य वाटते.

ही लेखमाला लिहायला सुरूवात करण्याआधी मला नक्की काय लिहायचं आहे यापेक्षा मला नक्की कशाप्रकारे आणि कशासाठी लिहायचं आहे याबद्दल काही स्पष्ट कल्पना होत्या. त्या मी त्यावेळी लिहूनही काढल्या होत्या. त्यातलं काय नक्की साध्य होतं आहे, किती यश मिळतं आहे हे वाचकच सांगू शकतील.

मला नक्की काय लिहायचं आहे?

रिचर्ड डॉकिन्सने कोणे एके काळी (म्हणजे जेव्हा तो धार्मिकांवर तोंडसुख घेणं सोडून खरोखरच ललित-वैज्ञानिक लिखाण करत होता तेव्हा) लिहिलं होतं 'प्रत्येक माणसात एक जन्मजात कुतुहल असतं. भव्यदिव्यतेने अवाक् होऊन डोळे दिपवून घेण्याची त्याची क्षमता असते, क्षमताच नाही तर गरज असते. दुर्दैवाने भोंदू साधू फकीर, भंपक चमत्कार करणारे त्यांना काहीतरी फुटकळ हातचलाखी दाखवून त्यांना दिपवून टाकतात. एका अर्थाने त्यांनी मानवजातीची ही क्षमता हायजॅक करून ठेवलेली आहे. त्यामुळे भर दिवसा सूर्याच्या झगझगीत प्रकाशाने दिपून जाण्याऐवजी रात्रीच्या अंधारातल्या काजव्यांचा प्रकाशच त्यांना डोळे दिपवणारा वाटतो.' हे सगळे शब्द अर्थातच त्याचे नाहीत, पण भावना तीच. ज्यांनी दिवसाचा प्रकाश पाहिलेलाच नाही त्यांचे डोळे केवळ अंधारालाच सरावलेले असल्यामुळे हे होणं सहज शक्य आहे. त्यासाठी सगळे काजवे मारून टाकणं हा उपाय नाही. तर लोकांना सूर्यप्रकाशाच्या देशात हळूहळू का होईना घेऊन जाणं महत्त्वाचं. एकदा सर्वत्र प्रकाश झाला की मग काजवे आपोआपच कुचकामी होतील. या देशात घेऊन जाण्यासाठी ज्या दिवट्या उजळाव्या लागतील त्यातली एक उजळण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करायचा आहे.

कार्ल सेगनचं लिखाण किंवा त्याचे टीव्ही शोज हे माझ्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून आहेत. वैज्ञानिक शोध, त्यातून दिसणारं आसपासचं विश्व, त्यात भरलेले नैसर्गिक 'चमत्कार' यातून लोकांना थक्क करण्याचा त्याचा प्रयत्न असे. कोणालातरी मूर्खात काढणं, कुठच्यातरी अंधश्रद्धांचं निर्मूलन करणं, काहीतरी खोडून काढणं यावर त्याचा बिलकुल भर नसे. लॉनमध्ये गवत वाढवायचं असेल तर नुसते तण काढत बसणं फायद्याचं ठरत नाही. चांगलं गवत सतत वाढत राहील, त्याची जोपासना होईल, त्याला खतपाणी मिळत राहील, नवीन बियाणं रुजत राहतील - जीव धरतील याकडे लक्ष पुरवणं जास्त महत्त्वाचं असतं. गवत सशक्त झालं की तणांवर आपोआपच मर्यादा येते. त्यांचा प्रसार आटोक्यात येतो. यासाठी जी माया लागते त्या मायेने आणि अधिकारवाणीने बोलणारा म्हणून कार्ल सेगनची ख्याती होती. एका अर्थाने पुल देशपांडे ज्या प्रेमाने त्यांना दिसणाऱ्या दैवतांचं 'गुण गाईन आवडी' करायचे, त्याच आत्मीयतेने कार्ल सेगन वैज्ञानिक संकल्पनांचं 'गुण गाईन आवडी' करत असे. तसं काहीतरी मराठीतून करायची माझी इच्छा आहे. अर्थातच मी काही स्वतःला कार्ल सेगन समजत नाही, पण मला जे समजलं ते इतरांना सांगावं, त्यांच्या प्रश्नांतून मलाही योग्य ती उत्तरं शोधण्याची दिशा मिळावी असा प्रयत्न आहे.

हे करताना माझी भाषा क्लिष्ट न होता सोप्यातली सोपी होईल असाही प्रयत्न असेल. वैज्ञानिक कल्पना सादर करताना त्या कठोरपणे डिराइव्ह करणं यापेक्षा लोकांना समजतील अशा भाषेत मांडणं मी जास्त महत्त्वाचं मानतो. पण त्याचबरोबर त्या कल्पनांचं इतकं चिल्लरीकरण होऊ नये की त्यामागचा अर्थच बदलून जाईल. सायंटिफिक रिगर न घालवता त्या कल्पना आकर्षकपणे, लालित्यपूर्ण रीतीने मांडणं ही तारेवरची कसरत असते. अनेक चांगल्या विज्ञानलेखकांना ती जमलेली आहे. मलाही शक्यतो तोल जाऊ न देता ही कसरत साधायला आवडतं. या लेखमालेतही तोच प्रयत्न असेल. तो जमेलच असं नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय कसं शिकायला मिळणार?

स्वरूप - सुमारे हजार ते दीड हजार शब्दांचा एक लेख. हे लेख संपूर्ण स्वतंत्र असतील, म्हणजे या लेखात काय म्हटलंय हे समजण्यासाठी आधीचं काही वाचलेलं असण्याची गरज पडू नये. प्रत्येक लेखात एक एक लहानशी संकल्पना मांडली असेल - एखादं तंत्रज्ञान, एखादा नवीन शोध, निसर्गात दिसणारं काहीतरी, मानवी समाजात दिसणाऱ्या घटना याभोवती घोटाळत त्याविषयी काही सर्वसामान्य विधानं करण्याचा प्रयत्न असेल. बिग पिक्चरमध्ये हे नक्की कुठे बसतं हेही मी सांगेन. कधी एखादं विज्ञानविषयक पुस्तक (नवीन किंवा जुनं) का छान आहे, लेखकाने त्यात नक्की काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हेही सांगेन. प्रत्येक लेख एखाद्या विशिष्ट पॅटर्नमध्ये बसेलच असं नाही. पण तरीही त्यांना बांधणारं एक सूत्र असेलच - लालित्यपूर्ण आणि सोप्या भाषेत वैज्ञानिक-तांत्रिक कल्पनांविषयी काही ना काही मांडणी त्यात असेल. हिरा फिरवला की दरवेळी एकेक पैलू चमकून जावा तसं काहीसं. या अनेकविध पैलूंच्या दर्शनातून एक काहीतरी सम्यक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.

आत्तापर्यंतच्या दहा लेखांचा आढावा -

भाग १ - काळाचा आवाका - आपलं जीवन लहान आहे, आणि आपली वैयक्तिकदृष्ट्या इतिहासाकडे पाहाण्याची नजर तोकडी आहे. आपला लिखित इतिहास हा काळाच्या आवाक्यात नखाच्या एका कणाइतका आहे. इतक्या प्रचंड इतिहासात काय घडलं हे पाहिलं तर आपल्याला व्यापक दृष्टिकोन प्राप्त होऊन आपलं जीवन अधिक समृद्ध होईल.

भाग २ - नासदीय सूक्त - पृथ्वीची निर्मिती चार अब्ज वर्षांपूर्वी झाली तर विश्वाची निर्मिती चौदा अब्ज वर्षांपूर्वी. काळाची आणि अवकाशाचीच उत्पत्ती तिथे झाली. तेव्हापासून अवकाशाचा आवाका विस्तारतो आहे.

भाग ३ - अस्तिस्तोत्र - आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की निसर्ग हा काहीतरी कर्ता करवता आहे. पण ते खरं नाही. निसर्गाला इच्छा नाहीत, सुख नाही की दुःख नाही. सजीवसृष्टीच्या एकमेकांशी असलेल्या नात्यांच्या विणीतून त्याची निर्मिती झालेली आहे. सर्व नैसर्गिक घटनांचं तो एक घटित आहे. निसर्ग केवळ आहे.

भाग ४ - उत्क्रांतीचं उत्तर - मानव पृथ्वीवर का आला याचं उत्तर शोधताना एकंदरीतच प्राणीसृष्टी कशी जन्माला आली याचं उत्तर शोधावं लागतं. अजूनही अनेकांना माहीत नसलं तरी ते उत्तर सापडलेलं आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेने टिकून राहायला अधिकाधिक सक्षम प्राणी तयार होते गेले आणि एकपेशीय प्राण्यांपासून क्लिष्टता वाढत जात आत्ता दिसणारी जगड्व्याळ, डोळे दिपवून टाकणारी जीवसृष्टी तयार झाली.

भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी - हा मुलांना गोंधळात टाकण्याचा प्रश्न असला तरी त्यात सृष्टीचं कोडं दडलेलं आहे. कोंबडीशिवाय अंडं नाही आणि अंड्याशिवाय कोंबडी नाही हे केवळ इतिहासाच्या आपल्या मर्यादित दृष्टिकोनातून काळाच्या सुरूवातीपासून केलेलं चुकीचं एक्स्ट्रापोलेशन आहे. कोंबडी अंडं कोंबडी हे चक्रच हळूहळू मोठं झालेलं आहे हे लक्षात घेतलं की काळाचा सान्तपणा आणि जीवसृष्टीच्या उत्पत्तीचं कोडं सुटायला मदत होते.

भाग ६ - जंबोजेट दृष्टांत - निर्जीवतेपासून सजीवतेपर्यंत एक प्रचंड उडी कशी घेतली जाऊ शकेल? काहीतरी जादू घडली आणि एका क्षणात सजीव निर्माण झाले ही कल्पना चुकीची आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत लहान लहान पायऱ्यांनी सतत प्रगती झाली. तो हलका चढ सतत चढत राहिलं की अब्जावधी वर्षांनी सजीवांनी गाठलेली उंची ही डोळे दिपवून टाकते. पण काळाचा आवाका प्रचंड असल्यामुळे हा प्रवास हळुवार झाला असला तरी प्रचंड मजल गाठलेली आहे.

भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत - सजीव आणि निर्जीव या शब्दांमुळेच त्यांमध्ये पार न करता येण्याजोगी दरी आहे हे आपण गृहित धरतो. याचं कारण म्हणजे आपली सोपं वर्गीकरण करण्याची गरज. आणि मधल्या अवस्था एकतर आपल्या डोळ्यांसमोर नसतात, किंवा आपण त्यांचा विचार करणं टाळतो. पण सजीवता ही काळीपांढरी, किंवा आहे/नाही अशी डिजिटल अवस्था नसून कमी सजीवता आणि अधिक सजीवता अशी अॅनालॉग किंवा चढती भांजणी आहे.

भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत - रेणू निर्जीव आणि पेशी सजीव अशी आपल्या मनात एक विभागणी असते. मग रेणूंपासून पेशी तयार होतीलच कशा? रेणूंमध्ये सजीवतेचा एक मुख्य गुणधर्म असू शकतो तो म्हणजे स्वतःसारख्याच प्रतिकृती निर्माण करण्याची क्षमता. नैसर्गिक निवडीतून हीच क्षमता अधिकाधिक तीव्र झाली. रेणू एकमेकांना खायला लागले आणि बचाव करण्यासाठी आपल्याभोवती आवरण निर्माण करायला लागले. यातूनच पहिल्या पेशींची निर्मिती झाली.

भाग ९ - अनैसर्गिक निवड - नैसर्गिक निवडीतून प्रजाती कशा बदलतात, सुधारणा कशा होतात हे समजून घ्यायचं असेल तर मानवाच्या निवडीतून त्या कशा बदलल्या आहेत हे आधी बघायला लागेल. कुत्र्यासारख्या प्राण्यांच्या अक्षरशः शेकडो वेगवेगळ्या जाती तयार केल्या गेल्या आहेत. कणसामध्ये गेल्या काही शतकांत सहा इंची बंद बियांच्या शेंगेसारख्या कणसापासून ते आता त्याच्या कितीतरी पट दाणे देणारी फूटभर लांबीची कणसं तयार केली आहेत. ही प्रक्रिया समजली की नैसर्गिक निवड समजून घेता येते.

भाग १० - नैसर्गिक निवड - अनैसर्गिक निवड माणसाच्या पुढाकाराने कशी घडली हे आपल्याला स्पष्ट दिसून येतंच. मात्र नैसर्गिक निवड होताना उद्दिष्ट असलेली कोणी व्यक्ती त्यामागे नसते. पण जगण्याची स्पर्धा असते, आणि त्या स्पर्धेपोटी आपोआपच यशस्वी जीवांना त्यांचे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात पाठवता येतात. अशा रीतीने 'मला लांब मान असलेले जिराफ हवेत' असं म्हणणारं कोणी नसलं, तरीही केवळ लांब मानेच्या जिराफांना अन्न अधिक मिळू शकतं म्हणून पुढच्या पिढीत माना लांब होतात. माणसाने 'मला लांब कणसं हवीत' म्हटल्यासारखंच.

या दहा भागांच्या पुढचे भाग सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय आणि काय नाही, उत्क्रांतीच्या तत्त्वाचा मानवी जीवनावर घडणारा परिणाम, आणि उत्क्रांती झाली याचे पुरावे काय या विषयांना वाहिलेले आहेत. त्यापलिकडे आणखीन काय स्वरूपाचं लिखाण या लेखमालेत यावं (केवळ उत्क्रांतीच नाही, तर इतरही विषय) याबद्दल वाचकांकडून सूचना हव्या आहेत.

आत्तापर्यंत लेख वाचून त्याबद्दल प्रोत्साहन देणारांचे, प्रश्न विचारून मला योग्य विचार करायला लावणारांचे, आणि माझ्या लेखनाचे फॅन बनून मला अत्तर लावलेली गुलाबी पत्र पाठवणारांचे (आय विश!) सर्वांचेच मनापासून आभार.

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

शरद's picture

3 Jan 2016 - 7:08 am | शरद

राजेशजी, धन्यवाद. आपल्या कविता आवडतातच पण त्यापेक्षाही ही लेखमाला जास्त भावली. कारण अगदी साधे आहे. कविता आवडली हे सापेक्ष आहे. मला आवडलेली कविता दुसर्‍याला चांगली वाटेलच असे नाही. व तसे पटवून देणे अवघड नव्हे तर अशक्यच असते. पण या लेखमालेचे तसे नाही. देव नाही किंवा सगळे बाबा-बापू भोंदू आहेत हे सांगण्या ऐवजी "असे कां", यात कोणताही "चमत्कार" नाही, हे सोप्या भाषेत सांगणे केव्हाही उचित. भावनेला न डिचवता विचाराला प्रवृत्त करणे जास्त महत्वाचे, किंवा जास्त परिणामकारक..मालिकेतील लेखांची शृंखलाही उत्तम पद्धतीने गुंफली आहे. छान !

अशा मालिकांबाबत मला संपादक मंडळाला एक सुचना कराविशी वाटते. हे सर्व लेख एका ठिखाणी एकत्र वाचता येणे शक्य करता येईल कां ? प्रत्येक वेळी नवीन लिंक क्लिक करण्याऐवजी एकत्र वाचता आले तर वाचकाला जास्त सोपे होईल.
शरद

अनुप ढेरे's picture

3 Jan 2016 - 10:10 am | अनुप ढेरे

लेखमाला अप्रतीम आहे. विचारात पॅराडाइम शिफ्ट आणू शकेल अशी.
'दखल' सदरात ही यावी असं वाटतं.

साती's picture

3 Jan 2016 - 1:17 pm | साती

अय्यो, हा लेख आत्ता वाचला.
त्याआधीच विठांना दिलेल्या प्रतिसादात तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्याबद्दलच माझं मत मी मांडलं आहे. जे तुमच्या इथल्या म्हणण्याशी बर्‍यापैकी जुळतंय.

बाकी पत्रे मी ही तुम्हाला पाठवलीत.
मिपा प्रशासनाला विनंती की अत्तर मरूदे , पण निदान गुलाबी पत्रांसाठी गुलाबी ब्याकग्राऊंड तरी उपलब्ध करून द्यावे.
;)

वैचो-सामो-धार्मिक कारणे काय असावीत असे मला तरी
यक्षप्रश्न पडतात
म्हणजे प्रश्नांची उत्तरे देणं वा प्रयत्न करणं हे प्रश्न विचारण्यापेक्षा
कमी प्रतीचं कस काय ?
प्रश्न उपस्थित करणं कीतीही महत्वाच असल तरी
त्याहुन महत्वाचं उत्तर शोधणं वा देण्याचा प्रयत्न करण नाही का ?
यात मोठी वैचारीक भुमिका एक्स्पोज होते. म्हणजे नकळत एक्स्पोज होते.
अस मला आपलं वाटलं
शिवाय उजव्या बाजुला जो लेख खरचं "उजवा" आहे तोच झळकतो का ?
मग ऑफबीट लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह वाल्यांचा वाली कोण ?

पैसा's picture

3 Jan 2016 - 7:56 pm | पैसा

त्या आधीच्या लिंका किती जुन्या आहेत पाहिल्यात का? मार्गी, जयंत कुलकर्णी, डॉ म्हात्रे यांच्या लिखाणाच्या लिंकही दखलमध्ये घ्यायच्या राहिल्या आहेत. संपादक मंडळ नव्हते तेव्हा नीलकांत आणि प्रशांत यांना ही रोजची कामे करणे वेळेअभावी कठीणच होते. आता नवीन संपादकांना लिहा प्लीज. हे असे लिहिले की तुम्ही वाद उत्पन्न करण्यासाठी लिहिताय असा लोकांचा गैरसमज होतो.

विवेकपटाईत's picture

3 Jan 2016 - 7:14 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. काही कळला काही कळला नाही. पुन्हा पुन्हा वाचावे लागेल.