सायकल स्वारीचा श्रीगणेशा

अरिंजय's picture
अरिंजय in भटकंती
14 Dec 2015 - 3:47 pm

मिसळपाव वर मार्गीदादा, मोदकदादा या सायकल प्रेमी मित्रांचे लेख वाचून उत्साहाचा संचार झाला, जुने सायकल प्रेम उफाळून आले, आणि सायकल चालवायचे ठरवले. शाळेत असताना हर्क्युलस सायकल होती. ९ वी ते इंजिनिअरींग २ ईयर पर्यंत वापरली. त्या वेळेस भरपूर भटकलेलो. दसऱ्याचे सीमोल्लंघन किमान २० किमीचे ठरलेले असे. असो. त्यात अजून एक भर म्हणजे आपले मिपा मित्र निनाद कटारे यांनी व्हॉट्सअप वर 'सायकल सायकल' हा समूह बनवून त्यात सामील करुन घेतले. त्यातील सायकल प्रेमी व तज्ञ लोकांचे सल्ले बघून सायकल चालवायचीच हा ठाम निश्चय झाला.

परंतु हे इतके सहज नव्हते. 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' या म्हणीचा प्रत्यय लवकरच आला. मित्राचा मुलगा आशुतोष, नाशिक ला शिकायला गेल्यामुळे त्याची सायकल पडून होती. मित्राला सांगितले, "सायकल दुरुस्त करुन घेतो आणि वापरतो." त्याची हरकत नव्हती. मी त्याच्याकडुन किल्ली घेतली.

बिल्डिंग मध्ये सर्वच मुलांच्या जवळपास २० सायकली एकाच जागी ठेवलेल्या. एका दुपारी मी वेळ काढला आणि त्या घोळक्यातून आशूची सायकल बाजुला काढली. अक्षरशः धुळीने माखलेली होती. मी स्वतः कपडा मारुन स्वच्छ केली. दोन्ही चाके पंक्चर असल्यामुळे ढकलत दुकानात नेली. उन्हामुळे चांगला घामेघुम झालो. सायकलचं पूर्ण सर्विसिंग करुन घेतलं. पंक्चर, अॉईलींग, ब्रेक्स सर्व करुन घेतले आणि आनंद गगनात मावेना. त्या जोशात मस्त ६-७ किमी राईड मारुन घरी आलो.

दुसऱ्या दिवशी मुलीच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे ती घरीच होती. ती खेळायला खाली गेली आणि थोड्या वेळाने वर येऊन मला म्हणाली, " बाबा, तू कोणाची सायकल दुरुस्त केलीस?" मी म्हणालो," आशू भैय्याची". मुलगी हसायला लागली, "बाबा, तू जी सायकल दुरुस्त केलीस ती आशू भैय्याची नाही, समोरच्या आर्यची आहे." आता मी गोंधळात. लॉक कसं निघालं ? मी तरी खात्री करुन घेण्सासाठी खाली गेलो, वॉचमन ला बोलावले. विचारल्यावर तो पण हसू लागला, म्हणाला की ती आर्यचीच सायकल आहे. त्यानीच आशूची खरी सायकल बाहेर काढुन दिली.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या. धूळ भरलेली सायकल स्वच्छ करुन, ढकलत नेऊन, सर्विसिंग करुन सरळ घरी आणून लावली. दुसऱ्या दिवशी राईड मारली.

सायकल दुरुस्त करुन घेतल्यापासुन रोज संध्याकाळी एक चक्कर मारणे सुरु केले. तशी ती सायकल म्हणजे तज्ञांच्या मते 'रणगाडा' च. पण सरावासाठी योग्य. सुरुवातीला ६ किमी पासुन सुरु करुन हळूहळू अंतर वाढवायला सुरुवात केली. ८, १० करता करता रोज १५ किमी पर्यंत पोहोचलो. आणि मग एक दिवस रेणापूरला जाण्याचा बेत केला. माझ्या घरापासून ते रेणापूरचे मंदीर हे अंतर १७ किमी होते. या निमित्ताने आपली क्षमता पण तपासुन बघता येईल हा विचार होता. आणि आजचा रविवार निश्चित केला. सकाळी ७ वाजता निघुन १० वाजेपर्यंत परत असे नियोजन होते.

परंतु काल अचानक ठरलेल्या 'पार्टी' मुळे थोडे विघ्न आले. पार्टी जोरदार झाली. तरीसुद्धा सकाळी रोजच्या प्रमाणे ६ वाजता जाग आली. परंतु रात्रीचा थोडा असर जाणवला. त्यामुळे अर्धा एक तास उशीरा निघायचे ठरवले. असर घालवण्यासाठी तोंड धुतल्यावर पहिले कपभर थंड दूध भरपूर साखर घालून प्यायलो. त्यानंतर सगळी आन्हीके उरकण्यात १ तास गेला.

दुसरी कडे गृहमंत्री पातळीवर प्रचंड असंतोष खदखदत होता आणि तो 'अबोला व असहकार' या स्वरुपात बाहेर पडत होता. मी सायकल वर रेणापूरला जाणार हे माहीत असुनसुद्धा स्वयंपाकघरात काहीच हालचाल दिसत नव्हती. फक्त चहा मिळाला. मी तरी थोडावेळ वाट बघितली आणि मुकाट्याने एक ग्लास भरुन दूध घेतले. "बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ" अशी शरणागती पत्करुन तयारी केली. इतके सर्व होईपर्यंत बऱ्यापैकी उशीर झाला होता. ९ वाजले होते. सोबत पाऊच मध्ये बसणारी ५०० मिली. च्या बाटलीत पाणी भरुन घेतले. घरातुन अगदी निघताना मुलीनी एक ५००/- ची नोट आणुन दिली. (बायकोची प्रेम व्यक्त करायची पद्धत. अबोला कायम.)

खाली आलो, सायकल काढली, बोंबलायला पुढचं चाक पुन्हा पंक्चर. परवाच काढुन आणलं होतं. दोन क्षण विचार केला, "जाणे कॅन्सल". पण मुलीनी समजुत घालायला सुरुवात केली. "बाबा, ठरवलं आहेस तर जा, वाटल्यास मी पंक्चर काढून आणते." म्हटलं,"राहू दे." ठरवलेले पार पाडायचेच असा निश्चय करुन सायकल ढकलत दुकानावर नेली. च्यामारी तिथेही माझ्या आधी एक मोटरसायकल आणि एक सायकल वाट बघत उभ्या. निवांत बसलो म्हटले,"आता तर जायचेच". पंक्चर काढेपर्यंत १० वाजले. आणि अस्मादिकांनी टांग मारली आणि रेणापूरच्या दिशेने प्रयाण केले.

दहा वाजले असले तरी वातावरण थंड होते. निघताना थोडे पाणी पिऊनच निघालो होतो.आपण निश्चय पार पाडणार या उत्साहात झपझप अंतर कटत होते. नुकताच लातूरच्या बाहेर पडलो असेन तर घरुन फोन आला. मुलगी बोलली,"बाबा, रेणापूर मध्ये पोहोचल्या पोहोचल्या काहीतरी खाऊन घे." (अर्थात बायकोचा निरोप!! अबोला कायम. बायकांचा अबोला कधी कधी 'इबोला' सारखा वाटतो. जिवघेणा.) "बरं" म्हणालो आणि प्रवास चालू केला. साधारण ६-७ किमी पार पडल्यानंतर 'पार्टी' चा असर दिसू लागला. भरपूर घाम निघाला. सगळी 'स्मर्न अॉफ' बाहेर पडली. रेणापुरच्या अलिकडे २-३ किमी रस्ता हलका चढ असल्यामुळे दम लागला. पण तरीही न थांबता हळूहळू वाटचाल चालू ठेवली. वाटेत लोकं वळून वळून बघत होते, खासकरुन तरुण मुले. मजल दरमजल करत एकदाचा मंदिरात पोहोचलो. १७ किमी अंतर पूर्ण, वेळ ५३ मिनिटे. अतिशय आनंद झाला. सुधारणा आहे.

मंदिर रिकामेच होते. त्यामुळे छान निवांत दर्शन झाले. संपूर्ण मंदिर परिसर फिरुन बघितला थोडा वेळ मंदिरात बसलो आणि तिथून निघालो. सकाळपासुन काहीही खाल्लेले नसल्यामुळे एक बऱ्यापैकी उपहारगृह बघून पोटोबाची पुजा केली. तिथून थोडे रेणापूर फिरुन जुना राजवाडा बघितला. राजा-प्रधानाच्या समाध्या बघितल्या त्यात १ तास गेला. आणि परतीच्या प्रवासाला लागलो. निघताना पाणी भरुन घेतले. येताना तशी गरजच पडली नव्हती. परंतु आता १२ वाजले होते आणि उन भाजून काढत होते.

हळूहळू सुरुवात केली. २-३ किमी आल्यानंतर डावा गुडघा थोडा बोलायला लागला. पण दुर्लक्ष करुन तसाच निघालो. घाम तर केंव्हाच सुरु झाला होता. डोक्याला मोठा रुमाल बांधला होता. आता तर प्रत्येक येणारा जाणारा माझ्या घामेघुम चेहऱ्याकडे बघत होता. मघाशी लागलेला चढ आता उतार झाला होता. त्याचा थोडा फायदा मिळाला. तरीही ६-७ किमी झाल्यावर सावली बघून थांबलो. २ मिनिट थांबुन पाणी पिऊन निघालो. हळूहळू घाम पुसत लातूर जवळ पोहोचलो.

मेडिकल कॉलेज दिसू लागल्यावर अचानक आठवण झाली ती उड्डाणपुलाची. जवळ जवळ ३०० मिटर चा तो लांबलचक चढ!!!!!!! १५ किमी उन्हात चांगलाच दमलो होतो आणि शेवटी शेवटी हा चढ. तरीही नेटाने चढ चढायला सुरुवात केली. अगदी हळूहळू चढत अर्ध्यापर्यंत आलो. शेवटी खाली उतरलोच. जास्त त्रास करुन घेऊन उपयोग नव्हता. पुढचा चढ पायी पायी चढलो. उतार सुरु झाल्यावर पुन्हा सायकलवर बसलो. हळूहळू एकदाचा घरी पोहोचलो. आणि आनंदाला पारावार उरला नाही. परतीच्या प्रवासाला लागलेला वेळ १ तास ०८ मिनिटे. हरकत नाही. सायकल स्वारीचा तोरणा सर केला होता. दमलो असलो तरी आत्मविश्वास कमालीचा वाढला होता.

(मिपा वरचा माझा पहिलाच लेख आहे. छायाचित्रे चिटकवण्यची प्रक्रिया थोडी किचकट असल्याने जमले नाही. पुढच्यावेळी नक्की छायाचित्रांसहित लिहीन.)

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Dec 2015 - 5:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

लगे रहो!! अजुन ट्रिप्स प्लॅन करा आणि वर्णने टाका .

कविता१९७८'s picture

14 Dec 2015 - 5:18 pm | कविता१९७८

छान लेखन, माझीही ईच्छा आहे सायकल चालवण्याची पण चालवता येत नाही, त्यामुळे टु व्हीलर शिकताना खुप जड गेल पण चालवते आता प्लेजर

अरिंजय's picture

14 Dec 2015 - 11:58 pm | अरिंजय

मेहेंदळे साहेब, आता आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे दौरे काढणार व अनुभव सर्वांसोबत वाटुन घेणार. नक्कीच.

कविताताई, न घाबरता सुरुवात करा. मी जवळपास २० वर्षांनंतर आत्ता १५ दिवसांपुर्वीच सायकल हातात घेतलीये.

सौन्दर्य's picture

15 Dec 2015 - 12:26 am | सौन्दर्य

आयुष्यातील हे छोटे छोटे पडाव असतात. प्रत्येक पडाव सर करताना जी मजा येते, जो आनंद अनुभवायला मिळतो त्याला तोड नाही. आणि ह्या सर्वांहून जास्त फायदा म्हणजे जो आत्मविश्वास मनात जागतो त्याला कशाचीच सर नाही. लेख देखील फार छान लिहिला आहे, चित्रे असती तर जास्त मजा आली असती. मिपावर चित्रे डकविणे फार कठीण नाही, एक-दोन प्रयत्नांनी ते देखील जमू शकेल. पुढील सफरीसाठी शुभेच्छा.

खरे आहे तुमचे. छोट्या छोट्या गोष्टींमधुनच आत्मविश्वास वाढतो.

पुढच्या वेळी नक्की चित्रांसहीत.

वावावा! बाकी ते 'इबोला' शी बाडिस! ;-)

अरिंजय's picture

15 Dec 2015 - 1:07 pm | अरिंजय

धन्यवाद

नितीन पाठक's picture

15 Dec 2015 - 3:11 pm | नितीन पाठक

सर्वप्रथम सायकल सफर चालू केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या सफरीबद्दल शुभेच्छा .
बाकी एकदम मस्त. असेच सायकल चालवित रहा.
एक गोष्ट कळली नाही ...
घरातुन अगदी निघताना मुलीनी एक ५००/- ची नोट आणुन दिली. (बायकोची प्रेम व्यक्त करायची पद्धत. अबोला कायम.)
१७ किमी सायकल चालविण्यासाठी ५०० /- ची नोट मिळते, जर याहून मोठी सफर करणार असेल तर काय मिळेल???
विचार करून ठेवा आणि लवकर पुढची मोठी (!) सफर ठरवा ..............

हा हा हा. त्यामुळेच मी मोठ्या सफरीचे मनसुबे आखायला सुरुवात केली आहे.

पाठक साहेब, तुमची प्रतिक्रिया माझ्या बायकोला वाचायला देईन म्ह्णतो
काही फायदा होतोय का बघतो.

नितीन पाठक's picture

16 Dec 2015 - 1:13 pm | नितीन पाठक

@ @ श्री. चंद्रात्रे साहेब -- लवकरात लवकर मोठ्या सफरीचे नियोजन करा. घरच्या आघाडीचा अंदाज घ्या. सफरी वर निघतांना काय मिळू शकते हे बघा.शक्यतो आदल्या रात्री "पार्टी" करू नका म्हणजे लवकर उठून जाता येईल. गृहमंत्र्यांना विश्वासात घ्या म्हणजे घरातून निघतांना अबोला न राहता टाटा टाटा बाय-बाय करून तुमची सफर एकदम फलदायी होईल. Best of Luck आणि हो आम्हाला ही कळवा काय मिळाले ते ?? !!!

@ @ श्री. आंनदराव -- सर्व प्रथम तुम्ही सायकल चालवयाला सुरूवात करा. एक छोटी सफर काढा. घरच्या आघाडीचा अंदाज घ्या. काय मिळते (!) ते बघा. तुम्हाला निश्चितच काहीतरी मिळेल. मोठी सफर ठरवा मग जरूर तुम्ही माझी प्रतिक्रिया तुमच्या पत्नीला वाचायला द्या. कदाचित नोट नाही मिळणार कदाचित त्याहून काही मौल्यवान (समझने वालों को इशारा काफी है !) निश्चितच मिळेल. Best of Luck
आणि हो आम्हाला ही सांगा ....................

अरिंजय's picture

16 Dec 2015 - 8:40 pm | अरिंजय

नितिन भाऊ, असा खाऊ फक्त नाराजी असल्यावरच मिळतो. पण तरीही गृहमंत्री विश्वासात घेतल्याशिवाय दौरा काढायचा नाही हे ठरवले आहे.

पाठक साहेब, सायकल अनियमित्पणे का होईना पण चालवतोय.

हार्दीक शुभेच्छा आनंदराव. एकदा गोडी लागली की आपोआप नियमितता येते.

पैसा's picture

16 Dec 2015 - 8:46 pm | पैसा

मस्त लिहिलंय! खुसखुशीत! लिहा अजून.

अरिंजय's picture

16 Dec 2015 - 10:34 pm | अरिंजय

धन्यवाद पैसाताई

उत्तम. बहुतेक सगळेच मिपाकर सायकलच्या नादी लागणार आहेत. सगळ्यांना शुभेच्छा..

अरिंजय's picture

16 Dec 2015 - 10:36 pm | अरिंजय

बहुतेक. चांगलंच आहे ना.

मार्गी's picture

18 Dec 2015 - 4:56 pm | मार्गी

नमस्कार! जोरदार!!! आपण अगदी छान स्पीडने ३४ किलोमीटर पहिल्याच फटक्यात केले! मस्त. (सर्वांच्या) पुढील सायकलिंगला शुभेच्छा!! :)

अरिंजय's picture

18 Dec 2015 - 9:25 pm | अरिंजय

तुमचे लेख वाचुनच प्रेरणा मिळाली.

चाणक्य's picture

18 Dec 2015 - 5:52 pm | चाणक्य

सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन. अजून करा भटकंती आणि टाका वर्णने.

अरिंजय's picture

18 Dec 2015 - 9:27 pm | अरिंजय

धन्यवाद चाणक्य दादा. जरुर टाकेन.

आधी चुकीची सायकल नीट करुन आणलीत त्यानंतर पुन्हा दुसरी सायकल करुन आणलीत तिथेच तुमची जाण्याची जिद्द दिसली
पहिले पॅडल मारेपर्यंतचा काळच अनिश्चिततेचा असतो एकदा तो पार पाडलात की यू स्टार्ट रोलिंग! :)
छान लिहिलं आहेत. गृहमंत्र्यांची परवानगी मात्र निश्चितच महत्त्वाची, अहो गृहखातं नीट असेल तर सगळं नीट, अन्यथा अंतर्गत बंडाळी व्हायला वेळ लागत नाही! ;) असो, पुढील प्रवासांना शुभेच्छा!

(अवांतर - सध्या हिवाळ्याने अजूनतरी कृपा केल्याने मी हापिसात सायकलवरुन जाऊ शकतोय. :) )

(सायकलस्वार्)रंगा

अरिंजय's picture

18 Dec 2015 - 9:29 pm | अरिंजय

धन्यवाद चतुरंगजी. मी पण हिवाळ्यामुळेच हिंमत करतोय.

'गृहमंत्र्यांची परवानगी मात्र निश्चितच महत्त्वाची'
१००% सहमत

यशोधरा's picture

18 Dec 2015 - 9:56 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय!

मोदक's picture

15 Jan 2016 - 1:30 pm | मोदक

अरे व्वा.. अभिनंदन..!!!

मिपाकरांचे सायकल प्रेम वाढत आहे ही खरोखरी चांगली गोष्ट आहे.

(सायकलप्रेमी) मोदक.

अरिंजय's picture

15 Jan 2016 - 1:42 pm | अरिंजय

आपल्या सारख्या अनुभवी मित्रांच्या पावलावर पाऊल ठेवूनच वाटचाल सुरु केली आहे.

पद्मावति's picture

15 Jan 2016 - 7:22 pm | पद्मावति

खूप छान लिहिलंय.
पुढील सायकल स्वारीसाठी तुम्हाला शुभेच्छा.

अरिंजय's picture

15 Jan 2016 - 10:02 pm | अरिंजय

धन्यवाद

सगळी 'स्मर्न अॉफ' बाहेर पडली

ह्यासाठी +१

पाटीलभाऊ's picture

5 Sep 2016 - 1:06 am | पाटीलभाऊ

+१

चित्रगुप्त's picture

18 Jan 2016 - 5:42 am | चित्रगुप्त

छान. असे काहीतरी सुरू करून ते करत राहणे हे उत्साह आणि तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी उत्तमच. निघण्यापूर्वी आणि वाटेत खायला चांगली पिकलेली केळी आणि अन्य फळे, खजूर, उकडलेले रताळे, सत्तूचे पीठ वगैरे घरूनच नेणे चांगले. गुडघ्याच्या मागील स्नायूंवर जास्त ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी . तुमचे वय किती आहे ?

अरिंजय's picture

19 Jan 2016 - 8:55 pm | अरिंजय

४३ वर्षे.

केडी's picture

4 Sep 2016 - 9:29 pm | केडी

वा मानस, छान लिहिलंय. सायकलिंग ची गोडी आता चांगलीच वाढली आहे तुमची, ती उत्तरोत्तर वाढत राहावी हीच सदिच्छा!

अरिंजय's picture

4 Sep 2016 - 9:57 pm | अरिंजय

धन्यवाद दादा

भ ट क्या खे ड वा ला's picture

13 Sep 2016 - 10:49 am | भ ट क्या खे ड वा ला

आवडली तुमची सायकल सफारी .
मला ही सायकल कट्टात सहभागी व्हायला आवडेल नुकतीच जुनी सायकल विकली आहे एक दोन अठवड्यात जरा भारीतली घेतोय तजवीज झाल्ये. मला ही फारसा अनुभव नाही थोडफार सायकलिंग केलय आणि गेल्या मे मध्ये युथ हॉस्टेल चा " जलोरी पास " हा सायकल ट्रेक केलाय, आता ट्रेकिंग कमी करुन सायकलिंग करायचा विचार आहे
माझा भ्रमणध्वनी ९९६००९६४३५ सायकल कट्टा साठी दिलाय .

इरसाल कार्टं's picture

4 Apr 2017 - 11:05 pm | इरसाल कार्टं

रणगाडा हणाताय तुम्ही, सलाम.