दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग २

अजया's picture
अजया in जनातलं, मनातलं
13 Dec 2015 - 12:08 am

भाग-१

मागच्या भागात आपण प्रेग्नंसीमध्ये आणि बाळाच्या दातांची काळजी कशी घ्यावी ते पाहिले.या भागात आपण ३ ते १२ वयोगटातील मुलांच्या दातांबद्दल जाणून घेऊ.
.
साधारण सहाव्या महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते ते तीन वर्षापर्यंत प्रत्येक जबड्यात दुधाचे दहा दात येतात.यात समोरचे पटाशीचे दात,सुळे आणि दाढा असतात.हे सर्व दात निरनिराळ्या वयात पडतात.तरीही लोकांचा दुधाचे दात पडणारच आहेत तर का त्यांच्या किडण्याकडे फारसे लक्ष द्या असा दृष्टिकोन असतो. त्यामुळे या दातांचे महत्त्व लक्षात न घेता केवळ पालकांच्या गैरसमजूतीमुळे मुलांचे हाल होत असतात.बाळाला नीट बोलता येणे, चावणे यासाठी या दातांचा उपयोग असतोच तसाच नव्या येणार्‍या दातांसाठी जागा राखणे ,जबड्याच्या वाढीसाठीही हे दात अत्यंत आवश्यक असतात.नवे आलेले दुधाचे दात हे कमी मिनरलाइझ असणारे असतात.म्हणजेच कमकुवत असतात.त्यामुळे या दातांमध्ये पटकन किडायला सुरुवात होते.सुरुवातीलाच काळजी घेतल्यास हे किडणे टाळात येते.काळजी काय तर दात आल्या दिवसापासून तो पुसून घेणे,रात्री दूध पाजणे बाळ मोठे व्हायला लागले की बंद करणे हे आहेच.पण रोजचे दोन वेळा फ्लोराईड असणार्‍या पेस्टने घासणे अत्यंत आवश्यक आहे.याच तीन वर्षाच्या वयात मुलं हट्टी होऊ लागतात.पण मुलांचे लाड करणे म्हणजे त्यांनी मागताक्षणी चॉकलेटाचे तोबरे भरणे नव्हे हे मुलांना पालकांनी थोडे ठाम राहून ,किडलेल्या दाताची चित्रं दाखवून पटवून दिले पाहिजे.त्याच बरोबर चॉकलेट इतकेच हानीकारक पदार्थ म्हणजे बिस्किटं,पूडीतील वेफर्स्,चिटो आदी पदार्थ्,केकसारखे अती गोड मऊ पदार्थ हे सर्वच दात किडवण्यात सहभागी असतात हे जरूर लक्षात ठेवावे.पॅकमधे मिळणारे ज्यूस्,फ्रूटी तत्सम पेयदेखील तितकीच हानीकारक आहेत.
काय करतात हे पदार्थ? या पदार्थांची पातळ फिल्म दातावर बसून राहते.ती तोंडातल्या बॅक्टेरियांना आयतेच खाद्य मिळते.ते या खाद्यपदार्थांचे अ‍ॅसिडमध्ये रूपांतर करतात.आधीच कमी मिनरल्स असणारे दुधाचे दात मग या अ‍ॅसिड हल्ल्याने कमकुवत होऊन त्यांना भोक पडायला सुरुवात होते.अशा प्रकारे दात किडण्याची प्रक्रिया सुरू झाली की वेळेवर लक्ष न दिल्यास त्या भोकात अजून अजून अन्न साठून दाताचे तुकडे पडू लागतात.समोरचे काळे दात असलेली अनेक मुलं बघण्यात येतात.ती कीड ही अशी सुरू होते.एका दातात तयार झालेले अ‍ॅसिड शेजारच्या दाताला पण कमकूवत करून सोडतात.आणि मग अगदी लहान वयात अनेक दात किडलेली मुलं आमच्याकडे येतात.दाढाही किडल्याने या मुलांना चावायला खूप वेळ लागतो,बरेच पदार्थ ते खाऊ शकत नाहीत्,मग खाणे टाळणे,फक्त मऊच खाणे असे प्रकार मुलं करू लागलेली असतातच पण कुपोषित देखील होऊ लागतात.कारण न चावता गिळलेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही.बरेच पालक याही अवस्थेत मुलांकडे ते दुखतंय नाही सांगत तोवर लक्ष देत नाहीत.मग कधीतरी दाढ दुखायला लागते,मूल रात्रभर रडून जागवते आणि मग ते डेंटिस्टकडे आणले जाते!
.
हे टाळण्यासाठी मुलांना दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे घेऊन जावे.ते त्याचे दात तपासतीलच पण कसे ब्रश करायची ही माहितीही देऊ शकतील.कीड अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात येऊन भरली जाईल आणि मुलाचे पुढे होणारे हाल वाचतील.काही महिन्यापूर्वी रूट कॅनाल करताना गेलेल्या लहान मुलाची बातमी वाचून अनेक लोक संतप्त झाले होते. त्यात काही लोकांना तर एवढ्या लहान मुलाची रूट कॅनल कशाला करतात प्रश्न पडला होता. त्यासाठी आपल्याला आधी मुलांचे कोणते दात कधी पडतात हे जाणून घेणे जरूरीचे आहे.
.
यात पाहिल्यावर कळते की दाढा साधारण ९ते १३ या वयात पडतात.मग एखाद्या मुलाची न हलणारी,खूप किडलेली दाढ पाचव्या वर्षीच खूप दुखायला लागली तर येणारा दात तिथे पाच ते सात वर्षानी येईल.मग जर फक्त या कारणासाठी दाढ काढली तर ते मूल नीट चावू शकेल का? तसेच सहाव्या वर्षी पहिली कायमची दाढ याच दातांच्या मागे येते.ती या रिकाम्या जागेत घुसून नव्या येणार्‍या दाताचा मार्ग बंद करून टाकू शकेल.मग नवा दात तिरपा,वाकडा जागा मिळेल तसा येऊन सर्व दातांच्या रचनेवर परिणाम होऊ लगतो.म्हणून अगदी लहान वयात किडलेली दाढ डेंटिस्ट वाचवायचा सल्ल्ला देतात.याकरीता लहान मुलांच्या स्पेशलिस्ट डेंटिस्टकडून या ट्रिटमेंट केल्या जातात.यात कोणताही धोका नाही.
नाइलाजाने दाढ काढावी लागल्यास त्या जागी हेच डॉक्टर स्पेस मेंटेनर बसवून देतात.यामुळे नव्या येणार्‍या दाताचा मार्ग मोकळा राहतो.त्याची जागा राखून ठेवायचं काम हे स्पेस मेंटेनर करतं.
.
साधारण सहाव्या वर्षी खालचे समोरचे दात पडायला सुरुवात होते. बर्‍याच मुलांना हे दात पडण्याआधीच नवे दात येऊ लागतात !
.
दुधाच्या दाताचे मूळ झिजायला लागते आणि मग तो हलून आपोआप पडतो आणि त्याच जागी नवा दात येतो.पण काही मुलांच्या दाताची मुलं झिजतच नाहीत्,पण आत कायमच्या दाताचे मूळ मात्र मोठे होते.तो दात आत मावेनासा होतो.मग तो जिथे सोयीने येता येईल असा मार्ग म्हणजे दुधाच्या दाताच्या मागे येऊन बसतो! अशा वेळी लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाऊन दुधाचे दात काढून घ्यावे.म्हणजे नवा आलेला दात त्या जागी आपोआप येतो.काही करावे लागत नाही. दातांना अजिबात व्यायाम नसणे हेसुद्धा हा प्रकार घडण्याचे एक कारण आहे.म्हणूनच मुलांना तोडून फळं खाण्याची सवय लावावी.विशेषतः सफरचंद,गाजर अशी.त्यामुळे दातांना ,हिरड्यांना व्यायाम होतो,त्यांचे रक्ताभिसरण सुधारते आणि दात पडणे,नवे येणे सुकर होते.
.
.
वरच्या तक्त्यावरून लक्षात येईल की सहाव्या वर्षापासून मुलांना कायमचे दात येऊ लागतात.आधीचे दुधाचे दात किडके असल्यास हे दात किडायला वेळ लागत नाही.म्हणून या वयातल्या मुलांना दात किडू नये यासाठी प्रतिबंध करणारे उपचार आता करता येतात .ते आहेत फ्लोराइड लावणे आणि सिलंट्स.
फ्लोराइड उपचार- नवा आलेला दात हा एखाद्या चाळणीसारखा कॅल्शियमच्या तंतूंनी बनलेला असतो.या चाळणीची भोकं जितकी मोठी दात किडायची शक्यता जास्त.इथे फ्लोराइड काम करते.ते या चाळणीच्या भोकांमध्ये जाऊन बसते.त्यामुळे दाताचे एनॅमलचे आवरण मजबूत बनते.असा दात पटकन किडून त्यात छिद्र पडत नाही.यासाठीच फ्लोराइडची टूथपेस्ट वापरायचा सल्ला नेहमी दिला जातो.
साधारण सहाव्या सातव्या वर्षी फ्लोराइड दातांना लावायचे उपचार करून घेता येतात.यासाठी आम्ही मुलांना जेवून आणायला सांगतो.म्हणजे फ्लोराइड लावल्यानंतर लगेच ते निघून जाऊ नये.मुलांच्या तोंडात फ्लोराइड जेल भरलेले मऊ ट्रे दोन ते तीन मिनिटे ठेवले जातात.ते फ्लोराइड दातामध्ये शोषले जाण्यासाठी एवढा वेळ द्यावा लागतो.
.
मग हा ट्रे कढून मुलांना जास्तीचे तोंडात आलेले जेल थुंकून टाकायला लावले जाते.दुसर्‍या जबड्यातल्या दातांनाही याच पद्धतीने फ्लोराइड लावले जाते.
यानंतर अर्धा तास तरी मुलांना पाणी देऊ नये.बरेच दात किडके असणार्‍या मुलांना परत सहा महिन्यांनी तसेच दोन वर्षानी हीच प्रोसिजर करायला सांगितले जाते.६-७ आणि १०-११ वयाच्या मुलांची ही ट्रिटमेंट जरूर करून घ्यावी.

सिलंट्स- आपल्या कायमच्या दाढा आणि उपदाढा या गुळ्गुळीत नसतात.त्यांच्यावर खडबडीत भाग असतो.या भागात अन्न साचलेले राहून दाढा किडायला सुरुवात होते.म्हणून ही,सिलंट्स वापरली जातात.ही रेझीन प्रकारातली पातळ सिमेंट्स असतात.ती प्रवाही असल्याने दात स्वछ धुवून,त्यावर ही सिरिंजने सोडली जातात.ती दाताच्या भेगा,छिद्रांमध्ये जाऊन बसतात.मग विशिष्ट प्रकारच्या लाइटने त्यांना कडक केले जाते.यात अजिबात दुखत नाही.दाताचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्याने त्यात अडकून दात किडणे बंद होते.सहाव्या आणि बाराव्या वर्षी दोन्ही कायमच्या दाढा आल्या की हा उपचार जरूर करून घ्यावा.दात किडणे प्रकार नक्कीच कमी होईल.
.

. या वयातल्या मुलांचा अजून एक प्राॅब्लेम म्हणजे अंगठा किंवा बोट चोखायची सवय असणे.पाच वर्षानंतरही हे सुरु राहिल्यास अंगठ्याचा प्रेशरमुळे टाळुचा भाग खोल जाऊ लागतो आणि समोरचे दात पुढे येऊ लागतात. पाचव्या वर्षानंतरही सवय सुरु राहिल्यास डेन्टिस्टकडे जरुर घेऊन जावे.ते यासाठी एक सवय मोडणारे अॅप्लायन्स बनवून देतात.ज्यामुळे मुलांना अंगठा तोंडात घालता येत नाही. नंतर दात पुढे आल्यावर करायच्या मोठ्या ट्रीटमेंट टाळता येतात.
याच प्रकारची अजून एक सवय म्हणजे रात्री मुलांच्या तोंडात पॅसीफायर द्यायची.त्यानेही दातांमध्ये रचनाबदल होऊ शकतात.या सवयी वेळीच मोडलेल्या चांगल्या.

.दात ब्रश करणे-या सर्व प्रतिबंधात्मक उपचारांबरोबरच रोज दोन वेळा दात घासणे अत्यंत जरूरी आहे.यासाठी सर्व कुटुंबाने डेंटिस्टची भेट घेऊन आपापल्या दंतरचनेप्रमाणे दात कसे घासावे हे जरूर शिकून घ्यावे.
एक सर्वसधाराण पद्धत म्हणजे दात हिरडीपासून जिथे सुरू होतो तिथे ४५ अंशाच्या कोनात पकडून खालीवर असे घासत जाणे.आतल्या बाजू न विसरता घासणे.
.
दातात फटी असल्यास इंटरडेंटल ब्रश डॉक्टरी सल्ल्याने वापरणे.फट नसलेल्या दातांना डेंटल फ्लॉसने दोन दाताच्या मधला भाग साफ करणे.कोणताही सरळ मऊ ब्रिसल्स असणारा ब्रश वापरणे योग्य.कारण पेस्टच्या वापराने ब्रश कडक होत जातो.तो चार महिन्याने बदलावा.अती जोरात भांडी घसल्यासारखे दात कधीही घासू नयेत!जर फार लवकर आपला ब्रश झिजतोय तर तुम्ही दाताला चरे पाडताय.मुलांना आपल्याबरोबर ब्रश करायची सवय लावावी. नेहमी मुलांना माझ्यासमोर हा रात्री दात घासत नाही म्हणून ओरडणार्‍या पालकांना तुम्ही घासता का विचारल्यावर त्यांची पंचाईत होते ! मुलांना सवय लावण्यासाठी ती सवय स्वतःत मुरणे आधी आवश्यक नाही का!!

हे झाले मुलांसाठी प्रतिबंधात्मक उपाय.पुढच्या भागात प्रौढांच्या दातांसंबधी जाणून घेऊ.

( सर्व चित्रे व तक्ते आंतरजालावरून साभार )

हे ठिकाण

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी's picture

13 Dec 2015 - 3:16 am | स्वप्नांची राणी

दुधाचे दात न पडणं आणि तिथेच डबल दात येणं हा प्रकार माझ्या मुलाच्या बाबतीत झालाय अजया. ७-८ अजिब्बात न किडलेले, न झिजलेले दुधाचे दात, दंतवैद्यांकडून काढुनच घ्यावे लागले. भातखाऊ असल्याचा दुष्परिणाम असावा बहुतेक....

अजया's picture

13 Dec 2015 - 7:20 am | अजया

:)

हम्म......आज सकाळी मुलाची सहा महिन्यांची पिडियाट्रिक दंत तपासणी होती. तू या आणि आधीच्या भागात सांगितलेली बाळाच्या दातांची काळजी, म्हणजे कापसाने पुसणे हे माहित नव्हते पण सुदैवाने बाळांचा टूथब्रश पुरला. आता भीती वाटली की आपल्याला माहिती नव्हती म्हणून दात किडले असते तर? वरील माहित असणे आवश्यक होते.
मुलाच्या पहिल्या दाढा आल्यावर सिलंटस लावण्याबद्दल दंतवैद्यांनी विचारले. त्यावेळी भडकमकर मास्तरांच्या सल्ल्याने सिलंटस करून घेतली. आता चारपैकी तीन कायम दाढा आल्यात व चौथ्या ठिकाणी हिरडी मऊ झालीये. ती दाढ येईल तेंव्हा येवो पण आत्ता तीन दाढांना सिलंट करून घेणार आहे. कृपया पालकांनी सिलंट करून घ्यावे. फार उपयोग होतो. आजचे एक्स रे ही समाधानकारक असल्याचे ते म्हणाले. तुझे सगळे सल्ले फार फार मोलाचे आहेत. गेली अनेक वर्षे अगदी न कंटाळता टायमर लावून आम्ही सगळे एकत्र दात घासणे, फ्लॉसिंग, इनटरडेंटल ब्रशींग करतो ज्यामुळे सुदैवाने मुलगा आपण होऊन दात घासतो. रात्री व्यवस्थित पण सकाळी अक्षरश: कसेबसे उरकतो. त्यावरून सतत मागे लागावे लागते. माझ्या दातांचे उदाहरण देऊन सतत पटवणे चालू असते.
तो ९ वर्षांचा असताना नवे दात येण्यास जागा नसल्याने स्पेसर बसवणे, त्यातील अंतर हळूहळू वाढवणे हा उपचार १ वर्ष ऑर्थोडोंटिस्टकडे जाऊन करावा लागला पण त्यामुळेही फायदा झाला. आता डेंटिस्टच्या म्हणण्यानुसार ब्रेसेस लावण्यासाठी तपासणी करावी असे आहे. माझ्या डेंटिस्ट मैत्रिणीने तपासणी केल्यावर तशी फारशी गरज नसल्याचे म्हटले आहे. तुझ्या पुढील लेखनात याबद्दल येईल तेंव्हा वाचीन. मोठ्या माणसांच्या दातांबद्दलही वाचणार आहे. वाट बघते. धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

13 Dec 2015 - 8:49 am | प्रीत-मोहर

वाचतेय. मस्त लेख :)

अतिशय उपयुक्त माहिती! वाखुसाआ.

अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेखमाला. पु. भा.प्र.

पैसा's picture

13 Dec 2015 - 7:26 pm | पैसा

लहान मुलांसाठी असली तरी मोठ्यांसाठीही उपयुक्त आहेच. मला स्वतःला एका मुळावर दोन दात येणे, अक्कलदाढांना वाढायला पुरेशी जागा नाही म्हणून काढायला लागणे, प्रेग्नन्सीत दातांची लाईन जागा बदलून वरखाली होणे असे शक्य त्या सर्व प्रकारचे त्रास झाल्यामुळे दातांच्या डॉक्टरचे महत्त्व चांगलेच माहीत आहे!

नेहमी प्रमाणे लेख आवडला.
पुभाप्र.

मनिमौ's picture

14 Dec 2015 - 6:34 am | मनिमौ

छान माहिती मिळते आहे. लेख वाचून कित्येक नवीन उपचार कळाले. सिलंट चा समावेश मुलीच्या पुढच्या अत्यावश्यक गोष्टी मधे केला आहे.
एक शंकाआहे.की हा सिलंट मोठ्या माणसांना पण उपयोगी पडेल का?

मुलांना दाढ आल्या आल्याच सिलंट्सचा सल्ला दिला जातो.कारण दाढ किडलेली नसते.आणि मुलं चांगले दात घासतील याची खात्री नसते. प्रौढ व्यक्तींना व्यवस्थित ब्रश करणे येत असते म्हणून सांगितलं जात नाही. परंतु न किडलेली पण दाढेचा पृष्ठभाग फारच भेगा असणारा,खोल असेल तर मोठ्या व्यक्तीनेही सिलंट करुन घ्यायला हरकत नाही.

चतुरंग's picture

14 Dec 2015 - 8:04 am | चतुरंग

दाढा सीलंट करण्याबद्दल एक शंका नुकतीच मनात आली आहे - दाढांचा पृष्ठभाग खडबडीत असण्यामागे अन्नपदार्थांचे व्यवस्थित चर्वण होऊन घासात लाळ योग्यप्रकारे मिसळली जावी असा असावा. जर दाढांचा खडबडीत पृष्ठभाग सीलंटने भरला तर तो गुळगुळीत होऊन अन्नाचे चर्वण नीट होण्यात काही अडचणी येत नाहीत का?

सिलंट किती दिवस टिकतो ? अन्न चावताना त्याचा लेयर नष्ट होत नाही का ?

चांगला सिलंट आठ ते दहा वर्ष टिकतो.अन्न चावण्याने हळूहळू कमी होऊ शकतो किंवा क्वचित तुटू शकतात.अशा वेळी त्यावरच नवे सिलंट टाकता येते.

उद्देश तुम्ही सांगता तोच आहे.परंतु नव्या आलेल्या दाढेवरच्या भेगा जास्त खोल असतात.अन्नाच्या चर्वणाने त्या जरा कमी होतात.परंतु खोल भेगात अन्न अडकल्याने किडण्याची शक्यता जास्त असते.सिलंट्स दातच्या शेपमध्ये फारसा बदल करत नसल्याने चावण्यात अडथळे येत नाहीत.सिलंट फक्त खोल भेगा पकडून बसतं.

नाखु's picture

14 Dec 2015 - 9:27 am | नाखु

वरील फ्लोराइड उपचार उपचार हा किती वर्षांच्या मुलाला करता येतो? वय १४ चालेल का?
तसेच मुलीच्या (वय ८) काही दाढांवर काळे डाग (वरील भाग) दिसतात सीलंट केल्याने काही त्रास होणार नाही ना?

आप्ल्या मोलाच्या मार्गर्दर्शनाबद्दल आणि तपशील्वार लेखाने बालकांचे दात कार्यक्षम आणि दीर्घायु ठेवण्यात मदत होईल हे नक्की

आनंदी पालक नाखु

१४ वर्षाच्या मुलाची दाढ किडलेली नसल्यास चालेल.
मुलीच्या दाढांवर काळे डाग फक्त डाग पडलेल्या भेगा असतील तर साफ करुन सिलंट वापरता येईल.किडणे सुरु झाले असल्यास भराव्याच लागतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2015 - 10:12 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती. ही लेखमाला सर्वच जणांना उपयुक्त आहे.

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 10:20 am | श्रीरंग_जोशी

हा ही भाग उत्तम व उपयुक्त माहितीने नटलेला आहे.

एक प्रश्न: अमेरिकेत अमेरिकन लोकांच्या बाळांना काही तासांचे असतानापासून दीड एक वर्षाचे होईपर्यंत पसिफायर वापरले जाते. त्यामुळे बाळं शांत राहतात.

आपले भारतीय लोक मात्र, तसे करू नये त्याने येणार्‍या दातांवर परिणाम होतो असे सांगत राहतात. अमेरिकनांच्या तुलनेत भारतीय बाळे बराच गोंधळ घालताना दिसतात :-) . माझी मुलगी आता तीन महिन्यांची झाली. या वयाच्या बाळांप्रमाणे ती देखील अंगठा चोखू लागली आहे. दर वेळी तिचा अंगठा ओढून बाहेर काढणे जीवावर येते.

पसिफायर वापरल्यास अंगठा चोखणे कमी होईल. दंतारोग्याच्या दृष्टीकोनातून त्याचे काही ज्ञात दुष्परीणाम आहेत का?

पॅसिफायरबद्दल दोन्ही प्रकारची मतं आहेत. लहान बाळाला सकिंगची सवय लागल्याने पॅसिफायरमुळे शांत वाटते.याचा उपयोग दोन वर्षाच्या पुढे मात्र करु नये.सतत सकिंगच्या सवयीने दातांच्या रचनेत बदल उद्भवू शकतात.

श्रीरंग_जोशी's picture

14 Dec 2015 - 10:53 am | श्रीरंग_जोशी

उत्तरासाठी धन्यवाद.

सस्नेह's picture

14 Dec 2015 - 10:52 am | सस्नेह

अतिशय उपयुक्त माहिती.

अदि's picture

14 Dec 2015 - 11:50 am | अदि

माहिती.

दिपक.कुवेत's picture

14 Dec 2015 - 2:36 pm | दिपक.कुवेत

रोचक आणि उपयुक्त आहे.

भुमी's picture

14 Dec 2015 - 3:22 pm | भुमी

उपयुक्त लेखमाला

पियुशा's picture

15 Dec 2015 - 11:29 am | पियुशा

+ १
खरोखर अतिशय उपयुक्त लेखमाला :)

पिलीयन रायडर's picture

14 Dec 2015 - 4:24 pm | पिलीयन रायडर

आमच्या मुलाला "ब्रशला पेस्ट लावणे" ह्या क्रिये बद्दल प्रचंड राग आहे. तो पाण्यात ब्रश बुडवुन घासतो.. पण पेस्ट नाही लावायची.

म्हणुन मग आम्ही "बोटाला पेस्ट लावुन बोट दातावर फिरवणे" आणि त्यावर "ब्रशने घासणे" अशा डिप्लोमॅटिक पद्धतीने दात घासुन घेत आहोत!!

रात्री दात घासायला हवेत हे खरंय.. पण जीवावर येतं.. पोरासाठी करायला हवं...

उपयुक्त लेख आहेत. पुभाप्र!

पिरा,ब्रशला वरुन पेस्ट न लावता ब्रिसल्सच्या आत पेस्ट घालुन पहा.त्याला दिसणार नाही.आणि जास्तीची पेस्ट वापरली जात नाही.मोटराइज्ड ब्रश आणून बघ त्याच्यासाठी. मुलं त्याच्या नादाने ब्रश करतात.आणि ब्रशिंग पण इफेक्टिव्ह होतं.

माझी मुलगी आता तीन वर्षाची होईल. अजुनतरी मीच तिचे दात घासतिये. मोटरायज्ड ब्रश किती वर्षाच्या मुलांसाठी वापरावा?

अगदी लहान बाळ सोडून कोणीही वापरु शकतं मोटराइज्ड ब्रश.सहा वर्षापर्यंत लहान मुलांचे पेरेंट गायडेड ब्रशिंग हवे मात्र.ब्रश कोणताही असू दे.

अनन्न्या's picture

14 Dec 2015 - 5:20 pm | अनन्न्या

माझ्या लेकालाही पुढचे दोन दात पडण्याआधीच नविन आले होते, मी लगेच दुधाचे दात काढून घेतले. आणि सासर माहेरची जेष्ठ मंडळी मी निसर्गाच्या विरूध्द कसे उगाच दात पाडून लेकाचे नुकसान करतेय यावर एकमताने तुटून पडल्याचे आठवतेय!

इडली डोसा's picture

14 Dec 2015 - 8:31 pm | इडली डोसा

अजयाताई हि लेखमाला कुटुंबातल्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद.

उगा काहितरीच's picture

15 Dec 2015 - 1:16 am | उगा काहितरीच

माझ्या वडिलांना (५४) जरा जास्तच चुळा भरण्याची सवय आहे.(दिवसातून ६-७ वेळेस , कमीतकमी २५-३० चुळा प्रत्येक वेळी)याने दातांवर काही वाईट परिणाम होईल काय ?

चांगलंच आहे चुळा भरणं.जरा जास्तच भरत असले तरी नुकसान काही नाही!!

उगा काहितरीच's picture

15 Dec 2015 - 12:01 pm | उगा काहितरीच

धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Dec 2015 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला उत्तम चाललि आहे. दोन्ही भाग आवडले.

पेस्ट वापरण्या ऐवजी पावडरने दात घासल्याने काय होऊ शकते? (उदा व्हीको किंवा दिव्य दंतमंजन इत्यादी किंवा कोलगेट सारखी अती गुळगुळीत पावडर )

तसेच पूर्वी लोक कडुलिंबाच्या काडीने दातुन करायचे. त्या बद्दल दंतशास्त्र काय सांगते?

मिश्री किंवा इप्को सारखी तंबाखूजन्य पेस्ट दांच्या आरोग्या साठी खरोखर हानिकारक आहे का ?

(अर्थात हे हा विषय जर तुम्ही पुढील लेखांमध्ये हाताळणार असलात तर इथे उत्तर दिले नाही तरी चालेल.)

पैजारबुवा

टूथ पावडर हाताला कितीही गुळगुळीत लागली तरी त्यांच्यामुळे दाताच्या एनॅमलवर घर्षणाने परिणाम होतो.वर्षानुवर्षे पावडर वापरलेल्या लोकांचे समोरचे दात बघा.झिजून चपटे झालेले असतात.विशेषतः विको पावडर वापरणाऱ्या लोकांमध्ये हे मी फार पाहिले आहे.एनॅमल गेले की दातांना सेन्सिटिव्हिटीचा त्रास सुरु होतो.वापरण्यासाठी सुलभता पण पेस्टमध्ये जास्त आहे.
दातून परत अतिशय अॅब्रेसिव्ह आहे.त्याने दात आणि हिरड्या रगडून निघतात.ज्याची गरज नाही.परंतु त्यातला निमचा जो रस निघतो तो जंतुनाशक आहे.हिरड्या मजबूत करतो.ब्रशिंगला पर्याय मात्र नाही दातून.कडुलिंबाच्या रसाने गुळण्या केल्या तरी हा फायदा मिळू शकतो.पण मुळात ओरल हायजिन चांगल्या ब्रशिंगने,नियमित स्केलींगने चांगले असेल तर असे रस वगैरे घेण्याची वेळ येऊ नये.
मिश्री आदि पेस्टमध्ये डायरेक्ट निकोटिन वापरले जाते.एका ब्रशिंगनेच चार सिगरेटीएवढे निकोटिन तोंडात वापरले जाते!
हे निकोटिन आपल्या गालाची त्वचा,जीभ इ ठिकाणी तसंच कमी प्रमाणात अन्ननलिकेच्या सुरुवातीला शोषले जाते.त्याचा पेशींच्या आवरणावर परिणाम होऊन तोंडाच्या निरनिराळ्या भागाचा कॅन्सर होण्याची शक्यता फारच वाढते.मुलांवर तर याचे अजूनच वाईट परिणाम,लहान वयात अॅडिक्शन सुरु होणे इ होऊ शकतात.
कोणतीही हर्बल पेस्ट मी तरी रेकमेंड करत नाही.कारण त्यांच्या ट्रायल्स स्टडीजची माहिती मिळत नाही.त्यात नक्की कितपत काय वापरले जाते कळत नाही.त्या औषधांचा माझा अभ्यासही नाही.त्यांच्या चांगल्या वाईटपणाबद्दल त्यामुळे बोलणे शक्य नाही.फ्लोराइड पेस्टवर भरपूर संशोधन झाल्याने त्यांचे गुणधर्म ज्ञात असल्याने सांगू शकते.

प्रचेतस's picture

16 Dec 2015 - 1:19 pm | प्रचेतस

उत्तम लेख.
प्रतिसादही बरेच माहितीपूर्ण.

उत्तम माहितीपूर्ण लेखमाला!

रायनची आई's picture

15 Jan 2016 - 11:31 am | रायनची आई

छान लिहिलय..माझ्या लहानपणी मलापण असाच पुढचा दात डबल आलेला..दुधाचा पडायच्या आधीच मागून दुसरा आलेला.मी आरशात पहिल आणि दचकलेलीच : )आता आठवून मजा वाटते. माझा ४ वर्षाचा मुलगा आहे.फ्लोराइड असलेली कुठली पेस्ट भारतात मिळते ?

अजया's picture

15 Jan 2016 - 2:06 pm | अजया

Pediflor
Cheeriogel
Elgydium junior
यातली कुठलीही मिळेल.

अनिता ठाकूर's picture

15 Jan 2016 - 2:02 pm | अनिता ठाकूर

सिलंट, ईंटरडेंटल ब्रश,मोटराईज्ड ब्रश हे काहीहि मला माहित नव्हते. धन्यवाद डॉ. अजया.आत्ताच मी रूट कॅनल व कॅप बसविणे हे उपचार करून घेतले आहेत. मोठ्या माणसांनी दातांसाठी घ्यावयाच्या काळजीबद्दलच्या लेखाची वाट पहाते आहे. खरंच,ही अत्यंत उपयुक्त लेखमाला आहे.

अनिता ठाकूर's picture

15 Jan 2016 - 2:03 pm | अनिता ठाकूर

माझाहि एक दात रांगेत न येता मागे आला आहे. त्याचे कारण आज समजले.

नमकिन's picture

17 Jan 2016 - 3:31 pm | नमकिन

काही खाल्ले की दात घासावे, झोपायच्या आधी व सकाळी नाष्टा नंतर, म्हणजे फक्त ८ते१० तासच अन्न कण (दुपार ते रात्र) राहतील दातांत.