शाळेत असताना मैदानी बरेच खेळ खेळले जायचे, कमी उंची असल्याने लांब उडी , उंच उडी असे जमायचे नाही पण लंगडी, कबड्डी खेळायला आवडायचे. पकडा पकडी , लगोरी खेळायचे पण धावण्याच्या शर्यतीतही कधीच जास्त टीकाव लागला नाही कधी. क्रीकेट सर्वान्चाच आवडता खेळ पण क्रीकेट सोडुन बाकी कुठले मैदानी खेळ तुम्हाला आवडायचे ??
प्रतिक्रिया
28 Nov 2015 - 10:29 am | बोका-ए-आझम
पण शाळेत कधी स्पर्धात्मक रीत्या, अगदी आंतरवर्गीय वगैरेही खेळलो नाही. काॅलेजमध्ये असताना खेळलो. शिवाय आम्ही काही मित्र जागा नाही म्हणून मैदानात बुद्धिबळ खेळायचो. पण त्याला मैदानी म्हणता नाही येणार.:)
28 Nov 2015 - 11:54 am | सव्यसाची
१० वी पर्यंत गावाकडे शिक्षण झाल्याने बरेच मैदानी खेळ खेळलो. खो खो आणि कबड्डी तर अगदी आवडीचे खेळ.
खो खो त्यातल्या त्यात जास्ती आवडायचा. कारण तिकडे ताकद थोडी कमी असली तरी चालायची पण चपळ (आमच्याकडे त्याला तर्राट असाही शब्द आहे :) ) असणे महत्वाचे होते. १० वी पर्यंत काडी पैलवान असल्याने पळायला कधी विशेष त्रास झाला नाही.
कबड्डी मध्ये पंचांबरोबर नियम धरून हुज्जत घालायला आवडायचे. ;) पण खेळात थोडी ताकद कमी पडायची आणि एन्ट्री मारली कि गडी बाद होऊनच परत. लगोरीही शाळेमध्ये खेळायचो. सूरपारंब्या हा खेळ पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मामाच्या गावी खूप खेळला.
पावसाळाच्या दिवसामध्ये खास करून आमच्याकडे एक खेळ खेळतात. त्याचे नाव आहे 'आट्यापाट्या'. गावी त्याला 'लोंपाट' असेही म्हणतात. जश्या पावसाच्या सरी सुरु होतात तसे मैदानावर चौकोन आखून ८-९ लोकांची एक टीम असे करून हा खेळ खेळतात. रात्र-रात्रभर हे खेळ चालायचे. गेली कित्येक वर्षे हा खेळ पाहिला नाही.
२००५ मध्ये पुण्यात स.प. महाविद्यालयामध्ये एक आट्यापाट्याचा गेम पाहिला पण भावला नाही.
विहिरीमध्ये पोहायला जायचो तेव्हा पाण्यामध्ये लपाछपी हा खेळ चालायचा.
आता पाऊस नाही, पाण्याने गच्च भरलेल्या विहिरी नाहीत आणि ती भावंडे व मित्रमंडळीही नाहीत.
28 Nov 2015 - 2:31 pm | भिंगरी
आम्हीही आट्यापाट्या खूप खेळायचो.वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की आधी मैदानावर जाऊन चौकोन आखायचे आणि मग घरी जायचे.असा शिरस्ताच होता आमचा.
पावसाळ्यात शीखरूपी नावाचा खेळ खेळायचो.चिखलात लोखंडाची सळी फेकून ती उभी राहिली पाहीजे.मग ती काढून परत पुढे फेकायची .पडली की गडी बाद.असा काहीसा खेळ होता तो.
28 Nov 2015 - 12:32 pm | रातराणी
रुमालपाणी :)
गावी गेल्यावर दिवस दिवस भर चुलत भाऊ आणि त्यांच्या मित्रांसोबत विटीदांडू खेळले आहे. धमाल नुसती!!
28 Nov 2015 - 1:51 pm | गामा पैलवान
सगळं आयुष्य ठाण्यात म्हणजे शहरात गेलं. तेही सदनिकांच्या इमारतीत. लहानपणी आमच्या इमारतीत जिन्यातली पकडापकडी नामक दमवणूक करणारा प्रकार चालंत असे. आमच्या तीनमाजली इमारतीचे दोन्ही कक्ष (=विंग्ज) वर गच्चीत आणि खाली अंगणात जुळलेले होते. त्यौले एका जिन्यातून वर जाऊन दुसऱ्या जिन्याने खाली येता येत असे. याचा परिपाक म्हणून उपरोक्त खेळ जन्माला आला आणि पब्लिकची दुपारची झोप इतिहासजमा झाली. मग गच्चीला कुलुपं लावायचा कार्यक्रम राबवून झाला. तरी वानरसेना कसली दाद देतेय! कुलपात माती भरून ज्याम करून टाकलं. आता बसा बोंबलत. मग कुलूप काढून टाकलं. तोवर वानरसेना मोठी होऊ लागली होती. एक इमारत पुरेशी ठरेना. तेव्हा कार्यक्षेत्राचा विस्तार झाला.
आमच्या एरियात इमारतींच्या भोवती उंचउंच भिंती असल्याने हालचालींस बाधा येत असें म्हणून जवळच्या चरई विभागात जाऊन तिथे आडवाटांनी पकडापकडी खेळंत असू. त्यातून पुढे चोर-पोलीस खेळाचा जन्म झाला. पोलिसांना चोर शिरजोर का ते ताबडतोब ध्यानी आलं. आजतागायत पोलिसांनी चोरांना पकडल्याची एकही केस पाहण्यात आलेली नाही.
असो.
अधिकृत खेळांच्या यादीतला खोखो अस्मादिकांना आवडत असे.
-गा.पै.
28 Nov 2015 - 6:19 pm | भीमराव
गोट्या, इट्टी दांडु, सुरपाट्या,पकडापकडी, विष अमृत, डोंगर का पाणी, आक-या टोक-या, पुंगी, चीर घोडा, लपाछपी, डब्बल बार वरची पकडा पकडी, वांग टांग, लगोरच्या, आबादुबी, भारत भारत, सोमवार मंगळवार......
29 Nov 2015 - 6:05 am | रेवती
शाळेत असतानाच्या वयात खोखो, लंगडी, पकडापकडी, लपाछपी, लगोरी, विटीदांडू, बैदूल हे मैदानी खेळ आलटून पालटून चालत असत. अमकाच खेळ नेहमी असे नव्हते. घरात भातुकली खेळताना दंगा केला की बाहेर काढले जात असे व आम्ही मैदानाच्या कोपर्यात झाडाखाली भातुकली खेळत असू. त्यामुळे तो मैदानी खेळ समजला जाईल असे वाटत नाही. बाहुलीच्या लग्नात जी रुसाफुगी होई ती खर्या कोणत्याही लग्नात झाली नसेल.
29 Nov 2015 - 9:58 am | स्वप्नांची राणी
आमच्या बाहुल्या 'मेल्यावर' आम्ही त्यांना पुरायचो पण...त्या ठीकाणी कधी भविष्यात ऊत्खनन झाले तर भरपुर कापडी बाहुल्या सापडतील...!!
29 Nov 2015 - 9:00 am | एस
खो खो खेळलोय भरपूर. आमच्या शाळेचा खो खो चा संघ आंतरशालेय स्पर्धांमध्ये बराच काळ दबदबा टिकवून होता.
29 Nov 2015 - 9:51 am | जयन्त बा शिम्पि
आपल्या वजनाएव्हढ्या मित्राला पाठीवर घेवुन , ठराविक अंतर , ठराविक वेळात पार पाडणे.
गव्हाच्या/ बाजरीच्या रिकाम्या पोत्यात ( बारदान ) दोन्ही पाय टाकुन, कमरेभोवती , पोते दोरीने बांधावयाचे आणि शर्यत सुरु.
आपला उजवा पाय आणि मित्राचा डावा पाय दोरीने एकत्र बांधावयाचा आणि शर्यत सुरु.
विटी दांडू , खो खो , कबड्डी ,पकडा-पकडी , लपंडाव हे तर खेळ होतेच.
29 Nov 2015 - 9:56 am | स्वप्नांची राणी
ठिकर्या आणि डब्बा ऐस पैस खूप खेळायचो. मैदान नव्हतं त्यामुळे असच रस्त्यावरच. पण गल्ली-बोळ असल्यामुळे डब्बा ऐस पैस ला धम्माल यायची...!!