आज चार दिवस झाले ही मुलगी दुसरं काही बोलतंच नाहीय. नुसती अधून-मधून रडतेय आणि "बाबा सांगा ना; बाबा सांगा ना"चा धोशा लावला आहे. आमची मुक्ता हो! मला वाटलं होतं, होईल एक-दोन दिवसांत नीट; पण चार दिवस झाले तरी हिचं लक्षण ठीक दिसेना.
झालेलं काहीही नाहीय. म्हणजे, अगदी विशेष असं काही फार झालं नाहीय. आमच्या घरात तर नाहीच. हिने मात्र ती गोष्ट फार मनावर घेतली आहे.
सांगतो.
गेल्या रविवारची गोष्ट. सकाळचे नऊ-सव्वानऊ झालेले. मी असा नेहमीप्रमाणे शूचिर्भूत होऊन; माझा मलमलीचा शुभ्र झब्बा-पायजमा घालून अभ्यासिकेत लिहीत बसलो होतो. हो; रविवारी सकाळी नऊ ते अकरा ही माझी लेखनसाधनेची वेळ असते. त्या वेळात व्यत्यय आणलेला मला मुळीच खपत नाही. म्हणजे, इतरवेळीही मी लिहितो; पण ते फुटकळ. वर्तमानपत्रातले लेख म्हणा, सदरं म्हणा किंवा साप्ताहिक-मासिक राशिभविष्य म्हणा. रविवारी मात्र माझं स्वतःचं खास लेखन. आता गेल्या वर्षीच माझं "राशी आणि रत्ने" प्रकाशित झालं. वाचकांच्या नुसत्या उड्या पडल्यात त्यावर! एका वर्षात तीन हजारांची आवृत्ती संपली सुद्धा! आता पाच हजाराची नवी आवृत्ती बाजारात येतेय. प्रकाशक म्हणताहेत अजून लिहा; वाचक म्हणताहेत अजून लिहा; म्हणून आता दुसरं पुस्तक लिहायला घेतलंय "राशी आणि त्यांचे स्वभाव"! मोठा मनोरंजक विषय आहे आणि मी लिहितोयसुद्धा अगदी मन लावून! मला लिहितानाच इतकी मजा येतेय तर वाचकांना किती मजा येईल याची कल्पनाच करवत नाहीय. हे पुस्तक तर आधीच्या पुस्तकापेक्षाही जास्त लोकप्रिय होणार यात मला तरी संशय वाटत नाही. बघा, तुमची प्रत राखून ठेवायची असेल तर सांगा मला; काय?
हां, तर असा मी माझ्या लेखनसमाधीत बुडुन लिहीत बसलो होतो. मेषेच्या दणकेबाज धडकेबद्दल लिहू, की कर्केच्या मुळुमुळु रडूबाईबद्दल लिहू; मिथुनेच्या चतुर फटाकडीबद्दल लिहू, की वृषभेच्या विलासी मदनिकेबद्दल लिहू; वृश्चिकेच्या सणसणीत डंखाबद्दल लिहू, की तुळेच्या संतुलित कलात्मकतेवर लिहू असं मला अगदी झालं होतं. मस्त खुसखुशीत नर्मविनोदी शैलीत एकेक स्वभाववैशिष्ट्य उदाहरणासहित लिहिण्यात मी मश्गुल असताना मुक्ता "बाबा, बाबा" करत अभ्यासिकेत आली. समाधी भंगल्याने साहजिकच मी वैतागलो.
"मुक्ता! तुला मी हजारवेळा सांगितलं असेल की माझ्या लेखनात व्यत्यय आलेला मला चालत नाही म्हणून!", असं मी तिच्यावर करवादलो.
ती म्हणाली,"बाबा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आजी आल्यात."
मी म्हटलं", तुला मी सांगितलंय ना, की या वेळात कोणी न सांगता-सवरता आलं तर सरळ कटवायचं म्हणून?"
"हो, पण ह्या खूप म्हातार्या आजी आहेत हो.", ती हेका न सोडता म्हणाली.
"म्हातारी असो की तान्हं बाळ, आपण भीड पडू देता कामा नये. किती वेळा सांगायचं? भीड ही भिकेची बहीण आहे. जा. नंतर यायला सांग त्यांना."
"पुढच्या वेळेसपासून मी नक्की सांगेन; पण आजच्या दिवस चला ना बाबा, प्लीज. प्लीज. खूप म्हातार्या आजी आहेत हो त्या." ती माझा हात धरुन ओढायलाच लागली.
माझा मग नाईलाजच झाला. आता नववीतल्या मुलीला बोलून-बोलून तरी किती बोलणार? त्रासिक चेहर्याने मी दिवाणखान्यात येऊन पाहतो तर दिवाणावर माई बसलेली. आमची गल्ली मुख्य पेठेला लागते त्या वळणावर दोन घरं सोडून एक मोठा वाडा आहे. तो माईचा वाडा. दहा-एक हजार चौरस फुटांचा तरी असेल. पण आता सगळा पडून गेलाय आणि पुढचा दरवाजा आणि त्याला लागून असलेल्या एक-दोन खोल्या कशाबशा तगून राहिलेल्या. त्या पडक्या वाड्यात ही एकटी राहायची नव्वद-पंच्याण्णवची म्हातारी. सगळं अंग सुरकुतलेलं, तोंडाचं पूर्ण बोळकं झालेलं, कमरेतून वाकून अंगाचं धनुष्य झालेलं, हातापायाच्या काड्या झालेल्या अन् त्यामुळे अंगावरच्या धुवट पातळाचा आणि चोळीचा बोंगा झालेला, एकेकाळचे घारे डोळे आता पिवळट झालेले आणि डाव्या डोळ्यात पांढरा अपारदर्शक मोतीबिंदू झालेला. अशा या माईला आमच्या दिवाणखान्यात पाहून मला आश्चर्यच वाटले. माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता तिच्या वाड्यावरून जातो; पण तिला मी कित्येक वर्षांत पाहिले नव्हते. तिला ओळखतील असे आमच्या गल्लीत फारच कमी लोक उरले असतील. इतरवेळी अजिबात बाहेर न दिसणारी ही म्हातारी एकदम घरीच उगवली म्हटल्यावर मी अचंबित होऊन माझा त्रासिकपणा विसरलो.
"काय माई? काय चाललंय? कसं काय येणं केलंत आज?", तिला कमीच ऐकू येत असणार असं गृहीत धरून मी जरा मोठ्यानेच विचारलं.
म्हातारी बोळक्यानेच रुंद हसली; म्हणाली, "माझं म्हातारीचं मेलीचं काय चालणार?", दात नसल्यामुळे बोलताना हवा सुटून तिचे उच्चार गमतीशीर वाटत होते, "आला दिवस ढकलते झालं. सकाळी उठल्यावर आपण अजून जिवंतच आहोत हे कळून आताशा वाईट वाटतं बघ.", असं म्हणून म्हातारी हॅ हॅ हॅ करून हसली. तिच्या आक्रसलेल्या पापण्या आणि थकलेल्या बुबुळांमध्ये थोडासा मिश्कीलपणा चमकून गेला.
"तुझं मात्र कौतुक आहे हो!", म्हातारी पुढे बोलायला लागली,"लोक फार नाव घेतात तुझं. फार मान आहे तुला समाजात. वाडा पाडून दुमजली इमारत बांधलीस, दारात गाडी आणलीस. आजीचे पांग फेडलेस रे बाळा. तुझी आजी आणि मी साधारण एकाच वेळी लग्न होऊन इकडे राहायला आलो. हिच्याएवढीच असेन मी तेव्हा", मुक्ताकडे हात करून ती म्हणाली.
"अहो काय माई मागच्या गोष्टी घेऊन बसलात?", मी उतावळेपाणाने म्हणालो, "आज कशी काय वाट वाकडी केलीत ते सांगा".
"माझं एक काम होतं रे तुझ्याकडं", माई थोड्याशा अजिजीच्या सुरात म्हणाली, "माझी अवस्था तर तू बघतोच आहेस. पिकलं पान कधी गळून पडेल त्याचा भरवसा नाही. पण जीवही सहजासहजी जात नाही बघ. माझा जीव माझ्या शंकरमध्ये अडकलाय रे.", तिचे डोळे एकदम पाण्याने चमचम करु लागले आणि खालचा जबडा काहीवेळ नुसताच वरखाली हालत राहिला.
"चाळीस वर्षे झाली त्याला घर सोडून.", माई खोलवरून कापरा आवाज ओढून आणत म्हणाली. ती पुन्हा भूतकाळात शिरतेय हे पाहून मी सुस्कारा सोडला आणि मुक्ताकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. मुक्ताचंही तोंड रडवेलं झालं होतं. या बायकांना रडायला काहीही कारण लागत नाही. एक रडायला लागली की लगेच दुसरी तिच्याबरोबर रडायला लागते.
"बरोबर आहे माई;", ती पुढे काय बोलतेय ते न ऐकता मी आवाजाची एक पट्टी वाढवून म्हणालो, " पण त्याचं आता आपण काय करणार?". आता हिचा मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी नाटक कंपनीच्या नादाने घर सोडून गेला. चाळीस वर्षांत त्याची ना चिठी ना चपाटी. अशा मुलाचं रडगाणं माझ्याकडे गाऊन काय होणार होतं?
"तसं नाही रे.", ती परत अजिजीने म्हणाली, "आता तू एवढा प्रसिद्ध शास्त्री-पंडित झाला आहेस; सगळी शास्त्रं-पुराणं तुला मुखोद्गत आहेत. लोकांसाठी तू काय-काय उपायही करून देतोस. माझे डोळे मिटायच्या आधी शंकरची भेट होईल असा काही उपाय तुझ्याकडे असेल तर बघावा म्हणून मी आले रे बाळा."
आता हे खरं आहे की या क्षेत्रात माझा थोडाफार अभ्यास आहे. त्यात लहानपणापासून पाठांतराची सवय असल्यामुळे माझी स्मरणशक्ती अगदी तल्लख आणि उच्चार अतिशय सुस्पष्ट आहेत. शिवाय बँकेत नोकरी करत असलो तरी आमचा परंपरागत पौरोहित्याचा व्यवसाय मी जपला आहे. ज्योतिषाविद्येचा अभ्यास असल्याने पत्रिका बनवणे, जुळवणे आणि काही दोष असल्यास शांतीहोमादि उपाय सुचवणे व ते व्यवस्थितरित्या पार पाडून देणे वगैरे वगैरे मी करत असतो. त्यामुळे मला लोक मानतात आणि अगदी दूर-दूरहून माझा सल्ला घ्यायला येतात. आता या माईसाठीही धर्मशास्त्रात सांगितलेला एखादा उपाय मी शोधून देऊ शकलो असतो; पण मला त्यात काही राम दिसेना. आधीच म्हातारीच्या सगळ्या गोवर्या स्मशानात गेलेल्या. असा एखादा उपाय शोधायचे कष्ट घ्या; तिला तो समजावून सांगा आणि एवढं करून तो उपाय करणे तिला परवडणार नसेल तर? शिवाय दक्षिणा देण्याइतके द्रव्य तिच्याकडे असणे दुरापस्तच असणार असा मी अंदाज केला. आमचे पिताश्री म्हणायचे की कोणासाठीही काहीही फुकटात करु नये, माणसाला किंमत राहात नाही; म्हणून मी तिला झटकून टाकायला हवं होतं; पण सरळ-सरळ नाही म्हटलं तर म्हातारी उगाच चिवटपणा करेल, रडारड करेल आणि आणखी वेळ खाईल म्हणून मी तिला काहीतरी थातूर-मातूर उपाय सांगायचं ठरवलं.
"माई तुम्हाला वाचता येतं का?", मी तिला विचारलं.
"हो; येतं की. चवथीपर्यंत शिकलेली आहे मी आणि उजव्या डोळ्याने दिसतं मला अजून!", माई उत्साहाने म्हणाली.
मुक्ताला मी कागद-पेन आणायला पाठवलं आणि माईला म्हणालो, "एक उपाय सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा आणि मी देईन तो मंत्र अकरावेळा म्हणून तो अभिमंत्रित करायचा. मग तो चमचा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोयंड्यात अडकवून द्यायचा. कितीही वर्षे दूर गेलेला माणूस हमखास घरी येतो; काय समजलं?"
"दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा; अकरावेळा मंत्र म्हणून दाराच्या बाहेरच्या कोयंड्याला अडकवून द्यायचा.", माई थोडक्यात म्हणाली.
"बरोबर", मी म्हणालो. तितक्यात मुक्ता कागद-पेन घेऊन आली. मी कागदावर मनानेच रचून एक मंत्र लिहीला.
यथा उत्क्षिप्तो पाषाणः पुनरायाति पृथिवीम् |
बाष्परुपभूतं तोयं पुनरायाति सागरम् |
यथा भास्वतो भास्करः पुनरायाति उदयाचलम् |
तथा सुदूरं गतो जीवः पुनरायाहि स्वगृहम् ||
|| ॐ शुभं भवतु ||
लिहून झाल्यावर कागद मी माईकडे दिला आणि तिला वाचायला सांगितलं. तिने मंत्र अडखळत-अडखळत वाचला.मी अर्थ सांगितला, "ज्याप्रमाणे वर फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीकडे येतो; ज्याप्रमाणे वाफ झालेले पाणी शेवटी पुन्हा सागराला येऊन मिळते; ज्याप्रमाणे तेजस्वी असा सूर्य पश्चिमेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे येतो; त्याचप्रमाणे घरापासून खूप दूर गेलेल्या हे जीवा तू स्वगृही परत ये असा त्याचा अर्थ आहे."माईने आनंदाने डोलत मान हलवली व कागदाची घडी दोन्ही हातांच्यामध्ये धरून हात जोडून कपाळाला लावत भक्तिभावाने नमस्कार केला.
"फार उपकार झाले रे बाळा", माई पुन्हा भावनावश होत म्हणाली, "तुझे उपकार तर मी फेडू शकणार नाही; पण दक्षिणा किती द्यायची तेवढं तरी सांग."
"आता तुमच्याकडून काय घ्यायचं माई?", मी हसत म्हणालो, "स्वखुशीने जे द्यायचं ते द्या."
माईने कमरेची चंची काढली आणि त्यातून अकरा रुपये काढून मला दिले. एक खडीसाखरेचा खडा काढून मुक्ताच्या हातावर ठेवला. मुक्ताला काय वाटलं कोण जाणे? तिने वाकून माईला नमस्कार केला.
"चिरंजीव हो.", माई भरल्या गळ्याने म्हणाली आणि मुक्ताच्या दोन्ही गालांवरून हात फिरवून तिने स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.
"मोठी गोड आहे पोरगी!", बोळ्क्याने हसत मान डोलावत ती म्हणाली आणि मग पदराने डोळे पुसत पुसत निघून गेली.
मी पुन्हा अभ्यासिकेकडे वळलो तर मुक्ता म्हणाली, "बाबा तुमचा मंत्र काम करेल ना हो?"
"म्हणजे काय?", मी हसत म्हणालो, "अगदी शंभर टक्के. इथून पुढे मी लिहीत असताना तू कोणाला घरात घेतलं नाहीस तर नक्कीच माझा मंत्र फळेल."
"बाबा! चेष्टा नका ना करू! खरं खरं सांगा तुमचा मंत्र काम करेल ना?", मुक्ता परत रडवेली झाली होती आणि आता कोणत्याही क्षणी गंगा-यमुना वाहायला लागतील असं वाटलं म्हणून मी म्हणालो, "हो गं. नक्की काम करेल. अगं उपनिषदातला मंत्र आहे तो!". मी ठोकून दिलं असलं तरी तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. ती तरीही विचारात पडलेली दिसत होती पण किमान रडली तरी नाही.उरलेला रविवार विशेष काही न होता गेला. सोमवारही आला आणि गेला. मंगळवारी सकाळी मात्र तो सगळा गोंधळ झाला. नेहमीप्रमाणे बँकेत जायच्या आधी मुक्ताला शाळेत सोडवायला मी निघालो होतो. वळणावर गाडी वळवली तर माईच्या घरासमोर ही गर्दी. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, "माईच्या घरासमोर गर्दी कसली?", असं म्हणत गाडी बाजूला थांबवली आणि मुक्ताला गाडीतच बसून राहायला सांगून गर्दीत घुसलो. गर्दीतून रस्ता काढत पुढे आलो आणि पाहिले तर एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन हवालदार आणि दोन पहारी घेतलेले मजूर उभे.
"काय झालं?", मी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला विचारलं.
"दरवाजा तोडताहेत", तो म्हणाला, "काल दरवाजा उघडला नाही म्हणून दूधवाला दूधपिशव्या दारात ठेऊन गेला. आज येऊन पाहतो तर मांजराने पिशवी फोडून सगळीकडे दूध सांडलेलं. आजही दार उघडेना म्हटल्यावर सगळ्यांनाच संशय आला म्हणून बोलावलंय पोलिसांना. बहुतेक रविवारी रात्रीच गेली वाटतं म्हातारी."
पहारी घेतलेली माणसं दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर पुढे झाला आणि दाराच्या कोयंड्यात अडकवलेला चमचा त्याने काढला. मी परत फिरलो आणि गाडीत येऊन बसलो. गाडीत बसून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
"काय झालं बाबा?", मुक्ताने विचारलं.
"गेली बिचारी निजधामाला.", मी म्हणालो.
"निजधामाला?", मुक्ताने विचारलं.
"हो.", मी वरती बोट दाखवून म्हणालो, "देवाच्या घरी."
मुक्ता काचेतून गर्दीकडे आणि माईच्या घराकडे पाहात राहिली. मी चटकन गाडी काढली आणि निघालो. मुक्ता खिडकीच्या काचेतून वराचवेळ बाहेर बघत राहिली. काही वेळाने एकदम वळून तिने विचारलं, "बाबा, देवाच्या घराला निजधाम का म्हणतात?"
"निज म्हणजे कायमचं आणि धाम म्हणजे घर", मी तिला सांगू लागलो. इंग्रजी माध्यमात ती शिकत असल्याने मराठी व संस्कृत शब्दांचा अर्थ मीच तिला सांगत असतो, "अगं, देवाचं घर हेच आपलं कायमचं घर असतं. इथं पृथ्वीवर आपण सगळेच तात्पुरते घरापासून दूर आलेलो असतो. प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या स्वतःच्या कायमच्या घरी जावंच लागतं".
"तुमच्या मंत्रात तेच म्हटलं होतं ना बाबा?", ती एकदम म्हणाली, "त्यामुळेच माईचा जीव....", आणि अचानक ती हमसून हमसून रडायलाच लागली. माझ्या डोक्यातच नव्हतं ते, यामुळे ती काय बोलतेय तेच मला कळेना. थोड्यावेळाने कळल्यावर मी डोक्यावर हात मारून घेतला. झाऽऽलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सारखा तोच विचार ती करतीये. मधूनच रडते आणि "सांगा ना बाबा; सांगा ना बाबा"चा धोशा लावला आहे. तिला मी हजारवेळा सांगून झालंय की हे मंत्रा-बिंत्राने काहीही झालेलं नाहीय; ती माई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी मरणारच होती ते त्याच दिवशी मेली; तो निव्वळ योगायोग होता; आयुष्य म्हणजे नुसता योगायोग असतो; हे मंत्र-पूजा-पाठ केल्याने नियती बदलत नाही वगैरे परोपरीने सांगून पाहिलं पण ही हेकट पोरगी काही ऐकायलाच तयार नाही. वर "मंत्राचा परिणाम नाही तर तुम्ही लोकांना मंत्र का देता?", असं विचारतीये. आता या मूर्ख मुलीला कसं समजावून सांगू? तुम्हीच सांगून पाहा तिला. तुमचं कदाचित ऐकेल ती.
प्रतिक्रिया
18 Nov 2015 - 9:50 pm | भाऊंचे भाऊ
पॉपकॉर्न घेउन बसल्या आहे.
18 Nov 2015 - 9:58 pm | जेपी
लेख आवडला.
19 Nov 2015 - 2:01 am | उगा काहितरीच
"कथा" आवडली... ;-)
18 Nov 2015 - 10:20 pm | पगला गजोधर
आपल्या चपलेने विंचू मारण्यात आलेला आहे.
19 Nov 2015 - 2:05 am | रुपी
छान! आवडली!
19 Nov 2015 - 2:43 am | मुक्त विहारि
मस्त....
19 Nov 2015 - 4:40 am | कंजूस
तात्पर्य चमचा दुसय्राच्या दाराला लावून पहावा।
19 Nov 2015 - 6:19 am | रेवती
कथा आवडली. वेगळ्या विषयावरील आहे.
ननि, खूप दिवसांनी लिहिलत.
19 Nov 2015 - 8:15 am | मितान
खूप दिसांनी.. हेच लिहायला आले होते..
कथा मस्त फुलली आहे. आवडली.
19 Nov 2015 - 10:38 am | आतिवास
कथा आवडली.
19 Nov 2015 - 9:19 am | एस
कथा आवडली. बर्याच दिवसांनी.
19 Nov 2015 - 9:32 am | प्रकाश घाटपांडे
अप्रतिम!
19 Nov 2015 - 9:42 am | नाखु
"सुखद" दर्शन.
मिपाच्या दाराला चमचा लावल्याने गेल्या २-३ आठवड्यात बरेच जण आपल्या या वाड्यात परतलेत (आणि जोमाने लिहूही लागले आहेत) हे सारं कसं विलक्षण आहे ! मोठं गमतीशीर आणि मजेशीर वगैरे वगैरे !!!
नाखुक मिपगावकर
19 Nov 2015 - 10:06 am | असंका
वा!! काय सुंदर मांडलंत...!!
19 Nov 2015 - 10:10 am | यशोधरा
आत्ता समजलं चिमण्या परत का फिरल्यात ते.
19 Nov 2015 - 8:22 pm | टवाळ कार्टा
चिमण्या??? हे म्हणजे हत्तीच्या गंडस्थळाला सशाचा टाळू म्हणणे =))
19 Nov 2015 - 10:30 am | सस्नेह
सणसणीत कथा ! =))
19 Nov 2015 - 10:52 am | नाव आडनाव
कथा आवडली.
19 Nov 2015 - 3:04 pm | विवेक ठाकूर
"तुमच्या मंत्रात तेच म्हटलं होतं ना बाबा?", ती एकदम म्हणाली, "त्यामुळेच माईचा जीव....",
असा त्या मंत्राचा अर्थ कुठे होतो?
शिवाय : "निज म्हणजे कायमचं आणि धाम म्हणजे घर",
असं नसून, निज म्हणजे स्वतःचं घर, `स्वरूप ' किंवा `विदेही-रूप' असा अर्थ आहे.
19 Nov 2015 - 4:03 pm | नगरीनिरंजन
तसा अर्थ कथानायकाने मुक्ताला सांगितला आहे. कथानायकाच्या ज्ञानाबद्दल शंका येणे चांगली गोष्ट आहे.
अर्थात तो स्वतःचं म्हणजेच कायमचं नाही का? असा प्रतिवाद करेल कदाचित.
19 Nov 2015 - 6:39 pm | विवेक ठाकूर
अर्थात तो स्वतःचं म्हणजेच कायमचं नाही का? असा प्रतिवाद करेल कदाचित.
निजं म्हणजे कायमचं! खरं तर देह जन्माला येण्यापूर्वीचं आणि देहावसान झाल्या नंतरच.
19 Nov 2015 - 4:01 pm | बॅटमॅन
कथा आवडली.
19 Nov 2015 - 5:38 pm | पैसा
उत्कृष्ट कथा!
19 Nov 2015 - 7:46 pm | स्वाती२
कथा आवडली.
19 Nov 2015 - 11:56 pm | रातराणी
पुन्हा तीच चर्चा असेल म्हणून उघडला नव्हता धागा. पण ही तर मस्त कथा निघाली! आवडली!
21 Nov 2015 - 2:49 pm | कानडाऊ योगेशु
कथा प्रवाही आहे आणि उत्सुकतेने वाचली गेली.
साधारण प्रथम पुरुषात लिहिलेल्या अश्या कथेमध्ये असणारा शेवटचा धक्का मिसिंग आहे असे वाटते आहे.
एक सुधारणा म्हणुन सुचवु इच्छितो कि समजा कथेचा शेवट असा केला तर... कथानायकाच्या अपरोक्ष त्याची मुलगीही हा मंत्र श्रध्दापूर्वक म्हणते आहे (कदाचित घरातुन नाहीसे झालेल्या मांजरासाठी वगैरे तत्सम एखादे निरूपद्रवी वाटणार कारण.) व कथेच्या शेवटी नायकाला जाणवते आहे कि त्याने बेफिकिरपणे दिलेला मंत्र खरोखर काम करतो आहे आणि त्याची मुलगी त्यात पूर्णपणे अडकली गेली आहे तर... एका हुरहुर लावणार्या वळणावर कथा संपेल.
21 Nov 2015 - 3:06 pm | असंका
लेखकाला जे सांगायचंय ते सांगण्यासाठी, आहे त्या रचनेने दिलेला धक्का भुकंपाच्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. मी तर नकळत ऑफिसमध्ये असूनही मोठमोठ्ठ्याने हसलो होतो.
त्यांना फक्त लोकांनी विचार करावा एवढंच हवंय. लोकांनी कथेत गुंतून पडावं असं नकोय.
असं मला वाटतं.
21 Nov 2015 - 3:15 pm | कंजूस
श्रीवर्धनला काळभैरवाच्या मंदिरात कळे लावतात ( फुले मुर्तीला चिकटवतात) आणि भाविकाच्या प्रश्नाचे उत्तर ( गुरव ) देतात त्याची मजेशीर घटना पाहिली आहे.
कथा चांगली आहे.
23 Nov 2015 - 12:11 pm | लाल टोपी
तुमची लेखनशैली, कथांचा आशय नेहमीच आवडत आला आहे. ब-याच दिवसांनी आलेली कथा आवडली. वेलकम बॅक!
23 Nov 2015 - 8:36 pm | विशाल कुलकर्णी
आवडेश...