अॅनी हॉल: एका नात्याचा प्रवास

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 4:51 pm

प्रौढ नायक अणि तितकीच प्रौढ नायिका टेनिस खेळायच्या निमित्याने भेटतात. मग त्यांच्या भेटी होत जातात. लगेच बेडरुमपर्यंत जातात. मग दोघे एकत्र राहायला लागतात. मधेच भांडणे होतात तेंव्हा रागावून काही काळ विभक्त होतात. दोघे एकमेकापासून दूर राहू शकत नाही म्हणून मग परत एकत्र येतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर दोघांनाही जाणवते का आता आपले एकत्र राहणे शक्य नाही. परत विभक्त होण्याचा निर्णय घेतात, आता मात्र शांतपणे विचार करुन हा निर्णय घेतला असतो. तरीही तो तिच्याकडे येतो तिला सोबत चल म्हणतो. ती नाही म्हणते. मी आनंदी आहे असे सांगते. तो तुटतो. नंतर परत ती त्याच्या गावात जाते आणि चित्रपट संपतो. ही आहे स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यातील प्रवास उलगडनाऱ्या अॅनी हॉल या चित्रपटाची कथा. स्त्री पुरुषातील या नात्याला कुठलेही लेबल न लावता नात्याचे पदर उलगडले जातात. तसे बघायला गेले तर कथेत नवीन कसे काही नाही तरीही या चित्रपटाच्या पटकथेसाठी १९७८ साली वुडी अॅलन आणि मार्शल ब्रिकमॅन यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा अॅकेडेमी पुरस्कार मिळाला. तसे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (हा का दिला माहीत नाही. फारस काही नवीन नव्हत), सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार सुद्धा मिळाले. या चित्रपटाची पटकथाच या चित्रपटाची सबकुछ होती आणि त्यावर आयसिंग ऑन केक म्हणाव तसे म्हणजे डायान किटन हीचा अभिनय.

Annie Hall
जालावरुन

साधारणतः चित्रपटाची पटकथा ही अॅक्ट१, अॅक्ट२, अॅक्ट३ अशी तीन भागात लिहीली जाते. पहील्या भागात मुख्यत्वे करुन पात्रांची ओळख आणि संघर्षाची नांदी येते तर दुसऱ्या भागात हा संघर्ष शिगेला पोहचतो, तिसऱ्या भागात नायक युद्ध वगेरे करुन विजयी होतो किंवा नायकनायिका एकत्र येतात वगेरे वगेरे प्रकार घडतात. फ्लैशबॅक मधे कथा मागेपुढे होत राहते पण अॅनी हॉल मधे मात्र ‘Non Sequential Narrative’ या तंत्राने पटकथा लिहिली होती. या प्रकारात चित्रपटातील घटना क्रमाक्रमाने येत नाहीत. हल्लीच्या काळात क्वेंटीन टारंटिनो याने हे तंत्र बरेच लोकप्रिय केले. परंतु प्रेमकथा किंवा रोमकॉममधे हे तंत्र प्रभावीपणे वापरनारे जे मोजके चित्रपट आहेत त्यातला महत्वपूर्ण चित्रपट म्हणजे अॅनी हॉल. (असाच दुसरा सुंदर प्रेमचित्रपट म्हणजे 500 days of summer). नायक हाच सूत्रधार बनून कथा सांगतो. चित्रपटाच्या सुरवातीलाच नायक सांगतो की अॅनी आणि मी आता वेगळे झालो आहोत, तर नायक नायकिची पहीली भेट जवळ जवळ तासभराचा चित्रपट झाल्यानंतर येते. चित्रपट मागे जातोय की पुढे असे तुम्हाला कुठेही सांगितले जात नाही. प्रेक्षकालाच ते ठरवावे लागते त्यामुळे चित्रपट बघातना सतर्क राहावे लागते. संवाद आणि सारे संदर्भ समजून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने सांगितलेल्या गोष्टीमुळे बऱ्याचदा प्रेक्षकांची लय बिघडू शकते, त्याचा चित्रपट बघण्यातला रस जाउ शकतो. खर सांगायचे तर अशा प्रकारच्या चित्रपटात सुरवातीला अर्धा तास तसे होतेच, काय चाललेय फारसे काही कळत नाही, लय लागत नाही परंतु नंतर मात्र तुम्ही चित्रपटात गुंतत जाता. अॅनी हॉलमधेही तसे होते परंतु सुरवातीच्या अर्धा तासात अप्रितम संवाद तुम्हाला गुंतवुन ठेवतात. चित्रपटाच्या सुरवातीलाच येनारा मोनोलॉग हा म्हणजे उत्तम संवाद लेखनाचे उदाहरण आहे. तसेही संवाद लेखन ही वुडी अॅलनची हातोटी आहे आणि हा त्याचा सर्वोत्तम चित्रपट आहे.

‘Non Sequential Narrative’ मधे त्यातला एकेक प्रसंग स्वतंत्रपणे तितकाच प्रभावी असायला हवा आणि त्याने मूळ कथानकाशी कुठे तरी नाळ जोडायला हवी. ही कामगिरी लेखक द्वयींनी मस्त हाताळलीय. मुळात पात्रे ही तुमच्या आमच्या सारखी सामान्य, ती वागतात पण तशीच. तो स्टँडअप कॉमेडीयन तर ती धडपडनारी अभिनेत्री. तो तिच्यातले गाणे ओळखतो आणि तिला गायला प्रोत्साहन देतो. पुढे जाउन तिला गाण्यात चांगल्या संधी मिळतात. माझ्या आवडीचा प्रसंग म्हणजे नायक नायकिची पहीली भेट. दोन माणसे एकमेकांना सहजच भेटतात आणि पुढे जाउन त्या ओळखीतूनच प्रेम, जवळीक निर्माण होत जाते. असे असले तरी काही माणसांशी बोलावसे वाटते, त्यांना भेटावेसे वाटते अगदी पहील्या भेटीतच. ते भेटतात ते टेनीस खेळताना मिश्र दुहेरीमधे ती त्याची विरोधक असते. खेळ संपल्यानंतर तो आपली बॅग भरत असतो ती येते.
“हाय”
“हाय” काही वेळ काहीच बोलने नाही मग तीच म्हणते
“बाय” ती निघते.
“छान खेळलीस.”
“खरच, तू पण छान खेळला. काय मूर्खपणा आहे तू मला म्हटले छान खेळलीस मी तुला म्हटले छान खेळला. ओह अॅनी.” त्यानंतर तिचे ते ट्रेडमार्क 'ला दी दा ला दी दा ला ला ला'. ही दोन वाक्ये डायान किटन ज्या प्रकारे बोलते तर वाटते तेवढ्यासाठीच तिला पुरस्कार मिळाला असावा.

पुढे जाउन तिचे कार ड्रायव्हींग, त्यांचे ते पोकळ बुद्धीजीवी संवाद चित्रपटातच बघायला हवे. सांगायचा मुद्दा हाच दोन व्यक्तींमधे प्रेम होनार म्हणून ते भेटताना पाऊस पडला किंवा कुण्या गुंडाने पाठलाग केला असे काही व्हायची गरज नाही. त्या दोघांमधे कुठेतरी आत दडलेली एकमेकांनी भेटायची, एकमेकांशी बोलायची सुप्त इच्छाच त्यांच्या भेटीला, प्रेमाला कारण असते. चित्रपट अशाच प्रसंगांनी भरलेला आहे. तिने त्याला रात्री तीन वाजता फोन करुन घरी बोलवल्याचा प्रसंग, ती त्याच्या घरात राहायला आल्यानंतर त्याने घेतलेला आक्षेप तो प्रसंग, किंवा आपण बुद्धीजीवी आहोत, प्रौढ आहोत आणि फार पोक्तपणे आपण विभक्त होत आहो असे म्हणत असतानाच हे पुस्तक तुझे की माझे यावरुन घातलेला वाद. या अशा प्रसंगातूनच नात उलगडत जात. एका बाजूला तो तिला तू गात जा असे प्रोत्साहन देतो तर दुसऱ्या बाजूला तिच्या छोट्या गोष्टींवर आक्षेप घेतो. दोघांनी एकमेकांना सपोर्ट करने, याचा हट्ट, तिचा हट्ट, याचा संशय, तिचा संशय, एकत्र लॉबस्टर पकडने, पहीले ड्रींक, याच्या घरची मंडळी तिच्या घरची मंडळी. चित्रपट सर्वत्र फिरतो. तुम्हाला नात्यातले विविध पदर उलगडून दाखवतो. हे चित्रपटातच बघण्यात मजा आहे.

काही प्रसंग खास वुडी अॅलन स्टाइलचा टच असनारे आहेत. ती रागात त्याला सोडून गेल्यावर तो रस्तावरच याला त्याला त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल विचारतो किंवा सहा वर्षाच्या मुलाने वर्गातल्या मुलीलाच किस केल्यावर त्याचे ‘I was expressing sexual curiosity’ असे समर्थन करने. हे वाक्य छोटा नाही तर मोठा वुडी अॅलन बोलतो म्हणजे कदाचित त्याच्या बालपणीच्या कृत्याचे त्याने आज केलेल समर्थन म्हणायचे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजून एक गोष्ट अप्रतिमपणे करतात ते म्हणजे स्टिरोओटाइपचा वापर. विशेष करुन न्यूयॉर्क आणि कॅलीफोर्निया म्हणजे दोन वेगवेगळे ध्रुव आहेत हे तुमच्यासमोर मांडल्या जाते. हे करीत असताना मी स्टीरोओटाइपींग करतोय असेही तुम्हाला सांगितले जाते. जेंव्हा ती जी न्यूयॉर्कची आहे त्या न्यूयॉर्कच्या माणसाला सोडून कॅलिफोर्नियात जाते, तिथल्या माणसासोबत राहते म्हणजे तिने काहीतरी भयंकर असे केलेय हे जाणवत राहते. आपला राग तो आजूबाजूच्या गाड्या ठोकून व्यक्त करतो हे चुकीचे असले तरी त्याचा राग समजून घ्यावा असे वाटते.

दिग्दर्शन, कॅमेरा वर्क यात नवीन वगेरे काही नाही. हा रोल डायान किटन हीच्यासाठीच लिहिला गेला होता आणि तिने त्याचे सोने केले. अप्रतिम अभिनय. संयत आभिनय, ती कुठेही उगाच भावूक होत नाही. काहीतरी महत्वाचे काम आहे असे सांगून त्याला रात्री तीन वाजता घरी बोलवल्यावर त्याला चॉकलेट हवे का मस्त आहे हे ती ज्याप्रकारे सांगते निव्वळ अफलातून. असा संतुलित अभिनय फार कठीण असतो यात तुम्हाला नाटकी नाही तर सहज नैसर्गिक वागायचे असते. डायान किटन यात कुठेही कमी पडत नाही. वुडी अॅलनने याच चित्रपटात काय इतर कुठल्याही चित्रपटात असाच अभिनय केला असता किंवा केला आहे. चित्रपटाच्या बाहेर पण तो तसाच बोलतो, वागतो. यात तर त्यानी त्याचा स्वतःचाच व्यवसाय निवडला होता स्टँडअप कॉमेडीयन. तरी एका प्रसंगात जेंव्हा तो लेखक असतो आणि कुण्या आर्टीस्टसाठी त्याला लिहायचे असते म्हणून आलेला असतो. तो आर्टीस्ट त्याला त्याने काय आणि कसे लिहायचे ते सांगत असतो. मनात ‘This man is pathetic’ म्हणत तोंडावर खोटेच हसू ठेवत तो काय सांगतो ते वुडी अॅलन ऐकत असतो त्या प्रसंगात अॅलनचा चेहरा निव्वळ लाजवाब. चित्रटातील नव्वद टक्क्याच्या वर दृष्यात या दोघांपैकी कुणीतरी असतो त्यामुळे इतर कलाकारांना फारसा वाव नाही पण ठीक आहे.

वुडी अॅलनचा चित्रपट म्हटला की त्यातले संवाद नेहमीच लक्षवेधक असतात. जाता जाता त्यातलीच काही उदाहरणे खाली देतो बाकी जालावर बरीच आहेत.

‘In California they don’t throw garbage out, they make TV show out of it.’

‘I would never wanna belong to any club that would have someone like me for a member. ’

‘Life is full of misery, loneliness and sufferings—it ‘s all over much too soon’

‘life is divided into the horrible and the miserable’

quote
जालावरुन

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 Nov 2015 - 5:20 pm | पैसा

सुरेख ओळख! अजून येऊ द्या.

मस्त ओळख करून दिलीत. विशेषत 'Non Sequential Narrative’ चे मर्म छान उलगडून दाखवलेत.

हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे!

दमामि's picture

4 Nov 2015 - 6:35 am | दमामि

वा!!!
अतिशय सुंदर परीक्षण!अजून लिहा.

मित्रहो's picture

5 Nov 2015 - 10:10 am | मित्रहो

धन्यवाद पण परीक्षण नाही. आपल्याला जे आवडल, पटल ते.
बाकी परीक्षणातले ते रेटींग म्हणजे एक गंमत असते. सामान्य माणसासाठी पिक्चर एक तर झकास, बकवास किंवा फारच झाले तर सोसो. आता २ बकवास आणि २.५ बकवास मधे फरक कसा करायचा. शेवटी बकवास तो बकवास.

दमामि's picture

7 Nov 2015 - 11:34 am | दमामि

बरोबर, परीक्षण नाही ओळख. चांगला चित्रपट परिचय हा अत्यंत कठिण साहित्य प्रकार वाटतो.फारच थोड्याना जमतो. तुम्हाला नक्की जमलाय . अजून येऊ द्या.

जयन्त बा शिम्पि's picture

4 Nov 2015 - 8:15 am | जयन्त बा शिम्पि

चित्रपट न वाचता पाहिला असता तर , इतका चांगल्या रितीने समजलाच नसता. असेच लिहित रहा.

कोमल's picture

4 Nov 2015 - 8:23 am | कोमल

छान ओळख.
चित्रपट बघणार या विकांताला

सुमीत भातखंडे's picture

4 Nov 2015 - 10:56 am | सुमीत भातखंडे

माझा आवडता चित्रपट.

छान ओळख.चित्रपट मिळवणे आले.५०० डेज आॅफ समर पण.

यशोधरा's picture

5 Nov 2015 - 3:57 pm | यशोधरा

चित्रपट ओळख अतिशय आवडली. धन्यवाद.

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 1:09 am | बोका-ए-आझम

हा बापमाणूस! अॅनी हाॅल पाहाताना सतत लक्ष ठेवायला लागतं हे खरं आहे आणि कथा ही संवादांमधूनच समजते. मला वाटतं की पटकथेतले संवाद आधी लिहून मग प्रसंगांची रचना केलेली असावी आणि हे चित्रपट पटकथा लेखनाच्या नेहमीच्या तंत्रापेक्षा खूपच वेगळं आहे कारण एरवी प्रसंग प्रथम आणि संवाद नंतर असा क्रम असतो. वुडी अॅलनला पटकथेबद्दल अॅकॅडमी अवाॅर्ड मिळण्याचं कारण बहुतेक तेच असावं. टरँटिनोच्या पल्प फिक्शन मध्येही या तंत्राचा वापर आहे.

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 1:10 am | बोका-ए-आझम

हा बापमाणूस! अॅनी हाॅल पाहाताना सतत लक्ष ठेवायला लागतं हे खरं आहे आणि कथा ही संवादांमधूनच समजते. मला वाटतं की पटकथेतले संवाद आधी लिहून मग प्रसंगांची रचना केलेली असावी आणि हे चित्रपट पटकथा लेखनाच्या नेहमीच्या तंत्रापेक्षा खूपच वेगळं आहे कारण एरवी प्रसंग प्रथम आणि संवाद नंतर असा क्रम असतो. वुडी अॅलनला पटकथेबद्दल अॅकॅडमी अवाॅर्ड मिळण्याचं कारण बहुतेक तेच असावं. टरँटिनोच्या पल्प फिक्शन मध्येही या तंत्राचा वापर आहे.

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 1:10 am | बोका-ए-आझम

हा बापमाणूस! अॅनी हाॅल पाहाताना सतत लक्ष ठेवायला लागतं हे खरं आहे आणि कथा ही संवादांमधूनच समजते. मला वाटतं की पटकथेतले संवाद आधी लिहून मग प्रसंगांची रचना केलेली असावी आणि हे चित्रपट पटकथा लेखनाच्या नेहमीच्या तंत्रापेक्षा खूपच वेगळं आहे कारण एरवी प्रसंग प्रथम आणि संवाद नंतर असा क्रम असतो. वुडी अॅलनला पटकथेबद्दल अॅकॅडमी अवाॅर्ड मिळण्याचं कारण बहुतेक तेच असावं. टरँटिनोच्या पल्प फिक्शन मध्येही या तंत्राचा वापर आहे.

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 1:10 am | बोका-ए-आझम

हा बापमाणूस! अॅनी हाॅल पाहाताना सतत लक्ष ठेवायला लागतं हे खरं आहे आणि कथा ही संवादांमधूनच समजते. मला वाटतं की पटकथेतले संवाद आधी लिहून मग प्रसंगांची रचना केलेली असावी आणि हे चित्रपट पटकथा लेखनाच्या नेहमीच्या तंत्रापेक्षा खूपच वेगळं आहे कारण एरवी प्रसंग प्रथम आणि संवाद नंतर असा क्रम असतो. वुडी अॅलनला पटकथेबद्दल अॅकॅडमी अवाॅर्ड मिळण्याचं कारण बहुतेक तेच असावं. टरँटिनोच्या पल्प फिक्शन मध्येही या तंत्राचा वापर आहे.

श्रीरंग_जोशी's picture

6 Nov 2015 - 2:48 am | श्रीरंग_जोशी

चांगली ओळख करुन दिलीत या चित्रपटाची. संधी मिळताच पाहण्यात येईल.
डायान किटनचे काही चित्रपट पाहिले आहेत. तिचा अभिनय आवडतो.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2015 - 6:57 am | मुक्त विहारि

ज्यांना हा सिनेमा बघायचा असेल, त्यांच्यासाठी लिं़ देत आहे....

https://kat.cr/annie-hall-1977-720p-brrip-800mb-mkvcage-t10294690.html

पद्माक्षी's picture

6 Nov 2015 - 1:43 pm | पद्माक्षी

छान ओळख !!

मित्रहो's picture

7 Nov 2015 - 8:33 am | मित्रहो

धन्यवाद पैसाताई, एस, अजया, कोमल, दमामि, जयंत बा शिम्पि, सुमीत, यशोधरा, बोका-ए-आझम, श्रीरंग जोशी, पद्माक्षी.
मुवी लिंकसाठी धन्यवाद
वेळ मिळेल तसे अजूनही चित्रपटाची ओळख येइलच.

पद्मावति's picture

8 Nov 2015 - 1:49 pm | पद्मावति

खूप छान ओळख. चित्रपट बघावासा वाटतोय.

मारवा's picture

9 Nov 2015 - 5:47 am | मारवा

मित्रहो
तुम्ही अजुन वेगवेगळ्या तुमच्या आवडत्या सिनेमांवर लिहावे ही
विनंती