मित्रांनो,
मिळपाववर रामायण-महाभारताच्या विविध अंगानी चर्चा होत राहाते. त्यातील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या लीलांमुळे सामान्यजनांवर त्याच्या चरित्रातील विविधांगांची मोहिनी पडलेली जाणवते. अनेकांना लीला व अदभूतता सोडून श्रीकृष्णाच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाची माहिती मला नव्याने कळल्याचे जाणवले. ते मला भावले. कदाचित आपणालाही ते वाचायला रंजक वाटेल.
या सादरीकरणात अनेक भौगोलिक उल्लेख सध्या काय म्हणून प्रसिद्ध आहेत याचे विवरण मिळावे तर ज्ञानात भर पडेल.
श्रीकृष्ण वसुदेव यादव
काळाच्या ओघात सूर्यवंशाची सत्ता गेली व 'यादव,अंधक,भोज,भौज,कुकर, दाशार्ह, आणि वृष्ण' या सात 'चंद्रवंशी' कुलांनी 'मधुपुरी, मधुरा', अशा नावाने प्रसिद्ध 'मथुरेच्या' प्रदेशात वसाहती केल्या.
1. 'उग्रसेन' हा मथुरेचा राजा. त्याची राणी 'पद्मावती'. यांना 'कंस' नामक क्रूर पुत्र. पित्याला कैदेत टाकून त्याने सत्ता बऴकावली.
2. श्रीकृष्णाचा पिता 'वसुदेव' आपला पिता 'शूरसेनाने' आपले राज्य गमावल्याने यमुनेच्या उत्तरेला गोवर्धन परिसरातील एक सामान्य जहागीरदार म्हणून मथुरेत राहात होता. शूरसेनाला ‘पृथा’ (पांडवांची माता कुंती) आणि ‘वसुदेव’ अशी दोन अपत्ये होती.
3. 'भोजपुरचा' राजा ‘कुंतीभोज’ शूरसेनाचा मित्र आणि आत्तेभाऊ निःसंतान होता. म्हणून शूरसेनाने आपली मुलगी ‘पृथा’ त्याला दत्तक दिली.
4. राजा उग्रसेनाचा भाऊ ‘देवक’. त्याची मुलगी ‘देवकी’. तिचा विवाह जहागिरदार वसुदेवाशी झाला. विवाहप्रसंगी चुलत भाऊ कंस रथाचे सारथ्य करत होता. परंतु वरातीत विघ्न घालणाऱ्याला त्याने चाबकाने फटके मारले. त्यावेळी त्याने ‘ज्यांची वरात तू नेत आहेस तिचा आठवा मुलगा तुझा वध करेल’ असा तळतळाट केला. चिडून कंस देवकीला मारायला धावला. वसुदेवाने मधेपडून ‘तू बहीण देवकीला मारून काय मिळणार. नंतर तिला झालेली अपत्ये तुझ्या हवाली करतो’. म्हणून समजूत काढून वेळ मारून नेली.
5. कटकट नको म्हणून कालांतराने कंसाने देवकी व वसुदेवाला नजरबंद कैदखान्यात ठेवले. पहिली सहा-सात मुले कंसाने क्रौर्याने मारली. मुले मारल्याचे भिंतीवरील रक्ताचे डाग तो मुद्दाम ठेवत असे. शांत व विचारी स्वभावाच्या वसुदेवाच्या सहवासाने देवकी शांत राहिली.
6. वसुदेवाची आणखी एक पत्नी ‘रोहिणी’ गोकुळात राहात असे. तिला आधीच सहा मुले होती. (कदाचित वाड्यासमान) कैदेत असताना रोहिणी वसुदेवाला भेटावयास येत असे. तिने तिच्या सातव्या अपत्याला 'बलरामाला' श्रावण वद्य षष्ठीला, दुपारी स्वाती नक्षत्रावर, सोमवारी व मथुरेत देवकीने आठव्या 'श्रीकृष्ण' अपत्याला श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेत असताना रात्री 12 वाजता जन्म दिला. बलराम व श्री कृष्ण यांच्या फक्त 2 दिवसांचे अंतर होते.
7. श्रीकृष्णाचे आजोबा, वसुदेवाचे वडील ‘शूरसेन’, मथुरेतील ‘वृष्णी’वंशातील राजा ‘मीढदेव’ याला त्यातील क्षेत्रिय? कुळातील (नाव?) एका पत्निचे अपत्य होते. दुसरी पत्नी वैश्य कुलोत्पन्न होती. तिला पर्जन्यजी नामक मुलगा होता. त्याने यमुनेच्या उत्तरतीरावर वास्तव्यकरून गायीपालन करायचा व्यवसाय सुरू केला. त्याला पाच अपत्ये झाली. पैकी ‘नंद’ बुद्धिमान असल्याने गोकुळपरिसरातील गोपालनाचे प्रमुखपद त्याला देण्यात आले. नात्याने ‘नंद’ व ‘वसुदेव’ बंधू होते. म्हणून आपली पत्नी रोहिणीला त्याने नंदाकडे ठेवले होते.
8. व्रजमंडळातील एका कुटुंबात ‘सुमुख’ आणि ‘पाटला’ यांच्या पोटी ‘यशोदा’ नामक कन्या जन्मली. नंद आणि यशोदाचा विवाह झाला होता. त्यांना एक कन्यारत्न झाले. वसुदेवाला देवकीपासून झालेले आठवे अपत्य त्याने गुपचुप रातोरात नंदाच्या हवाली केले आणि नंदाची कन्या (म्हणून कदाचित एका नवजात मुलीला) परत मथुरेत नेले. यमुनेला पुरग्रस्त परिस्थितीमुळे, मथुरेत आणिबाणीची परिस्थिती असल्याने, जो तो आपला जीव वाचवण्याच्या नादात पहारे देणे वगैरे याकडे दुर्लक्ष झाल्याचे वसुदेवाच्या पथ्यावर पडले असावे.
9. देवकीला आठवे अपत्य मुलगी झाल्याचे कंसाला कळले तरीही दक्षता म्हणून त्याने त्या मुलीला मारायचा प्रयत्न केला पण ती हातातून सटकली. पुराची परिस्थिती, रात्रीची वेळ, त्यात पहाऱ्यातील ढिलाई, अशा अनेक कारणांनी देवकीला मुलाच्या ऐवजी मुलगी झाल्याचे कंसाला खरे न वाटून गोकुळातील वसुदेवाच्या नातलगांचा संशय येत असावा.
10. बाराव्या दिवशी नामकरण विधीला ‘राधा’ नामक एक 23 वर्षाची विवाहिता हजर होती. गोपालक ‘अनय’ आणि त्याची पत्नी ‘राधा’ जवळच्या ‘बरसाना’ गावचे होते. त्या गोंडस श्रीकृष्ण बालकाला पाहून तिला त्याच्या बाललीलांचे मोहक रूप आवडून ती वेळी-अवेळी त्याला आपल्याकडेवरून नेत असावी. अन्य गोपमातांनाही त्या बालकाशी जवळीक साधताना आवडत असावे. कदाचित गवगवा होऊन साधारण त्याच दिवसात जन्मलेल्या अपत्यांचा शोध घेण्यासाठी विविधमार्गांनी नंदावर, वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नी रोहिणी वगैरेंवर लक्ष ठेऊन अशा नवजात बालकांना मारायला काही ना काही सोंगे घेऊन अनेकांना पाठवण्यात आले. त्यात एक पूतना नामक बाई होती. परंतु त्यांना काही छडा न लावताच परतावे किंवा मृत्यूला सामोरे जावे लागले.
11. हळूहळू श्रीकृष्ण मोठा झाल्यावर गाईचारावयास अन्य गोपांच्या समावेत वृंदावन नामक चराऊ कुरणांकडे जात असे. त्याला बालपणापासून बांसरी वाजवायचा नाद असल्याने फावल्यावेळात त्यातून सुरेल स्वरांनी तो मनोरंजन करे. दुग्धजन्य पदार्थ बनवून मथुरेला बाजारात विकायच्या प्रयत्नात घरातील लोकांपासून त्या पदार्थांना दूर ठेवायच्या चालीमुळे खाण्यापिण्यात लहान बाळांची, वृद्धांची अबाळ होताना पाहून ‘श्रीकृष्णाने प्रथम घरचांची भूक भागवा व उरलेले विका’ असे कधी गोड बोलून तर कधी मित्रांच्या मदतीने न ऐकणाऱ्या गोप कुटुंबांवर मस्करीतून धडा घालून पटवून दिले.
12. तिकडे मथुरेत कंसाच्या मनात संशयाची सुई सारखी श्रीकृष्ण-बलरामाकडे जात असल्याने एका उत्सवात मल्लयुद्धाचे कारण दाखवून त्या दोघांना बोलावून मारायचा बेत रचून मथुरेत आणवले गेले. या 8-9 वर्षांच्या मुलांना मुद्दाम बोलावून वयाने व शक्तीने बलवान मल्लांसमोर नेण्यातील कुटिल डाव ‘अक्रूर’ नामक सारथ्याला कळून आला असावा. श्रीकृष्ण व बलरामांचे मल्लयुद्ध चातुर्य व संत्रस्त जनसमुदायाचा उठाव असे कारण होऊन कंस व त्याचे साथीदार मारले गेले. नंतर बंदिवान उग्रसेनाला पुन्हा राज्यावर बसवून, माता देवकी व वसुदेव यांची सुटका केली. त्यानंतर ‘उजैनी’जवळील ‘सांदीपनींच्या’ आश्रमात बलराम व श्रीकृष्ण विद्याग्रहणाला गेले.
वरील लिखाण 'आपली संस्कृती' नावाच्या (जिव्हाळा परिवारतर्फे दामोदर रामदासी, 87/5 ब आझादनगर कोथरूड पुणे 29. मो 9422535997) विविध विषयावर माउली सुत ‘प्रकाश’ यांनी संकलित केलेल्या ज्ञानग्रंथातून घेतलेले आहे. अदभूतता, वगळून मूळलेखनातील तपशील ठेवून, माझ्याकडून थोडी भर घालून हे लिखाण केले आहे. पुढील कथाभाग मिळणाऱ्या प्रतिसादावर ठरेल.
प्रतिक्रिया
2 Nov 2015 - 5:39 am | कंजूस
ज्ञानकोशातही हेच वर्णन आहे.
2 Nov 2015 - 10:08 pm | शशिकांत ओक
वरील ग्रंथ ज्ञानकोशच आहे.
2 Nov 2015 - 10:10 pm | परिकथेतील राजकुमार
संग्रहणिय धागा
2 Nov 2015 - 11:10 pm | प्रचेतस
बऱ्याच व्यक्तींचा महाभारतात काहीच उल्लेख नाही.
राधेची एंट्री सरळ सरळ १० व्या शतकानंतरची आहे ती पण महाभारतात नव्हे तर ज्यदेवकवीच्या गीतगोविंदात.
2 Nov 2015 - 11:43 pm | शशिकांत ओक
प्रचेतसजी,
आपली संस्कृती या ग्रंथात ही असा उल्लेख नाही. फक्त त्यांच्या वयातील अंतर जास्त स्पष्ट करून सांगितले आहे.
5 Apr 2018 - 3:41 pm | परिंदा
वसुदेवाची आणखी एक पत्नी ‘रोहिणी’ गोकुळात राहात असे. तिला आधीच सहा मुले होती. (कदाचित वाड्यासमान) कैदेत असताना रोहिणी वसुदेवाला भेटावयास येत असे. तिने तिच्या सातव्या अपत्याला 'बलरामाला' श्रावण वद्य षष्ठीला, दुपारी स्वाती नक्षत्रावर, सोमवारी व मथुरेत देवकीने आठव्या 'श्रीकृष्ण' अपत्याला श्रावण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेत असताना रात्री 12 वाजता जन्म दिला. बलराम व श्री कृष्ण यांच्या फक्त 2 दिवसांचे अंतर होते.
अश्विनी ते रेवती या नक्षत्रमंडलात रोहिणी हे चौथे नक्षत्र आहे, तर स्वाती हे पंधरावे नक्षत्र आहे. चंद्र हा जवळ जवळ एका दिवसात एक नक्षत्र पार करतो. त्यामुळे जर बलराम स्वाती नक्षत्रावर जन्मलेले असले आणि कृष्ण बलरामांत दोन दिवसांचे अंतर असते, तर कृष्ण अनुराधा किंवा ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेले असावेत.
किंवा जर कृष्ण रोहिणी नक्षत्रावर जन्मलेले असते, तर बलराम रेवती किंवा अश्विनी नक्षत्रावर जन्मलेले असावेत.
किंवा जर या दोघांची जन्मनक्षत्रे बरोबर असतील, तर त्यात दोन दिवसाचे अंतर नसावे.
6 Apr 2018 - 7:12 pm | शशिकांत ओक
आपल्या विचारणेची शहानिशा ते करू शकतील - 'आपली संस्कृती' नावाच्या (जिव्हाळा परिवारतर्फे दामोदर रामदासी, 87/5 ब आझादनगर कोथरूड पुणे 29. मो 9422535997) विविध विषयावर माउली सुत ‘प्रकाश’ यांनी संकलित केलेल्या ज्ञानग्रंथातून घेतलेले आहे.
20 Apr 2018 - 1:12 pm | श्वेता२४
रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेत
कसा काय. वृषभेत म्हणायचंय का तुम्हाला
21 Apr 2018 - 2:09 pm | प्रकाश घाटपांडे
रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृष्चिकेत असताना>>> वृषभेत असावे.
21 Apr 2018 - 2:11 pm | प्रकाश घाटपांडे
महाभारतात राशी व वार नव्हते.हे नंतरचे विश्लेषण असणार आहे
21 Apr 2018 - 2:11 pm | श्वेता२४
रोहीणी नक्षत्राच्या चारही चरणात वृषभच रास असते व वृश्चिक रास त्यापासून खूप लांब आहे. तार्कीकदृष्ट्या पटत नाहीय
18 Apr 2018 - 4:55 am | चित्रगुप्त
या लेखाचा पुढला भाग प्रकाशित केलेला आहे का ? नसल्यास अवश्य करावा ही विनंती.
19 Apr 2018 - 10:39 pm | शशिकांत ओक
पाहता पाहता २००० पार व्हायला आली तरीही कुणी 'पुढील भागाच्या प्रतिक्षेत' वगैरे म्हणून राहिले नाही...
मध्यंतरी इतर विषयांवर काम चालू होते म्हणून हे काम मागे पडले होते.
19 Apr 2018 - 11:34 pm | चित्रगुप्त
शूरसेनाचे राज्य नेमके कुठे होते आणि त्याला ते गमवावे का लागले ?
या दोघांना एकाच कोठडीत ठेवणे हाच खरा कंसाचा मूर्खपणा. त्याला असे करण्याची काही सक्ती/मजबूरी असावी का ?
त्या काळच्या भाषेत 'रात्रीचे बारा' ला नेमके काय म्हणत ? हल्ली प्रचलित असलेली दिवसाचे चोवीस तास वाली पद्धत भारतात इंग्रजांबरोबर आली ना ?
20 Apr 2018 - 2:22 am | गामा पैलवान
चित्रगुप्त,
१.
पोरं व्हावीत म्हणून एकत्र ठेवलं. आणि पोरं झालेली कळायला हवं म्हणून कोठडीत ठेवलं.
२.
माझ्या मते तो रात्रीचा शेवटचा प्रहर असावा. आजच्या भाषेत रात्री १२ ते पाहते ३ हा समय.
आ.न.,
-गा.पै.
20 Apr 2018 - 4:44 am | चित्रगुप्त
यातून खालील तर्क संभवतातः
१. "ज्यांची वरात तू नेत आहेस तिचा आठवा मुलगा तुझा वध करेल" असा तळतळाट-शाप (खरोखर तशी घटना घडली होती असे गृहित धरता) ऐकून हे भाकित खरे ठरणारच अशी कंसाला खात्री पटली, त्यामुळे आता त्यांना किमान आठ तरी मुले होऊ देणे क्रमप्राप्तच होते. या गोष्टीची सोय कंसाने करून दिली. असे असले तरी या भाकिताचा उर्वरित भाग मात्र आपण मुले मारून बदलू शकू असे कंसाला वाटणे, यात विसंगती दिसते.
२. दुसरा तर्क म्हणजे रामायण, महाभारत व अन्य पुराणकथातील सरसकट सगळ्या वरदान-शापवाल्या कथा या प्रक्षिप्त आहेत असे मानणे. मग काहीच प्रश्न उरत नाहीत.
याबद्दल आपल्याला काय वाटते ?
20 Apr 2018 - 12:16 pm | गामा पैलवान
चित्रगुप्त,
वरच्या पहिल्या मुद्द्यात विसंगती कशी ते कळलं नाही.
दुसऱ्या मुद्द्याबद्दल म्हणाल तर शाप देण्यामागे संकल्पाची शक्ती असते. धृतराष्ट्राला युधिष्ठिराच्या याच संकल्पशक्तीची भीती वाटंत असे.
आ.न.,
-गा.पै.
21 Apr 2018 - 2:43 pm | माहितगार
हा धागा अणि चर्चा फालो करत नाहीए त्यामुळे कुठे आउट ऑफ काँटेक्स्ट असल्यास क्षमस्व .
विधानाशी बहुतांश सहमत आहे, आधी लिहिलेल्या कथेतील गॅप एक्सप्लेन करण्याचे प्रयत्न - हे करताना कथानकाचे समिक्षण करुन एखादे उघड खंडण करण्यापेक्षा स्पर्धात्मक कथानक उभे करण्याचे प्रयत्न - , सोबत कर्म विपाक सिद्धांत जोडून अमुक तमुक का घडले असावे याची रोचक कथा बांधणे , सोबत जमल्यास आपले पंथीय दैवत उजवे दाखवणे , गरज भासल्यास आपले नसलेले पंथीय दैवत डावे दाखवणे , अशी सब्टल उद्दीष्ट्ये राहीली असतील का अशी साशंकता वाटते.
21 Apr 2018 - 9:34 pm | चित्रगुप्त
आजच्या वाचकाला अतर्क्य वाटणारे, बुचकळ्यात टाकणारे वा न पटणारे पुराणकथांमधील काही प्रसंग आणि त्यामागील दिला जाणारा कार्यकारण भाव, वर-शाप वा पूर्वजन्मातील घटना इ. ची योजना ही काहीतरी अप्रिय सत्य लपवण्यासाठी केली गेली असावी असे वाटते.
उदाहरणार्थ वैधव्य, पति परांगदा होणे, भ्रताराचे नपुंसकत्व यामुळे होणारी कुचंबणा टाळण्यासाठी किंवा वारस लाभावा यासाठी अन्य पुरुषांशी रत होणे जोवर समाजमान्य होते, तोवर त्यात कुणाला काही गैर वाटत नसावे. कालांतराने रूढी बदलल्यावर अश्या घटनांना काहीतरी दैवी, उदात्त स्वरूप देण्यासाठी देवांच्या आशिर्वादाने संततीलाभ होणे, कुणाच्यातरी शापामुळे अमूक घटना घडलेली असणे अश्या प्रकारच्या कथांचा अंतर्भाव मूळ कथेत करण्यात येऊ लागला असावा.
जुन्या काळातील ऐतिहासिक घटनांना कारणीभूत असलेले तात्कालीन राजकारणातले बारकावे कालांतराने विस्मृत झाल्यावर त्या घटनांचे सरलीकरण/बाळबोधीकरण करताना सरधोपटपणे अमूक व्यक्ती 'देव' वा दैवी गुणांनी युक्त, तर कथेतील त्याच्या शत्रूला 'राक्षस' वा असुरी गुणांनी युक्त ठरवणे, याची उदाहरणे पुष्कळ मिळतात.
या दृष्टीकोणातून शूरसेन, वसुदेव,कंस, कृष्ण यांच्या जीवनातील घटनांकडे बघितले तर काय आढळते ?
21 Apr 2018 - 10:55 pm | माहितगार
मला भागवत आणि महाभारतातील सर्व घटना माहीत नाहीत . शिवाय गीते व्यतिरिक्त संस्कृत ग्रंथांच्या प्रत्येक शब्दा साहित अनुवादाची उपलब्धता सहसा नसते त्यामुळे निश्चित स्वरूपाच्या प्रतिक्रिया देणे सहसा कठीण जाते .
सर्वच काव्य लेखक सत्य लपवत नसावेत इतपत बऱ्या पैकी स्पष्टता हि बऱ्याचदा प्राचीन संस्कृत साहित्यातून दिसून येते . जे काही डोक्यात येते ते सर्व ईश्वरेच्छा म्हणून ते ना पुसता लिहिणारे वाढवणारेही असावेत . काही चातुर्य कथा लिहिणारे असावेत . संस्कृत सर्वसामान्यांची भाषा नव्हती त्यामुळे त्यात काय लिहिले जाते आहे याचे प्रत्यक्ष दबाव मर्यादित असावेत . महाकाव्ये , जातक आणि पुराणातील कथा मात्र लिहिणे , स्मरण आणि स्मरणातून गावोगावी जाऊन पुराणिकांमार्फत कथा कथनास मात्र चरितार्थ चालवू शकणार्या व्यवसायाचे स्वरूप आले असावे. मग काही कथांचा जन्म राजपुत्र आणि राजे लोकांसाठी चातुर्य आणि माहिती कथा म्हणून रचल्या जाणे ते काही कथा सवर्सामान्य जनतेच्या रंजन आणि प्रबोधनासाठी असत . आणि श्रोत्यांच्या गरजेनुसार कथांमध्ये तडजोडी होणे ऐकिवात आणि स्मरणात फरक पडणे , श्राद्धामध्ये फरक पडणे हे हि होत असणार .
प्रक्षिप्ततेच्या शक्यता व्यक्त करणारे एकाच काळात एकाच प्रक्षिप्तता आली असे समजून चालत नाही ना असे क्वचित वाटते. प्रत्यक्षात प्रक्षिप्ततेचे अनेक स्तर अनेक पिढ्यातून होत गेले असणार . तत्कालीन एकूण जनसंख्या कमी असेल संस्कृत येणारे अजून कमी . दुसरी एजून एका शक्यता कमी विचारात घेतली जाते ती म्हणजे हे संस्कृत ग्रंथ सांभाळण्याचे काम एक प्रकारचा विश्वास असलेलयामकडून दुसऱ्या प्रकारचे विश्वास असलेल्यांची सांभाळणे असेही झाले असणार आणि त्या पुढच्या सांभाळ कर्त्यांनी आपापल्या मनाची भर घातली असणार या मुळे कथासूत्रात विरोधाभास होण्यासारखे प्रकार होतात . किंवा एखाद्या आवृत्तीत एखादे भाग नाही दुसऱ्याच्या आवृत्तीत मिळाला तर जोड चार प्रसंग . किंवा एखादे पण एखाद्या ग्रंथाचा भाग नाही हे संकलकास माहिती नसेल तर तो जसे संकलन असेल तसेच बिनदिक्कत फॉरवर्ड करेल . आणि एका ग्रंथ दुसऱ्या ग्रंथात कसा यावर अभ्यासक डोके खाजवण्या पलीकडे काही करणे अवघड जाणार . असो
22 Apr 2018 - 2:46 pm | माहितगार
'नन्द' या शब्दाचे संस्कृत साहित्यातील (शक्य झाल्यास कालानुक्रमे) उल्लेखान्ची माहिती कुणी देऊ शकेल का ? (माझा इंटरेस्ट स्थलनामात आढळणारा नन्द हा शब्द उल्लेख आहेत )