वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांड मधील ४३व्या सर्गात श्रीरामांची त्यांच्या मित्रांसोबत होणार्या चर्चेचे वर्णन आहे. त्यात श्रीरामांचा मित्र भद्र सीता विषयी प्रजेचे मत बेधडकपणे श्रीरामांसमोर मांडतो. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून श्रीरामाला आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. रामकथेला कलाटणी देण्यात भद्राचे महत्वपूर्ण स्थान असूनही, अधिकांश लोकांना भद्राचे नाव माहित नाही.
म्हणतात न, राजाला मित्र नसतात. राजा अवतीभोवती वावरतात फक्त, चाटुकार, चारण, भाट आणि विदूषक. राजावर स्तुतिसुमने उधळून, निरनिराळ्या क्लुप्त्या करून राजाला प्रसन्न करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट. राजा प्रसन्न झाला तर त्यांना त्यांचे हित साध्य करता येते. नेहमी राजाला रुचेल असेच त्यांचे वागणे असते.
श्रीरामाचीहि मित्रमंडळी होती. दिवसभराच्या राजकाजातून दमल्यावर श्रीरामहि आपल्या मित्रांसोबत हास्य, विनोद, परिहास करत काही काळ घालवीत होते. विजय, मधुमत्त, काश्यप, मंगल, कुल, सुराजि, कालिय, सुमागध, दंतवक्त्र आणि भद्र हि श्रीरामांच्या मित्रांची नावे. असेच एके दिवशी श्रीरामाने आपल्या मित्रांना विचारले, प्रजाजनांचे राजपरीवारा बाबत काय मत आहे? त्यावर श्रीरामांचा मित्र भद्र म्हणाला, रावणावर आपण जो विजय मिळविला आहे, त्या बाबत बर्याच गोष्टींची चर्चा प्रजाजन करतात.
भद्राचे म्हणणे ऐकून श्रीराम म्हणाले, भद्र, न कचरता सांग, प्रजाजन माझ्या विषयी कोणकोणत्या गोष्टी शुभ बोलतात आणि कोणत्या गोष्टी अशुभ बोलतात. शुभ गोष्टींचे मी आचरण करीन आणि अशुभ गोष्टींच्या त्याग करीन.
एवमुक्तस्तु भद्रेण राघवो वाक्यमब्रवीत्
कथयस्व यथातत्त्वं सर्वं निरवशेषतः ll९ll
शुभाशुभानि वाक्यानि कान्याहुः पुरवासिनः
श्रुत्वेदानीं शुभं कुर्यां न कुर्यामशुभानि च ll१०ll
भद्र म्हणाला राम, प्रजाजन म्हणतात, युद्धात रावणाला मारून श्रीराम सीतेला आपल्या घरी घेऊन आले. प्रजेच्या मनात सीतेच्या चारित्रा विषयी शंका आहे. रावणाने बलपूर्वक सीतेचे हरण केले, तिला घेऊन लंकेत आला. अंत:पुरातील रम्य अश्या अशोक वनात तिला ठेवले. ती रावणाच्या अधीन राहिली. एवढे असूनही श्रीरामाने तिचा स्वीकार कसा काय केला? लोक प्रश्न विचारतात, आता आम्हालाही स्त्रियांचे असे वागणे स्वीकार करावे लागेल कारण प्रजा राजाचे अनुसरण करते. भद्राचा म्हणण्याचा आशय स्पष्ट होता, विवाह नंतर ही स्त्रियांनी पर-पुरुषांशी संबंध ठेवले, तरी तिचा त्याग करता येणार नाही. ती श्रीरामांचे उदाहरण देईल. परिणाम समाजात व्यभिचार माजेल. विवाह संस्थेला अर्थच उरणार नाही.
भद्राचे मत ऐकताच श्रीरामांना धक्काच बसला. अत्यंत दुखी होऊन श्रीरामांनी आपल्या अन्य मित्रांना त्यांचे मत विचारले. आजचा काळ असता तर सर्वांनी एकजुटीने भद्राच्या म्हणण्याचा निषेध केला असता. पण ते श्रीरामांचे सच्चे मित्र होते, त्यांनी अत्यंत दीनवाणीमध्ये म्हंटले, भद्राचे कथन सत्य आहे. जड अंत:करणाने श्रीरामांनी आपल्या मित्रांना निरोप दिला. संपूर्णपणे विचारकरून श्रीरामांनी आपले कठोर कर्तव्य निश्चित केले. प्रजेच्या मनातल्या शंका दूर करण्याकरिता आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग केला.
जर त्या दिवशी, भद्राने प्रजेमध्ये सीतेविषयी चाललेल्या प्रवादांबाबत, चिक्कार शब्द ही उच्चारला नसता, तर श्रीरामांनी सीतेचा त्याग केला नसता. पण या साठी भद्राला खोटे बोलावे लागले असते. भद्र श्रीरामांचा खरा मित्र होता, खोटे बोलणे त्याला शक्य नव्हते. आपल्या हृदयावर दगड ठेऊन भद्राने श्रीरामांना कटू सत्य सांगितले. रामकथेला एक वेगळे वळण लागले.
प्रतिक्रिया
19 Oct 2015 - 9:27 pm | प्रचेतस
उत्तरकाण्ड उघडउघड प्रक्षिप्त आहे हे युद्धकाण्डाच्या शेवटी असलेल्या वाल्मिकीरामायणाच्या उपसंहार आणि फलश्रुतीवरुन आणि उत्तरकाण्डात असलेल्या कर्मकांडांवरुन, हरीच्या गुणवर्णनांवरुन, रावणाच्या विविध पराक्रमांच्या आणि पराभवांच्या वर्णनांवरुन आणि मुख्य म्हणजे बदललेल्या भाषेवरुन अगदी सहजी लक्षात येते.
बाकी हा भद्र उत्तरकाण्ड सोडून इतर कशातही येत नाही.तरी उत्तरकाण्ड सध्याच्या वाल्मिकिरामायणाचा भाग आहे हे सोडून देता येत नाही.
19 Oct 2015 - 9:41 pm | दिवाकर कुलकर्णी
अभद्र शब्दाची व्युत्पत्ति काय
20 Oct 2015 - 7:49 pm | विवेकपटाईत
मला फक्त वाल्मिकी रामायणानुसार माहिती सांगायची होती. मी पण पहिल्यांदाच हे नाव वाचल. त्या आधी दुसर्या कथा माहित होत्या. कुणा परीचीतालाही भद्र बाबत माहिती नव्हती. म्हणून हा प्रयत्न.
21 Oct 2015 - 8:25 pm | विद्यार्थी
मी तर सीतेच्या चरित्रावर एका धोब्याने शंका घेतल्याची कथा ऐकली होती, नवीन माहितीबद्दल धन्यवाद.
22 Oct 2015 - 3:25 pm | द-बाहुबली
दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...