जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील.
अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक".
न्यूयॉर्क. ध्येयवेड्या लोकांचं शहर. आणि पॅरिस स्वप्नाळू आर्टिस्ट लोकांचं ठिकाण. आपल्या ध्येयवेड्या आर्टिस्ट चा प्रवास चालू झाला पॅरिस पासून न्यूयॉर्ककडे. गोष्ट काही फार नवीन नाही पण अगदीच जुनी पण नाही आणि अप्रचलित तर अगदीच नव्हे. न्यूयॉर्कवासीयांना, या ना त्या कारणाने न्यूयॉर्क सफ़र घडवलेल्यांना, न्यूयॉर्क बद्दल ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या सगळ्यांना फिलिप पेटी (पेटिट) बद्दल माहिती असतेच. हि फिलिपची सत्यकथा रॉबर्ट झेमेकीसने दिग्दर्शित केलेल्या "द वॉक" मध्ये आहे.
फ्रान्स मध्ये फिलिपला हाय वायर वॉकर होण्याचा नाद लागतो. ज्या सर्कशीतील कलाकाराला बघून त्याच्या डोक्यात हे खूळ शिरतं तोच पापा रुडी फिलिपचा वायर वॉकर मधला गुरु. चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतसे हे गुरुशिष्याचे नाते पण बदलत जाते.
"मी सर्कशीत काम करणारा जोकर नाहीये" हे ठरवून फिलिप पॅरिस मध्ये रस्त्यावर आपल्या कलागुणांना सादर करू लागतो. आणि पॅरिस मध्ये त्याला त्याचं ध्येय गवसतं; न्यूयॉर्क मधल्या अतिप्रचंड, आयफेल (तेव्हाचे उंच वास्तुंशी तुलना करण्याचे परिमाण :) ) पेक्षा २७५ मीटर उंच अशा ट्वीन टॉवर वर वायर वॉक करायचं. पॅरिस मध्येच फिलिपला त्याची पहिली गोड साथीदार अॅनी भेटते. मात्र अॅनीची साथ त्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंतच असते. एका पाठोपाठ एक फिलिप आपले साथीदार गोळा करत, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत जातो.
फिलिपच स्वप्न पूर्ण होत, पण ते नक्की कसं, आलेल्या अडचणींवर तो कसा मार्ग काढत जातो हे पाहायला चित्रपट गृहाची पायरी चढावीच लागेल. मलाही फिलिपची गोष्ट चित्रपट पहायच्या आधीपासून माहिती होती. "अरे एक रोप वॉकर होता है. ट्वीन टॉवर के बीच रोप बांधके वो उसपे वॉक करता है, वीच इस इललिगल. फिर एन.वाय.पि.ड़ि वाले पहून्च जाते है ट्वीन टॉवर पे उसको उठानेके लिये. ये सब देखने क्युं जाना थियेटर?" असं स्टोरीला गुंडाळून, आमच्या मूवीच्या प्लानला सुरुंग लावायचा माझा विचार दोस्त लोकांनी खोडून काढला. आणि जेव्हा मी चित्रपट गृहातून बाहेर पडले तेव्हा एका अप्रतिम अनुभवाची साक्षीदार होऊनच.
चित्रपटातील काही प्रसंग बऱ्यापैकी मोठे असूनही चित्रपट कधीच कंटाळवाणा होत नाही. विनोदी प्रसंगांची पण खूबीने पेरणी केलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या चौकटी पासून शेवटच्या चौकटीपर्यंत ट्वीन टॉवर आपल्याला भेटतच राहतो. आयफेल टॉवर सुद्धा अधून मधून दर्शन देतो. पण फिलिपची रोप/वायर कायम आपल्या सोबत राहते. आणि ट्वीन टॉवर सध्या नसल्याची हुरहूर पण.
कास्ट अवे, फॉरेस्ट गम्प, फ्लाईट सारखे अप्रतिम चित्रपट घडवलेल्या रॉबर्टने याही चित्रपटात प्रत्येक दृश्य काळजीपूर्वक आणि वैशिष्ट्यपूर्ण रीतीने हाताळले आहे. कित्येक प्रसंगांमधल्या थराराने प्रेक्षकाला गोठवून ठेवण्यात दिग्दर्शक आणि कॅमेरा यशस्वी झाला आहे. रूपांतरण अर्थात ट्रांसफॉर्मेशन हा दिग्दर्शकाचा कळीचा मुद्दा आहे. फिलिपचा आयुष्यातला पहिला वॉक आणि चित्रपटातील शेवटचा वॉक यात ट्रांसफॉर्मेशनचा वापर जबरदस्त आहे. जोसेफ गॉर्डन-लेविटने सुरेख एक्श्प्रेशन्स वापरून फिलिपला उत्तम वठवले आहे. एका कलाकारासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते प्रशंसा. अॅप्रिसिएशन. त्याला पैसे भलेही कमी मिळोत पण केलेल्या कामांची प्रशंसा झाली हे फार महत्त्वाच असत त्याच्यासाठी. फिलिपसाठीही हेच महत्त्वाचं होतं आणि जोसेफने त्याच्या अभिनयातून या फिलिपच्या भावना हुबेहूब उतरवल्या आहेत.
इथे बर्याच गोष्टी मांडायच्या राहिल्या आहेत. बर्याच गोष्टी शब्दांपलिकडल्या आहेत.
या चित्रपटातील शेवटची ३० मिनिटे तर मी कितीही वेळा पाहिली तरी मनाचे समाधान नाही होणार अशी आहेत.
चित्रपट तर नक्की पहाच. आणि तोही चित्रपट गृहात जाऊनच. क्योंकी वहाँ का माहौल ही कुछ अलग बन जाता है. तूर्तास हा ट्रेलर बघा :
प्रतिक्रिया
19 Oct 2015 - 12:00 am | चाणक्य
नक्की बघणार
19 Oct 2015 - 12:08 am | उगा काहितरीच
असं म्हणूनच टाळला चित्रपट , अव्हेलेबल असेल तर बघू ३डीत!
19 Oct 2015 - 12:14 am | वेल्लाभट
काल एक मित्र भेटला. संवाद बघा आमच्यातला.
अ. हाय
मी. हाय
अ. द वॉक बघून येतोय
मी. अच्छा! नवीन पिक्चर ना? कसा आहे?
अ. अॅक्टिव्हा ८०-९० ने पळवलीय
मी. बापरे. का रे बाबा?
अ. अरे! वेड लागलंय पिक्चर बघून! जाच्च्च
मी. हा हा हा! बरं बरं मी जातो, पण तू सावकाश जा.
अ. हाहा येस येस. चल.
(अँड ही झूम्ड ऑफ)
अँड आय वॉज लाइक; बघायला पाहिजे चायला....
19 Oct 2015 - 5:11 am | निनाद
ओळख खुपच छान करून दिली आहे. पाहण्यात येईल हा चित्रपट.
धन्यवाद!
19 Oct 2015 - 6:48 am | एस
वा! चित्रपट छान असणार. उत्तम ओळख.
19 Oct 2015 - 7:17 am | जॅक डनियल्स
नक्की बघणार !
पण "फ्लाईट" हा टुकार सिनेमा होता, द्यान्झल ला वाया घालवले आहे, आणि फोरेस्ट गंप बरोबर या सिनेमाची तुलना करणे हा गुन्हा आहे.. असे माझे मत आहे.
19 Oct 2015 - 8:20 am | कोमल
हाहाहा..
फ्लाईट अगदीच टुकार नव्हता ओ जेडी. पण हो देन्झेल ला म्हणावं तितका स्कोप नाही.
आणि तुलना नाहीच फॉरेस्ट गम्प बरोबर.
19 Oct 2015 - 6:03 pm | द-बाहुबली
फ्लाइट अतिशय बकवास निराशावादी कंटाळवाणा चित्रपट. ग्रहाम्ची स्थिती वाइट असतान ज्य शिक्षा नशीबात असतात त्यातली एक म्हणजे द फ्लाइट सारखे चित्रपट पहाणे नशीबी येणे.
20 Oct 2015 - 5:22 am | जॅक डनियल्स
हो, माझी ग्रहाची स्थिती अगदीच वाईट होती, अगदी सहमत!
19 Oct 2015 - 7:30 am | बाजीगर
वाह खूट छान ओळख. उत्सुकता निर्माण केलीत.आवडलं
19 Oct 2015 - 8:17 am | मुक्त विहारि
नक्कीच बघणार.
19 Oct 2015 - 9:01 am | प्रचेतस
उत्तम परिचय.
हा चित्रपट बघणार आहेच.
19 Oct 2015 - 11:34 am | प्यारे१
ट्रेलर बघितला. हा प्रकार थ्री डी मध्ये बघायचा म्हणजे भारीच!
हा जॉन डॉन चा हीरो आहे काय?
19 Oct 2015 - 12:50 pm | बॅटमॅन
ओळख छानच आहे, बघावासा वाटतोय....
19 Oct 2015 - 3:34 pm | द-बाहुबली
नक्किच. यासाठीच चित्रपट फर्स्ट डे लास्ट शो बघितला होता. शेवटचे काही क्षण तर अक्षरशः जिवंत. निशब्द.
चित्रपट फक्त ३डी मधेच पहा.
19 Oct 2015 - 6:08 pm | रेवती
सहज जायला मिळाल्यास पाहीन व थेट्रात जाऊन पाहीन.
20 Oct 2015 - 11:54 am | अभ्या..
छान लिहिलय. मस्त एकदम.
कमी शब्दात परफेक्ट जमलय.
.
अवांतरः परवाचा एक अँटीप्रतिसाद एवढा परिणाम करेल आताच्या प्रतिसादसंख्येवर असे वाटले नव्हते. ;)
असो. लिहित राहा. शुभेच्छा कायमच आहेत.
20 Oct 2015 - 1:18 pm | प्रचेतस
:)
20 Oct 2015 - 1:29 pm | प्यारे१
गप की बे.
आपण खेळायचं का बोल!
20 Oct 2015 - 1:31 pm | अभ्या..
प्यार्या तुझी जीभ काळी हाय.
20 Oct 2015 - 1:34 pm | प्यारे१
हा हा हा हा!
एक जाणता मिपाकर अशी अंधश्रद्धेमध्ये भर घालतो हे वाचून नेणता मिपाकर म्हणून शरम वाटली.
आम्ही जॉन डॉन बघतो अधून मधून. स्कार्लेट जोहान्सन...... आह!
20 Oct 2015 - 3:08 pm | कोमल
हाहाहाहा मलाही नव्हतं वाटलं असं होइल.
तुझ्यामुळेच झालंय असं. शाप दिलेलास ना..
20 Oct 2015 - 3:12 pm | प्यारे१
मीनी कं केला? :/
20 Oct 2015 - 3:15 pm | अभ्या..
षाप येगळा. भविष्यवानी येगळी.
पावरवाले षाप देतेत. पावर काय असते माहीत असलेले भविष्यवानी करतेत.
20 Oct 2015 - 3:24 pm | प्यारे१
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात....! :)
20 Oct 2015 - 3:16 pm | बॅटमॅन
अवांतराशी सहमत. शेवटी कंपूबाजांना जे जमते तेच करणार ते. ;)
20 Oct 2015 - 3:50 pm | कोमल
20 Oct 2015 - 4:43 pm | नीलमोहर
@ कोमल,
माझ्याकडूनही सेम स्मायली ;)
या सिनेमाच्या मेकिंगबद्दल एक लेख वाचला होता, त्यात त्याने तशाप्रकारे वॉकची बरीच प्रॅक्टिस केली असं सांगितलं होतं. चित्रपटाबद्दल इतर बरीच माहितीही दिली होती, तेव्हापासून उत्सुकता वाढली होती.
टू सी लिस्ट मध्ये आहेच हा सिनेमा.
असे प्रकार करणारे लोक एक झपाटलेले आणि त्यांच्यावर चित्रपट बनवणारे हॉलिवूडचे लोक ही तसेच अफाट !!
"शेवटी कंपूबाजांना जे जमते तेच करणार ते."
- you said it,
- straight from the horse's mouth.
20 Oct 2015 - 5:16 pm | प्यारे१
अभ्याचा रोख कंपूच्या विरोधातल्या कंपूच्या वर्तुळाच्या परिघातल्या कंपूच्या आत नसलेल्या पण बाहेर वाटणार्या कंपूबद्दल आहे. तुम्चा रोख कुणाकडं आहे ?
20 Oct 2015 - 5:24 pm | नीलमोहर
ज्यांच्यासाठी आहे ते समजून घेतील बरोबर..
बाकी मी कोणत्याच कंपूत नसल्यामुळे पास.
20 Oct 2015 - 2:09 pm | बिन्नी
सुंदर परिचय. मी बघेन हा सिनेमा.
20 Oct 2015 - 4:31 pm | अजया
छान ओळख कोमल.जरुर बघेन हा सिनेमा.
20 Oct 2015 - 4:45 pm | स्वप्नांची राणी
ती शेवटची ३० मिन्ट म्हणजे आख्ख्या थेटरला हार्टअटैक यायचा बाकी होता....खतरनाक खल्लास पिक्चर..!!!
20 Oct 2015 - 5:10 pm | पैसा
सिनेमाची ओळख आवडली.
20 Oct 2015 - 5:32 pm | खटपट्या
आता यावर हींदीवाले चित्रपट काढून कथेची वाट कधी लावतात त्याची वाट पाहूया :)
20 Oct 2015 - 5:33 pm | सव्यसाची
मागच्याच आठवड्यात हा चित्रपट पाहण्याचा योग आला. चित्रपट आवडला.
चित्रपटामधील चांगल्या गोष्टींवर वरती प्रतिसाद आले आहेतच.
मला स्वतःला जाणवलेल्या काही गोष्टी:
१. सूत्रधार चित्रपटामध्ये असल्याने खूप त्रास होतो असे नाही पण नसता तरी चालले असते.
२. वरती बऱ्याच लोकांनी लिहिले आहे कि ३ डी मध्ये चांगला आहे. मला वैयक्तिक रित्या ३ डी मध्ये काही विशेष वाटले नाही. शिवाय काही ठिकाणी संकलनाच्या वेळी दृश्य जोडणी थोडीशी गंडली आहे असे वाटले.
३. मला चित्रपट थोडासा लांबला आहे असे वाटले. न्यूयॉर्क मध्ये आल्यावर चित्रपट वेग घेतो. पण त्याआधी तो बराच संथ वाटला.
-----------------------------------------
अवांतर: फ्लाईट चित्रपटावर कुणीतरी वरती लिहिले आहेच. त्या चित्रपटातील विमानाच्या अपघाताचे चित्रण अतिशय चांगले आहे. पण पुढचा चित्रपट आवडला नाही.
-----------------------------------------
अति अवांतर: या आठवड्यात 'ब्रिज ऑफ स्पाईज' प्रदर्शित झाला आहे. वेळ मिळाला कि थोडेसे लिहीनच. पण चित्रपट नक्की पाहावा असा आहे.
20 Oct 2015 - 5:37 pm | द-बाहुबली
ब्रिज ऑफ स्पाईज बघितला, नक्किच छान आहे पण एकदम उत्तम, खतरा वगैरे नाही... का ते दिवसच आता गेले जेंव्हा स्पिलबर्गचे चित्रपट असोत की ए.आर. रेहमानचे म्युजीक .. सारं काही जादुइ अन स्वप्नवत वाटायचं ?
20 Oct 2015 - 6:41 pm | स्रुजा
ब्रिज ऑफ स्पाईस खतरा नाही? :( बघायचा आहे अजुन, टॉम हँक्स साठी नॉन खतरा सिनेमा चालवुन घ्यावा असं वाटतंय.
सव्यसाची , तुमचा फीडबॅक उत्तम, ३ डी चा हट्ट न धरता सिनेमा बघेन आता.
बघायचा होताच आता उत्सुकता अजुन वाढली आहे या परिचयामुळे.
20 Oct 2015 - 6:06 pm | किसन शिंदे
चित्रपटाची ओळख आवडली.
काही गोष्टी आज पुन्हा एकदा अधोरेखीत झालेल्या दिसल्या. :)
20 Oct 2015 - 7:01 pm | आतिवास
ओळख आवडली.
20 Oct 2015 - 8:26 pm | जेपी
चित्रपट ओळख आवडली.
कास्ट अवे आवडला होता.
हा पण पाहण्यात येईल.
20 Oct 2015 - 11:28 pm | रातराणी
परीक्षण आवडले.
22 Oct 2015 - 6:39 pm | अभिनव
तोडलंस मित्रा च्या विरुद्ध!
चित्रपट खूपच छान आहे. ३डी मधेच खरी गंमत आहे बघण्यात. आतापर्यंते जे काही मोजके ३डी चित्रपट पाहिले ते सगळॅ वैज्ञानिक कल्पना किंवा काल्पनीक होते. त्यामुळे ३डी चा खरा अनुभव आणि थरार याच चित्रपटात घेता आला.
[स्पॉयलर]
एक शंका - जेव्हा तो दुस-या ईमारतीवरुन बाण येण्याची वाट बघत असतो, डोके खाली घेऊन ५ सेकंद, त्यानंतर असे दाखवले की त्याला बाण सापडतच नाही. मग लगेच सगळ्या तारा जोडलेल्याच दाखवल्या. मधे काय झाले?
ही संपादनातली काही त्रुटी आहे की आमच्या चित्रपटगॄहाने चित्रपट पुढे पळवला?
३. मला चित्रपट थोडासा लांबला आहे असे वाटले. न्यूयॉर्क मध्ये आल्यावर चित्रपट वेग घेतो. पण त्याआधी तो बराच संथ वाटला. +१
ती शेवटची ३० मिन्ट म्हणजे आख्ख्या थेटरला हार्टअटैक यायचा बाकी होता....खतरनाक खल्लास पिक्चर..!!! +१
२-३ ठिकाणी एखादी वस्तु पडण्याची दृश्य आहेत. त्यावेळेला खरोखरच ती वस्तु अंगावर पडल्याचा फिल्य प्रत्येकवेळेला येतो ३डी मुळे. त्य्या प्रत्येकवेळी दचकायला झाले.
नक्की पहावाच (३डी मधे) असा चित्रपट!