उडाली हो!

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
18 Oct 2015 - 10:46 am

हार्ड डिस्क उडाली असे ऐकले की घाबरायला होते!

आपल्याला हार्ड डिस्क फेल होणे हा मोठा धक्का असतो.
यात बहुदा आपले फोटो आणि व्हिडियो जातात, जाऊ शकतात म्हणून जास्त मानसिक त्रास असतो. शिवाय काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे असतील तर ते पण जातात.
यामुळे अर्थातच या तबकडीशी आपली भावनीक जवळीक असते! स्मित
त्यात रिसर्च पेपर आणि त्याचा डाटा बॅकअप वगैरे असतील तर अक्षरश: हार्टफेलच व्हायचे बाकी असते.

सर्व प्रथम - मी काही यातला एक्स्पर्ट वगैरे नाही!
अनुभवाने जे काही लक्षात आले ते लिहितो आहे.
पहिले सत्य असे आहे की. कोणतीही डिस्क घ्या - ती एक दिवस फेल होणारच आहे.

डेटा रिकव्हरी महाग असू शकते. म्हणून दुकानात जाण्यापुर्वी काही गोष्टी घरी करून पाहण्यासारख्या आहेत.

डिस्क फेल होण्यात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
१. हार्डवेयर फेल्युअर
२. सॉफ्टवेयर फेल्युअर

या लेखात आपण प्रामुख्याने हार्डवेयर फेल्युअर वरचे सोपे घरगुती उपाय काय आहेत हे पाहू.
हार्डवेयर फेल्युअर मध्ये बहुतेक वेळेला डेटा मिळणे हा चमत्कार असतो.
पण सॉफ्टवेयर फेल्युअर मध्ये मात्र बरेच वेळा डेटा रिकव्हरी होऊ शकते.

काय असते ही हार्ड डिस्क?
या डिस्कच्या चौकोनी खोक्यात एक गोल चकती असते. या चकतीवर एक पातळ रासायनिक थर असतो. यावर लेखनिक हेडच्या माध्यमातून माहिती (डेटा) लिहिली जाते. हे लेखनिक हेडस व्हॉईस कॉइलच्या मदतीने हलवले जातात.
लेखनिक हेडस डिस्कवर तरंगते असतात. टेकत नाहीत! पण काही कारणाने जसे डिस्क आदळणे वगैरे झाले तर यांची ठेवण बिघडते. एकदा हे बिघडले आणि ते चकतीला टेकलेले असताना डिस्क चालू केली तर चकतीवरचा पातळ थर खरवडला जातो.
हे १००% हार्डवेयर फेल्युअर! तुमचा डेटा उडतो - म्हणजे अक्षरश: धूळ होउन उडून जातो.
हे प्रकार सहसा होत नाहीत. पण होतात हे ही खरे.
याशिवाय डिस्कचा बोर्ड बिघडणे, मोटर नादुरुस्त होणे वगैरे प्रकार यात मोडतात.

बोर्ड बिघडला तर डिस्क सारखीच दुसरी डिस्क शोधायची आणि त्याचा बोर्ड बसवून पाहायचा. हे काम तूलनेने सोपे असते. चार स्क्रू काढायचे आणि बोर्ड बदलायचा चार स्क्रू लावायचे. पण हे बोर्ड एकसारखे नसतात!
आपल्या डिस्कवर जो निर्मिती दिनांक असेल त्याच्या अगदी जवळ जाणारी डिस्क मिळाली तर हे जमू शकते. कारण डिस्क बनवणारे कायम सुधारणा करत राहतात. आणि त्यामुळे त्यातले कंट्रोलर्स बदलते असतात. प्रणाली बदलती असते. त्यांचे कार्यही बदलते असते.
मोटर बिघडली असेल तर डेटा विसरलेला चांगला कारण चकती आणि हेडस यांची ठेवण परत जुळवणे जवळपास अशक्य असते. कारण लेखनिक हेडसना त्यांचे सिलिंडर्स सापडले तरच ते डिस्कवरची माहिती वाचू शकतात.
असो.

पहिल्यांदा डिस्क फेल होते आहे असे लक्षात आले की त्याक्षणी आपला बॅकअप घ्या!
हे कसे लक्षात येते तर, डिस्क उशीरा रिप्लाय देते आहे, खुप वेळ लागतो आहे, वगैरे प्रकार सुरू होतात. म्हणजे कदाचित चकतीवर न वाचता येण्याजोगे भाग तयार होत आहेत. हे बॅड सेक्टर्स आहेत. डिस्क वाचायचा प्रयत्न करते आहे पण योग्य तो भाग सापडत नाही म्हणून अजून प्रयत्न करते आहे. म्हणून वेळ लागतो आहे.
हे डिस्क फेल होण्यात आहे, याचे हे पहिले लक्षण आहे.

डिस्क अगदीच गेली म्हणजे संगणकाला सापडेनाशी तर तेव्हा आपण विविध प्रकारे जोडायचा प्रयत्न करतो.
एक्सटर्नल असेल तर वायर बदल वगैरे प्रकार करून पाहतो.

हे करा, पण करण्याआधी,
- आपल्याकडे पुरेसा वेळ आहे
- आपण नक्की काय बॅकअप घेणार आहोत याची यादी स्पष्ट आहे
- बॅकअप घ्यायला दुसरी डिस्क हाताशी आहे
- नवीन डिस्क मध्ये पुरेशी जागा आहे
या गोष्टी नक्की करून घ्या.

मगच डिस्कवर प्रयोग करा. कारण डिस्क जर संगणकाला जोडली गेली तर कदाचित ही शेवटची वेळ असू शकते फेल डिस्क चालण्याची!
संधी मिळाली तर घेण्याची पुर्ण तयारी ठेवा.

डिस्क जोडली आणि नाही चालली तर,
- उभी ठेउन पाहा
- तिरपी ठेऊन पाहा
- उलटी ठेउन पाहा
कधी कधी या गोष्टींनी चालून जाते. आपला डेटा मिळून जातो.

तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. डिस्क अगदी गार वातावरणात चालवून पाहा काही प्रसंगी डिस्क चालतातही. तुम्ही उष्ण वातावरणात राहात असाल तर हे नक्की करून पाहा. पण यासाठी डिस्क फ्रिजमध्ये वगैरे ठेऊ नका. कारण त्यात बाष्प गेले तर आहे ते ही हातचे जाईल. पण एसीच्या अगदी ब्लोअर जवळ आणून जास्तीत जास्त गार करा आणि मग जोडा.
कधी कधी चालून जाते. आपला डेटा मिळू शकतो.

अजूनही डिस्कचा डेटा नाही मिळाला तर वरचे सर्व प्रकार
निरनिराळ्या ऑपरेटींग सिस्टिम्सवर डिस्क जोडून करा.
म्हणजे लिनक्स, मॅक, विंडोज वगैरे. कधी कधी डिस्क जोडली जाते. लगोलग डेटा घेउन टाका.

नाही झाले तर डिस्क संगणकाला जोडून ठेवा २४ तास वाट पाहा
कधी कधी आपोआप जोडली जाते. पण गार वातावरणात असेल असे पाहा! नाहीतर तापून उडायची...

सगळ्यात महत्वाचे बॅकअप बॅकअप बॅकअप!
नियमित बॅकअप घ्या.
डिस्क घेताना सुमारे सहा माहिन्याच्या अंतराने दोन घ्या.
म्हणजे बॅकअप डिस्कचाही बॅकअप घेत राहता येईल.
सहा महिन्याचा फरक म्हणजे त्यातल्या त्यात एकाच वेळी दोन्ही फेल होण्याची शक्यता कमी करणे.

याशिवाय माझ्या काही ओळखीतील लोकांनी डेटादेवाची आरती, डिस्कदेवीची आरती, चकती स्तोत्र पारायण, संगणक महती साप्ताह, संगणकचालन जप, डिस्क देवाला घेऊन जाणे, अखंड मदिरा अभिषेक (स्वतःला) वगैरे प्रकारचे उपाय केले आहेत.
तुम्हीही करू शकता, पण हे कितपत यशस्वी झाले याची कल्पना नाही. स्मित

सॉफ्टवेयर फेल्युअर वर परत कधी तरी...

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

18 Oct 2015 - 12:05 pm | एक एकटा एकटाच

एक उत्तम माहिती
अतिशय रोचक पध्दतीने सांगितलीय

लेख आवडला

बाबा योगिराज's picture

18 Oct 2015 - 12:23 pm | बाबा योगिराज

लेख आवड्यास...

एस's picture

18 Oct 2015 - 2:37 pm | एस

हीहीही! छायाचित्रणाच्या क्षेत्रात विशेषतः प्रो फोग्रांना ही डेटाकार्ड वा चकत्या खराब होण्याची भीती चांगलीच सतावीत असते. त्यामुळे हे उपाय आणि शेवटी दिलेले स्तोत्र-पारायणं-अभिषेक आदी उपाय करत राहणे हा प्रोफोग्रांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतो! :-)

गामा पैलवान's picture

18 Oct 2015 - 3:30 pm | गामा पैलवान

निनाद,

तुमची राशीचक्राची कहाणी आवडली. डेटा = राशी आणि डिस्क = चक्र

आता याचे गल्लोगल्ली (जालावरच्या) प्रयोग होऊ द्यात! ;-)

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2015 - 4:07 pm | टवाळ कार्टा

सहीच

नेत्रेश's picture

18 Oct 2015 - 7:52 pm | नेत्रेश

डिस्क फेल व्हायचा धोका नाही

कोमल's picture

18 Oct 2015 - 7:55 pm | कोमल

मस्तच. आवडलं.

पैसा's picture

20 Oct 2015 - 10:31 am | पैसा

मस्तच लिहिलंस! निनादची अजून एक कूट कविता असेल म्हणून धागा उघडला, आणि वेगळाच धक्का बसला!

निनाद's picture

20 Oct 2015 - 10:45 am | निनाद

कूट कविता...
येईल येईल कविता पण कुटली जाईल :)

निनाद's picture

20 Oct 2015 - 11:12 am | निनाद

ताई तुम्ही आठवण केल्या प्रमाणे कविता कुटली आहे.
गोड मानून घ्या!

पैसा's picture

20 Oct 2015 - 11:39 am | पैसा

:) काथ्या कुटतात हे माहीत आहे. आता कविता पण! =))

निनाद's picture

20 Oct 2015 - 11:42 am | निनाद

कूट असल्याने कुटली.
अन्यथा पाडली जाते.. ;)

पैसा's picture

20 Oct 2015 - 11:54 am | पैसा

=)) ते बुवांना माहीत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2015 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे

नियमित बॅकअप घ्या.
+१०००

महत्वाचा डेटा, फोटो, गाणी, इ नष्ट झाल्यास काय होते हेवेसांनल !

त्यांची साठवण करण्यासाठी खालील पद्धती उपलब्ध आहेत :

१. खाजगी फ्लॅश हार्ड डिस्क्सवर बॅकअप/कॉपी ठेवणे : मी अश्या दोन हार्ड डिस्क्स बाळगून आहे. हल्ली १ टेरॅबाईटची फ्लॅश हार्ड डिस्क्स ४,००० अथवा कमी किंमतीत मिळते व आकाराने शर्टाच्या खिश्यात नेण्याइतकी लहान असते. हा खर्च त्यावर साठवलेल्या माहिती किंमतीच्या व ती माहिती नष्ट झाल्यास होणार्‍या नुकसान/मनस्ताप/श्रमाच्या मानाने नगण्य ठरतो.

२. गुगल ड्राईव्ह व मायक्रोसॉफ्टचा वन ड्राईव्ह : हे पर्याय तुम्हाला आपल्या फाईल्स त्यांच्या सर्व्हरवर (क्लाऊडमध्ये) साठवू देतात. या कंपन्यांचे सर्व्हर विकसित तंत्रज्ञान असलेले असतात, फाईल नष्ट होऊ नये यासाठी त्यांच्या प्रणालीत प्रत्येक फाईलच्या एकापेक्षा जास्त कॉपीज अनेक ठिकाणी साठवून ठेवलेल्या असतात. त्यामुळे पूर्ण फाईल्स नाहिशी होणे जवळ जवळ अशक्य असते. गुगल १५ जीबी पर्यंतचा डेटा चकटफू साठवतो !

या पर्यायांचे अजून महत्वाचे काही फायदे असे:
अ) या फाईल्स इंटरनेटवरून जगात कोठेही असलो तरी साठवणे, उघडणे, एडिट करणे, डिलीट करणे, दुसर्‍यांबरोबर शेअर करणे शक्य असते. या फाईल्स आहेत तेथूनच इमेल, व्हॉट्सॅप, इ च्या अ‍ॅटॅचमेट्स म्हणून पुढे पाठवता येतात.
आ) क्लाऊड साठवणीत शेअर केलेल्या फाईल्स ज्यांच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यापैकी कोणीही आहेत तेथून उघडून, एडिट करून, परत तेथेच साठवू शकतो... म्हणजे एकाच फाईलवर बर्‍याच जणांना एकत्र काम करणे शक्य होते (कोऑपरेटिव्ह / टीम वर्क). व्यवसाय / खाजगी सल्लामसलतीत हे फार सोईचे व फायदेशीर होऊ शकते.

३. गुगल फोटो, पिकासा, फ्लिकर, इ फोटो साठवण व शेअर संस्थळे : ही संस्थळे फोटो साठवणीसाठी ते दुसर्‍यांबरोबर शेअर करायला उपयोगी आहेत हे बर्‍याच जणांना माहिती आहेच.

प्रत्येकाच्या आवड व गरजेप्रमाणे वरच्यापैकी एक किंवा अनेक पर्याय वापरता येतील. मी सगळेच वापरतो !