आंब्याचे गोड तिखट लोणचे

भिंगरी's picture
भिंगरी in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:35 pm

साहित्य ----

राजापुरी कैरी २ किलो
गूळ १ किलो
लोणचे मसाला १०० ग्राम
मिरची पावडर १ टेबल स्पून
कढीपत्ता १ वाटी
मीठ पाव वाटी (आवडीप्रमाणे कमी जास्त)
लवंग १०
मिरे १५
धने २ टी स्पून
सुक्या मिरच्या १०
तेल ३०० ग्राम
पाणी २०० मिली

कृती -----

राजापुरी कैऱ्या आणून धुवून सोलून घ्याव्या. नंतर त्यांच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करून घ्याव्या.(बाठी सकट)
फोडी उन्हात एक दिवस वाळवून घ्या.

दुसऱ्या दिवशी एका पातेल्यात (फोडी बुडतील इतके ) पाणी उकळावे आणि त्यात वाळलेल्या फोडी टाकून ५ मिनिटे उकळू द्यावे ५ मिनिटानंतर फोडी काढून निथळायला ठेवाव्या.

कढीपत्ता धुवून निथळून घ्यावा.
सुक्या मिरच्यांचे २/२ तुकडे करून त्यातील बिया वेगळ्या कराव्या.

गूळ बारीक चिरून घ्यावा.
आता एका पातेल्यात ३०० ग्राम तेल टाकून तापवावे.

चांगले तापल्यावर त्यात लवंग मिरे टाकावे.
तडतडल्यावर कढीपत्ता,धणे सुक्या मिरच्या,हिंग टाकावे. मिरचीच्या बियाही टाकाव्यात.

आता त्यात बारीक चिरलेला गूळ टाकून ढवळत रहावे.

गूळ फसफसू लागला की त्यात मिरची पावडर व लोणचे मसाला व मीठ घालून चांगला परतावा. तेल सुटू लागताच त्यात २०० मिली.पाणी घालून उकळावे. उकळ येताच त्यात कैरीच्या फोडी घालाव्या व घातलेले पाणी आटेपर्यंत उकळावे. मधून मधून ढवळत रहावे. (नाहीतर बुडाला जळण्याची शक्यता असते.)

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

16 Oct 2015 - 12:48 pm | त्रिवेणी

पाणी टाकून लोणचे पहिल्यांदाच वाचले.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 2:16 pm | प्रीत-मोहर

Mihi. Ata yetya mosamat Karin

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 3:56 am | सानिकास्वप्निल

लोणच्याची पाकक्रुती आवडली भिंगरीताई :)

अनन्न्या's picture

17 Oct 2015 - 11:06 am | अनन्न्या

पण यात कढिपत्ता, लवंग, मिरी, धने हे सर्व घालून नव्हते पाहिले कधी. फोटो हवा होता ताई.

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 11:42 am | इशा१२३

छान वेगळे लोणचे आहे.करुन बघेन.

पैसा's picture

17 Oct 2015 - 8:39 pm | पैसा

वेगळीच कृति!

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:52 am | मधुरा देशपांडे

वेगळाच प्रकार. मुख्य म्हणजे मला इथे घरच्या साहित्यात करण्याजोगा आहे. धन्यवाद ताई.

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 7:08 pm | प्यारे१

फोटो टाकला नाही हे बरे केले नाहीतर 'बुडाला जळण्याची शक्यता' होती. ;)

स्वाती दिनेश's picture

20 Oct 2015 - 12:04 am | स्वाती दिनेश

आंब्याचे हे आंबट गोड तिखट लोणचे आवडीचे आहे,
स्वाती

कृतीबद्दल धन्यवाद भिंगरीताई. यावर्षी सिझन संपता संपता का होईना कैरीचे लोणचे केले आहे. पहिल्यांदाच केले आहे. ते जम्ल्यामुळे हेही जमेल असे वाटते.

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2015 - 1:07 pm | पिलीयन रायडर

करुन बघेन मी.. पण नक्की जमेल का ते ठाउक नाही..
पण पाकॄ सोप्पि वाटतेय.. :)

छान आहे गं पाकृ. पण इथे कैर्‍या मिळत नाही. त्यामुळे माझा पास. :(

पद्मावति's picture

26 Oct 2015 - 7:12 pm | पद्मावति

खूप छान सोपी आणि मस्तं पाककृती. आवडली.

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:26 pm | कविता१९७८

वाह मस्त पाककृती

एकदम वेगळाच प्रकार..करुन पाहीन..