तलवार
२००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना तलवार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”.
सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते. जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल? इत्यादी थिअरिजला स्पर्श करत सरते शेवटी CBI या तपाससंस्थेतील अंतर्गत राजकारणात/लाथाळ्यात तिच्या आई-वडिलांना झालेली शिक्षा हि निर्दोष असूनही झाली होती/आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतपत डिटेल समीक्षण करते. त्यासाठी लेखक विशाल भारद्वाजचे आणि दिग्दर्शक मेघना गुलजारचे खरोखर कौतुक.
या कहाणीच्या आत थोडक्यात शिरताना भारतीय नोकरशाहीत अंतर्गत राजकारण किती खोलवर रुजलेले आहे कि ते असल्या मोठमोठ्या प्रकरणांच्या कोर्टाच्या निकालावर तपासाद्वारे प्रभाव टाकू शकते हे दिसून येते. लेखक विशाल भारद्वाजने भारतीय नोकरशाहीवर कोणतीही टिकाटिप्पणी करण्याचे टाळून माझायामते कहाणीला भरकटण्यापासून वाचवलेले आहे. आरुषीच्या निकालावर कोणतीही थेट टिप्पणी न करता खाणी पूर्णपणे त्या तपासाभोवती फिरते आणि शेवटी फक्त निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रेक्षकांना ठरवण्यास बाध्य करते. भारतीय नोकरशाहीत राजकारण आहे पण ते असे दृष्टीकोनात्मक पद्धतीने सीबीआय सारख्या तपास संस्थेत प्रभाव टाकत असेल हे खरोखर धक्कादायक आहे.
इरफान खान हा पोलिस अधिकारी अश्विन कुमार आणि नीरज काबी हा रमेश टंडन पक्षी आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांच्या भूमिकेत आहेत. कोंकणा सेन-शर्मा हि आरुषी उर्फ श्रुती टंडन (सिनेमात) हिच्या आईच्या भूमिकेत आहे. इरफान खान आणि नीरज काबी हे उत्कृष्टरित्या आपापल्या भूमिकांना वठवतात कारण सिनेमा पूर्णवेळ या दोघांभोवतीच फिरतो.
मेघना गुलजारचे कौतुक करावेच लागेल कारण ती विशाल भारद्वाज सोबत सहपटकथा लेखिकाही आहे आणि कहाणी कुठेही संथ बनून प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी तिने लेखक सोबतीने घेतलेली पदोपदी जाणवते. आरुषीच्या मृत्यूसंदर्भात दुसरी थियरी मांडताना म्हणजे ज्यामुळे डॉ राजेश तलवारला शिक्षा झाली ते विषद करताना कहाणी वरील पकड सुटण्याची पूर्ण संधी होती. पण त्या मुळ कारणाला विषद करणारी जी मिटिंग असते त्यात विनोद पेरणी करून त्या विनोदाखाली ते कारण तिने व्यवस्थित हाताळल आहे.
आरुषी प्रकरण मीडियानेच मोठे केले होते २००८ साली आणि ऑनर किलिंगचा मुलामा देऊन वाढवले होते पण चित्रपटात विषद केलेली दुसरी थियरी देखील शक्य होती आणि कदाचित खरीही असू शकते. आरुषीची कहाणी चित्रपट रुपात प्रेक्षकांसमोर आली म्हणजे भविष्यात सध्या गाजणारे शिना बोरा प्रकरण हि भविष्यात येइलच याची खात्री वाटते.
मी चित्रपटाला विशाल भारद्वाजची कथा/पटकथा आणि मेघना गुलजार चे दिग्दर्शन यांच्या उत्कृष्टतेसाठी मुख्यत्वे तीन ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
4 Oct 2015 - 10:12 pm | बोका-ए-आझम
आँ? चित्रपट दोघांभोवती फिरतो म्हणून ते उत्कृष्ट कलाकार? हे जरा इस्कटून सांगा राव.
4 Oct 2015 - 10:25 pm | समीर_happy go lucky
इरफान आहे पोलिस अधिकारी जो या प्रकरणाचा सखोल तपास करतो आणि सोबतच राजकारणाचा बळी ठरतो त्याचे हे रूपं प्रेक्षकांना पटतात. आणि नीरज काबी हा डॉ राजेश तलवार म्हणजेच सिनेमात डॉ रमेश टंडन हा तिचे वडील, ज्याने गुन्हा केलेला नाही पण शिक्षा मिळते आणि लेखक-दिग्दर्शकाला कोणतीही स्पष्ट टिप्पणी न करता सगळ प्रेक्षकांच्या ठरवण्यावर सोडायचं आहे. असल्या विचित्र केसमध्ये आपल्या अभिनयाने कोणाचाही/कोणताही पूर्वग्रह बनू नये हि लेखक दिग्दर्शकाची अपेक्षा पडद्यावर उभी करणे हे कठीण होते कारण पूर्ण कथा त्या दोघांनी एकत्र/वेगवेगळ्या प्रसंगात घेतलेल्या सहभागाभोवती फिरते. आणि म्हणुनच इरफान कसलेला कलाकार आहे पण नीरज काबी हा लेखक/दिग्दर्शकाने घडवला माझ्या मते.
4 Oct 2015 - 10:26 pm | समीर_happy go lucky
^^^^^^^^^^^^^^कोणाचाही/कोणताही असे वाचावे
4 Oct 2015 - 10:32 pm | बोका-ए-आझम
पण मग दिग्दर्शिकेने त्यांची निवड त्यांचं अभिनयकौशल्य पाहूनच केली असणार ना. शिवाय नीरज कबी हा रंगमंचावरचा कसलेला कलाकार आहे. डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी मधली
त्याची भूमिका तर अफलातून आहे. त्यामुळे तो लेखक/दिग्दर्शक अने घडवला हे पटत नाही. तसा घडवलेला म्हणजे घायल आणि दामिनी मधला सनी देओल, ज्याला राजकुमार संतोषीने घडवला, कारण सनीचा अभिनय बेतास बात आहे पण संतोषीने त्याच्या उणिवा ओळखून त्याला अशा काही पद्धतीने पेश केलं की तो राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेला.
4 Oct 2015 - 10:41 pm | एस
सुरुवातीच्या 'मेघना तलवार घेऊन आल्या आहेत' मध्ये तलवारऐवजी गुलजार पाहिजे. बाकी परीक्षण अजून विस्तृत हवे होते.
4 Oct 2015 - 10:45 pm | समीर_happy go lucky
१. निवड क्षमतेवर असणार आणि ज्येष्ठ देओल पुत्राबद्दलचे मत पटले
२. kabi हे कबी आहे काबी नाही आत्ताच कळलं
३. व्योमकेश बक्षी लहानपणी बघितलं होत सिरियल आता फक्त रजत कपूर आठवतो त्यातला बस ..
4 Oct 2015 - 11:21 pm | बोका-ए-आझम
डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी हा चित्रपट आहे दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेला. त्यात नीरज कबीचा अभिनय बघा.
4 Oct 2015 - 11:25 pm | बोका-ए-आझम
अजून एक
4 Oct 2015 - 10:46 pm | समीर_happy go lucky
हम्म ते चुकून झाल आणि आता एडिट चा ऑप्शन सापडत नाही आहे आणि विस्तृत म्हणजे कसं??
4 Oct 2015 - 11:47 pm | अभ्या..
समीरभौ, नमस्कार.
कदाचित तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा राग पण येत असेल, मला वाटते ते बोलतो. राग मानू नकात.
हम्म ते चुकून झाले असे म्हणून विस्तृत म्हणजे कसे अशा शंका विचारलात म्हणून बोलतो.
फेस्बुकावर, ऑर्कुटावर अशा फिल्म स्टोर्या लिहिल्यात तरी त्याचे कौतुक करणारे खूप भेटतील. कारण ते तुमचे मित्र असतात. तुम्हाला वैयक्तिक भेटलेले, ओळखणारे असतात. इथे तुमचे लेखन, तुमचा अभ्यास हीच तुमची ओळख.
ते लेखन किती दर्जेदार यावर तुम्हाला प्रतिसाद मिळणार.
चित्रपट परिक्षण म्हणजे पिक्चर पाहून त्याची स्टोरी इथे टायपायची अन जरा क्रेडेन्शिअल्स मधली नावे द्यायची एवढेच नव्हे. त्यासाठी भरपूर अभ्यास लागतो. स्वतःचा असा एक दृष्टीकोन लागतो. महत्वाचे म्हणजे वेड्यासाऱखे चित्रपट पचवायची ताकद लागते. भाषिक सामर्थ्य अन मांडण्याची पध्धत हे नंतरचे.
आपल्या मराठीत पण चित्रपट परिक्षणाची मोठी परंपरा आहे. राज ठाकरेंचे वडिल श्रीकांत ठाकरे हे सुध्दा खूप वर्षे नेमाने चित्रपट परिक्षण लिहायचे. शिरिष कणेकर, अभिजीत देसाई अशांनी पण ही परंपरा चालवलीय. चित्रपटाचे कथा, पटकथा, संगीत, गायन, अभिनय, दिग्दर्शन, तंत्र, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, पब्लिसिटी अशी अनेक अंगे असतात. त्यातील अभ्यास दिसावयास हवा. चांगले चांगले सिनेपरिक्षण करणारे पण अॅक्चुअल दिग्दर्शनात फेल गेल्याची खालीद मोहम्मद सारखी उदाहरणे आहेत.
अभ्यासपूर्ण परिक्षण काय असते ते नुसते अनुभवायचे तरी खूप आधी रानडेबुवा सवाईचे रिपोर्टिंग सकाळमध्ये द्यायचे ते वाचा. त्यांचे संगीतमहफिलींचे लेख वाचा. अभ्यास दिसतोच हो.
आता काय बॉलीवूड अन मराठीवाल्यांनी अगदी पेड पीआरओ ठेवलेत. रिलीजच्या आधी व्यवस्थित हवा करुन परि़क्षणाचे पण रेडि फॉर्मॅट तयार असतात. त्या साच्यात परिक्षण देऊ नकात.
एखाद्याच चित्रपटाचे परि़क्षण करा पण असे करा की आम्हाला ते तसे पाहायला आवडेल.
बाकी आपली मर्जी.
धन्यवाद.
5 Oct 2015 - 12:13 am | समीर_happy go lucky
प्रयत्न करतोय, चुकांतून शिकतोय, तुम्हाला एक विनंती, प्रतिसाद देताना जरा डिटेल द्या उदाहरणार्थ माझी एक कविता तुम्हाला फालतू वाटली. मान्य पण कशी?? वाटेल ते मत जर तुम्ही देता पण त्याला जर समोरच्यानी काहीही महत्व दिले नाही तर ते "बरळणे" बनते,नुकतेच तुमचे संपादक म्हणून प्रमोशन झाल्याचे कुठेतरी धाग्यावर वाचले, तर संपादकाची जबाबदारी फक्त मोठ मोठे परिच्छेद लिहून धारेवर धरणे इतकीच फक्त नसते तर माझ्या मागच्या काही दिवसातल्या इथल्या मी संपर्क साधलेल्या संपादकांनी मला दिलेल्या प्रतिसादांवरून सांगतो, हि खूप वेगळी जबाबदारी आहे. फक्त एखाद्याला "लायकी दाखवणे" इतकी मर्यादित जबाबदारी नसते तर असलेल्या लायकीतून वर/बाहेर यायला मदत करणे अशी विस्तृत आहे हे मी अनुभवल, असो परीक्षणाबद्दल तुमचे मत समजले आणि मी माझे पूर्णत: वैयक्तिक अन अननुभवी मत सांगितले, बाकी तुमची मर्जी
धन्यवाद.
5 Oct 2015 - 12:24 am | अभ्या..
विस्तृत म्हणताय का तुम्ही? मग लेख तसा लिहा.
सेम तुमच्या लेख किंवा कवितेबाबतही असेच असते.
मी संपादक/साहित्यसंपादक आधीही नव्हतो, आता पण नाहीये. शिंपल सदस्य आहे तुमच्यासारखाच. फक्त जरा एकदोन जास्त उन्हाळे पाहिलेत इथे.
त्या संपादकांचे आभार. आम्हाला अशी मदत मिळाली नाही ;)
वो तो हैच.
शुभेच्छा.
लेखनसीमा.
5 Oct 2015 - 11:59 am | बिपिन कार्यकर्ते
दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे. म्हणूनच मी जेव्हा जेव्हा मिपावर किंवा इतरत्र चित्रपटांविषयी लिहिले आहे तेव्हा त्याला कटाक्षाने ’चित्रपट ओळख’ असेच म्हणतो, परीक्षण नव्हे.
5 Oct 2015 - 12:15 am | तर्राट जोकर
आमचेच शब्द जणू. धन्यवाद ह्या प्रतिसादाबद्दल.
पण लेखकरावांना अभ्यास ह्या शब्दाचीच अॅलर्जी आहे असे दिसते. तसेच टीका सोसायची तयारी दिसत नाही हेही दिसते.
झटपट ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात आपण खुप अपेक्षा करतो का असंही वाटतं कधी कधी. पण एक आनंद आहे की ट्वेंटी-ट्वेंटी वाले जास्त टिकत नाहीत. हिमेस गेला, हनीही जाईल. जीवंतपणी हे लोक मरतील. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी मरुनही अमर राहतात. हे जो लक्षात घेइल त्याचेच नाव होईल.
5 Oct 2015 - 12:20 am | समीर_happy go lucky
समजलं नाही कि लेखक राव कोण ते !!!!
5 Oct 2015 - 12:26 am | समीर_happy go lucky
समजलं भाऊ
5 Oct 2015 - 12:31 am | प्यारे१
एवढ्या पटकन???
मघाशी तुम्च्या ब्लॉगच्या लिन्क वरुन ब्लॉग पाहिला. नंतर धागा उडाला होता. परिक्षणांचे केलेले प्रयत्न अत्यंत बाळबोध वाटलेले आहेत.
तुम्ही अजून प्रयत्न करावेत. सिनेमे पहा आणि आत झिरपवा आधी. शुभेच्छा!
5 Oct 2015 - 12:35 am | समीर_happy go lucky
असेलही कदाचित
20 Oct 2015 - 10:15 am | मीउमेश
मी तुमच्या विचाराशी सहमत आहे
5 Oct 2015 - 11:42 am | मृत्युन्जय
समीरसूर, परिकथेचा राजकुमार, फारएण्ड, रमताराम, पिंपातला उंदीर आणि इतरही काही लोकांनी काही फार सुंदर चित्रपट परीक्षणे लिहिली आहेत. जमल्यास त्यांची चित्रपट परीक्षणे जरुर वाचा म्हणजे काय सुधारणा कराव्यात ते ही कळेल.
तुमचे लेखन फारच सरधोपट वाटत असल्याने कदाचित पकड घेउ शकत नाही. चित्रपट परीक्षण करताना त्यात थोडी स्वतःची टीकाटिप्पणी देखील असावी (तुमच्या परीक्षणातही आहे पण प्रमाणे थोडे कमी पडते आहे).
बाकी तुमच्या परीक्षणात तुम्ही चित्रपट परीक्षणाच्या एका नियमाचे फार काटेकोरपणे पालन करत आहात हे दिसुन येते. तो नियम हा की चित्रपट परीक्षणात कथेचे सगळे डिटेल्स येउ नयेत. हे तुमच्या परीक्षणाचे बलस्थानही म्हणता येइल आणि सामान्य वाचकांना हीच परीक्षणातली कमतरता देखील वाटु शकते. जमल्यास कथेसंदर्भात अजुन डिटेल्स द्यावेत (मी हे केवळ या परीक्षणाबद्दल बोलत नाही आहे तर एकुण तुमच्या परीक्षणाच्या स्टाइल बद्दल बोलतो आहे). चित्रपटात काही खास आवडलेली वाक्ये किंवा प्रसंग यांचे थोडे अजुन विस्तृत वर्णन आल्यास ही कमतरता थोड्या प्रमाणात भरुन काढता येइल.
4 Oct 2015 - 10:53 pm | सतिश गावडे
समीर सूर आणि पाठक एकच आहेत का? नसावेत असं वाटतंय. ;)
4 Oct 2015 - 10:54 pm | एकजटा अघोरी
;)
4 Oct 2015 - 10:59 pm | समीर_happy go lucky
नाहि
4 Oct 2015 - 11:42 pm | आदूबाळ
डॉ जेकिल आणि मिस्टर हाईड आहेत.
5 Oct 2015 - 12:29 am | प्यारे१
समीरसूर चा एवढा अपमान कुणी नसेल केला ब्वा!
बाकी नीरज कबी चा फॅन झालोय ब्वा आपण ब्योमकेस बक्शी बघून.
इर्र्फान खान जरा स्टायलिश साधेपणा करत असतो त्यामुळं कधीकधी डोक्यात जातो. म्हणजे मी किति नैसर्गिक अभिनय करतो बघा असं. पण तरी आवडतोच.
5 Oct 2015 - 10:22 am | सतिश गावडे
तसा उद्देश नव्हता.
5 Oct 2015 - 2:33 pm | नीलमोहर
नीरज काबीचा त्यातला अभिनय जबरदस्त... !!
त्याने ती भूमिका अक्षरशः वठवली आहे. चित्रपटात शेवटी तो अंगूरी देवीला वाईटरित्या मारतो, सगळे रहस्य उलगडते तेव्हा सीनमध्ये असलेल्या इतरांसारखाच मलाही जबरदस्त शॉक लागला होता.
पूर्ण चित्रपट बर्यापैकी जमला होता पण तो शेवट..
फार भयानक शेवट होता चित्रपटाचा, अति व्हायोलेंट आणि विकृत.
डोकं गरगरायला लागलं होतं ते बघून..
5 Oct 2015 - 12:09 pm | बबन ताम्बे
सर्व अॅक्टर्सचा अभिनय लाजवाब आहे.
तब्बूला विशेष काही काम नाही. त्यामुळे तिची निवड कशासाठी केली ते कळत नाही.
चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. शेवटी मोठे प्रश्नचिन्ह सोडून चित्रपट संपतो.
5 Oct 2015 - 1:32 pm | कपिलमुनी
परीक्षण आणी प्रथितयश लेखकांची उदाहरणे वाचून पुलं नी वर्णन केलेले किर्तनकार काका आठवले.
5 Oct 2015 - 1:55 pm | द-बाहुबली
या परिक्षणाला इंप्रुव व्हायची जबरदस्त संधी आहे. किमान २००% तरी नक्किच. संधिचा फायदा घ्या.
5 Oct 2015 - 3:15 pm | अद्द्या
समीर .
तुम्ही कोणत्या तरी धाग्यात ओर्कुट चा उल्लेख केलाय . .
तिथे "मुक्त पीठ " नावाच्या समूहात तर नवतात न तुम्ही ?
5 Oct 2015 - 7:42 pm | विवेकपटाईत
अधिकांश दिल्लीकरांना निठारीची आठवण येते.
नौकारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या बाबत कुठली हि खंत नाही.
सिनेमाचे प्रायोजक कोण आहे हे हि तपासण्याची आवश्यकता आहे.
6 Oct 2015 - 7:04 pm | द-बाहुबली
काय म्हणायचं आहे आपणास ? की हे ऑनर किलींग आहे ?
6 Oct 2015 - 5:31 pm | सुमीत भातखंडे
वर आलेल्या प्रतिसादांशी सहमत आहे. परिक्षण कठीण प्रकार आहे.
मुळात लेखनच कठीण आहे. मी एकदाच प्रयत्न केला होता. परत नाही गेलो त्या वाटेला.
बाकी तुम्ही लिहित रहा. इकडे बर्या-वाईट प्रतिक्रिया येत राहतील. त्यातुनच शिकायला मिळेल.
बाकी तलवार बद्दल उत्सुकता आहेच. बघुया कधी योग येतोय ते. नाहीतर शेवटी टीव्हीवर.
6 Oct 2015 - 6:27 pm | सानिकास्वप्निल
सिनेमा बघावासा वाटतोय पण किती बघवेल माहिती नाही.
11 Oct 2015 - 11:42 pm | दिवाकर कुलकर्णी
सिनेमा चांगला आहे,सत्याचा आधार किती व कल्पना विस्तार कीति कलत नाही पण दोन्हीचं
मिश्रण बेमिसाल केलं आहे,
तलवार दंपत्य बेक़सूर आहे ,असं अधिक ठसवायचा प्रयत्न आहे,
तसं असेलहि पणं एसी चा आवाज़ विमानासारखं ऐकवणं जरा अति झालंय,
इ. काही गफ़लती वाटतात,
मोलकरणीनं दरवाजा ऊघडण्याचा प्रकारहि बराच क्लीष्ट केलाय
डायल एम् फॉर मर्डर आठवण आली
एकूण सिनेमा नक्कीच बघणेफाईड् आहे, माझेहि ३ स्टार
13 Oct 2015 - 2:30 pm | कपिलमुनी
https://en.wikipedia.org/wiki/2008_Noida_double_murder_case
इथे या केसची बरीच माहिती दिली आहे.
अर्थात विकी असल्याने सत्यता माहीत नाही. पण केसमधील क्लिष्टता समजून येते.
पूर्ण पान वाचला की डोका भंजाळता
13 Oct 2015 - 6:10 pm | द-बाहुबली
विकीवर दिलेला फ्लॅटचा नकाशा चित्रपटात दाखवलेल्या घटस्थळाशी मेळ खात नाही.
20 Oct 2015 - 9:32 am | चिरोटा
चित्रपट नुकताच पाहिला. आई-वडिल निर्दोष असावेत असे अनेकांना वाटते.नार्को चाचणीत नोकरांनी खून केल्याचे थोडे फार कबूल केले आहे.पण सी.बी.आय.ने अहवाल सादर करताना ह्याचा उल्लेख केला नाही.सी.बी.आय.च्या पहिल्या टीम नुसार आई-वडिलांनी मारल्याचा प्रथम दर्शनी पुरावा नाही. पण दुसर्या टीमने मात्र आई-वडिलांनीच हत्या केल्याचे म्हंटले आहे. मात्र ह्यात ठोस पुरावे दिलेले नाहीत.
20 Oct 2015 - 9:34 am | म्हसोबा
चित्रपट पाहायचा आहे. मात्र हे चित्रपट परिक्षण अतिशय सुमार दर्जाचे झाले आहे.
20 Oct 2015 - 10:10 am | अनुप ढेरे
सिनेमा मस्तच आहे!