धाकट्या भावाने हरिवंशराय बच्चन यांची "कुछ अनमोल लोगोंसे रिश्ता रखता हूं" ही कविता पाठवली आणि कळवलं, 'दादा, मराठीत रुपांतर कर!'. प्रयत्न केलाय, त्याच्यासाठी, आणि मिपासाठी. सांभाळून घ्या.
***************
फतकल मारून मातीत बसतो बरेचदा, कारण मला समाधान देतं माझ्या लायकीत असणं
सागराकडून शिकलोय जगणं, खळबळणं शांतपणे, तरी मजेत राहणं
निर्दोष मी नक्कीच नसेन, पण फसवणूक नाही माझ्यात, कळू देत
कित्येक वर्षांत बदललंय ना प्रेम ना सोबती, शत्रू जळतात लकबीवर, जळू देत
एक घड्याळ मनगटावर काय बांधलं, वेळच मागे लागली आहे
घर बांधून सुख मिळेल वाटलं, गरजांनी भ्रमंतीच मागे लागली आहे
फुरसतीच्या बाता करू नकोस रे गालिब, लहानपणचा रविवार आता येत नाही
छंद आई-बापांच्या पैशावरच होते, माझ्या पैशांनी फक्त गरजा भागतात, बेत नाही!
का जगण्याच्या धावपळीत हरवते मजा, आनंदी आयुष्ये साधीशी होऊन जातात?
कधी काळी मी रोज सकाळी हसत जागा होई, न हसता आता कित्येक दिवस संपतात
कुठे दूर पोचलोय नाती सांभाळतांना, सर्वांना आपलंसं करतांना स्वत्वच विसरलोय
लोकांना मी हसरा वाटतो खूप, दु:ख लपवता-लपवता किती थकून गेलोय
आनंदी राहतो, आनंदी ठेवतो सार्यांना, बेजबाबदार असूनही मन जबाबदारी पेलते आहे
माझं स्वतःचं असं काही मोल नसेलही, पण काही अनमोल लोकांशी माझे नाते आहे
*************
हरिवंशराय बच्चन यांची मूळ कविता
बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..
मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।
ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है
जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!.
एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली.. वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!
सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से. . पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!
सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब….बचपन वाला ‘इतवार’ अब नहीं आता |
शौक तो माँ-बाप के पैसो से पूरे होते हैं, अपने पैसो से तो बस ज़रूरतें ही पूरी हो पाती हैं..
जीवन की भाग-दौड़ में – क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है? हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..
एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..
कितने दूर निकल गए, रिश्तो को निभाते निभाते.. खुद को खो दिया हमने, अपनों को पाते पाते..
लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है, और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..
“खुश हूँ और सबको खुश रखता हूँ, लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह करता हूँ..
मालूम हे कोई मोल नहीं मेरा, फिर भी, कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…
प्रतिक्रिया
19 Sep 2015 - 7:40 am | मारवा
बहुगुणी जी
सुंदर जमलाय अनुवाद आणि धाकट्याने कवीता हि सुंदर पाठवली हो तुम्हाला.
फतकल मारून मातीत बसतो बरेचदा, कारण मला आनंद आहे माझ्या स्थानाने
या ओळीत तुम्ही निवडलेला फतकल शब्द अतीशय चपखल आहे तो अगदी अचुक भाव पकडतो. मात्र आनंद आहे माझ्या स्थानाचे यातील औकात ला स्थानाचा पर्याय जमला नाही या एवजी लायकी हा मराठी शब्द वापरला असता तर कदाचित मुळ भाव अधिक योग्य व्यक्त झाला असता अस मला आपल एक वाटल
औकात शब्द जसा तीव्र संवेदना निर्माण करतो अगदी तशीच तीव्र संवेदना लायकी या मराठी शब्दाने निर्माण होते.
बच्चन यांच्या मधुशाले व्यतीरीक्त अशा अनेक सुंदर रचना आहेत मात्र त्या सहसा चर्चेत नसतात त्यांची निशा निमंत्रण ही अशीच मनस्वी रचना आहे. ज्यात मधुशाले चा ध्येयवादीपणा नाही मात्र अनोखा मनस्वीपणा आहे जसा वरील कवितेत आहे.
तर धाकट्याच सिलेक्शन आणि थोरल्याच ट्रान्सलेशन दोन्ही आवडले
19 Sep 2015 - 7:40 am | मारवा
बहुगुणी जी
सुंदर जमलाय अनुवाद आणि धाकट्याने कवीता हि सुंदर पाठवली हो तुम्हाला.
फतकल मारून मातीत बसतो बरेचदा, कारण मला आनंद आहे माझ्या स्थानाने
या ओळीत तुम्ही निवडलेला फतकल शब्द अतीशय चपखल आहे तो अगदी अचुक भाव पकडतो. मात्र आनंद आहे माझ्या स्थानाचे यातील औकात ला स्थानाचा पर्याय जमला नाही या एवजी लायकी हा मराठी शब्द वापरला असता तर कदाचित मुळ भाव अधिक योग्य व्यक्त झाला असता अस मला आपल एक वाटल
औकात शब्द जसा तीव्र संवेदना निर्माण करतो अगदी तशीच तीव्र संवेदना लायकी या मराठी शब्दाने निर्माण होते.
बच्चन यांच्या मधुशाले व्यतीरीक्त अशा अनेक सुंदर रचना आहेत मात्र त्या सहसा चर्चेत नसतात त्यांची निशा निमंत्रण ही अशीच मनस्वी रचना आहे. ज्यात मधुशाले चा ध्येयवादीपणा नाही मात्र अनोखा मनस्वीपणा आहे जसा वरील कवितेत आहे.
तर धाकट्याच सिलेक्शन आणि थोरल्याच ट्रान्सलेशन दोन्ही आवडले
19 Sep 2015 - 9:46 am | वेल्लाभट
अगदी हेच वाटलं.
स्थान पेक्षा लायकी जास्त अर्थपूर्ण ठरला असता कदाचित.
पण काहीही असो, ओव्हरऑल कविता तर अप्रतिम आहे वादच नाही. तुमचा भावानुवादही तितकाच प्रभावी. क्या बात है ! वाह.... खरंच छान !
19 Sep 2015 - 8:12 am | रेवती
भावानुवाद आवडला.
मूळ कविता तर चांगली आहेच.
दुसर्या कडव्यातील 'जळू देत' व चौथ्यातील 'बेत नाही' हे तुम्ही मुद्दाम अॅडवलय का?
पहिल्या कडव्यात 'लायकी' हा शब्द कसा वाटेल असे मनात आले.
19 Sep 2015 - 8:58 am | बहुगुणी
"औकात=status= स्थान" असा काहीतरी तिरपागडा विचार झाला होता, त्यापेक्षा 'लायकी' हा शब्द नक्कीच चांगला आहे, संपादकांनी दुरूस्ती केली तरवडेल.
रेवतीताई:
दुसर्या कडव्यातील 'जळू देत' व चौथ्यातील 'बेत नाही' हे तुम्ही मुद्दाम अॅडवलय का?
हो.19 Sep 2015 - 8:46 am | विशाल कुलकर्णी
छानच झालाय भावानुवाद...
19 Sep 2015 - 9:04 am | मदनबाण
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ganpati Aarti :- रमा माधव
19 Sep 2015 - 9:35 am | एस
छान अनुवाद. आवडला.
19 Sep 2015 - 10:14 am | किसन शिंदे
भावानूवाद आवडला बहुगुणीसाहेब.
19 Sep 2015 - 10:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सुंदर. आत्ता संपादन करताना दोन्ही वाचुन काढल्या :)
19 Sep 2015 - 11:23 am | मांत्रिक
सुंदर! अप्रतिम काव्य! भावानुवाद देखील उत्तमच! धन्यवाद बहुगुणीजी! तुमच्यामुळे एका अत्यंत सुंदर कवितेची ओळख झाली. "आलीस का ये" या कवितेची ओळख करून दिल्यापासून तुमचं नाव विशेष लक्षात आहे. अशाच उत्तमोत्तम कवितांची ओळख करुन देत रहा, ही नम्र विनंती!!!
19 Sep 2015 - 11:30 am | वाहीदा
उमदा !!
कई जगह मायने तो निकल आ रहे हैं लेकीन तर्जुमा नहीं निकल आ पा रहा..
हिंदी / उर्दु के अल्फाजोंको मराठी या किसी और जुबान में तर्जुमा करना वैसे भी मुश्किल हैं.. और यह तो पुरी नज्म हैं
लेकीन फिर भी उमदा ! बेहतरीन
~ वाहीदा
19 Sep 2015 - 11:38 am | वाहीदा
आया है मुझे फिर याद वो ज़ालिम गुज़रा ज़माना बचपन का
हाये रे अकेले छोड़ के जाना और न आना बचपन का ....
~ वाहीदा
19 Sep 2015 - 4:02 pm | मारवा
PIANO
Softly, in the dusk, a woman is singing to me;
Taking me back down the vista of years, till I see
A child sitting under the piano, in the boom of the tingling strings
And pressing the small, poised feet of a mother who smiles as she sings.
In spite of myself, the insidious mastery of song
Betrays me back, till the heart of me weeps to belong
To the old Sunday evenings at home, with winter outside
and hymns in the cozy parlor, the tinkling piano our guide.
So now it is vain for the singer to burst into clamor
With the great black piano appassionato.
The glamour of childish days is upon me, my manhood is cast
down in the flood of remembrance, I weep like a child for the past.
D. H. Lawrence
19 Sep 2015 - 4:27 pm | वाहीदा
:-)
19 Sep 2015 - 12:23 pm | रातराणी
मूळ कविता आणि भावानुवाद दोन्ही आवडले.
19 Sep 2015 - 1:07 pm | प्यारे१
मूळ कविता अप्रतिमच आहे पण भावानुवाद देखील उत्तम जमलाय.
मस्तच बहुगुणीजी.
>>> बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..
याचा अनुवाद थोडा वेगळा हवा होता असं वाटतंय.
19 Sep 2015 - 1:17 pm | एक एकटा एकटाच
चांगली जमलीय
19 Sep 2015 - 7:04 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम....
हरीवांशायजींच्या कवितेवर भाष्य करायची लायकी नाही. पण त्याचा अनुवाद मनाला भिडला. खुप आवडली तुमची कविता
20 Sep 2015 - 10:33 pm | चाणक्य
बहुगुणी, फार सुंदर कविता आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा अनुवादही छान आहे. एक प्रयत्न मीही करतो याचा भावानुवाद करण्याचा. मूळ कविता वाचल्यावर जे भाव मनात येतात तसे भाव भावानुवाद वाचल्यावरही यावेत असा प्रयत्न करतोय.त्यामुळे आोळींचा क्रम, उपमा वगैरे अगदी तसेच्या तसे नाही ठेवले. पण मूळ कवितेतल्या भावनेशी प्रामाणिक रहायचा प्रयत्न केलाय. सांगा बरा वाटतोय का ते...
भावानुवाद:-
कधी नाहीच कुठे दिसलो तुम्हाला मी तर ईथे बघा...खाली मातीत
मी बसतो जाऊन मातीत ब-याचदा
कारण पायरी ओळखून आहे मी माझी
आणि आवडतंही मला आपल्या पायरीवर रहायला
मातीत राहून मातीकडून शिकलोय बरंच काही
समुद्राकडूनही शिकलोय,
फारसा खळखळाट न करता आपल्या मस्तीत कसं रहायचं ते
.
.
.
पण आताशा समुद्र हरवलाय माझा
खरं तर नीट ठेवला होता मी तो माझ्या दप्तरात
समुद्र,आळसटलेला रविवार,रंगीत काचा,कागदाची विमानं आणि अजून काही वस्तू
रोज तपासायचो मी माझा दप्तरातला तो खजिना
पण एक दिवस मनगटावर घड्याळ चढवलं आणि तिथेच बिनसलं
वेळ सांभाळायच्या नादात तो खजिना कुठे हरवला कोणास ठाऊक
आणि आता विकत घ्यावा म्हटलं तर खर्च जाऊन हातात काही उरतही नाही
खर्च जाऊन हातात पैसे फक्त आईबाबाच देऊ जाणॆ
कळत नाही तेव्हा काय कमवलंय आणि आता काय गमावतोय
वाटलं होतं एक दिवस संपेल ही धावपळ
आणि मग तेव्हा पाठ टेकायला असावं म्हणून एक घर काढलं बांधायला
पण ते बांधकाम सुरू झालं माझ्याच पाठीच्या कण्यावर
घणावर घण बसतायत अजूनही....दिवसरात्र...रोज
पूर्वी बिछान्यातून कित्येकदा हसत हसत उठायचो मी
आता हे घण सोसता सोसता दिवस, आठवडे, महीने जातात न हसता
जेव्हा जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तेव्हा मी हसतो थोडासा
आणि नेमकं तेव्हाच कोणीतरी बघत असतं मला
मग अजून थोडा हसतो मी
बरं असतं ते....निदान झिजलेला कणा लपवता येतो
कधी कोणाला काही फसवलं असेल तर हे ईतकच
.
.
.
पण एक समाधान आहे आजही
या सगळ्या प्रवासात मी एकटा नाहीये
काही सावल्या आहेत माझ्या, माझ्याबरोबर वर्षानुवर्षं
लोकांना हेवा वाटतो माझा यामुळे
आणि वाटणारच की हो
कारण माझी स्वतःची कवडीईतकी किंमत जरी नसली
तरी या सावल्या अनमोल आहेत
मी ही जपतो या सावल्यांना जिवापाड
प्रसंगी मी उन्हात उभा राहतो पण सावल्यांना धग नाही लागू देत
आणि मला पक्कं माहितीये
या सावल्याच मदत करतील मला एक दिवस
.....माझं दप्तर शोधायला
21 Sep 2015 - 2:34 am | बहुगुणी
भावानुवाद म्हणून प्रयत्न आवडलाच, पण मला वाटतं तुमचं मुक्तक स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणेही छान उभं रहातं आहे.
21 Sep 2015 - 6:36 pm | बोका-ए-आझम
कविता हा न जमणारा विषय. या नावाची कोणी मैत्रीणही नाही म्हणजे बघा. पण ही कविता अनुवादित करायचा प्रयत्न केला -
बसतो मातीत मी नेहमीच स्वत:ची आवडती पायरी ओळखून।
समुद्राकडूनच तर शिकलोय कसं वागावं, बिनाखळखळ वाहावं आणि आपल्या लहरीत जगावं!
दुर्गुण नाहीत माझ्यात असं नाही पण खरं सांगतो खोटं वागत नाही मी
शत्रू होतात हैराण माझे कारण ना माझे मित्र बदलले, ना माझी मैत्री बदलली!
मनगटावर बांधलेल्या घड्याळाने काळाचा गुलाम केलं मला
आयुष्यातल्या अनिश्चिततेने बनवून टाकलं सदासर्वकाळ प्रवासी मला
आरामाच्या गप्पा करु नकोस गालिब, लहानपणची गंमत कधीच ओंजळीतून निसटली
हौस मायबापांनी पुरवली, माझ्या पगाराने तर फक्त गरज भागवली!
आयुष्याच्या धकाधकीत का काळ सगळी मजा उधळून देतो
हसत्या खेळत्या आयुष्याला का असं चाकोरीचं ग्रहण लावतो
तेव्हा हसलो की सकाळ व्हायची, आज उदासीन संध्याकाळ दार ठोठावते!
नाती सांभाळता मजल दरमजल करत खूप दूर गेलो
इतरांना आपलंसं करता करता स्वतःलाच विसरून गेलो
आनंदी आहे तरीही आणि वाटतो खिरापत आनंदाची
असलो बेपर्वा तरी पर्वाही करतो इतरांची
असलो स्वतः शून्य जरी, तरी नातं जोडतो अनेक बहुगुणींशी!
21 Sep 2015 - 7:05 pm | चाणक्य
आवडला हा ही अनुवाद
21 Sep 2015 - 7:25 pm | बहुगुणी
वा! छान जमलीये. 'कविता हा न जमणारा विषय' म्हणता, पण तुमचं स्वतःविषयीचं हे मत आता बदलायला लागणार तुम्हाला!
नवांतर (न-अवांतर ;-)) : मूळ काव्यच इतकं सुंदर आहे की तिघांना प्रेरणा मिळालीय आतापर्यंत, और भी आने दो!
21 Sep 2015 - 11:32 pm | पैसा
बहुगुणींचा भावानुवाद, चाणक्य आणि बोका ए आझम यांचेही भावानुवाद खूप आवडले.
22 Sep 2015 - 12:16 am | दिवाकर कुलकर्णी
हरिवंशराय बच्चन, बहुगूणाजी सर्वाना कुर्निसात
कौतुक करायला शब्द सुचत नाहित,बेमिसाल,
22 Sep 2015 - 1:46 am | चांदणे संदीप
बहुगुणी सर नमस्कार!
तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे या रचनेने आत्तापर्यंत तिघांना प्रेरणा दिलीये आणि aजूनही रांगेत असतील! त्या तुमच्या म्हणण्याला सार्थ ठरवित मीही रांगेत आलो पहा! मलाही नाहीच राहावल प्रयत्न करण्यावाचून!
माझा प्रयत्न कुठल्या वृत्तात आहे की छंदात आहे हे पाहण्याच्या फंदात या रात्री दोनच्या सुमारास नाही पडलो. जस सुचल तस लिहिल. कस वाटतय ते सांगा आणि कुठे चुकत असल्यास मार्गदर्शनही करा, नव्हे, मार्गदर्शनाचीच अपेक्षा आहे!
शब्दश: भाषांतर टाळून किंबहुना मूळ काही शब्दांनाही बगल देत पण मूळ अर्थ तोच ठेवत भावानुवाद केला आहे.
आगळिकीबद्दल पुन्हा एकवार माफी मागतो!
"असाच बसतो मातीत नेहमीच कारण,
भावत मला अस या मातीत मिसळणं!
ढब ही अशी समुद्राची, भिनवलीय अंगात,
उंच उसळून कधी किना-याशी लोळत पडणं!
माझ्यातही अवगुण दडून बसलेत काही,
पण खर सांगतो जमलच नाही, कुणा फसवणं!
दिसतात त्यांची आता जळकी स्मितं कारण,
ना दूर लोटल प्रेमाला ना थांबवल मी मित्र जमवणं!
हातात घड्याळ बांधताना दिसलच नाही,
ते वेळेच मला, अस कायमच चिकटणं!
नको सांगू मित्रा ऐशोआरामाची नाव,
जमतय का सांग फिरून लहान होणं?
खाऊ आईवडिलच आणायचे बाजारातन,
आपणतर शिकतोय फक्त बाजार करणं!
कधी सुटला रे हात त्या निवांत आयुष्याचा?
फावल्या वेळेचही कुठ हरवलं असेल निवांतपणं!
खिदळत येणारी ती सकाळही दिसत नाही,
मावळलेल हसू नाहीच का जमणार फुलवणं?
ह्याच्या त्याच्याशी नाती जोडण्यात बहुधा,
दिसतय मला इथे, विरून जाणारं मीपणं!
लोकांना कुठून दिसतोय 'तो' सदरा अंगात माझ्या,
सुखी माणसालाच इथे अजून नाही सुरू केल शोधणं!
पण आत कुठेतरी काहीच नकोय मला,
सुरू आहे तरी, दुस-यांसाठी सोसत जगणं!
टिकवून आहे बघा तुमच्यासारख्यांची सोबत,
माहित जरी आहे मला माझ फाटकं असणं!"
धन्यवाद ___/\___
Sandy
22 Sep 2015 - 5:03 am | चाणक्य
मजा आली संदीपजी. छान जमलय.
22 Sep 2015 - 5:26 am | बहुगुणी
छान जमलंय. (आणि आगळीकच म्हणायची असेल तर आपण सगळेच करतोय ती आभाळाएवढ्या हरिवंशरायांच्या प्रतिभेची, आणि जोवर मनातल्या भावनांना चांगले धुमारे फुटताहेत तोवर ती क्षम्यच असेल.)
22 Sep 2015 - 7:00 am | चांदणे संदीप
धन्यवाद बहुगुणी सर!
22 Sep 2015 - 8:51 am | बोका-ए-आझम
सुपर्ब!
22 Sep 2015 - 10:44 am | चांदणे संदीप
धन्यवाद 'बोका-ए-आझम!' ___/\___
(नाव घेतानाच दमल्यासारख होतंय! प्रत्यक्ष भेटल्यावर अवसानच गळून जायचं माझ! ;) )
24 Sep 2015 - 11:35 am | चांदणे संदीप
ही एक ओळ मिसली होती माझ्याकडन...
"सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से. . पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!"
त्यासाठी :
वाटलं होत बांधीन पावसाळ्याआधी घर
पण नशिबी कसं हे उन्हाळ्यात वणवण फिरणं!
22 Sep 2015 - 3:03 am | सटक
काय बहार उडवली आहे सर्वांनीच! अचानक छान धागा झालाय!
22 Sep 2015 - 1:02 pm | दिवाकर कुलकर्णी
मिपावरील सर्व लेखक, लिखाण अभिजात,
मिपाच एकूण द्रुष्ट लागण्यासारखं!!