गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट न झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ५ ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय ४ पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.) त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची. अर्धवट लक्ष त्याकडे आणि अर्धवट लक्ष बाहेरच्या घंटेकडे आणि न्यायला आलेल्या पालकांकडे असायचे आणि अशातच तिचे ते गाणे चालू व्हायचे -
"सारेगमप मपधनिसा,
मंत्रमुग्ध अवतार मंत्रमुग्ध अवतार …. "
त्यावेळी पडद्यावरचे गाणे जुही किंवा माधुरी म्हणते अशी आमची दाट समजूत होती आणि लता आणि आशा या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत असा गैरसमजही होता. गाणे नाचणे संगीत हे मुलींचे कार्यक्षेत्र असे वाटायचे. त्यामुळे त्यात त्यावेळी जास्त रस घेत नसलो तरी वर्गातील एकमेव गायिका आणि शिवाय पुढे उभे राहून बिनधास्त गाणे म्हणते म्हणजे नक्की मोठेपणी सिनेमात हिरोइन होणार असेही मनात यायचे. असो पण तरी तिने सूर लावला कि आपोआप डोक्यात त्याचे संगीत सुरु व्हायचे
"कऱ्हा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार" ह्या ओळीनंतर चे "घे गजमुख अवतार घे गजमुख अवतार" हा कोरस ती स्वताच म्हणायची नि श्वासात जराही खंड न पडता पुढे "दुमदुमे ता था तै तत्कार नाचतो शिवनंदन सुकुमार… मयुरेश हा रणी प्रकटला मावळला अंधार" हे कडवे संपून पुन्हा "सारेगमप मपधनिसा" चालू व्हायचे तेव्हा तर अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचो. आणि शेवटी "गोसावीसुत मोरयाचा झाला जयजयकार" म्हणल्यानंतरचे त्या विशिष्ट लयीतले "मंगलमुर्ती मोरया" घरी पोचेपर्यंत ओठांवर रुळलेले असायचे
त्यावेळी या शब्दांचे अर्थ हि माहित नव्हते. लय ताल सप्तसूर आलाप इतकेच काय तर या गाण्याची मूळ गायिका लता / उषा मंगेशकर आहे आणि अष्टविनायका मधील मयुरेश्वरावर हे गाणे लिहिले आहे हे कळायला पुढच्या दहा वर्षाचा काळ उलटावा लागला. नंतर शाळा बदलल्या संपर्क लोप पावले (असेही त्यावेळी तरी कुठे मुलींशी फार बोलायला जमायचे म्हणा ) पण अजूनही गणपती म्हणले कि पहिले गाणे आठवते ते हेच आणि कानात आवाज घुमतो तिचाच.
(गीताचे बोल लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व. संपूर्ण गीत कोठे मिळेल ?)
प्रतिक्रिया
10 Sep 2015 - 10:33 am | एस
वा! क्या बात है...! मूळचे गाणेही सुरेख आहे आणि हा लेखही
10 Sep 2015 - 2:35 pm | सौंदाळा
लेख आवडला.
सारेगमप-मपधनिसा चे शब्द मला तरी आंतरजालावर सापडले नाही.
पण या दुव्यावर गणपतीच्या बाकी गाण्यांचे शब्द (गीत) वाचता येतील
10 Sep 2015 - 2:41 pm | सिरुसेरि
छान लेख , आठवण . गणपती उत्सवाच्या दिवसात, मंडळांमध्ये आरतीची वेळ जवळ आली की "गजानना श्री गणराया" ,"रांजणगावाला जाउया", "अष्टविनायका तुझा महिमा कसा" अशी भक्तीगीते ऐकवली जातात . आणी , एरवी दिवसभर "डीजे" चा दंगा असतो .
10 Sep 2015 - 2:46 pm | स्वरांगी
लेख आवडला .
ते कदाचित - "सारेगमप मपधनिसा, मंद्र मध्य अन तार... " आहे असा वाटायचं मला.. नक्की शब्द माहित नाहीत..
10 Sep 2015 - 2:52 pm | कहर
लहानपणी कानावर तसेच काहीतरी पडायचे… ते 'मंत्रमुग्ध अवतार' (काहीतरी अर्थपूर्ण ) आमचेच R & D . नक्की शब्द माहित नाहीत.
10 Sep 2015 - 3:12 pm | कोमल
मस्त. आवडली आठवण.
संपुर्ण गाणे तुनळी वर सापडले
https://www.youtube.com/watch?v=vBRXuR366-Q
यांत गाण्याचे बोल पण आहे.
मेरेकु टंकायचा टंकाळा आया..
10 Sep 2015 - 3:32 pm | ब़जरबट्टू
तिथेच तर लिहिले होते..
मंत्र मध्य आणि ताल, झ्हारारात उठले स्वर झणकार, फुलातून दरवळला गंधाल, मयुरेश या ध्वनी प्रगटला मावळला अंधार
करह नदी च्या तीरा वरती घे गजमुख अवतार, दुम दुमे दाही दिशा ललकार, झाला विश्वंभर सहकार, गोसावी सुत मोरया ला घडला साक्षात्कार, उमटला ता ता थाई तत्काळ, नाचतो शिव नंदन सुकुमार , मंगल मूर्ती मोरया झला जय जयकार
10 Sep 2015 - 3:33 pm | कहर
पण त्यातही बऱ्याच चुका दिसतायत. त्या सुधारून टंकायचा प्रयत्न करेन …
10 Sep 2015 - 3:13 pm | अदि
ते मंत्रमुग्ध अवतार नाई काई... मंद्र, मध्य आणि तार असं आहे.. संगीतातली तीन सप्तके.... हसले बै मी खूप..
10 Sep 2015 - 3:31 pm | ब़जरबट्टू
मंत्र मध्य आणि ताल, झ्हारारात उठले स्वर झणकार, फुलातून दरवळला गंधाल, मयुरेश या ध्वनी प्रगटला मावळला अंधार
करह नदी च्या तीरा वरती घे गजमुख अवतार, दुम दुमे दाही दिशा ललकार, झाला विश्वंभर सहकार, गोसावी सुत मोरया ला घडला साक्षात्कार, उमटला ता ता थाई तत्काळ, नाचतो शिव नंदन सुख्वार, मंगल मूर्ती मोरया झला जय जयकार..