पंधरा दिवसांपुर्वी सुधांशु नूलकर यांनी कर्जत /लोणावळा पावसाळी कट्टा करण्याबद्दल विचारले होते आणि थोडीफार चर्चा होऊन मळवली स्टेशनपासून दीड-दोनेक किमीवरच्या भाजेलेणी ( लोणावळापासून अंदाजे बारा किमी )येथे येत्या रविवार दिनांक सहा (६) सप्टेंबरला कट्टा करण्याचे ठरले आहे.पक्के करायला उशीर झाल्याने धागा काढायला उशीर झाला याबद्दल कृपया समजून घ्यावे.
सध्या मुंबईचे पाच आणि पुण्याकडूनचे प्रचेतस ( पुर्वीचे नाव वल्ली )धरून चारजण येत आहेत असे कळवले आहे.
वेळ आणि आराखडा याप्रमाणे-
पुण्याकडून येणारे लोणावळा लोकल पकडून मळवलीस येऊ शकतात पहिली ७.३०ला आणि नंतरची ९.११ ला येते.मुंबईकडून डेक्कन एक्सप्रेसने ( 11007 )येणारे १०.१५ला येतील( लोणावळा अधिक लोकल ट्रेन),इंद्रायणी एक्सप्रेस ( 22105 )ने आल्यास ८.३०ला येतील.या दोन्ही गाड्यांस कनेक्टेड लोकल उभ्या असतात लोणावळ्याला.एकस्प्रेस पुढे गेली की मागोमाग लोकल जाते.डेक्कन एक्सप्रेसने येण्यासाठी तळेगावचे तिकीट काढा ,लोणावळा उतरून लगेच पलिकडच्या प्लॅटफॅार्मवरची पुणे लोकल धरा.एकच पुढचे स्टेशन मळवली.
मळवली स्टेशनच्या पुणे टोकाला पुलावरून पलीकडे उतरल्यास भाजे गावाकडे जाणाय्रा शेअर रिक्षा मिळतात.चालत गेल्यास वीस मिनिटे. गावाजवळच थोडे उंचावर लेणी पाहून तीन वाजता परत निघायचे आहे. चार वाजताची लोणावळा लोकल पकडून तिथे ४.४० ची डेक्कन एक्स आणि ५.१५ची कोयना गाडी मिळते.
मुंबई कडून येणाय्रा इंद्रायणी आणि डेक्कन ची रेझवेशन उपलब्ध आहेत परंतू परतीची संपली आहेत.
स्टेशनजवळ चहा वडे मिसळ मिळते.
थोडक्यात भाजेलेणी:
भाजे लेणीतल्या पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे तिथल्या चैत्यगृहाचे तिरकस खांब, स्तूपांची मांदियाळी आणि सूर्यगुंफ़ेतील ग्रीक माइथोलॉजीतील सेंटोर, पेगेसस अशा प्राण्यांची शिल्पे.गावापासून चांगल्या बांधीव दगडी पायय्रा आहेत .साधारण रेल्वेचे पाच जिने इतक्या उंचावर लेणी आहेत.सरकते जिने अथवा रोपवे अजून लावलेले नाहीत.
जवळजवळ दोन गड आहेत लोहगड आणि विसापूर.या विसापुराच्या डोंगरातच लेणी आहेत.तिन्ही एकाच दिवसात काहीजण करू शकतात परंतू ट्रेकिंग( सोपे असले तरी) असल्यामुळे वगळले आहे.( टॅाइलट सोय स्टेशनवरचीच वापरायची आहे).
साडेदहापर्यंत मळवली स्टेशन वर येणाय्रांची वाट पाहू.मोबाइल संपर्क होऊ शकला नाही तरी ऐनवेळी येणाय्रांनी लेण्यांकडे यावे.
प्रतिक्रिया
1 Sep 2015 - 1:40 pm | खेडूत
कट्ट्याला शुभेच्छा !
स्वच्छ उन पडेल असा अंदाज आहे. वृत्तांताच्या प्रतीक्षेत…………….
1 Sep 2015 - 1:45 pm | प्रचेतस
पावसाची एखाद दुसरी सर येऊन जातेच. :)
1 Sep 2015 - 2:04 pm | त्रिवेणी
भाजे लेणी म्हणजे एकविरा देवीच्या इथे आहेत ती का? जर कोणी अनाहिता असतील। आणि नावरोबा यायला तैयार zale टार। yeyin
1 Sep 2015 - 2:14 pm | प्रचेतस
एकवीरा असलेली कार्ल्याची लेणी. तिथे खूप गर्दी, घाण यामुळे जाववत नाही.
भाजे लेणी कार्ल्याच्या विरुद्ध बाजूस. म्हणजे पुण्यावरुन जुन्या हायवेने आलात तर भाजे डावीकडे आणि कार्ले उजवीकडे.
1 Sep 2015 - 5:34 pm | अनिरुद्ध.वैद्य
भाजे म्हणजे लोहगड जवळील न? तिथली गर्दीपण मला नकोसी झालेली … कार्ल्याला काय हालत असेल, कल्पना करवत नाही. बेडसे लेणी म्हणून अजून एक लेणी आहेत न त्याच परिसरात?
धन्यवाद
1 Sep 2015 - 5:48 pm | प्रचेतस
गर्दी असतेच.
बेडसे विसापूरच्या मागच्या डोंगरात आहेत. ती मात्र बरीच निवांत आहेत.
1 Sep 2015 - 2:20 pm | अजया
त्रि, चल जाऊया.
1 Sep 2015 - 3:59 pm | प्रचेतस
पुणे लोणावळा आणि लोणावळा पुणे लोकल ट्रेनचे वेळापत्रक येथे मिळेल.
http://www.punediary.com/html/upside_local.html
1 Sep 2015 - 4:14 pm | कंजूस
वेळापत्रक पुणे लोणावळा लोकल कामाच्या दोन गाड्या-
1 Sep 2015 - 5:21 pm | माझीही शॅम्पेन
परमेश्वरा हे वाचण्यासाठी मला दिव्य दृष्टी दे __/|\__
(सर इमेज क्लियर नाहीत)
कट्यास "हार्दिक" शुभेच्छा , सध्यातरी येण्याचा विचार नाही..
1 Sep 2015 - 5:10 pm | सुधांशुनूलकर
सविस्तर माहितीसाठी आभार.
मुंबईहून येणारे आपण सर्व एकमेकांच्या संपर्कात राहू या.
1 Sep 2015 - 5:28 pm | सूड
लोहगड असता तर विचार केला असता, भाजे लेणी म्हणजे...असो!!
1 Sep 2015 - 7:54 pm | सत्याचे प्रयोग
कट्यास शुभेच्छा. रविवारीच जाऊन आलो. छान रिमझिम पाऊस पडत होता.
1 Sep 2015 - 8:33 pm | अत्रुप्त आत्मा
shravan Sunday is styanarayan day!
Is liye .... hmra passss :-\
1 Sep 2015 - 9:26 pm | प्रसाद गोडबोले
styanarayan >>> =))
2 Sep 2015 - 8:30 am | नाखु
styanarayan = म्हंजे स्टाईलीत "नारायण"
अखिल्मिपातत्काळ्खुलासासमिती तर्फे जनहितार्थ प्रसारीत.
1 Sep 2015 - 8:35 pm | अरविंद कोल्हटकर
भाजे लेण्यामध्ये सात आठ शिलालेख आहेत. त्यांपैकी दोघांचे वाचन देतो. जिज्ञासूंना अधिक वाचने आणि लेण्यांची अधिक माहिती बर्जेस-इंद्राजी ह्यांच्या पुस्तकामध्ये मिळेल.
नडसवस नायस
भोगवतस गाभो दानं
(भाषान्तर - भोगवती गावाच्या नाय (जातीच्या) नदसवाचे दान केलेले गर्भ (खोदीव जागा).
महारथिस कोसिकीपुतस
विण्हुदतस देयधम पोढी
(भाषान्तर - कोसिकीपुत्र आणि महारथी असा विष्णुदत्त ह्याने देवधर्म म्हणून दान केलेले टाके.)
लेण्याच्या वरच्या डोंगरावर चढलात तर पावसाचे पाणी लेण्याच्या प्रवेश मार्गावर न पडता बाजूने वाहून जावे ह्यासाठी खोदलेला चर पाहायला मिळेल. हा engineering detail लक्षणीय आहे.
कार्ले-भाजे-बेडसे अशी १५-२० लेणी, काही पूर्ण तर काही अर्ध्यावर सोडून दिलेली, त्या भागामध्ये आहेत. पैकी शेलारवाडीची लेणी अगदी छोटी असली तर जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरून सहज जाण्याजोगी आहेत. तेथे एक शिलालेख असून मूळचे बौद्ध लेणे शंकरमंदिरात बदलल्याचे स्पष्ट दिसते.
1 Sep 2015 - 8:48 pm | प्रचेतस
भाजेतला अजून एक शिलालेख
'बाधया हालिकजयाना दानं'
बाध या शेतकर्याच्या बायकोचे दान.
बाकी शेलारवाडी लेण्यांत एक नसून दोन शिलालेख आहेत.
पहिला लेख चैत्यगृहाच्या अलिकडील विहाराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेला असून त्यात धेनुकाकटचा शेतकरी उसभणक याची पत्नी सियतगुणिकेने पुत्र नंदासहित दान दिल्याचा उल्लेख आहे तर दूसरा लेख चैत्याच्या आतील भिंतीवर आहे हयात थेर भदंत सिंह यांची शिष्या घपर ह्यांची प्रवजित कन्या हिने बुद्धसंघासाठी चैत्यगृह धर्मादाय केल्याचा उल्लेख आहे.
1 Sep 2015 - 10:03 pm | अरविंद कोल्हटकर
दुसरे लेणे असल्यास माझ्या नजरेतून चुकले असावे. बर्जेस-इंद्राजीहि एकाच लेण्याचा उल्लेख करतात. शंकमंदिराबाहेरील लेखाचे माझ्याजवळील छायाचित्र पहा:
ह्या लेखाचे वाचन असे आहे:
सिधं धेणुकाकडे वाथवस
हालकियस कुडुबिकस उसभ
णकस कुडुबिणिय सिअगुत
णिकाय देयधंम लेणं सह पुते
ण णं(द)गहपतिणा सहो
भाषान्तर - सिद्धि असो! धेनुकाकट (गावी) वास्तव्य असलेल्या आणि नांगर चालविणार्या (= व्यवसायाने शेतकरी असलेल्या) कुटुंबीय (कुणबी) ऋषभणकाची कुटुंबिनी सियगुतणिका (सिंहगुप्तनिका?) हिचे, पुत्र आणि गृहस्थ नंद ह्याच्यासह, देवधर्म म्हणून लेणे.
1 Sep 2015 - 10:08 pm | सूड
__/\__
मान गये!!
1 Sep 2015 - 11:31 pm | प्रचेतस
हे त्या दुसर्या लेखाचे छायाचित्र
उपरोक्त लेखाचे मूळ वाचन असे
सिध| थेरांन भयत सिहाण अते असिणिय पवैतिकाय घप [रा]
बालिका सघाय बुद्धा च चेतियघरो देयधम मातापित उदिस सह [च]
सवेहि भिखा [खु] कुलेहि सहा च आचरि [य] ही
भतविरायेही समापितो
भाषांतरः सिद्धी असो, थेर भदंत सिंह यांची शिष्या घपर यांची प्रव्रजित कन्या हिने सर्व भि़क्षुकुल यांछेसह बुद्ध आणि संघ यांच्यासाठी हे चैत्यगृह आईवडिलांच्या स्मरणार्थ समर्पित केले आहे.
तुम्ही दिलेल्या शिलालेखाचे अधिक उत्तम छायाचित्र
1 Sep 2015 - 8:39 pm | यशोधरा
यायला आवडेल. सुट्टी मिळते का बघते.
2 Sep 2015 - 2:23 am | जुइ
कट्ट्याला शुभेच्छा!!
2 Sep 2015 - 7:32 am | कंजूस
या लेखातले सर्व धडे वाचून या रे मुलांनो.
उगाच तिकडे विचारून हैराण करू नका.
2 Sep 2015 - 7:57 pm | स्वच्छंदी_मनोज
भाजे लेणी आणी लेणीमास्तर वल्ली असल्यामुळे यायला आवडले असते पण काही महत्वाच्या कामामुळे जमत नाहीये..
भरपूर फोटो काढा आणी झकास कट्टा वृत्तांत लिहा त्यामुळे आम्हाला घरबसल्या मेजवानी मिळेल..
बादवे.. काही अभ्यासकांच्या मते भाजे, ठाणाळे आणी खडसांबळे ही लेणी महाराष्ट्रात खोदली गेलेली सर्वात प्रथम लेणी (इ.स्.पू. २ रे शतक). खरे खोटे वल्ली जाणे पण तुम्हाला मनसोक्त लेणी बघता येवो आणी रवीवारच्या पिकनीक पब्लीकचा त्रास न होवो ही इच्छा. लेणी राहीली बाजूलाच ही पब्लीक शेजारच्या धबधब्यासाठीच येतात असे वाटते.
भाजे गांव प्राचीन आहेच पण डोंगराच्या पलीकडे असलेले पाटण गावही प्राचीन आहे (नक्की माहीत नाही पण बहुदा ह्या गावात पण खोदकाम झालेले असावे). पाटण गावात भारतातील पहीला लिथोग्राफिक प्रेस राजा रवीवर्मांनी सुरु केला होता असे वाचल्याचे स्मरते.
2 Sep 2015 - 9:51 pm | प्रचेतस
महाराष्ट्रातले सर्वात जुने लेणे हे राजमाचीच्या पोटातले कोंडाणे लेणे म्हणून मानण्यात येते. गिरिविहारात लेणी खोदण्याचे तंत्र तेव्हा प्राथमिक अवस्थेत असल्याने येथे वरच्या डोंगरात पाणी वाहून जाण्यासाठी चराचा अभाव, ओसरी नसणे त्यामुळे वरून कोसळणारे पाणी थेट लेण्यात जाऊन त्यांची झालेली हानी आदि प्रकार दृष्टीस पडतात. साधारणत: ह्याच कालखंडात ठाणाळे व खडसांबळे लेणी खोदण्यात आली असावीत तदनंतर ४०/५० वर्षातच भाजेचा चैत्य खोदला गेला असावा.
बाकी सातवाहनांचे नाणेघाटातील लेणेसुद्धा बहुत प्राचीन. साधारण (इसपू २०० व२२०)
2 Sep 2015 - 10:03 pm | प्रचेतस
बाकी पाटणच्या दिशेने विसापूरच्या डोंगरातही लेणी आहेत. एक चैत्य आणि काही विहार आहेत. पण माहितगाराशिवाय सापडणे अवघड. खुद्द विसापूर किल्ल्यावरही पाटणच्या वाटेने वर येताना खडकाळ पायऱ्यांच्या मधोमध कोठीवजा लेणे आहे. तिथेच एक शिवकालीन हनुमान मूर्ती आहे व लोहगडाहून गायमुख खिंडीतून येणारी ओढ्याची वाट किल्ल्यावर पोचते तिथेच १/२ खोदीव गुहा आहेत. त्यातीलच एका गुहेच्या का पाण्याच्या टाक्याच्या भिंतीवर एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. ऐन किल्ल्यावर असलेला ब्राह्मीतला हा एकमेव शिलालेख. डॉ. शोभना गोखले ह्यांनी त्याचे वाचन केले होते.
2 Sep 2015 - 10:35 pm | एस
तुम्ही एक पुस्तक काढा ना. असे माहितीपूर्ण प्रतिसाद नंतर कुठे व कसे शोधायचे?
2 Sep 2015 - 10:57 pm | प्रचेतस
:)
5 Sep 2015 - 3:32 pm | माहितगार
+१
गूगल बाबा आणि कंट्रोल एफ असतात साथीला तरीपण, अगदी वेगळ्याच धाग्यात असे मुल्यवान प्रतिसाद पेरुन ठेवले गेल्यास शोधून काढण्यासाठी प्रत्येकजण प्रचेतस होऊ शकत नाही. दुसरेतर मिपा मालकांनी हवे असलेले प्रतिसादांना टॅग, बुकमार्क करणे, सुलभ रेफरंन्स तयार करणे या सोयी द्यावयास हव्यात.
5 Sep 2015 - 11:01 am | प्रचेतस
पुण्याहून मी, धन्या, नादखुळा व त्यांचे चिरंजीव व फोटोफेम गणेशा असे नक्की येत आहोत.
5 Sep 2015 - 7:17 pm | सुधांशुनूलकर
नक्की येतोय.
कंजूस आहेतच, बहुधा मुविही येणार आहेत.
19 Oct 2015 - 8:53 pm | कन्यारत्न
तिन वेला पाहिलि आहे ...खुप छान आहे....
19 Oct 2015 - 9:18 pm | प्रचेतस
मी पण ३० ते ३५ वेला पाहिले आहे. खरंच खूप खूप छान आहे.
20 Oct 2015 - 6:10 am | अत्रुप्त आत्मा
मी स्वत: दोनदा ,आणि आगोबाला सदर लेणी पहाताना दोनदा पाहिली आहेत. खर्र्रच खूपच छाण छाण छाण छाण आहेत.
20 Oct 2015 - 8:26 am | राही
वरच्या काही प्रतिसादांत पाण्याच्या चरांचे उल्लेख आहेत. जलनियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण कान्हेरी लेण्यांत दिसते. एक तर हा लेण्यांचा खूप मोठा समूह आहे. प्रत्येक गुहेला पाणीपुरवठा व्हावा अशा रीतीने कातळात पाट खोदून ते व्यवस्थित वळवले आहेत. त्यांच्या मार्गावर मध्ये मध्ये जलकुंडे आहेत. या कुंडांचे ओसंडपाणी(ओवरफ्लो)सुद्धा कल्पकतेने वळवले आहे. या वॉटर सिस्टर्न्ससाठी तरी कान्हेरी एकदा पहावेच.
दहिसर नदीचा एक उगमस्रोत या टेकडीपासून आहे. एकेकाळी यावर दगडी बांध घालून पाणी अडवलेले आजही पाहाता येते. खोदकामाच्या औजारांसाठीच्या प्राचीन लोहभट्टीची जागा इथून अगदी जवळ आहे आणि साहजिकच तप्त लोह थंड करण्यासाठी आणि स्थपतींच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी सुलभ असावे म्हणूनही दोन्हींची आसपासच योजना असावी. अर्थात या धरणाच्या पाण्याचा मुख्य उपयोग घरगुती वापर हाच होता असणार.
20 Oct 2015 - 8:58 am | राही
वरील प्रतिसादात नियोजनाऐवजी व्यवस्थापन शब्द योग्य राहिला असता.