रामायण कथा - रुमा - एक मूक स्त्री

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jul 2015 - 7:11 pm

रामायणात रुमाची ओळख सुग्रीव पत्नी असे आहे. जिथे ताराच्या प्रखर व्यक्तित्वाची जाणीव रामायणात होते, तिथे रुमाच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. कारण स्पष्ट आहे, रुमा एक सामान्य स्त्री होती. सर्व अन्याय चुपचाप सहन करणारी. अश्या सामान्य स्त्री साठी कोण कवी आपले शब्द सामर्थ्य खर्च करेल. तरीही तिला काय सहन करावे लागले याची कल्पना आपण करू शकतो.

वानर समाजात पतीच्या मृत्यू नंतर स्त्री पुन:विवाह करू शकत होती. वालीने जर सुग्रीवचा वध केला असता तर रुमाला सुग्रीवच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा तरी मिळाला असता. पण वालीने सुग्रीवचा वध केला नाही अपितु त्याला पळवून लावले आणि त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याची पत्नी रुमा हिला आपल्या जवळ ठेवले. वानर समाजात ही नवरा जिवंत असताना, स्त्री दुसरा पती करू शकत नव्हती. बिना विवाह न करता परपुरुषा बरोबर संबंधाना त्या काळी समाजात मान्यता नव्हती. सुग्रीव जिवंत असल्यामुळे रुमाला वालीच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा मिळणे सुद्धा अशक्य होते. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर रुमा वालीची केवळ भोगदासी होती. वालीने तिच्या बरोबर जबरदस्तीचे शारीरिक संबंध निश्चितच ठेवले असतील आणि त्या संबंधातून अपत्य ही झाले असतील. त्या काळच्या परंपरेनुसार अवैध संबंधातून होणार्या अपत्यांना वानर समाजात ही दासीपुत्रांचा दर्जाच मिळाला असेल. अश्या दयनीय परिस्थितीत रुमाला जगावे लागले. त्या वेळी तिला किती मानसिक त्रास होत असेल, याची कल्पना करणे ही अशक्य.

सुग्रीव पुन्हा राजा झाला. म्हणायला रुमा किष्किंधा नगरीची पट्टराणी झाली होती पण सुग्रीवच्या हृदयाची पट्टराणी तर ताराच होती. सुग्रीव अधिकांश वेळ तारेचाच निवासी राहायचा. राजदरबारात ही तारेचीच चलती होती. कठीण प्रसंगी सुग्रीव तारेचाच सल्ला घ्यायचा. एकारितीने तारा त्याची तारणहार होती. एवढेच नव्हे, रुमाच्या जखमेवर मीठ म्हणून तारेचा पुत्र अंगद किष्किंधानगरीचा युवराज झाला होता. भविष्यात तोच राजा होणार होता. हे सर्व पाहून रुमाच्या मनात किती जळफळाट होत असेल, सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या खंडोबा या मालिकेत 'बानू' वरून खंडोबाच्या प्रथम पत्नी म्हाळसाबाईचा होणारा जळफळाट पाहून आपण कल्पना करू शकतो.

वाली पासून उत्पन्न होणार्या रुमाच्या पुत्रांचे भविष्य तर अंधकारमय होतेच. सुग्रीव पासून उत्पन्न पुत्रांवर ही एकारितीने म्हणाल तर अन्यायच झाला होता. राजाचे पुत्र असूनही ते सिंहासनाचे अधिकारी नव्हते.

पट्टराणी असूनही रुमाने सर्व अन्याय निमूटपणे सहन केला. त्या विरुद्ध आपला आवाज कधीच उठविला नाही. अत्याचार सहन करणाऱ्या दुर्बल लोकांचा इतिहास कधीच गुणगान करत नाही. कुठल्या ही कवी, चारण, भाट यांना त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा मिळत नाही. साहजिकच आहे रूमाला ही कुणी लक्षात ठेवले नाही.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 8:04 pm | उगा काहितरीच

सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या खंडोबा या मालिकेत 'बानू' वरून खंडोबाच्या प्रथम पत्नी म्हाळसाबाईचा होणारा जळफळाट पाहून आपण कल्पना करू शकतो.

याची गरज नव्हती , बाकी लेख छान.

विशाल कुलकर्णी's picture

3 Jul 2015 - 7:42 am | विशाल कुलकर्णी

याची गरज नव्हती , बाकी लेख छान.
सहमत आहे, कारण मुळात मालिकेत दाखवलेल्या कल्पनाच प्रचंड धेड़गुजरी आहेत. त्या मालिकेवरून तत्कालिन रुढीची ग्राह्यता ठरवणे हां वेडेपणा होईल. मुळात इथे मुख्य प्रश्न असा आहे की रामायण खरोखर झाले होते का? जरी होते असे गृहीत धरले तरी मागच्या 'तारा'वरील लेखावरून जाणवते की स्त्रीया स्वत:च्या मतानुसार राहू शकत होत्या, तेव्हा त्यावेळी स्त्रियांविरुद्ध जाणारीच परिस्थिति होती हे पटत नाही. अजुन एक मुद्दा म्हणजे वाली, सुग्रीव,मारुती यांना वानर म्हटले आहे. हां रामायणात उल्लेखलेला समाज खरोखर वानर होते की एखादी जंगलात राहणारी आदिवासी, अनागरी जमात होती.रामायणा नुसार हे सर्व दंडकारण्याचा म्हणजे सांप्रत नाशिकच्या आसपासपासचा भाग येतो. या भागात जव्हार, मोखाडा या भागात अजूनही आदिवासी पाडे आहेत जे मोस्टली मातृसत्ताक पद्धती जोपासणारे आहेत. अगदी स्त्रीसत्ताक पद्धती असते असे ऐकून आहे, तसे असेल वरील लेखातील बऱ्याच गोष्टी हे निव्वळ अंदाज़ ठरावेत.

सांगण्याचा हेतु इतकाच की रामायण, महाभारत या मुल्ये शिकवणाऱ्या कथा आहेत, त्यातुन तेवढेच घ्यावे. त्यावरून तत्कालिन संस्कृती , परंपरा यांचे अंदाज लावण्यात काहीच अर्थ नाही.

विवेकपटाईत's picture

3 Jul 2015 - 11:22 am | विवेकपटाईत

आपला मुद्दा मला ही पटतो. अधिकांश रामायणकारांनी रुमाला वगळले आहे. या लेखात केवळ रुमा सारख्या सामान्य स्त्रीच्या मनात काय चालले असेल या दृष्टीने विचार केला एवढेच.

रामायणात दंडकारण्य म्हणजे झाडीमंडळ हा प्रदेश येतो. भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि विंध्याभोवतीचे मध्यप्रदेशातील जंगल असा एकूण विस्तृत प्रदेश.
नाशिकचा उल्लेख रामायणात जनस्थान ह्या नावाने होतो.

पाणक्या's picture

3 Jul 2015 - 7:22 pm | पाणक्या

सह्मत. मला असे वाटते कि पौराणिक सगळेच संदर्भ अद्वैत अर्थाने दिले असावेत … उदाहरणार्थ

दशरथ - ५ कर्म इंद्रिये + ५ ज्ञान इंद्रियांचा आपला रथ (शरीर)
राम - आत्मा
सीता - देहबुद्धी (माया)
लक्ष्मण - मन
मारुती - दास्यभक्ती
रावण - अहंकार

सतिश गावडे's picture

3 Jul 2015 - 8:28 pm | सतिश गावडे

काही विशिष्ट पंथांची पुस्तके वाचता काय हो?

विशाल कुलकर्णी's picture

4 Jul 2015 - 10:16 am | विशाल कुलकर्णी

:)

सगळ्या पंथात कमी अधिक अर्थाने "एकच" गर्भित अर्थ दिलाय.

फारच वाईट!आज पर्यंत सुग्रीव पत्नी रूमाचि बाजू कुणी कधीच विचारत घेतलेली नव्हती. आपल्या मुळे तिला अल्पसा का होईना पण न्याय मिळाला. स्त्रीला केवळ वस्तू समजण्याची भारतातील एक घाणेरडी मनोव्रुत्ती!

ओखय, लेट्स इस्टार्ट फ्राम बुक आफ जिनेसीस( आरंभ/चॅपटर वन)... स्त्रीला केवळ वस्तू समजण्याची भारतातील एक घाणेरडी मनोव्रुत्ती आहे यात दुमत नाही पण ही का निर्माण झाली असावी बरे ?

भाऊ मी संपूर्ण बायबल २ वेळा वाचलेले आहे. अधून मधून मला ते वाचायला आवडतंही. पण त्याचा इथे काय संबंध?
धर्मग्रंथात काही का म्हणेनात. बुद्धीला तर पटते ना की असा भेदभाव केला जात असेल तर ते अयोग्य आहे.

जेनेसिस मध्ये ते बरगडी पासून स्त्री ची उत्पत्ती, निषिद्ध फळ खाणं, स्वर्गातून हकालपट्टी, स्त्रीला शाप ह्या कथा मला माहित आहेत. पण आपण किती दिवस दुसर्‍या कडे बोट दाखवून आम्हीच चांगले म्हणत राहणार. परमेश्वराला सुद्धा आपण देवी(स्त्री) स्वरूपात मानलंय. असो माझं मत मी मांडलेय. मला माहित्ये की यामुळे देशात किंवा जगात काही फार मोठे बदल घडणार नाहीत.

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 4:32 pm | द-बाहुबली

लेट्स स्टार्ट फ्रॉम बुक ऑफ जिनेसीस ही एक म्हण आहे... त्याचा अर्थ चला (हवा येउद्या न्हवे) सुरुवातीपासुन सुरुवात करुया.

म्हणजेच भारतात स्त्रियांना वस्तु समजयची नेमकी शुरवात का झाली असेल (रुट कोझ) चा शोध घेतला की बर्‍याच प्रश्नांची उत्तरे/उतारे मिळतील असे वाट्ते.

हा इंग्रजी वाक्प्रचार आहे होय! आम्हाला काय कळणार इतकं अ‍ॅडव्हान्स इंग्लीश!
असो, पण मला खरंच खूप वाईट वाटतं. स्त्रीचा केवळ एखादी वस्तू किंवा गुलाम असा वापर केलेला दिसला की खरंच खूप राग येतो.

द-बाहुबली's picture

6 Jul 2015 - 5:43 pm | द-बाहुबली

तुमाला बायबल समजते/आवडते हिच मुळात फार मोठी गोष्ट आहे, बुकॉफ जिनेसीस तर सुरुवात आहे असो...

की खरंच खूप राग येतो.

स्वाभावीक आहे पण मला मुळातच वरवरच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा रुट कॉझ हुडकणे जास्त महत्वाचे वाटते ? म्हणजे... का ? का ही सुरुवात झाली असावी...?

तुडतुडी's picture

7 Jul 2015 - 3:35 pm | तुडतुडी

गैरसमज झालेला दिसतोय . वालीच्या अन्यायाला , त्याच्या निचपनाला शासन करण्यासाठी वालीचा वध केला गेला. वाली अहंकारी , संतापी असला तरी सुग्रीव मात्र मवाळ होता . वालीला आपण धोक्याने मारलं हीच बोच त्याच्या मनाला लागून राहिली होती . ती बोच कमी होण्यासाठी श्री रामाने त्याला अंगदला
युवराज घोषित करण्याचं सुचवलं .
म्हणायला रुमा किष्किंधा नगरीची पट्टराणी झाली होती पण सुग्रीवच्या हृदयाची पट्टराणी तर ताराच होती.>> हे विधान अर्थहीन तसंच आधारहीन हि आहे .
स्त्री च्या सन्मानासाठी 'लग्न' हा शिक्का बसणं गरजेचं असल्यामुळे (मंदोदरी ने सुधा रावणाच्या मृत्यू नंतर बिभिषनाशी लग्न केलं होतं . ) तारा चं दुःख कमी होण्यासाठी आणि तिला पूर्वी चा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी हे लग्न झालं. पण त्यामुळे सुग्रीव तिच्याबाबतीत कामुक झाला किवा ती त्याच्या हृदयाची पट्टराणी झाली हा समाज चुकीचा आहे . हा आपण आपल्या पद्धतीने केलेला विचार आहे . रामायणात असं कुठेही म्हणलेलं नाहीये .

वानर समाजात पतीच्या मृत्यू नंतर स्त्री पुन:विवाह करू शकत होती>>>
पूर्वीच्या काळी पती मृत्यू नंतर पुनर्विवाह करायची इच्छा असणार्या स्त्रिया पुनर्विवाह करू शकत होत्या असं वाटतंय .
ज्यांना आपल्या नवर्यांशी संग करायला आवडत नसे त्यांच्यासाठी नवर्याला बदलावे लागे किवा तिच्या इच्छेप्रमाणे संग करणे टाळावे लागे उदा . अगस्ती - लोपामुद्रा , च्यवन ऋषी आणि त्यांची पत्नी . आता त्या स्त्रीचं नाव आठवत नाहीये पण तिचं लग्न बृह्स्पतीशी झालं होतं . पण तिला ते मान्य नवतं . मग तिने चंद्राशी लग्न केलं . एकापेक्षा अनेक पुरुषांशी लग्न करणारी द्रोपदी हि पहिली स्त्री नवती .
मला वाटतं पतिव्रतेचे वांझोटे नियम मध्य युगीन काळामध्ये निर्माण झाले असावेत . लहानपणी मुलींचं लग्नं करण , पुनर्विवाहाला बंदी , विधवा झाल्यावर ते केशवपन आणि ते भयानक जगणं हे साधारण मुस्लिम आक्रमणं सुरु झाल्या नंतरच्या काळात आलं असावं .
कारण त्या आधीच्या काळामध्ये असलं काही दिसत नाही .

सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या खंडोबा या मालिकेत 'बानू' वरून खंडोबाच्या प्रथम पत्नी म्हाळसाबाईचा होणारा जळफळाट पाहून आपण कल्पना करू शकतो.>>>
ब्राह्मणांनी खंडोबाला देव म्हणून मान्यता द्यावी म्हणून धनगरांनी तो महादेवांचा अवतार असल्याच्या कहाण्या रचल्या. खंडोबा हा कसलाही देव वगेरे नाहीये . हि मालिका तर अगदी बिनडोक आणि बालिश आहे. आदि शक्ती कधी तिच्या खर्या स्वरूपाला विसरणं शक्य आहे का? आणि आपल्या दासीला आपला नवरा आवडतो म्हणून त्यानं तिच्याशी लग्न करावं असं वाचन कुठली पत्नी तिच्या पतीकडून घेईन का ? हा गाढवपणा आदि शक्ती कडून घडणं शक्य आहे का ? आणि आता तर काय म्हणे जिला आधी तिचं मुल स्वरूप आठवेल ती कैलासात जाईल .काय पोरखेळ लावलाय का ?

सिरुसेरि's picture

7 Jul 2015 - 6:27 pm | सिरुसेरि

रामायण ( वाल्मिकी ), महाभारत ( व्यास ) या महाकाव्यांतील मुख्य व उप कथानके यांचा विस्तार एवढा व्यापक आहे , कि , त्यामुळे , अमुक एक पात्र हे चांगले व तमुक एक पात्र ते वाईट असे सरसकट अनुमान काढणे अवघड आहे . त्यापेक्षा या कथानकांमधुन मिळणारी शिकवण जास्त महतवाची .