खूप दिवसांपासून झोया अख्तर ह्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. ‘दिल धडकने दो’ चित्रपट आला आणि आम्ही ठरविले की सगळी कामे बाजूला ठेवून चित्रपटाला जायचे.
कॉमेडी-ड्रामा जानरा असलेल्या ह्या चित्रपटाने तगडी स्टार कास्ट घेउन प्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेतला आहे.
झोया अख्तर ह्यांचे दिग्दर्शन आणि एकाहून एक दिग्गज कलाकार अशी सुरेली महफिल जमल्यावर उत्तम चित्रपट तयार होणार हे सांगणे न लागे!
उच्च वर्गीय कुटुंबाची ही कथा आहे. नात्यानात्यांमधील हलके प्रसंग उत्तम प्रकारे मांडले आहेत. सुरवातीला थोडा स्लो वाटणार चित्रपट मध्यंतरानंतर वेग घेतो. रणवीरने सदर केलेला स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा मुलगा, त्याहूनही स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी तरीही आई वडिलांच्या शब्दाला मान देणारी प्रियांका प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा मिळवून जातात.
अत्यंत अदबीने वागणारा, मिळालेल्या संधीचे चीज करणारा आणि पहिल्या प्रेमाला कधीही न विसरणारा फरहान अख्तर मात्र छोटा रोल प्रचंड मोठा करून जातो. अनुष्का शर्माने साकार केलेली डान्सर मनाला भावून जाते.
अनिल कपूरची अनेक रूपे चित्रपटाची जमेची बाजू! वेगवेगळ्या भावना आणि प्रसंगातून जाणारा पिता अनिल कपूर ह्यांनी अप्रतिम वठवला आहे.
चित्रपटाची गाणी मनाचा ठाव घेतात. मला आवडलेले गाणे 'गल्ला गुडीया'! हाय एनर्जी चे हे गाणे यंदा ठीकठिकाणी लाऊड स्पीकर वर ऐकायला मिळणार हे निश्चित!
राहुल बोस आणी झरीना वहाब ह्यांचे रोलस त्यांच्या क्षमतेच्या मानाने बरेच छोटे असले तरी त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली आहे.
शेफाली शाह ह्यांनीही आपली भूमिका उत्तम वठवली आहे.
अलगद उलगडत जाणाऱ्या प्रेमाच्या अनेक छटा हळूवारपणे प्रेक्षकांच्या समोर ठेवणारा हा चित्रपट जरूर बघा.
जालावरून साभार
प्रतिक्रिया
12 Jun 2015 - 9:38 pm | एक एकटा एकटाच
पहायला पाहिजे म्हणजे......
12 Jun 2015 - 9:38 pm | जेपी
चित्रपट आजच पाहिला.
दिल चाहता है..जिंदगी ना मिलेगी दोबारा..नंतर..दिल धडकनो..
फरहानच्या चित्रपटांचा एक त्रिकोण पुर्ण झाला.
प्रिंयका अजुन मेरीकोम मधुन बाहेर पडली नाही.
बाकी एकदा पाहण्यासारखा आहे.
15 Jun 2015 - 4:10 pm | चिनार
तुमच्या वाक्यातला मतितार्थ लक्षात आला आहे. पण दिल चाहता है फरहानने दिग्दर्शित केला होता. त्याने त्यात अभिनय केला नव्हता. तसेच जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि दिल धडकने दो ह्यात फरहानने अभिनय केलाय. दिग्दर्शन त्याच्या बहिणीचे आहे.
बाकी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ह्यात फरहान अत्यंत तरबेज आहे यात वाद नाही...
12 Jun 2015 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तोंड ओळख अजून पाहिजे होती असे वाटले.
बाकी, ते गलिया गुडीया आता ऐकलं काही झेपलं नाही. :(
-दिलीप बिरुटे
12 Jun 2015 - 9:56 pm | NiluMP
बकवास
12 Jun 2015 - 10:07 pm | सिद्धार्थ ४
+१
18 Jun 2015 - 11:34 am | माझीही शॅम्पेन
ह्या वर्षी पाहिलेला सर्वात बंडल आणि बकवास चित्रपट , सामीरसुर किंवा फारेंड यांना योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी मानाची सुपारी देण्यात येत आहे :)
12 Jun 2015 - 9:58 pm | रेवती
पहावासा वाटतोय. संधी मिळताच पाहीन.
12 Jun 2015 - 11:59 pm | द-बाहुबली
माताय, प्रियांका फोर्ब्जच्या टॉप टेन मधे आलेली असते स्वतःच्या जिवावर अन सासुला, नवर्याला हे सांगायची हिंम्मत करु शकत नाही की ती एक करीअर ओरीएंटेड बाइ आहे ? घटस्फोटासाठी कारण काय देते तर मुझे उससे प्यार नाही है ? तिने दागीने विकुन व्यवसाय सुरु केलेला असतो म्हणे.. कैच्याकै.. एव्हडी कर्तुत्ववान बाइ घुसमटून जगत असते ?
सगळीच पात्रे मध्यवर्गीय कर्मकहाण्या जगताना दाखवली आहेत... हा सुरज बडजात्या फॉर्म्युला आहे. कथा एकदम श्रीमंत उच्च वर्गीय कुटुंबाची आहे म्हणायचे पण सगळी पात्रे फॉलो मात्र टीपीकल मिडलक्लास व्याल्युज करताना दाखवायची...
हे कमी की काय लोपसांग रामपाच्या मांजरी प्रमाणे ही कहाणी आपल्याला प्लुटो मल्होत्रा (कुत्रं) सांगत असतं.. हाइट आहे राव स्वतःला मुर्ख बनवुन घ्यायची. बाकी गाण्यांची चित्रीकरण मला खुप आवडले. सगळ्याच... वन टाइम कसाबसा वॉच.
13 Jun 2015 - 1:12 am | जुइ
थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहेस चित्रपटाची. मात्र नेटफिक्सवर वगैरे आला तर पाहीन मुद्दाम थियटर मध्ये जाऊन नाही.
13 Jun 2015 - 9:25 am | मुक्त विहारि
मग आपला पास.
वेळेचा आणि पैशाचा चुथडा.
13 Jun 2015 - 1:46 pm | निनाद मुक्काम प...
उच्चवर्णीय
तुम्हाला गर्भश्रीमंत म्हणायचे आहे का
नायकाचे स्वताच खाजगी विमान असते
आणि बहिणीचे नाव फोर्ब आणि बरेच काही
ह्यातील सर्व समस्या मात्र उच्च मध्यमवर्गीय घतील दाखविल्या असून त्यामुळे प्रेक्षकांना त्याचे नाविन्य वाटत नाही आणि अपील होत नाहीत कारण ह्या सर्व मुद्द्यांवर ह्या आधी कितीतरी वेळी सिनेमातून चर्चा झालेली आहे
आता तन्नू आणि मन्नू मध्ये जशी बाकीची सहाय्यक पात्र नैसर्गिक अभिनयाने सिनेमातील कथेचा महत्त्वाचा भाग बनतात तसे येथे न होता बाकीचे कलाकार येथे पाट्या टाकतात .
हा सिनेमा दहा वर्षापूर्वी आला असता तर त्याचे नावीन्य जपल्या गेले असते ,
तुम्ही रणवीर चे कट्टर पंखे असाल तर त्याच्यासाठी हा सिनेमा थेटर मध्ये जाऊन पाहण्यात हरकत नाही
नाहीतर आंजा जिंदाबाद
सिनेमाची मांडणी बडजात्याची व बाहेरील साज चोप्रा व जोहर प्रणीत भव्यता व बटबटीत पणाचा आणि दिखाऊ पंजाबीपणाचा आता भारतीय प्रेक्षकांना उबक आल्याचे गल्लाबारीवर दिसून आले आहे
आता सलमान व बडजात्या असे मिश्रण असेल तर वेगळी गोष्ट आहे.
15 Jun 2015 - 7:50 pm | रेवती
त्या रणवीरला पाहिलं तरी रागराग होते. कसला अर्मट, उद्धट, अचरट, निर्बुद्ध, क्रूर वाटतो.
18 Jun 2015 - 12:18 am | द-बाहुबली
नक्किच. पण अभिनय तितकाच समरसुन व चांगला करतो त्यामुळे चित्रपट सोडुन इतर कुठेही तो दिसला की धुम ठोकायची...
13 Jun 2015 - 2:52 pm | पद्मावति
अनिल कपूर ला अशा पॉलिश्ड अवतारात बघायची सवय नाही त्याचीही उत्सुकता आहेच. बाकी शेफाली शाह तर हसरते पासून माझी आवडति अभिनेत्री.
चला येत्या वीकेंडचा प्रोग्राम नक्की झाला आमचा.
15 Jun 2015 - 4:09 pm | सचिन धुमाळ
शेवट खुप मेलोड्रमाटिक आहे. लग्न होउन ६ ते ७ वर्ष झाली आहेत असे मानले तर दागिने विकुन इतक्या कमी वेळात फोर्ब्स लिस्ट मध्ये नाव येणे जरा जास्त वाटत!!!. शिवाय आपले विचार स्पष्ट माहित नसणे, ते सान्गताना घाबरणे हे एका सी.ई.ओ. कडुन अपेक्षित नाहि. जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटा समोर अगदीच य आहे. आणी तसही आता पन्जाबी वातावरणा चा वैताग आला आहे. हा चित्रपट करण जोहर चा म्हणुन सुधा खपुन जाईल!
15 Jun 2015 - 4:23 pm | चिनार
चित्रपट एवढा आवडला नाही. जिंदगी ना मिलेगी दोबारा सारखा निखळ तर अजिबातच नाहीये.
एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असणारा अनिल कपूर एक छोटे विमान विकून त्यातून पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतो हे बालिश वाटते. रणवीर सिंग हिरो आहे म्हणून त्याला प्रेमात पाडलेच पाहिजे या हट्टाने त्याची आणि अनुष्काची प्रेमकहाणी घुसडल्यासारखी झाली आहे. आणि फक्त एक प्राह्यवेट जेट विमान चालवता येते म्हणून "मै इसी में कुछ करना चाहता हु" सारखे discovering myself छाप वाक्य म्हणजे कहर आहेत.
सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. पण शेवट काहीतरी धावाधाव करून गुण्डाळल्यासारखा वाटतो.
15 Jun 2015 - 8:22 pm | अर्धवटराव
मला हा चित्रपट बिर्याणी शिजवण्यासारखा वाटला. बासमती तांदूळ आणि मसला सुरुवातीलाच मिक्स करुन मंद आचेवर बिर्याणी शिजत राहावी व मंद सुंगध दरवळत राहावा असं काहिसं वाटलं. जास्त शिजवण्यामुळे शेवट मात्र भरकटला. सुरुवातीला महिला स्वातंत्र्य ह मूळ विषय अजीबात नसताना शेवटी गाडी त्या अंगाने सुसाट पळते व आचरट शेवटावर आदळते. झिंदगी ना मिलेगी दोबारा (माझा वन ऑफ द मोस्ट फेव्हरेट) मधे मनांची घालमेल टिपायला बैलांचं जीवघेणं उधळण्याचं रुपक फार कल्पकतेनं वापरलय. इथे मात्र क्लायमेक्सला दिग्दर्शकाला काय म्हणायचय कळतच नाहि.
चित्रपट एकदा बघायला हरकत नाहि.