मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे. संपूर्ण चित्रपट एक नितांत सुंदर अनुभव देऊन जतो.
लागे राहो मुन्ना भाई नंतर पहिला चित्रपट असेल ज्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागाइतकाच प्रभावी बनवला आहे. कथा अगदी तिथूनच चालू होते जिथे पहिला भाग संपला होता. तनू आणि मनू च्या लग्ना नंतर त्याचं वेगळ होण आणि मनू च्या आयुष्यात तनू सारखी दिसणारी मुलगी येण, मनू तिच्या प्रेमात पडण असा आजकालच्या कुठल्याही मराठी हिंदी मालिके मध्ये शोभेल असा विषय घेऊन दिग्दर्शक आनंद राय यांनी चित्रपट बनवलाय. चित्रपटाचा शेवट हि आपल्या सर्वांना अपेक्षित असा मराठी हिंदी मालिकांमध्ये शोभेल असाच आहे परंतु चित्रपटाचे सादरीकरण हा या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे जिवंत केल्या आहेत, विशेष कौतुक करावे लागेल ते कंगना राणावत चे संपूर्ण चित्रपट मध्ये तिने तिच्या वाट्याला आलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे वठवल्या आहेत. माझ्या आवडत्या नायिकांमध्ये काजोल नंतर कंगनाचा नंबर लागेल असे वाटते. दोन व्यक्तिरेखा आणि त्याही परस्परांपासून अगदी वेगवेगळ्या, केवळ किंचितसे चेहऱ्यामध्ये साम्य. या चित्रपटाने डबल रोल चा एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.
एकूणच काय तर चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे, पूर्वीच्या जामन्या सारखे दोन दोन वेळा थेटरात तिकीट काढून बघण्याचा मोह आवारत नाही.
- पुणेकर
प्रतिक्रिया
30 May 2015 - 9:09 am | द-बाहुबली
आर माधवन ने पारंपारीक स्त्रिमनाचे व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती आणी (दोन्ही) कंगनाने पारंपारीक पुरुषमनाचे व्यक्तीमत्व असलेली(ल्या) व्यक्ती तगड्या उभ्या केल्या आहेत. कंगनासोबत तिच्यावर लाइन मारणार्या वकिलाने प्रसंगात अजुन धमाल आणली आहे. मजा आली. अजुन एकदा नक्किच बघेन.
2 Jun 2015 - 11:15 pm | अर्धवटराव
मनोरंजन होतं बरच.
गाणि थोडी अवास्तव आणि अतिरेकी वाटली. चित्रपटाचा शेवट फार कंटाळवाणा वाटला.
2 Jun 2015 - 11:20 pm | श्रीरंग_जोशी
हे परिक्षण वाचून चित्रपट बघण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
पहिला भागही आवडला होता पण शेवट फारच रटाळ होता.
2 Jun 2015 - 11:24 pm | सतिश गावडे
अश्लीलता, हिंसाचार, पाणचट विनोद यातले काहीही नसणारा, हलक्या-फुलक्या विनोदी प्रसंगातून निखळ मनोरंजन करणारा सुंदर चित्रपट.
3 Jun 2015 - 8:43 am | प्रचेतस
:)
3 Jun 2015 - 9:20 am | सतिश गावडे
आवड ज्याची त्याची. :)
2 Jun 2015 - 11:28 pm | रेवती
बघणार.
पण पहिल्या शिनेमाच्या शेवटाला त्यांचे लग्न होते असे दाखवलेय ना? त्यात ते वेगळे झालेले नसतात ना? आठवत नाही.
2 Jun 2015 - 11:37 pm | रुपी
फारच छान चित्रपट आहे. शेवटी जरा रखडलाय, पण पैसे खर्च करुन थिएटरमध्ये बघण्यासारखा नक्कीच आहे! कंगनाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
3 Jun 2015 - 12:47 am | एक एकटा एकटाच
चित्रपट तसा ok आहे.
पण कंगना rocksssss
भूमिका जगण म्हणजे काय ?
हे अनुभवायच असेल तर मग ह्या चित्रपटातली कंगनाची भूमिका आवर्जुन पहा.
3 Jun 2015 - 9:27 am | सतिश गावडे
3 Jun 2015 - 10:22 am | प्रसाद१९७१
काय डायलॉग आहे!!!!!!!!
3 Jun 2015 - 10:56 am | पिलीयन रायडर
डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण पटला नाही..
तनु मनु शर्माला चक्क पागलखान्यात पाठवते. मित्रालाच त्याला सोडवुन आणायला लावते. तिला लग्नाचा कंटाळा आलेला असतो. मग चिडुन ती वाट्टेल तसे कपडे घालुन कानपुर मध्ये आधीच्या मित्रांसोबत फिरत बसते.
इकडे मनु शिस्तीत एका चांगल्या मुलीच्या प्रेमात पडतो. घरी जाउन मागणी घालतो आणि सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचं म्हणतो तर तो "बदचलन"?
पिक्चर खरंच ठिकच आहे. स्टॉरी काही विषेश नाही. गाणी फार लक्षात राहिली नाहित (पिया मुव्ह ऑन आणि बन्नो तेरा स्वेटर हीच काय ती आवडली). डायलॉग चांगले आहेत. अनेक इल्लॉजिकल गोष्टी आहेत. नीट कळत नाही की कोण कुठे कशाला चाल्लय.. इंटरव्हल नंतर हुकलाय पिक्चर.
कंगना सोडुन कुणालाही तसा फारसा वाव नाही. आणि तसंही तिनी खाऊन टाकलय सगळ्यांना. दिसलीये सुंदर आणि अभिनयही लाजवाब. दोन वेगवेगळे बेसरिंग्स मस्त सांभाळलेत तिनी. फक्त स्त्री व्यक्तिरेखेवर आधारित पिक्चर (जसं की डर्टी पिक्चर, क्वीन .. होतेच स्त्री पात्रावर आधारित) नसुनही हिरोइनने खाऊन टाकलेला पिक्चर आहे हा.
3 Jun 2015 - 12:46 pm | सतिश गावडे
सहमत.
एका बालिश स्वभावाच्या मुलीला एक सरळ साधा नाकासमोर चालनारा मुलगा नवरा म्हणून मिळतो. आपल्या स्वभावामुळे तिला ते लग्न टिकवता येत नाही. मात्र आपला नवरा कुणा दुसर्या मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न करतोय हे कळताच ती भानावर येते. त्यानंतर नवरा परत मिळावा म्हनून ती करत असलेली धडपड, तिच्या मनाची होणारी घालमेल आणि या सगळ्याचा गोड शेवट हि या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
कंगना रानावतने साकारलेली हरयानवी मुलगी हा सुंदर अभिनयाचा नमुना आहे. त्या एका व्यक्तिरेखेसाठी हा चित्रपट पहावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
3 Jun 2015 - 12:52 pm | नाखु
मराठीत हुताच की मुंबईचा फौजदार रंजना आणि रवींद्र महाजनीचा.
त्यात पण गांवढळ म्हणून नाकारलेली बायको नव्या रूपात आवडते फौजदाराला.
मराठी सिनेमा प्रेक्षक
नाखु
3 Jun 2015 - 2:30 pm | अविनाश पांढरकर
+१
15 Jun 2015 - 9:38 pm | विअर्ड विक्स
चित्रपटाचा शेवट बिलकुल पटलेला नाही. कंगना चा अभिनय उत्कृष्ट… स्वावलंबी ,साहसी धावपटू सोडून बेजबाबदार बायकोला परत स्वीकारण्यारा पतीला सुरवातीच्या बदली शेवटी वेड्याच्या इस्पितळात टाकलेले दाखवणे अधिक संयुक्तिक ठरले असते. प्रेम आंधळे असते हेच खरे ????? नक्की तुटक्या मुटक्या लग्नाचे बंधन मोठे का प्रेमाचे ?
स्वरा भास्कर छोट्याश्या भूमिकेतही बरच भाव खाऊन जाते…
3 Jun 2015 - 12:52 pm | मृत्युन्जय
..... आणि बन्नो तेरा स्वेटर हीच काय ती आवडली
ते बन्नो तेरा स्वेगर असे आहे. स्वेगर म्हणजे अॅटीट्युड :) (थॉडा अॅरोगंट अॅटीट्युड )
3 Jun 2015 - 1:07 pm | पिलीयन रायडर
हा हा हा!!!! =))
ती जिकडे तिकडे स्वेटरच घालुन नाचत असते म्हणून म्हणलं असेल स्वेटर!!! आजकाल काय साम्गता येत नाही ना गाण्यांच!!!
3 Jun 2015 - 3:51 pm | ब़जरबट्टू
हरीयाणा में इतनी फाडफाड अन्गेजी ना होती ताऊ... :)
10 Jun 2015 - 3:38 pm | मोहनराव
चित्रपट ठिक आहे. कंगनाचा अभिनय वाखाणण्याजोगा. पण विशेष अशी काही स्टोरी नाही. शेवट काय होणार हे माहित असल्या कारणाने सस्पेन्स असा काहीच राहत नाही.
3 Jun 2015 - 9:31 am | किसन शिंदे
मस्त आहे चित्रपट..
बर्याच दिवसांनी चित्रपटगृहात असा चांगला चित्रपट पाहायला मिळाला.
3 Jun 2015 - 10:05 am | आकाश कंदील
गेल्या रविवारीच चित्रपट पहिला पण जेवढी हवा झाली आहे तेवढा rocking वाटला नाही. मला 'वासरात लंगडी गाय शहाणी' या म्हणीचा प्रत्यय आला
3 Jun 2015 - 11:00 am | मदनबाण
कंगनासाठी पहायला हवा असं दिसतय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
3 Jun 2015 - 12:15 pm | चिगो
मला आवडला चित्रपट.. कंगना धमाल, पप्पीभैयापण जबराट. डायलॉग्सचं बेअरींग जबराट.. एक ब्लिंक अँड मिस डायलॉग "आप क्या सलमान खान हो, जो कमिटमेंट इश्युज हो रहे हैं" ;-) एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे चित्रपट..
मला 'पिकू' जास्त हवाबाजीवाला वाटला पिक्चर.. लै हवा बनवली होती बाबा..
मात्र 'तनु वेड्स मनु'ची गाणी जास्त चांगली होती.. खास करुन 'रंगरेज' आणि 'युं ही'..
3 Jun 2015 - 12:19 pm | किसन शिंदे
लै वेळा शमत...
3 Jun 2015 - 2:55 pm | अविनाश पांढरकर
मलाही 'पिकू' जास्त हवाबाजीवाला वाटला.
3 Jun 2015 - 1:54 pm | भुमी
+१
3 Jun 2015 - 12:54 pm | मृत्युन्जय
मला तर आवडला ब्वॉ चित्रपट. परीक्षण पण लिहायला घेतले होते. पण आता धागा आलाच आहे तर लिहुन काय उपयोग म्हणुन अर्धवटच ठेवले. चित्रपट जरुर बघावा असा आहे,
3 Jun 2015 - 1:52 pm | शलभ
आम्हालाही खूप आवडला हा चित्रपट. आमच्या Anniversary ला बघितला. First Day First Show.
पण शेवटी दत्तो बरोबर लग्न झालं पाहिजे होतं.
तुम्ही परीक्षण लिहाच. आवडलेल्या चित्रपटाचे परीक्षण वाचायला जास्त मजा येते. :)
3 Jun 2015 - 3:04 pm | गिरकी
चित्रपट चांगला आहे. कंगना फारच भारी आहे. दोन्ही दोन टोके असलेल्या भूमिका अक्षरश: जिवंत केल्यात. पण मुळात या दोन्ही भागांमध्ये एकमेकांबद्दल निर्माण होणारी प्रेमं बेसलेस वाटली.मागच्या भागाप्रमाणेच या भागात सुद्धा शर्माजी फक्त चेहरा पाहून दत्तोच्या प्रेमात पडतात. आणि दत्तो का शर्माजीन्च्या प्रेमाला प्रतिसाद देते ते कळलेच नाही. कुणाला कळलं असेल तर मला पण सांगा प्लीज. :)
बाकी बेस नसेल तरीही मला असले शिनेमे लै आवडत्यात. त्यामुळं हा पण आवडलाच. पिकू पेक्षा ५०० पट चांगला आहे.
3 Jun 2015 - 5:03 pm | पिलीयन रायडर
बेसलेस बद्दल सहमत..
आणि पिकु मध्ये नक्की काय भारी होतं काही कळालं नाही. अगदीच सर्व साधारण शिनेमा..
3 Jun 2015 - 6:12 pm | सतिश गावडे
दत्तो तनूसारखी दिसते हा त्या प्रेमाचा बेस. :)
3 Jun 2015 - 7:20 pm | मित्रहो
चित्रपटाचा पहीला भाग आवडला. काही प्रसंग लइ भारी होते विशेषतः पागलखान्याचा भाग. किंवा कुणाचा फोन आला आणि सहज प्रश्न की शर्माजी कैसे है तो वो पागलखाने मे है. पप्पी तर मस्तच. भारी मजा आली पहील्या भागात.
दुसऱ्या भागात काय घडत होते काही कळत नव्हते. विनोद पण कमी झाले. उगाचच स्त्रीमुक्ती वगेरेच्या घोषणाही आल्या. मधेच टेस्ट ट्युब बेबी आली काही कळत नव्हते. कदाचित पहील्या भागात वाढलेल्या अपेक्षामुळे दुसरा भाग फिका वाटला. कंगणा राणावत जबारी. दत्तो म्हणजे कित्येक वर्षात असा अभिनय बघितला नाही.
एक वेगळा विचार. हिंदीमधे हल्ली वेगवेगळ्या भागातली बोली भाषा घेउन बरेच चित्रपट लिहिले जातात. हरयाणवी, उत्तर प्रदेशातली हिंदी, पंजाबी, बिहारी, बम्बैया हिंदी. मराठीत असे करताना फार आढळत नाही.असा प्रयोग मराठीत सुद्धा व्हायला पाहीजे.
बाकी हवाबाजी म्हणा की आणखी काही आपल्याला पिकूच जास्त आवडला.
4 Jun 2015 - 3:00 pm | अन्या दातार
वेगळा विचार आणि पिकूबद्दल सहमत. पिकूचे सट्ल विनोद जाम आवडल्या गेले आहेत.
12 Jun 2015 - 5:38 pm | यशोधरा
अतिशय सहमत. सुरेख सिनेमा आहे पिकू.
3 Jun 2015 - 9:27 pm | मुक्त विहारि
नावावरून तरी इंग्रजी वाटत आहे.
4 Jun 2015 - 2:18 pm | सिरुसेरि
तनु वेडा मनु या चित्रपटातुन खुप चुकीचा संदेश समाजामध्ये जात आहे . एखादी मुलगी कितीही दुर्गुणी , दारुबाज , सिगारेट पिणारी ,नौटंकीबाज , भानगडबाज असली , तरी , ती जर दिसायला बरयापैकी असेल तर तिला डॉक्टर ,एन आर आय , सतत मागे मागे करणारा बाईलवेडा असा नवरा आरामात मिळुन जातो . थोडक्यात काय तर साधे सरळपणाने राहणे हा मुर्खपणा झाला आहे .
4 Jun 2015 - 2:41 pm | टवाळ कार्टा
तुम्ही उलट लिहिले आहे...तो पिच्चर सध्ध्याच्या समाजाचे प्रतिबींब आहे
4 Jun 2015 - 2:48 pm | मदनबाण
ती जर दिसायला बरयापैकी असेल तर तिला डॉक्टर ,एन आर आय , सतत मागे मागे करणारा बाईलवेडा असा नवरा आरामात मिळुन जातो .
यात नविन काय ? स्त्री सौंदर्याने भले भले मोहित होतात, आणि अश्या स्त्रीयांना सुद्धा आपली "व्हॅल्यू" कॅश कशी करायची असते ते व्यवस्थित माहित असते ! असुरांच्या पुढे काही चालले नाही तेव्हा भगवान विष्णू ने "मोहिनी" रुप धारणे केले, लगेच रिझल्ट मिळाला की नाही ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swift
4 Jun 2015 - 5:32 pm | बॅटमॅन
पुरुषही कसाही असला तरी पैसा असेल तर लग्नाचे टेन्शन कधी भेडसावत नाही. तोच न्याय इथेही. कोणी कितीही आपटली तरी हे वास्तव नेहमीच राहील.
4 Jun 2015 - 4:00 pm | ब़जरबट्टू
पिकू पेक्षा तनु वेड्स मनु ५०० टक्के सुरस ? असे काय आहे या मध्ये.. एक दत्तो का कुसुम ? सोडली, तर ठो आहे मुव्ही.. नवरा भाव देत नाही, म्हणून गावाकडे येऊन जुन्या- जाणत्या यारांना भेटणे...फिरणे, व त्यात तो बदचलन चा डायलाग.. हा तर माधवनच्या तोंडी असायला हवा होता ना ? बाकी पुर्ण थीमच पाणचट वाटली.. लगेच यार फिरवणे काय, नविन मैत्रिण शोधणे काय, दत्तो ने या सेकन्डहण्ड ढेरपोटयाच्या प्रेमात पडणे काय.. लय कचरा होता राव....
त्यामानाने पिकू किती तरी सरसच की.. काय अभिनय केलाय राव अमिताभ ने.. स्वता:च्या आयुष्यावर पोरीचे सुख ही उधळुन देणारा म्हातारा, व हे माहीत असुनही, मनात राग धुसमसता ठेऊन सर्व करणारी पिकु...
असू द्या.. पैसे तुमने भी दिये, हमने भी दिये... :) टोरंट को ही सही.. :)
12 Jun 2015 - 2:43 pm | बॅटमॅन
अगदी असेच म्हणतो.......
4 Jun 2015 - 4:06 pm | राजेंद्र मेहेंदळे
चित्रपट छान असेल...पण चकटफु नेटवर मिळाला कि बघितला जाईल :)
4 Jun 2015 - 10:45 pm | सव्यसाची
तनु वेड्स मनु चा दुसरा भाग पाहिला. खरेतर पुर्ण पाहिला असे म्हणवत नाही. इंटर्वल च्या आधीच कंटाळा यायला सुरुवात झाली. इंटर्वल नंतर तर लक्षच दिले नाही. काहीही चालले होते चित्रपटात. शेवट कधी होतोय असे झाले होते. असो.
पिकु मला आवडला होता. (त्यातही बंगाली भाषेच्या उच्चारांबद्दल मला आक्षेप आहेत पण थोड्या वेळासाठी ते सोडुन देउ.) तिघांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे. आपल्या मुलीने कायम आपल्याच बरोबर राहावे यासाठी म्हातार्याने चालवलेला खटाटोप पाहण्यासारखा आहे.
आपल्या भावजयीसाठी नोकरी शोधुन देउनही तिने काम स्विकारले नाही म्हणुन तिला समजावतात तेव्हा त्या म्हातार्याचे अंतरंग दिसुन येते.
असो. असे कित्येक प्रसंग आहेत. चित्रपटाचे संगीत उत्तम होते. मागे वाजणारी सरोद अतिशय सुंदर.
4 Jun 2015 - 11:14 pm | मित्रहो
मला वाटते चांगले चित्रपट थेटरात जाउनच बघावे तरच चांगले चित्रपट बनतील. पिकू आणि तनू वेडस मनू हे चांगले चित्रपट आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगवगेळी असू शकते. कुठेही अश्लीलता किंवा उगीचच टाकलेली हिंसा नाही.
दुसरे असे की बऱ्याच देशातील चित्रपटसृष्टी हॉलीवूडने खाउन टाकली. आज व्यावसायिक अशी चित्रपटसृष्टी फारच थोड्या देशात उरलीय, भारत हा त्यातला मोठा देश. नाहीतरी काही वर्षानी सारे हॉलीवूडचेच चित्रपट राहतील. तसेही अगदी लहान वयात मुले डिस्ने, पिक्सरशी जोडले जातात. हॉलीवूड वाइट आहे असे नाही पण अश्लील किंवा हिंसक चित्रपट बनवण्यात हॉलीवू़डचा हात कोणी धरु शकत नाही. चित्रपट जर चांगला असेल तर तो मग हिंदी असो की मराठी बघायलाच हवा.
12 Jun 2015 - 12:57 am | स्वच्छंद
शेवट वेगळा हवा होता असं राहून राहून वाटतं..
12 Jun 2015 - 11:23 am | माझीही शॅम्पेन
मला चित्रपट आवडला पप्पी आणि कंगनाने फुल्टू बहार आणली आहे , इतका जबरदस्त डबल रोल हल्लीच्या काळात पाहिला नाही
TWM पार्ट १ आता पार्ट २ आणि क्वीन कंगना लिजेंड बनत चालली आहे
12 Jun 2015 - 11:31 am | बॅटमॅन
अरे काय के एल पी डी पिच्चर आहे राव. अती तेथे माती या म्हणीचा प्रत्यय आणून दिला या पिच्चरने. जी बायको नवर्याला मेंटल हास्पिटलात टाकते ती परत कुठल्या तोंडाने त्याच्याकडे येते? वर आणि गावभरचा फुकटा माजही उग्गीच दाखवायचा म्हणून दाखवलाय. शिवाय एका महिन्यात प्रेमच काय, लग्नापर्यंत जाणे हेही उदाहरणार्थ रोचक आहे. अर्थात कंगना भारीच आहे, तिचा रोल तिने मस्तच केलेला आहे. पण पिच्चरची स्टोरी अशी विचित्र के एल पीडी आहे त्याला कै इलाज़ नाही. गंडलाय पिच्चर, त्यातही सेकंड हाफ तर पूर्णच गंडलाय. पहिल्या हाफमध्ये निदान मजेशीर सीन्स तरी आहेत बरेच. तरी ते गुजराती वेशातले सरदार पाहूनही मजा आली.
12 Jun 2015 - 3:29 pm | द-बाहुबली
या चित्रपटातील स्त्रिपात्रे पुरुषपात्रांप्रमाणे वागतात व पुरुष स्त्रियांप्रमाणे. कंगनावर लाइन मारणारा एकटा वकीलच काय तो बर्यापैकी डोकं ताळ्यावर ठेउन तिचं क्यारेक्टर व्यवस्थीत जोखुन चान्स पेडान्स करायचा प्रयत्न करत असतो...
चित्रपट बघुन धमाल आली. पुन्हा एकदा पाहिला.
12 Jun 2015 - 5:20 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी.. कंगनाचं वागणं भयानक इल्लॉजिकल आहे..
बाकी त्यांच्या लग्नात तनु नाचत असते बाहेर आणि आत दत्तो तयार होत असते. (बावरी हो गई गाणं..)
त्यात दत्तोचा मेकप पाहुन कुणाला धक्का बसला का.. माझ्या तोंडुन अस्फुट का काय म्हणतात तशी किंकाळी बाहेर पडली होती!! काय ते जांभळं लिप्स्टीक..!!
12 Jun 2015 - 5:23 pm | गिरकी
ई… आणि तो लग्नाचा म्हणून जो काय ड्रेस घातलाय तो कसला मजेशीर आहे. तिचा अभिनय सोडता बाकी सगळी अतिशयोक्ती आहेच्च.
12 Jun 2015 - 8:50 pm | किसन शिंदे
हरयाणाच्या त्या भागात लग्नामध्ये स्त्रीयांनी तसेच कपडे घालण्याची पारंपारीक पद्धत असावी असे मला वाटते.
12 Jun 2015 - 6:24 pm | बॅटमॅन
सहमत...बाकी ती जांभळी लिपष्टिक होती की गडद गुलाबी? वैसेभी पुरुषी डोळ्यांना रंग अंमळ कमीच दिसतात असे शास्त्रज्ञही सांगतात, सबब आमचे म्हणणे चूक असण्याचा दणकून चानस आहे.
12 Jun 2015 - 8:38 pm | पिलीयन रायडर
माझ्या डोळ्याला तर जांभळट वाटली बुवा.
एकंदरीत द्त्तोच ध्यान करुन टाकलय पार त्या सीन मध्ये.. पुढे ती लिप्स्टीक थोडी फेड होते तेव्हा बरी दिसते.
पण माणुस दचकेल अशी रंगरंगोटी का केली असावी?!!
15 Jun 2015 - 2:42 pm | नाखु
असेही असेल दर्शकांनी "ध्यान" पहावे फक्त लावू नये म्हणून !!! हाकानाका !!!
जुगलबंदी प्रेक्षक
नाखु
12 Jun 2015 - 7:45 pm | उगा काहितरीच
के एल पी डी म्हणजे काय हे सांगण्याची कृपा होईल का या पामरावर ?
12 Jun 2015 - 8:30 pm | बॅटमॅन
के एल पी डी म्हणजे खास लम्हे पे धोका. म्हणजे पहा, आधीच्या विशिष्ट घटनाक्रमामुळे अपेक्षांची पातळी एकदम त्सुनामीसारखी उंचावलेली असते ती नंतर एकदम खास क्षणी, अर्थात जिथे काहीतरी व्हावे असे वाटते तिथेच नेमकी हॉलंड देशाच्या जमिनीसारखी सपाट होते.
12 Jun 2015 - 8:31 pm | सतिश गावडे
याला समांतर अशी एक मराठी म्हण आहे: भरवशाच्या म्हशीला टोणगा.
12 Jun 2015 - 8:36 pm | बॅटमॅन
हम्म, आहे खरी. फक्त हा टोणगा कधी लागतो याबद्दल विवेचन म्हणीत नसल्याने एग्झॅक्ट समांतर म्हणवत नाही.
12 Jun 2015 - 8:40 pm | हाडक्या
म्हणीमध्ये "भरवशाच्या म्हशीस टोणगा होतो" तर के.एल.पी.डी. मध्ये "आधीच्या विशिष्ट घटनाक्रमामुळे अपेक्षांची पातळी एकदम त्सुनामीसारखी उंचावलेली असते ती नंतर एकदम खास क्षणी, अर्थात जिथे काहीतरी व्हावे असे वाटते तिथेच नेमकी हॉलंड देशाच्या जमिनीसारखी सपाट होते." हे अपेक्षित असते. त्यामुळे ही म्हण समांतर म्हणता येणार नाही.. ;)
12 Jun 2015 - 8:41 pm | सतिश गावडे
एग्झॅक्ट समांतर नसेल तर मग ते समांतर नाहीच. कारण ते समांतरच्या व्याख्येलाच निकालात काढते. त्यामुळे आपण "मिळतीजुळती" असा शब्द वापरूया आता. ;)
12 Jun 2015 - 8:48 pm | बॅटमॅन
बिंदू आहे तुमच्या बोलण्यात ;)
12 Jun 2015 - 8:44 pm | सतिश गावडे
त्या दत्तोचे हरयाणवी हिंदीमधले संवाद कोणत्या डबिंग आर्टिस्टने केले असतील बरे?
15 Jun 2015 - 2:46 pm | पिलीयन रायडर
ते कंगनानेह म्हणलेत ह्या भाबड्या समजुतीत मी कंगनावर खुष होते हो!
15 Jun 2015 - 3:29 pm | गिरकी
म्हणजे ते तिनीच नाही बोललेले का ? :(
15 Jun 2015 - 3:19 pm | इरसाल
ती राणावत / रानौत म्हणजेच हरियाणवी आहे.
15 Jun 2015 - 3:24 pm | कपिलमुनी
ती हिमाचल प्रदेशची आहे असे वचले.
15 Jun 2015 - 10:54 pm | यसवायजी
कंगना रनाऊट.