नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे. काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही. अर्थातच, दातून साठी. बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची. पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या. संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड. आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले. अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही. काही महिन्याचे हे निश्चित असेल. झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे गेले नाही. झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले. काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल. एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले. आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे वाटले. पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.
जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली, बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो. एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी सोबत खेळताना दिसायची. कालचीच गोष्ट, त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट म्हातारीला दाखवत म्हणत होती, दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ). तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया. अचानक पिटुकलीचे लक्ष्य माझ्या कडे गेले, हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि दुडदुड धावत धावत घरात गेली. मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिचे डोळे बंद होते. तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता. काही क्षण मी तिला पाहतच राहिलो. अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं, म्हणत मी तिथून पाय काढला. आज त्या गल्लीतून जाताना सदानकदा घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी घरा बाहेर एका सतरंजीवर पांढऱ्या वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले. काय झाले असावे मला याची कल्पना आली. पण घरात काय घडले याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती. तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे, मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ. तेवढ्यात तिची आई बाहेर आली, तिने तिला उचलले अणि घरात नेले. मी पुढे निघालो. न जाणे का, डोळे पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार. संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.
प्रतिक्रिया
9 May 2015 - 7:23 am | चुकलामाकला
तरल!
10 May 2015 - 11:42 pm | श्रीरंग_जोशी
कथा वाचून झाल्यावर 'तरल' हाच शब्द मनात आला.
9 May 2015 - 9:40 am | चित्रगुप्त
दिल्लीतील नीरस बस प्रवासातूनही आपण तरल संवेदनशीलतेने लहान-सहान प्रसंगातले, दृष्यांमधले भावपूर्ण सौंदर्य टिपत असता, हे बघून खूप छान वाटले. लगे रहो.
9 May 2015 - 10:05 am | एक एकटा एकटाच
+१
9 May 2015 - 10:04 am | एक एकटा एकटाच
छान लिहीली आहे.
9 May 2015 - 11:11 am | उगा काहितरीच
सुंदर ! पण खरं सांगू का ? आजकालच्या जगात नाही चालत एवढं भावुक होऊन . बाकी लेख अप्रतिम हेवेसांनलगे .
9 May 2015 - 12:37 pm | चित्रगुप्त
"चालत नाही" म्हणजे नेमकं काय ??? कुणाला चालत नाही ??? असे लोक दु:खी होतात का? की इतरांना त्रासदायक ठरतात ? की आणखी काही ?
9 May 2015 - 11:12 am | राही
ललित लेखन फार आवडले. तुमच्या मराठीला हिंदीची डूब असते तीही फार आवडते.
11 May 2015 - 1:06 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
9 May 2015 - 11:41 am | तुषार काळभोर
दोन्हीची किरणे एकसारखी असतात.
सूर्य उगवतो तो मावळण्यासाठी, अन् मावळतो तो पुन्हा उगवण्यासाठी.
9 May 2015 - 12:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
फारच सुरेख,
अतिशय आवडले
पैजारबुवा,
9 May 2015 - 9:44 pm | मास्टरमाईन्ड
अप्रतिम
वाचताना थोडंसं पाणी आलं डोळ्यात आणि छान वाटलं की माझी संवेदनशीलता अजून थोडीफार शिल्लक आहे.
श्रेय अर्थातच
ला.
9 May 2015 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! भावपूर्ण !
11 May 2015 - 1:52 pm | कपिलमुनी
+१
9 May 2015 - 10:14 pm | एस
आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटलं. पण असो! चांगलं आहे.
10 May 2015 - 12:23 pm | स्पंदना
मस्त!!
10 May 2015 - 8:54 pm | विवेकपटाईत
झाडाची कहाणी ही सत्य घटना आहे. गेल्या ३० वर्षांत माझ्या डोळ्यांसमोरडोळ्यांसमोर घडलेली.
10 May 2015 - 11:33 pm | रेवती
छान लिहिलय.
11 May 2015 - 6:23 am | अंतरा आनंद
मस्त आहे.
असं ते वाळणारं झाड नविन झाडाला म्हणालं असेल .
11 May 2015 - 10:52 am | अगम्य
सुन्दर. साधे आणि भिड्णारे लेखन.
12 May 2015 - 1:09 am | रुपी
छान लिहिलं आहे..
12 May 2015 - 1:31 pm | पैसा
अतिशय छान लिहिलंय.
12 May 2015 - 6:31 pm | अनन्न्या
मनाला हळवं करून गेलं
12 May 2015 - 6:54 pm | स्वधर्म
भावपूर्ण.
13 May 2015 - 7:56 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद