भृगूसंहितेच्या शोधात... १

योगविवेक's picture
योगविवेक in जनातलं, मनातलं
22 Apr 2015 - 11:55 pm

भृगूसंहितेच्या शोधात...
नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल
सादरकर्ताः विवेक चौधरी.
a

जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर.
नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो. दि 23 मार्चला पालम विमानतळावरून आमचे उड्डाण झाले. ‘काठमांडौ’ (नेपाळी लोकांचा उच्चार) त्रिभुवन विमानतळावर उतरल्यावर एका टॅक्सीवाल्याच्या मोबाईलवरून सानू थापा यांच्याशी संपर्क साधला. पर्यटकांना घ्यायला आलेल्या गर्दीतून हात वर करून त्या ओळख देत भेटल्या अन् आमच्या नेपाळ यात्रेतील प्रथम अदभूताची सुरवात झाली.
निघायच्या अगदी 1-2 दिवस आधी गोव्यातील सनातन संस्थेतर्फे ओक सरांना नेपाळमधील त्यांच्या साधिकेशी संपर्क करायला सुचवले गेले. त्यांचा सनातनशी पेपर वाचण्याइतपत संबंध. पण सानू थापा या तरुण मुलगीवजा साधिकेच्या रुपाने महर्षींच्या मदतीचा हात दैवी संकेत होता. कारण त्यांनी पुढील संपूर्ण 3-4 दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन व पूर्तता केली. त्यातील काही ठळक घटनांचा परामर्श...
रेडिओ जॉकी जनार्दन घिमिरे
‘हे कांतीपुरा 93.1 एफ एम रेडिओ स्टेशन आहे’ असे म्हणत ‘रेडिओ जॉकी’ जनार्दन घिमिरे यांनी ओकसरांशी हिन्दीतून बोलत नेपाळीभाषेत पहाटे 4 ला उठून टॅक्सीने वाटेत सानु थापांना घेत स्टूडिओत पोहोचून दिलेली मुलाखत घेतली. एव्हरेस्टच्या शिखरापासून ते चीन सरहदीपर्यंतच्या संपुर्ण नेपाळच्या दऱ्याखोऱ्यात ती पोहोचली! सुरवातीला ओक सरांनी तमिळनाडूमधील नाडी ग्रंथांची तोंड ओळख करून दिली. नंतर मुलाखतीत ओकसर कोण, ते नेपाळमधे भृगूसंहितेच्या ग्रंथ संपदेचा ठावठिकाणा शोधायला का आलेत, आपल्यापैकी कोणाकडे असे प्राचीन ग्रंथ असतील तर त्याची माहिती मला म्हणजे रेडिओ जॉकी घिमिरेंना दयावी. ते ती ओकांना पोहोचवतील असे नेपाळी भाषेत तीन-तीनवेळा आवर्जून आवाहन केले गेले.
नेपाळच्या संस्कृतीचा तो एक मोठा साठा आहे. नेपाळच्या भूमीतून आमच्यापुर्वजांकडे भृगुसंहितेचे ग्रंथ आले असे भारतातील भृगुशास्त्री अभिमानाने सांगतात तेंव्हा असे प्राचीन ग्रंथ साहित्य योग्य व्यक्तींच्या हाती सोपवून त्यातील ज्ञानाचा लाभ जगातील सुयोग्य व्यक्तिना मिळावा अशी त्यांची तळमळ आहे. अशी त्यांची घोषणा लोकांच्या कानावर गेल्याचे आम्हाला नंतरच्या काही कार्यक्रमातील व्यक्तिनी जनार्दन घिमिऱ्यांबरोबरची मुलाखत आम्ही ऐकली म्हटल्याने ओक सरांच्या मुलाखतीचा योग्य तो परिणाम झाल्याची खात्री वाटली. नेपाळ मधील सुदूर खेड्यापाड्यातील लोकांच्या प्रत्यक्ष भेटीस जाऊन जे सहजासहजी साध्य झाले नसते ते एका ‘मन की बात’ मुलाखतीतून सहजी घडून आले!
डॉ. माधव भट्टराय
सानू थापांनी नेपाळनरेनशांचे राज ज्योतिषी म्हणून नावाजले गेलेले डॉ. माधव भट्टराय (भट्टाराय असे सामान्य उच्चारण) यांच्याशी संपर्क करून त्यांच्या घरी भेटायची वेळ मिळवली होती. ओकसरांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव केला. नंतर अचानक जमलेल्या मित्रपरिवारात चर्चा होऊन दुसऱ्या दिवशी एक ज्योतिषांची सभा घ्यायचे ठरले. ती सभा नंतर डॉ. लोकराज पौडेलांच्या पुढाकाराने यांच्या संस्थेत 38 ज्योतिषांच्या समोर पार पडली. त्यात एक-दोघांनी आमच्या पुर्वजांकडील काही पोथ्या अजून उपेक्षित आहेत त्या उघडून शोध घेऊन आपणाला डॉ. माधवजींच्या मार्फत आपणास कळवतो असे आवर्जून सांगितले.
डॉ. गोविंदशरण उपाध्याय
काठमांडोतील त्रिचंद्र कॉलेजचे प्रोफेसरांशी सानू थापांनी ओळख करून दिली. त्यांची भेट घेतल्यावर, ‘चला, मी तुम्हाला राष्ट्रीय आर्काईव्ह मधे नेतो. तिथेच तुम्हाला हवे ते महत्वाचे दस्ताऐवज आहेत’ असे म्हणत आधी ओक सरांना व नंतर मला आपल्या बाईकवरून खेप मारत नेले! त्यांच्या धडाका असा होता की आर्काईव्हच्या स्टाफच्या ताब्यातील सर्व कॅटलॉग (जो स्टाफ अन्यथा कोणालाही साधा चिठोरा देखील हाताळायला देण्याची परवानगी काढायला दाद देत नाही) त्यांनी स्वतः पाशी घेतले. ‘नेपाळात जे मॅन्यूस्क्रिप्ट्स आहेत ते इथे जर्मनी लोकांच्या सहाय्याने मायक्रोफिल्मिंग करून जतन केले आहेत. तुम्ही जे शोधता आहात ते यात जर नसतील तर मग कुठेच मिळणार नाहीत! असे म्हणत, पहिला ज्योतिषखंड ओक सरांच्या हातात देत, ‘शोधा, तोवर मी आपल्या सहकाऱ्याला गाडीवर घालून आणतो म्हणत माझ्यासाठी ते परतले! तोवर ओक सरांनी 10 जाडजूड रजिष्टरवजा कॅटलॉगची सुक्ष्म पहाणी संपवून, ‘विवेक, तुला उपयोगी हे-हे रजिस्टर नंबर पहा’ म्हणून माझी सोय केली! आयुर्वेदातील काही संहितांमधे माझा विशेष रस सरांना माहित होता. असो. आम्ही पटापट त्या कॅटलॉगमधून हव्या त्या पानांचे फोटो घेतले व नंतर सानू थापांनी त्या पानांच्या मायक्रो फिल्म्स पाहून त्यांची झेरॉक्स मिळवायला नेपाळी रुपयात पैसे भरून ते मिळवायची व्यवस्था करायची सोय केली. आम्ही परतल्यावर काही दस्तऐवज मिळवायची प्रक्रिया आता सुरू आहे.
नेपाळ एम्बसीतील अधिकारी अभय सिंग
ओक सरांनी नेटवरून काही माहिती मिळवून डॉ. विजय भटकर सरांच्या सहीचे एक पत्र व एक्सटर्नल मिनिस्ट्रीतर्फे सांस्कृतिक आदान प्रदान करायला उत्तेजन करणारी ICCR (Indian Council for Cultural relations) नवी दिल्लीला पत्रव्यवहार केला होता. त्या कौन्सिलचे अध्यक्ष डॉ लोकेश चंद्रा यांच्या फाईलनोटींगमुळे ओक सरांना आम्ही काठमांडौत असताना निदान एक विपत्र आले की ‘आम्ही काही मदत करू शकत नाही’! तरीही ओक सरांनी एम्बसीतील अभयसिंग नामक अधिकाऱ्याचा असा पिच्छा पुरवला की विचारू नका! आपल्या नेपाळमधील भारत वाचनालयात आपण नाडी ग्रंथ विषयावर पुस्तके ठेवावीत म्हणजे भारतीयांच्या ज्ञानाची ओळख नेपाळी अभ्यासकांना होईल. याचा परिणाम म्हणजे ओकसरांच्या पुस्तकांच्या प्रती पाहून व सरांनी त्यांना तिथल्या तिथे दिलेल्या अर्जावर, ‘मी ही पुस्तके जगातील सर्व भारतीय वाचनालयासाठी उपलब्ध करून द्यावीत असा उचित शेरामारून दिल्लीला आमच्या खात्याला कळवीन’ म्हणून आश्वासन दिले व वर चहा पाजला. पुर्वी गावात पाव्हण्याला आल्याआल्या पाणी व गुळाच्या खड्यानी स्वागत करायची पद्धत असे तसे काहीसे अभयसिंहाच्या टेबलावरील चवदार गुळाच्या तुकड्यांनी व थंडगार पाण्याने केले. मात्र एम्बसीच्या रस्त्याचे काम चालू असल्याने त्यांच्या ऑफिसला पोहोचायला पायी चालत जायचा जो द्राविडी प्राणायाम करायला लागला त्यामुळेही ही भेट लक्षात राहिली!
मेरठ मधील बिपिन दीक्षित
ज्यांनी शांताराम आठवल्यांचे ‘नाडी ग्रंथ - एक अभ्यास’ पुस्तक वाचले असेल त्यांना एस के उर्फ शिवकुमार दीक्षितांचे मुंबईच्या आलीशान अस्टोरिया हॉटेलातील वाचनाचे किस्से आठवत असतील. 1966 साली मुबईत जुलै उजाडला तरी पावसाचे आगमन लांबल्याने रेडिओवर मुख्यमंत्र्यानी लोकांना मुंबई सोडायचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर, ‘आज पासून इतका पाऊस सुरू होईल की लोक आता पुरे म्हणायला लागतील’ असे भृगूमहर्षींनी केलेल भाकीत, खिशात फक्त 5 रुपये 12 आणे वगैरे वगैरे...त्यापैकी काही.
तर या दीक्षितांचे नातू आजकाल मेरठमधे भृगूसंहिता केद्र (447 बुढाना गेट, हनुमान मंदिरासमोर, मो. क्र. 9837066263) चालवतात. आम्ही त्यांची आई, पत्नी व मुलासमावेत त्यांचा शाल व भृगुमहर्षींच्या गुरूकुलाचे एक रंगीत चित्र भेट देऊन सत्कार केला. त्यांच्या कडील राशी इष्टकाल मिलान यंत्र, गर्ग संहिता, भृगु संहितेच्या तमिलनाडी प्रमाणे ताडपट्ट्यावरील पाली लिपीतील कथन आदी वर चर्चा करायची संधी ओकसरांमुळे मला मिळाली. मी माझी कुंडली त्यांच्याकडे शोधायला दिली आहे. माझे भृगूफल सापडल्यावर ते केंव्हा बोलावतील याची उत्सुकता आहे.
प्रतापगढच्या भृगु केंद्रांच्या भेटी
अलाहाबाद पासून 50 किमीवर प्रतापगढ या गावात होशियारपुरातील (टूटोमाज़रावाले) भृगुशास्त्रींप्रमाणे (गांव संडारीवाले) चार भृगु संहितावाचकांची घरे रेल्वे स्टेशनपासून चालत जायच्या अंतरावर आहेत. पैकी श्रीमती अनीता प्रकाश (त्रिपाठी) मो. क्र. ( ), श्रीमती साधना सुर्या (मो. 9450185962) व डॉ. बिपिन मिश्र (मो क्र. )या तीन जणांची भेट व सत्कार झाला. त्या प्रत्येकाकडील पट्ट्यांचे वाचन व मुलाखती टेप व व्हीडिओत सामावल्या आहेत. तेथील केंद्रात पातळ कागदासमान पट्ट्यावर पाली लिपीत भविष्य कथन आहे. त्याचा मासला ही ऐकायला मिळाला. साधारण 2000रुपये लागतात. शिवाय पट्टी हुडकायला काही मेहनताना घेतला जातो. पण 3-4 आठवड्यात कुंडली मिळते असा दावा केला जातो.
मित्रांनो, हा होता भुगुसंहितेच्या शोधाचा धावता वृतांत. या शिवाय यात्रेत अनेकदा न ठरवता भेटणारे मिळाले. त्यात होते काठमांडौतील मराठी कुटुंबिय जगन्नाथ करमरकर, विदुषी डॉ सरस्वतीसिंह व कल्पना परांजली. मेरठच्या केंद्रात मिळालेले राशी मिलान यंत्र, लखनौला अचानक नाडीकेंद्रात जाऊन तेथील चालकांनी नाडीपट्टीतील नावांचा व जन्म दिनांकाचा घेतलेला व्हीडिओ, आयत्या वेळी कॅन्सल झालेली रेल्वे, बस, रिक्षातून धक्केखात जाताना, शरयूतीरावरील गचडीच्या गर्दीतून, टॅक्सी, प्रवासात, नंतर विविध ठिकाणी हॉटेलातील (गैर)सोयी व अयोध्येत सीआरपीएफ मधील माझ्या जुजबी ओखळीच्या मित्राने करून दिलेली राहायची सोय व रामजन्मभूमीच्या लांबलचक रांगेतून केलेली सुटका, अशा अनेक वेळी अनपेक्षितपणे मिळून आलेली मदत, पशुपतीनाथाच्या मंदिरात अचानक आदिशंकराचार्यांची हस्तमुद्रेसह संस्कृतमधे घडलेले ऑटोरायटींग, अशा घटनांची मालिका आम्हाला अनेकदा महर्षींच्या कृपाआशीर्वादाची आठवण करून देत होत्या.

1
1. पहाटे 5.30च्या कार्यक्रमासाठी जनार्दन घिमिरें सोबत स्टूडिओत ओक सर

---
2

2. डॉ माधव भट्टरायांचा शाल घालून सत्कार करताना
---
3
3 डॉ . गोपाल शरण उपाध्यायांसोबत
4

4. काठमांडौ आर्काईव्ह भवनातील शीलालेख
----
5
5. भारत पुस्तकालयाचा दर्शनी भाग
6

6. मदन पुस्तकालयासमोर ओक, विवेक चौधरी
7
7. पशुपतीनाथ मंदिराचा दर्शनी भाग
8
8. पशुपतीनाथाच्या मंदिरात घडलेले ऑटोरायटिंग - आदिशंकराचार्यांचा संस्कृतमधील संदेश भाग 1.
मेरठ, अयोध्या, प्रतापगढ, प्रयाग प्रवासातील फोटो नंतर पुढील भागात सादर करीन...

मांडणीसमीक्षा

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

23 Apr 2015 - 12:13 am | कानडाऊ योगेशु

पुढील लेखमाला वाचण्यासही उत्सुक. मुळात असे काहीही प्लॅनिंग न करता परदेशात जाणेच कौतुकास्पद आहे.ज्योतिष विषयक माहीती सोबत विस्तृत प्रवासवर्णनही येऊ द्यात.

पैसा's picture

23 Apr 2015 - 11:15 am | पैसा

तुम्ही चांगले प्रवासवर्णन लिहू शकता. नेपाळमधे मिळालेले ग्रंथ कोणत्या काळातील आहेत?

योगविवेक's picture

23 Apr 2015 - 11:16 pm | योगविवेक

नेपाळ मधे आम्हाला ग्रंथ हाताळायला मिळले नाहीत. फक्त कॅटलॉग पाहून त्यातील भृग संहितेच्या मायक्रोफिल्म्स पहायला अर्ज करून मग अमुक एवढे पैसै भरून मग ते झेरॉक्सच्या रूपाने मिळवता येतात. इतका वेळ आमच्या जवळ नव्हता. आता सानू थापा काठमांडौला परतल्या असून त्यांनी हे कार्य करायला सुरवात केल्याचे त्यांच्या विपत्रातून समजले आहे.

गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे

माहितगार's picture

10 May 2018 - 9:57 am | माहितगार

गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अंतरावर एक मंगळाचे मंदिर आहे

नेमके कुठे ?

कंजूस's picture

23 Apr 2015 - 1:55 pm | कंजूस

एकंदर लेख फारच उत्सुकता वाढवणारा आहे.ओकसरांची ओळख घारापुरी कट्ट्याला झाली आहेच. पुर्वी (७० साली)एक छापील भृगुसंहिता पाहण्यात आली होती.त्याविषयी नंतर.

शशिकांत ओक's picture

23 Apr 2015 - 5:36 pm | शशिकांत ओक

विवेक,नमस्कार.
साध्या सरळ पद्धतीने मांडलेला अहवाल सर्व महत्त्वाचे संदर्भ देऊन पुढे जाताना पुनः भेटीचा आनंद मिळतो आहे. तू माझ्या सोबत आपली व्यवसायातील व्यस्तता बाजूला ठेवून महर्षींच्या कामासाठी आवर्जून सलग ११-१२ दिवस आला होतास, त्यामुळे ही यात्रा शक्य झाली.
तू सोबत होतास म्हणून मला इतक्या मोठय़ा व प्रदीर्घ काळच्या यात्रेला जायची परवानगी घरच्यांनी आनंदाने दिली.
तुझ्या सारखे तरूण नाडी ग्रंथ व महर्षींच्या कामाला झोकून देऊन मदतीला धावून येतात त्यामुळे 'तू काम करत रहा, योग्य व्यक्ती तुला मिळत राहतील' हे कथन विविध महर्षींच्या आशिर्वादाने सफल होताना, माझा श्रद्धाभाव उचंबळून येतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2015 - 11:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक सफरवर्णन !

जरा अजून विस्तारपूर्वक असते तर अजून आवडले असते. शिवाय, नाडीग्रंथांसंबंधी अजून सविस्तर माहिती द्यावी.

शशिकांत ओक's picture

25 Apr 2015 - 11:24 pm | शशिकांत ओक

मित्रांनो.
सविस्तर माहितीसाठी याठिकाणी अनेक धागे मी पुर्वीपासून काढलेले आहेत ते पहावेत...
मला आता ते परत सांगायला रस नाही. तथापि, विवेक यांनी लखनौच्या नाडी केंद्रातील व्हिडिओची क्लिप, मासला म्हणून सादर करावी अशी विनंती करतो. त्यात नाडी ग्रंथ ताडपट्टीत व्यक्तीचे नाव व जन्मदनांकाची नोंद कशी केलेली असते याचे थोडक्यात वर्णन येते. त्यातून सुयोग्य खुलासा व्हावा. आणि आपणाकडून माहिती काढून तीच आपल्याला नाडी ता़डपट्टीतून मिळते असा बहाणाकरून नाडी वाचक आपल्याला फसवतात आक्षेपाबाबत सत्यता काय याचा उलगडा त्यातून व्हावा. तरीही काही लोक, संस्था हट्टने ते मान्य करणार नाहीत. त्यांच्या अमान्य करण्याने काही फरक पडत नाही. तो भाग निराळा...

योगविवेक's picture

27 Apr 2015 - 5:41 pm | योगविवेक

गोदावरी नदी काठी चेन्नई पासून १५३ कि.मी अनातावर एक मंगळाचे मंदिर आहे.आणि तिथ पासून २१ कि. मी. वर ९ ग्रहांची मंदिरे आहेत.तिथे जगातल्या प्रत्येक माणसाचे भविष्य नाडी पट्ट्यांवर लिहून ठेवलेले आहे

तन्मणी,
आपल्याला या स्थळाचा अनुभव असेल तर तो सादर करावा. आम्हाला वाचायला आवडेल.