वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र.
अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवर्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.
मला असे वाटले होते कि या सर्वाबरोबरच पुस्तकात ‘प्रकाश नारायण संत ‘ या संवेदनशील, तरल लिखाण करणाऱ्या लेखकाबद्दल थोडीफार माहिती मिळेल. त्यांचे साहित्यिकदृष्ट्या समृद्ध असलेले आयुष्य,त्यांच्या आईचे, इंदिरा संत यांचे, त्यांच्यावर कवियत्री या नात्याने झालेले संस्कार, त्यांचे लेखन कसे आकारास येत गेले किंवा या लेखकाने लिखाणाकरता काय वेगळे परिश्रम घेतो, त्यांना रोजच्या जीवनातून काय स्फूर्ती मिळते, लेखिकेचे म्हणजेच त्यांच्या पत्नीचे यामागे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काय योगदान होते,दोघांमधले पूरक वातावरण कसे असेल इ. इ.असे काही या पुस्तकातून समजेल अश्या अपेक्षांनी मी हे पुस्तक वाचायला घेतले. परंतु या सर्व गोष्टी बद्दल फारशी माहिती या पुस्तकात मिळत नाही.
वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे, सुधा लहानपणी त्यांच्या आजोळी आई बरोबर राहत असे. आजोळ खूपच श्रीमंत होते. तिकडे त्यांची आणि त्यांच्या आईची, आईच्या आई वडिलांनी आणि भावांनी, खूपच प्रेमाने काळजी घेतली होती. सुधा प्रचंड लाडात वाढलेली होती. शाळेत हुशार होती. आईच्या दम्याच्या आजारामुळे तिने लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले. आणि मूळच्या अभ्यासूवृत्तीमुळे तसे होवूनही दाखवले.
पुस्तकातल्या अनेक प्रसंगातून असेल जाणवते कि सुधा लहानपणापासून महत्वाकांक्षी आणि व्यवहारी होत्या. प्रकाश नारायण संत मात्र होते कवीमनाचे आणि संवेदनशील. ते लहानपणी खूपच गरीब होते. वडील लहानपणीच गेलेले आणि आई एकटी नोकरी करणारी. सुअधा आणि प्रकाश दोघांचेही पिंड वेगळे होते.
प्रकाश आणि सुधा हे बालमित्र. बेळगावात एकत्र वाढलेले. दोघानाही लहानपणापासून वाचनाची प्रचंड हौस. पुढे प्रकाश पुण्याला जीओलॉजी शिकायला गेले आणि सुधा मुंबईला मेडिकल कॉलेज मध्ये. तिथे देखील पत्र व्यवहाराने दोघांची मैत्री कायम राहिली आणि कॉलेजचे एक वर्ष पूर्ण होताच, वयाच्या २१ व्या वर्षी प्रकाशने सुधाला लग्न करता मागणी घातली. मात्र सुधाला शिक्षण संपवणे जास्त गरजेचे वाटले. आणि इथपासून दोघांचे मन दुखावले जाण्याला सुरुवात झाली. पुढे चार वर्षांनी त्यांचे लग्न झाले.
इंदिरा संत या मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्री. इंदिरा संत आणि सुधाची आई या दोघी एकाच कॉलेज मध्ये शिकवत होत्या. दोघींची वर्षानुवर्षे मैत्री होती परंतु सुधा-प्रकाश यांच्या लग्नात झालेल्या मानपानामुळे ते संबंध बिघडले आणि सुधाच्या आईने रत्नागिरीला नोकरी करायला सुरुवात केली. MBBS चे शिक्षण झाल्यावर मनात असूनही, कौटुंबिक जबाबदार्यांमुळे सुधा यांना MD करता आले नाही आणि डॉक्टरकीच्या कारकिर्दीकारता आयुष्याच्या उमेदीच्या वयात हवा तसा वेळ देता आला नाही. मात्र “सुधामुळे प्रकाशचे लिहिणे, चित्र काढणे, व्हायोलीन वाजवणे थांबले” असे ताशेरे आयुष्यभर सहन करावे लागले. जरी सुधा आणि प्रकाश कऱ्हाड ला राहत असल्याने सासू सुनेचे भावविश्व स्वतंत्र राहिले तरी आयुष्यभर अनेक समज-गैरसमजांमुळे असंतोषाचेच राहिले.
लेखिकेला नेहमीच वाईट वाटत राहिले कि तिला तिच्या लेखक नवऱ्याला वेळोवेळी भावनिक आणि मानसिक साथ देता आली नाही. लेखिकेला कित्येकदा प्रकाशचा हळवा, हळुवार स्वभाव कळायचाच नाही. कलावंत फुलून यायला भावनिक साथ तितकीच महत्वाची असते. त्या तारा कधी जुळल्याच नाहीत हा दैव दुर्विलास.
तसेच त्यांच्या दोघांच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. एखादा चांगला प्रसंग घडला कि त्या पाठोपाठ एक वाईट प्रसंग घडयाचाच.जोडीला प्रकाश यांची तब्येतदेखील त्यांना साथ देत नसे. प्रकाश,सुधा आणि इंदिरा संत या सगळ्यांचीच तब्येत बिघडत असे .आणि त्यामुळे त्या तिघानाही वरचेवर हॉस्पिटल मध्ये रहायची वेळ आली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रकाश नारायण संत आयुष्यातील ३० वर्षे काहीही लिहू शकले नाहीत.
या पुस्तकातल्या काही गोष्टीनी मात्र मला भुरळ घातली. पुस्तकाचा कालखंड अंदाजे १९४० ते २००० पर्यंतचा. तेव्हाची सामाजिक आणि कौटुंबीक जीवनपद्धती कशी होती याचे फार सुंदर चित्रण केले आहे. मोबाईल ,TV , इंटरनेट या सर्वांचे जेव्हा अस्तित्व नव्हते तेव्हा माहिती मिळवण्याची आणि करमणुकीची साधने काय होती हे वाचायला छान वाटले.आजूबाजूला घडणारी छोटो मोठी घटना पण करमणुकीचा विषय बाबत असे. झाडांचे वाढणे, बहरणे, घरातल्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळणे, निसर्गाची विविध रूपे पाहणे या गोष्टीनी रोजच्या जीवनात विरंगुळ्याचे क्षण येत असत. पत्रे पाठवणे आणि आलेली पत्रे वाचणे हा आयुष्यातील महत्वाचा भाग होता. तसेच प्रकाश नारायण संत यांना आवडणाऱ्या अभिजात रशिअन पुस्तकांचे संदर्भ, त्यातले उतारे,कोट्स यांच्या उल्लेखामुळे त्यांचा वाचनाचा व्यासंग समजून आला.
लेखिकेने अर्थातच त्यांच्या काळातले बोली भाषेतले कित्येक शब्द यात स्वाभाविकपणे वापरले आहेत जे आता आपल्याला माहित पण नाहीत..उदा.’ लसण्या ‘ नावाचा हातात घालवायचा बांगडी सारखा दागिना किंवा नाकातल्या मूगबटातला हिरा.
सगळ्यात महत्वाचे हे देखील समजले कि वनवास,शारदा संगीत मधला लंपन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः प्रकाश नारायण संत याचे लहाणपणेचे रूप आहेत.त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी लंपन ला प्रथम एका कथेत शब्दबद्ध केले. आणि नंतर तब्बल ३० वर्ष्यांच्या खंडानंतर वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी उर्वरित कथा संग्रह लिहायला घेतला. ज्या तरलतेने त्यांनी लंपनची भावनिकता वयाच्या ५६ व्या वर्षी शब्दात पकडली आहे हे पाहून मन थक्क होते. प्रतिभा प्रतिभा कशाला म्हणतात तर याला.
खूप खूप वाईट वाटत राहते कि नियतीने या लेखकाला ३० वर्ष या लेखनाच्या अभिव्यक्तीपासून दूर ठेवले.आणि ही खंत काही केल्या माझ्या मनातून पुसली जात नाही.
प्रतिक्रिया
18 Mar 2015 - 10:59 am | खेडूत
एका चांगल्या पुस्तकाचा उत्तम परिचय.
वाचायची उत्सुकता ताणली गेली आहे.
थोडं दीक्षित सरांबद्दल - ते कऱ्हाडला आमच्या महाविद्यालयात भूगर्भशास्त्र शिकवत असत, मात्र तो विषय आमचा नसल्याने आम्हाला त्यांनी शिकवले नाही.
पण सर अत्यंत व्यासंगी आणि विद्यार्थ्यामध्ये प्रिय होते.
त्यांचा मुलगा अनिरुद्ध आणि आता त्याची पत्नी असलेली शुभा हे दोघेही माझ्या वर्गात होते. त्यांनी दोघांनीही पुढे एम. डी. केले आणि आतां कऱ्हाडला व्यवसाय करत आहेत. त्याच्या आईची एम डी करण्याची इच्छा असल्याचे ठाऊक नव्हते. पण मुलगा आणि सुनेने ते केल्याचे समाधान त्यांना नक्कीच मिळाले असणार.
( अवांतर: आजीची कविता त्याला बारावीला अभ्यासात आहे याची आम्हाला खूप गम्मत वाटे! )
18 Mar 2015 - 11:56 am | सविता००१
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
18 Mar 2015 - 12:21 pm | मराठी_माणूस
हे समजले नाही. दोन नावच्या मागे काय कारण आहे.
18 Mar 2015 - 12:58 pm | उदय के'सागर
प्रकाश नारायण संत ह्यांना त्यांच्या आजी-आजोबांनी म्हणजेच इंदिरा संतांच्या आई-वडिलांनी दत्तक घेतल्याने ते नंतर भालचंद्र दीक्षित झाले.
18 Mar 2015 - 12:35 pm | आदूबाळ
याच कारणांमुळे अमलताश वाचायचा धीर होत नव्हता. आता तर बिलकुल वाचणार नाही.
पुस्तक परिचय आवडला.
18 Mar 2015 - 12:42 pm | सविता००१
यांचे खरे नाव भालचंद्र दीक्षित.
ते इंदिरा संतांचे दत्तक पुत्र.
18 Mar 2015 - 12:59 pm | उदय के'सागर
इंदिरा संतांचे दत्तक पुत्र नव्हे, त्यांच्या म्हणजे इंदिरा संतांच्या आई-वडिलांचे दत्तक पुत्र. ते इंदिरा संतांचे खरे म्हणजे बायॉलॉजिकल पुत्र होते.
18 Mar 2015 - 5:41 pm | बहुगुणी
खूप नवीन माहिती कळली, धन्यवाद!
18 Mar 2015 - 6:40 pm | रेवती
तुम्ही करून दिलेली पुस्तकाची ओळख आवडली. का कोणास ठाऊक पण वाचावेसे मात्र वाटत नाही.
18 Mar 2015 - 8:54 pm | पैसा
पुस्तकाची ओळख आवडली. मात्र वाचावे असे वाटत नाही. कुणा लेखकाच्या पत्नीने मानसिक-भावनिक साथ न दिल्यामुळे तो काही वर्षे लिहू शकला नाही हे पटणे अवघड आहे. मग ३० वर्षांनंतर असे काय बदल झाले की की अचानक लिहावेसे वाटले? आणि "हे सगळं तुझ्यामुळे झालं" असं जर कोणी डॉ दीक्षित बाईंच्या मनावर ठसवलं असेल तर ते फारच क्रूरपणाचं वाटलं. संसार करताना त्यांचा काहीच त्याग नव्हता का?
आपण आपल्या लंपनच्या गोष्टी आणि इंदिराबाई संतांच्या कविता वाचाव्यात. त्यामागची माणसे जाणून घ्यायचा प्रयत्न करू नये. डॉ. दीक्षित यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती वाटली एवढं खरं.
18 Mar 2015 - 9:32 pm | आदूबाळ
उलट मला पटलं. किंवा पटू शकेल.
लंपन-सुमीच्या नात्यामधलं एकमेकांबद्दलचं आकर्षण हा भाग वजा केला तर संत सुमीचं चित्र "थोडीशी डॉमिनेटिंग, थोडीशी हेकट" असं रंगवतात असं मला वाटत आलं आहे. उदा. "साखळी", "झांज" या कथा. लंपनच्या मनातला हळवा कोपरा असलेल्या शारदा संगीत विद्यालयातही सुमी जात असल्याचा कधी उल्लेख नाही (पण सुमी गाणं म्हणण्याचा उल्लेख दोन-तीन कथांत आहे).
त्यामुळे संत सूक्ष्मपणे/अप्रत्यक्षपणे आपल्या मनातली अढी सुमीवर काढताहेत की काय असं वाटून गेलं. म्हणूनच अमलताश वाचायची इच्छा नाही.
18 Mar 2015 - 9:52 pm | पैसा
ज्याला लिहायची एवढीच आच असेल तो/ती कशाही परिस्थितीत लिहील. आपण लिहू शकलो नाही याबद्दल दुसर्याला दोष देणे, आपल्या चुकांचे खापर दुसर्यावर फोडणे हे काही मॅच्युअर माणसाचे लक्षण वाटत नाही.
21 Mar 2015 - 10:10 am | स्पंदना
लिहीणं अन ते ही हळुवार, तरल या साठी मन खूप महत्वाचे असते. अन तेव्हढीच महत्वाची असते मन:शांती. संत काही संशोधन करुन लिहीणारे नसावेत. मनाच्या डोहातुन उठणारे तरंग चित्रीत करण्यासाठी मनःशांती ही हवीच.
एकूण संतांनी निखारा हातात धरला अस म्हणेन मी. स्वभाव विषेश माहीत असूनही एका ओढीपायी लग्नाचा हट्ट धरने काही पटले नाही.
बाकी बर्याच जणांचे पाय मातीचेच असतात.
21 Mar 2015 - 10:17 am | पैसा
तेवढ्या ताकदीचे लेखक असतात ते उलट अनेकदा प्रचंड खळबळ चालू असतानाही आपल्या सर्वोत्कृष्ट निर्मिती करून जातात. कमीत कमी दुसर्या कोणाला आपल्या अपयशासाठी जबाबदार धरणे पटत नाही.
21 Mar 2015 - 10:51 pm | कानडाऊ योगेशु
बर्याचदा अश्या कलाकारांच्या कुटुंबाची फार ससेहोलपट होते. बहुदा अश्या कॅटेगरीतल्या कलाकारांना उद्देशुनच "प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्या पुरुषाची पत्नी असते" हा शब्दप्रयोग वापरात आला असावा.
25 Mar 2015 - 2:09 pm | बॅटमॅन
There is a woman behind every successful man, because women don't choose failures असेही वाचले आहे.
18 Mar 2015 - 9:46 pm | अजया
मी संतही वाचलेत आणि अमलताशही.संतांची डायहार्ड फॅन असल्याने तसेच त्यांची मुलगी माझ्या काॅलेजची आवडती शिक्षिका असल्याने फार उत्सुकता होती,अमलताशबद्दल.पण अगदी निराशा झाली अमलताश वाचुन.अतिशय एकांगी लिहिलेले पुस्तक आहे.बर्याच घटना लिहिताना अर्धवट लिहिल्या आहेत किंवा संदिग्ध असे वाटत राहाते. संतांची किती घालमेल झाली असेल असे वाटुन दयाच आली पुस्तक वाचल्यावर.
19 Mar 2015 - 12:58 pm | सानिकास्वप्निल
पुस्तक परिचय अावडला पण वाचावेसे वाटत नाही.
20 Mar 2015 - 11:46 pm | बोका-ए-आझम
शेवटी लेखक हाही माणूसच असतो. त्यालाही इतरांसारख्याच भावना आणि रागलोभद्वेषमत्सर इत्यादी गोष्टी असतात. आपला आणि लेखकाचा परिचय फक्त त्याच्या पुस्तकांतून होतो पण प्रत्यक्षात तो माणूस म्हणून कसा आहे हे त्याच्या पत्नीशिवाय दुसरं कोणी सांगू शकेल असं मला वाटत नाही. ' आहे मनोहर तरी ' वरुन सुनीता देशपांड्यांवरही टीका झालीच. आपल्या आवडीच्या लेखकाचे पाय मातीचेच आहेत हे दाखवल्यावर त्याच्या कलाकृतीचा दर्जा कमी होत नाही. उलट अशी पुस्तकं लेखक आणि वाचक यांच्यामध्ये जास्त चांगला संवाद प्रस्थापित करतात.
21 Mar 2015 - 10:22 am | पैसा
आम्हाला मिठाईशी मतलब आहे. हलवायाशी नाही. म्हणूनच लेखकाच्या खाजगी आयुष्याबद्दल मला अजिबात कुतुहल वाटत नाही. की त्याबद्दल वाचून जाणून घ्यावं असंही वाटत नाही. त्यांच्या पुस्तकांमुळे आपल्याला जे काय अनुभव येतील तेवढेच आपण त्यांचं देणं लागतो. याहून जास्त नकोच असं वाटतं.
या पुस्तकाची माहिती नव्हती तेव्हा डॉ. दीक्षित यांच्याबद्दलही माहिती नव्हती. आता संतांचा राग येत नाही तर त्यांच्या पत्नीबद्दल जास्त वाईट वाटतं. ते एक जास्तीचं ओझं झालं.
21 Mar 2015 - 12:41 pm | प्रदीप
पाश्चात्य देशांत, जिथे दर्जेदार वाडःमय, कलाकृती, संगीत इत्यादींची निर्मीती शतकानू शतके होत आलेली आहे, तिथेही त्या त्या कलाकारांच्या जीवनांचा धांडोळा घेतला जात असतोच. कलाकार किती दर्जेदार ह्यावरून त्याविषयी संशोधनात्मक लिखाण कमीजास्त प्रमाणात सदैव प्रसिद्ध होत असते. कलाकाराला कुठल्या प्रेरणा मिळत गेल्या, किंवा त्याच्या (तिच्या)पासून दुरावत गेल्या, त्याच्या जीवनाचे संदर्भ कुठले होते, त्याजवर कसल्या भोंवतालचा परिणाम होत होता, त्यात बदल झाला असल्यास तो त्याच्या निर्मीतीत बिंबीत झाला किंवा कसे, अशी अनेक कारणे ह्यामागे असतात.
आपल्याकडेही विवीध कलांवर, साहित्यावर ज्यांनी आपापल्या कार्याने अमूल्य ठसा उमटवलेला आहे, त्यांच्या जीवनांत सहेतुक डोकावून पहाणारी व त्यांजविषयी माहिती देणारी पुस्तके येत राहिली पाहिजेत.
पुस्तक परिचय आवडला.
21 Mar 2015 - 12:06 am | वॉल्टर व्हाईट
नक्की वाचेन, या पुस्तक ओळखीबद्दल धन्यवाद.
'अमलताश' असे हिंदी नाव का दिले असावे पुस्तकाला ? कदाचित 'बहावा' या मराठी शब्दापेक्षा जास्त रोमँटिक भासतो म्हणुन असावे. कदाचित एखादी हिंद्दीतली कविता असेल अमलताशावर दोघांना आवडणारी, हु नोsज ? याबद्दल प्रस्तावनेत काही आहे का ?
21 Mar 2015 - 10:15 am | स्पंदना
मलापण "आहे मनोहर तरी..." पुस्तकातला डाळींबाचे दाणे इतरांनी खाल्ले म्हणुन पोटातला जीव चिरडुन टाकणे वाचुन सगळी भावना मेल्यासारखे झाले. का इतका उदो उदो करतात त्यांचाही? शंभरभर प्रेम पत्रांना फक्त कर्मण्येवाधिकारस्ते....एवढा एकच जवाब पाठवण्यात मनाच दारिद्र्यच दिसल मला.
असो.
25 Mar 2015 - 10:16 am | क्रेझी
मलापण असंच वाटलं जेंव्हा 'आहे मनोहर तरी' वाचलं...खूपच खडूस होत्या सुनिताबाई असं वाटतं राहिलं..आणि त्यांनी जी.ए.कुलकर्णी ह्यांच्या पत्रांना दिलेली सगळी पत्रोत्तरं तर अगदी माझ्या डोक्यापलिकडे गेली..अॅबस्ट्रॅक्टच वाटत आलंय मला त्यांचं लिखाण!
21 Mar 2015 - 11:25 pm | प्रचेतस
संतासंच काही वाचलं नाही त्यामुळे अमलताश वाचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
27 Mar 2015 - 11:22 am | झकासराव
लम्पन सेरीज नक्की वाचा वल्ली शेठ. :)
24 Mar 2015 - 11:48 am | गिरकी
परिचय आवडला. खूप दिवस हे पुस्तक वाचायचं मनात होतं. प्रकाश नारायण संत मला फार आवडतात. या पुस्तकात त्यांच्याबद्दल आणि लंपन बद्दल अजून जिव्हाळ्याचं काही सापडेल असं वाटलेलं. पण आपण दिलेल्या परिचयावरून त्यांच्याबद्दल निगेटिव्ह समोर येईल असं वाटतंय. मनातल्या लंपन आणि सुमीच्या प्रतिमेला अजिबात धक्का लागू द्यायचा नाहिये त्यामुळे आता अमलताश वाचणार नाही.
25 Mar 2015 - 9:01 am | पारुबाई
सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
25 Mar 2015 - 10:28 am | क्रेझी
मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही 'अमलताश' ह्या पुस्तकाचा खुलासा केल्याबद्दल :)
लोकसत्ता च्या एका पुरवणीत दोनेक वर्षांपूर्वी ह्या पुस्तकातील एक उतारा वाचण्यात आला होता तेंव्हा खूप इच्छा झाली होती वाचायची पण आजतागायत ते जमलं नाही. पण आता हे परिक्षण वाचल्यावर वाटलं बरं झालं वाचलं नाही ते पुस्तक. मी सुध्दा हाच विचार केला होता की संतांविषयी, त्यांनी लिहिलेल्या लंपनविषयी काहितरी खास वाचायला मिळेल पण..असो.
25 Mar 2015 - 3:39 pm | आदूबाळ
एक उगाचंच आठवलं: एका लंपन-कथेचा भाग असलेली "लक्ष्मीची झाडं" म्हणजे कॅशिया फिस्टुला अर्थात अमलताश!
18 Jun 2015 - 6:12 pm | स्मिता श्रीपाद
नुकतेच अमलताश वाचायला घेतले आहे...हे परीक्षण पूर्वी वाचले होते पण तरी सुद्धा पुस्तक स्वतः वाचुन मगच त्याबद्दल मत बनवायचे असे मी ठरवले होते..
लंपन वर माझे अतिशय प्रेम आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायची उत्सुकता होतीच...
अजुनही पूर्ण पुस्तक वाचुन झालं नाहिये पण तरी जेवढ वाचुन झालय त्यावरुन ईतकं नक्कीच म्हणेन की सुप्रिया दिक्षीतांबद्दल जी नेगेटीव्ह इमेज ईथे तयार झाली आहे तसं नक्कीच नाही ...
वर असा उल्लेख आहे की
"वयाच्या २१ व्या वर्षी प्रकाशने सुधाला लग्न करता मागणी घातली. मात्र सुधाला शिक्षण संपवणे जास्त गरजेचे वाटले. आणि इथपासून दोघांचे मन दुखावले जाण्याला सुरुवात झाली"
पण हे खुप एकांगी वक्तव्य आहे...सुधा यांनी फक्त स्वतः चाच विचार केला नव्हता....त्यानी स्वतः पेक्षा प्रकाश यांचा जास्त विचार केला होता हे त्यांनी तेथे नीट स्पष्ट केले आहे..त्यानी जर तेव्हाच होकार दिला असता तर दोघांचही कमी वय, अर्धवट शिक्षण या सगळ्या मुद्द्यांवरुन त्यांचं दुसरीकडे लग्न लावलं गेलं असतं. हळव्या मनाच्या प्रकाश संतांना हे नक्कीच सहन झालं नसतं.सुधा मनोमन प्रकाश वर अतिशय प्रेम करीत होत्या आणि त्यामुळेच दोघांच्या भल्यासाठी त्यांनी मनावर दगड ठेवुन नकार दिला. त्या नकारामुळे त्यांची कीती वाईट अवस्था झाली होती हे त्यांच्या लेखनात दिसुन येते.
एखादी स्त्री खंबीर पणे एखादा निर्णय घेते म्हणजे तिला काही मनच नाही असा अर्थ त्यातुन निघत नाही ना.
उलट त्यांचं लग्न होउन त्या परत पालघर ला जॉईन झाल्यावर त्यांचा नकळत प्रकाश संतांच्या मनात लगनातील मान-अपमानावरुन नाही नाही त्या गोष्टी भरवल्या गेल्या आणि प्रकाश संतांनी हे सगळं त्यांना बोलुनही दाखवले.याठीकाणी उलट मला ईंदीरा संतांची भूमीकाच जास्त खटकली. पण तरीही हे सगळं लिहिताना सुधा यांनी कुठेही प्रत्यक्षपणे अक्काना दोष दिलेला नाही. शेवटी सासुरवास कोणालाच चुकला नाही असच राहुन राहुन वाटतं.
ईथले परीक्षण वाचुन जर हे पुस्तक न वाचण्याचा निर्णय कोणी घेतला असेल तर प्लीज स्वतः वाचा आणि मगच तुमचे मत बनवा. एक छान पुस्तक वाचकांच्या हातुन निसटुन जाउ नये यासाठी हा लेखनप्रपंच
19 Jun 2015 - 9:40 pm | विशाल कुलकर्णी
सहमत आहे. आपल्या आवडीच्या लोकांबद्दल काही उलट-सुलट वाचले की ते लगेच आपल्याला खटकते. पण ते चुकीचे किंवा खोटेच असेल असे थोडेच आहे. पुस्तक वाचल्यावर केवळ प्र.ना. संतांबद्दलच नव्हे तर अगदी इंदीराबाईंच्या वागणुकीबद्दलही खेद वाटू लागतो आणि सुधाबद्दल कमालीची सहानुभूती. सुधा यांनी अतिशय त्रयस्थपणे लिहीलेले पुस्तक आहे हे, जरी आत्मचरीत्र असले तरीही. त्या स्वतःच्या दोषांबद्दलही अतिशय परखडपणे लिहीतात. मला तर प्रचंड आवडले पुस्तक.