मालती-माधव...एक लघुकथा...इथेच पूर्ण केली आहे.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 5:25 pm

मालती-माधव...

भाटगरच्या त्या अथांग जलाशयाच्या काठावर मी माझ्या गाडीला टेकून उभी होते. थोड्या अंतरावर एका सिमेंटच्या बाकावर एक वृद्ध स्त्री म्हणजे माझी मालतीआजी डोळे मिटून मागे टेकून बसली होती. तिच्या अंगावर उगाळलेल्या चंदनाच्या रंगाची साडी होती. तिने डोक्यावरुन पदर घेतला होता. त्या साडीचे मरुन रंगाचे काठ मागेच असलेल्या लालचुटूक रंगाच्या फुलांना फिके पाडत होते. आजवर मी तिला याच रंगाच्या साडीत पाहिले होते. पण त्याने काय फरक पडला असता ? तिच्या खानदानी सौंदर्याचा प्रभाव समोरच्यावर सहज पडत असे. मालतीआजी जर कधी बोलली तर मात्र तिच्या विद्वत्तेचा अंदाज समोरच्याला येत असे. पण असे प्रसंग विरळाच. ती आरामात बसली आहे असे कोणालाही वाटले असते पण तिच्या मनातील वादळे जर बाहेर पडली असती तर त्या पाण्यावर एक प्रलयकारी वावटळ उठली असती हे निश्चित.

साहजिकच आहे.

मागच्याच आठवड्यात तिचे लग्न झाले. हातावरची मेंदी सुकली नव्हती,

आणि कालच ती विधवाही झाली.

श्रीमती मालती साने ही माझी मावस मावस आजी. म्हणजे काय नाते होते हे कृपया मला विचारु नका. मला ते सांगता यायचे नाही. पण आमच्या दोघीत एक सुंदर नाते तयार झाले होते. मैत्रीणीचे म्हणाना ! मित्र-मैत्रीणी, सासवा-सुना, आई-मुलगी, आजी-नात, अशा अनेक नात्यांपेक्षाही दोन स्त्रियांमधे एक अनोळखे खोलवर नाते असते आणि ते म्हणजे दोन स्त्रियांचे नाते. स्त्रियांच्या सगळ्या नात्यांच्या मुळाशी व सगळ्या नात्यांच्या वर असणारे हे एकमेव नाते. भोरमधे भल्यामोठ्या वाड्यात ती एकटी रहायची. दिमतीस एक गाडी, ड्रायव्हर सुधाकर व घरकामाला त्याचीच बायको लक्ष्मी. आजीने दोघांनाही नोकरी सोडण्याचा मोह होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असणार कारण गेली कित्येक वर्षे आम्ही त्या दोघांना बघत होतो.

मी हळूवारपणे तिच्या शेजारी जाऊन बसले व हळूच तिच्याकडे पाहिले. तिने नजर त्या जलाशयाच्या पलिकडे जमिनीवर लावली होती. मीही तिथे जरा रोखून पाहिले. डोलणाऱ्या पिकात शेतातली झोपडी स्पष्ट दिसत होती. अरेच्चा हे तर आमचेच शेत होते. घराची पडवी व झोका अस्पष्ट पण ओळखण्याइतपत दिसत होता. मी हळूवारपणे तिचा हात हातात घेतला. आम्ही दोघीही काही बोलत नव्हतो. वारा स्तब्द्ध होता. दूरवर कोणीतरी गाडीचा हॉर्न मोठ्यानी वाजवला आणि मी भानावर आले. अंधार पडण्यास सुरुवात झाली होती. आम्ही किती वेळ असे बसलो होतो कोणास ठाऊक !. मी माझा हात हळूच तिच्या हातातून सोडवला व उभी राहिले.

‘‘ए आजी निघायचे ना? बघ दिवेलागणीची वेळ झाली !’’ गावाकडे आले की तोंडातून कसे गावाकडचे शब्द बाहेर पडतात कोणास ठाऊक ! तेवढ्यात आजीने मला हात धरुन शेजारी बसवले व म्हणाली,

‘हे बघ सुमे, तो झोका आहे का ग अजून तेथे ? मला म्हातारीला आता दिसत नाही म्हणून विचारते.’’

‘‘हो आजी आहे ना. तुला कसे काय माहीत ?’’

‘‘हंऽऽऽऽऽ ’’ तिने एक मोठा सुस्कारा सोडला.

‘‘तेथेच मला प्रथम तुझे आजोबा भेटले होते........’’ असे म्हणताना तिच्या डोळ्यांच्या कडांना पाणी जमा झाले.

‘‘बरं चल जायचे ना ? सुमे तू पुण्याला जाईपर्यंत माझ्याबरोबर राहशील का ग ? मी बोलते तुझ्या आईशी !’’

‘‘हो !ऽऽऽऽ का नाही !’’

‘‘तुला माझ्या लग्नाबद्दल ऐकून फार विचित्र वाटले असेल नाही का ग ?’’

‘‘अग आजी आमच्या पिढीला आता असलं काही विचित्र बिचित्र वाटत नाही. त्याची काळजी सोड तू’’ मी म्हणाले. अर्थातच मी खोटे बोलत होते. एखाद्या स्त्रीला हे विचित्र न वाटणे अशक्यच होते....मला विचित्र वाटले होते व रागही आला होता, लोभ कोणाला सुटलाय ? पण खात्रीही होती की यामागे काहीतरी कारण असणार.....

‘‘तू उद्या रहायला आलीस ना, की मी सांगेन तुला सगळे. मरण्याआधी कोणी तरी माझी कहाणी ऐकावी असे मला आता मनापासून वाटते ग सुमे !. पण एक दोन दिवस काढून ये बरका..’’..........

स्वातंत्र्यपूर्व काळातील भोर कितीसं मोठ असणार ? संस्थानिकांचे गाव असल्यामुळे काही परंपरा होत्या, त्या मात्र कसोशीने पाळल्या जात व काही मला वाटते अजूनही पाळल्या जातात. इतर गावांच्या तुलनेने ब्राह्मणांची घरे मात्र जास्त होती. सगळी घरे सान्यांचीच. खालच्या ब्राह्मण आळीतील साने व राजवाड्याशेजारील साने यांच्यात लक्षात येण्यासारखी तफावत होती. त्या खालच्या गल्लीत मालतीआजीचे बालपण गेले. आत्ता आजीकडे पाहताना ती परकरपोलक्यात कशी दिसत असेल या कल्पनेने मला हसू फुटले.

‘सुमे हसू नकोस. वर्षातून एखादे परकर पोलके मिळायचे आम्हाला. मोठ्या बहिणींचे कपडे घालूनच आम्ही लहानाच्या मोठ्या झालो. पण डोळ्यात स्वप्ने होती व स्वप्नांच्यामागे धावण्यासाठी फुरसत होती.’
तिचे एकच स्वप्न होते ते म्हणजे या गावातून बाहेर पडायचे. बख्खळ पैसा कमवायचा व जग बघायचे. मालतीआजीला तीन बहिणी भाऊ नाही त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या आई वडिलांकडे किंमत होती. तिचे वडील म्हणत,

‘मालती इथून बाहेर पड. या गावाकडे परत वळून बघू नकोस. इथे या दारिद्र्यात कोणाचेही भले नाही.''

चारीही बहिणींचे हेच मत होते. पुढे तीन बहिणींनी गाव सोडले पण सगळ्यात हुशार व सुंदर मालतीलामात्र भोरमधेच शेवटी यावे लागले.

मालती सगळ्यात लहान, सुंदर व हुशारही. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाही. एवढेच काय व्हफाला ती राज्यात पहिल्या दहातही आली होती. सुंदर इतकी की असे म्हणतात त्या काळी भाटगरवर काम करणाऱ्या एका ब्रिटिश इंजिनीअरने तिला मागणीही घातली होती पण त्याच्या साहेबांनीही मागणी घातल्यामुळे तो प्रकार तेथेच थांबला.

शाळेतील माधव सानेशी मालतीचे प्रेमप्रकरण मोठ्या चवीने गावात चघळले जात होते. आज दोघे पुलावर दिसले, आज सायकलवरुन शेतातील घरी गेले, झोक्यावर दिसले, एक ना अनेक चर्चा. अर्थात दोन्ही घरची परवानगी असल्यामुळे सगळ्यांना आता फक्त त्यांच्या लग्नाचीच वाट बघायची होती. मॅट्रीक झाल्यावर माधव पुण्याला इंजिनयरींग कॉलेजला शिकण्यास जाणार हे निश्चित झाले. न विसरण्याच्या आणाभाका पुलावर घेतल्या गेल्या, थोडीशी रडारडही झाली असणार. पुढच्या तीन चार वर्षात मालतीच्या इतर बहिणींचीही लग्ने झाली. आता घरात ती व तिचे आईवडील एवढेच उरले. पुढे गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीत त्यांचा वाडा जळला व अनेक ब्राह्मण कुटुंबांप्रमाणे सान्यांचीही अनेक कुटुंबे शहराकडे स्थलांतरित झाली. या जाळपोळीत मालतीचे आईवडील खचले व त्यांनी खंत करत जीव सोडला. खरे तर मालती व तिचे वडील दोघेही कट्टर गांधीवादी...पण ते जाऊदे... आता मालतीचे काय करायचे हा प्रश्न सगळ्यांपुढे उभा राहिला. तिच्यापुढे दोन मार्ग होते एक म्हणजे लग्न करणे पण माधवचे शिक्षण अजून चालू होते त्यामुळे ते शक्यच नव्हते. दुसरा मार्ग म्हणजे एका बाहिणीकडे इंदोरला राहणे. अर्थातच हा मार्ग तिला बरा वाटला. थोड्याच दिवसात तिची रवानगी इंदोरला झाली. माधवरावांशी तिचा पत्रव्यवहार चालूच होता. मधून मधून एखाद्या कार्यक्रमात भेटही होत असे...... माधवरांवानी कॉंट्रॅक्टरच्या धंद्यात चांगलाच जम बसवला. पुण्यात बंगला झाला, आणि एक दिवस माधवराव इंदोरास मालतीला भेटण्यास आले ते त्यांचे लग्न एका मुलीशी ठरले आहे ही बातमी घेऊन. मालतीवर वीज कोसळली. कथा कादंबऱ्यात आढळतो तसा सगळा तमाशा झाला...त्यात काही नवीन नाही.

‘‘पण मी त्यांना त्या लग्नाच्या परवानगीसाठी एक अट घातली.’’ मालतीआजी म्हणाली.

‘आत्ता तुम्हाला माझ्याशी लग्न करणे शक्य नाही हे मला दिसत आहे. पण मला वचन द्या, जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न कराल’’ याचा अर्थ न समजण्याइतके ते दुधखुळे नव्हते.

"मालती ही अट मला घालू नकोस. यामुळे सगळ्यांवर अन्याय होईल. ऐक माझे.’’

‘‘पण मी हट्टालाच पेटले होते. मला खात्री होती की त्यांनी जर वचन दिले तर ते पाळतीलच.’’

‘‘पण आजी असे काय झाले की त्यांनी तुझ्याशी लग्न न करताच दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले ?’’

‘‘अगं तीच नेहमीची कारणे. ती ऐकून मला अगदी वीट आला होता. मला त्याला शिक्षा करायची होती. मी जर लग्न केले असते, संसार केला असता तर या सगळ्या गोष्टी आम्ही विसरुनही गेलो असतो पण अखंड जळणाऱ्या कापूर आरतीसारखी ही वेदना मला जळती ठेवायची होती. सुमे माझा स्वभाव असा नाही हे तुला माहिती आहे ना ग ? पण त्यावेळी माझ्या अंगात काय संचारले होते कोणास ठाऊक !’

‘‘ अगं पण याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच झाला ना !’’

‘‘मलाच नाही, माधवलाही झाला. कारण त्याचे माझ्यावर खरे प्रेम होते. त्याच्याकडे नव्हती ती हिंम्मत. एवढ्या शिकल्या सवरल्या, स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या माझ्या प्रियकराकडे घरातील माणसांविरुद्ध निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. अर्थात त्या काळात अशीच मुले जास्त असायची म्हणाऽऽऽ.’’

‘‘ मग ?’’

‘‘मी इंदोरला शिकले सवरले व स्वत:ला सावरले सुद्धा. शिक्षणाधिकारी झाले व मी केलेल्या शिक्षणातील प्रयोगांमुळे सगळ्या जगात माझे नाव झाले....पण या सगळ्या प्रकारात माझ्या रागाची तिव्रता तसुभरही कमी झाली नव्हती. एवढी वर्षे मी पुरुषाच्या स्पर्षावाचून काढली. मला आमच्या तारुण्यातील सहवास आठवे, आमचे एकमेकांना होणारे स्पर्ष आठवत....’’

‘‘आजी चुकलेच बर का तुझे. अगं असले दहा ब्रेप अप आम्ही पचवतो. मुव्ह ऑन....हा आमचा परवलीचा शब्द आहे बरका हल्ली.... आणि खरे सांगू का मला माझ्या पूर्वीच्या प्रियकराचा रागही येत नाही. मला त्याची कींव येते...’’ मी हसत हसत म्हणाले.
पण त्या काळात बहुधा तत्वाला चिकटून राहण्याची झिंग चढत असावी. आजीच्या मते म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले. असो.....तर अनेक वर्षे लोटल्यानंतर आजीला माधवरावांची पत्नी निवर्तल्याची बातमी कळली. त्या वेळेस मालती आजी इंदोरहून भोरला स्थायीक झाली होती.

‘‘मी आता माधवरावांची वाट पहात होते. करतील का ते त्यांनी दिलेले वचन पूरे ?. वसुंधरा गेल्यावर दहा दिवसांनी माधवरावांचा निरोप आला आणि मी खचले. मटकन खाली बसले. मला कळेना मी करते आहे ते बरोबर आहे का ?’’
माधवरावांनी हा लग्नाचा प्रस्ताव मांडल्यावर घरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी टिकेची झोड उठविली. मुलांनी व सुनांनी माधवरावांशी बोलणे टाकले. आता या वयात....इ. तमाशा व्हायचा तो झाला. फक्त घरात एकच माणूस त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहिला ती म्हणजे त्यांची नात. मुख्य प्रश्न होता एवढ्या मोठ्या इस्टेटीचा. या इस्टेटीत आता अर्धा वाटेकरी येऊ पहात होता. मालती आजीवर नसते आरोप झाले. पैशासाठी ही बाई काहीही करु शकते पासून हे लग्न होण्याआधी माधवरावांना वरुन बोलावणे आले तर बरे होईल असेही नातेवाईक कुजबुजू लागले. त्यावेळी त्यांचे वय होते जवळजवळ ९२.

‘‘सुमे तू जर आमच्याबाजूने ठामपणे उभी राहिली नसतीस तर ही वचनपूर्ती अशक्यच होती’’

‘‘अगं आजी या लग्नाचे कौतूक करायचे सोडून सगळे हिशेब घालत बसले यावरुनच कळते ना !’’

आठवड्यापूर्वी लग्न लागले. त्याआधी वकिलांना बोलावून नवविवाहीत जोडप्याने माधवरावांच्या इस्टेटीवरील आपला सगळा हक्क सोडून दिला. मालतीआजीने मात्र तिची सगळी इस्टेट माझ्या नावाने केली. इस्टेटीला आता काही होणार नाही हे समजल्यावर लग्न मोठ्या उत्साहात व थाटात लागले. सगळे विधी सांग्रसंगीत पार पडले. चेष्टामस्करी, कुत्सित नजरा झेलत नवराबायको हनीमून साठी उद्या भोरला राजवाड्यात जाणार हेही ठरले.

रात्रीच आजीच्या किंकाळीने सगळे लग्नघर दचकून जागे झाले. माधवरावांनी वचनपूर्तीच्या समाधानाचे ओझे पेलता न आल्यामुळे आपला प्राण सोडला होता. मी आजीला घेऊन भोरला आले......

एक महिन्यानंतर मालतीआजी गेली. तिच्या सामानाची उचकापाचक करताना मला पत्रांचा एक गठ्ठा हाती लागला. ती प्रेमपत्रे वाचावीत का नाही या संभ्रमात असतानाच मी वरचे पत्र उलगडले.....केव्हाचे होते कोणास ठाऊक....

....... मालती मी तुझ्या गालावर रुळणाऱ्या बटांमधे जेवढा गुंतलो होतो तेवढाच या पश्चात्तापाच्या गुंत्यात गुंतत चाललो आहे. मला त्याचा फास बसतोय मालती.....
आयुष्यभर न मरता फासावर लटकत रहायचे......कसली भयंकर शिक्षा दिली होती मालतीआजीने आजोबांना.....

ते वाचताना माझा जीव घुसमटला.....ती अक्षरे कधी अस्पष्ट होत गेली...हेच मला कळले नाही.

जयंत कुलकर्णी.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2015 - 5:54 pm | नगरीनिरंजन

छान सुरुवात पण खूपच त्रोटक. थोडा अजून मोठा भाग हवा. लघुकथाच असेल तर बळंच क्रमशः कशाला?

सौंदाळा's picture

16 Mar 2015 - 7:17 pm | सौंदाळा

भाग छान पण छोटा वाटला.
बाकी जयंत कुलकर्णीसाहेब सध्या अप्रतिम फॉर्मात आहात तुम्ही. थांबु नका लिहित राहा.

प्रचेतस's picture

16 Mar 2015 - 10:32 pm | प्रचेतस

सुरुवात आवडली.
पुभाप्र

एक एकटा एकटाच's picture

16 Mar 2015 - 10:56 pm | एक एकटा एकटाच

स्टार्ट चांगली झालीय
आता पटापटा पुढचे गिअर टाका.

मनीषा's picture

16 Mar 2015 - 11:10 pm | मनीषा

सुरवात चांगली झाली आहे.
वाचते आहे.

आकाश कंदील's picture

17 Mar 2015 - 11:09 am | आकाश कंदील

जयंत कुलकर्णीसाहेब झक्कास सुरवात. तुमचे, अतिवास तैचे लेखन म्हणजे एक मेजवानी असते
पुभाप्र

जयंत कुलकर्णी's picture

18 Mar 2015 - 12:52 pm | जयंत कुलकर्णी

श्री ननि, येथेच पूर्ण केली आहे....

सौंदाळा's picture

18 Mar 2015 - 1:56 pm | सौंदाळा

छान आहे कथा.
तुम्ही जरी काल्पनिक आहे म्हटले असले तरी तपशील बारकावे ईतके ठळक आहेत की सत्यकथाच वाटते.

मृत्युन्जय's picture

18 Mar 2015 - 2:13 pm | मृत्युन्जय

उत्तम कथा. कथा कशी लिहावी याचे प्रशिक्षण घ्यावे काकांकडे

तुषार काळभोर's picture

18 Mar 2015 - 4:05 pm | तुषार काळभोर

तुमच्या सर्वच कथांमध्ये स्थानिक तपशील अतिशय अचूक, सर्व बारकाव्यांसहित येतात. यासाठी मनापासून धन्यवाद.

कारण तपशीलातले किंचीत दोषही त्या ठिकाणची माहिती असणार्‍यांना दाताखाली आलेल्या खड्यासारखे वाटतात.

बाकी कथा अतिशय सुंदर!!

पैसा's picture

18 Mar 2015 - 4:31 pm | पैसा

अतिशय सुंदर कथा!

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2015 - 4:54 pm | नगरीनिरंजन

सुंदर कथा! (सलग इथेच लिहिल्याबद्दल धन्यवाद!)

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2015 - 4:57 pm | नगरीनिरंजन

समाज, संस्कृतीच्या नावाखाली जो अदृष्य पॉवरगेम चालतो त्यात आयुष्यं कशी चिरडली जातात याचं भेदक चित्रण आहे. सुखवस्तु घरांच्या भिंती बोलायला लागल्या तर अशी अनेक दु:खे भळभळत बाहेर येतील.

रेवती's picture

18 Mar 2015 - 5:22 pm | रेवती

अगदी पर्फेक्ट प्रतिसाद!

बहुगुणी's picture

18 Mar 2015 - 5:18 pm | बहुगुणी

सुरूवातीस कथा त्या काळाशी न जुळणारी, अशक्य अशी वाटली, पण तर्क-सुसंगत मांडणीमुळे अखेरीस, असं घडणं विरळ असेल पण अगदीच अशक्य नाही, असं वाटलं. हे तपशीलांचं यश. (उदाहरणच द्यायचं झालं तर: "आजवर मी तिला याच रंगाच्या साडीत पाहिले होते. पण त्याने काय फरक पडला असता ? तिच्या खानदानी सौंदर्याचा प्रभाव समोरच्यावर सहज पडत असे. मालतीआजी जर कधी बोलली तर मात्र तिच्या विद्वत्तेचा अंदाज समोरच्याला येत असे. पण असे प्रसंग विरळाच." या वर्णनावरून सुमेने मालती आजींना बरेचदा भोरमध्ये पाहिलं असावं असं वाटतं, पण 'आजी जर इंदुरात असतील तर हे कसं शक्य आहे' असं वाटलं, पण पुढे "अनेक वर्षे लोटल्यानंतर आजीला माधवरावांची पत्नी निवर्तल्याची बातमी कळली. त्या वेळेस मालती आजी इंदोरहून भोरला स्थायीक झाली होती." हे वाक्य येतं, अशा बारकाव्यांमधून जयंतराव लिखाणात त्रुटी रहात नाहीत याची काळजी घेतात.)

खटपट्या's picture

19 Mar 2015 - 4:02 am | खटपट्या

जबरद्स्त कथा !!

रुपी's picture

19 Mar 2015 - 4:08 am | रुपी

आवडली.

जयंत कुलकर्णी's picture

19 Mar 2015 - 8:56 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

इशा१२३'s picture

19 Mar 2015 - 4:33 pm | इशा१२३

सुंदर कथा!

स्पंदना's picture

27 Mar 2015 - 5:44 am | स्पंदना

__/\__!

नाखु's picture

27 Mar 2015 - 9:17 am | नाखु

कथा...
ननिंचा प्रतिसाद एकदम कडक.
पुलेप्र.

सविता००१'s picture

31 Mar 2015 - 12:03 pm | सविता००१

सुरेख कथा