मार्चचा पहिला वीकांत अनेक कारणांनी सर्वांच्या निशाण्यावर होता. सलग ३ दिवस सुट्टी. त्यामुळे गाडीवरून एखादी ट्रीप करायची की एखादी मोठी सायकल राईड हा प्रश्न अनेक दिवस चर्चेमध्ये होता.
कोणता रूट..?
पुन्हा कोकणातच जायचे का..?
पुन्हा ताम्हिणी घाटातूनच जायचे काय..?
परत येताना तरी ताम्हिणी घाट नको.
मांढरदेवीला जावूया.. BRM रूट करूया.
मांढरदेवी BRM अनेक कारणांमुळे पूर्ण करता आली नसल्याने तो BRM चा रूट सुधाकर, केदार व राहुलला करायचा होता. (पुणे - भाटघर धरण - भोर - मांढरदेवी - वाई - मांढरदेवी - भोर - पुणे)
अशा अनेक चर्चांनंतर आणि अनेक ठिकाणे ठरवून व बाद करून ही ट्रीप "घाट स्पेशल" करण्याचे नक्की झाले.
कोण कोण येणार हा नंतरचा कळीचा मुद्दा होता. शेवटी प्रत्येकाच्या सोयीनुसार..
किरण कुमार - कापूरहोळपर्यंत..
केदार दिक्षीत, सुधाकर, राहुल लोखंडे - मांढरदेवी.
अमित M आणि मी दोघे संपूर्ण ट्रीप करणार असे ठरले.
आमचा रूट होता
पहिला दिवस -
पुणे - वाई - महाबळेश्वर - पोलादपूर - महाड (व शक्य झाल्यास पाचाड / रायगड पायथा)
दुसरा दिवस -
(पाचाड किंवा) महाड - भोर - पुणे
या दरम्यान आम्ही ५ घाट पार करणार होतो.
१) कात्रज
२) खंबाटकी
३) पसरणी
४) आंबेनळी
५) वरंधा
बरेच महिने प्रतिक्षेत असलेल्या सायकलींग जर्सी अगदी शेवटच्या क्षणी मिळाल्या. त्या मिळवण्याची धावपळ करण्याच्या प्रकारात वेळेचे गणित चुकले व रात्री घरी पोहोचायला अमितला व मला बराच उशीर झाला.
सकाळी लवकर उठायचे व ५ ला बाहेर पडायचे गणित अवघड दिसत होते. तरीही झोपताना सायकल संपूर्ण तयार करून व बॅगा, दिवे अडकवूनच झोपलो.
भल्यापहाटे साडेचारला उठलो. बाकी सर्वांचे ग्रूपवरती मेसेजेस येत होते. अमितला फोनाफोनी केली व सव्वापाचच्या सुमारास बाहेर पडलो. साडेपांचला वडगांव पुलाजवळ पोहोचलो..
थोड्या वेळाने किरण कुमार, सुधाकर, केदार दिक्षीत, राहुल आले.. आम्ही त्यांच्या आधी निघणार होतो परंतु ते शक्य दिसत नव्हते. आमची एकंदर तयारी, वक्तशीरपणा यावर अनेक डोस पाजून ते निघून गेले...
सहा वाजता अमित आला व आम्ही वेगाने कात्रज बोगद्याकडे कूच केले.
सकाळच्या थंड हवेत घाट चढताना फारसा थकवा जाणवत नव्हता. आम्ही अगदी सहजच दरीपुलावर आलो. तेथून कात्रजचा खरा चढ सुरू होतो. तो चढही सहज पूर्ण करून बोगदा पार केला तर केदार व किरण तेथे थांबले होते. थोड्या गप्पा टप्पा करत थांबलो.. आता पुढचा थांबा कापूरहोळमध्ये घ्यायचा असे ठरवून निघालो.
सकाळची वेळ, वेगाने जाणारी वाहने, टोलनाक्यावरच्या रांगा, कंटेनर आणि ट्रकच्या आजुबाजूने सुसाट जाणार्या गाड्या.. आणि एका लयीत जाणार्या आमच्या सायकली...
ट्रक व कंटेनरसोबत - अमित.
कापूरहोळ येथे बाकी सायकलस्वारांचा निरोप घेवून आम्ही पुढे निघालो.
कात्रज ते शिरवळ बर्यापैकी उतार असल्याने फारसे कष्ट न घेता अगदी तीन तासात आम्ही खंबाटकी पायथ्यापर्यंत येवून पोहोचलो.
रात्री जेवण न झाल्याने अमितला थकवा जाणवत होता. खंबाटकी सुरू होण्याआधीच पोटभर नाष्टा करण्यासाठी एक हॉटेल बघितले व पोहे, वडापाव, मिसळ... या ऑर्डरी सुटू लागल्या.
अचानक माझा फोन वाजला व ट्रेकिंग ग्रूपमधला एक मित्र दिलीप वाटवे त्याच रूटवर गाडीने येतो आहे हे ही कळाले. तो १०-१५ मिनीटातच येवून पोहोचला. दिलीप आणि त्याच्यासोबतच्या मित्रांनी आणलेली पुरणपोळीही आम्ही चेपली. ;)
बरीच खादाडी करून व गरमागरम कॉफी घेवून खंबाटकी चढायला सुरूवात केली.
खंबाटकी घाटासमोर - मी.
खंबाटकी घाटामध्ये नेहमीच्या अडचणी येत होत्या. सायकलसाठी रस्ता न मिळणे.. चढ चढवताना जवळून एखादी कार खूप जोरात जाणे.. प्रचंड माल भरलेला एखादा ट्रक सायकलपेक्षाही हळू वेगात जाणे त्याला पार करायचे कसे हा नेहमीचा प्रश्न. कारण डावीकडून जागा नाही आणि उजवीकडे सायकल काढावी तर मागून येणार्या गाड्यांचे हॉर्न एका लयीत वाजू लागतात..
खंबाटकी घाट - यात अमित सापडतोय का? ;)
यावेळी खंबाटकी घाटामध्ये फारसा त्रास झाला नाही. अमित व मी पुढे मागे न होता; न थांबता खंबाटकी घाट पूर्ण केला. कुठेही फारसा वेळ वाया न घालवता आम्ही घाटामधून घरंगळायला सुरूवात केली. घाट संपला. आता सुरूर फाटा फक्त ३ किमी लांब होता. तेथून NH 4 ला टाटा करून सिंगल रोड चा प्रवास सुरू होणार होता.
सुरूर फाटा ते वाई हा आमचा अत्यंत आवडता रस्ता आहे. नितांतसुंदर, प्रेक्षणीय आणि अल्हाददायक..
हायवेसारखा रखरखाट नाही, गाड्यांची गर्दी नाही. दोन्हीबाजूंना दाट झाडी असणारा निवांत रस्ता. एकूणच हिरवाई आणि आजूबाजूची शेतजमीन यांच्यामुळे भरदुपारीही सुखद गारवा असतो.
वाईनंतर लगेचच पसरणी घाट सुरू होतो.. पुण्यातून गडबडीने निघून आणि वाटेत फक्त एकदाच थांबूनही पसरणी घाटाच्या पायथ्याला ११ वाजून गेले होते. भर उन्हात घाट चढवण्याशिवाय पर्याय नव्हता.
घाट सुरू करण्याआधी नातू फार्म्स मध्ये थांबून एक कोकम सरबत प्यायले व पाणी भरून घेतले. येथे आम्हाला एका भारद्वाज पक्षानेही दर्शन दिले.
पसरणी घाट हा C च्या आकाराचा आहे आणि घाट सुरू होतानाच शेवटचा "हॅरीसन फॉली" चा पॉईंट दिसतो आणि तो सतत दिसत राहतो. त्यामुळे त्याच्याकडे बघूनच खच्चीकरण होत होते.
पसरणी घाट चढवायला सुरूवात केली. खंबाटकी घाट न थांबता पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला होताच. पहिले काही चढ आणि वळणे विनासायास पार पडली. थोडे अंतर पार केल्यानंतर मी एक पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला. अमित येथे पुढे निघून गेला. पाणी प्यायलो. थोडे पाणी डोक्यावर ओतून हेल्मेटच्या आतला रूमाल भिजवला व पुन्हा एका लयीत पेडल मारू लागलो. येणारे जाणारे लोक हात दाखवून 'चिअरअप' करून जात होते. अनेकजण "इतक्या उन्हात?? सायकल??" अशा अर्थानेही हसत हसत पुढे जात होते.
वाटेत अचानक समोरून येणारी एक पजेरो / फॉर्चुनर छाप गाडी थांबली व आतून आवाज आला
"क्रिश्ना रिवर जाना है!"
आता ऐन पसरणी घाटात या मी या प्रश्नाचे काय उत्तर देणार??
मी: "वो रिवर उपर महाबलेश्वरमें है और नीचे वाई मेंभी! आपको कहाँ जाना है?"
तो: "ओके थँक्यू" - आणि निघून गेला.
मी पुन्हा सायकल चालवायला सुरूवात केली. घाटातले मंदिर पार केले. नियमीतपणे पाणी पिवूनही थोडे डिहायड्रेशन जाणवू लागले होते. अचानक पायामध्ये क्रॅंप आला. थोड्या अंतरावर सावली होती तेथेही सायकल चालवत जाणे जमेल असे वाटले नाही. चुपचाप सायकवरून उतरलो व सायकल ढकलतच सावलीच्या आश्रयाला गेलो. पाणी प्यायलो. थोडा वेळ विश्रांती घेतली, स्ट्रेचींग केले व पाय ठीकठाक आहेत याची खात्री करून सायकल हाणायला सुरूवात केली. थोड्या वेळापूर्वीची पजेरो / फॉर्चुनर पुन्हा अवतरली व "क्रिश्ना रिवर उपर है!" ही सुवार्ता देवून निघून गेली. मी कोणत्याही विनोदाला हसण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांना फक्त हात दाखवला व टाटा केला.
दमणूक चांगलीच जाणवत होती. त्यात वरून उन्हाचा तडाखा होताच. दोघेही तसेच सायकल चालवत होतो.
हॅरीसन फॉलीजवळ अमित भेटला. त्यालाही क्रँपचा त्रास झाला होता. त्यामुळे तो चालत चालला होता. आता मी पुढे निघालो पांचगणी गावाच्या थोडे आधी आम्ही एकत्र आलो व एकत्र सायकलींग सुरू केले. पाणी जवळ जवळ संपलेले होते. पांचगणी मध्ये इलेक्ट्रॉल, गोळ्या अशी खरेदी झाली पण पाणी भरून घ्यायला विसरलो. पुढे बघू, मिळेल.. असा विचार करत दोघेही पांचगणी बाहेर पडलो. मात्र पुढे पाण्याची काहीही सोय नव्हती. मॅप्रो गार्डन फक्त ५ किमी लांब होते त्यामुळे आम्हीही निर्धास्त होवून सायकल चालवत होतो. अचानक "माला'ज" चे काऊंटर दिसले व तेथे पाणी भरून घ्यायचे ठरवले. सोबत काहीतरी खादाडी.. स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा स्ट्रॉबेरी क्रीम खाण्याचा बेत ठरण्याआधीच घड्याळाकडे बघून नकार दिला व महाबळेश्वरकडे कूच केले.
स्ट्रॉबेरी क्रीमचा एक फोटो. ;)
वाटेत एका ठिकाणी दोघांनी मिळून अर्धा किलो स्ट्रॉबेरी चा फडशा पाडला.
पांचगणी ते महाबळेश्वर दरम्यान..
अमित M.
यथावकाश वेण्णा लेक व शेवटचा मोठा चढ चढून आम्ही "महाबळेश्वर 0" जवळ पोहोचलो.
ठरवलेल्या वेळापत्रकानुसार आम्ही ४० मिनीटे मागे पडलो होतो त्यामुळे फोटोसेशन आवरून आम्ही महाड रस्त्याकडे मोर्चा वळवला. आजच्या दिवसातला चौथा घाट "आंबेनळी घाट" समोर होता. मात्र हा घाट फक्त उतरायचा होता. सलग २० किमी उतार, एक किरकोळ चढ, पुन्हा १६ किमी उतार आणि शेवटचे कांही किलोमीटरचा सपाट रस्ता संपला की आम्ही पोलादपूरमध्ये पोहोचणार होतो.
आता या डोंगररांगा उतरायच्या होत्या...
आम्ही एकत्रच आंबेनळी घाट उतरायला सुरूवात केली. एक दोन खराब पॅचेस सोडले तर रस्ता खूपच चांगला होता. दुपारचे चार वाजत होते परंतु झाडांची सावली आणि वारा यांच्यामुळे उकाडा व थकवा जाणवत नव्हता.
बघता बघता निम्मा घाट उतरूनही झाला होता.
पांच वाजण्याच्या दरम्यान वाटेतल्या एका छोट्या चढावर एक गांव लागले. दोघांनाही भूक लागली होती. अमितने मिसळ घेतली तर मी फरसाण व कांदा लिंबू घेतले. तेथे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. वड्यांची अवस्था बघून ते घ्यावेसे वाटले नाहीत.
नाष्टा आवरून व शिल्लक राहिलेला घाट उतरून आंम्ही पोलादपूरला पोहोचलो. आजचा पाचाड मुक्काम अवघड दिसत होता. पोलादपूर महाड १८ किमी आणि पुढे पाचाड २६ किमी. अजून ४४ किमी अंतर पार करायचे का? महाड-पाचाड दरम्यान एक घाटही आहे. त्यामध्ये जाणारा वेळ गृहीत धरला असता आम्ही खूप उशीरा पाचाडला पोहोचलो असतो. त्यामुळे "Plan B" म्हणजेच महाडलाच मुक्काम करावयाचे ठरवले.
NH17 वरून दिसणारा सूर्यास्त.
महाडमध्ये शिरता शिरताच एका चांगल्या हॉटेलमध्ये रूम मिळाली. सायकलींची सुरक्षीत व्यवस्था केली व आवराआवरी करण्यासाठी रूममध्ये दाखल झालो..
फ्रेश होवून तंदूरी चिकन, पापलेट तवा फ्राय आणि भारत विंडीज सामन्याच्या हायलाईट्स सोबत आजच्या एकंदर प्रवासाचा आढावा घेत व उद्याचे नियोजन करत जेवण आवरले.
सकाळपासून १८० किमी सायकल चालवली होती... कात्रज, खंबाटकी, पसरणी व आंबेनळी हे चार घाट पार केले होते.
(यातला कात्रज व आंबेनळी हे एकदम सोपे.. त्यातही कात्रज घाट आम्ही बायपास रस्त्याने आल्यामुळे घाट म्हणावा असा नव्हताच. फक्त चढ होता. आंबेनळी म्हणजे फक्त उतार होता.)
एक झकास दिवस चविष्ट भोजनासमवेत संपत होता...
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Mar 2015 - 5:13 pm | विअर्ड विक्स
भरपूर दिवसांनी cycle वरचा लेख वाचतोय. अस्मादिकांनी सुद्धा १ ल्या मार्च सप्ताहात मोहीम फात्त्ते केली . पण cycle नव्हती. वेळ मिळाला तर डकवीन येथे … गिरनार ६.४५ तास!!!!!! तूर्तास एवढेच
11 Mar 2015 - 5:20 pm | पिलीयन रायडर
गुड!! किप इट अप!
11 Mar 2015 - 5:21 pm | त्रिवेणी
मस्त सुरुवात.
11 Mar 2015 - 5:22 pm | लॉरी टांगटूंगकर
झकास हो मोदकाण्णा!
पुभालटा हेवेसांनल
11 Mar 2015 - 7:52 pm | आदूबाळ
+१
येहीच बोल्ताय.
11 Mar 2015 - 5:24 pm | खंडेराव
वाट बघतोय पुढच्या भागाची..१८० किमि, ४ घाट..सॉलिड!
11 Mar 2015 - 5:27 pm | सव्यसाची
जबरदस्त!
मोदक सर तुमचा उत्साह लाजवाब!
11 Mar 2015 - 5:32 pm | सुधीर
अगदी हेच म्हणतो.
11 Mar 2015 - 6:08 pm | जगप्रवासी
तुमचे लेख वाचून मला सुद्धा सायकल चालवायची हुक्की येते, मग दोन दिवस अगदी नेमाने चालवून तिसरया दिवशी परत येरे माझ्या मागल्या.....
11 Mar 2015 - 6:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जब्राट कीप इट अप...!!
11 Mar 2015 - 7:26 pm | कंजूस
उत्कंठावर्धक आणि चला उठा सांगणारे लेखन आवडले.
11 Mar 2015 - 8:02 pm | प्रीत-मोहर
मस्त . पु भा प्र.
11 Mar 2015 - 8:08 pm | कंजूस
साइकल टीम
11 Mar 2015 - 8:12 pm | सौंदाळा
तुझे कौतुक करावे, खच्चुन शिव्या द्याव्यात (लाडाने ;) का साष्टांग नमस्कार घालावा या विचारात आहे
पुभाप्र
11 Mar 2015 - 8:14 pm | सुबोध खरे
आताशा १८० किमी मोटारीने पण नकोसे वाटतात. मोटारसायकलने तर नकोच. मग सायकलने
मोदक राव प्रणाम __/\__
बाकी स्ट्रोबेरी क्रीम भारीच आहे. पाहून तों पा सु
11 Mar 2015 - 8:20 pm | आजानुकर्ण
झकास लेख. खूप आवडला. पुढचा भाग पटापट येऊद्या.
12 Mar 2015 - 1:00 am | रामपुरी
पु भा प्र
12 Mar 2015 - 5:03 am | श्रीरंग_जोशी
लै भारी उपक्रम सुरू आहेत.
वर्णन अन फटु आवडले. पुभाप्र.
12 Mar 2015 - 9:01 am | अत्रुप्त आत्मा
+१
12 Mar 2015 - 9:08 am | खटपट्या
+२
12 Mar 2015 - 7:08 am | पॉइंट ब्लँक
सायकलीवरून केलेल्या प्रवासाचे छान वर्णन केले आहे. फोटोपण छान आहेत.
12 Mar 2015 - 10:23 am | मोदक
धन्यवाद मंडळी. :)
उत्कंठावर्धक आणि चला उठा सांगणारे लेखन आवडले.
कंजुस साहेब - उद्देश तोच आहे. ;)
तुम्ही सायकल चालवायला कधी सुरू करताय?
12 Mar 2015 - 1:17 pm | बाळ सप्रे
मस्त रुट आहे.. एक पसरणी घाट खूप आव्हानात्मक आहे बाकी रुटवर मस्त मजा येते सायकलिंग करायला..
तुमच्या आधी दोनच आठवडे पुणे-पाचगणी अशी भ्रमंती झाली सायकलवर.
12 Mar 2015 - 2:54 pm | मोदक
अरे व्वा... अभिनंदन.
आणखी नवीन रूट असल्यास जरूर सांगा.
आमचे पुणे सातारा रोड, पुणे मुंबई रोड आणि पुणे सोलापूर रोडच्या आसपासचे जवळ जवळ सगळे रूट झाले आहेत.
एकदा नगर रोडचा बाकी टीममेट्सना वाईट अनुभव आल्याने नगर रोडवर फुली मारली आहे.
12 Mar 2015 - 1:32 pm | सस्नेह
सायकलवरून १८० किमी ? __/\__
बाकी, ईत्कं सायकलिंग करून मोदकाचा आता बोंबील व्हायला हरकत नाही ! +D
12 Mar 2015 - 2:35 pm | एस
भन्नाट!
पुभाप्र!
12 Mar 2015 - 5:13 pm | मॅक
अप्रतिम.......
12 Mar 2015 - 5:20 pm | मी_आहे_ना
झकास वर्णन आणि फोटो रे मोदका! तो "स्ट्रॉबेरी विथ क्रीम" फोटो बघून, तुझाच २०१२ च्या "स्ट्रॉबेरी फेस्टिवल" वाला लेख आठवला, बाकीचेही लिखाण डोळ्यासमोर आले, आणि "व्हर्साटिलिटी" म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आला.
पुलेशु
12 Mar 2015 - 7:21 pm | विजुभाऊ
मस्त मजा आली वर्णन वाचताना.
तुम्ही कधी कराड कोयनानगर मार्गे खाली चिपळूण लाउतरलाय का? गाडीला सुद्धा दमवणारा रस्ता आहे.
पाटण कोयना नगर पोफळी पर्यन्तचा रस्ता मात्र भरपूर झाडीमुळे एकदम चित्रातल्यासारखा वाटतो.
12 Mar 2015 - 7:53 pm | सौंदाळा
+१
आणि शेडगेवाडी, कोकरुड , मलकापुर आंबा घाट्मार्गे कोकणात उतरा. मलकापुराजवळ काही भाग सोडला तर रस्ता एकदम मस्त.
आंबा घाटातला रस्ता तर अतिसुंदर
12 Mar 2015 - 8:18 pm | मोदक
पाटण कोयना नगर पोफळी पर्यन्तचा रस्ता मात्र भरपूर झाडीमुळे एकदम चित्रातल्यासारखा वाटतो
आता लगेचच कुंभार्ली घाट टारगेटवर आहे.
कोकणात उतरणारे एक एक घाट आम्ही सर करत आहोत. ताम्हीणी, वरंधा, आंबेनळी असे तीन झाले. आता अर्थातच कुंभार्ली आणि अंबा घाट.. बघू कसे जमते आहे ते!
उन्हाळी सुट्ट्यांमधले बालपण पोपळीला गेल्यानेही तो घाट एकदा करायचाच्च आहे.
बादवे - कोयनेतील उद्यानापासून एक रस्ता मोठमोठाल्या बोगद्यांमधून आलोरे येथे निघतो. हा रस्ता संपूर्णपणे पाटबंधारे विभाग आणि सध्या "महानिर्मिती" च्या ताब्यात आहे. या रस्त्याने प्रवास करण्याची संधी मिळाली तर सोडू नका.
कुंभार्ली घाटाला लाजवेल असा रस्ता आहे!!
आणि शेडगेवाडी, कोकरुड , मलकापुर आंबा घाट्मार्गे कोकणात उतरा. मलकापुराजवळ काही भाग सोडला तर रस्ता एकदम मस्त. आंबा घाटातला रस्ता तर अतिसुंदर
१ जानेवारीला या रस्त्यावरून दुचाकीने जाणे झाले आहे... खतर्नाक रस्ता..!!
12 Mar 2015 - 7:46 pm | जे.पी.मॉर्गन
झकास! पुढच्या भागाच्या अर्थातच प्रतीक्षेत.
जे.पी.
12 Mar 2015 - 9:03 pm | असंका
सादर प्रणाम!
हे वरचे श्रम जे आपण केलेत ते नुसते वाचुनसुद्धा मेंदुला शीण आलेला आहे...
12 Mar 2015 - 11:55 pm | प्रसाद गोडबोले
लेख वाचुनच दम लागला . आत्तापर्यंत सायकलवर सर्वात जास्त म्हणजे ४० किमि चा सपाटीचा प्रवास केला आहे तोहि १४-१५ वर्षांपुर्वी ते आठवले !
आता कितपत जमेल देव जाणे !!
13 Mar 2015 - 4:32 am | रुपी
बापरे.. सायकलवर १८० किमी? खरंच माझाही नमस्कार!
13 Mar 2015 - 7:59 am | स्पंदना
फक्त चारच घाट? ;)
:))))
मी तर घाटच काय पण सपाट रस्त्यावर सुद्धा एक किमी सायकल चालवू शकत नाही. सो तुम्ही आदरणीय. ध्येयवादी, स्फुरणीय, वगैरे, वगैरे.
अन हे सगळ अतिश्शय कौतुकाने हं. नाहीतर येतील छिद्रान्वेषी चाळण्या घेउन.
13 Mar 2015 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा
@मी तर घाटच काय पण सपाट रस्त्यावर सुद्धा एक किमी सायकल चालवू शकत नाही. >> =))
13 Mar 2015 - 11:23 pm | श्रीरंग_जोशी
मांडी घालून मी १०० फुटही सायकल चालवू शकणार नाही =)) .
13 Mar 2015 - 11:05 pm | रवीराज
तुमच्या सायकलींगला मनापासुन दाद द्यावी लागेल.
(पण पुण्यात कधी येणार परत,ते काय आहे की पुढचे भाग लवकर वाचायला मिळतील.)
14 Mar 2015 - 12:51 am | जुइ
पुभाप्र!
14 Mar 2015 - 1:54 pm | सांगलीचा भडंग
भन्नाट प्रवास
15 Mar 2015 - 12:54 pm | शैलेन्द्र
मस्त...
१८० किमी व २ मोठे घाट ही छान अचिव्हमेंट आहे..
आजवर मी केलेल्या घाटातला सर्वाधिक जीव काढणारा म्हणजे, नेरळ- माथेरान.. सायकलच पुढच चाक अक्षरशा वर उचलल जात चढावर.. :)
18 Mar 2015 - 10:06 pm | मोदक
नेरळ- माथेरान रूटची आणखी माहिती देता का..?
18 Mar 2015 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी
नेरळ- माथेरान घाट: जून २००७ मध्ये हापिसातल्या टिमबरोबर माथेरानला सहलीला गेलो होतो. जाताना नेरळ स्थानकावरून टॅक्सीने गेलो होतो कारण मिनी ट्रेनची तिकिटे मिळाली नव्हती. या प्रवासात एक म्हातारे गृहस्थ रेसची सायकल वापरून घाट चढत होते. चालकाने सांगितले हे आजोबा रोज हा घाट सायकलने चढून जातात.
दुसर्या दिवशी परतीच्या प्रवासात आमच्या टिमला पायी घाट उतरायची हुक्की आली. नेमके आठवत नाही पण ज्या ट्रेनचे आरक्षण करून ठेवले होते ती ट्रेन अडीच तासांनी नेरळहून सुटणार होती. हा घाट पायी चालत पाहणे डोळ्यांसाठी फारच सुखद होते. पण आमच्या दुर्दैवाने जोराचा पाऊस सुरू झाला. मग काय पूर्ण भिजून नेरळ स्टेशनला गाडी सुटण्याच्या पाच मिनिटे आधी पोचलो.
सायकलने चढून जाण्यासाठी (अंतर अंदाजे १०-११ किमी) हा घाट नक्कीच आव्हानात्मक असावा.
15 Mar 2015 - 4:43 pm | बॅटमॅन
लैच जबराट. मध्ये राजगुरूनगर ते भोरगिरी हे ५० किमी चालवताना झालेली दशा आठवली. अर्थात रस्ता व सराव यांवर अवलंबून आहे म्हणा ते. पण धागा लयच भारी.
एक प्रश्न या अनुषंगाने आहे तो म्हणजे व्यवस्थित साधनसामुग्री असेल तर दिवसाला १००-१२० किमी पार करण्यासाठी सराव कसा करावा आणि त्या लेव्हलपर्यंत फिटनेस यायचा तर किती दिवस लागतील?
15 Mar 2015 - 4:45 pm | बॅटमॅन
अन यात फक्त १ दिवसासाठी नव्हे तर सलग दोन दिवस प्रत्येकी १००- १२० किमी असे अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद.
15 Mar 2015 - 7:08 pm | शैलेन्द्र
सलग २ दिवस १००-१२० मारण्यासाठी सायकलींगचा दररोजचा कमीत कमी ३०-४० किमी सराव असायला हवा (कमीत कमी १२-१५ दिवस.) त्याच्बरोबर अधुनमधुन ३-४ कीमी धावणे व बैठकांसारखे व्यायम करावेत. तसेच हे १००-१२० कीमी कोणत्या प्रकारच्या रस्त्याने करायचे आहेत हेही महत्वाचे आहे.
बाकी मार्गदर्शन मोदक साहेब करतीलच..
19 Mar 2015 - 12:52 pm | बॅटमॅन
अनेक धन्यवाद शैलेंद्र साहेब. एक महत्त्वाची यार्डस्टिक दिल्याबद्दल.
16 Mar 2015 - 8:09 am | एक एकटा एकटाच
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
16 Mar 2015 - 2:36 pm | मोदक
मध्ये राजगुरूनगर ते भोरगिरी हे ५० किमी चालवताना झालेली दशा आठवली.
नक्की काय अडचण आली होती? पाय अवघडले, डीहायड्रेशन की आणखी काही..?
एक प्रश्न या अनुषंगाने आहे तो म्हणजे व्यवस्थित साधनसामुग्री असेल तर दिवसाला १००-१२० किमी पार करण्यासाठी सराव कसा करावा आणि त्या लेव्हलपर्यंत फिटनेस यायचा तर किती दिवस लागतील?
या प्रश्नाचे उत्तर थोडे अवघड आहे कारण फिटनेस त्या लेव्हल पर्यंत येण्यासाठी सुरूवात कोणत्या लेव्हल पासून करणार आहात हे महत्वाचे आहे आणि सुरूवात करण्याची लेव्हल प्रत्येकाची वेगळी असते.
१) अगदीच नवीन सुरूवात असेल तर रोज वॉर्म-अप करून ५ / १० किमी पासून सुरूवात करावी.
२) उत्साहाच्या भरात अंतर कापताना "इतकेच अंतर परत चालवत जायचे आहे" हे लक्षात ठेवावे.
३) खूप कमी वेळात भरपूर वेगवान सायकलींग करून लगेचच "बर्न आऊट" होवू नये.
४) अंतर हळूहळू वाढवत न्यावे तसेच सायकलसोबत जास्तीत जास्त वेळ घालवल्याने आपल्याला अनेक गोष्टी आपोआप कळू लागतात.
५) सलग २५ / ३० किमी सायकलींग करून फारसा दम लागत नसेल तर एका दिवशी १०० किमी सायकलींग करण्यास आपण तयार आहोत असे गृहीत धरण्यास हरकत नाही.
६) किती दिवस लागतील हे नेमके सांगता येणार नाही - ते आपले आपण ठरवावे. एक दोनदा अपयश आले तरी हरकत नाही. प्रयत्न सोडू नयेत.
७) १०० / १२० किमी सायकलींग कोणत्या प्रकारच्या रस्त्यावर आहे, तिथले प्रॉब्लेम्स काय असू शकतात वगैरे गोष्टींना तोंड देण्याची तयारी असावी. समजा सायकल पंक्चर झाली तर.. किंवा एखादी दुखापत झाली तर.. असे प्रश्न तयार करून "आपण काय करू?"हा प्लॅन ठरवून ठेवावा.
८) रस्तावर कोणासही मदत मागण्यास संकोच करू नये.
सलग २ दिवस १००-१२० मारण्यासाठी सायकलींगचा दररोजचा कमीत कमी ३०-४० किमी सराव असायला हवा (कमीत कमी १२-१५ दिवस.) त्याच्बरोबर अधुनमधुन ३-४ कीमी धावणे व बैठकांसारखे व्यायम करावेत.
हेच लिहिणार होतो.. धन्यवाद शैलेंद्र!
16 Mar 2015 - 3:22 pm | कपिलमुनी
ह फार महत्वाचा मुद्दा आहे
16 Mar 2015 - 3:31 pm | मोदक
अनुभवाचे बोल आहेत ते मुनीश्वर...
किस्से सांगेन याचे कधीतरी... :))
19 Mar 2015 - 12:59 pm | बॅटमॅन
डीहायड्रेशन इतके झाले नव्हते. पाय अवघडले होते पण गिअर्स नीट अॅडजस्ट न केल्याचे परिणाम आणि शिवाय रस्त्यावरचे चढ-उतार तीव्र असल्याचा आणि रस्ता तितका खास नसल्याचा परिणाम. एकूणच अजून सराव पाहिजे हे अधोरेखित करणारा अनुभव होता. इन दि एंड, तसे जमले, पण ३० किमीनंतर लै थकलो होतो. शेवटचे १०-१५ किमी तर कशी सायकल दामटली ते माझे मला माहीत. तीव्र चढ-उतारामुळे गिअर बदलायची कटकट न करता २ र्या गिअरवरतीच कॉन्स्टंट ठेवली सायकल. तुलनेने बराच कमी त्रास झाला अॅज़ कंपेअर्ड टु गिअर-चेंजिंग. हे कदाचित चूकही असू शकेल पण तेव्हा तिथे तसा अनुभव आला खरा.
बाकी डीटेल्ड सल्ल्याकरिता अनेक धन्यवाद. या गाईडलाईन्सचे नक्कीच पालन करेन. किमान ३-४ महिन्यांचा तरी प्लॅन दिसतो आहे. त्याबरहुकूम फिटनेस नक्की वाढवायचा प्रयत्न करेन.
अन इंटेंडेड रस्ता नेशनल हायवे आहे. सबब रोड क्वालिटीबद्दल तक्रार इल्ले. अशा ठिकाणी तुलनेने कमी श्रमात सायकलिंग होते.
शिवाय अजूनेक सल्ला पाहिजे: घाट चढायला काही खास टेक्निक आहे की स्टॅमिना वाढवून सायकल रेमटवणे हीच स्ट्रॅटेजी आहे?
19 Mar 2015 - 2:12 pm | मोदक
घाट चढायला काही खास टेक्निक आहे की स्टॅमिना वाढवून सायकल रेमटवणे हीच स्ट्रॅटेजी आहे?
घाट चढवताना स्वतःकडे आणि सायकलकडे खास लक्ष द्यावे लागते.
घाट सुरू होण्याआधी
१) सायकल पुन्हा एकदा नीट चेक करून घ्यावी. ब्रेक, हवा आणि बॅग वगैरे नीट जागच्या जागी आहेत का बघावे.
बॅगांचे पट्टे, एखादा भाग चाकाजवळ सुटा राहून चाकात येवू नये याची काळजी घ्यावी.
२) तहान लागली असेल किंवा नसेल किमान अर्धा ते पाऊण लिटर पाणी प्यावे. घाटामध्ये स्नायूंवर आणि एकूणच शरिरावर भरपूर ताण येतो. घामही भरपूर येतो त्यामुळे लगेच डीहायड्रेशन होते व पायात Cramps येणे, पाय अवघडणे. आणखी वाईट गोष्ट म्हणजे "मसल टियर" त्यामुळे आधिपासूनच हायड्रेटेड रहावे.
३) सायकल शक्यतो हलक्या गेअर वर ठेवावी. म्हणजे चढ आला तर लगेच बदल करावे लागत नाहीत.
घाट चढताना
१) एका सलग लयीमध्ये पेडलींग करावे, केडन्स मध्ये फारसा बदल करू नये.
२) गेअरचा योग्य पद्धतीने वापर करावा. एखाद्या वेळी आपला फक्त केडन्स वाढत असेल आणि अंतर फारसे कापले जात नसेल तर एक गेअर वाढवावा.
३) दम लागल्याने थांबावयाचा विचार करत असताना आणखी एखादा टप्पा पार करून मग थांबावे.
म्हणजे... समजा मी सायकल चालवताना दम लागला आणि A या थांबावयाचे ठरवत आहे. तर तेथून पुढचे B ठिकाण हेरून त्या ठिकाणी थांबावे. B थोडे लांब असावे. B नीट पार केले व आणखी दम शिल्लक असेल तर सरळ C ला टारगेट करावे व तेथे विश्रांती घ्यावी.
४) रस्त्यामध्ये दिसणारे एखादे झाड, विजेचा खांब.. अशा गोष्टी घाट चढताना टारगेट ठरवाव्यात..एक खांब मागे पडला की दुसरा खांब.. नवीन एखादे झाड.. एखादे देऊळ.. वगैरे वगैरे..
५) सायकलींग करताना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वेळ कसा घालवायचा..?? यासाठी मी कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत सायकल चालवतो. घाटामध्ये "हे गाणे संपल्यानंतरच ब्रेक घ्यायचा" वगैरे प्लॅन करता येतो.
६) घाट चढताना शक्य असेल तर आधी घाटाचा अभ्यास करावा. किती अंतर आहे? उंची कशी वाढत जाते? आजुबाजूला झाडे आहेत की सावली नसलेला रखरखाट आहे? वाटेत एखादे गांव आहे का?
७) घरात बसून घाटाची उंची मोजण्यासाठी http://veloroutes.org/bikemaps/# याचा वापर करावा. या ठिकाणी त्रास इतकाच आहे की प्रत्येक रस्ता वळणावळणासह सिलेक्ट करत बसावे लागते.
८) खूप दम लागला किंवा शरिरात थोडाजरी बदल जाणवला तरी लगेच थांबावे व विश्रांती घ्यावी.
९) इलेक्ट्रॉल, ग्लुकॉन डी, केळी वगैरे वस्तू जवळ ठेवव्यात.
१०) समोरून येणार्या आणि मागून येणार्या गाड्यांकडे नीट लक्ष ठेवावे.
११) कोकणातल्या घाटात किंवा पाबे / कादवे खिंडीत नीरव शांतता असते. त्यावेळी शांततेची मजा घेत सायकल चालवावी..
१२) घाटातल्या रस्त्यांचा सराव करण्यासाठी सिंहगड घाट हा उत्तम मार्ग आहे.
सध्या इतकेच.. आणखी सुचले तर येथे टाकेनच!
19 Mar 2015 - 2:37 pm | बॅटमॅन
बहुत धन्यवाद, खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल.
भोरगिरीकडे सायकल चालवताना अजूनेक जाणवलेली गोष्ट जी वरच्या प्रतिसादातही दिसत आहे ती म्हणजे पाणी पिणे. साधारण पाणी पिण्याची फ्रीक्वेन्सी व क्वांटिटी काय असावी? मला आठवतेय त्यानुसार जास्त पाणी प्याल्यास ओटीपोटाजवळ दुखते. विशेषतः उजवीकडच्या बाजूला. घाट चढताना अर्धापाऊण लिटर पाणी पिणे त्यामुळे कसे म्यानेज होईल याबद्दल अंमळ साशंकता आहे.
19 Mar 2015 - 2:42 pm | मोदक
तहान लागली किंवा नाही लागली तरी आपल्या सोयीनुसार पाणी पीत रहावे.. मला नक्की फ्रीक्वेन्सी व क्वांटिटी सांगता येणार नाही.
जास्त पाणी प्यायल्याने मला त्रास झाला नाहीये कधी..
अगदीच एखादा चेकपॉईंट हवा असेल तर आपल्या लघवीचा रंग पिवळसर होवू लागला की लक्षात घ्यावे शरिराला पाण्याची गरज आहे. अनेकदा तहान न लागल्याने आपण पाणी पिणे टाळतो पण त्याचा परिणाम शरिरावर होतोच!
19 Mar 2015 - 2:52 pm | बॅटमॅन
धन्यवाद. मला जास्त पाणी पिल्यावर जरा त्रास होतो. तरी लघवीचा इंडिकेटर एकदम परफेक्ट आहे.
19 Mar 2015 - 4:29 pm | पैसा
झकास!
6 Apr 2015 - 7:08 pm | गणेशा
अप्रतिम प्रवास मोदका ... खुप दिवसानी लेख वाचला तुझा.
अरे ही सायकल कितीला भेटते रे.. ( आता येथुन सुरुवात आहे म्हनुन हसु नये.. मी काय सायकलिंग नाय करणार बॉ तुझ्यासारखे.. पण निदान इथल्या इथे तरी..)
6 Apr 2015 - 7:29 pm | श्रीरंग_जोशी
सायकलींग... (भाग १)
बाकी राजकारण सोडून सर्वसामान्यांच्या धाग्यांवर आपण प्रतिक्रिया दिली हे पाहून बरे वाटले :-) .
6 Apr 2015 - 7:41 pm | कपिलमुनी
असत्यात हो ते सगळीकडं !
8 Apr 2015 - 7:46 pm | मोदक
गणेशा..
माहिती मिळाली की आणखी काही माहिती हवी आहे..?
श्रीरंगपंत - धन्यवाद! :)