शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in जनातलं, मनातलं
19 Feb 2015 - 10:04 am

शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
shamitabh
अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं. लौकिकार्थाने प्रचंड यशस्वी कारकिर्दीच्या ‘आखरी पडाव’ वर, पिक्चर पडला तरी हारण्यासारखं काहीच नाही अशा एका स्थितीला पोचल्यावर आता अमिताभने स्वत:ची ‘मन की बात’ ऐकत वेगवेगळे प्रयोग करायला सुरूवात करूनही आता बराच काळ लोटला आहे. स्वत: केवळ स्वत:साठीच पिक्चर काढण्याच्या किशोर कुमार, देव आनंद यांच्या लहरी वाटेवर अमिताभही आता चालायला लागला आहे, हे ‘शमिताभ’ पाहिल्यावर मला प्रकर्षाने जाणवलं.

एका वाक्यात चित्रपटाची कथा सांगायची म्हणजे सिनेमात हिरो बनण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असलेला मुका नायक [धनुष] एका अपयशी म्हातार्‍या नटाचा [अमिताभ] आवाज उसना घेतो आणि पडद्यावर साकारते एक अनोखे द्वंद्व जे कधी अनपेक्षित तर बर्‍याचदा अपेक्षित वळणे घेत शेवटी ०२ तास ३५ मिनिटांनी एका शोकांतिकेत संपते. मध्येमध्ये गोष्ट पुढे सरकवण्यासाठी टेकू म्हणून अक्षरा हसन नावाचा [बहुधा वशिल्याचा] ठोकळा येतो आणि आपल्या सहनशीलतेची परीक्षा घेतो. अमिताभ ज्या विद्यापीठाचा Professor Emeritus आहे त्या विद्यापीठाच्या अंगणवाडीतही अक्षरा हसनला अद्याप अ‍ॅडमिशन मिळायची आहे.

ऑफ-बीट सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यात संतुलन साधताना चित्रपट थोडा पसरट झाला आहे. पण त्यामुळे माझ्यासारख्या प्रेक्षकाला मधेमधे थोडी डुलकी घेऊन अक्षरा हसनच्या गंभीर अभिनयाने [?] येणारा शीण घालवण्यास मदत होते. सुरुवातीलाच नायकाचं सगळं आयुष्य एका गाण्यात लपेटून टाकल्यावर चित्रपट वेगवान असेल ही आपली समजूत लवकरच खोटी ठरते. आता मध्यंतर घ्यायची वेळ झाली आहे हे आपल्याला जाणवूनही दिग्दर्शकाला तसे वाटेपर्यंत खुर्चीत बसून राहणे भाग पडते.

अमिताभ- अमिताभ करता करता संकलनात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. थोडी अजून कात्री चालवून चित्रपट थोडा आटोपशीर करण्यास बराच वाव होता. अनेक ठिकाणी प्रसंग पॅच अप केल्यासारखे वाटतात,जसं काही अमिताभ-धनुषची मुख्य कथा आधी लिहून, चित्रित करून मग बाकीचे प्रसंग घुसडले आहेत. सांप्रतकालीन मसाला सिनेमाला चिमटे काढण्याच्या नादात बाल्कीने भरपूर दाक्षिणात्य आचरटपणा केला आहे. कदाचित मुंबैय्या सिनेमावाल्यांच्या पार्श्वभूमीवरचा चित्रपट असल्याने AIB छाप भाषाही यथेच्छ वापरली आहे. अमिताभनेही आतापर्यंत पडद्यावर दिल्या नसतील एवढ्या शिव्या या एकाच चित्रपटात दिल्या आहेत.

आता धनुषसारख्या माणसाला अमिताभचा प्लेबॅक देणं, त्यावर तो यशस्वी झालेला दाखवणं हा अनेकांच्या मते मायनस पॉइंट असू शकतो. पण एक अतिसामान्य चेहर्‍याचा नायक म्हणून धनुष ‘फिट’ आहे. बाकी राहिला ते अमिताभचा त्याला असलेला प्लेबॅक. संपूर्ण चित्रपटभर एका ब्लॅक कॉमेडीचा अंडरकरंट आहे, तो म्हणजे आजच्या तंत्रशरण झालेल्या आणि संवादफेक, शुद्ध उच्चार , उत्तम लेखन अशा नाट्य-सिनेमाच्या मूलभूत तत्वांपासून दूर झालेल्या व्यावसायिक सिनेमावर केलेली ही टीका आहे. आणि ही टीका करणारा आवाज अमिताभचा आहे. ‘लाईफबॉय’ची जाहिरातही त्यातलाच एक प्रकार असावा [ती खरोखर in-script जाहिरात नसली तर. पण असावी कारण अमिताभ या चित्रपटासाठी टीव्हीवर Benadrylचीसुद्धा जाहिरात करतो आहे. असो.] हे सगळं करण्याच्या नादात नट आणि आवाज यांतील संघर्ष या [आधी कधीतरी] मुख्य असलेल्या विषयाकडे दिग्दर्शकाचं दुर्लक्ष होतं आणि चित्रपट मध्येच पकड सोडतो. पण मध्यंतरानंतर शेवटाकडे जाताना पुन्हा वेग घेतो. सिनेमात अमिताभ धनुषचा पर्सनल स्टाफ [वॅलेट] म्हणून वावरत असतो. या पर्सनल स्टाफच्या कष्टाचं रेक्गनिशन म्हणूनच की काय साधारणत: शेवटच्या टायटल्सच्या शेवटी शेवटी येणारं मुख्य कलाकारांच्या वॅलेच नाव चित्रपट संपल्यावर लगेच दिग्दर्शकाच्या नावाआधी येतं. स्वानंद किरकिरे हा खरोखरच ‘मेहनती’ गीतकार आहे हे या चित्रपटात पुन्हा सिद्ध होतं.

चित्रपट अमिताभसाठीच लिहिलेला आहे हे तर स्पष्टच आहे. पण तो अमिताभनेच लिहून घेतला आहे की काय अशी मला दाट शंका आहे. संपूर्ण सिनेमाचे नसले तरी स्वत:च्या सीन्सचे दिग्दर्शनही त्यानेच केले असावे. कारण त्या त्या सीन्सचे टेकिंग थोडं जुन्या वळणाचं आहे. अर्थातच हा माझा एक अंदाज आहे. कदाचित तांत्रिकतेपेक्षा अंगभूत कलेला महत्त्व देणार्‍या जुन्या नटाच्या व्यक्तिरेखेला साजेसं म्हणून दिग्दर्शकाने तसं केलं असावं. पण खर्‍या अमिताभच्या वैयक्तिक आयुष्यातले संदर्भही कधी चोरटेपणाने तर कधी जोरकसपणे येऊन जातात. उदा. रेडिओवर अमिताभचा आवाज कसा ‘रिजेक्ट’ झाला होता व त्यानंतरची कथा सर्वांनाच माहिती आहे. ‘शमिताभ’चा विषयच मुळी नट आणि आवाज असल्याने हा संदर्भ जोरकसपणे आला आहे. तसेच रेखाच्या काही सेकंदाच्या गेस्ट अपीअरन्स मधून प्रेक्षक काय समजायचे ते समजतो. इथे लेखक-दिग्दर्शक बाल्की प्रेक्षकाला चित्रपटशी कनेक्ट करण्यात यशस्वी होतो. फिल्म इंडस्ट्रीने स्वत:ला ‘बॉलीवूड’ म्हणवून घेणं हे खर्‍या अमिताभप्रमाणे पडद्यावरच्या अमिताभलाही आवडत नाही. या व अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटात अमिताभ बच्चन हा अमिताभ सिन्हा म्हणून वावरत असला तरी तो खरा अमिताभ बच्चनच आहे हे शेवटपर्यंत जाणवत राहते. कदाचित याला काही समीक्षक उणे मार्क्स देतील. पण मला तर हे जाणीवपूर्वक केलं आहे असं वाटतं. किंबहुना म्हणूनच सिनेमाची कल्पना ही स्वत: अमिताभचीच फॅण्टसी असावी असं मला वाटतं. त्यामुळेच कितीही शमिताभ, शमिताभ म्हटलं तरी शेवटी अमिताभच उरतो, पडदाभर. मग तुम्ही आमच्यासारखे त्याचे चाहते असा किंवा नसा.

ता.क.: आता ‘शमिताभ’मध्ये दारुड्याची भूमिका करून मद्यप्राशनाला उत्तेजन दिलं म्हणून कुणा संस्कृतीरक्षकाने बिचार्‍या अमिताभवर FIR दाखल करू नये म्हणजे मिळवलं !

http://aawaghmare.blogspot.in/

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2015 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शमिताभ पाहु की क्लासमेट यात क्लासमेटने बाजी मारली आणि शमिताभ बघायचा राहुन गेला. परिक्षण आवडलं.
नक्की पाहतो शमिताभ. धन्स.

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

19 Feb 2015 - 9:29 pm | बहुगुणी

अमिताभकडून अपेक्षा होत्याच, म्हणून पहायचा विचार होताच. त्याच्या करियरच्या या टप्प्यावर देव आनंद आणि किशोरकुमारशी तुलना विचार करण्यासारखी आहे.

कथाबीज interesting आहे, पण धनुषचा आवाज अमिताभ - ये बात कुछ हजम नही हुई!

अमिताभला शिव्या द्यायला लावल्या आहेत (किंवा त्याने लिखाणात योगदान देऊन दिल्या आहेत) हे वाचल्यावर थोडंसं खटकलं, पण कथेच्या संदर्भात असेल तर ते 'कलात्मक स्वातंत्र्य' वगैरे असेलही!

अर्धवटराव's picture

19 Feb 2015 - 9:46 pm | अर्धवटराव

नितांत सुंदर सिनेमा. अमिताभच्या चाहत्यांना पर्वणी. 'शमिताभ' या नावाची व्युत्पत्ती तर लाजवाब दाखवली आहे ( म्हणजे हल्ली असलं काहि बघायला मिळत नाहि म्हणुन लाजवाब ).

मला (विनाकारण) या चित्रपटाची तुलना पिके शी कराविशी वाटली... पिकेएव्हढं कलेक्शन तर फार लांब राहिलं, त्याच्या आसपास तरि पैसा बनवेल हा चित्रपट.

रेवती's picture

19 Feb 2015 - 10:08 pm | रेवती

हम्म्म........उलटसुलट प्रतिक्रिया ऐकल्याने शिनेमा पाहू की नको?
अजून सहा एक महिन्यांनी पाहते. नुकताच हॅपी न्यू इयर नावाचा अचरटपणा पाहून झालाय. त्यातील मनवा लागे हे गाणे आवडले आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Feb 2015 - 5:03 pm | निनाद मुक्काम प...

शामिताभ चुकूनही पाहू नका
एखाद्या अभिनेत्याच्या अभिनयाची शैली अति परिचयात अवज्ञा असल्याचे शामिताभ उत्तम उदाहरण आहे
१९८० ते १९९० मध्ये अशोक सराफ व आता मधल्या काळात भरत जाधव हयंची अभिनयाची शैली लोकांना आवडायची त्यांचे आचरट विनोदासः
आता त्या धाटणीचे सिनेमे अशोक व भरत अधून मधून करतात , पण हे सिनेमे कधी येउन गायब होतात हे सुद्धा काळात नाही
पा मध्ये अभिनय व वेशभूषा सर्वच बाबतीत अमिताभ ने एक प्रयोग केला म्हणून तो भावाला
ह्या सिनेमात मोठी बोल बच्चन डोक्यात जाते
बोल बच्चन अमिताभ बच्चन ही म्हण सार्थ ठरते
क्लास मेट हा बघणेबल आहे
अगदीच वेळ जात नसेल तर मितवा पहा
बदलापूर , पहा
कुणावर सूड उगवायचा असला तर रॉय पाहण्यास सांगा