II मोगरा फुलला मोगरा फुलला II
माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले, तिथे माझावर उत्तम संस्कार झाले. शाळेची इमारत चारी बाजुनी व मधे मोकळी जागा, या मोकळ्या जागेच्या बाजुनी उंचावर लाऊड स्पीकर लावले होते. प्रार्थना, सूचना देण्यासाठी याचा उपयोग होत असे, मात्र दुपारच्या सुट्टी मधे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम रचित गीतांचे प्रसारण केले जाई. ओम नमोजी आद्या, अवचित परिमळू, आजी सोनियाचा दिनु, पैल तो गे काऊ कोकताहे, धनु वाजे घुणघुणा, अरे अरे ज्ञाना, अशा सुंदर गीतांनी माझ्या मनात घर केले ते बालपणी, पण मनावरती कोरले गेले ते मोगरा फुलला. स्वर, शब्द व संगीत यांचा सुरेख मिलापाची प्रचीती देणारे संत ज्ञानेश्वर रचित मोगरा फुलला ही रचना.
मोगरा फुलला, मोगरा फुलला i
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला ॥
गाण्याची सुरवातच मुळी बासरीच्या दीर्घ आलापाने होते. हे बासरीचे स्वर मनाचा गाभारा प्रसन्न्तेने भा रून टाकतात. “मोगरा फुलला” हा स्वर लतादीदीनी इतका हळुवार व संयमाने उच्चारला आहे कि, कुणालाही नकळत वाऱ्याचा मंद झुळकेने उमलणारी मोगऱ्याची कळी. “कळियासी आला” याचा उच्चार ही असाच जणू मोगऱ्याच्या फुलांचा सडा अंथरलेला आहे आणि गगनाचा गाभारा फुलांच्या सुगंधाने गंधित झाला आहे
इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥
ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर लिहतात की गुरुंदेवानी ज्ञानवृक्षाचं जे रोप माझ्या मनाच्या अंगणी लावले आहे त्याचा वेल गगनावरी विसावला आहे. साऱ्या आसमंती त्याच वेलाचा मांडव आहे. चहूकडे फुलांचे ताटवे फुलले आहेत. हि ज्ञानरुपी फुले वेचतो आहे तो पुन्हा कळ्यांना बहार येतो आहे. या फुलांच्या सुगंधाने सारा आसमंत भरून गेला आहे. अशा या विलक्षण वेळी मनाचा गोंधळ उडाला आहे, मना मधे विचारांचा गुंता झाला आहे.
माझ्या मते ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वरानी ही रचना समाधी घेण्या अगोदर लिहली असावी. हे प्राप्त केलेले ज्ञान स्वता जवळ ठेवल तर मनाचा गुंता अधिक वाढेल, आपल्या मनाला कुरतडीत राहील. निवृत्तीनाथानी दाखवलेली वाट ही आता अंतिम ठिकाणावर पोहचली आहे, आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाले त्याच श्रेय अर्पण करण्याची योग्य वेळ ही आहे अशी ओढ त्यांचा मनाला लागली असावी.
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥
आणि मग एकाद्या सुंदर संधाकाळी जेंव्हा सूर्यनारायण अस्ताचलास पोहले असतील अशा शुभमुहर्तावर
ज्ञानेश्वरानी मनाचा गुंता करणारा ज्ञानरुपी फुलांचा हा सुरेख शेला विणून आपल्या बाप रखुमादेविवरी अर्पण केला असावा.
प्रतिक्रिया
7 Jan 2015 - 7:26 pm | पैसा
चांगलं लिहिलंय. मात्र 'मोगरा फुलला' वर अजून खूप काही लिहिलेलं वाचायला आवडलं असतं.
7 Jan 2015 - 9:20 pm | पर्नल नेने मराठे
सु रे ख
8 Jan 2015 - 7:36 am | स्पंदना
चु चु ? ? ?
8 Jan 2015 - 10:55 am | सविता००१
अगं किती दिवसांनी?????
स्वागत स्वागत..
8 Jan 2015 - 1:19 am | बहुगुणी
छान लिहिलं आहे, आणखी लिखाण येऊ द्या.
8 Jan 2015 - 11:05 am | सविता००१
छानच लिहिलंय.
मला नेहमी वाटतं लता आणि हृदयनाथांनी जाम मेहनत घेतली आहे या गाण्यावर. यात लता गाते ना- मोगरा फुलला? तेव्हा अक्षर्शः असं वाटतं की एखादी मोगर्याची कळी अगदी नाजूक पणे गुपचुप उमलते आहे. कुणाला पत्ताच नाही. आणि फुले वेचिता ऐकताना तर वाटतं की जशी जशी फुलं वेचू तशी तशी खरच वरती आणखी आणखी कळ्या उमलत जातायत. किती वेचू कळत नाही. अत्यंत हळुवार, नाजूक अशी चाल असलेलं गाणं. ऐकू तेव्हा तेव्हा मन एका अनामिक शांततेत आपोआप जातं.उगीच अती ताना, मुरक्या असं काहीही नसताना कळियासी आला हे म्हणून पहा. इतका आतून मोगरा उमलून येतो की बस्स.जितकी शिष्याची पात्रता, तितका गुरू दोन्ही हाताने ज्ञानदान करतच असतो नाही का? असाच अर्थ असावा असं मला वाटतं.
तुमचं विवेचनही आवडलं!
अजून लिहा.
8 Jan 2015 - 11:24 am | सुनील
अगदी.
मोगर्याची कळी अगदी अलगदपणे तीन दिवस उमलत असते आणि मग हिरव्याकंच पानांवर शुभ्र मोगर्याचे फुल दिसते!
8 Jan 2015 - 11:35 am | सविता००१
धन्यवाद हो! हा धागा नव्हता पाहिला मी.
छानच आहेत तुम्ही काढलेले फोटो. मला नव्हतं माहीत मोगर्याची कळी अगदी अलगदपणे तीन दिवस उमलत असते आणि मग हिरव्याकंच पानांवर शुभ्र मोगर्याचे फुल दिसते!
8 Jan 2015 - 11:10 am | सस्नेह
हे जरा खटकले.
'मनाचिये गुंती गुंफियला शेला' याचा अर्थ 'प्रत्येक धाग्या धाग्यात मन जडवून गुंफलेला शेला' हा सुसंगत वाटतो.
8 Jan 2015 - 2:13 pm | प्यारे१
+१
असेच म्हणतो. मनाचा गोंधळ असं न मानता 'मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो' अशा पद्धतीनं मनाचा वापर करुन एक छानसा शेला गुंफला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा शेला विठ्ठलचरणी अर्पण केला म्हणजे जणू मनाचा वापर थांबवला आणि असीम शांतीचा अनुभव आला असा विचार मांडता येतो.
हृदय नाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेले आणि लतादीदींनी गायलेले हे माऊलींचे अभंग खूपच उच्च दर्जाची आंतरिक शांती आणि समाधान देऊन जातात.
मोगरा फुलला बद्दल आणखी खूप आणि खूप तर्हेनं लिहीता येऊ शकतं.
8 Jan 2015 - 9:21 pm | आदित
सुंदर विवेचन!!!
मला गोनीदांच्या 'मोगरा फुलला' ची आठवण झाली. त्यात गोनीदांनी निवृत्तीनाथांचं आणि ज्ञानेश्वरांचं गुरु-शिष्याचं नातं अगदी हळूवारपणे उलगडून सांगितलंय.
8 Jan 2015 - 9:25 pm | दिलिप भोसले
मी मिसळपावचा गेले तीन वर्षापासुनचा वाचक आहे.इथे अनेक सदरामध्ये लिहणारे लेखक हे अगदी सहज व सुंदर लेख लिहतात, जे अतिशय वाचनीय असतात. मिसळपाव वरील लिखानातुनच मलाही लिह्वासे वाटले.लिखाण ही एक कला आहे. मोगरा फुलला हा माझा पहिला प्रयत्न आहे. खूप भीत भीत हे लिखाण मिसळपाव वर लिहले आहे. लिहित असताना शब्द सुचत नाहीत.शब्द रुसून बसतात. हा लेख लिह्ल्यावर आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी खूपच अधीन होतो. वाचकांनी हा लेख आवडल्याचे लिहले आहे. काही वाचकांनी अनमोल सूचना केल्या आहेत. मला कल्पना आहे कि आपल्या प्रतिक्रिया उतेजन पर आहेत.आपण आपले अभिप्राय लिहल्या बद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद