झिरना गेट......
हवालदाराची जबानी.....
‘हो साहेब मलाच सापडले ते प्रेत. मी नेहमीप्रमाणे लाकूडफाटा गोळा करण्यासाठी सकाळी बाहेर पडलो होतो. टेकडीच्या माथ्याआधी एक देवराई व बांबूचे बन लागते तेथेच दिसले मला ते.
ही टेकडी कुठे आहे ? आपल्या या फरासखान्यापासून जो रस्ता रामपूरकडे जातो त्या रस्त्यावर आर्धा मैल आत ! ती देवराई जरा एकांतातच आहे.’
‘जरा सविस्तर सांग ’ गोरा साहेब म्हणाला.
‘तो माणूस पाठीवर उताणा पडला होता. त्याच्या अंगात निळी बाराबंदी व डोक्यावर भरजरी मुंडासे होते. छातीवर आरपार गेलेला घाव स्पष्ट दिसत होता. आसपास बांबूच्या पात्यांवर वाळलेल्या रक्ताचे काळपट डागही दिसत होते.’
‘नाही ! रक्तस्त्राव थांबला होता. जखम वाळली होती बहुदा. त्या रक्तावर माशाही चिकटलेल्या दिसत होत्या.
‘काही शस्त्र वगैरे सापडले का ?’
‘नाही साहेब काहीच नाही. एका झाडापाशी कापलेला दोर व एक कंगवा सापडला तो जमा केला आहे. पण बहुदा तेथे बरीच मारामारी झाली असावी कारण सगळीकडे रक्ताचे डाग व गवतही तुडवले गेलेले दिसत होते. काही ठिकाणी बांबूही तुटले होते.
‘काही घोडा वगैरे ?’
‘नाही साहेब ! तिथे पायी चालणेच अवघड आहे तर घोडा कुठला ?
‘बरं त्या साधूला पाठवा आत !
साधूचा कबुलीजबाब !
‘वेळ ? साहेब कालचीच दुपारची वेळ होती. हा माणूस रामपुरला चालला होता. त्याच्या हातात एका घोड्याचा लगाम होता व घोड्यावर एक बाई. मला आत्ताच कळले की ती बाई त्याची बायको होती. तिने डोक्यावरुन पदर घेतला होता त्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. हो ! नववारी ! ती ज्या घोड्यावर बसली होती तो मोठा उमदा होता. त्याची आयाळ लक्षात राहण्यासारखी होती हे मात्र खरे.
तिची उंची ? असेल पाच फुट आणि वर पाच ते सहा इंच. मी सन्यासी असल्यामुळे तिच्याकडे काही विशेष लक्ष दिले नाही. तो चालणारा माणूस हत्यारबंद होता. त्याच्या कमरेला तलवार लटकत होती व खांद्याला तीरकमठा. त्याच्या भात्यात दहा एक बाणही दिसत होते.
त्याचा मृत्यु अशा प्रकारे होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. मी पाहिलेला मणूस आता या जगात नाही याचे मला खरोखरच वाईट वाटते.
‘ठीक आहे तुम्ही जाऊ शकता’.
शिपायाने दिलेला कबुलीजबाब.
‘कोणाला पकडले आहे तुम्ही हवालदार ?
‘मी पकडलेला माणूस ? तो या भागातील एक कुविख्यात ठग आहे. मी जेव्हा त्याला अटक केले तेव्हा तो रामपूरच्या पुलावर वेदनेने विव्हळत पडला होता. वेळ ? असेल रात्रीची आठ...निश्चित आठवत नाही आता. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी परवाच याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने लाल रंगाचा अंगरखा घातला होता व त्याच्या कंमरेला मोठी तलवार लटकत होती. मी त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण साहेब तो निसटला. त्याच्याकडे एक तिरकमठा व काही बाणही होते. ते त्या मेलेल्या माणसाचे आहेत असे म्हणता ? मग त्यानेच त्याला ठार मारुन ते घेतले असणार. हो आणि घोडा तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच आहे. त्या पुलापलिकडेच मला तो घोडा शांतपणे चरताना सापडला. बहुतेक त्या घोड्यानेच त्याला पाठीवरुन फेकून दिले असावे.
या भागातील ठगांच्या परंपरेनुसार ते कोणत्याही स्त्रीच्या वाटेस जात नाही. त्याला अपवाद फक्त हा ‘नासीरखान’. या नालायकाने या भागातील स्त्रियांना जेवढा त्रास दिला आहे तेवढा आत्तापर्यंत कोणी दिला नसेल. मागच्याच थंडीत झासीवरुन आलेल्या एका विवाहितेवर बलात्कार हो़ऊन तिचा खून झाला होता. तो यानेच केला असा प्रवाद आहे. एवढेच नाही तर तिच्याबरोबर आलेल्या तिच्या मुलीचाही खून झाला होता. या ठगाने जर त्या माणसाचा खून केला असेल तर त्याने त्या बाईचे काय केले असेल...देव जाणे....
या नासीरखानच्या प्रकरणात साहेबांनी स्वत: लक्ष घालावे ही विनंती आहे....
म्हातारीचा कबुलीजबाब
‘साहेब तो मेलेला माणूस माझा जावई आहे. तो काही रामपूरचा नाही. तो झासीमधे साहेबाच्याच सैन्यात नोकरीला आहे. त्याचे नाव रामसिंग. वय ? असेल अंदाजे सव्वीस. तो स्वभावाने अत्यंत चांगला होता साहेब. दुसऱ्या कोणाची तो खोडी काढणे शक्यच नाही.
‘माझी मुलगी ? तिचे नाव पार्वती. वय ? तिचे वय आहे एकोणीस. एक अवखळ, आनंदी मुलगी असेच तिचे वर्णन करता ये़ईल. तिचा चेहरा गोल, रंग गोरा व हनुवटीवर एक तीळ आहे. कालच रामसिंगने माझ्या मुलीला घेऊन रामपूर सोडले. आणि हे काय झाले हो साहेब....माझी मुलगी विधवा झाली.....माझी मुलगी कुठे आहे? पार्वती ? ती कुठे आहे ? गेलेले माणूस परत येत नाही पण माझ्या मुलीला शोधून काढा साहेब... फार उपकार होतील. त्या ठगाला माझ्या ताब्यात द्या...त्याला ठेचून काढते मी....पण माझी पार्वती....
पुढचे शब्द त्या बिचारीच्या हुंदक्यात साहेबाला ऐकू येणे शक्यच नव्हते.
‘बरं जा तू. आम्ही शोधूच तिला.’
नासीरखान ठगाची जबानी.
मी कबूल करतो मी त्याला ठार मारले. पण मी तिला मात्र ठार मारले नाही. ती नंतर कुठे गेली हे मी सांगू शकत नाही कारण मला ते माहीत नाही साहेब.
ते ऐकताच एका पोलिसाने त्याचा पाय त्याच्या पोटात जोरात मारला.
"तुम्ही मला कितीही मारले तरी जे मला माहीत नाही ते तुम्ही माझ्याकडून वदवून घेऊ शकत नाही. साहेब याला सांगा. गोष्टी येथपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे मी तुमच्यापासून आता काही लपविणार नाही. मी सांगतो काय काय झाले ते....
काल दुपारी मला हे जोडपे भेटले. त्याचवेळी हवेच्या एका झोतामुळे त्या बाईच्या चेहऱ्यावरचा पदर जरा सरकला. लगेचच तो झाकलाही गेला. त्या माणसाच्या मृत्युसाठी खरेतर त्या वाऱ्याला जबाबदार धरायला हवे. मला ती एखाद्या अप्सरेसारखी भासली. त्याच क्षणी मी तिला पळवायचा निर्णय घेतला. अगदी तिच्या नवऱ्याला ठार मारावे लागले तरीही. तिचा उपभोग घेण्याच्या कल्पनेने माझ्या मनात समुद्रावरील वादळे उठली. मला किनारा दिसेना.
माणसांना ठार मारणे म्हणजे माझ्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही. कितीतरी माणसांचे मुडदे मी सहज पाडले आहेत. पण एखाद्या बाईला पळविताना तिच्या माणसाला ठार करावेच लागते. मला सांगा साहेब या जगात काय मी एकटाच माणसांचे मुडदे पाडतो का ? तुम्ही नाही तुमच्या बंदुका, तलवारी वापरत? तुम्ही तुमच्या सत्तेच्या व संपत्तीच्या जोरावर माणसे मारताच की. काही वेळा तर तुम्ही त्यांचे शोषण करुन ठार मारता. अर्थात तेव्हा ती रक्तबंबाळ होत नाहीत एवढाच काय तो फरक. आता माझे पाप मोठे का तुमचे हा वादाचा विषय हो़ऊ शकतो साहेब. पण साहेब मुडद्याची संख्या मोजाना....तुम्हालाच उत्तर मिळेल.
पण पुरुषांना न मारता त्यांच्या बायकांना उपभोगता आले असते तर बरे झाले असते असे मला नेहमी वाटते बघा. यावेळीही मी त्याला ठार न करता त्या बाईची अब्रू लुटता येते का हा प्रयत्न करुन बघायचे ठरविले होतेच की. पण त्या हमरस्त्यावर दोन्हीही शक्य नव्हते. अर्थात ठगांना ही अडाचण कधीच भासत नाही. मी त्याच्याशी गोड बोलून त्यांना आडरस्त्यावर नेले.
मी आमची नेहमीचीच पद्धत वापरली. मी गोड बोलून त्यांचा सहप्रवासी झालो व गप्पा मारताना त्याला सांगितले की तेथे देवराईत एका टेंगळावर मी एक खजिना शोधला आहे. त्यात मोहरांचे हंडे सापडले आहेत व मला ते अत्यंत कमी किंमतीत विकायचे आहेत कारण ते मला तेथून हलवायचे आहेत. आता मोह कोणाला सुटलाय ? त्याला समजण्याआधीच तो माझ्या जाळ्यात अडकत चालला होता. अर्ध्या तासातच ते दोघे माझ्याबरोबर त्या रस्त्याला लागले.
जेव्हा आम्ही त्या देवराईपाशी आलो तेव्हा मी त्यांना त्या खजिन्याची जागा जरा अडचणीच्याजागी आहे असे सांगितले. अर्थात त्या माणसाची कुठेही यायची तयारी होतीच. त्याच्या बायकोने मात्र येण्यास नकार दिला व ती तेथेच थांबते असे म्हणाली. ते घनदाट जंगल पाहून ती घाबरली असल्यास त्यात तिची काहीच चूक नाही. खरे सांगायचे तर सगळे माझ्या योजनेनुसार चालले होते. तिला तेथेच एकटे सोडून आम्ही दोघे वर गेलो. सुरवातीला बांबूचे दाट बन लागते. थोड्याच अंतरावर काही उंच झाडे दिसत होती. यदा कदाचित लागले तर, ती जागा त्याला पुरायला मला योग्य वाटली. त्या झाडाखालीच तो खजिना पुरला आहे असे मी त्याला सांगितले. ते ऐकल्यावर त्याने घाईघाईने पावले उचलली. बांबूच्या त्या गच्च झाडीतून आम्ही वाट काढत असतानाच मी त्याला मागून धरला. तो सैनिक होता व चांगलाच ताकदवान होता. शिवाय त्याच्या कमरेला तलवारही होती. पण मी त्याला मागून धरल्यावर त्याला धक्काच बसला. मी त्याला खाली पाडले व एका झाडाला दोरखंडाने बांधून टाकले. दोरखंड कुठून आणला ? तो तर आमच्याकडे नेहमीच असतो. त्याचे तोंड बंद करण्यासाठी मी त्याच्या तोंडात माझा रुमाल कोंबला.
त्याची अशी वाट लावल्यावर मी त्याच्या बायकोकडे गेलो व तिच्या नवऱ्याला अचानक बरे वाटेनासे झाले म्हणून तो वरच थांबला आहे व तिने तेथे जाऊन बघावे असे सांगितले. ती घाईघाईने माझ्या मागून येऊ लागली. मधेच मी तिला गरज नसताना माझ्या हाताने आधारही दिला. ज्या क्षणी तिने तिच्या नवऱ्याला बांधलेल्या स्थितीत बघितले, तिने तिच्या छोट्या खंजिराने माझ्यावर हल्ला चढविला. मी सावध होतो म्हणून बरं नाही तर तो खंजीर माझ्या बरगड्यातच घुसला असता. एवढी चिडलेली बाई मी माझ्या आयुष्यात पाहिली नव्हती. मी तिचा तो वार चुकवला पण ती माझ्यावर चालच करुन आल्यावर माझा नाईलाज झाला. अर्थात मी एक ठग आहे. तिच्या हातातील कट्यार माझ्या हातात केव्हा आली हे तिलाही कळले नाही. शस्त्राविना तिचे माझ्यापुढे काय चालणार ? शेवटी मी तिच्या नवऱ्याला न मारता तिचा उपभोग घेतलाच. हो त्याला न मारता. त्याला मारण्याची मला मुळीच इच्छा नव्हती.
माझे काम झाल्यावर त्या रडणाऱ्या बाईला तेथेच टाकून मी पळ काढणार तेवढ्यात तिने माझा हात घट्ट धरला. मला ती जाऊच दे़ईना. ती म्हणाली की आता आम्हा दोघांपैकी एकचजण जिवंत राहू शकतो. ‘दोघांनी माझा उपभोग घेतल्यावर मी कशी जिवंत राहू शकेन ?’ जो जिवंत राहील त्याच्याबरोबर मी राहीन.’ ते ऐकल्यावर मात्र माझ्या मनात त्याचा काटा काढण्याची प्रचंड इच्छा उफाळून आली.
हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला मी तुमच्यापेक्षा क्रुर आहे असे वाटण्याची शक्यता आहे. पण तुम्ही त्या बाईला अजून पाहिले नाही म्हणून... तिने जेव्हा मला हे सांगितले तेव्हा तिच्या डोळ्यात बघताना मी तिच्या प्रेमातच पडलो म्हणाना... मला आता तिच्याशी लग्न करण्याची तीव्र इच्छा झाली. माझ्या मनात दुसरा विचारच येत नव्हते. आता हे असे मला प्रथमच झाले होते. मला तिच्या शरिराचा लोभ नव्हता. ते तर मी आधीच उपभोगले होते आणि मी तिला झिडकारुन केव्हाही तेथून जाऊ शकलो असतो. मला वाटते तुमच्या लक्षात येतेय मी काय म्हणतोय ते. तिच्या डोळ्यात बघतानाच मी त्याला ठार मारायचा निश्चय केला.
पण मी नासीरखान आहे. निशस्त्र माणसाला मी कधीच मारले नव्हते व मारणारही नाही. मी त्याची दोरी कापली व त्याला माझ्याबरोबर तलवारीचे दोन हात करण्याचे आव्हान दिले. तो कापलेला दोर जो तुम्हाला सापडला साहेब, तो हा कापलेला दोर आहे. चिडून त्याने त्याच्या विचारांच्या वेगाने तलवार उपसून माझ्यावर चाल केली. बरोबर तेविसाव्या वाराला मी त्याला जखमी केले. लक्षात घ्या... बरोबर तेवीस....माझ्या बरोबर आत्तापर्यंत वीस वारापूढे कोणी जाऊ शकलेले नाही. चांगलाच लढला तो....
मी माझी रक्ताने माखलेली तलवार घेऊन तिच्याकडे वळलो तर ती तेथे नव्हती. मी नीट कानोसा घेतला पण त्या मरणाऱ्या माणसाच्या घशातून येणाऱ्या आवाजाशिवाय तेथे कुठलाही आवाज येत नव्हता. बहुदा आमचे द्वंद सुरु झाल्यावर ती पळाली असावी. तिला मदत मिळण्याआधी मला तेथून सटकायलाच हवे होते. माझ्या जीवनमरणाचा प्रश्न होता तो. मी पटकन त्याची तलवार धनुष्य व बाण घेतले व पोबारा केला. याशिवाय सांगण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. मला माहिती आहे की शेवटी तुम्ही मला फासावरच लटकवणार आहात. ती शिक्षा तेवढी लवकरात लवकर अमलात आणावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. शेवटी भवानीची इच्छा.....!
बाईची जबानी....
आत्ता जो माणूस बाहेर गेला त्यानेच माझी अब्रू लुटली साहेब. ती लुटल्यावर तो नालायक माझ्या नवऱ्याकडे बघून छद्मीपणे हसला. माझ्या नवऱ्याची काय हाल झाले असतील त्यावेळी. तो बिचारा त्या दोरखंडातून सुटण्याची खूप धडपड करत होता पण त्यामुळे तो दोर त्याच्या हाताला काचत घट्ट होत होता. न राहवून मी त्याच्याकडे धाव घेतली पण त्या दुष्टाने मला एक फटका मारला. त्याचवेळी माझ्या नवऱ्याची अणि माझी नजरानजर झाली. माझ्या नवऱ्याला बोलता येत नव्हते पण त्याच्या मला नजरेत असा भाव दिसला ज्याने मी त्या नालायकाच्या फटक्याने घायाळ झाली नसेल तेवढी घायाळ झाले. त्याच्या थंड नजरेत ना राग होता न दु:ख. होता फक्त तिरस्कार ! ते बघून मी किंचाळले आणि बेशूद्ध पडले.
मी शुद्धीवर आले तेव्हा तो गेला होता. माझा नवरा अजुनही झाडाला बांधलेला होता. मी मोठ्या कष्टाने त्या बांबूच्या गिचमिडीतून उठले आणि धडपडत त्यांच्याकडे गेले. त्यांच्या डोळ्यात अजुनही तोच भाव होता. त्या थंड डोळ्यातील तिरस्काराखाली आता द्वेष, लाज आणि दु:ख जमा झाली होती.
‘माझी अब्रू लुटली गेल्यावर मी आता तुमच्याबरोबर कशी राहू ? मी आत्महत्या केलेलीच बरी. पण तुम्हीही या जगात जगण्यासाठी लायक नाही, कारण तुमच्या डोळ्यासमोर माझी अब्रू लुटली गेली. तुम्हाला जिवंत राहण्याचा काय अधिकार ?
मला त्यांची अजून निर्भत्सना करायची होती पण त्याची नजरेतील भाव बघून माझे शब्द घशातच रुतले. मी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या ह्रदयाच्या चिंध्या उडत होत्या.. मी त्यांची तलवार शोधली पण बहुदा ती त्या दरोडेखोराने नेली असावी. पण नशिबाने माझ्याजवळ माझा खंजीर त्याच्या छातीत खुपसण्यासाठी उगारला.
‘मीही तुमच्या मागून आलेच’ मी म्हणाले.
‘मार मला ! ’ ते म्हणाले.
मी भानावर होते आणि नव्हतेही. त्याच अवस्थेत मी तो खंजीर सर्व ताकदीनिशी खाली आणला. याच वेळी मी बहुदा अतिताणामुळे परत बेशूद्ध झाले. मी डोळे उघडले व त्यांच्याकडे पाहिले. त्यांचे हात अजून तसेच बांधलेले होते. उन्हाची तिरपी किरणे बांबूतून त्यांच्या चेहऱ्यावर पडली होती पण त्यांचा प्राण गेला होता. मी त्याच खंजीराने तो दोर कापला व तो खंजीर माझ्या गळ्यावर चालवला. मी मरण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे सांगण्याची ताकद आता माझ्याकडे नाही. नंतर मी एका तळ्यात आत्महत्या करण्यासाठी उडी मारली.
ते सगळे प्रयत्न असफल झाल्यामुळे मी अजुनही हे कलंकित आयुष्य जगते आहे....माझ्या पापाची बरोबरी नरकातही कोणी करु शकणार नाही....मी माझ्या नवऱ्याला ठार मारले, माझी अब्रू लुटली गेली...काय करु मी...काय करु..?
तिला पुढे बोलता आले नाही व ती ढसाढसा, किंचाळत रडू लागली.
हवालदार ! कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही. परमेश्वराला आणि त्या खून झालेल्या माणसालाच खरे काय ते माहीत.
‘साहेब आमच्या येथे एक देवऋषी आहे तो मेलेल्या माणसांबरोबर बोलतो म्हणे. मीही माझ्या गेलेल्या बायकोबरोबर एकदा बोललो आहे. आपली हरकत नसेल तर मी त्याच्याकडे जाऊन येतो. आपण येण्याची आवश्यकता नाही.
‘ठीक आहे हेही करुन बघू......’
मेलेल्या रामसिंगच्या आत्म्याची जबानी....
"माझ्या बायकोची अब्रू लुटून झाल्यावर ते दोघे तेथे बोलत बसले होते. म्हणजे तो हरामखोर माझ्या बायकोला काहीतरी समजावत होता. मला बोलता येत नव्हते व मला झाडाला बाधून घातले होते. मी नजरेनेचे तिला सांगण्याचा प्रयत्न केला की ‘त्याच्यावर विश्वास ठेऊ नकोस’. पण ती तर त्या बांबूच्या तुटलेल्या काटक्यांवर भकास नजरेने तिच्या मांड्यांकडे बघत बसली होती. मला वाटते ती त्याचे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकत होती. त्याही अवस्थेत माझ्या मनात क्षणभर असूया जागी झाली. शेवटी ज्याची मला भीती वाटत होती तो प्रश्न त्याने तिला केलाच ‘आता यानंतर तुला या माणसाबरोबर संसार करणे शक्य नाही. तू माझ्याशी लग्न का करत नाहीस ? शेवटी माझ्या तुझ्यावरच्या प्रेमापोटीच हे सगळे रामायण घडले आहे.’
तो हे बोलत असताना माझ्या बायकोने तिची मान जरा वर केली व शुन्यात नजर लावली. एवढी सुंदर ती मला कधीच भासली नव्हती. काय उत्तर दिले असेल माझ्या बायकोने ? मी आता दुसऱ्या जगात आहे पण ते उत्तर आठवल्यावर माझ्या मस्तकात आजही तिडीक जाते. ती म्हणाली, ‘तू जेथे जाशील तेथे मी तुझ्याबरोबर येते’..
यात तिच्या हातून फार मोठे पाप घडले आहे आहे असे मला वाटत नाही. एवढ्याने मी वेदनेने तडफडलो नसतो. त्या बांबूच्या बनातून बाहेर जाताना ती अचानक थबकली. तिचा चेहरा पांढराफटक पडला. तिने त्याचा हात धरला व माझ्याकडे बोट दाखवत ती किंचाळली.
‘आधी त्याला ठार कर ! तो जिवंत असताना मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही. आजही ते शब्द तापलेल्या शिशासारखे माझ्या कानात घुसतात व होणाऱ्या वेदनेने मी पाताळात परत एकदा मरेन की काय अशी मला भीती वाटते. या जगात हे असे कोणी ऐकले आहे का ? एकदातरी......असे म्हणताना तो आत्माही विव्हळू लागला. बघता बघता ते ऐकणे उपस्थितांनाही असह्य झाले.
हे ऐकताच तो क्रूरकर्माही थबकला. ते ऐकून त्याचाही चेहरा पांढराफटक पडला.
‘ठार कर त्याला !’ ती परत किंचाळली.
तो तिच्याकडे अविश्वासाने बघत राहिला. त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो काय उत्तर देणार याची मी अतुरतेने वाट पहात असतानाच त्याने तिला जमिनीवर फेकले. हाताची घडी घालत त्याने शांतपणे मला विचारले , ‘तूच सांग काय करु आता मी हिचे ? ठार मारु का सोडून देऊ ?’
त्याच्या या एकाच वाक्यासाठी मी त्याच्या गुन्ह्यांना मनातल्या मनात माफ करुन टाकले होते. मी काहीच उत्तर देत नाही असे पाहून तिने एकाच उडीत तेथून पळ काढला. त्या दरोडेखोरानेही तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती निसटली ती निसटलीच.
ती पळून गेल्यावर त्याने माझी तलवार, तिरकमठा व बाण घेतले. ‘नशीब माझे !’ तो पुटपुटत होता. त्याने माझे दोर कापले व तेथून नाहिसा झाला. तेथे आता स्मशानशांतता पसरली. नाही...नाही.. कोणीतरी रडत होते ! मी कान देऊन ऐकू लागलो....तेथे तर कोणीच नव्हते....तो माझ्याच रडण्याचा आवाज होता. भेसूर !
मी कशीबशी माझी सुटका करुन घेतली. माझ्यासमोर माझ्या बायकोचा तो छोटा खंजीर पडला होता. मी तो उचलला आणि माझ्या छातीत खुपसला. मला रक्ताची उलटी झाली पण मला कसल्याही वेदना होत नव्हत्या. माझ्या छातीतील धडधड हळूहळू शांत होत असल्याचे मला स्पष्ट जाणवत होते. केवढी शांतता पसरली होती तेथे ! प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता. मीही त्या शांततेत ओढला गेलो.
कोणीतरी माझ्याकडे येत होते. मला आठवते आहे मी कष्टाने डोळे उघडून कोण आहे ते पहाण्याचा प्रयत्न केला पण अंधार फारच पसरत चालला होता. तो जो कोण होता त्याने हळूवारपणे तो खंजीर माझ्या ह्रदयातून ओढून काढला. त्याचवेळी माझ्या घशात रक्त आले आणि मी ते जग सोडले......
झिरना गेट......
(झांसी शहराच्या कोटाला असलेल्या दहा दरवाजापैकी हा एक दरवाजा. हा शहराच्या विरुद्ध बाजूला आहे आणि ब्रिटिशांनी येथूनच झांसी काबीज केली होती. त्या दरवाजाची भिंत ७०/७५ फुट उंचीची होती. ‘झिरना गेट’ याचे हे नाव ब्रिटिशांनी पाडले. झांसीच्या पराभवानंतर या शहराला उतराती कळा लागली. याही दरवाजाची बरीच पडझड झाली. लोकांनी दरवाजा काढून जळणात जाळला तर बरेच दगड आपल्या घरासाठी वापरले. हे गेट दुमजली होते व वरचा मजला अजूनही तसा शाबूत होता. ब्रिटिशांनी झांसीची जी लुटालूट केली त्यात बरीच बेवारशी प्रेते येथे आणून टाकली व ती आता पद्धतच पडून गेली आहे.)
पाऊस मुसळधार पडत होता व हवेत हाडं गोठविणारी थंडी जाणवत होती. झिरन्यात कोणीही नव्हते. खरे तर या वेळी काही माणसे तेथे असायला हवी होती पण आत्ता तरी तेथे एकच सैनिक कुडकुडत उभा होता. पाऊस केव्हा थांबतोय याची तो अस्वस्थ होत वाट पहात होता.
गेले काही वर्षे झांसीवर संकटाची मालिकाच कोसळत होती. भुकंप, वादळे, अवकाळी पाऊस आणि आता ब्रिटिशांची लुटालूट...झिरन्याच्या आसपासही झांसीच्या वैभवाची साक्ष देत अनेक गोष्टी विखरुन पडल्या होत्या. मुर्ती, कलाकुसर असलेली चेपलेली भांडी, तुटलेल्या तलवारी ज्याच्या मुठीवर एखाद्दुसरे रत्नही चमकत होते. नक्षिकाम असलेल्या लाकडी तुळया.....एक ना दोन... झांसीकडेच कोणाचे लक्ष नव्हते तर या स्मशानाकडे कोण लक्ष देणार ....रानटी जनावरे व सोडून दिलेल्या जनावरांचा तेथे सुळसुळाट होता. जुगारी, गांजेकस, चोर, लुटारुंचे आता झिरना आश्रयस्थान झाले होते असे म्हणायला हरकत नाही. अंधार पडल्यावर तेही तेथे जाण्यास घाबरत असावेत.
जसे अंधारुन आले तसे कावळ्यांच्या झुंडीच्या झुंडी कुठूनतरी तेथे अवतिर्ण झाल्या व समोरच्या पटांगणात उतरल्या. एखाद्या मांत्रीकाने काळे तीळ फेकावेत तसे ते तेथे पसरले. पाऊस थांबण्याची वाट पहात तो माणूस या दृष्याकडे पहात होता. त्याला त्याच्या उजव्या गालावर आलेला फोड हाताला जाणवल्यावर त्याच्यावरुन बोट फिरवायचा त्याला चाळाच लागला.
तो पाऊस थांबण्याची वाट पहात होता हे खरे, पण पाऊस थांबल्यावर काय करायचे हे त्याचे त्यालाच माहीत नव्हते. कालपर्यंत तो त्याच्या मालकाकडे परत गेला असता पण दुपारीच त्याची नोकरी गेली होती. झांसीमधील परिस्थिती फारच झपाट्याने खराब होत चालली होती. बेकारीची कुऱ्हाड अनेकजणांवर कोसळत होती त्यातच हा एक. पाऊस पडत अस्ल्यामुळे त्याला तेथे थांबण्यासाठी कारण होते. तो थांबल्यावर त्याला कुठेही जाण्यासाठी कसलेही कारण नव्हते. त्याला आतून तो पाऊस थांबूच नये असे वाटत होते. तशी त्याने देवाकडे पार्थनाही केली. पाऊस थांब नाही हे उमगल्यावर तो निश्चिंत झाला व उद्याची काळजी करायला लागला.
झिरनाला पावसाने घेरले आणि पावसाचा त्या भिंतींवर आपटण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्याने आकाशाकडे पाहिले तर एक भला मोठा काळा ढग !. ते बघून तो परत एकदा विचारत बुडून गेला.
सध्याच्या काळात त्याच्याकडे उपजिविकेचे कसलेही साधन नव्हते. "मी प्रामाणिकपणे काम करायचे ठरविले तर मी उपाशी मरेन. व शेवटी येथे येऊन पडेन बेवारस प्रेतांसारखा. त्यापेक्षा चोरी केलेली काय वाईट ?’ या विचाराने त्याने ते ठीक होईल असे मनाशीच ठरविले. पण त्याच्या मनात शंकेचे काहूर उठले. त्याच्यावरचे संस्कार त्याला हा निर्णय घेऊ देइनात. त्याचा धीर होईना...
त्याने मान फिरवून त्या वेशीवर नजर टाकली. अंगातील अंगरखा काढून त्याने तो पिळला आणि त्याने आजची रात्र तेथेच काढायचा निर्णय घेतला. त्याला आता वाऱ्यापावसापासून सुरक्षित अशी जागा शोधायची होती. त्याला वरचा मजला ठीक वाटला. तेथे बहुदा कोणी नसावे. ‘असलीच तर एकदोन प्रेते असतील. पण ठीक आहे’ तो मनात म्हणाला. त्याने वर जाणाऱ्या अरुंद जिन्यावर पाऊल ठेवले आणि तो दचकला. वर कोणीतरी होते. त्याने तलवारीवर हात ठेवला व एक पाऊल पुढे टाकले. वरुन येणाऱ्या पिवळट प्रकाशाची एक तिरीप त्याच्या उजव्या गालावर पडली होती व त्यात तो फोड अधिकच उठून दिसत होता. त्याच्यावरुन हात फिरवायची त्याला तीव्र इच्छा झाली पण त्याने तो विचार झटकून टाकला.
अर्ध्यावर पोहोचल्यावर त्याला कोणीतरी हालचाल करते आहे याची जाणीव झाली. हलक्या पावलाने व श्वास रोखून तो अजून एक पायरी चढला. त्या प्रकाशात छतावर चिकटलेल्या कोळ्यांच्या जाळ्यांच्या मोठ्या सावल्या पडल्या होत्या व त्यामुळे वातावरण अधिकच भयंकर व रहस्यमय वाटत होते.
‘आत्ता या वेळी अशा वादळात कोण काय करत असेल वरती?’ तो मनाशी म्हणाला.
घाबरत त्याने मान लांब करुन आत नजर टाकली. त्याने ऐकले होते ते खरे होते. आत बरीच प्रेते पडली होती. काहींच्या अंगांवर कपडे होते तर काही नग्न होती. काही उताणी हात लांब करुन पडली होती तर काही तोंडे वासून पडली होती. त्या मजल्यावरुन जीवनच हद्दपार झाले होते. त्या मंद हलणाऱ्या प्रकाशात त्या मुडद्यांचे उंचवटे उठून दिसत होते तर त्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावल्यात त्यांचे इतर भाग अंधारात बुडून गेले होते. त्या कुजणाऱ्या प्रेतांचा वास असह्य्य हो़ऊन त्याने नाकावर हात धरला...
दुसऱ्याच क्षणी जे दिसले त्याने त्याचा हात खाली आला. त्याला एक चेटकिणीसरखी दिसणारी बाई एका प्रेतावर वाकलेली दिसली. त्याच्या अंगावर सरसरुन काटा आला. त्याच्या डोक्यावरचे केस उभे राहिले. ती बाई म्हातारी व तिचे केस पांढरेशूभ्र होते. तिने हातात एक मशाल धरली होती व त्याच्याच प्रकाशाचा सगळा खेळ चालला होता. ती ज्या प्रेतावर वाकली होती त्या प्रेताचे केस लांबसडक जमिनीवर पसरले होते.
ते दृष्य बघून तो इतका घाबरला की त्या भीतीने त्याचे कुतुहल मारुन टाकले. रोखलेला श्वासही बाहेर टाकायचे त्याला भान उरले नाही. तो ते दृष्य बघत असतानाच तिने तिच्या हातातील मशाल लाकडी तक्तपोशीच्या खाचेत खोवली व एखादे माकड ज्या प्रमाणे डोक्यातील उवा वेचते तसे ती त्या प्रेताच्या टाळूवरील एकएक केस काळजीपुर्वक उपटू लागली. तिच्या हातात सफाई होती. एकएक करत ते केस अलगदपणे तिच्या हातात येत होते.
एकेका केसाबरोबर त्याच्या मनातील भीतीची जागा घृणेने घेतली. त्याच्या मनात जगात जे जे अमंगल होते त्याविरुद्ध वैरभाव उत्पन्न झाला. आत्ता जर त्याला कोणी विचारले असते की चोरी का आत्महत्या तर त्याने आत्महत्याच केली असती.
खरे तर त्याला ती त्या प्रेतांच्या टाळूवरचे केस का उपटत होती हे माहीत नव्हते ना ती करते आहे ते पाप होते का पूण्य याची त्याला कल्पना होती. पण आत्तातरी त्याच्या दृष्टीकोनातून त्या वादळात झिरन्यामधे ती जे करत होती तो सर्वात मोठा गुन्हा होता. त्याने अवसान आणून हातात तलवार घेऊन त्या चेटकणीसमोर उडी मारली. ती दचकली, गर्रकन वळली. विश्वास न बसल्यामुळे तिचे डोळे विस्फारले होते. ती कशीबशी उठली व एकच किंकाळी फोडत तिने जिन्याकडे झेप घेतली.
‘चेटके ! कुठे पळतीस ?’ तो ओरडला व एकाच झेपेते त्याने तिला गाठले व तिची वाट अडवून उभा राहिला. तिने त्याला जोरात मागे ढकलले. त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत ते दोघे त्या प्रेतात पडले. थोड्याच क्षणात त्याने तिचा हात पिरगाळला व तिला खाली दाबून धरले. तिच्या हाताच्या नुसत्या काड्याच राहिल्या होत्या. तिला खाली पाडून त्याने त्याच्या तलवारीचे चमकणारे टोक तिच्या नाकाला लावले. ती फीट आल्यासारखी थरथरत होती व तिचे डोळे एवढे विस्फारले होते की कोणत्याही क्षणी तिची बुबुळे त्यातून बाहेर पडतील की काय असे वाटत होते. एवढे झाल्यावर तोही भानावर आला. त्याला आता कसलाही धोका नव्हता.
‘हे बघ मी गोऱ्या साहेबाच्या पलटणीतील एक सैनिक आहे.. मी तुला काहीही करणार नाही. तुला कोतवालाच्या ताब्यातही देणार नाही, पण तू हे काय करते आहेस हे मला सांगितले पाहिजे. सुरुकुत्यांच्या जाळ्यातून तिचे ओठ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी मोठ्या कष्टाने तिच्या घशातून शब्द उमटले,
‘मी त्या केसांचे टोप विणते.’
ते उत्तर ऐकल्यावर त्याचा आवेश सरला. तो क्षणभर निराशही झाला. त्याच्या तिरस्काराची जाग घृणेने घेतली. भीती नष्ट झाली. त्या म्हातारीच्या हातात अजुनही तिने उपटलेले केस होते. मोठ्या कष्टाने ती म्हणाली,
‘या प्रेतांच्या टाळूवरील केसांचे मी टोप बनविते हे तुला मोठे पाप वाटत असेल पण या प्रेतांची हीच लायकी आहे. ही सुंदर बाई बघ. ही जिवंत होती तेव्हा मासे विकायची तेव्हा त्यात सापाचे तुकडेही घालायची. ही जर महामारीने मेली नसती तर तिने हाच उद्योग चालू ठेवला असता. अर्थात तिला दुसरा मार्गही नव्हता. हे जर केले नसते तर ती उपाशी मेली असती. जगण्यासाठी मी तिचे लांबसडक केस उपटत होते हे जर तिला आत्ता कोणी सांगितले तर तीही त्याकडे दुर्लक्ष करेल.’
त्याने त्याची तलवार म्यान केली. डावा हात तलवारीच्या मुठीवर ठेऊन तो तिच्या बोलण्यावर विचार करु लागला. उजव्या हाताने तो त्याच्या उजव्या गालावरचा फोड कुरवाळत होता. तिचे बोलणे ऐकतान त्याला जरा धीर आला. काहीच क्षणापूर्वी त्याने चोरी करण्यापेक्षा मरण पत्करण्याचे ठरविले होते. आता त्याला उपाशी कशासाठी मरायचे हा प्रश्न पडू लागला.
‘खात्री आहे का तुला ?’ त्याने तिची नक्कल करीत विचारले. तिचे बोलणे संपल्यावर त्याने उजव्या हाताने तिची मान
धरली.
‘मग मी तुला लुटले तर तुझी काहीच हरकत नसणार. मी तुला लुटले नाही तर माझी उपासमार अटळ आहे’.
त्याने तिचे कपडे काढून घेतले व त्या चेटकीणीसारख्या दिसणाऱ्या म्हातारीला लाथेने त्या प्रेतात उडविले.
अंधारात गायब होणाऱ्या त्या जिन्याच्या दिशेने तो जाणार तेवढ्यात ती चेटकीण त्या प्रेतातून उठली व मशाल घेऊन ती त्याच्या मागे धावली व जिन्याच्या पहिल्या पायरीपाशी येऊन थबकली. तिच्या डोळ्यासमोर आलेल्या पांढऱ्या केसांच्या जंजाळातून तिला तो शेवटची पायरी उतरुन बाहेर जाताना दिसला.
त्यापलिकडे फक्त अंधार होता....अज्ञात.... अज्ञानाचा.........
मूळगोष्ट : राशोमॉन.
मूळलेखक : रियुनोसुखे आकुतागावा, जपान.
भाषांतर : जयंत कुलकर्णी.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या मराठी भाषांतराचे सर्व हक्क भषांतरकाराच्या स्वाधीन.
प्रतिक्रिया
5 Nov 2014 - 2:34 pm | कपिलमुनी
राशोमान पाहिला आहे.
स्वैर अनुवाद / रुपांतर चांगले जमले आहे.
5 Nov 2014 - 3:01 pm | मदनबाण
जबरदस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India
ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF}
Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years
5 Nov 2014 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडले,
काहि दिवसा पूर्वी रमताराम यांनी रशोमान वर जंगलवाटांवरचे कवडसे या नावाची एक सुंदर मालिका लिहिली होती त्याची आठवण झाली.
पैजारबुवा,
5 Nov 2014 - 7:26 pm | अस्वस्थामा
अगदी अगदी ..!
5 Nov 2014 - 3:56 pm | अनुप ढेरे
सत्याची विविधता !
रुपांतरण आवडलं.
5 Nov 2014 - 7:01 pm | बोका-ए-आझम
वा बुवा! शेवटचा पंच तर अफलातूनच! राशोमान सारखा चित्रपट आणि कुरुसावासारखा दिग्दर्शक होणे नाही!
5 Nov 2014 - 7:04 pm | टवाळ कार्टा
मस्तच
6 Nov 2014 - 3:59 am | स्पंदना
रोशोमान!!
ररांनी अगदी फ्रेम बाय फ्रेम ही कथा उलगडली होती. अतिशय सुंदर.
पण शेवटची झिरना गेट मात्र पहिल्यांदाच वाचली.
7 Nov 2014 - 10:44 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद ! याचे नाट्यरुपांतर करण्यासाठी ही सुरवात केली आहे.......
7 Nov 2014 - 7:40 pm | पिंगू
राशोमॉनचा अनुवाद चांगलाच जमलाय..
7 Nov 2014 - 11:16 pm | कवितानागेश
छान झालाय अनुवाद