'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जनातलं, मनातलं
12 Oct 2014 - 2:18 pm

हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे....

सिनेमा सुरु होतो लंडनमधे. तिथे ओमार झफर (डॅनी) नावाच्या टकल्या व्हिलनला (जो इंटरपोलच्या लिस्टमधला सगळ्यात खूंखार दहशतवादी आहे) एमआय६ ने पकडून ठेवलंय आणि त्याला भेटायला कर्नल वीरेन (की कायतरी) नंदा नावाचा जाँबाज भारतीय मिलिटरी ऑफिसर (जिमी शेरगिल) फुल आर्मी फटिग्स मधे येतो (माझ्या माहितीप्रमाणे हा पोशाख फक्त युद्धभूमीवर वापरतात. एरवी साधा ड्रेस युनिफॉर्म असतो) आणि झफरला सांगतो, की आता आपण अशी एक एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी साईन करणारे की कुठलाही गुन्हेगार कुठूनही ७२ तासांच्या आत भारतात घेऊन जाता येईल त्यामुळे तिहार जेल आणि फासी के फंदे के लिये तयार रहा वगैरे. ही ट्रीटी कोणाबरोबर साईन होणार आहे हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहातं. मधेच त्या कर्नल नंदाला त्याच्या आईचा वगैरे फोन येऊन जातो. 'तू स्वेटर घातलायस ना रे बाळा?' वगैरे चौकशी ती माऊली अगदी आस्थेने करते आणि जिमी शेरगिल त्याला जमेल तितकं ओशाळण्याचा प्रयत्न करुन त्याच्यासोबत असलेल्या ब्रिटिश ऑफिसरकडे पाहातो. तितक्यात इमारतीच्या छतावरून काळ्या कपड्यातली ७-८ माणसं दोर्‍या लावून खाली येतात आणि जोरदार लाथांनी इमारतीची जाडजूड काच फोडून एम आय ६ च्या सगळ्यात सुरक्षित (!) इमारतीत प्रवेश करतात (कसलं सोप्पंय ना?). मग धडाधड गोळीबार करून मॉलमधल्या सिक्युरिटी गार्डसारख्या दिसणार्‍या एम आय ६ च्या सगळ्या एजंटांना यमसदनी धाडतात आणि डॅनीला जिथे ठेवलेलं असतं तिथे प्रवेश करतात. मग त्यांचा म्होरक्या हमीद गुल (जावेद जाफरी) तिथे प्रवेश करतो आणि डॅनीला बंदूक देतो. डॅनी जिमी शेरगिलला मारून टाकायच्या आधी नेहेमीच्या प्रथेने 'अर्घ्यं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि' च्या चालीवर 'मी तुला मारत आहे' छापाचे डायलॉग बोलतो. मग जिमी शेरगिलही 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर' छापाचे डायलॉग बोलतो, गोळी खातो आणि मरून जातो. मग डॅनी आणि जावेद जाफरी अंत्यविधीचा खर्च तरी कशाला इंडियन आर्मीवर टाकायचा म्हणून जाता जाता जिमी शेरगिलला पेटवूनही जातात....

मला माहित आहे की हे असलं वाचल्यावर पुढे काय होणार याची कल्पना आली असणार आहे. तरी पण थोडक्यात पुढे काय होतं ते सांगतो म्हणजे डोक्याल शॉट लागण्यापासून लोकांना वाचवण्याचं पुण्य तरी माझ्या गाठीला जमा होईल. बाहेर आल्यावर डॅनी जावेद जाफरीला म्हणतो "ही ट्रीटी साईन झाली तर आपली वाट लागेल. एक काम कर आपण अशी काही तरी वस्तू चोरू की ज्याने भारतीय फुल उदास होतील. फक्त चोर भारतीय असला पाहिजे. तू एक काम कर 'कोहिनूर चोरणे आहे' अशी एक जाहिरात दे. च्यायला १२५ कोटी लोकांमध एक तरी सापडेल जो कोहिनूर चोरेल". मग अपेक्षेप्रमाणे कोहिनूर चोरला जातो. चोराचं चित्र सीसीटीव्हीवर दिसतं. ओळखा पाहू चोर कोण? अर्थात हृतिक. मग तो बर्‍या वेळा डॅनीच्या गुंडांना तुडवतो, गोळ्या घालतो, कतरिना कैफला घेऊन जगभर हिंडतो, पुन्हा गोळीबार, पळापळ, तुडवातुडवी, नवीन देश, गोळीबार, पळापळ, तुडवातुडवी, वगैरे वगैरे वगैरे... शेवटी साठा उत्तरांची कहाणी म्हणून एकदाचा डॅनीला मारून टाकतो आणि एकदाचा चित्रपट संपतो. फक्त मारण्याआधी मीच जिमी शेरगिलचा भाऊ आहे, मी इंडियन आर्मी मधे आहे, मी कसा भारी आहे, इंडियन आर्मीतली लोकं कशी जाँबाज आहेत, तू कसा टुकार आहेस, तू माझ्या भावाला कसा जाळून मारलास आणि 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग बोलतो. असो, आपली सुटका होते आणि एवढा सगळा चित्रपट पाहिल्यावर हृतिक हे सगळं का करत असतो याचा विचार करत आपण थेटराबाहेर पडतो.

नाईट अँड डे, ट्रान्स्पोर्टर, बॉर्न ट्रिलॉजी, कसिनो रोयाल, क्वांटम ऑफ सोलेस यासारख्या अनेक इंग्रजी सिनेमातून उचललेले सीन आणि (किंबहुना यामुळेच)कोणतेही लॉजिक नसलेली पटकथा यामुळे हा चित्रपट केवळ छळ आहे. मुख्यतः 'नाईट अँड डे' मधले बरेच सीन्स जसेच्या तसे उचललेले आहेत. कतरीना कैफ आणि तिचं पात्र याबद्दल न बोललेलंच बरं. एखादी अभिनेत्री पडद्यावर किती बावळट दिसू शकते याचं उत्तम उदाहरण. बरं अभिनयाचं सोडा, तिला सेक्सी दिसायलाही जमलेलं नाही (कमी कपडे घालूनसुद्धा!). असो, लोकेशन्स नयनरम्य आणि नृत्ये भन्नाट आहेत. हृतिक रोशन हा माणून लै भारी नाचतो (बिचार्‍याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. काय हा दुजाभाव म्हणायचा!!). तर, कतरीना त्याच्यासोबत नृत्य करताना केवळ बोजड दिसते (त्याला ती तरी काय करणार म्हणा...). गाणी टुकार आहेत. एकुणात चित्रपट केवळ पैश्यांची नासाडी आहे. आमच्या शेजारी दोन कॉलेजयुवती म्हणाव्यात अशा दोघी बसल्या होत्या. त्या सुरुवातीला 'हृतिक... सो सेक्सी' वगैरे म्हणत किंचाळल्या मग जाम बोअर झाल्या आणि मध्यंतरात निघून गेल्या. आम्हीच आशा धरुन बसलो होतो की चित्रपट आता तरी पकड घेईल... असो, जालावरच्या एका फेमस चित्रपट परीक्षणात वाचलेलं (बहुधा मायबोलीवर) वाक्य - कारण आम्ही मूर्ख आहोत!!!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2014 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल आम्ही मराठी चित्रपट बघायला गेलो होतो. मकरंद अनासपुरे आणि सयाजीचा...मुजरावाला. पण तो शो अगोदरच होता. मग एक्कीस तोफो की सलामी आणि ब्यंग ब्यंग हे पर्याय होते. ब्यंग ब्यंग हा पर्याय निवडला आणि चित्रपट पाहतांना मला सारखं आतल्या आत हसायला येत होतं. माझ्या निवडीबद्दल. असो.

चित्रपटाची सुरुवात चांगली स्टायलीश झाली होती. बाकी चित्रपटातील गाणी सतत एफएमवर कानावरुन जातात म्हणुन बरी वाटतात म्हणजे अच्छा ते या चित्रपटातलं गाणं होतं तर... असं. बाकी, चित्रपटात एकच गोष्ट मला बरी वाटली त्या आपल्या मताशी मी सहमत आहे ते म्हणजे ''लोकेशन आणी छायाचित्रण'' बरी वाटतात अशी दृश्य. बाकी मारधाड, तो गोळ्यांचा वर्षाव, ती आजी, समुद्रातल्या त्या उड्या. अगं माय गं...

बाकी ऋतिक आणि कतरीनाची जोडी एकतर माझ्या मनाला अजिबात सुट होत नव्हती. कटरीना कशी गच्च बिच्च वाटते आणि ऋतिक पोरगं सोरगं. बाकी कटरीनानं एक दृश्य छान दिलंय. (कोणतं ते विचारु नका) तेवढंच बरं वाटलं. चित्रपटात शेवटची मारधाड सुरु झाली आणि मी थेटर सोडले अक्कल खाते एकशे नव्वद. धन्यवाद.

अवांतर : चित्रपट पाहतांना नेमका धन्याशेटचा वाट्सपवर मेसेज आला सालं माझं तेव्हा नेट गलपटलं नै तर धन्यासेठशी गप्पा मारणे परवडले असते.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2014 - 2:52 pm | टवाळ कार्टा

'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग

=))

कतरीना कैफ ... तिला सेक्सी दिसायलाही जमलेलं नाही (कमी कपडे घालूनसुद्धा!).

जोरदार णिषेध ... "आमच्या" कत्रिनाला कै बोलायचे नै

कसलं भरी लिहिलंयस रे! मजा आली! =))

प्यारे१'s picture

12 Oct 2014 - 3:06 pm | प्यारे१

फुकटात पण बघवला नाही.
वैतागून २४ मिन्टात संपवला .

परीक्षण वाचुनच समाधानी आहे.
टिवीवर आलातर जमलतर बगु.

सेम टू सेम...एकदम टुकार आणि बकवास सिनेमा.

सिमला बँकेत काम करणारी रीसेप्शनिस्ट कतरीना एखाद्या शार्प शुटरला लाजवेल अश्या गोळ्या चालवते व एखाद्या मासळीला लाजवेल असे पोहते. बघावं ते नवलच.

कै च्या कै.

बिचार्‍याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. काय हा दुजाभाव म्हणायचा!!

=))

रेवती's picture

12 Oct 2014 - 10:33 pm | रेवती

सिमला बँकेत काम करणारी रीसेप्शनिस्ट कतरीना एखाद्या शार्प शुटरला लाजवेल
या शिनेमात ती बुवाबरोबर जगभर फिरलीये ना! एवढी रजा कशी मिळाली ब्यांकेतून?

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 2:56 am | प्यारे१

'टेम्परवारी' होती ती. काँट्रॅक्ट संपलं की मध्ये ब्रेक मिळतोय.
मग फिराचं. पोहायचं. गोळ्या बिळ्या मारायच्या. लवशिप द्यायची घ्यायची.
मग परत बँकेच्या चेरमनला सांगून टेम्परवारी.
पार्ट टू येईस्तोवर टेम्परवारी.
मग पर्मनन्ट.
पार्ट थ्री ला सब्बॅटिकल. सा म्हैने.

रेवती's picture

13 Oct 2014 - 5:07 am | रेवती

हॅ हॅ हॅ......तुमाला लैच म्हायतीये कॅट ताईंबद्दल!

इरसाल's picture

13 Oct 2014 - 10:26 am | इरसाल

आज्जी कॅट ला ताई म्हणत आहेत. कृपया नोंद घ्यावी.

मुक्त विहारि's picture

12 Oct 2014 - 11:02 pm | मुक्त विहारि

दंडवत...

क लिवलंय...

वेल्लाभट's picture

13 Oct 2014 - 10:41 am | वेल्लाभट

डोळे बघ डोळे बघ.... हहवे !!!!!!!
हाहाहाहाहाहाहाहा
मी इंग्लिशच पसंत करतो साधारणपणे. पिक्चर हं.

वेल्लाभट's picture

13 Oct 2014 - 10:41 am | वेल्लाभट

बरेच दिवसात डार्क नाईट बघितला नाहीये. बघायला हवा.

स्वामी संकेतानंद's picture

13 Oct 2014 - 11:03 am | स्वामी संकेतानंद

हिंदी चित्रपट तसेही मी पैसे टाकून बघत नाही. आज आपल्या निर्णयावर अजून एकदा मोहर उमटली.

चिगो's picture

13 Oct 2014 - 12:51 pm | चिगो

मीच जिमी शेरगिलचा भाऊ आहे, मी इंडियन आर्मी मधे आहे, मी कसा भारी आहे, इंडियन आर्मीतली लोकं कशी जाँबाज आहेत, तू कसा टुकार आहेस, तू माझ्या भावाला कसा जाळून मारलास आणि 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!'

=)) :D
जबराच फाडलाय, राव..

मुख्यतः 'नाईट अँड डे' मधले बरेच सीन्स जसेच्या तसे उचललेले आहेत.

त्याचाच रिमेक आहे म्हणे..

क्रेझी's picture

13 Oct 2014 - 1:57 pm | क्रेझी

तुमाला कोनाला कळतच्च नाइ हिर्तीक ने हा सिनुमा काऊन केला त्ये!! त्येच्या बायकोनं त्याला पार लुबाल्डा मंग त्येला पैकं नकोत का आं..मंग असा काही सिनुमा काल्ढा की पैकचं पैकं!! पेप्रात बी आल्त की शिनुमानं पाच दिव्सामंदीच २००कोटी कमावलं..त्यो शिनुमा काय तुमच्या आमच्या सारख्या श्टोरी पाहिजेल असणा-यासाठी थोडीच हाय..त्यो तर फकस्त हिर्तीक साठीच बनिवला हाय..आता तुमी मला सांगा त्या गाण्यामधी 'मायकेल जॅक्सन ला ट्रिब्यूट' का काय दिलं म्हणे..कशापायी? त्येचा अन त्या शिनुमातल्या श्टोरीचा काइतरी संबंध हाय का आं??

छ्ळ वाद म्हणजे याचा उत्तम नमूना म्हणजे हा चित्रपट.