घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता. घरी जाता जाता रस्त्यात लक्या दिसला.
"दिसली का?" लक्याने डोळे मिचकावत विचारलं.
"कोण? मी बाजारात गेलो होतो. कोथिंबीर आणायची होती."
"आलं?"
"काय आलं? कोण आलं?"
"आलं आणलं का सोबत? मटणाचा बेत असेल ना आज?"
"ए लक्या, आमच्या घरी मास-मटण चालत नाही; माहिती आहे ना तुला?"
"मग कशाला बाता मारतो? फोडणीच्या वरणात कोथिंबीर नसली तरी चालतं एखाद्यावेळेस. तू तिला बघायला गेला होता की नाही?"
"...."
"चल घरी...बुधवारचा भारतीय चिवडा आणलाय."
मी त्याच्यासोबत चालू लागलो. रिमझिम पाऊस सुरु होता. रस्त्याच्या आतल्या बाजूला लक्याचा वाडा होता. अंगण आणि मोठी हैली! हैली म्हणजे हवेलीचं लघुरूप. कसलासा धूर हवेत पसरला होता. मंद संगीताची लय असावी असा पाऊस पडत होता. वातावरण एकदमच रोमँटीक झालं होतं. आत गेलो. टीव्ही सुरु होता. चिवडा खायला सुरुवात केली. अचानक दीदींचा आवाज ऐकू आला.
"ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना"
मी टीव्हीकडे पाहिलं. श्रीदेवी लाजत लाजत गायला लागली होती. 'राम अवतार' नुकताच लागून गेला होता प्रकाश टॉकीजला. च्यायला, बघायचा राहिला. मी गुंगून गाणं बघू लागलो. सनी देवल पाठमोरा उभा! त्याच्या खास स्टाईलमध्ये मागे वळून बघत मोहम्मद अझीजच्या आवाजात तितक्याच उत्साहाने म्हणतो
"ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना"
लगेच लक्ष्मी-प्यारेचा 'ढाकटाकटरडाकटूंग' असा परिचित ठेका सुरू झाला आणि श्रीदेवी खटकेबाज नाचू लागली. अहाहा! काय हा रोमान्स! जिंदगी अशी पाहिजे असं वाटून गेलं. प्रेमात पडल्यावर असं होत असेल का? प्रेमात पडल्यानंतर आणि जिच्या/ज्याच्या प्रेमात पडलोय तिने/त्याने अलगद आपल्याला उचलून हृदयात ठेवल्यानंतर जिंदगी पिक्चरसारखीच होत असेल का? श्रीदेवीला पाहतांना मनात हे ही विचार चालू होते. मी आणि ती बुधवारच्या बाजारात गाणी म्हणत फिरतोय...दुनिया से बेखबर...साला, पिक्चर बहुत बढिया चीज बनायी हैं...मनातून आनंदलो.
ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना
तेरे बिन ओ ओ ओ ओ ओ...तेरे बिन एक भी दिन, मुश्कील हो गया जीना, जीना, जीना
असं होणार का आपलं? बुधवारच्या बाजारात मिळणारी ती अंगठी आणि तिच्यातला तो, खोटा का असेना पण चमचमणारा गुलाबी खडा. जणू आपलं हृदयच! तिच्या बोटात खुलून दिसणारी ती अंगठी. मोठ्या कौतुकाने त्या अंगठीकडे बघतेय ती. अशी प्रीती असल्यावर वेगळं कसं राहवणार? प्रीतीचं झुळझुळ पाणी, वार्याची मंजुळ गाणी... पण एकत्र राहणार कसं आणि कुठे? दोघांच्याही घरी एकत्र राहणं शक्य नव्हतं. शिवाय ती माझ्याघरी आली तर तिचं दप्तर, पुस्तकं, वह्या हे सगळं कुठे ठेवणार? माझ्या कपाटात माझंच दप्तर आणि वह्या-पुस्तकं कसेबसे मावतात. तिचं घर छोटंच आहे तसं. आणि दोघांच्या आई-बाबांना काय सांगायचं? अभ्यासासाठी एकत्र राहतोय असं? पण किती वेळ? आणि गावात च्यायला मुलींशी बोलायची टाप नाही कुणाची. मग कसं जमणार? 'दिल'मध्ये आमीर खान म्हणतो ना, "दूर कही जायेंगे, नयी दुनिया बसायेंगे..हमने घर छोडा हैं..रस्मों को तोडा हैं..." असं काही करायचं का? पण अवघड आहे. 'नयी दुनिया' म्हणजे काय? लोकं विचारतील की दोघं एकटे इकडे काय राहता, घरी जा. मग काय सांगणार? शिवाय आम्ही दोघंही शाळेत गेल्यावर स्वयंपाक कोण करणार? आणि कसा? नको नको, नयी दुनिया वगैरे भानगड नको. हीच दुनिया बरी आहे आपली. यातच बघू कसं जमतंय ते...
"गवताळ प्रदेश लक्षात राहतात का रे तुझ्या? माझ्या लक्षातच राहत नाही यार..." लक्या बडबडला.
"काय?" मी श्रीदेवीवरून नजर न हलवता म्हणालो.
"गवताळ...गवत...गवत"
"आण शेतातून...इथं काय बोंबलतोय गवत गवत..."
आज किये हैं कुछ वादे, खाकर प्यारभरी कस्में
आज किया सौदा हमने इस जी-जान का आपस में
याद सदा तू रखना, याद सदा तू रखना
ये दिन, साल, महिना...
ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना...
पहिलं कडवं. आज ती हसून आत पळाली. काय मिठ्ठास नजर होती तिची. त्या नजरेतूनच तिने माझ्याकडे 'वादा' फेकला आणि मी माझ्या नजरेतून तिच्याकडे फेकला. असंच झालं असावं बहुतेक! आता कसम कधी, कुठे, आणि कशी खायची? लक्या बर्याचदा बोलतांना 'मायच्यान' म्हणत असतो. तसंच असेल काहीतरी. कसम तर खायलाच पाहिजे.
"चिवडा खा ना, थांबला का?" लक्या चिवड्याच्या दुनियेत रमला होता. चिवडा ही एकमेव महत्वाची गोष्ट आहे का जगात?
"खातो ना. खायचीच आहे."
"काय खायची आहे? चिवडा खायचा असतो; खायची नसते."
"लक्या, व्याकरण नको शिकवू मला. मला एक सांग कसम कशी खातात? पारावरच्या मारुतीचा शेंदूर कपाळावर लावून खाल्ली तर चालते का?"
"कसली कसम खॉयची ए तुआ...?" लक्याने चिवड्याचा बकाणा तोंडात भरत विचारले. त्याच्या तोंडातली थोडी ओलसर गिळगिळीत शेव माझ्या अंगावर उडाली. माझं अर्थात लक्ष नव्हतं.
"अशीच"
"अशीच? मग कशीही खा; काय फरक पडतो? सकाळी संडासात बसल्या बसल्या खाल्लीस तरी चालेल."
"काय यार मजा उडवतो तू माझी. आपल्याला 'ती' खूप आवडते यार..."
"बरं मग? तिच्यासाठी कसम खायची आहे का? तू एकट्याने खाऊन काय उपयोग? तिने पण खाल्ली तर काही मजा आहे...त्यासाठी तुला तिला आधी विचारावं लागेल की ती कसम खायला तयार आहे का ते. ती हो म्हटली तर मी सोय करतो तुमची कसम खाण्याची"
"खरं?"
"मायच्यान!"
चला, हे एक मार्गी लागलं. तेव्हाच सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेऊन टाकू. आणाभाका म्हणजे काय च्यायला? परवा टीव्हीवरच्या मराठी पिक्चरमधले हीरो-हिरोईन सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतात. तसा डायलॉग म्हणते ती हिरोईन. तसंच करून टाकू एकदम. तो दिवस, महिना, आणि वर्ष लक्षात ठेवले पाहिजेत. एवढा महत्वाचा दिवस लक्षात ठेवावाच लागणार ना!
"चिवडा संपेल!"
"संपव तू सगळा चिवडा. तुला अजून आणून देऊ का? खात बस दिवस-रात्र चिवडा. चिवडा चिवडा चिवडा!"
"अरे, चिडतोस काय? टेंशन नही लेने का. तू फक्त तिचा होकार आण आणि दिवस, वेळ ठरव. बाकी माझ्यावर सोड. तुमचे कस्मे-वादे झाले की झकास चिवड्याचा बेत ठेवू...असं एकदम..."
"परत चिवडा..."
कब ना तुझको याद किया, कब ना तेरा नाम लिया
जब ना तुझको याद किया, जब ना तेरा नाम लिया
दिन ऐसा ना निकला, दिन ऐसा ना निकला
ऐसी रात हुई ना
ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना
हे खरंच आहे. च्यायला, नेहमी ती मनात असतेच. दिवस-रात्र. छळत असते अगदी. एक दिवस अस्सा नाही की तिची आठवण येत नाही. सुटीच्या दिवशी तिच्या घराकडे फिरून-फिरून पाय दुखून येतात. एरवी शाळेत रोजच दिसते म्हणा. आपण बेंच पण असाच निवडलाय जिथून ती स्पष्ट दिसते. मधूनच आपल्याकडे बघते. देखा हैं तेरी आँखों में, प्यार ही प्यार बेशुमार...तिने एकदा आपल्याकडे पाहिलं की दिवस कसा सार्थकी लागतो.
"उद्या भेट तिला. विचार कसम खायची आहे म्हणा, केव्हा येतेस. जागा-बिगा पण ठरवून टाका." लक्या म्हटला.
मी तिथून निघालो. रात्री स्वप्नात 'ऊंगली मे अंगुठी' सुरू होतं. एकदा संपलं की पुन्हा सुरू व्हायचं. एकदा श्रीदेवी, एकदा ती! एकदा सनी, एकदा मी!! म्हणजे श्रीदेवी असतांना सनी असायचा आणि ती असतांना मी असायचो. श्रीदेवी असतांना मी आणि 'ति'च्यासोबत सनी असं बहुधा झालं नाही. आणि आधीच सांगून ठेवतो, श्रीदेवी आणि ती आणि मी आणि सनी असं अजिबात झालं नाही.
सगळी रात्र 'अंगुठी'मय होऊन गेली. सकाळी उठलो तरी कानात 'अंगुठी' वाजतच होतं. आज तिच्याशी बोलायचंच असं ठरवून शाळेत गेलो. लक्या सोबत होताच. आम्ही दोघं सगळीकडे सोबतच असायचो. त्याला मी म्हटलं की आधी 'अंगुठी' घेऊन येऊ बाजारातून पण त्याने मला येड्यात काढलं. तिने जर नाही म्हटलं किंवा तिच्या आई-बाबांना, भावाला सांगीतलं तर अंगठीचे सात रुपये वाया जातील. अरे हो, लक्षातच नाही आलं; तिला एक मोठा भाऊ पण आहे...ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं वाटून गेलं. तो दिवस मग आम्ही चिंतनात घालवला. रात्री मी झोपलो. अचानक मध्यरात्री केव्हातरी तोंडात काहीतरी कोंबलं जातंय असं वाटलं. मी खाडकन डोळे उघडले. तिचा भाऊ माझ्या तोंडात मोठ्या आवेशाने एक अंगठी कोंबत होता. त्याचे मोठे डोळे भयावह दिसत होते. मी भयभीत झालो आणि मदतीसाठी इकडे-तिकडे बघू लागलो. लक्या बाजूला बसून चिवडा खात-खात दात काढत बघत होता. मी ओरडलो, "लक्या, चिवडा काय खात बसलाय, याला धर ना, मारतोय मला तो". लक्या नुसताच हसत बसला.
"अंगठी देतो माझ्या बहीणीला? हे घे." तो पुन्हा अंगठी माझ्या तोंडात कोंबू लागला. पाठीवर, दंडावर गुद्दे मारू लागला. लक्या खदाखदा हसतच होता. आणि नेहमीप्रमाणे चिवड्यातली गिळगिळीत शेव त्याच्या तोंडातून बाहेर फेकली जात होती...
प्रतिक्रिया
9 Oct 2014 - 4:37 pm | सस्नेह
भारी अंगूठी !
मी पैली भौतेक !
9 Oct 2014 - 5:48 pm | खेडूत
आवडले. :)
गाण्याचा हा दुवा.
बाकी तो काळ भारी होता. मो अझीझ पण सुरेल वाटायचा
9 Oct 2014 - 6:09 pm | सुहास..
आवडले भौ ! और भी गाना आने दो ...
10 Oct 2014 - 1:20 am | प्यारे१
___/\___
खूपच तरल रसग्रहण केलंय. =))
मला उंगली में अंगुठी पेक्षा फक्त उंगलीच केलेली वाटतेय.
स्साला आमची नजरच खराब झालीये. असो. बदलीन.
10 Oct 2014 - 9:24 am | समीरसूर
माझं प्रामाणिक रसग्रहण आहे. बाकी काही नाही. रसग्रहणाची यादी बरीच मोठी आहे:
बघू कसं जमतंय ते... :-)
10 Oct 2014 - 3:29 pm | प्यारे१
मान्य. प्रामाणिक आहे ह्याबद्दल शंका नाही.
मोहम्मद अझीज की अझीज आवाज और समीरसूरजी का मनोवैग्यानिक रसग्रहण. और क्या चाहिये दोस्तों.
बाकी गाण्यांबरोबर व्हिडो पण टाकायला विसरु नका. ते महत्त्वाचे आहेत.
10 Oct 2014 - 1:52 am | खटपट्या
जबरदस्त मस्त लीवलय !!
आता निवांत चिवडा खातो !!
10 Oct 2014 - 3:45 am | काउबॉय
तुटलो, काही क्षणांसाठी वास्तवापासून तुटलो...तो काळ, ते जग, ती खुमारीच वेगळी.... साला, पिक्चर बहुत... बढिया चीज बनायी हैं...!
10 Oct 2014 - 5:55 am | स्पंदना
:))
हांगश्शी! ह्याला म्हणतात खर रसग्रहण. कालच कोणसं विचारत होतं. रसग्रहण .... तर ते गाण ती कविता ते शब्द जगणं म्हणजे रसग्रहण.
10 Oct 2014 - 11:30 am | विजुभाऊ
नारायण धारपांची आठवण झाली
10 Oct 2014 - 4:29 pm | पैसा
लाजवाब लिहिलंय!
10 Oct 2014 - 7:42 pm | यसवायजी
हा हा.. भारीच लिवलंय.
@ तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे >>>
पहिल्या पॅर्यातच अडकलो होतो बराच वेळ. ;)
10 Oct 2014 - 7:47 pm | बॅटमॅन
म्म्म्म्म्म्म आम्हीही ;)
तिथून चिवडा-अंगठी-उंगली इ.इ. मध्ये यायला वेळच लागला. त्या कमानीतच अडकून पडलो होतो.
10 Oct 2014 - 7:47 pm | बॅटमॅन
कमनीय असा शब्द का तयार झाला त्याचा उलगडा झाला.