ह्या कथेचे नाव आहे "बुल दे सुफ़" म्हणजेच इंग्रजीत "बटरबॉल" अन मायबोलीत बोलल्यास "चरबीचा गोळा". युद्धकालिन फ़्रेंच मध्यमवर्गावर प्रकाश टाकणारी ही कथा समाजवादासोबतच वर्गविग्रह इत्यादी तात्कालिन फ़्रेंच समाजातल्या प्रॉब्लेम्स वर प्रकाश टाकत एक मनुष्य स्वभावाचा मासला देखील ठरते........ लेखक :- हेन्री रेने गाय दे मोपासां....... मी मुळ संकल्पना अन ढाचा तोच ठेवायचा प्रयत्न करुन ह्या नितांत वास्तवदर्षी कथेची पुनर्निर्मिती करायचे धैर्य केले आहे...... जसं जमलंय घ्या गोड मानुन.....
आज सकाळपासुनच रोवेन गावावर मळभ पसरल्यागत होत होतं...... इतकं की कसतरीच व्हाव...... भकास काळ्याढगांनी अवघा आसमंत व्यापलेला होता सकाळच्या बेल्स पण अश्या वाटत होत्या जसे की आज येशु ची पण लेकरांशी संवाद साधायची इच्छा नाही असे भासत होते....... त्या मध्ययुगीन कथेड्रलच्या उजव्या बाजुला असलेल्या गावच्या कब्रस्तानातला कावळ्यांचा दंगा आज कानाला विशेष जाणवत होता..... नीरव भकास शांतता हेच काय ते सर्वव्यापी होते..... अपवाद फ़क्त चर्च चे पोर्च होते.
हातात कातडी आवरणाच्या रिव्हिटे मारलेल्या पट्ट्यांनी आवळलेल्या सुटकेसी सावरत तिथे काही माणसे उभी होती..... काही म्हणजे नेमकी सहा माणसे....... ह्यात सिस्टर अनास्तासिया अन क्लाऊडीन ह्या दोन नन्स.... गावातच सावकारीचा धंदा करणारे वयस्कर असे मिस्यु पेनॉं अन मिसेस पेनॉं अन त्यांच्याच बाजुच्या पेढीत कारकुन म्हणुन काम करणारे मिस्यु ले मार्तिन अन मिसेस ले मार्तिन होत्या...... वातावरणाप्रमाणेच मनांवरपण मळभ साचलेलं ह्या सहाजणांच्या चर्या पाहुन सहज कळुन येत होतं..... बरोबरच होतं म्हणा फ़्रॅंको-प्रशियन युद्धाचा तो धामधुमीचा काळ होता , जर्मनांनी फ़्रांस वर आक्रमण केलेलं होत अन काल परवाच ते रोवेन च्या पंचक्रोशित अवतरले होते आता गावात कधीपण येतील असे काहीलोक दबक्या आवाजात बोलत होते, म्हणुन वर उल्लेखलेल्या सहा लोकांनी जीवितास्तव गाव सोडुन तुलनेने शांत अश्या ली हार्व गावाकडे प्रस्थान ठेवायचं ठरवलं होतं
"काय तर बाई बेजबाबदार आहे हा मेला पिंटो!!!!" सिस्टर अनास्तासिया पुटपुटली
"हो ना सिस्टर, हे खालच्या थरातले लोक तुम्हाला सांगते, रॉबेस्पियर गेला तेव्हा पासुन माजलेत.... ते आजतागायत माजलेलेच आहेत .... म्हणे लोकशाही" मिसेस पेनॉंनी त्यांचे ठेवणीतले "किचन पॉलिटिक्स" चे मत दामटले.... तेव्हा सिस्टर क्लाऊडीन रोझरी जपत बसल्या होत्या त्यांनी मिष्किल हसत त्यांच्या मताला अनुमोदन दिले
"ह्या भडव्या पिंटोला ठरल्यापेक्षा १० फ़्रॅंक्स कमीच द्यायला हवेत आपण" असे म्हणतानाच प्रभूच्या पायरीवर आपण आवेषात दिलेल्या शिवीचे मिसेस ले मार्तिनांच्या वटारलेल्या डोळ्यातन पडसाद आल्याचे दिसल्यामुळे मिस्यु मार्तिन ओशाळुन तिसरीच कडे पहायला लागले.........
बायकोचा दरारा काय असतो हे एरवी ज्यांच्याकडे पाहुन कळावे असे मि.पेनॉं तेवढ्यात स्मित करत म्हणाले.... "१० कमी द्या किंवा जास्त हा सैतान १०० वर्षं जगणार हे मात्र नक्की!!!!!" सगळ्यांनी चमकुन चर्चच्या बिडाच्या मोठाल्या फ़ाटकाकडे पाहीले तर पिंटो त्याची बग्गी जोरात हाकत आत शिरत होता....
कालच पडलेल्या बर्फ़ामुळे झालेल्या रेंद्यातुन गाडीच्या चाको-या जणु त्या लोखंडी पट्टी मारलेल्या लाकडी चाकांना घट्ट धरुनच होत्या......... चर्च च्या पायरीशी बग्गी थांबताच पिंटो हुषारीत उडी मारुन खाली उतरला अन टोपी काढुन समस्त स्त्री वर्गास त्याने एक प्रोफ़ेशनल "बॉन्जुर" घातला, त्याकडे दुर्लक्ष करत आत्ता पर्यंत शांत असलेल्या मिसेस ले मार्तिन फ़णकारल्या व
"मेल्या कुठल्या पब मधे शॅंपेन ढोसत बसला होतास सकाळी सकाळी "अशी पृच्छा करु लागल्या
"ह्यांना शॅंपेन परवडते??? अन प्रभूच्या दानपेटीत एक फ़्रॅंक टाकायला सांगा रडकं तोंड करुन उलटं धर्मदाय बॅग्वेट ब्रेड चा लोफ़ मागुन नेतील मेले" हा सिस्टर क्लाऊडीनने "चर्चचा आहेर" दिला.....
थोरामोठ्यांच्या घरच्या दिड शहाण्या तोंडाळ बायकांचा पुरेपुर अनुभव असणा-या पिंटो ला सिस्टर क्लाऊडीनांचे नन व्हायच्या आधीचे दरकदारी पार्श्व माहित असल्यामुळे त्याने त्या सगळ्या कुजकटपणाकडे दुर्लक्ष केले अन सराईत पणे लवुन नमस्कार करत माफ़ीच्या सुरात मि.पेनॉंना म्हणाला
"माफ़ी असावी मेहेरबान.... एका चाकाचा स्पोक तुटला ते चाकच बदलुन यायला उशीर झाला मला"
"चल आता तुझे बहाणे पुरे कर अन सुटकेसेस लोड कर.... निघायचंय आपल्याला" पेनॉंनी फ़र्मान काढले
काहीवेळातच पिंटोने सगळे सामान लोड केले व झुकत रितीप्रमाणे स्त्रीवर्गास वर चढण्यास हात दिला...... पिंटो मुळचा आयरिश पण इंग्लंडात "हमाल क्लोव्हर" अशी संभावना व्हायला लागली तेव्हा ह्याचे बापजादे रोबेस्पियर अन मॉंटेस्क्यु च्या लोकशाही प्रयोगात नशीब आजमवायला म्हणुन फ़्रेंच झालेले...... एक एक करत दोन्ही नन्स व मि.पेनॉं अन मि.ले मार्तिन अश्या वर चढल्या अन त्यांचा मागे आपला स्थुल देह सांभाळत मि.पेनॉं अन कापायला काढलेल्या कोंबडीसारखे दिसणारे मि.ले मार्तिन चढले...
बाहेर तर अंधारलेलंच होतं तेव्हा बग्गीत अगदीच यथा तथा प्रकाश होता, ते ताडुनच मि.पेनॉंनी लगबगीने त्यांच्या स्पेनिश कातडी पर्स मधुन एक मेणबत्ती काढली अन ती पेटवुन बग्गीच्या रोशनदानात लावली तेव्हाच त्यांचे लक्ष गेले ते पुरुषांच्या बाजुला सीट वर अंग चोरुन बसलेल्या तरीही जिचा स्थुलपणा लपत नाही अश्या एका स्त्री कडे....... त्यांच्या एकटक नजरेच्या रोखाकडे बघतात इतर तिघी अन पुरुषांच्या नजरापण तिकडेच वळल्या.. तशी ती बाई अजुनच अवघडल्यागत झाली.. सगळे स्थिरस्थावर झाल्याच्या अदमासाने पिंटो तेवढ्यात बग्गीचे दार लाऊ लागला
" ह्या कोण??" सि.अनास्तासियांनी तुटक आवाजात विचारले.....
"उम्म्म त्या होय, त्या आहेत मॅडम रोसेटा......... त्यापण आपल्या सोबत येणारे ली हार्व ला" पिंटो गडबडल्यागत बोलला.....
"रोसेटा म्हणजे लेक एंड ला जिचे "प्लेझर हाऊस" आहे तिच का ही बया???"
"उम्म्म मी म्हणजे हो.... पण मी......" असे काहीसे रोसेटा बोले तो पर्यंत समस्तजनांच्या नजरा अन भुवया आक्रसल्या सगळे जरा टरकुन सरकुन बसले अन अनास्तासिया पुटपुटली
"ओह गॉड फ़र्गिव्ह मी फ़ॉर द सीन"
"चला म्हणजे आपल्याला कंपनी द्यायला एक लचके तोडला जाणारा एक "चरबीचा गोळा " आहे तर" मि.ले मार्तिन आपल्या सात्विक संतापाला वाटकरुन देत बोलले अन त्यांना अनुमोदन दिल्यासारखे ते अन मि ले मार्तिन पिंटो कडे पहायला लागले.....
पिंटो ने एकदाच दयेने रोसेटा कडे पाहीले ती शांत असल्याचे पाहुन तो कसनुसे हसत कोचवानाच्या जागेवर उडी मारुन बसला अन बग्गी भरधाव सोडली...... बग्गी सुटली तश्या विखारी बुर्झ्वा जिभा अन "गप्पा" पण सुटल्या
"तुम्हाला सांगते मी मंडळी, मागल्या जन्मी मरणाची पापे केली की हा जन्म असा मिळतो बघा" अनास्तासिया बोलली
"मग काय, आधीच चरबीचा गोळा त्यात माहित नाही किती रोगट असेल हा गोळा" मि.पेनॉंनी आपल्या हॅंड बॅगेतली साबणाची वडी चाचपडत शेरा मारला, ह्या वेळी रोसेटा निर्विकार होऊन बग्गीबाहेर बघत होती
"बघा बघा लाज म्हणुन काही ती नसतेच ना चरबीच्या गोळ्यांना........ काहिही बोला ह्यांना काही नाही तसेही हे गोळे म्हणजे डस्टबीन्सच असतात समाजाचे " इति श्री पेनॉं........
"हो ना हो पेनॉं, हा गोळा माझ्यापासुन दुरच ठेवा कसा....." क्लाऊडीन बोलल्या तसे रोसेटाच चपापुन थोडे अंग चोरत बसली............
"मेल्या पिंटो ने काही सवा-यांचे पैशे घेतलेत की फ़क्त एक वेळ चरबी खायला मिळाली म्हणुन जागा दिलीए ह्या गोळ्या ला देव जाणे" मि.पेनॉं बोलल्या......
तास दिड तास असाच गेला तेव्हा गाडी थांबली , पिंटो उतरला अन लगबगीने मिस्यु.पेनॉं बसले होते त्या खिडकी जवळ येऊन म्हणाला "मेहेरबान आपण आपला नाश्ता गाडीतच उरकावा ही विनंती, धुक्यामुळे आपण तसे ही स्लो आहोत अन रात्रीच्या आधी आपल्याला ली हार्व ला पोचायचेच आहे"
असे ऐकताच काय ही कटकट आहे अश्या भावनेने त्रासलेल्या पेनॉंनी समस्तांकडे न पाहताच "हूं" केले व गाडी तडक पुढे सरकली..... अश्यातच लोकांच्या भुका खवळल्यावर लक्षात आले की मधे कुठेतरी थांबायचे म्हणुन आज कोणीच घरी ओव्हनची भट्टी पेटवलीच नव्हती... चर्च चा किचन स्टाफ़ पण युद्धाच्या धामधुमीत काम सोडुन गेला होता, आता चरफ़डत बसणे खेरीज कोणाकडे काही इलाज नव्हता..... अन तितक्यात उमद्या चीज अन ताज्या ब्राऊन ब्रेड चा सुगंध दरवळायला लागला तसे लोकांची आशाळभूत नजर तिकडे वळली, रोसेटा ने आपली पिकनिक बास्केट उघडली होती......
अतिशय सहज अन सच्चा असा एक आवाज घुमला "घ्या ना सिस्टर ,मिस्यु ऍंड मिसेस.... प्लिज थोडी ब्रेड खाऊन घ्या बरे वाटेल जीवाला सगळ्यांना अन मला पण आनंद होईल".... ती रोसेटा होती....
"ए... बये वेड लागलंय काय???....... तुला हजार रोग असणारी तु पापी विच, आम्ही का तुझ्या तुकड्यांचे सेवन करणार की काय??? मेला चरबीचा गोळा" क्लाऊडीन उचकल्या.........
"हो ना मेली दोन घास खायला घालुन काय मोठे पाप धुवुन घेणार आहे देव जाणे" मि.ले मार्तिन बोलल्या
तसे रोसेटा गप्पगार झाली तिची भुकेची संवेदनाच मेली अन तिने ते बास्केट तसेच सरकवले, काहीवेळानंतर जसे जसे पोटातला भडाग्नी अजुन पेटला तश्या जिभा लुळ्या पडु लागल्या ........ शांततेचा भंग करत क्लाऊडीन पहीले बोलल्या
"तसं ब्रेड अन वाईन शुद्ध अन्न असतं नाही का हो सिस्टर अनास्तासिया???....."
"तर काय, लास्ट सपर मधे पण प्रभू ने तेच खाल्ले होते, ते पण मेरी मॅग्डेलन ला शेजारी बसवुन"
अतिशय तत्परतेने रोसेटाने ब्रेड लोफ़ अन रेड वाईन क्लाऊडीन ला दिली ती हातात घेऊन मानभावीपणे सिस्टर इतरांना म्हणाली "घ्या मंडळी थोडे खाऊन घ्या , तेवढेच चरबीच्या गोळ्याला पुण्य लाभेल माय पायस फ़ॉलोवर्स ऑफ़ लॉर्ड"...... हळु हळु अन्नवासनेला "प्रभूची इच्छा" "चरबीच्या गोळ्यावर उपकार" इत्यादी विशेषणं लाऊन का होईना अन्नाचा पार चट्टामट्टा झाला....
असेच घड्याळाचे काटे सरकत राहीले ,तसे थोड्या वेळाने पिंटो खाली उतरला व मिस्यु पेनॉंना बोलला " मेहेरबान आज रात्री तर आपण ली हार्व ला पोहोचणे मुष्किल आहे, इथे जवळच एक कॅरीयर इन आहे तिथे आपण रात्री राहू शकु, अन पहाटे लवकर उठुन परत पुढे निघु"
"काय कट्कट आहे, पिंटो तुला अजिबात गाडी हाकता येत नाही!!!!.... आता काय जे पुढ्यात येईल ते करणे अजुन काय, टेक अस टू द इन यु रब्बीश आयरीश पोर्टर"
चेहरा पाडुन पिंटोने गाडी आस्ते आस्ते इन च्या दारात नेऊन थांबवली, सामान उतरवुन आत नेले, रिसेप्शन ला मि.पेनॉ पोचले तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला..... मागे एक जर्मन निषाण होते
"हे हो काय????" मागुन येऊन चकित झालेल्या मिस्यु ले मार्तिनांनी विचारले......
मख्ख तोंडाने रिसेप्शनिस्ट बोलला" काल रात्रीच जर्मनांनी ताबा घेतलाय इन चा..... तुम्ही आधी त्यांच्या मेजर ला भेटुन घ्या कसे"
सगळी वरात तशीच पहील्या मजल्यावर चालवली गेली, वर घेऊन जाणारा एक कप्तान होता तरणा जर्मन ठेवणीचा दणकट चेहरा ,युद्धाने रापलेला रंग अन रुंद जबडा असणारा, तो टकटक करुन एका खोलीत गेला बंद होणा-या दारातुन प्रत्येकाला टक्कल पडलेला निळ्या डोळ्यांचा त्याचा वरिष्ठ दिसला, काही क्षणातच कप्तानाने त्यांना आत बोलावले अन ओळख करुन देण्यासाठी बोलला
"सिटोयेन्स एंड सिटोयेनेस, मेजर हान्ज क्रेपे ऑफ़ प्रशियन आर्मी बाय द कमांड ऍंड कमिशन ऑफ़ आर्च ड्युक ऑफ़ प्रशिया"
"वेलकम सिटीझनरी, बी काल्म ऍंड कंफ़र्टेबल....... निश्चिंत असा..... तुम्ही सेफ़ आहात....... मी मे.क्रेपे तुमचे स्वागत करतो....... आपला परिचय करुन द्यावा अशी मी आपणा सर्व मिस्टर्स ,मिसेस ऍंड मॅड्मोसेल्स ना विनंती करतो"
मंडळी इतक्यात बरीच रिलॅक्स झाली होती, सगळ्यांच्या ओळखी झाल्या तसे सगळे थोडे पाघळले होते "काय पण सुसंकृत सैनिक आहे हा" असे मि.पेन मि ले मार्तिनांच्या कानी लागुन सांगत होत्या...... इतक्यात काहीसे चमकुन क्रेपे रोसेटा ला म्हणाला
"माफ़ करा मॅड्मोसेल आपली तारीफ़ काय म्हणालात आपण??"
"उम्म्म मी मॅडम रोसेटा, लेक व्यु इस्टेट रोवेन ची मालकीण.........."
"ओहो, तुमचे प्लेझरहाऊस बरेच प्रसिद्ध आहे मड्मोसेल" क्रेपे......
"ठीक आहे तर मग ठरले, मला मॅड्मोसेल रोसेटांची पुर्ण सर्व्हिस मनसोक्त मिळाली तर उद्या सकाळीच तुम्ही बग्गी जोडुन ली हार्व ला रवाना होऊ शकाल नाही तर इथे थांबा आमचे मेहेमान म्हणुन" असे म्हणत क्रेपे उठला अन बाहेर जाऊ लागला
"नीच नराधम पाप्या, माझ्याच देशावर आक्रमण करुन मलाच शरीरसुखाची मागणी करणारी खरंच ऑस्ट्रीय्न अवलाद आहे की बार्बेरियन????" रोसेटा कडाड्ली होती.......
"मड्मोसेल, इंपल्सिव्ह होऊ नका, पुर्ण विचार करा, मला काही घाई नाहीए..... पण विचार करा" छ्द्मी हसत क्रेपे बोलला अन दार लावल्यावरच सुन्न झालेली रोसेटा जाग्यावर आली.......
सगळी खोली आपल्याकडे विचित्र नजरेने बघते आहे असे तिला वाटुन गेले अन ते खरे होते, उरलेले सहा भुवया ताणुन तिच्याकडे पाहात होते अन फ़क्त पिंटो गाडीवान समयोचित करुण नजरे ने तिला सांत्वना देत होता...... सगळे खोलीत शांत बसले होते
"मड्मोसेल रोसेटा, विचार करा आपण सारे फ़्रेंच नागरीक आहोत, आपल्या सगळ्यांचा जीव आज राष्ट्रासाठी महत्वाचा आहे तुमच्या क्षणिक त्यागामुळे काही तरी चांगले घडू शकते, तरी तुम्ही प्लिज क्रेपे ची इच्छा पुर्ण करा अन आपणा सर्वांनाच ह्याच्यातुन मुक्त करा" असं जेव्हा श्रीयुत पेनॉ म्हणाले तेव्हा श्रीयुत ले मार्तिन त्यांना अनुमोदन देत मान हलवत होते, कापायला काढलेल्या बोकडागत दोघांच्या डोळ्यात अजीजी होती
"बेटा, तु त्याची इच्छा पुर्ण करुन इश्वराचे काम करतीएस ,लक्षात ठेव, तु जितक्या लवकर त्याला त्रृप्त करशील तितक्या लवकर आपण इथुन निसटू अन तितक्या लवकरच आम्हाला नन्स म्हणुन जखमी फ़्रेंच लेकरांची सेवा करता येईल अन सैनिकांची दुआ तुला लागेल...... येशु ची तु लाडकी होशील पोरी" अनास्ताशिया च्या ह्या बोलण्यावर क्लाऊडीन "नैले पे दैला" सारखी नजर करुन आलटुन पालटुन तिच्याकडे अन रोसेटाकडे पाहु लागली
"दया करा मड्मोसेल, आम्ही मेलो तर ब्रिनीच्या लष्करी शाळेतली आमची कच्चीबच्ची अनाथ होतील हो...." असे म्हणतच दोन्ही बाया भोकाडूं लागल्या...... तसे रोसेटा निश्चयाने उठुन म्हणाली ,
"आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी मी एका राष्ट्रशत्रु सोबत शय्यासोबत करेन"
तिचे बोलणे ऐकताच खोलीत वसंत फ़ुलला, जितका उतावळा क्रेपे तिला भेटायला नव्हता तितके उतावळे सगळे तिला त्याच्या खोलीत धाडायला झाली, एकटा पिंटोच बेचैन झाला होता..... काही वेळाने सांज ढळली तेव्हा तिला क्रेपेच्या खोलीत धाडण्यात आले.....
सगळी मंड्ळी आपापल्या खोल्यांत निवांत पहुडली होती, तिघंच जागे होते, लचके तोडणारा क्रेपे, रोसेटा अन समाजाच्या दंभाचा उबग आलेला अन वरच्या खोलीतनं आलेले उसासे ब्रॅंडीच्या खळखळाटात विरघळवु पाहणारा सहृदयी गाडीवान पिंटो.........
सकाळ झाली ,
ताजी तवानी झालेली मंडळीच क्रेपे बरोबर काळा चहा अन क्रॉइसांट्स चा नाश्ता करत होती, त्यांचा नाश्ता होई पर्यंत पिंटो ने गाडी तयार केली, अतिशय सभ्यपणे क्रेपे ने समस्तांस गुडबाय केले, अन आपण काहीतरी विसरतो आहोत हे विसरुन ही मंडळी सुहास्य वदने गाडीत स्थानापन्न झाली...... आज सकाळीच मिसेस ले मार्तिनांनी डोके लाऊन भरपुर ब्रेड अन वाईन अन अंड्यांचा खाऊ सोबत बांधुन घेतला होता , एका कोप-यात कशीबशी पाय ओढत आलेली रोसेटा बसली होती ,रात्रभर रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते, कोलमडलेल्या तिला तहानभूक अन शिदोरीच काय पण अंगावरच्या फ़ाटक्या झग्यातनं दिसणा-या व्रणांची ही तमा उरलेली नव्हती....... काही वेळानी नाश्त्याची वेळ झाली तसेच भुका ही कडाडल्या तेव्हा भराभर ब्रेड अंडी मोडल्या जाऊ लागली
काल भुकेने लुळ्या पड्लेल्या जीभा परत ताठरल्या, काल रात्री भिती ने करुण झालेले जीव परत एकदा ताज्यादमाने हुषारी खाऊन पिऊन सरसावुन बसले, परत एकदा एक सामाजिक भिंत उभारली गेली जिच्या ज्या व्यवसायामुळे काल हे फ़्रेंच बुर्झ्वा जिवानिशी वाचले होते तिलाच परत एकदा
"रडायला काय ,काल रात्रीचा मेहेनताना कमी मिळाला की काय मड्मोसेलला कोणास ठाऊक ???" अशी पृच्छा ब्रेडच्या तुकड्याला मोताद ठेऊन एका नितांत सुंदर आत्म्याला केली जाऊ लागली.........
गाडीवानाच्या सीट वर बसुन पिंटो " द सॉंग ऑफ़ मार्सेल्स" म्हणजेच फ़्रेंच राष्ट्रगीत शीळेवर वाजवत होता अन तेच गीत पार्श्वभुमीवर ठेऊन बुल दे सुफ़ म्हणजेच चरबीचा गोळा विष्षण नजरेने बाहेरच्या भकास अन सुतकी आसमंताकडे पाहात एकटाच रडत होता........
प्रतिक्रिया
19 Aug 2014 - 12:02 pm | एस
भडवे साले दांभिक...! ह्यांच्या त्या कनवाळू देवाला तर काय म्हणावे! तुम्ही डोकंच उठवलं हो अशी कथा टाकून...
19 Aug 2014 - 1:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
मोपासां हा फ्रेन्च भाषेतला मंटो म्हणावा लागेल, अश्याच कथा असतात त्याच्या, मुस्काडणार्या, डोकी उठवणा-या :)
19 Aug 2014 - 2:05 pm | अजया
मोपासांची ही माझी आवडती कथा.मी वाचलेल्या कथासंग्रहात हीच पहिली गोष्ट होती.तीच्यातली अंगावर येणारी दांभिकता,विचारात पाडून गेली.त्यानंतर मोपासांच्या सर्व कथा झपाटल्यासारख्या वाचुन काढल्या होत्या.छान जमलाय भावानुवाद.अवघड काम!
19 Aug 2014 - 9:35 pm | कैलासवासी सोन्याबापु
येप्प!!! मोपासां च्या वेळी नोबेल कॉन्स्टीट्युट झाले नव्ह्ते नाहीतर पठ्ठ्या ने उचललेच असते
19 Aug 2014 - 2:08 pm | प्यारे१
हे वाचलंय कुठंतरी. आवडलेलं. आताही आवडलंय.
19 Aug 2014 - 9:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
हो आधी इतरत्र प्रकाशित आहे हे , आभार आपले :)
19 Aug 2014 - 2:46 pm | इनिगोय
छान जमलाय अनुवाद. अशा कथांचं सार दुस-या भाषेत तंतोतंत पोचवणं खरंच अवघड.
विरामचिन्हांची थोडी काळजी घ्या, आणि ellipsis (...) टाळता आले तर पहा.
अनुवाद करताना संवादांच्या पलीकडे असलेले एक्स्प्रेशन्स, पाॅझेस मांडताना या एलिप्सिसचा वापर करावासा वाटतो. पण त्यामुळे वाचणा-याचा थोडा रसभंग होतो. हीच कथा एलिप्सिस पूर्णतः वगळून लिहिली, आणि मग स्वसंपादन करून अगदी आवश्यक तिथेच वापर केला तर अधिक परिणामकारक होईल असे वाटते.
पुलेशु.
19 Aug 2014 - 9:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
हां!!! नेमके हेच झाले होते माझ्यासोबत लिहिताना!!!! आता हियर ऑन हा सल्ला पक्का ध्यानात ठेवेन!!! टेक्निकल करेक्शन साठी आभारी आहे
20 Aug 2014 - 2:44 am | बहुगुणी
वर्णन फारच छान जमलं आहे, बग्गी, कोचवान यांसकट सर्वच प्रसंग डोळ्यांसमोर उभे रहातील असं लिखाण झालं आहे.
ही कथा इंग्लिश मध्ये ऑडिओबुक स्वरूपात इथे मिळेलः
फ्रेंच भाषा मला येत नाहीच, पण या कथेच्या नावाचा उच्चार 'बुल दे स्विफ' असा होतो असं आधी वाचल्याचं/ ऐकल्याचं आठवतं....आणि मूळ कथेत मला वाटतं दहा प्रवासी असतात. पण तुमच्या सहा प्रवाश्यांनी काही फरक पडत नाही, कथेचा गाभा अचूक पकडला आहे, धन्यवाद!
20 Aug 2014 - 6:41 am | कैलासवासी सोन्याबापु
अरे वा ऑडीओ बुक पण आहे का!!! छान छान!!!!, फ्रेंच मला पण मोडकं तोडकंच येतं (साहित्यिक वाचना इतके खचित येत नाहीच) मी इंग्लिश बुक वाचलेलं एक "सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज ऑफ मोपासां" म्हणुन, स्विफ बद्दल मी पण ऐकले होते, पण एक दोन फ्रेंच ट्रान्स्लेटर जन मित्र आहेत ते "सुफ" म्हणत होते सो तेच उचलले
20 Sep 2015 - 9:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
.सहज एक जुनी कथा वर कढ़ाव वाटली! :)
20 Sep 2015 - 10:35 pm | जव्हेरगंज
सोन्याबापू खुपच छान झालाय अनुवाद. एकदम रिफ्रेशिंग.
आपण अजुन अश्या अनुवादीत कथा टाकाल ही अपेक्षा आहे.
लवकर येऊ द्या.
20 Sep 2015 - 10:52 pm | पैसा
तथाकथित सभ्यता!
21 Sep 2015 - 12:47 am | बोका-ए-आझम
अनुवाद मस्तच. मोपासां आणि मंटो यांच्यात तर साम्य आहेच पण ही कथा वाचून मला तेंडुलकरांचं ' शांतता, कोर्ट चालू आहे ' आठवलं. पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे पण समाजाची तथाकथित उच्च-नीच संकल्पना, त्यातून येणारीjudgmental वृत्ती आणि त्यातून निर्माण होणारा दांभिकपणा हे सगळीकडे सारखंच आहे.
21 Sep 2015 - 7:03 am | कैलासवासी सोन्याबापु
येस!!!! शांतता कोर्ट सुरु आहे!!
21 Sep 2015 - 7:10 am | मनीषा
एका उत्तम कथेचा सुरेख भावानुवाद ...
21 Sep 2015 - 10:49 am | पद्मावति
अस्वस्थ करणारी कथा. तुम्ही भावनुवाद इतका सुरेख केलाय की मूळ कथेतला आशय जसाच्या तसा आमच्या पर्यंत पोहोचला.
21 Sep 2015 - 11:29 am | मृत्युन्जय
अस्वस्थ करणारी कथा आहे.
21 Sep 2015 - 8:24 pm | भीमराव
वाईट वाटत राव आसलं वाचुन, लय वर्षापुर्वी आसलीच कथा पेपरात वाचलेली, फक्त त्या कथेमधला शत्रु सैन्याचा अधिकारी गाडीमधल्या ३ स्त्रीयांपैकी कोणीपन यावे अशी अट ठेवतो, मग त्या तथाकथीत कुळवंत बाया व त्यांच्या बरोबरचा पुरुष या कसबीनीला हाता पाया पडुन तिकडे जायची विनंती करतात, ति बिचारी ह्या बायांची आब्रु वाचवायला जाते मात्र परत आल्यानंतर......