===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
सुपीक चंद्रकोरीतील (Fertile Crescent) स्थानामुळे आणि त्याच्या प्राचीन इतिहासामुळे जॉर्डन बघण्याची इच्छा होतीच. पण एकदा विमानप्रवास करत असताना विमान कंपनीच्या मासिकात पेत्रा दरीतल्या नेबॅतियन साम्राज्याच्या जामदारखान्याचा (treasury) फोटो पाहिला आणि तो देश सफरीच्या यादीत वर सरकला. नंतर सहा आठ महिन्यांतच आमच्या कर्मस्थानाच्या क्रीडा आणि मनोरंजन विभागाने जॉर्डनच्या सहलीचा प्रस्ताव मांडला. अर्थात ही सुवर्णसंधी टाळणे शक्यच नव्हते. माझ्या फिरण्याच्या आवडीमुळे त्या विभागाच्या संचालकाची आणि माझी दोस्ती होतीच. त्याला थोडीबहुत मदत करून त्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवायला मदत केली. अर्थात यात माझाच जास्त फायदा होता म्हणा !
जॉर्डनसारख्या प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध असलेल्या पण आधुनिक आकर्षणांचे काहीच वलय नसलेल्या देशाच्या सफरीसाठी साथी मिळविणे कल्पनेपेक्षा जरा जास्तच कठीण गेले. जाहिरातीला २५ -३० जणांनी प्रतिसाद दिला, आगाऊ रक्कम भरण्याची वेळ आली तोपर्यंत अकरा जणच शिल्लक उरले, फिलिपिनो नागरिकांना व्हिसा देण्याच्या जॉर्डनच्या काही नियमांमुळे त्यातले चार गळले आणि शेवटी सात जणच बाकी राहिले. सहलीची किंमत ठरवताना २५ जणांना जमेस धरल्याने टूर एजन्सीने आता सात जणांसाठी दर माणशी जास्त पैसे पडतील असे सांगितले. नशिबाने तो फरक सातही जणांना मान्य झाल्याने सहल नक्की झाली आणि आमचा जीव भांड्यात पडला !
सहलीत विविध स्तरांवरचे कर्मचारी असल्याने खर्च ताब्यात ठेवण्यासाठी दम्माम या आमचे सौदी अरेबियातल्या ठिकाणापासून जॉर्डनची राजधानी अम्मान पर्यंतचा साधारण १७०० किमी लांबीचा प्रवास बसने करण्याचे ठरले. इतक्या लांबीचा आणि अठरा-वीस तासांचा बसप्रवास मी पहिल्यानेच करत असल्याने जरा काळजी वाटत होती. पण दम्माम ते अम्मान अशी तडक आरामबस असल्याने जरा बरे वाटले. शिवाय आपल्याच संस्थेतले सहा सहप्रवासी असल्याने प्रवास गप्पा मारत मजेत होईल हा दिलासा होताच.
या प्रवासाचा मार्ग खालील नकाश्यात दाखवला आहे...
दम्माम ते अम्मान बस प्रवासाचा मार्ग (मूळ नकाशा जालावरून साभार)
बसच्या खुर्च्या आरामदायक होत्या. दिवसाउजेडीचे पहिले आठ-नऊ तास खेळीमेळीने गप्पा मारत गेले आणि रात्र पडू लागली. एका थांब्यावर पोटपूजा आटपल्यावर सर्वच जण आलटून पालटून डुलक्या आणि गाढ झोप घेऊ लागले. बाहेर नेहमीच दिसणारे वाळवंट आणि त्यात रात्र असल्याने बाहेर बघण्यात कोणालाच रस नव्हता. पहाटे पहाटे सौदी-जॉर्डन सीमाचौकी आली तेव्हा देशबदलाचे सोपस्कार आटपायला उठवले गेले. टूर एजन्सीच्या माणसाने आमचे पासपोर्ट ताब्यात घेऊन सगळी कारवाई केली. त्यामुळे त्या आवारात पाय मोकळे करत गप्पा मारायला अर्धा तास मिळाला. नंतर पुढे असलेले साधारण २०० किलोमीटर परत आलटून पालटून डुलक्या आणि गाढ झोप असेच गेले.
ही आहेत त्या प्रवासातली काही क्षणचित्रे...
प्रवासातले एक बस स्थानक
.
एका थांब्यावर पोटपूजा आटपल्यावर उघड्या आकाशाखाली चहा-कॉफीपानाची मजा घेताना
जॉर्डन
जॉर्डनमध्ये फिरायला सुरुवात करण्या करण्याअगोदर त्या देशाची थोडी तोंडओळख करून घेतल्यास सहलित जरा अजून जास्त मजा येईल.
सर्वसाधारणपणे जॉर्डन (Jordan; अरबीमध्ये : الأردن म्हणजे al-Urdun किंवा al-Ordon) असे संबोधल्या जाणार्या या देशाचे औपचारिक नाव आहे 'जॉर्डनचे हाशेमाईट राज्य' (हाशेमाईट किंगडम ऑफ जॉर्डन; अरबीमध्ये: المملكة الأردنية الهاشمية म्हणजे al-Mamlakah al-Urdunīyah al-Hāshimīyah). पश्चिम आशियामध्ये असलेल्या या देशाच्या दक्षिण व दक्षिणपूर्वेस सौदी अरेबिया, उत्तरपूर्वेस इराक, उत्तरेस सिरीया, पश्चिमेस इझ्रेल व मृत समुद्र आणि दक्षिणेच्या अती चिंचोळ्या भूभागाला लागून रक्त समुद्रातले आकाबाचे आखात आहे.
आजपासून ५०,००० वर्षांपूर्वी मानवाने प्रथमच कायमस्वरूपी पादाक्रांत केलेल्या सुपीक चंद्रकोर किंवा लेवांत नावाच्या भूमीचा एक भाग आहे. तेथे आतापर्यंत सर्वात जुने मानवाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. या भागातून पुढे जाऊन नंतर मानवाने युरोपमध्ये वस्ती करायला सुरुवात केला. त्यामुळेही या भूभागाला पाय लावण्याची माझी खास इच्छा होती.
प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने आणि महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व होते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत दंतकथा, स्थानिक पुराणे आणि लिखीत इतिहास यापैकी एक किंवा जास्त पुरावे असलेली अनेक राज्ये-साम्राज्ये येथे होऊन गेली. काही राज्ये जॉर्डन किंवा फारतर आजूबाजूचा काही प्रदेश इतकीच मोठी होती तर इतर काही साम्राज्ये जॉर्डनसह इतर बराच मोठा भूभाग व्यापून होती. आधुनिक जॉर्डन आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाला फार पूर्वीपासून ट्रान्स़जॉर्डन असे संबोधले जात असे. ट्रान्स़जॉर्डनवर सत्ता गाजवणार्या महत्त्वाच्या राजसत्ता अशा होत्या: मोआब, अम्मॉन, बाशान, अस्सिरिया, बॅबिलोनिया, पर्शिया, मॅसेडोनिया, सिल्युसिड, पार्थियन, नेबॅतियन, रोमन, इस्लामी, ऑटोमान, युरोपियन साम्राज्ये, इत्यादी.
इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष तेथे अजूनही बर्यापैकी शाबूत राहिलेले आहेत. आपण भेट देणार असणारी पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे. इ स १०६ मध्ये रोमन साम्राज्याने या भूभागावर कब्जा केला. नंतर इ स ६३३ ते ६३६ मध्ये अरबी व्दीपकल्पातून उत्तरेकडे पसरणार्या अरब सत्तांच्या ताब्यात हा भाग गेला. त्यानंतर अनेक इस्लामिक सत्तांतरे होत होत सोळाव्या शतकात हा भाग ऑटोमान तुर्कांच्या ताब्यात आला. त्यावेळी त्याचे नियंत्रण दमास्कस (आता आधुनिक सिरीयाची राजधानी) येथून होत होते.
पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमान साम्राज्याची शकले झाली आणि १९२० साली त्यातला एक भूभाग "जॉर्डन" या नावाने ब्रिटिश प्रभावाखाली आला. इ स १९२१ मध्ये जॉर्डनची सत्ता अब्दुल्ला इब्न हुसेनच्या हाती सोपवली गेली. इ स १९२३ मध्ये ब्रिटनने जॉर्डनला आंशिक स्वातंत्र्य दिले, पण "ब्रिटीनचे संरक्षित राष्ट्र (ब्रिटिश प्रोटेक्टोरेट)" ही स्थिती कायम ठेवली. दुसर्या महायुद्धात केलेल्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटनने इ स १९४६ साली जॉर्डनला पूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि राजा अब्दुल्ला (पहिला) आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.
अब्दुल्लाचा १९५१ मध्ये वध झाल्यावर त्याचा मुलगा तलाल सत्तेवर आला. तलाल मानसिक रोगी असल्याने पुढच्याच वर्षी त्याची सत्तेवरून उचलबांगडी करून त्याचा मुलगा हुसेन याला राजसत्ता दिली गेली. प्रदीर्घ अरब-इझ्रेल संघर्ष, १९५६ चे सुवेझ कालवा प्रकरण, सिरीया देशाची निर्मिती, पॅलेस्टिनी समस्या, आखाती युद्ध, इ वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि पाश्चिमात्य सत्ता व अरब हितसंबंध यांच्या ओढाताणीत जॉर्डनला सुरक्षित आणि बर्यापैकी सुस्थितीत ठेवण्याचे श्रेय राजा हुसेन याला जाते. इ स १९९९ मध्ये कर्करोगाने त्याचे निधन झाल्यावर त्याचा मुलगा अब्दुल्ला (दुसरा) राजसत्तेवर आला आहे. त्याने जॉर्डनमध्ये २००३ मध्ये पहिली निवडणूक घेऊन लोकांनी निवडलेल्या लोकसभेची स्थापना केली; मात्र पंतप्रधानाची नेमणुक-बरखास्ती करण्याच्या अधिकारासह महत्त्वाचे शासकीय अधिकार स्वतःकडेच ठेवले. तेव्हापासून जनक्षोभामुळे अनेकदा बरखास्त केलेली मंत्रिमंडळे, अरब स्प्रिंग, इत्यादी अडथळ्यांवर अडखळत जॉर्डनची आधुनिक काळातली खडतर मार्गावरची वाटचाल चालू आहे.
तर असा आहे हा आजचा जॉर्डन... ७७,८०० चौ किमी क्षेत्रफळाच्या भूमीवर वसलेल्या ६०-६५ लाख लोकसंखेचा देश. या लोकसंखेत ९८% अरब आणि ९२% मुस्लिम आहेत. बराचसा वाळवंटी असलेल्या या देशातला सर्वात मोठा पर्वत १,८५४ मीटर उंच असून त्याची शिखरे हिवाळ्यात बर्फाच्छादित असतात आणि सर्वात सखोल जागा असलेला मृत समुद्राचा किनारा जागतीक समुद्रसपाटीच्या ४२० मीटर खाली आहे ! उन्हाळ्यात रखरखीत उष्ण असणार्या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.
===================================================================
अम्मानमध्ये हॉटेलवर पोहोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. बसच्या खुर्च्या कितीही आरामदायक असल्या तरी त्यांच्यात अठरा तास बसून अंग आंबलेले होते. पण बस थांब्यावरच भेटलेल्या स्थानिक मार्गदर्शकाने "दोन तासांत अम्मानच्या सहलीला बाहेर पडायचे आहे" असे सांगितले होते. त्यामुळे सर्वच जण आपापल्या खोल्यांकडे शॉवरादी प्रभातकर्मे करायला पळाले. ताजेतवाने होऊन आणि सज्जड न्याहारी आटपून हॉटेलच्या लॉबीत पोहोचलो तेव्हा अम्मानचा स्थानिक मार्गदर्शक, खमीस, आमची वाट पाहत बसलेला होता. वेळ न दवडता हॉटेल मधून बाहेर पडलो.
अम्मान
या जागेवरच्या प्राचीन वस्तीचे नाव "रब्बाथ अम्मान" म्हणजे "अम्मोनाईट लोकांचे महानगर" असे होते. राजा डेविडने हे शहर जिंकून घेतल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. डेविडच्या प्रेयसीच्या नवर्याला डेविडने युद्धावर पाठविल्यावर तो या जागेवरच्या एका चकमकीत मारला गेला अशीही नोंद आहे. दुसरा टॉलेमी फिलाडेल्फस (इ स पूर्व २८३ ते २४६) या नावाच्या इजिप्तच्या राजाने हा भाग जिंकल्यावर या शहराचे नाव बदलून स्वतःच्या नावावरून फिलाडेल्फिया असे ठेवले होते. सातव्या शतकात हे शहर उम्मायद अरबांच्या ताब्यात गेल्यावर त्याचे परत अम्मान असे नामकरण केले गेले. उम्मायुदानंतरच्या कालखंडात या जागेचे महत्त्व कमी होऊन तिचे महत्व कमी झाले. एकोणिसाव्या शतकात ऑटोमान साम्राज्याच्या ट्रान्सजॉर्डन प्रांताची राजधानी म्हणून अम्मानला परत एकदा महत्त्व आले, ते कमी अधिक प्रमाणात आजतागायत चालू आहे.
नव्या-जुन्याच्या संगमाने चित्तवेधक झालेले हे शहर सात टेकड्यांचा समूह असलेल्या भूभागावर वसलेले आहे. राजधानी असण्याबरोबर हे शहर जॉर्डनचे मुख्य आर्थिक शहरही आहे. जॉर्डनची साधारणपणे अर्धी लोकवस्ती (३० लाख) या एका शहरात राहते. जॉर्डन आणि अम्मानच्या वैविध्यपूर्ण इतिहासामुळे या शहरात साहजिकपणे आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या संस्कृतींची सरमिसळ झालेली आहे. तिचे दर्शन आपल्याला शहरात फिरताना होते. या शहराच्या हद्दीत असलेले काही प्राचीन / ऐतिहासिक अवशेष खास आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षणे आहेत. चला तर निघूया अम्मानची फेरी मारायला.
हॉटेलवरून आजच्या एका मुख्य थांब्याकडे जाताना या शहराच्या सात टेकड्यांवर वसलेल्या नव्या व जुन्या भागांपैकी काहींचे दर्शन झाले...
जुन्या अम्मानची पहिली झलक
.
नव्या अम्मानची पहिली झलक
अम्मानच्या सहलीत त्याच्या विविध भागांचे दर्शन आपल्या होत राहीलच.
अम्मान सिटॅडेल (अम्मान किल्ला)
अम्मानमधिल काला नावाच्या, इंग्लिश "L" या अक्षराच्या आकाराच्या, एका टेकडीवर अम्मान सिटॅडेल (Amman Citadel) ही जॉर्डनमधली एक राष्ट्रीय ऐतिहासिक जागा आहे. या टेकडीवर नवअश्मयुगापासून ते आजतागायत मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे हे शहर जगातली सर्वात जास्त (सुमारे ७,००० वर्षे) सलग मानवी वस्ती असणारी जागा समजली जाते ! अर्थातच या सगळ्या कालखंडात होऊन गेलेल्या राजसत्तांना आणी उलथापालथींना या जागेने पाहिले आहे.
त्याचबरोबर हा परिसर मध्यपूर्वेत जन्मलेल्या आणि जगभर पसरलेल्या जुदाइझम, ख्रिश्चियानिटी आणि इस्लाम तीन एकेश्वरवादी धर्मांच्या शेकडो वर्षांच्या वाटचालीचा साक्षीदार आहे.
तुलनेने आधुनिक काळात (ब्राँझ युग, इ स पूर्वी १८०० वर्षे) ह्या भागाभोवती भिंत उभारली गेली आणि त्यावरून याचे नाव अम्मान सिटॅडेल म्हणजे अम्मानचा किल्ला असे पडले आहे. मात्र येथील प्राचीन अवशेष सिटेडेलच्या बाहेरच्या जागेवरही विखुरलेले आहेत. त्यातील काही तर अम्मानच्या इतर भागांतही आहेत. या प्राचीन ठेव्याचे बरेचसे उत्खनन आणि अभ्यास अजून बाकी आहे.
चला तर बघूया ही अशी विविधरंगी जागा...
अम्मान सिटॅडेलचा नकाशा
हराक्लेस (हर्क्युलीस) चे मंदिर
येथे इ स १६२ ते १६६६ मध्ये बांधलेले हर्क्युलीसचे मंदिर आहे. या मंदिराचा आकार रोममधील हर्क्युलीसच्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा आहे. मंदिराचा परिसर १२२ x ७२ मीटर आहे आणि मुख्य इमारतीचा आकार ३१ मी x २६ मीटर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशव्दारात प्रत्येकी १० मीटर उंचीचे सहा स्तंभ आहेत. मंदिराच्या अंतर्भागांचे बरेचसे अपेक्षित अवशेष न सापडल्यामुळे या मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले असावे असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
हर्क्युलीसच्या मंदिराचे अवशेष : ०१
.
हर्क्युलीसच्या मंदिराचे अवशेष : ०२
.
हर्क्युलीसच्या मूर्तींच्या हाताचा अवशेष (तसा काय फार मोठा नाही माझ्या हातापेक्षा ;) )
बायझँटाइन काळातील चर्चचे अवशेष
पाच-सहाव्या शतकात बांधलेल्या या चर्चचे फक्त काही खांब आणि कुसाचे अवशेष राहिलेले आहेत.
बायझँटाइन काळातील चर्च
इतर काही अवशेष
अम्मान सिटॅडेल : ०१
.
...
अम्मान सिटॅडेल : ०२ आणि ०३
.
सिटॅडेलवरून दिसणारे टेकडीच्या पायथ्याशी असलेले रोमन अँफिथिएटर
.
सिटॅडेलवरून दिसणारे रोमन अँफिथिएटरचे कार्यालय
.
सिटॅडेलवरून आमच्या पुढच्या थांब्याकडे नेणारा रस्त्याचा काही भाग अम्मानच्या आधुनिक उच्चभ्रू वस्तीतून जात होता...
आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०१
.
आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०२
.
आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०३
.
नव्या-जुन्याची सरमिसळ असलेल्या अम्मानमधून आमची गाडी अज्लून किल्ल्याकडे निघाली...
एका जुन्या वस्तीच्या मागे दिसणारा अम्मान सिटॅडेल
(क्रमशः )
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
4 Aug 2014 - 5:48 pm | पिलीयन रायडर
तुम्ही ग्रेटच आहात!!!
किती फिरत असता मस्त.. आणि शिवाय किती सुंदर लिहीता!
4 Aug 2014 - 5:56 pm | केदार-मिसळपाव
वाचत राहु...
4 Aug 2014 - 5:59 pm | मृत्युन्जय
तुम्ही लिहिले छान आहे. पण इतका रखरखीत प्रदेश मला आवडेल की नाही जरा शंकाच आहे. पण पेत्राची मात्र उत्सुकता आहे. पुभाप्र
4 Aug 2014 - 6:17 pm | आदिजोशी
एक्का काकांमुळे अजून एक मस्त सफर घडणार.
4 Aug 2014 - 6:57 pm | अजया
मीना प्रभुंच्या इजिप्तायनमध्ये जाॅर्डनचे वर्णन वाचल्यापासून तिथे जायची इच्छा आहे.अाता आधी मिपावर तुमच्याबरोबर सफर होणार तर!
4 Aug 2014 - 7:07 pm | रेवती
अरे वा! चला नव्या सफरीला!
माहिती वाचतीये.
काही चित्रे ही सानिकेच्या अविस्मरणीय ग्रीसमध्ये होती तशी आहेत.
4 Aug 2014 - 8:48 pm | चौकटराजा
जॉर्डन चा प्रवास रंजक असणार अशी कल्पनेने धाग उलगडला. पावलो.मला उत्तम अवस्थेतील वास्तूं इतकेच पडक्या वास्तूंचे ही आकर्षण आहे. अवशेषांवरून मूळ वास्तूची कल्पना करण्यातही एक मौज असते. एवढेच काय हंपीसारख्या ठिकाणी अवशेषांना न्याहाळत बाजूच्या शिळांचे ही सौंदर्य अनुभवता येते. आपली अवस्थाही अशीच झाली असणार. बाकी अल
या शब्दाचा the असा अर्थ आहे काय? आणि बर्याच इमारती एकाच रंगाच्या कशा ? काही कन्वेन्शन आहे का तिथे ? जसे जोधपूर मधे ब्राह्मणांची घरे निळी आहेत .
5 Aug 2014 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरबी अल् इंग्लिशमधल्या the सारखाच साधारणपणे वापरला जातो.
सौदी अरेबियात इमारतींचे रंग बहुदा वाळवंटाच्या तपकिरी रंगाच्या छटांचे असतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मठ इस्लाममध्ये रंगीबेरंगी वस्तूंबद्दलचा निषेध असावा. तसेच हा रंग मुळातच मातकट असल्याने बराच काळ खराब होत नाही, त्यामुळे इमारतींच्या रखरखावीचा खर्च कमी होतो :)
4 Aug 2014 - 11:32 pm | प्यारे१
ओ आम्हाला येऊ द्या की....!
नेहमीप्रमाणंच उत्तम सुरुवात.
(अल्जिरिया मध्ये अशी मेमोरियल्स आहेत. रोमन अँफिथिएटर अगदी असंच आहे. चेपुवर टाकलेत फोटो.)
5 Aug 2014 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोमन साम्राज्यांने भूमध्य समुद्राचा संपुर्ण किनारा काबीज केला होता. त्यामुळे त्या समुद्राच्या चारही बाजूंना अश्या प्रकारचे अवशेष विखुरलेले आहेत. रोमन अँफिथिएटर हा तर रोमन साम्राज्याचा आणि संस्कृतीचा ट्रेड मार्कच होता.
4 Aug 2014 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
मी बस मधे आलेलो आहे. ;)
किल्ला यायची वाट पहातोय.
5 Aug 2014 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
पिलीयन रायडर, केदार-मिसळपाव, मृत्युन्जय, आदिजोशी, अजया आणि अत्रुप्त आत्मा : आपल्या सर्वांचे सहलीत स्वागत आहे !
5 Aug 2014 - 6:08 pm | बॅटमॅन
वा!!!! अजूनेक देश फिरणार आता तुमच्यामुळे. सहीच!!!!!
6 Aug 2014 - 10:08 am | प्रचेतस
परत एकदा प्राचीन इतिहासात फिरवणार तुम्ही आम्हाला.
मस्त सफर.
6 Aug 2014 - 11:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्राचीन इतिहासाबरोबरच जरा नजिकचा रोचक इतिहास आणि एक भौतिक आश्चर्यपण आहे !
6 Aug 2014 - 10:14 am | अनुप ढेरे
वा. मस्तं!
जॉर्डनची राणी फार सुंदर आहे
8 Aug 2014 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा
आपल्या लारा दत्ता सारखी! ;)
10 Aug 2014 - 10:05 pm | प्यारे१
वा बुवा!
क्या आपके टुथपेस्ट में नमक है? ;)
बाकी जॉर्डनची राणी जगात सगळ्यात सुंदर ठरली होती कुठल्याशा सर्व्हे मध्ये.
11 Aug 2014 - 12:18 pm | एस
कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे शामभटाची तट्टाणी! ;-)
11 Aug 2014 - 8:26 pm | प्यारे१
जॉर्डनच्या राणीला तट्टाणी का म्हणताय हो?
-त्रुप्त समंध ;)
15 Aug 2014 - 10:30 am | अनुप ढेरे
किमान सांडणी तरी म्हणायला पाहिजे होतं
14 Aug 2014 - 4:36 pm | सूड
आपल्या??
6 Aug 2014 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
बॅटमॅन आणि अनुप ढेरे : सहलीत स्वागत आहे !
7 Aug 2014 - 5:49 pm | सूड
चला..नवीन सहल!! लांबचा पल्लाऽऽऽ!! ;)
7 Aug 2014 - 6:00 pm | शिद
नव्या सफरीला सुरुवात दणक्यात झाली आहे. आता पुढील भाग पण पटापट येऊद्या.
7 Aug 2014 - 11:46 pm | भाते
एक्का काकांच्या नविन सहलीसाठी मी तयार आहे.
8 Aug 2014 - 9:58 am | यशोधरा
वाचते आहे.
11 Aug 2014 - 11:23 am | स्वाती दिनेश
सुरूवात छान!
पु भा प्र,
स्वाती
11 Aug 2014 - 12:19 pm | एस
सहलीत (नेहमीप्रमाणे) नाव नोंदवलं आहे.
11 Aug 2014 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
सूड, शिद, भाते, यशोधरा, स्वाती दिनेश आणि स्वॅप्स : आपणा सर्वांचे सहलीत स्वागत आहे. सर्वांच्या सहभागामुळे सहल नक्कीच रंगेल असे वाटते.
12 Aug 2014 - 12:05 pm | स्मिता श्रीपाद
मस्त मस्त मस्त...
ईजिप्तायन मधे जॉर्डन बद्दल वाचलं होतं...पण पुस्तकात फोटोंची मर्यादा येते त्यामुळे नुसतच वाचुन कल्पना केलेल्या बर्याच जागा आता तुमच्या लिखानातुन पाहायला मिळतिल :-)
भरपूर फोटो टाका प्लीज :-)
13 Aug 2014 - 7:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो हा तर माझ्या प्रवासवर्णनाचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे निर्धास्त असा :)
14 Aug 2014 - 11:09 am | पैसा
आतापर्यंत फक्त नाव ऐकलेल्या देशात इतकी जुनी बंधकामे आहेत याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद! आणि ती इस्लामी आक्रमकांच्या तडाख्यातून इतपत शिल्लक राहिली आहेत हे विषेषच!
14 Aug 2014 - 4:21 pm | मंदार दिलीप जोशी
फोटो अतिशय छान काढले आहेत :)
15 Aug 2014 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे
पैसा आणि मंदार दिलीप जोशी : अनेक धन्यवाद !
16 Aug 2014 - 12:35 pm | स्पंदना
स्वच्छ दिसतेय जॉर्डन!!
आज पासून वाचायला सुरवात करतेय. तुम्ही व्हा पुढे.
24 Aug 2014 - 10:55 am | प्रभाकर पेठकर
उशीराने आलोय. पण वाचतो आहे.
24 Aug 2014 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay आणि प्रभाकर पेठकर : धन्यवाद !