गंध ...........
आपल्या जीवनात गंध हा अविभाज्य घटक आहे.(फक्त ज्यांना वासच येत नाही त्यांचे माहित नाही.)पण सर्वसाधारणपणे गंधाशी आपले जीवन निगडीत असते.
सुगंधाशी जवळीक आणि दुर्गंधापासून पलायन ही सर्वसामान्यपणे गंधाविषयीची प्रतिक्षिप्त क्रिया.
लहानपणापासून ते आत्तापर्यंत निरनिराळ्या गंधांशी काही आठवणी जोडलेल्या आहेत.काही सुखदायक काही वेदनादायक.
लहानपणी सुट्टीमध्ये गावी जायचो (संसरी, नाशिक) त्याकाळी घरात चुली असायच्या.त्यात जळण म्हणून गोवऱ्या जाळल्या जायच्या.तो धूर घरातील सर्व वस्तूंना प्रेमाने आपल्या कवेत घ्यायचा. दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांनाही तो वास लागलेला असे.तेंव्हा तो जाणवत नसे,पण गावाहून घरी परतल्यावर मात्र कपड्याचा वास तीव्रतेने जाणवत असे. त्या वासाला आम्ही भावंडे 'संसरीचा वास'असे म्हणत असू.
त्या वासातच गावाची आठवण साठवलेली असे.
क्लोरोफॉर्मचा वास म्हणजे 'दवाखान्याचा वास.'
एका जिवलग नातलगाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे शव नेताना लावलेल्या मोगरा अगरबत्ती आणि निलगिरीचा एकत्र झालेला गंध आजही कुठे जाणवला तर मला तो 'मृत्यूचा गंध'च वाटतो.
आमच्या गॅलरीच्या समोर असलेला पिवळा कॅशिया मार्च -एप्रिल मध्ये फुलतो.माझा मुलगा लहान असताना परीक्षेच्या वेळी गॅलरीत अभ्यास करीत असे.त्यावेळी वाऱ्यामुळे फुलांचा गंध दरवळत असे.आता मुलाचे लग्न झाले आहे पण अजूनही तो गंध आला कि तो म्हणतो 'परीक्षेचा वास' आला.
आज आपण आंब्याच्या निरनिराळ्या जाती पाहतो,आस्वाद घेतो,प्रत्येकाचा गंध निराळा.पण पायरी आंब्यासा वास मला थेट आजोळी घेऊन जातो.म्हणून मी त्याला ;अण्णांच्या(आजोबा)आंब्याचा वास' म्हणते.
आमच्याकडे दृष्ट काढण्यासाठी 'ढोणबाबा' नावाचा माणूस बोलावला जायचा.
अग्नीमध्ये जाळलेल्या मीठ मिरची,मोहरीचा वास म्हणजे 'ढोणबाबाचा वास '.
आजही पेरू चिरताना पेरूचा वास आला की लहानपणी फ्रॉकमध्ये ठेऊन चिमणीच्या दातांनी तोडलेल्या पेरूचा वास आठ्वतो आणि मैत्रिणींची आठवण करून देतो.
दिवाळीतील फराळाचा,फटाक्यांचा वास म्हणजे जणू वासांचा महोत्सवच.
कोणाच्या घरी काय पदार्थ तयार झालाय हे सांगणारा 'चुगलखोर वास.
असे कितीतरी गंध .......
कितीतरी वास.....
काय सांगू? किती सांगू?..............
पण तापलेल्या मातीवर प्रथम पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने दरवळलेला, जिवलगाची आठवण करून देणारा 'मादक गंध', त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही.
(कृपया लेखनात गंध आणि वास हे दोन्ही शब्दांचा वापर सहजपणे केलेला आहे.चू.भू द्या.घ्या.)
प्रतिक्रिया
4 Aug 2014 - 9:52 am | खटपट्या
मला आवणारे काही वास !!
नवीन वह्या पुस्तकांचा वास
घरी रंग मारल्यावर येणारा वास.
सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करताना येणारा वास.
मातीचा वास, रातराणीचा वास.
संध्याकाळी धुपारत फिरवताना येणारा वास
कोणत्याही हॉटेल जवळून जाताना येणारा वास,
पेट्रोल चा वास, रॉकेल चा वास.
गवत कापल्यावर येणारा विशिष्ट वास.
4 Aug 2014 - 10:21 am | भिंगरी
नवीन कपड्यांचा वास,
बाळ बाळंतणीचा वास (धुरीचा)
सोळा सोमवारच्या प्रसादाचा वास (हा वास मला आमच्या येथील माळीबुवांची आठवण देतो.ते हे उपवास मोठ्या श्रद्धेने करायचे आणि आम्ही त्यांच्या प्रसादाची वाट पाहायचो.)
4 Aug 2014 - 4:07 pm | आनन्दा
खरच!!
4 Aug 2014 - 4:37 pm | तिमा
कानातल्या कुड्या काढल्यावर सुटणारा ब्युटिरिक अॅसिडचा वास
कचर्याची बादली उघडल्यावर येणारा कुजका वास
सोसायटीचे ड्रेनेज तुंबून बाहेर पसरणार्या पीतरसाचा वास
पावसाळ्यांत कारमधे दरवाजा उघडताक्षणी येणारा कुबट वास
हे वास तर आवडत नाहीच, पण
केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!
11 Aug 2014 - 11:59 am | पिवळा डांबिस
"केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!"
म्हणजे काय?
नाही म्हणजे एखादा वास मोहक किंवा निर्मोहक (मराठीत अनप्लेझन्ट ) असणं हे समजू शकतो. पण 'तिरस्करणीय' वास म्हणजे काय?
खरोखरीच शंका आहे, कॄपया फाट्यावर मारू नये.....
15 Mar 2015 - 11:44 pm | भिंगरी
पिंपाच्या खाली मेलेल्या उंदराचा वास
तो पिंपाखालचा उंदीर मिळेपर्यंत जीव नकोसा झाला होता.
5 Aug 2014 - 2:36 am | अगोचर
नवीन रस्ता करताना बाजुला डांबर जाळतात त्याचा वास, मला शाळेत सहाविच्या सुमारास सायकल नी जायचो त्याची आठवण करून देतो. कडक उन्हाळ्यात भर दुपारी गाडी उघडली असता येणारा वास शालांत परिक्षेची आठवण करुन देतो, त्यावेळी दुपारी बारा-एकला संपायचे पेपर. उपहार गृहांसमोरून सायकल दामटताना येणारे भजी / सामोसे यांचा हवाहवासा वास आणि एसटी मधे लांबच्या प्रवासात (विशेषतः वळणावळणाच्या घाटानंतर) प्रवासाच्या शेवटी शेवटी कोंदाटणारा अणि कधी एकदा बाहेर पडु असे वाटायला लावणारा वासही आठवतो.
आजकाल गाडीत एसी लावुन काचा वर केल्या की असले वास येत नाहीत. लिहिता लिहिता वाटले कि आत्ता लिहिलेले सगळे वास रस्त्याशीच निगडीत आहेत. असो !
5 Aug 2014 - 2:48 am | प्रभाकर पेठकर
अपरीहार्यतेने आवडणारा वास ...... कोर्या नोटांचा.
5 Aug 2014 - 4:50 am | बहुगुणी
छान धागा, बरेच आठवणीत दडलेले गंध (आणि काही नावडते दर्पही!) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार!
काही मजेशीर माहिती खाली देतो आहे, पण त्याआधी थोडंसं गंधामागचं शास्त्र (कंटाळवाणं होणार नाही अशी आशा आहे):
आपल्याला केक, फळं, फुलं, अत्तर, कांदा इत्यादिंपैकी कसलाही वास येतो म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू/ पदार्थाच्या पृष्ठभागावरून सहज विलग होऊ शकणारे रासायनिक कण (volatile molecules) जेंव्हा aerosol (मराठी शब्द?) बनून हवेत उसळतात आणि आपल्या नाकाच्या मागे असणार्या एका छोट्याशा पातळ पापुद्र्यावरच्या असंख्य मज्जा-पेशींवर (olfactory receptor neurons) जाऊन आदळतात. या पेशींच्या पृष्ठभागावर लक्षावधी प्रत्येकी निरनिराळे गंध ओळखणारे गंधग्राहक रेणू (olfactory receptors) असतात. यांद्वारे हजारो निरनिराळे गंध आपलं नाक 'ओळखू' शकतं. यांतला प्रत्येक रेणू एका जनुकापासून encode झालेला असतो. जर एखाद्या गंधग्राहकाचं जनुक कार्यरत नसेल (उदाहरणार्थ कापराचा गंधग्राहक रेणू), तर ते गंधज्ञान त्या व्यक्तींना नसतं. आता शुद्ध स्टील (ज्यापासून कुठलेच volatile molecules निघत नाहीत) अशा पृष्ठभागांना कसलाच वास येत नाही. याउलट फुलं, फळं वगैरेंमध्ये ester प्रकारचे गोडसर रेणू असतात जे आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. (केळातलं आयसोअॅमिल अॅसिटेट एस्टर, किंवा मोसंब्यातलं ऑक्टिल अॅसिटेट एस्टर ही काही उदाहरणं.) Scents तयार करणार्या कंपन्या असे एस्टर्स रासायनिक प्रकियेने तयार करून विकतात.
वरती मृद्गंधाचा उल्लेख आलाय. तो येतो कोरड्या मातीतल्या आणि पाला-पाचोळ्यावरच्या अॅक्टिनोमायसिटिस (Actinomycetes) या बॅक्टेरियांमुळे, पहिली सर पडली की या बॅक्टेरियांचे spores (मराठी शब्द?) हवेत उसळतात आणि आपल्याला एक distinctive, earthy सुवास येतो.
ही झाली थोडीशी 'गंधगाथा'!
आता सुरूवातीला म्हंटलं ती गंमतः आपल्याला कृत्रिम गंधनिर्मिती करता येते हे माणसाला कळलं, पण असा गंध एकाकडून दुसर्याला 'digitally' पाठवता येईल का? इ-मेल द्वारे, किंवा एखाद्या संस्थळाच्या माध्यमातून? कोण जाणे, भविष्यात मिपाच्या संस्थळावर 'स्वगृहा'वर आळं की मिसळपावाचा तर्रीदार गंध, किंवा पेठकर साहेब, सानिकाताई, गणपा, दिपक.कुवेत, स्वातिदिनेश वगैरे बल्लवाचार्यांच्या पाककृती उघडल्या की त्यांचा सुगंध, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल का?
तर या अफलातून संशोधनाची ही किंचितशी झलकः
डिजिसेंट्स ही एक लई भारी आयडिया असलेली कंपनी २००१ साली सुरू तर झाली, पण लवकरच 'झोपली'! का त्याची थोडीशी कारणमीमांसा इथे वाचायला मिळेल. अशीच दुसरी कंपनी होती सेनेक्स, याचीही आंतर्जालावर आता काही माहिती मिळत नाही.
पण हार्वर्ड विद्यापीठात निर्माण होणारं ओ-नोट हे संशोधन मात्र बाजारात येण्याची शक्यता आहे. In fact, त्यांचं ओ-फोन नावाचं आय फोन चं अॅप उपलब्ध झालं आहे. त्यांच्याच ओ-स्नॅप या अॅप द्वारे आता आय-फोन धारकांना एकमेकांना फोटोबरोबर 'गंध' पाठवणं शक्य आहे म्हणे.
लोणी, बाल्सॅमिक व्हिनेगार, आंबट दही, खोबरं अशा एकूण ३२ प्रकारच्या गंधाच्या मिश्रणातून २०००० प्रकारच्या 'नोट्स' तयार होतात, त्यापैकी निवडक तुम्ही तयार करून oNote द्वारा पाठवू शकता. यासाठी आय फोन ब्लूटूथने oPhone Duo नावाच्या smelling station hotspot ला जोडलेला हवा, ज्यातील oChips (एक प्रकारच्या ink cartridge) द्वारे
हा गंध 'छापला' जातो, आणि तुम्हाला त्याची अनुभुती मिळते. (याचं अँड्रॉईड अॅप काही सापडलं नाही, येईलही कदाचित लवकरच.)
मग काय तर, है कोई रसायनशास्त्री लाल जो मिपाके गंधोंको दुनियाभरमें पहुंचा दे?
5 Aug 2014 - 9:30 am | प्रभाकर पेठकर
तान्ह्या बाळाला चण्याचं पीठ लावून आंघोळ घातल्यावर त्याच्या उबदार अंगाला येणारा सुवास फारच निष्पाप वाटतो.
तर, शिकेकाईने न्हायलेल्या पत्नीच्या अंगाचा वास वेगळ्याच भावना जागवतो.
6 Aug 2014 - 9:55 am | भिंगरी
धन्यवाद बहुगुणीजी,
शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल.
तशी थोडीफार माहिती होती पण आपण सविस्तर दिलीत.
पेठकर सर ,
शिकेकाईचा सुगंध अजूनही 'हिरवा' ............
6 Aug 2014 - 10:02 am | सुबोध खरे
गंध या बद्दल काही शास्त्रीय कारण मीमांसा माझ्या लेखात केली होती त्याचा दुवा
http://www.misalpav.com/node/25432
http://www.misalpav.com/node/25466
6 Aug 2014 - 10:31 am | भिंगरी
वा!
खूप माहितीपूर्ण लेख सुबोधजी
नवविवाहितांनी जरूर वाचवा.
8 Aug 2014 - 9:31 am | श्रीवेद
कष्टाच्या घामाचा वास आवडतो.
11 Aug 2014 - 6:36 pm | सूड
उकडीवरचं झाकण काढल्यानंतर येणारा वास, अनंत, चाफ्याच्या फुलांचा वास्...याहूनही आवडणारा 'पार्क अव्हेन्यु अल्टर इगो' डिओचा वास..याच्या तोडीचा दुसरा डिओ अजून मिळालेला नाही. :)