जीवनगाणे

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जे न देखे रवी...
1 Aug 2008 - 8:30 am

रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे
ओबडधोबड अन काटेरी वाटेवरती चालत जाणे
परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही
कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही
ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात
संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत
'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

या स्वप्नांपुढती प्राणांना येई कवड्यांचे मोल
कारण असती स्वप्नपूर्तीचे दोनच क्षणही अनमोल
स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी स्वप्नांसाठीच जगत राहाणे
होई तृप्तीच्या दो श्वासांनी सुरेल माझे जीवनगाणे...

कविता

प्रतिक्रिया

सर्किट's picture

1 Aug 2008 - 11:11 am | सर्किट (not verified)

वा भटांनो !!!

नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात
संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत
'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

क्या बात है ! वा ! संभवलेल्या असंभवाचे ! अशक्य !!!

मस्त !

शेवटच्या कडव्यात "स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी" च्या ऐवजी "स्वप्नांसाठी स्वप्नांमधुनी स्वप्नांनीच जगत राहाणे" हे अधिक छान वाटेल.

येऊ द्या,आणखी !!

- सर्किट

धनंजय's picture

1 Aug 2008 - 5:02 pm | धनंजय

आवडले तुमचे जीवनगाणे.

कुठेकुठे यतिभंग नि छंदहि भंग होतसे, लक्ष असूदे...

घाटावरचे भट's picture

2 Aug 2008 - 10:14 am | घाटावरचे भट

यतिभंग म्हणजे काय? माफी करा हं, पन आमचं याकरन जरा कच्चं है...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

लिखाळ's picture

1 Aug 2008 - 5:10 pm | लिखाळ

मस्तच कविता !

संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत...

कारण असती स्वप्नपूर्तीचे दोनच क्षणही अनमोल...

होई तृप्तीच्या दो श्वासांनी सुरेल माझे जीवनगाणे...

आवडली.

शेवटच्या कडव्यात "स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी" च्या ऐवजी "स्वप्नांसाठी स्वप्नांमधुनी स्वप्नांनीच जगत राहाणे" हे अधिक छान वाटेल.

सर्किट यांच्या या मताची सहमत नाही. भटांना स्वप्नांसाठीच फक्त जगत राहणे (वास्तवात) असे म्हणायचे असावे असे वाटले.
बाकी मला फक्त अर्थ समजतो..वृत्त वगैरे नाही..त्यामुळे सर्किट यांनी जर वैल सूचना वृत्त-छंद डोळ्यासमोर ठेवून केली असेल तर ...

--लिखाळ.

सर्किट's picture

1 Aug 2008 - 11:15 pm | सर्किट (not verified)

सर्किट यांच्या या मताची सहमत नाही. भटांना स्वप्नांसाठीच फक्त जगत राहणे (वास्तवात) असे म्हणायचे असावे असे वाटले.
बाकी मला फक्त अर्थ समजतो..वृत्त वगैरे नाही..त्यामुळे सर्किट यांनी जर वैल सूचना वृत्त-छंद डोळ्यासमोर ठेवून केली असेल तर ..
.

नाही. वरील सूचना शब्दांसाठी केलेली आहे. ही तिहाई पेटीवर छान वाटते, कवितेत नाही.

- (सूचक) सर्किट

घाटावरचे भट's picture

2 Aug 2008 - 6:41 am | घाटावरचे भट

सर्किटराव,

तिहाईबद्दल सांगायचं तर ही कविता मी बर्‍याच काळापूर्वी आमच्या कॉलेजच्या एका नाटकासाठी लिहिली होती (खरं तर ते नाटकच लिहिलं होतं, आय वॉज् द को-ऑथर यु सी :-S)...त्या नाटकात ज्या प्रसंगात ही कविता होती, तिकडे ही तिहाई आमच्या नायकाच्या जोशपूर्ण भाषणात बरी वाटली होती. इथे ती संदर्भ सोडोनि आल्याने विचित्र वाटतीये...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

सर्किट's picture

4 Aug 2008 - 6:10 am | सर्किट (not verified)

कविता, संवाद, आणि बरेच काही,

संदर्भ सोडून आल्यास समजा विचित्र वाटत असतील, तर त्यांची स्टेयिंग पॉवर फारशी नाही, हे समजावे.

असो,

- सर्किट

लिखाळ's picture

2 Aug 2008 - 3:12 pm | लिखाळ

नाही. वरील सूचना शब्दांसाठी केलेली आहे. ही तिहाई पेटीवर छान वाटते, कवितेत नाही.
हा हा.. असे होय !

मनस्वी's picture

1 Aug 2008 - 5:46 pm | मनस्वी

परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

मस्त हो भट काका

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्राजु's picture

1 Aug 2008 - 9:01 pm | प्राजु

अतिशय आशावादी कविता

रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे
ओबडधोबड अन काटेरी वाटेवरती चालत जाणे
परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

खूपच सुंदर...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

1 Aug 2008 - 9:11 pm | चतुरंग

भटराव, अजून येऊदेत!!

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

2 Aug 2008 - 7:43 am | पिवळा डांबिस

संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही
कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही
ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

छान! छान!!
"कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो,
हलाहलाते प्राशून शंकर, देवेश्वर ठरतो....."
याची आठवण झाली....

आणि खुळी स्वप्नेच जग बदलतात, शहाणी स्वप्ने फक्त (माझ्या मते) रिटायरमेंटला नेतात.....

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

यशोधरा's picture

2 Aug 2008 - 10:16 am | यशोधरा

कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही

सुरेख!

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:51 pm | विसोबा खेचर

वा वा!

लै भारी काव्य!

अभिनंदन भटराव, अजूनही येऊ द्यात प्लीज...

तात्या.

मदनबाण's picture

4 Aug 2008 - 11:42 am | मदनबाण

संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही
कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही
ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

हे फार आवडलं

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मनीषा's picture

4 Aug 2008 - 6:19 pm | मनीषा

नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात
संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत
'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे

आवडले... खुप छान कविता आहे