राजमाची उन्हाळी भटकंती: २

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
25 May 2014 - 9:33 am

राजमाची उन्हाळी भटकंती: १

चार वाजले होते आणि गार वाऱ्याने बरे वाटले.इथे डावीकडच्या मनोरंजनच्या पायथ्यात कोणी घर /हॉटेल बांधले आहे.
सरळ पुढे खाली करवंदीच्या जाळ्यांतून पंधरा मिनीटात उधेवाडी या गडावरच्या गावात आलो.

उधेवाडी गावात तशी पन्नासच्या आत घरे आहेत.जानोरे यांच्या हॉटेल शिरिष मध्ये पडवीत बैग टाकली तेव्हा साडेचार वाजले होते.मालकांनी हसून स्वागत केल.ओळखतात."बऱ्याच दिवसांनी आलात?"तसा मी गेल्या दहा वर्षात सहावेळातरी इथे आलोय.लगेच पाणी आणले .चहा घेतला.पावसाळ्यात खूप गर्दी असते.पुण्याकडचे पर्यटक शनिवारी पाचनंतर निघतात आणि {खंडाळा कुणे गाव/लोणावळा वळवंडमार्गे
सोळा किमी चालत}रात्री दहानंतर कधीही पोहोचतात तेव्हाही त्यांच्या स्वागताला जानोरे कुटुंब तयार असते.यांच्या सारखे आणखी चार कुटुंबे सिझनमध्ये व्यवसाय करतात.गावात दुकान नाही.सर्व जीवनावश्यक सामान आणण्याकरीता गावकरी पहाटे चारला गावातून लोणावळ्याला सोळा किमी चालत जातात.पंचवीसेक किलोचा बोजा डोक्यावरून परत नऊपर्यँत घेऊन येतात.एकदा मी कोंडाणेच्या वाटेने वर जात होतो तर पुढे एक जण वीस किलो पीठ डोक्यावरून खालून वर नेत होता.

चहा घेऊन पाचवाजता वरच्या भैरवनाथाच्या देवळाच्या ओसरीवर आलो.आता इकडे चांगली दगडी वाट बांधण्याचे काम चालू होते.स्वच्छताही चांगली ठेवली आहे.

देवळापाशी दहा ते वीस वयोगटातील बरीच मुले दिसली.हा एक पुण्याचा नवचैतन्य नावाचा गट होता.एक तरुण प्रतिक याचे आयोजन करतात.संस्कृति संवर्धन आणि थोडी मौज हा त्यांचा उद्देश आहे.ते एक गणेश उत्सव मिरवणूक ढोल पथकही चालवतात.त्याच्याशी ओळख झाली.

आज उन्हाने फारच घामाघुम होऊन थकल्याने लगेच आराम केला.संध्याकाळी मुले तलावावर जाऊन आली आणि मग त्यांनी चहा केला.मला चहाची आवड आणि ती हौस अशी अचानक पुरी होत होती.

उन्हाळी भटकंतीत मी इकडे दोन्ही किल्यांवर जात नाही.वरच्या पाण्याच्या टाक्या (टाकं) पार रिकाम्या झालेल्या असतात.आणि दृष्य अगोदर येतानांच पाहात आलेलो असतो.थंडीत आलो की वर यायचे.पावसाळ्यात तलावापलीकडचा दरीतला धबधबा पाहायचा.

एकदा का महाशिवरात्र झाली की गाववाल्यांची पाण्याची वणवण सुरू होते.येथे इतका पाऊस पडतो की दोनही गडांवर मिळून असलेली पंधरा एक टाकं तुडुंब भरतात परंतु इथे विहिरींना पाणी लागत नाही. मनोरंजनच्या तळालाही पाच टाकं आहेत.यातलं पाणी पिण्यासाठी असतं.ही रिकामी झाली की वरच्या माथ्यावरील टाक्यांचं पाणी खाली नळाने घेतात. देवळाच्या डावीकडेही दोन प्रचंड टाकी आहेत.

तलावाकडेच्या शंकराच्या देवळातले गोमुखातले पाणी जानेवारीपर्यँत पडत असते.
चहापानानंतर प्रतिकने मुलांचे बौध्दिक घेतले,कामे वाटून दिली.मीपण चार गोष्टी शिकलो.प्रथमच असा अनुभव घेत होतो.काही मुले सातारा,डोंबिवली आणि बेळगावहून आली होती.सुटीची खरी मजा घेत होती.

आठनंतर अंधार पडला आणि काजवे जागे झाले.रानात सगळीकडे काजवे चमकू लागले.थोड्या वेळाने त्यांनी दोन मोठ्या झाडांवर मुकाम ठोकला.आता त्यांचा एक नवीन खेळ सुरू झाला.एक पुंजका पेटायचा आणि असा विझायचा की जणू तो पुंजकाच फिरतो आहे असं वाटायचं.काजवे आहे तिथेच राहायचे पण पेटण्याच्या सुसुत्रतेमधून हे करत होते.हे सतत चालूच राहिले.आकाशातले तारेही दिसू लागले.परंतु आता खंडाळ्याच्या हॉटेल्सच्या दिव्यांचा झगमगाट फार वाढला आहे.पहिल्यासारखा अंधार पडत नाही.इकडे उधेवाडीत अजून वीज आलेली नाही.सोलरचे दिवे आहेत.त्यावर काम भागवतात.खंडाळाची वस्ती दरीच्या समोरच दिसते.चार पाच किमि अंतर असेल.वोडाफोनची आणि आइडिआची रेंज चांगली जोरदार मिळते.

दहा वाजता त्यांचे चुलीवरचे जेवण होईपर्यंत गप्पाटप्पा झाल्या.मग मिणमिणत्या उजेडात जेवण झाले.

रात्री कधी पटकन झोप लागली आणि जाग आली तेव्हा उजाडले होते.दीपमाळेच्या डावीकडच्या झाडीत शामापक्ष्याने नेहमीच्या आडव्या फांदीवर बसून मंजुळ शिट्या वाजवायला सुरुवात केली होती.मागच्या राईत शेंडी बुलबुल साद घालत होते.पिवळ्या बुलबुलांनी झाडांत कल्लोळ केला होता.लाल मोठ्या किड्यांनी वाळक्या जांभळांचा ताबा घेतला होता.पावसाळी पहिले ढग शिखरांशी लगट करत होते.गारवा नसला तरी उकडत नव्हते.
थोड्या वेळाने सगळेच जागे झाले.मला आठ वाजता परत निघायचे होते.आवरेपर्यँत चहा झाला.सर्वाँचा निरोप घेऊन गावात खाली आलो.पोहे करायला सांगितले.हे गाववाले पोहे फार छान करतात.मग आणखी एक चहा घेऊन नऊला गड उतरायला सुरुवात केली.घरची ओढ असली आणि उतार असला तरी पावले सावकाशच पडतात.कड्यावर पोहोचल्यावर एकदा मागे बघितलं.पुन्हा कधी यायचं असा विचार करत होतो तोच समोरच्या घाटातल्या रेल्वेगाडीने भोंगा वाजवला. राजमाची सोडून परतीच्या वाटेला लागलो.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 May 2014 - 9:43 am | प्रचेतस

छान लिहिलंय काका.
फोटो छान आलेत पण अगदी मोजकेच आहेत.

उन्हाळी भटकंतीत मी इकडे दोन्ही किल्यांवर जात नाही

जायला हवेच. निदान श्रीवर्धनाच्या सर्वोच्च टोकावरील ध्वजस्तंभापाशी तरी.
ऐन उन्हाळ्यात तिथे भर्राट थंडगार वारा वाहात असतो. तिथेच बुरुजाच्या डाव्या अंगाच्या खालचे बाजूस दरीपासच्या खडकात खोदलेले थंडगार पाण्याचे टाके आहे. तिथे बारमाही पाणी असते. ते फारसे कुणाला दिसत नाही कारण ते तसे नेहमीच्या वाटेवरचे नाही. श्रीवर्धनावरील चांगल्या पाण्याचा तो एकमेव स्त्रोत. लोणावळ्याच्या दिशेच्या चिलखती बुरुजाच्या जवळ अजून एक चांगल्या पाण्याचे टाके होते पण हल्ली ते बरेच खराब झाले आहे.

कंजूस's picture

3 Sep 2014 - 4:45 pm | कंजूस

१)कोंदिवडे गावाकडे रिक्षातून जाताना दिसणारा राजमाची डोंगर.
1

२)कोंदिवडे गावातले नवीन हॉटेल.
2

३)जांभळांचा सडा.
3

४)रानमेवा करवंदे.
4

५)चिंचेचे झाड.
5

६)ओढ्यातले उंच झाड.
6

७)ओढ्यातली वनदेवता
7

कंजूस's picture

3 Sep 2014 - 4:54 pm | कंजूस

१)वाटेतली झाडी
p

२)राजमाचीच्या जोडकिल्यापैकी पूर्वेकडचे श्रीवर्धन शिखर.
p

३)तोफ.
p

४)पानावरचा किडा
p

५)एक आनंदी गावकरी.
p

६)राजमाची /उधेवाडीतली घरे
p

७)पोहे
p

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 9:45 am | मुक्त विहारि

झक्कास....

डोंबिवलीला आलो, की भेटूच....

दिपक.कुवेत's picture

25 May 2014 - 11:50 am | दिपक.कुवेत

भेटुच. हा हि भाग आवडला. पण फोटो एवढे कमी का?

वल्ली ,धन्यवाद भाग एकत्र केल्याबद्दल .

राजमाची सदाबहार आणि सदाहरित गड आहे तसेच इथे पाणी ,निवारा आणि सरपण भरपूर आहे . मुंबई आणि पुणेकरांना सोईचा आहे .आता तर भुसावळ -पुणे रेल्वे गाडीमुळे नाशिककरही येऊ शकतात . दहा वर्षाँपूर्वी प्रवासखर्च बत्तीस रुपये यायचा आता तब्बल साऽऽठ रुपये लागतात .त्यामुळे 'एक रुपया तिकीट आणि नव्व्याणव रुपयांची पायपीट' या ट्रेकरांच्या उक्तिमध्ये हा गड माफक बसतो .

मुवि आणि दिपक ,तुम्ही आल्यावर कालमानाप्रमाणे योग्य ठिकाणी भेटू /जाऊ .
फोटो आणखी वीस वाढवले आहेत .

पुणेकरांना आजही हा ट्रेक फक्त ३० रूपयांत जाऊन येऊन पडतो. :)
पण राजमाचीच्या सुरेश/राम कडे माफक दरांत भरपेट मावळी जेवण हादडण्याची मजा काही औरच.

आत्मशून्य's picture

25 May 2014 - 3:21 pm | आत्मशून्य

हिरवा सभोवताल बघत हां ट्रेक करणे म्हणजे जन्नत आहे.

शक्यतो मुर्ख लोक नकोत सोबत.

मस्त लेख. लेखन आवडले.
-धन्यवाद

कंजूस's picture

25 May 2014 - 6:01 pm | कंजूस

आता पुण्याकडून (लोणावळा)करायला पाहिजे .चालत नाही गेलो पण एकदा एका गाववल्याने मला उधेवाडी ते कुणे गावाअगोदरच्या वळवण फाट्यापर्यँत एम एटी M 80 वरून डबलसीट वीस मिनीटांत सोडले होते ."कसं आहे माझं डरायविंग ?"दोन तीनदा विचारलं ."छान !" कारण येतांना तो टिबल सिट आला होता सासरा आणि बायकोला माहेरी सोडायला .
मला एकदा दोन काठ्यांवर चालत (मिजोरम सारखे) हा ट्रेक करायचा आहे .दगड धोंड्यांत सोपे पडेल .
आत्मशुन्य ,काही XXलोक छत्री घेऊन आले होते का भिजायला ?

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 7:24 pm | मुक्त विहारि

खूप दिवसांनी हा शब्द वाचला.

एकदा एका इंग्रजाला, "आम्ही भारतीय मोटरसायकलवर "टिबल सीट" जातो" , असे ऐकवून, त्याच्या मेंदूला घाम फोडला होता.

शेवटी एकाने मध्यस्ती केली आणि "टिबल=ट्रिपल", असे त्याला समजावून सांगीतले.

शेवटी काय? तर इंग्रज झाला तरी तो त्याच्या घरचा.त्याची भाषा इथे आली, की आम्ही ती आम्हाला हवी तशी वळवणार.

सुहास झेले's picture

26 May 2014 - 1:34 am | सुहास झेले

मस्त... :)
मी आणि माझ्या मित्राने राजमाची ट्रेक भर पावसाळ्यात केलेला... तो सुद्धा नाईट ट्रेक, कर्जतच्या बाजूने. एकदम थरारक अनुभव. अंधारात वाट चुकलेलो आणि गुडघाभर चिखलात रुतलेलो :)

सौंदाळा's picture

29 May 2014 - 5:51 pm | सौंदाळा

मस्त वर्णन आणि फोटो कंजुससाहेब,
मिझोरमची जोरदार लेखमाला पण होऊन जाऊ दे आता

शेखर बी.'s picture

30 May 2014 - 4:07 pm | शेखर बी.

लेख आवडला..फोटो पण छान आहेत...

अभिप्रायाबद्दल सर्वाँना धन्यवाद .झाडाखाली आंबे खातानाचा फोटो /विडिओ हात चिकट झाल्याने माझा मला काढता आला नाही .गडावरच्या टाक्या ,तटबंदी ,तलावाकाठचे देऊळ यांचेही फोटो यावेळेस काढले नाहीत .ते तुमच्याकडे असतीलच .यावेळी रानमेवा खाणे याकडे जास्ती लक्ष होते .यावेळी नवीन कार्बन के २०प्लस (एक साधाफोन) नेला होता त्याचे विडिओ कमालीचे चांगले आले .या फोनचा लेख टाकला आहेच .लेख वाचून तुमच्या डोंगरसहलीची आठवण झाली याचा आनंद होतो आहे . फोटोंची लिंक चालवून घेतल्याबद्दल आभार .लिहिण्याचा हुरूप आला .

रतनगडाच्याही बद्दल काही लिहायचे आहे (आसनगाव ,मुरशेत आणि धरणातून बोटीने तीन वाटेंनी )परंतु त्यावेळी फोटो काढलेले नव्हते .आता पुन्हा जाऊन फोटो आणेन त्यावेळी लिहिता येईल .