प्रिय........,
आज दुपारी उन्हाने जीव कासावीस झाल्यावर मी भाजलेल्या कैरीचे पन्हे घोटाघोटाने पीत असताना मला मावशीआज्जेची आठवण झाली....मावशीआज्जी....म्हणजे माझ्या वडिलांची सगळ्यात थोरली मावशी.....तू अजून तिला भेटला नाहीस. तिने केलेले पन्हे आजोबांना फार आवडे... तिला बिचारीला त्या वयात अजिबात ऐकू यायचे नाही...आम्ही तिच्याशी पाटीवर लिहून तिच्याशी संवाद करायचो...त्या काळातील टेक्स्ट मेसेजिंगच म्हणना....फ़क्त एकतर्फी....
मी जशी तिला बघितले तशी ती म्हातारीच होती....व आजोबांबरोबर मोठ्ठे आंगण असलेल्या कौलारु घरात रहात असे. लाल चुटुक रंगाची कौले, पिवळ्या रंगाच्या भिंती व हिरव्या रंगाच्या खिडक्या व दरवाजे.....त्या अंगणात पांढर्या व लाल रंगाच्या सोनचाफ्याची झाडे होती....त्याच्या छायेत बागडणार्या खारी, आजीने टाकलेले दाणे वेचणार्या मैना व चिमण्या.....
मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर तिच्या घरी जायचे तेव्हा आजोबा नेहमी अंगणात आरामखुर्चीवर पेपर वाचत पडलेले असायचे व आजी आत स्वयंपाकघरात काहीतरी काम करीत असायची. मी जोपर्यंत आत जाऊन तिला हात लावायचे नाही तोपर्यंत बिचारीला आम्ही आलेलो कळायचेही नाही.........
म्हातारपणीचे तिचे सहजिवन माझे तरुण मन बघत होते. त्या दोघांना एकमेकांशी बोलताना मी पाहिल्याचे मला आठवत नाही व काही दिवसात तिच्याशी पाटीवर लिहून संवाद साधण्याची मलाही सवय झाली....विचारांच्या वेगाने ते विचार कागदावर उतरविण्याचे कसब मला वाटते मला तिच्यामुळेच प्राप्त झाले असावे....मी लिहायचे व तीने वाचून उत्तर द्यायचे.......कधी ती उत्तर देताना कढी करत असे तर कधी भाजी करताना.....मी तिला खाली बसलेली कधीच पाहिले नाही...ना आजोबांशी बोलताना....
जशी जशी आमची ओळख होत गेली तसे समजत गेले......साल १९१५....ती तेरा वर्षाची असताना तिचा विवाह झाला होता...त्यावेळी आजोबांचे वय होते एकोणीस....तेव्हापासून म्हणजे गेले सत्तर वर्षे ते एकमेकांची सोबत करीत आहेत......
"या फिकट साड्या धुण्याची फार कटकट होऊन राहिली आहे बाई......माझ्या बरोबर चल, जरा गडद रंगाच्या साड्या घेऊन येऊ...येतीस का? मी हो म्हटल्यावर दुसरर्या दिवशी आजोबाही यायला तयार झाले. काठीचा आधार घेत ते रिक्शात बसले, मग आजी व मग मी........
आम्ही दुकानात पोहचलो व दुकानदाराने साड्या दाखविण्यास सुरवात केली. आजोबा दूर बसून आमची खरेदी बघत होते.....आजीने तिच्या पसंतीच्या चार गडद रंगाच्या साड्या घेतल्या. तेवढ्यात आजोबांनी मला हाक मारली....हे काय करताएत त्या ? असले भडक रंग ! यांना माहीत नाही का मला असले रंग बिलकूल आवडत नाहीत ! आजीला ऐकू आले नाहीच...... मी तिला जवळ जाऊन आजोबा काय म्हणतात ते सांगितले. आजीने त्या ठेऊन फिकट रंगाच्या साड्या घेतल्या. तिच्या चेहर्यावर कसलीही खंत नव्हती.....त्या साड्या घेऊन आम्ही घरी परतलो.....
माझ्या मनात मात्र खळबळ माजली होती. ती मी पाटीवर लिहिली व आजीसमोर ठेवली. "तुमच्या लग्नाला इतकी वर्षे झाली पण अजूनही तुला तुझ्या आवडीची साडी घेता येत नाही का ? लग्नानंतर असे असते का ?”
तिने सांगितले, "मी या घरात आले तेव्हा लहानच होते. तुझे आजोबा डॉक्टरीचे शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर होते.......दोन वर्षांनी त्यांनाच टि.बी. झाला........सासरच्या माणसांनी अपशकूनी म्हणून माझा छळ आरंभला. याच्या नंतर ही कशी जगू शकते असे प्रश्र्न विचारु लागले. चार चार दिवस उपाशी ठेवत.....कुठल्याही कारणाने मारहाण करणे नित्याचे झाले.....’
"मग ?" मी पाटीवर लिहिले.
"विलायती औषधाने म्हण किंवा देवाची कृपा म्हण, यांचा टि.बी बरा झाला. व हे डॉक्टरही झाले.....ज्या इस्पितळात ते उपचार घेत होते त्यातच त्यांना नोकरीही मिळाली. जेव्हा ते मला घेण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांनी त्यांच्या माणसांना बजावून सांगितले की माझ्या बायकोला तुम्ही इतका त्रास दिला आहे की मी परत तुमचे तोंडही पाहणार नाही. या क्षणापर्यंत आम्ही त्यांचे तोंड पाहिलेले नाही’. ज्या माणसाने माझ्यासाठी घरादाराशी संबंध तोडले त्यांच्यासाठी मी फिकट रंगाच्या साड्या घेऊ शकत नाही का ?” आजीच्या चेहर्यावर आजोबांबद्दल वाटणारा अभिमान डोकवत होता....
सत्तर वर्षे चालत असलेली प्रेमकहाणी माझ्या समोर होती......
प्रिय...........खरे सांगायचे तर जेव्हा आपल्यातील नात्याने मी उबून जाते तेव्हा माझ्या मावशीआज्जेची मला हमखास आठवण येते....व मी शांत होते......पन्ह्याने नाही का उन्हाळ्यात आपल्याला एकदम बरं वाटते तसेच..............
मुळ लेखिका: डॉ. रमा गोलवलकर
भाषांतर : जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
11 May 2014 - 12:12 am | मुक्त विहारि
जयंत कुलकर्णी साहेब, धन्यवाद...
11 May 2014 - 9:37 am | अनुप ढेरे
छान लिहिलय.
11 May 2014 - 10:02 am | किसन शिंदे
अनुवाद आवडला सर, मुळ लेखही फार सुरेख असणार.
11 May 2014 - 10:55 am | पैसा
आवडला!
12 May 2014 - 4:35 am | स्पंदना
हं! अशी साथ देणार्यासाठी रंगच काय पण जन्मही उधार टाकायला तयार होइन मी.
12 May 2014 - 11:15 am | मदनबाण
अनुवाद आवडला. :)
12 May 2014 - 11:54 am | कवितानागेश
छान लिहिलय. :)
12 May 2014 - 7:50 pm | अनन्न्या
कथा पण चांगली आहे.
13 May 2014 - 9:44 am | प्रचेतस
अनुवाद आवडला.
13 May 2014 - 11:16 am | michmadhura
अतिशय आवडली कथा.
13 May 2014 - 2:44 pm | प्यारे१
भावानुवाद आवडला!
13 May 2014 - 7:00 pm | रेवती
गोष्ट आवडली. धन्यवाद.