Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P
आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते. पटकन जमेल तसा मोबाईलमधून फोटो काढला.
वॉलंदाम हे एक बंदर आहे. इथे अनेक शेतकरी व मासेमार स्थायिक झाले आहेत. हे बंदर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक फिशींग बोट्स बघायला मिळतात शिवाय डच लोकांचा पेहरावही बघण्यासारखा असतो. असं म्हणतात तेथील स्थानिक बायका आजही डच पेहराव परिधान करतात. आम्हीसुध्दा डच पेहरावात अनेक फोटो काढले ..ते इथे देत नाहीये ;)
छायाचित्र आंजावरुन साभार*
वॉलंदामला पोहचेपर्यंत साडेबारा वाजून गेले होते. हवामानही थंड शिवाय थोडे ढगाळ होते.
वाटेत अॅमस्टेल बियर मिळणारे दुकान कम कॅफे लागले. अॅमस्टेल बियरला अॅमस्टेल नदीवरुन नाव देण्यात आले.
वॉलंदामला येताच समोर दिसते ती सुंदर मार्केनमिअर नदी. एकीकडे सगळे कॅफे, दुकानं आणि दुसर्या बाजूला सगळ्या बोटी. दुरवर दिसणार्या पवनचक्क्या आणि मार्केन बेट.
मेरी ऑफ वॉटर चा पुतळा
मार्केन बेटावर जायला आम्ही लगेच फेरी पकडली.
फेरीने जसे वॉलंदाम सोडले तसे ते आणखीनचं सुंदर दिसु लागले.
आत्ताशी वारा ही जोरात वाहू लागला होता, वातावरण ही गार होऊ लागले. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर मार्केन बेट दिसू लागले.
मार्केन बेट हे द्विपकल्प आहे. इकडची लाकडी, पारंपारिक डच घरं प्रसिद्ध आहेत , लाकडी बुट (क्लॉग्ज) ह्यांचा कारखाना आहे. आम्ही तो मागे डेल्फ्ट्ला बघीतला होता म्हणून ह्यावेळेस नाही पाहिला.
नदीकिनारी वसलेले हे गाव खुपच सुंदर होतं, थोडीबहूत भटकंती केली , ह्या बेटाची आठवण म्हणून १-२ वस्तूंची खरेदी केली. हवामान गार म्हणून थंडीही वाजू लागली. वॉलंदामला जायला फेरी पकडायची होती , थोडा वेळ होता म्हणून गरमा-गरम कॉफी व हॉट चॉक्लेटचा अस्वाद घेतला. जरा तरतरी आली .
जाताना फेरीतून काढलेले काही छायाचित्र.
वॉलंदामला पोहोचताच आम्ही सरळ चीझ फॅक्टरी गाठली. सर्वत्र वेग-वेगळ्या चवीचे, आकारचे चीझ बघून तोंपासू :)
येथे चीझ कसे बनवतात त्याची एक डेमो टुर झाली. थोडक्यात माहिती देते.
दुधाला ३० डिग्री सें तापमानावर तापवतात. त्याचे दही बनण्यासाठी त्यात लॅक्टीक अॅसिड किंवा Rennet त्यात मिसळतात. ते घातल्यानंतर काहीवेळात दुध घट्ट/ सेट (खरवसासारखे) होतं. नंतर त्या दुधाला अनेक पाती असलेल्या रोटेटींग नाईफने बारीक तुकडे / चॉप करतात. व्हे (पनीर तयार केल्यानंतर जे हिरवट्/पिवळट पाणी दिसतं ते) काढून टाकतात. उरलेल्या दह्याला गोल डब्यात दाबून भरतात व वरुन दाब देणार्या मशीन खाली २-३ तास ठेवतात. त्यानंतर डब्यातल्या चीझला काढून मिठाच्या पाण्यात चोवीस तास मुरत ठेवतात. त्यावर वॅक्स कोटींग करुन मॅच्युअर होण्यासाठी ठेवतात. एका महिन्याने हे चीझ खाण्यासाठी तयार होतं.
थोडे चीझ टेस्टिंग झाले आणी मग आम्ही चीझची शॉपींग करुन झांसेस कांसला निघालो.
नेदरलँड्सच्या लोकांचे सायकलप्रेम :)
झांसेस कांसला पोहचेपर्यंत बराच उशीर झाला होता त्यामुळे एक पवनचक्की जी आतून बघता येते ती बंद झाली होती. फार जळजळ झाली नाही, आमच्या युकेत चालू अवस्थेतील एका पवनचक्कीला गेल्या वर्षी भेट देण्यात आली होती. असो तर इथली चालू अवस्थेतील पवनचक्कीमध्ये पिठं, मसाले दळणे, अशी बरीच कामं केली जातात. ह्या पवनचक्क्या १५७४ साली बांधल्या गेला आहेत. पटापट फोटो काढले, संध्याकाळ ही होऊ लागली होती.
एकंदरीत नेदरलँड्सची ट्रिप मस्तं झाली होती, फ्रेश वाटत होत. ट्युलिप्सचा अनुभव अविस्मरणीय, सुखद होता. मन प्रफुल्लित झाले होते, ते टवटवीत, सुंदर गालिचे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघीतले, ज्यांचा आनंद मला उपभोगता आला ह्याचे समाधान होते, हा अनुभव मी आयुष्यभर जपून ठेवीन :)
समाप्त
प्रतिक्रिया
25 Apr 2014 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा
आहाहाहाहाहाहाहाहा... काय ती घरं... बोटी... पवनचक्की..!
क्या क्या हो रहा है दिल के अंदर!!! पता न चले.. पता न चले..!
मै तो निकला..बाबा..!![http://www.sherv.net/cm/emoticons/vehicles/hot-air-balloon-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/vehicles/hot-air-balloon-smiley-emoticon.gif)
25 Apr 2014 - 4:35 pm | पिलीयन रायडर
apratima foTo.. to khambaavara basalelaa pakshi tar mastach!!
ithe maraathi kaa type karata yet nahiye?!
25 Apr 2014 - 4:40 pm | शुचि
"आल्या आल्या आल्या पावसाच्या धारा" च्या चालीवर वाचावे -
आला आला आला, सानिकाचा धागा
रंगरूपाची मुक्त उधळण लुटा ..... उधळण लुटा!!! :) :)
25 Apr 2014 - 4:52 pm | अजया
सुंदर फोटो आणि झकास वृत्तांत .
आता चीज च्या पा कृ ची वाट बघावी काय ?!!
25 Apr 2014 - 5:03 pm | कवितानागेश
काय सुंदर फोटो आलेत. मस्तय जागा.
25 Apr 2014 - 5:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त झालेली आहे सफर ! वर्णन आणि फोटो सुंदर आहेत हेकासांहका * ?
* हे काय सांगायला हवेच का
25 Apr 2014 - 5:29 pm | त्रिवेणी
अतिशय सुंदर
25 Apr 2014 - 5:45 pm | प्यारे१
पाकृ छानच! (अ र्र र्र... )
भटकंतीचा धागाय नाही का? सानिकातैचं अतिक्रमण खरंच चांगलंय.
एक नंबर फोटो आणि वर्णन!
सौंदर्यदृष्टी आणि कॅमेरा दोन्ही उत्तम असल्यानं पाकृ असो अथवा स्थळ, फोटो भारीच येतात ह्या काकूंचे.
25 Apr 2014 - 6:05 pm | रेवती
ही भटकंतीही सुरेख झालीये. टुमदार गाव, पवनचक्की, सायकली सगळं आवडलं.
25 Apr 2014 - 6:19 pm | आदूबाळ
सानिकातै
स्त्रूपवाफल नावाची खास डच बिस्किटं खाल्ली का? (तसंच पांचट अॅम्स्टेलपेक्षा ग्रॉल्श्च नावाची डच बीयर जास्त टेष्टी असते हे नम्र मत!)
25 Apr 2014 - 6:32 pm | सूड
सहीच!!
25 Apr 2014 - 6:40 pm | निनाद मुक्काम प...
मस्त झाला हा प्रवास
उन्हाळ्यात सायकलिंग हा युरोपियन लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
25 Apr 2014 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन.
८ मे ला जातो आहे. त्यावेळी पुन्हा हा लेख वाचून माझे वेळापत्रक ठरवेन. धन्यवाद.
25 Apr 2014 - 10:55 pm | मैत्र
नेदरलँड्सच्या वास्तव्यात इतक नितांत सुंदर जागा हुकल्याची रुखरुख वाटते आहे..
कधी परत या देशात जाण्याचा योग आला तर इथे नक्की जावं असं तुमच्या फोटो आणि रसाळ वर्णनामुळे ठाम मत झालं आहे.
अवांतरः
डच भाषेत v चा उच्चार f कडे झुकणारा असतो. म्हणजे जर्मन v आणि इंग्लिश v च्या काहीसा मध्ये...
26 Apr 2014 - 4:15 am | खटपट्या
सर्व फोटो छान !!!
26 Apr 2014 - 1:19 pm | खेडूत
सुंदर!
पहिला फोटू एकदम भारी. असा प्रकार अजून एकदा चेपु वर पाहिला होता- बहुधा द. अमेरिकेतला, पण हे दुर्मिळ असणार!
बाकी 'खरा' युरोप वाटतो तो इकडेच. चीझ च्या पाकृ वर एक छान माहितीपट पाहिला होता. मिळाला तर इथे पेस्टवतो .
26 Apr 2014 - 3:50 pm | आरोही
फोटो खरेच खूप सुरेख........ ..आवडले
26 Apr 2014 - 7:49 pm | Prajakta२१
खूप सुंदर :-)
26 Apr 2014 - 8:14 pm | सुधीर कांदळकर
रनवे पूल पाहून खरेच नवल वाटले. फेरीतून वालंदाम सुरेख.
धन्यवाद.
27 Apr 2014 - 1:54 pm | आयुर्हित
नेहमीप्रमाणे चांगले फोटो व महत्त्वाची माहिती मिळाली.
धन्यवाद.
आपल्या पहिल्या फोटोवरून लक्षात आलेले अॅमस्टरडॅम एअरपोर्ट शिफोल चे अप्रतिम विडीओ शुटींग:
https://www.youtube.com/watch?v=9sE4xXiWa90
27 Apr 2014 - 5:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
आमस्टsदाम् च्या स्कीफॉल (स्झीफॉल) विमानतळ ही सुद्धा मोकळा वेळ काढून बघायची जागा आहे ! ८० च्या दशकात जगातला सर्वात मोठा ड्युटी फ्री मॉल येथेच होता. आता त्या विशेषणाचे अनेक दावेदार झाले असले तरी स्कीफॉल आपले मोहक रस्टीक-मॉडर्न रूप राखून आहे. शिवाय विमानतळाच्या इमारतीत एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाण्याकरता जे व्यवस्थापन केलेले आहे ते इतरांनी उचलण्याजोगे आहे.
ही स्कीफॉलची छोटी झलक...
.
.
.
.
आणि तेथील हे मला फार आवडलेले आकर्षण :) ...
.
विमानाच्या जेट आणि लँडिंग गियर्स जवळ गेल्याशिवाय हे काय प्रचंड प्रकरण आहे हे ध्यानात येत नाही :)
(जेटचा स्वतंत्र फोटो नसल्याने वरचा जेटचा फोटो टाकला आहे. क्षमस्व. मात्र त्या मधे कडमडणार्या माणसामुळे जेटच्या आकारमानाची कल्पना येण्यास जरूर उपयोग होईल ;) )
.
27 Apr 2014 - 7:52 pm | प्यारे१
>>> त्या मधे कडमडणार्या माणसामुळे
असू दे हो, 'बरा' आहे तो माणूस! ;)
27 Apr 2014 - 9:49 pm | सानिकास्वप्निल
मस्तं फोटो एक्का काका :)
27 Apr 2014 - 4:00 pm | दिपक.कुवेत
आवडले. स्गळेच फोटो सुरेख आलेत.
27 Apr 2014 - 6:16 pm | दिपक.कुवेत
मजा आलि फोटो पाहुन
27 Apr 2014 - 6:39 pm | Anvita
मस्त फोटो आणि वर्णन !
27 Apr 2014 - 8:03 pm | स्वप्नांची राणी
सानिका, त्या केशरी छपराच्या हिरव्या घरावर अगदि मधोमध तुझं नाव आलय...घेउन टाकलस कि काय ते घर..? नसेल तर घेउनच टाक कशी..!!
27 Apr 2014 - 8:11 pm | arunjoshi123
वाव्व!!
28 Apr 2014 - 1:40 am | मधुरा देशपांडे
सुरेख फोटो
28 Apr 2014 - 6:29 pm | सानिकास्वप्निल
सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार :)
1 May 2014 - 7:29 pm | पैसा
सगळं वर्णन आणि फोटो मस्तच!