ज्ञानेश्वरी

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
17 Mar 2014 - 9:57 am

आज सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियमला भेट देण्याचा योग आला. पाश्चात्य शैलीच्या इमारतीत तामिळनाडूमधला नंदी, जपानी अमूर्त चित्रे, अफगाण गांधारशैलीतील ग्रीक शिल्पे, चीनी दुर्मिळ कपबश्या सारंकाही एका छताखाली मांडलेले. प्रकाशयोजना उत्कृष्ट आणि माहिती देणारी सुंदर. त्यामुळे तसं आवडीने सगळं पहात होतो. त्यातच एकदम मला काही मराठी अक्षरं दिसली आणि अगदी माहेरचं माणूस भेटल्याचा आनंद मला झाला.

Dnyneshwari

ही ज्ञानेश्वरीची सुमारे १७६३ सालची प्रत, म्हणजे जवळजवळ पानिपत युद्धाला समकालीन. ही नागपूरमध्ये बनवलेली प्रत. जलरंग आणि शाई वापरून त्यातलं रंगकाम केलेलं आहे. सोनेरी रंग हा अस्सल सोने वापरून दिलेला आहे. वर इंद्र छत्र आणि सिंहासनावर आणि खाली शंकर-पार्वती कैलासावर विराजमान.

कलाअनुभव

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

17 Mar 2014 - 10:01 am | अत्रन्गि पाउस

रंजक माहिती
आणि मी पैला

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Mar 2014 - 10:12 am | भ ट क्या खे ड वा ला

अजून विस्तृत लिहा, काहीतरी असेलच पाहण्यासारखे /लिहिण्यासारखे

आयुर्हित's picture

17 Mar 2014 - 11:00 am | आयुर्हित

चेतना वरुन पसायदान आठवले.

आता विश्वात्मके देवे| येणे वाग्यज्ञे तोषावें|
तोषोनी मज द्यावे| पसायदान हे।|

जे खळांची व्यंकटी सांडो| तयां सत्कर्मी रती वाढो|
भूतां परस्परे जडों| मैत्र जीवांचे।|

दुरितांचे तिमीर जाओ| विश्वस्वधर्मसूर्ये पाहो|
जो जे वांछिल तो ते लाहो| प्राणिजात।|

वर्षत सकळ्मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी|
अनवरत भूमंडळी| भेटतु भूतां।|

चला कल्पतरूंचे आरव| चेतना चिंतामणीचे गाव|
बोलते जे अर्णव| पीयुषाचे।|

चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन|
ते सर्वांही सदा सज्जन| सोयरे होतु।|

किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होवोनी तिन्ही लोकी|
भजि जो आदिपुरुषी| अखंडित।|

आणि ग्रंथोपजीविये| विशेषीं लोकी इये|
दृष्टादृष्टविजयें| होआवें जी।|

येथ म्हणे श्री ज्ञानेश्वराओ| आ होईल दान पसाओ|
येणे वरें ज्ञानदेओ| सुखिया जाला।|

पैसा's picture

21 Mar 2014 - 7:35 pm | पैसा

मस्तच! आतापर्यंत कुराणाच्या अशा सुशोभित प्रती असल्याचं वाचलं होतं. ही प्रत खरंच अमूल्य आहे. तिच्यातला मजकूर आणि आताचा पाठ यात काही फरक आहेत का याबद्दल कुठे माहिती मिळू शकते का?

विकास's picture

21 Mar 2014 - 7:40 pm | विकास

अमूल्य आहे! अजून माहिती देता आली तर द्या. आतली पाने दिसू शकली का? का फक्त मुखपृष्ठच?

विवेकपटाईत's picture

21 Mar 2014 - 9:51 pm | विवेकपटाईत

माहितीपूर्वक लेख आणखीन माहिती मिळाल्यास उत्तम.

मुक्त विहारि's picture

21 Mar 2014 - 10:02 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

मनो's picture

22 Mar 2014 - 2:29 am | मनो

सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियममध्ये फक्त एक पान फ्रेम करून लावले आहे. तिथे बाकी पाने नाहीत. ते पान Virginia Institute of fine arts, Richmond यांच्याकडून आले आहे असे तिथे लिहिले आहे.

त्यांच्या स्वतःच्या साईटवर अजून एक पानाचा फोटो आहे. हाही फोटो अगदी सुंदर, पहावा असा आहे.

एकूण ६२८ पाने दोन भागात त्यांच्याकडे आहेत.

http://www.vmfa.museum/Collections/South_Asian_Art/Indian_P_91_9_1-628_M...

त्यांना ज्ञानेश्वरी Adolph D. and Wilkins C. Williams Fund, Glasgow यांच्याकडून मिळाली. आयर्लंडमध्ये इतरही काही मराठी ऐतिहासिक कागद आहेत, उदाहरणार्थ चेस्टर-बेट्टी. त्यावरून असे अनुमान करता येईल की ही प्रत कदाचित नागपूर दरबारातल्या इंग्रज वकिलाने नवलाईची चीज म्हणून बनवून घेतली असावी आणि आपल्याबरोबर आयर्लंडमध्ये नेली असावी. कदाचित असेहि असेल की १८१८ मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांचा पराभव केला त्या वेळी जी लूट झाली त्या वेळी ती कुणा इंग्रजाच्या हाती लागून परदेशात पोहोचली असावी. ती अस्सल प्रत पाहून थोडी अजून माहिती मिळेल (जसे जी प्रत कुणी लिहिली, कुणाच्या आज्ञेवरून इत्यादी).

Virginia भेटीचा योग आला तर अजून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. Richmond मध्ये कोणी मिपाकर असतील तर त्यांनी शोध करून पहावा.

पैसा's picture

22 Mar 2014 - 8:46 am | पैसा

माहितीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे!