यु.एस. ला आल्यानंतर दर ११ महिन्यानी कंपनी (नवऱ्याची) एकदा भारतात जाण्यास परवानगी देते. तशीच आम्हालाही मिळाली. आणि त्यातून नणंदेचे लग्न ठरले आणि मी आत्याही झाले. भावाला मुलगा झाला. म्हणून आम्ही तिच्या लग्नाला आणि भाच्याच्या बारशाला पोहोचू अशा दृष्टीने बेत ठरवले. दिर-जाऊ कॅनडातून निघणार आणि आम्ही न्युअर्क वरून. पण काही कारणाने नवऱ्याला आमच्यासोबत यायला जमणार नव्हते. तो नंतर ८-१० दिवसांनी निघणार होता. मुंबईवरून पुढे पुण्याला एकत्र जाता यावे या हिशोबाने दिराचे विमान ज्यावेळेत मुंबईत पोहोचणार होते साधारण त्याच वेळेत आमचे (मी आणि माझा लेक) विमान पोहोचेल आशीच वेळ पाहून एअर इंडियाचे बुंकिंग केले होते. दिर-जाऊ रात्री ११.०० ला पोहोचणार होते तर आम्ही रात्री ११.३० ला. म्हणजे वेळ तशी योग्यच होती. टिकीट कंफर्म झाल्याचे समजल्यावर माझे शॉपिंग सुरू झाले. कोणासाठी काय काय न्यायचे... नणंदेसाठी काय घ्यायचे..छोट्या भाच्यासाठी काय घ्यायचे..? चॉकलेटस, परफ्यूम्स, शांपू, कॉस्मेटिक्स.. भरपूर खरेदी झाली. बॅगा बरून त्याचं वजनही करून झालं. हार्टफोर्डवरून न्युअर्क पर्यंत जाण्यासाठी C.T. लिमो चं बुकिंग ही करून झालं. २३ फेब्रु. रात्री ९.३० ला फ्लाइट होतं. चेक इन साठी ६.०० ला पोहोचणं आवश्यक होतं. त्या हिशोबाने दुपरी १२.३० च्या सि.टी. लिमो चं बुकिंग केलं. नवरा आम्हाला एअरपोर्टला सोडून रात्री न्यूयॉर्क ला मित्राकडे जाणार होता. सग्गळं सग्गळं कसं अगदी मनासारखं जमलं होतं. पण........
ठरवल्याप्रमाणं अगदी सगळं तसंच झालं तर ते प्लॅनिंग कसलं? माशी अगदी जोरात शिंकली. कुठून माझ्या दिराला बुद्धी झाली आणि त्याने एअर इंडियाच्या साईटवर आमच्या तिकीटांचे PNR टाकून पाहिले. त्याला २३ फेब्रु. वारीच्या फ्लाईटला आमच्या नावने बुकींग दिसेना. त्याचा कॅनडाहून मला फोन आला. झा.... लं! मी नवरा ऑफिसमधून आल्या आल्या त्याला ही गुडन्यूज(???) दिली. त्याने ताबडतोब एअर इंडियाच्या टोल फ्री नंबर वर फोन करून माहीती मिळवली.. ती अशी .. २३ फेब्रु. चे रात्री ९.३० चे विमान ४ तास उशिरा म्हणजे २४ फेब्रु. च्या मध्यरात्री १.०० am ला होते. म्हणजे आमचा मुंबईत साधारण एकाचवेळी पोहोचण्याचा प्लॅन बोंबलला..! ४ तास फ्लाईट लेट! हरी हरी...! पण एक गोष्ट बरी होती फाईट थेट होते पॅरीसला बदलायचे नव्हते. २ तास थांबून तेच फ्लाईट मुंबईला जाणार होते. परत नवऱ्याने दुपारी १२.३० च्या सि.टी. लिमोचे बुकींग कॅन्सल करून ते दुपारी ३.३० चे केले. आता माझ्या दिर-जावेला झक मारत ४ तास मुंबईच्या विमानतळावर आमच्यासाठी थांबावे लागणार होते कारण पुण्याला जाण्यासाठी के.के. ट्रॅव्हल्सचे बुकींगही झाले होते. यालाच म्हणतात... कुठे जाशी भोगा.. तर तुझ्याच पुढे उभा! ४ तास उशिरा का होईना पण बुकिंग आहे एवढीच मनाची समजूत घालून आम्ही रात्री झोपलो.
२३ फेब्रु. ची सकाळ अतिशय प्रसन्न वाटत होती. अचानक मला आमच्या घराबाहेर पसरलेला बर्फाचा पांढराशुभ्र थर कापसाच्या गालिच्या सारखा भासू लागला. कडाक्याच्या त्या बर्फाळलेल्या थंडीत कोकीळेच्या कूजनाचे आवाजही ऐकू यायला लागले. समोर दिसणाऱ्या धुक्याच्या पडद्यापलिकडेच मुंबई आहे असे नाना प्रकारचे भास होऊ लागले. सगळी जय्यत तयारी झाली. मला मानसकन्या मानणारे एक पंजाबी काका-काकू मला हार्टफोर्ड च्या युनियन स्टेशनपर्यंत सोडायला आले कारण नवरा ऑफिसमधून परस्परच येणार होता( जळ्ळलं मेलं त्याचं ते ऑफिस..!) एका वेगळ्याच उत्साहाने भरलेला चेहरा घेऊन आम्ही युनियन स्टेशनला पोहोचलो. ते पंजाबी काका-काकू परत आले. आता त्या युनियन स्टेशनवर, ३.३० ला येणाऱ्या लिमोची वाट पाहत मी, नवरा आणि मुलगा मस्तपैकी ४.४५ पर्यंत थांबलो. म्हणजे यु.एस. मध्येही असं होतं तर! शेवटी ४.४५ ला ती आली एकदाची आणि आम्ही बसलो. साधारण ७.४५ पर्यंत त्या न्युअर्कच्या विमानतळावर पोहोचले.
प्लाईट ४ तास उशिरा असल्याने एअर इंडियाने प्रवास्यांना फूड कुपन्स दिली होती. तेवढाच तुमचा राग कमी व्हावा.. ही भावना असावी त्यामागची. बॅगेज चेक-इन करून आम्ही फूड-कोर्टला जाऊन so called जेवण केलं. ९.३० ला रात्री मी आणि लेक सिक्युरिटी चेक साठी निघालो. नवरा न्युयॉर्कला मित्राकडे गेला. इथे विमानतळावर एक मात्र आहे.. एअर इंडियाचा सगळे कर्मचारी वर्ग गुजराती आहे. त्यामुळे कायम चेहरे हसतमुख आणि बोलण्यात मार्दव. सिक्युरिटी चेक चे सगळे वाकडे तिकडे सोपस्कार आटोपून आम्ही प्रतीक्षालयात येऊन बसलो. आजूबाजूला सगळेच देसी दिसत होते. प्रतीक्षालय मोठ्ठं असल्याने लेकाला हुंदडायला भरपूर वाव होता.
मला येऊन साधारण दिड तास झाला असेल-नसेल तोवर तिथे अतिशय वृद्ध असं गुजराती जोडपं आलं. ते आजोबा ८० च्या आसपास असतील आणि आजीही ७५च्या असतील. आजोबा व्हिल-चेअर वर होते. ते जवळ जवळ बेशुद्धच असावेत असे सकृत दर्शनी भासत होते. त्यांना पार्किन्सन आहे असे नंतर समजले. आजीही तशा थकलेल्याच होत्या फक्त आजोबांची आणि स्वतःची जमेल तशी काळजी घेत होत्या इतकेच.
विमानात बसायला ३० मिनिटे असताना म्हणजे रात्री १२.३० ला.. आजीनी कसलीशी औषधाची गोळी आजोबांच्या तोंडात घातली आणि पाणी पाजलं. झा... लं! ते आजोबा लागले जोरजोरात खोकायला आणि त्याबरोबरच ओकायलाही. आजी त्यांची छाती चोळू लागल्या. कर्मचारी वर्गातली लोकं लगेचंच तिथे आली. ते आजोबा थोडे शांत झाले. पण एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी "आम्ही तुम्हाला या विमानाने पाठवू शकत नाही" असे त्या आजींना सांगितले... अर्थातच गुजरातीमध्ये! यांची तब्बेत ठिक नाही. प्रवासात काही बरं-वाईट झालं तर जिथे असू त्या देशांत आम्हांला इमर्जन्सी लँडींग करावे लागेल. याचा त्रास बाकीच्या प्रवाश्यांना होईल. आम्ही रिस्क घेऊ शकत नाही." अशी भूमिका एअर इंडियाने घेतली. आधीचं ४ तास उशिर.. त्यात हे असं! अरे देवा! त्या आजीनी डॉक्टरांचे सर्टिफिकेट दाखवले... न्युजर्सित राहणाऱ्या मुलाला फोन लावला आणि त्या अधिकाऱ्यांशी बोलायला सांगितले. शेवटी ज्या डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिले त्यांनाही फोन लावला आणि मग त्यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांना बोर्डिंग करू दिले. मात्र, इतके म्हातारे दोघं.... असं कसं दोघांनाच पाठवलं, मुलांनी बरोबर यायचं नाही का? .. अशी चर्चा इतर प्रवाश्यांमध्ये सुरू झाली आणि थांबलीही लगेच. कारण बोर्डींग सुरू झालं होतं. मी ही विमानात आमची सीट शोधून जाऊन बसले. सगळी दिव्यं (हो.. दिव्यचं म्हणावं लागेल.) पार करून लेक माहेरी निघाली अखेर.
सीटवर बसल्या बसल्या खांद्यावर बसलेल्या माझ्या पिल्लूला मी बाजूच्या सीटवर झोपवले, त्याचे सीटबेल्टस बांधले. स्वतःचे बांधले आणि ताबडतोब हात जोडून त्या जगंनियंत्याला प्रार्थना केली.."बाबारे! त्या आजोबांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचू दे." आता मला वेध लागले फक्त भारतात पोहचण्याचे. वर्षभरात काय काय नवीन गोष्टी घडल्या असतील भारतात, मुंबईत, पुण्यात....! अजून टेक ऑफ नव्हतं झालं तरीही मला भारताच्या हवेचा सुगंध जाणवू लागला. परत कोकीळेचं कूजन ऐकू (विमानात??) येऊ लागलं. आजूबाजूला देसी लोकं, देसी भाषा आणि मस्त फुलाफुलांच्या हिरव्या साड्यांमध्ये वावरणाऱ्या हवाई(भारतीय) सुंदरी पाहूनही असेल कदाचित... पण कोकीळा गाऊ लागली हे नक्की!
विमान रन-वे कडे जाऊ लागलं. ताबडतोब मी कानांत घालण्यासाठी कापसाचे बोळे मागून घेतले. काय करणार हवेच्या दाबाने आमचे कानही दाबले जातात आणि त्याचा परिणाम मात्र डोक्याला भोगावा लागतो.. कारण ते बधिर होतं. अर्थातच हा जुना रोग आहे. विमानाने रन-वे घेतला, वेग वाढला, आणखी वाढला, खूप वाढला आणि........ टेक ऑफ! नकळत तोंडातून उद्गार निघाले.."आहह्हा... सहह्ही!" कारण टेक ऑफ करताना असंख्य दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघालेलं न्युयॉर्क शहर... ! दिव्यांच्या माळेमध्ये गुंफलेले ते अनेक पूल, रस्ते, उंच उंच इमारती...... मी खिडकीतून नुसती पाहतच राहिले. जमेल तितकं ते विहंगम दृष्य, तो लक्षलक्ष दिपांचा नजारा डोळ्यांत साठवून घेऊ लागले. उंचावर जाईपर्यंत मी जमेल तितकी मान वाकडी/तिरकी करून ते देखणं शहर मनामध्ये ठसवू लागले. शेवटी अगदीच काही दिसेना तेव्हा मग नाईलाजाने नीट बसले. मन अतिशय उल्हासीत होतं.
लगेचच हवाई सुंदरींनी कोक, ज्युस आणि डिनर सर्व्ह केलं. खूप झोप येत होती. पण झोपलं तरी दर अर्ध्या तासाला जागही येत होती. ८-९ तास प्रवास करून आम्ही पॅरिसला पोहोचलो. इथे मला आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे, आजपर्यंत मी केलेल्या विमान प्रवासांमध्ये उत्तम लँडींग आणि टेक ऑफ आनुभवलं ते एअर इंडियाचं. टेक ऑफ करताना जमिनीपासून चाक कधी अलग झालं ते कळत नाही आणि लँडिंग करताना रन-वेला चाक कधी टेकलं हे ही कळत नाही. पॅरिसला स्थानिक वेळेनुसार दुपारी २.३० ला पोहोचलो. विमानातून उतरायचे नव्हते. कर्मचारी वर्ग बदलला गेला. माझा छोटा आता जागा झाला होता. उठल्या उठल्या,"इंडियात पोहोचलो का?" असाच प्रश्न त्याने टाकला. स्थानिक वेळेनुसार ४.३० ला आम्ही मुंबईसाठी परत टेक-ऑफ..! हिवाळ्याचे दिवस असल्याने साधारण पुढे दिड तासाने अंधारून आल्या सारखं दिसू लागलं. छोट्याने प्रश्न टाकला, " आता तर सकाळ झाली होती.. परत लगेच कशी रात्र झाली?" त्याच्या बालबुद्धीला न झेपणारा प्रश्न होता, त्याचं उत्तरही तसंच होतं. अर्थातच, ते त्याला सांगण्याच्या भानगडीत मी पडले नाही. जसजसं विमान भारताच्या जवळ येऊ लागलं.... कोकीळा जोरजोरात गाऊ लागली. मध्येच एक-दोनदा उठून मी ते गुजराती आजोबा ठिक असल्याची खात्री करून घेतली. समोर स्क्रीनवर आपण भारतापासून किती दूर आहोत, जिथे आहोत, तिथली स्थानिक वेळ.. सगळं नीट कळत होतं. भारतात पोहोचायला ३० मिनिटे अवकाश.. ही अनाऊन्समेंट ऐकली आणि मी हुरळून गेले. माझा देश.. माझी भूमी.. जिला मी वर्षापूर्वी सोदून गेले होते... माझं पुण्यातलं घर.. माझे आई-बाबा, भाऊ-वहिनी, भाचा, सासू-सासरे ! हा अर्धातास जास्तिच लांबल्या सारखा वाटंत होता. मी खिडकीतून खाली पाहत होते. आणि हळू हळू अंधुक दिसणारे तारे मोठे होऊ लागले... जवळ आल्यासारखे भासू लागले. अरे!!!!! हे तारे नव्हेत.... ये तो है अपनी मुंबई..! साठवून ठेवलेलं ते चित्र परत मनः पटलावर उमटू लागलं. कित्त्तीतरी दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघालेली, वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळीसारखी दिसणारी आपली मुंबई.. ही तर न्युयॉर्कपेक्षाही देखणी दिसत होती. हिऱ्यामोत्यांच्या- माणकांच्या दागिन्यांनी सजलेल्या नववधूसारखी. हे सौंदर्य त्या न्युयॉर्कपेक्षाही काकणभर अधिक होतं. कारण इथल्या हवेला माझ्या मातीचा सुगंध होता. मी नुसती बघतचं राहिले. डोळे भरून आलेले कळलंही नाही मला. विमानानं लँडिंग केलं.... मध्यरात्रीचे ३.३० झाले होते. खोल श्वास घेऊन मी ही हवा उरात भरून घेतली. विमानतून बाहेर पडून त्या जमिनीवर पहिलं पाऊल टाकताना आपोआपच उजवा पाय पुढे आला(संस्कारांचा परिणाम). इमिग्रेशन, कस्टम ..सगळं क्लिअर करून बॅगेज ताब्यात घेऊन मी बाहेर आले. माझ्या आकाशाचं पहिलं दर्शन मी माझ्या भूमीवरून घेतलं. एक अनामिक उर्जा संचारली होती धमन्यांमध्ये.
बाहेर दिर-जाऊ बिचारे ४ तास वाट पाहून दमले होते. मला आणि लेकाला पाहून त्यांचा थकवा पळून गेला. छोटा तर लगेचंच काकाला बिलगला. पुढचा १ महिना आता खूप मजा, मायेची माणसं... बस्स! आता पुण्यापर्यंत आम्ही के.के. च्या ५०० रुपयांत विमान प्रवास घडवणाऱ्या बसमधून जाणार होतो. कुठे??? अर्थातच.. माझ्या घरी!
- प्राजु.
अवांतर : मुंबई-पुणे सनातन वादात मी पुण्याची बाजू मांडली होती. इथे मुंबईचे वर्णन ऐकून समस्त मुंबईकरांनी गैरसमज करून घेऊ नये. न्युयॉर्क - मुंबई तुलनेत मुंबई बद्दलच प्रेम वाटणार.. हे ही गृहीत धरावे.
प्रतिक्रिया
5 Nov 2007 - 10:32 am | बेसनलाडू
रोचक अनुभवकथन आहे. मागच्या डिसेंबरात भारतात येतेसमयी कोकीळकूजन वगैरे काही जाणवले नव्हते; मात्र मुंबई विमानतळावर विमानाची चाके लागून जाग आली, आणि खिडकीतून बाहेर पाहिले असता दोन कावळे उडताना दिसले; शेजारच्या धावपट्टीवर काही पोरे पतंग उडवताना, काटाकुटी लावताना दिसली. तेव्हा आपण खरोखरच मुंबईत पोचलो आहोत, यावर विश्वास ठेवला(च!)
(मुंबईकर)बेसनलाडू
7 Nov 2007 - 12:59 am | विसोबा खेचर
बेसनलाडू म्हणतो त्याप्रमाणे साधे सोपे परंतु चांगले अनुभवकथन..
मनोगत या थोरामोठ्यांच्या संकेतस्थळाच्या बरोबरीने हाच लेख आमच्या क्षुल्लक मिसळपाववरही प्रकाशित केल्याबद्दल आपले आभार...!
तात्या.
7 Nov 2007 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुभव कथन झकास झाले आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
7 Nov 2007 - 9:23 pm | प्राजु
बेसनलाडू, तात्या, दिलीपजी धन्यवाद आपल्या प्रतिसादांबद्दल.
- प्राजु.
15 Dec 2014 - 3:58 am | उडन खटोला
+१००
15 Dec 2014 - 5:42 am | रमेश आठवले
बरेच वेळा आंतरराष्ट्रीय प्रवास घडला आहे. प्रत्येक प्रवासात काहीतरी अनपेक्षित पण वेगळा अनुभव येतो. ऐर इंडिया म्हणजे तर दिव्यच. पण जर सरकारच्या च्या वतीने परदेशी जायचे असले तर ऐर इंडिया ला पर्याय नसतो . त्यांच्या अनेक अनुभवापैकी एक साङ्गतो.
* हैदराबाद-मुंबई- प्यारीस-नेवार्क-प्यारीस-मुंबई-हैदराबाद असे तिकीट होते . जाताना हैदराबाद मध्ये emigration वगैरे सगळे सोपस्कार झाले. परत ऐर इंडिया ने प्यारिस ला पोहोचलो. तेथून पुढील प्रवासासाठी आम्हाला ऐर फ्रांस च्या विमानाने पाठवले. ह्या विमानाला हैदराबाद पर्यंत जाण्याची परवानगी नसल्याने ते मुंबईतच थाम्बले. ऐर इंडिया च्या अधिकार्यांशी या बद्दल बोलायला गेलो तर आमच्याशी चर्चा करत बसलात तर पुढचे हैदेराबाद चे ऐर इंडिया चे विमान चुकेल कारण तुम्हाला immigration चे सोपस्कार आता इथेच उरकावे लागणार आहेत असे त्यांनी सांगितले. ते उरकून दुसर्या terminal ला दोन ब्यागा उचलून, लिफ्ट चालू नसल्याने, दोन जिने चढून वेळेवर पोहोचावे लागले .
15 Dec 2014 - 12:35 pm | कविता१९७८
छान लेखन, छान अनुभव