"ती, सपरा कडची माझी." - बहिरा बापू एका फांदी कडे बोट दाखवत म्हणाला.
"हा, अन ती आमच्या घरावरची हाय का, ती माझी"- शिरपा आबा एका फांदीला दाखवत म्हणाला.
"पण , आबा ती तर लैच बारीक है, निट न्हाय जळायचा तू?"- बापूने (माझे आजोबा) आबाला विचारलं.
"आबा तरी कुठं लय जाड है तवा"- काकू (माझी आजी) आबाच्या काटकुळ्या शरीरावर टोमणा मारीत म्हणाली.
हे सगळे आमच्या घराच्या ओसरीवर बसून समोरच्या लींबाच्या फांद्यांची आपसात वाटप करून घ्यायचे.
दर उरुसाला हे असेच जमायचे अन त्यांच्या इतक्याच जुन्या असलेल्या त्या लिंबाकडे बघत ह्या असल्या गप्पा रंगवायचे.
आधी नुसताच लिंब, नंतर त्याला पार बांधला, त्याच्याच सावलीखाली चावडी बांधली, चावडीत सगळी वस्ती जमायची.
फांदीचा एक एक मालक काळाच्या पडद्या आड गेला.
सर्वात शेवटी आमची आजी गेली. गेल्या उरुसाला ओसरी रिकामीच राहिली .
उरुसाच्या काळात वादळ आलं अन कधीही न पडो असा तो लिंब मुळापासून उन्मळून पडल्याचं,
गावावरून आलेल्या दादाने सांगितलं.
तेव्हांपासून बाल्कनीतल्या गुलाब, जाई-जुई सगळ्यांना रोज ओंजारायला गोंजारायला लागलो.
कोण कसा लळा लावेल सांगता येत नाही.
प्रतिक्रिया
8 Mar 2014 - 4:50 pm | स्पंदना
भावना पोहोचल्या.
8 Mar 2014 - 5:18 pm | कवितानागेश
ह्म्म... छान लिहिलय.
8 Mar 2014 - 5:36 pm | शैलेन्द्र
पहिल्या पॅराने मस्त पकड घेतलेली, थोडक्यात आवरलं तुम्ही...
8 Mar 2014 - 11:12 pm | साळसकर
छान
आणखी लिहा, पुलेशु :)