ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते. म्हणजे ते स्वप्नातले दुरून आल्यासारखे वाटणारे सारे कर्णकर्कश्श स्वर अगदी सामोरूनच येत होते तर. अचानक मला बाईकवर फिरताना वा रस्त्याने चालतानाही कानात हेडफोन लावणारी आजची युवा पिढी गुणी बाळ वाटू लागली. आधीच या अंड्याला ईंग्रजी संगीतातला ओ कि ठो कळत नाही, आणि इथे तर ठो ठो करत वाजवली जाणारी वाद्ये कानठळ्या बसवत होती. रेहमानसाहेबांच्या अपवादात्मकच अश्या न आवडलेल्या ‘रॉकस्टार’ या रणबीरपटाची आठवण झाली. त्या संगीतातले शब्द तरी किमान ओळखीचे असल्याने त्यातच काही तरल भावना शोधायचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र ते ही शक्य नव्हते.
काय करावे, काय करावे, या फर्स्टक्लासमधल्या माणसांना पटकन हटकताही येत नाही. सेकंडक्लासच्या डब्यात परप्रांतीयांचे ‘तुम तो ठहरे परदेशी’ ऐकण्यापासून वाचावे म्हणून फर्स्टक्लासच्या तिकिटावर खर्चा करावा तर इथेही परदेशी संगीत पिच्छा सोडत नाही. संगीत असावे तर आपल्या भाषेतले, आपल्या मातीतले.. ओढ लावतीss अशी जीवाला, गावाकडची माती.. साद घालतीss पुन्हा नव्याने, ती रक्तांची नाती.. मल्हारवारी आठवले तसे मी देखील स्वताचा मोबाईल काढून ते गाणे शोधायला घेतले. पण चाळताना लक्षात आले की ते घरच्या कॉम्प्युटरवरच पडून आहे. मोबाईलमध्ये कधी असे ऐकायला घेतलेच नाही. पण चाळता चाळता आणखी एका मराठी गाण्यावर नजर पडली आणि कामावर जाईलाss, उशीर व्हाईलाss, बघतोय रिक्षावाला ग्ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला.. स्सॉल्लिड, हे पण आपले एक फेवरीट ! कानावर पडले की बस उठून नाचावेसे वाटावं. पण आता सकाळच्या टाईमाला हे ऐकावे की न ऐकावे याचा विचार करता करताच एक क्लृप्ती सुचली अन चेहराच खुलला. आता काट्याने काटा निघणार होता. लावलेच ते गाणे फुल्ल वोल्युम करून. पाठोपाठ कोंबडी पळाली तयार होतेच, पण त्याची वेळ आलीच नाही. तिथवर पोहोचायच्या आधीच समोरून येणारे आवाज लोप पावले. तसे मी बॅगेतला हेडफोन काढून कानाला लावला आणि आतल्या आत गपचूप गाणे बंद करून शांत झोपी गेलो.
- अंड्या
प्रतिक्रिया
5 Mar 2014 - 9:10 pm | जेपी
लवकर रिक्षा पकडा , बैला आहे साक्षीला .
शुभरात्री
5 Mar 2014 - 10:43 pm | पाषाणभेद
"लवकर पकडा रिक्षेला, बैला आहे साक्षीला"
भिंतीवर लिहा आता सरकारीछाप.
5 Mar 2014 - 9:10 pm | किसन शिंदे
हम्म.
5 Mar 2014 - 10:30 pm | मुक्त विहारि
अंड्या अज्जून अंड्यातूनच बाहेर नाही आला.
सरळ त्या लॅपटॉप्वाल्याशी मराठीतून कायदा सांगायचा की.
ही अशीच अंड्या सारखी माणसे देशाची वाट लावतात.
5 Mar 2014 - 10:58 pm | साळसकर
कायदा ?
ट्रेनमधून ज्वलनशील पदार्थ नेऊ नये सारखा कायदा आहे का गाणीबजावणी करण्याला न करण्याला ?
अवांतर - माहित असता अन सांगायचे ठरवले असते तर मराठीतच सांगितले असते एवढे नक्की :)
5 Mar 2014 - 11:10 pm | मुक्त विहारि
तुम्ही हेड फोन लावूनच गाणी ऐकू शकता.
हवे असेल तर कुठल्याही स्टेशन मास्तरला विचारा.
मी जाम नडतो, अशा माणसांशी.फक्त नडतांना मराठी भाषाच वापरायची आणि भांडायच्या तयारीनेच जायचे.
5 Mar 2014 - 11:22 pm | साळसकर
ओके, हे नव्हते माहीत.
पण असा कायदा असला तरी तो कागदावर किती आहे आणि लोक याबाबत जागरूक किती असतात हा देखील यात एक पैलू असतो.
मी कित्येक मुर्खांना ट्रेनच्या दारात सिगारेटी फुंकतानाही पाहिलेय, पण तेव्हा मात्र न चुकता हटकलेय, पण तेव्हाही स्वर भांडणाचा नसून कोणी पाहिले तर बाराच्या भावात फाईन लागेल असे सांगून त्याचा हितचिंतक बनतच घाबरवतो. ज्या ३-४ वेळा असे केलेय त्या प्रत्येक वेळी त्या त्या व्यक्तीने लागलीच एक शेवटचा लांबलचक झुरका मारून तुरंत सिगारेट टाकली आहे म्हणून पुढे काही प्रकरण वाढलेच नाही.
6 Mar 2014 - 11:12 pm | मुक्त विहारि
आजच परत एकदा थोडी चौकशी केली.....
सार्वजनिक ठिकाणी स्पीकर फोन लावून मोबाइलवर कार्यक्रम ऐकण्याला बंदी आहे....
तेंव्हा बिंधास्त नडा.....
फक्त जरा त्या आत्म्याला शून्यात न ठेवता, त्याला जरा पुरुषात आणा.
6 Mar 2014 - 11:36 pm | आत्मशून्य
आजुअबाजुला सपोर्टर असतील तर नडा अन्यथा फुकटचे अपमानीत व्हाल. विसरु नका तुम्ही पुरुषच आहात परमेश्वर नाही, म्हणुन शेवटी शुन्यच बरे, उगा आत्म्याला पुरुषात वगैरे न्यायच्या फंदात पडु नका. कायद्याने तो गुन्हाही असेल.
6 Mar 2014 - 12:01 am | धन्या
अंड्या लय हुशार हाय बगा.
6 Mar 2014 - 9:19 am | साळसकर
कोई शक ;)
6 Mar 2014 - 9:21 am | स्पा
चान चान निबंध
6 Mar 2014 - 9:29 am | साळसकर
चान चान बोले तो ?
6 Mar 2014 - 12:00 pm | सुहास झेले
बरं मग?
हुच्चभ्रू ;-)
बाकी चालू द्यात....मिपा आहे घरचं
6 Mar 2014 - 2:26 pm | साळसकर
हुच्चभ्रू बोले तो ?
6 Mar 2014 - 12:15 pm | पैसा
काट्याने काटा काढला!
6 Mar 2014 - 12:34 pm | आत्मशून्य
मी अन मित्र दोघच. थेटर बरच रिकामे तरी आंमच्या समोरच 6 जणांचा कम्पू येउन बसला. बरे येउन बसला तो बसला त्यांना शांत कुठे बसवतय चित्रपट पचनी पडत नसल्याने त्यांची कुरकुर अजुन वाढली. ते 6 आम्ही 2 दुसरीकडे बसा म्हटले तरी आम्हालाच त्रास व्हायचा.
शेवटी वैतागून मी मित्रा ला म्हटले चल टाइमपास करुया. आम्ही दोघांनी उगाचच मोबाइल कानाला लावले अन फोन वर दोन वेगळ्या व्यक्तिशी बोलत असल्या प्रमाणे अतिशय भसाड्या आवाजात गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला कम्पुला लक्षात येइना इतक्या शांततेत दोन नग इतक्या जॉरात आशा पराकोटिच्याअसंबध्द गप्पा कसे मारू शकतात... काय बोलत आहोत त्यानां पत्ता लागेना. माना वळवल्या तर लक्षात आले आम्ही फोनवर बोलतोय, एकमेकांशि नाही हे बघून चुळबुळ सुरु ते स्वत: आपापसात गप्पा मारत असल्याने आम्हाला शांत बसा सांगता येइना.
शेवटी ते उठून दूसरी कड़े निघाले तेंव्हा मित्राने फोनवर डोय लोग मारला , जिनके घर शिशेके होते है वो दूसरोंपे पत्तर नहीं फेका करते..... ज्याला मी सुधा फोन वर दुसर्याशिच बोलत असल्याप्रमाने उत्तर दिल हम वो आदमी है जो शिशेसे पथ्तर तोडना जानते है :)
आमच्या कडे खाऊ का गिळु नजरेने बघत कम्पू दुसरीकडे लांब जाऊं बसला
6 Mar 2014 - 2:25 pm | साळसकर
मस्तच !
हे खोटे फोनकॉलचे माझे वा आमचेही किस्से आहेत बरेच, त्यामागची कारणे विविध
6 Mar 2014 - 9:09 pm | मुक्त विहारि
मी आणि माझा एक मिपाकर मित्र लोकलने प्रवास करत होतो.
एकाने मोबाईल स्पीकर ऑन करून गाणी ऐकायला सुरुवात केली.त्याला योग्य त्या भाषेत मोबाईल बंद करायला लावला.
नडला त्याला फोडलाच
पळपुटेपणा आम्हाला मंजूर नाही.
6 Mar 2014 - 9:50 pm | आत्मशून्य
6 Mar 2014 - 10:05 pm | मुक्त विहारि
तुम्हाला नाही कळायचे ते....
तेंव्हा सोडूनच द्या.....
6 Mar 2014 - 10:57 pm | आत्मशून्य
मला वाटतय तुम्हाला मुलभुत प्रश्न जो जनतेला पुन्हा पुन्हा सतावतो जे त्रासाचे बिज आहे तो अजुन लक्षात आलेला नाही. आपला त्रास अख्या जगाचा त्रास आहे अशी बतावणी/त्रागा ओबामा सुधा करतो व कमकुवत राश्ट्रांवर हल्ला करुन नडल अकी फोडलाची टिमकी मिरवतो. पण ना तो मुलभुत प्रश्न संपवु शकतो ना त्यांचे सहकारी शांततेत नांदतात. थोडक्यात कायदा आणी जमाव सोबत असुन फायदा होतोच असे नाही. (हेच खरे तर तुम्हाला कधी कळणार नाही पण मला अशांनाच समजावायला जास्त आवडते म्हणून मी ही प्रयत्न सोडणार नाही) कारण जगात तुमच्या निरीक्षणाच्या नेमके अगदी विरुध्द म्हणजे ५% चांगले ९५% कमी चांगले ते अतिशय वाइट या प्रकारचे लोक अस्तित्वात आहेत.
आता कल्पना करा त्या डब्यात तुम्ही व एक मिपाकर आहे आणी एकाने जोरात मोबाइल लावला. त्या एका सोबत ६-७ जणांचा ग्रुप आहे जे सुधा ते गाणे ऐकण्यात जबर्दस्त रस आहे आणी डब्यात एकुण ११ लोकच आहेत तर तुम्ही काय उपाय योजुन स्पिकर बंद करायला लावु शकता ? याचे उपयोगी उत्तर खरोखर सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.
6 Mar 2014 - 11:03 pm | मुक्त विहारि
धन्यवाद....
6 Mar 2014 - 11:27 pm | आत्मशून्य
6 Mar 2014 - 11:31 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
6 Mar 2014 - 9:39 pm | आसिफ
एशियाड मधुन प्रवास करताना मस्त झोप लागलेली, मागे बसलेल्याने १० स्पिकर वाल्या चायना मोबाईल वर ९० च्या दशकातील रटाळ रिमिक्स गाणी वाजवणे सुरु केले.
मी: भावा मोबाईल कितीचा रे ?
तो: (खुश होऊन) २५०० चा
मी: मग त्याला १० रु.चा हेड्फोन लावुन गप एकटा ऐक की, गावाला का तरास द्यायलाइस ?
लगेचच गाणी बंद होउन मोबाईल खिशात..
6 Mar 2014 - 9:46 pm | मुक्त विहारि
झक्कास
6 Mar 2014 - 10:48 pm | साळसकर
राव तो चायना मोबायील म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा असतो. असल्या "खणखणीत" आवाजात वाजतो की स्वताच्या स्पीकरलाही फाडतो..