तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते. ह्या शास्त्रालाच उत्पादनाचा वापर करणाऱ्याच्या 'सुलभ अनुभवाची रचना' (User Experience Design) किवा 'मानव-तंत्रज्ञान-सुसंवाद' (Human Computer Interaction) किंवा वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवून केलेली रचना (User Centered Design) म्हणतात. आधुनिक जगातील प्रत्येक उत्पादन किंवा सेवा ह्यांच्या उपयुक्ततेसाठी आणि गुणवत्तेसाठी हे शास्त्र अत्यंत आवश्यक ठरले आहे.
आज जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपैकी ३४% लोक इंटरनेट वापरतात, इंटरनेटवर ६० कोटींपेक्षा जास्त संकेतस्थळं उपलब्ध आहेत, दरवर्षी ५ कोटी नवीन संकेतस्थळं तयार होतात, जगातील २ अब्जपेक्षा जास्त लोक ईमेल सुविधा वापरतात, दररोज गूगल सर्चद्वारे १८१ देशातील लोक १४६ भाषा वापरून एकूण १ अब्ज प्रश्नांची उत्तरे शोधतात. जगातील ८७% लोक मोबाईल फोन वापरतात (भारतात, लोकसंख्येच्या ७०% लोक मोबाईल फोन वापरतात), साधारणतः २ अब्ज संगणक नियमितपणे वापरले जातात, अब्जावधी लोक आणि शेकडो कंपन्या लाखो कार्यप्रणाली (Software) वापरतात, जगभर साधारणतः 22 लाख एटीएम मशिन्स वापरल्या जातात… ही आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने/सेवा किती प्रचंड प्रमाणात वापरल्या जातात. अशी उत्पादने/सेवा केवळ आखीव-रेखीव-सुंदर असून चालत नाहीत तर त्या उपयोगशील (Usable) सुद्धा असाव्या लागतात, त्यामागे एक उपयुक्त कल्पना किंवा विचार असावा लागतो. शिवाय जागतिक बाजारपेठेत असणाऱ्या गळेकापू, वेगवान स्पर्धेत टिकून यशस्वी व्हायचे असेल तर उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच उपयुक्तता आणि आकर्षकपणा हादेखील महत्त्वाचा ठरत आहे.
User Experience Design प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायची झाल्यास असं म्हणता येईल की, लोकांना (किंवा संभाव्य वापरकर्त्यांना) उत्पादनाकडून किंवा सेवेकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या सध्याच्या अडचणी काय आहेत? त्यांची आवड-नावड काय आहे? त्यांच्या गरजा काय आहेत? त्यांच्या मर्यादा काय आहेत? त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या संधी आहेत? अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन केला जातो. ह्या माहितीच्या आधारे उत्पादनाची संकल्पना तयार केली जाते. ही संकल्पना पुन्हा लोकांना दाखवली जाते. आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन उत्पादनाची अंतिम रचना-अभिकल्पना तयार केली जाते. ह्याचं अगदी आपल्याशी संबंधित उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण जे मोबाईल फोन वापरतो ते फोन तयार करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या संभाव्य वापरकर्त्यांचा परिपूर्ण अभ्यास करतात आणि मगच फोनचे नवीन मॉडेल तयार करतात. आणखी एक उदाहरण म्हणजे पूर्वी याहू किवा रेडीफ ईमेल सुविधा वापरणारे बहुतांश लोक आता गुगलची जीमेल ही ईमेल प्रणाली वापरतात कारण जीमेल खूप उपयुक्त, सोयीचे आणि आकर्षक दिसणारे संकेतस्थळ वाटते, ह्याचं श्रेय गूगल कंपनीच्या उपयोगशीलता-तज्ञांना, रचनाकारांना आणि युजर इंटरफेस डिजाईनर ह्यांना जातं. गूगलने लोकांच्या आवडी-निवडीचा अभ्यास करूनच अशी यशस्वी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. हीच प्रक्रिया कमी-जास्त प्रमाणात जगातील प्रसिद्ध संकेतस्थळे, कंपन्या, सॉफ्टवेअर-हार्डवेअर कंपन्या, बँका, इन्शुरन्स कंपन्या वापरतात. जेवढे उत्पादन उपयुक्त, वेगवान आणि आकर्षक तेवढा कंपनीचा नफा जास्त या सूत्रामुळे आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात प्रत्येक कंपनीला या क्षेत्रातील लोकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उत्पादन किवा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना या विषयातील तज्ञ माणसे लागतात. लोकांचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रातील तज्ञ लागतात, उपयोगशीलता तपासणारे उपयोगशीलता-विश्लेषक (Usability Analyst), लोकांना सोयीचे असे उत्पादन तयार करण्यासाठी उत्पादन- अभिकल्पकार (Product Designer) लागतात, युजर इंटरफेसचा आराखडा आणि संकल्पना तयार करण्यासाठी रचनाकार (User Experience Designer), ग्राफिक डिजाईनर, विज्युअल डिजाईनर लागतात. तयार केलेले डिजाईन तांत्रिकदृष्ट्या अमलात आणण्यासाठी प्रोग्रामर, डेव्हलपर लागतात.
तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील संवाद कसा उपयुक्त होईल ह्याविषयीचे संशोधन दुसऱ्या महायुद्धापासून चालू होते पण डोनाल्ड नॉर्मन ह्यांनी १९९३च्या सुमारास User Experience Design ही संकल्पना पहिल्यांदाच ठाशीवपणे मांडली. त्यामुळे तंत्रज्ञानाची निर्मिती करताना वापरकर्त्याचा(User) विचार केला पाहिजे ही भावना प्रबळ झाली. त्यावेळेस डोनाल्ड नॉर्मन हे अॅपल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत काम करत होते. खरंतर 'सॉफ्टवेअर' ही संकल्पना उदयाला येण्याआधी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने सरळसोट, कमी गुंतागुंतीची असत. त्यामुळे उत्पादनाच्या डिजाईन बरोबरच उपयुक्तता-तंत्रज्ञान सुसंवाद याचा फार तीव्रतेने विचार केला गेला नव्हता. पण सॉफ्टवेअर ही संकल्पना उदयाला आली आणि त्याबरोबरीनेच गुंतागुंतीची उत्पादने निर्माण होऊ लागली. त्यातूनच ही गुंतागुंतीची उत्पादने लोकांना सोपी, सोयीची आणि आकर्षक कशी होतील याचा विचार झाला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्यप्रणाली (Software) ही संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली. १९६८ आणि १९६९ ह्या वर्षांमध्ये कार्यप्रणाली (Software) या विषयाला वाहिलेल्या दोन परिषदा आयोजित करण्यात आल्या आणि त्याबरोबरच सॉफ्टवेअर तंत्रज्ञान अधिकृत उद्योग म्हणून उदयाला आला. पुढील काळात आयबीएम, अॅपल, मायक्रोसॉफ्ट या सारख्या संगणक निर्मिती करणाऱ्या कंपन्या उदयाला आल्या आणि उद्योग जगाला तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनाची उपयुक्त आणि आकर्षक रचना (Design) करणारया अभिकल्पकारांची (Designer) गरज भासू लागली. त्या काळात अमेरिकेतील कॅलीफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅली परिसरात अनेक झपाटलेले तरुण नवनवीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि निर्मिती करण्यासाठी धडपडत होते. पुढे १९९०च्या दशकात महाजाल (Internet) आणि संकेतस्थळ (Website) ह्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला. त्याकाळी वेबसाईटचे डिजाईन करण्यासाठी ग्राफिक डिजाईनर नेमले जात परंतु वेबसाईटच्या संभाव्य वापरकर्त्याचा किंवा वेबसाईटच्या उपयोगशीलतेचा फारसा विचार केला जात नसे. त्यामुळे वेबसाईटचे डिजाईन करणारे ग्राफिक डिजाईनर महत्त्वाचे की वेबसाईटला उपयुक्त बनवणारे उपयोगशीलता-तज्ञ महत्त्वाचे असा गमतीशीर वाद निर्माण झाला. पुढे २०००च्या दशकाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये डिजाईन आणि उपयोगशीलता दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत असा विचार पुढे आला आणि हा वाद संपुष्टात आला. पुढे मोबाईल फोन, टॅब्लेट यांच्या उत्पादनवाढीनंतर ह्या शास्त्राची गरज आणखी व्यापक होत गेली.
हे शास्त्र जरी पाश्चात्य देशात उदयाला आले असले तरी आज ह्या विषयाची जाणीव, प्रयोग आणि काम आपल्या देशातसुद्धा होत आहे. भारतातील उत्पादन कंपन्या आपल्या संभाव्य वापरकर्त्यांचा अभ्यास करून प्रोडक्ट डिजाईन करत आहेत. माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवा किंवा उत्पादन पुरवणाऱ्या प्रत्येक कंपनीमध्ये या विषयातील तज्ञ माणसे लागतात. पाश्चिमात्य उद्योगांना या क्षेत्राचं महत्त्व माहिती असल्यामुळे आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ लोकांची गरज असल्यामुळे आज भारतीय अभिकल्पकारांना (Designers) खूप मोठी मागणी आणि संधी आहे. गेल्या तीन-चार दशकांपासून माहिती-तंत्रज्ञान उद्योग भारतात वाढत आहे. अमेरिका-युरोप येथील बँका, तंत्रज्ञान कंपन्या, टेलिकॉम कंपन्या, आरोग्य-इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्या, विमान-उद्योग कंपन्या कुशल मनुष्यबळाअभावी आणि कमी खर्चात काम करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर-निर्मितीचे काम भारतात देतात. ही सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवा उपयुक्त आणि आकर्षक असणे हीसुद्धा स्पर्धेची एक मोठी गरज आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हे काम करणारे स्वतंत्र विभाग निर्माण झाले. या विभागांमध्ये उपयोगशीलता तपासणारे उपयोगशीलता-विश्लेषक (Usability Analyst), लोकांना सोयीचे असे उत्पादन तयार करण्यासाठी प्रॉडक्ट डिजाईनर, ग्राफिकल युजर इंटरफेसची संकल्पना तयार करण्यासाठी रचनाकार (User Experience Designer), ग्राफिक डिजाईनर, विज्युअल डिजाईनर यांची मोठी गरज निर्माण झाली. त्यामुळे भारतातील कल्पक, कुशल तरुण मुलांना या क्षेत्रात खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतातील आयआयटी, एनआयडी, सिम्बिओसिस यासारख्या प्रख्यात शैक्षणिक संस्थांमध्ये या विषयाचे दर्जेदार शिक्षणसुद्धा उपलब्ध आहे.
User Experience Design हे क्षेत्र केवळ पाश्चात्य उद्योग किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांपुरते मर्यादित न राहता सामान्य भारतीय लोकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना उपयोगी पडेल असे मुलभूत संशोधनसुद्धा ह्या विषयात होत आहे. आयआयटी, सी-डॅक ह्या सारख्या संस्थांमध्ये अनेक संशोधन-प्रकल्प चालतात. आज ई-गवर्नन्स ही संकल्पना अनेक देशात प्रभावीपणे रुजू पाहते आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, शहरे, गावे आणि खेड्यातील ग्रामपंचायत तंत्रज्ञानाने जोडली जाऊन त्याचा चांगल्या प्रशासनासाठी उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अशा ई-गवर्नन्स व्यवस्थेत तंत्रज्ञान, डिजाईन लोकांना उपयुक्त आणि अनुरूप असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तिथेही हे क्षेत्र खूप उपयोगी पडणार आहे. आज माहिती तंत्रज्ञान भारतातल्या प्रत्येक क्षेत्रात, शहरापासून खेड्यांपर्यंत पोहोचत आहे. बँका, सरकारी कचेऱ्या, रेल्वे-यंत्रणा, पोस्ट, मोठी दुकाने, शाळा, महाविद्याले संगणकीकृत होत आहेत. तंत्रज्ञान सर्वदूर पोचत आहे. हे सारे तंत्रज्ञान लोकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि सोयीचे असणे खूप महत्वाचे झाले आहे. ते लोकांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची उपयुक्त रचना (Usable Design) खूप आवश्यक बनली आहे.
तंत्रज्ञान दिवसेंदिवस आधुनिक होत असतानाच त्याची रचना, डिजाईन लोकांसाठी सोपी, उपयुक्त असावे यासाठी देखील संशोधन चालू आहे. User Experience Design या विषयावर जगभर दरवर्षी शेकडो परिषदा आयोजित करण्यात येतात. विविध देशातील संशोधक, गणिततज्ञ, डिजाईनर, प्रोग्रामर एकत्र येऊन विविध प्रयोगांवरील प्रबंध सादर करतात. त्यातून सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आयआयटीमधील संशोधन-प्रकल्पांवर काम करताना भारत, नेदरलॅंड आणि अमेरिकेतील काही परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. पुण्यात भरलेल्या एका परिषदेत अमेरिकेत असणारे एक भारतीय प्राध्यापक आले होते. त्यांनी अंध, अपंग व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना उपयोगी पडतील अशी लिहिण्या-वाचण्याची विविध उपकरणे निर्माण केली होती. इंग्लंडमधील एका संशोधकाने, वापरकर्त्याचा अभ्यास न केल्यामुळे कसे गोंधळ उडतात याचे उदाहरण देताना विमानातील सॉफ्टवेअरच्या स्क्रीनचे डिजाईन उपयुक्त नसल्यामुळे एकदा विमान धावपट्टी ओलांडून नागरी वसा हतीत कसे घुसले याचे गमतीशीर उदाहरण दिले. त्याने एका प्रख्यात कंपनीच्या कॅल्क्युलेटरमध्ये अनेक चुका शोधून स्वतःचे सुधारित नवीन कॅल्क्युलेटर डिजाईन केले होते. नेदरलॅंडमधील अॅमस्टरडॅम येथील एका परिषदेत मोबईल फोन-डिजाईनमधील नवनवीन आविष्कार सादर करण्यात आले. मोबाईल फोन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक शोध आणि त्याच्या येत्या काही वर्षात मानवी जीवनशैलीवर त्यांचा होणारा परिणाम याविषयी अनेक प्रयोग सादर करण्यात आले. अमेरिकेतील बॉस्टन येथील एका परिषदेमध्ये विकसनशील देशांच्या विकासामध्ये Human Computer Interaction कसे हातभार लावू शकेल या विषयावर एक कार्यशाळा भरली होती. त्यात आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाखंडातील विविध देशातील संशोधकांनी तंत्रज्ञान, डिजाईन आणि त्या देशातील लोकांचा विकास या विषयी केलेले नवनवीन प्रयोग, प्रबंध आणि कल्पना सादर केल्या.
या क्षेत्रातील भारतातील व्यावसायिकांनी आणि संशोधकांनी एकत्र येऊन संघटना (HCI Professionals Association of India) स्थापन केली आणि ही संघटना दरवर्षी India HCI या नावाने या क्षेत्रातील भारतीय पैलूंवर आधारित परिषद आयोजित करते. भारतातील आणि जगभरातील व्यावसायिक, संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षक या परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. २०१० मध्ये आयआयटी मुंबई येथे भरलेल्या IndiaHCI 2010 परिषदेमध्ये Human Computer Interaction हे शास्त्र भारतीय अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख उद्योगांसाठी कसे वापरता येईल, भारतातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी हे शास्त्र कसे वापरता येईल, डिजाईनचा वापर अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कसा करता येईल अशा विविध पैलूंवर प्रबंध सादर करण्यात आले. सप्टेंबर २०१३ मध्ये बंगलोर येथे भरलेल्या परिषदेमध्ये या क्षेत्राचा उपयोग नवनवीन अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रप्रणाली यांच्यासाठी कसा होऊ शकेल, शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी डिजाईन कसे वापरता येईल, अपंग आणि वृद्ध लोकांसाठी तंत्रज्ञानाची रचना करताना डिजाईन कसे वापरता येईल अशा व्यापक पैलूंवर प्रबंध सादर करण्यात आले.
या क्षेत्राचा भारताच्या बाबतीत विचार केला असता असे लक्षात येईल कि इंटरनेट, मोबाईल फोन, संगणक, एटीएम या सुविधा शहरी भागाबरोबरच निम्न शहरी आणि ग्रामीण भागात पोचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दहा ते वीस वर्षात निम्न शहरी आणि ग्रामीण भागातील खूप मोठी लोकसंख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने वापरण्यास सुरुवात करणार आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान लोकांना वापरण्यासाठी उपयुक्त, सोपे आणि प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणे खूप महत्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञान, त्याचे डिजाईन हे केवळ एक कल्पनारम्य निर्मिती न राहता ते सर्व प्रकारच्या लोकांना, उद्योगांना उपयुक्त आणि कार्यक्षम असणे ही येत्या काळाची गरज आहे. यासाठी तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना खूप महत्त्वाची ठरणार आहे.
निखिल वेलणकर
फ्रीमाँट, कॅलिफोर्निया
प्रतिक्रिया
18 Feb 2014 - 1:25 pm | मुक्त विहारि
आवडले...
18 Feb 2014 - 1:58 pm | आत्मशून्य
साजेसा निंबंधही आहे...! फक्त आता प्रयोजन स्पष्ट कराल काय ?
18 Feb 2014 - 11:40 pm | कल्पक
User Experience Design म्हणजे नक्की काय आहे? जागतिक आणि भारतीय उद्योगाला त्याचा कसा उपयोग होतो आहे? भारतातल्या सर्जनशील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या काय संधी आहेत? आधुनिक तंत्रज्ञान वापरून सरकारी यंत्रणा इ-गवर्नन्सद्वारे थेट ग्रामपंचायतींशी जोडली जात असताना या क्षेत्राचे काय महत्व आहे? अंध, अपंग व्यक्तीसाठी तंत्रज्ञानाचा विकास करताना या क्षेत्राचा कसा उपयोग होत आहे? इंटरनेट, मोबाइल फोन, संगणक, एटीएम या सुविधा शहरी भागाबरोबरच निम्नशहरी आणि ग्रामीण भागांत पोचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० ते २० वर्षांत निम्नशहरी आणि ग्रामीण भागांतील खूप मोठी लोकसंख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने वापरण्यास सुरुवात करणार आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थांसाठी मोठय़ा प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या पाश्र्वभूमीवर या क्षेत्राचे काय महत्व असणार आहे याचा सोप्या मराठी भाषेत घेतलेला आढावा.
मूळ लेख (लोकसत्ता- करिअर वृत्तांत पुरवणी, १० फेब्रुवारी २०१४). (http://www.loksatta.com/career-vrutant-news/usage-of-technology-367435/?...)
18 Feb 2014 - 11:59 pm | आत्मशून्य
इन्सेप्शनसाठी तुम्ही ब्रेन स्टॉर्मींग कसे करता ?
19 Feb 2014 - 12:07 pm | कल्पक
मला प्रश्न नीट समजला नाही. user experience design मध्ये उत्पादनाचे design करण्याआधी वापरकर्त्यांचा अभ्यास केला जातो, त्यांच्या गरजा आणि अडचणी यांच्या विश्लेषणानंतर design संकल्पना तयार करतात, ती पुन्हा वापरकर्त्यांना दाखवून पुढील सुधारणा केल्या जातात असे काही वेळा केल्या नंतर semi-final/ high fidelity design वापरकर्त्यांना वापरायला देऊन usability testing केले जाते आणि त्या प्रतिक्रियेच्या आधारे अंतिम design तयार केले जाते.
19 Feb 2014 - 5:26 pm | आत्मशून्य
त्या दिशेने झालेली प्रगतीच चिरकाल टिकते. जग बदलते. गोष्टी फार साध्या असतात पण योग्य दिशा आवश्यक असते. ज्यासाठी ब्रेन्स्टॉर्मींग आवश्यक पडते.
उदा. टचस्क्रीन. घ्या आयफोन च्या आढी अनेक मोठ्या कंपन्यांचे टचस्क्रीन उपलब्ध्द होते, (अर्थात त्याला नावालाच टचस्क्रीन म्हणा प्रत्यक्षात काचेवर पारदर्शक फिल्म अंथरेली असयची टच सेंस्न्सर म्हणुन). हे कधीच चालले नाहीत अगदी आपण म्हणत असलेल्या युजर एक्स्पिरिअन्स कसोटीतुन हे तावुन सुलाखुन निघाल्यानंतरच कंपनीन्यांनी त्या मॉडेलला मान्यता दिलेली असुनही.
थोडक्यात ट्च इंटरफेस असुनही ते फक्त पुश बटन सारखेच काम करायचे...म्हणूनच दे वेर बुल्शि*!. अँड वाट वॉइ नीड इज अ ब्रेन्स्टॉर्मींग टु मेईक इट युउजफुल इंट्रफेस. हाउ ? अन एग्झाक्ट पर्स्पेक्टीव दॅट सिम्प्लिफायज व्हाट ऑर वि ट्राइंग टु डिलाइवरींग टु दि लेमॅन. वूइ निड इनोवेशन... वुइ इड ब्रेन्स्टॉर्मींग विच इज अ डिरेक्शन टु कॅप्चर दी इसेंन्स अँड नॉट द अक्चुअल Of such experience...! इट्स अ स्टडी ऑफ व्हॉट ऑलरेडी स्टडीड/लर्न्ट.
थोडक्यात जेंव्हा सामान्य माणुस एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो तेंव्हा तो काय करतो ति गोष्ट दाबण्याशिवाय ? कारण दाबायचे असेल तर त्यासाठी बटणच सर्वात उपयुक्त डिवाइस आहे अन टचस्क्रिन्ची मग गरजच नाही. पण जर सपाट पृष्ठभागाष्ठ्जर टच इंटरफेस हवाय तर अर्थातच मी पेपरवर बोट ठेवुन समजु घेउ शकतो की मला पेपर दाब्ता येत नाही पण टच करता येतोय म्हणजे हा टच इंट्रफेस आहे, मी तो बोटाने स्लाइड,रोटेट, मुव करु शकतो, मला त्यावर एकाच वेळी एकापेक्षा जास्त बोटे ठेवता येतात. बास हाच खरा टच इंट्रफेस जो माणुस आधिपासुनच शिकलाय म्हणुन जर ह्याचा इसेन्स मी डिजीटली माज्या डिवाइमधे कॅप्चर केला तरच अशी रिप्लीका हमखास यशस्वी ठरेल. ह्यालाच इन्सेप्शनसाठीचे ब्रेन्स्टॉर्मींग म्हणतात. इट्स अ पार्ट ऑफ रिअल स्टडी ऑफ युजर एक्स्पीरिअन्स.
काहीवेळा हे आपसुक घडते काहीवेळा करावे लागते. अगदी गुगल पासुन ते हॉटमेल-युट्युबपर्यंतच्या यशस्वी संकल्पनांच्या निर्मीतीचा हाच परिपाक आहे, साध्या सोप्या लेमन गोश्टीसोबत ब्रेनस्टॉर्मींग. अगदी मिसळपावही हे संध्याकाळी डेक्कनवर मारलेल्या गप्पांच्या अनुभ्वाचा इसेन्स आहे जो अनुभवायला संध्याकाळची वाट पहावी लागत नाही.
असो प्रश्न हा होता की ब्रेन्स्टॉर्मींगसाठी काही पध्दती असतात जी आपल्या निर्मीतीला योग्य दिशा देतात. अशा आपण कोणत्या पध्दती वापरता ?
23 Feb 2014 - 10:57 am | कल्पक
बरोबर आहे तुम्ही लिहिलेलं. जे लोकांच्या मनात आधीपासूनच ठसलं आहे त्याला Conceptual Model असं म्हणतात. म्हणजे आम्ही एका संशोधन प्रकल्पावर काम करताना शेतकऱ्यांसाठी, अशिक्षित लोकांसाठी मोबईल इंटरफेस तयार करत होतो तेव्हा आम्ही झाड, फुल, घर, सूर्य अशा चिन्हांचा वापर केला होता कि जे लोकांना आधीपासूनच परिचित होते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित होते. त्यामुळे त्यांना शिकायला आणि वापरायला फार त्रास होत नाही.
संभाव्य वापरकर्त्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यातून योग्य तो निष्कर्ष काढण्यासाठी Affinity Modeling, Card Sorting अशा पद्धतींचा वापर केला जातो तसेच सद्यपरिस्थितीतील यंत्रणा समजावून घेण्यासाठी Heuristic Evaluation, Task Analysis, Focus Group अशा विविध पद्धतींचा वापर केला जातो.
24 Feb 2014 - 1:34 pm | आत्मशून्य
प्रत्यक्ष काम करणार्यांकडुन घडणार्या चर्चेत नेहमीच असे चांगले इनपुट मिळत असतात. धन्यवाद.
18 Feb 2014 - 2:14 pm | आतिवास
आधुनिक जगाची? कोणत्याही जगाची हीच गरज नसते काय?
फक्त इंटरनेट, मोबाईल बँकिंग, जीपीआरएस .. वगैरेला तंत्रज्ञान का समजायचं? उदाहरणार्थ निर्धूर चूल, हलकं पडणारं जातं, सौरऊर्जेवर चालणारे दिवे .. हेही तंत्रज्ञान आहे.
शिवाय माणसाच्या गरजा बदलत राहतात आणि म्हणून तंत्रज्ञानही बदलत जाते. एक उपयोग सिद्ध झाला की दुस-या उपयोगांची 'गरज' निर्माण होत राहते.
बाकी एखादं तंत्रज्ञान आपल्याला वापरता येत नसेल तर आपण 'ढ' आहोत असा निष्कर्ष आजवर काढत आले होते, तंत्रज्ञानालाही नावं ठेवता येतील हे लक्षात नव्हतं आलं कधी ;-)
18 Feb 2014 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
तंत्रज्ञानालाही नावं ठेवता येतील हे लक्षात नव्हतं आलं कधी
रोज ढिगांनी तांत्रिक गोष्टी तयार होतात. त्यातली जी ग्राहकाला पसंत पडतात आणि ज्याकरिता ग्राहक पैसे मोजायला तयार असतो तीच व्यवहारात येतात आणि तगून राहतात... त्यातली फक्त काही थोडीच गाजावाजा होण्याइतकी प्रसिद्ध होतात आणि सर्वसामान्य लोकांत त्याचे नाव होते.अनेक अशी उदाहरणेही आहेत की जी तंत्रदृष्ट्या उत्तम होती पण ग्राहकाला आवडली/परवडली नाही (अथवा त्यांच्या वेळेअगोदर बाजारात आली) आणि त्यामुळे काळाच्या उदरात गडप झाली... ठळक उदाहरण म्हणून 'नेक्ट ओएस' पटकन आठवली. जाणकार अजून बरीच उदाहरणे देवू शकतील.
18 Feb 2014 - 3:25 pm | मदनबाण
लेखन आवडले ! :)
बरीचशी उत्पादने बनवली की ती वापरताना चूका होण्याची शक्यता असते,म्हणजे उदा. द्यायचे झाले तर एखाध्या उपकरणाचा प्लग उलटा लावला जाउ शकतो.
(चित्र जालावरुन घेतले आहे.)
आता जरा विचार करा... तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह अयोग्य पद्धतीने पीसीच्या युएसबी पोर्टला लावु शकता का ? याचे उत्तर नाही, कारण त्याचे डि़झाइन करताना त्यात वापरकर्त्या कडुन ही चूक घडु शकते हा विचार आधीच केला गेला आहे.
याला Poka-yoke म्हणतात्,हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे mistake-proofing.
18 Feb 2014 - 4:27 pm | राजेश घासकडवी
उत्तम लेख.
खरं आहे. सत्तरच्या दशकातले फोन फक्त कॉल करू शकता येणारे होते. याउलट ९० च्या आसपास फोनमध्ये प्रचंड नवीन सुविधा यायला लागल्या. कॉलवेटिंग, व्हॉइस मेसेज रेकॉर्डिंग, रिडायल करणे वगैरे वगैरे. त्यात ते फोन नुकतेच कॉर्डलेस व्हायला लागले होते. त्यांच्या आकाराच्या मानाने खूप फीचर्स होत्या, मात्र त्या वापराव्या कशा हे सहज कळण्यासारखं नव्हतं. त्यामुळे अनेक अशी नवीन उत्पादनं आपापली जाडजूड पुस्तकं घेऊन येत.
यात खरी क्रांती अॅपलने केली. अत्यंत इट्युइटिव्ह डिझाइन जे वापरायलाच सोपं असेल असं नाही, पण शिकायला नैसर्गिक असेल असं तयार केल. काही वर्षांपूर्वी मी आयफोन विकत घेतला तेव्हा चकित झालो होतो. आता आयफोन म्हणजे पूर्वीच्या त्या प्रचंड ठोकळा लॅंडलाइन फोन्सपेक्षा कितीतरी पटीनी अधिक फीचर्स असलेला! पण त्यासोबत एक छोटीशी कागदाची छापील पट्टी - फोन चार्ज कसा करावा हे सांगणारी. बस. बाकी काहीही इन्स्ट्रक्शन्स नाहीत! त्यातून एक प्रचंड आत्मविश्वासपूर्वक विधान होतं - आयफोन वापरायला इतका सोपा आणि इंट्युइटिव्ह आहे की शिकण्याची काही गरजच नाही. वापरायला लागा. बहुतेक गोष्टी तुम्हाला दिसल्यादिसल्याच कळतील. बाकी अजून बारकावे तुम्हाला आपल्याआपण सहज शिकता येतील.
यंत्र आणि मनुष्य यांच्यातलं इतकं मैत्रीचं नातं आता प्रस्थापित होतं आहे - याचं श्रेय इतके दिवस अॅपलला देत होतो. आता त्यामागच्या डोनाल्ड नॉर्मनचं नाव कळलं.
19 Feb 2014 - 12:00 am | अर्धवटराव
एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रोटीमॅटीक.
http://rotimatic.com/
19 Feb 2014 - 12:37 pm | प्रकाश घाटपांडे
लेख अतिशय आवडला. तंत्रज्ञान ग्राहकाभिमुख करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो हे आपल्या लेखाने दाखवून दिले. या डिझाईन वरुन एक गोष्ट आठवली. मला मोबाइल घ्यायचा होता. मी इंटरनेट वरुन काही मॉडेल्स ठरवली. पण मला त्यावरुन एक गोष्ट ठरवता येत नव्हती की मोबाईला गळ्यात अडकवण्यासाठी कॉर्ड लावायची असेल तर त्यासाठी नॉच आहे की नाही? मी दुकानदाराला माझ्या गरजा सांगितल्यावर त्याला ही सांगता येईना कि नवीन मॉडेल्स ना नॉच असते की नाही. माझा एक निकष होता की कितीही आधुनिक सुविधा असल्या तरी जर मला त्या मोबाईलला कॉर्ड लावता येणार नसेल तर काय उपयोग? भले ते वापरणारे १ टक्का असतील. पण माझ्या गरजेचा विचार जर मोबाईल डिझाईन करणार्या कंपनीने केला नसेल तर मला तर ती कंपनी बाद. मला ती ग्राहकाभिमुख वाटणार नाही. ज्यांना कॉर्ड वापरायची नाही त्यांना न वापरण्याचा पर्याय खुला आहे पण नॉच नसेल तर ज्यांना वापरायची आहे त्यांना ती वापरता येणार नाही. शेवटी मी सॅमसंग जीटी-एस ७५६२ घेतला. त्यात सुविधा होती. सुविधा कसली खर तर ग्राहक म्हणुन माझा तो हक्क आहे.
थोडक्यात काय तर कल्पकतेचे दारिद्र्य आपल्याला दिसते.ग्राहकांच्या सूचना / अभिप्राय यातून बोध न घेणार्या कंपन्या या मागे पडतात. या सूचना / अभिप्राय ग्राहक जसे देउ शकतो तसे विक्रेताही देउ शकतो. कारण ग्राहकाशी संवाद हा त्याचा होत असतो.
24 Feb 2014 - 4:15 pm | धर्मराजमुटके
उत्तम उदाहरण !
साध्या साध्या गोष्टींची काळजी घेऊ शकते तेच उत्पादन बाजारात चालते.
अवांतर : नोकीयाच्या जुन्या ईअरफोनमधे एफएम चे चानेल बदलण्यासाठी बटन असत. ते मला दुसर्या कोणत्याच मोबाईलमधे आढळले नाहित. तसेच त्यांच्या बर्याच मोबाईलच्या स्क्रीनवर आपण ज्या भागात असू त्या भागाचे नाव दिसून यायचे. ही सुविधा अगदी अद्यायावत फोनमधेही दिसत नाही. कोणी याचे कारण सांगू शकेल काय ?
24 Feb 2014 - 4:20 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत!
24 Feb 2014 - 6:09 pm | चौकटराजा
असे पहा की परमेश्वर एक डिझाईनर आहे. त्याने दोन किडनीच ठेवल्या. दोन डोळे ठेवले, कान दोन ठेवले, ब्रेन एकच का ठेवला र्ह्दय एकच का ठेवले ? काही उत्तर आहे ? मी युजर म्हणून मला दोन ब्रेन व दोन र्ह्दये असणे आवडले असते. तसे झाले का? मला असे महत्वाचे अवयव राखीव म्हणून का दिले नाहीत त्याने ? तात्पर्य काय ...कितीही प्रगति झाली तरी गेल्या दीडशे वर्षात खिशात घेवून जाता येईल असा उर्जा घट तयार झाला आहे का की ज्यायोगे शे दोनशी किलोमीटर पर्यंत कार नेता येईल. माझे मते प्रत्येक देवघेवीत घेणारा देणार्यापेक्षा थोडा अधिक महत्वाचा असतो. ( गुरू पेक्षा शिष्य महत्वाचा, भले श्रेष्ठ पण गुरूकडे असो.) जेंव्हा एखादे उपकरण आपल्याला नीट वापरता येत नाही त्यावेळी नेहमीच त्याला युजर फ्रेंडली नाही असा शिक्का लावता येत नाही. तर वापरणार्याची लायकीच जास्त मह्त्वाची ठरते. त्या लायकीत प्रशिक्षणाने भर पडते पण त्याच्या वापरातील कल्पकता ही निसर्ग दत्त देणगी असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे फोटोशॉप हे सॉफ्टवेअर आहे.
24 Feb 2014 - 6:37 pm | आत्मशून्य
मला मुळाक्षरे गिर्वावी लागली तर मी कधीच मराठी समस्तळाव्र कार्यरत राहु शकणार नाही पण शुध्दालेखन व्यवस्थित करणारे एप अडोन असेल तर कदाचीत एखाद्याला माझे प्रतिसाद खराब वाटणारही नाहित!