कुठूनतरी सरकावी वाळू,
भुकंपासारखी धसावी जमीन आतल्याआत.
सार्या आसमंताने ढुंगण हलल्यासारखे हेलकावे द्यावे.
मंथन: सार्या शरीरात, मनात, मेंदुत, आत्म्यात!
खुर्चीत बसल्याबसल्या मांडावेत सरपटणारे दिडदमडिचे हिशेब,
निरर्थक हेलपाट्यांचे
दामटावे अनाहूत घोडे,
अवांतर, वांझ शब्दांचे फोडावे तीव्र बुडबुडे,
टेबलाच्या कोपर्यावर ठेवलेल्या हसर्या बुद्धाच्या डोळ्यातील करुणेचा उगम शोधावा
आणि फेडावे पांग आपल्यातील दिवंगत मानवप्राण्याचे.
भयाण अनिष्ट भुंकावे स्वत:वर !
कोलमडून टाकावे सारे बंदिस्त अरण्य,
चिरेबंदी स्फोटक वाड्यातील अप्रुप चव्हाट्यावर मांडावे.
सांडावे भेसूर अश्रू :कलेवर चांगले भिजू द्यावे.
फोडावा अमर्याद टाहो: स्साला, बेंबीच्या देठापासून ब्रह्मांडाचा निरंतर आक्रोश भंजाळत न्यावा.
सल्तनतीच्या जोरावर भीषण उधळावे अश्व, भयाण भेसूर मांडवात
जीव पोसावा मंगलाष्टकासारखा.
आणि भटजीच्या सोग्यात गुंडाळून टाकावे प्राक्तन !
प्रवास किडेमकोड्यांचाः दिक्कालावर पेरून काढावा
आणि
वेदनांचे घडच्याघड तुडूंब भरुन विकावेत.
दुष्काळात वाहून गेलेल्या अवशेषांच्या जीवावर आणखी आशेचे रोप लावावे.
भयाण वादळात सोडावे बुभुक्षीत पक्षी,
घुबडांचा नंगा घुत्कार काळजात टोचून घ्यावा
आणि आयुष्य लक्तरासारखे अधांतरी टांगून ठेवावेँ.
रात्रीच्या क्षितिजावर निर्धारीत कराव्या आपल्या जगण्याच्या सीमारेषाः त्यावर जीव जाईस्तोवर फळाफळा मुतावे
आणि आपापल्या रिंगणात लपाछपीचे निवांत पोरखेळ मांडावेत.
सनातन लिंगाच्या सामर्थ्यावर उधळून टाकावे समाधिस्थ अस्तीत्व,
बाहुलीच्या नकट्या नाकावर जीव ओवाळून टाकावा,
चवचाल वर्तमानासोबत फडतूस मुल्यांचा व्यवहार करावा, माणुसकीला ओरबाडून काढावे: नखशिखान्त बलात्कार भोगावा आणि रंडीबाजासारखे भेलकांडत भविष्याकडे धांवत सुटावे!
डॉ सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
16 Feb 2014 - 12:01 pm | जेपी
.