या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो.
शनिवार ८ तारखेला सी एस टी च्या आसपास भेटायचे ठरले होते. मी थोडा आळस केला आणि आम्हाला म्हणजे माझ्यामुळे रामदासनाही जरा उशीर झाला. आम्ही घाटकोपर गाठतोय तो मुविंचा फोन! रामदासांनी २०-२५ मिनिटांत पोचतो असे सांगितले आणि नव्या पूर्व मुक्त मार्गामुळे आम्ही अवघ्या ४५ मिनिटात ठाणे ते फोर्ट हे अंतर पार पाडले. पोचता पोचता जरा जमवाजमव करत रामदासांनी मुविंना सी एस टी वरुन निघुन डी एन मार्गावर पी एम मार्गाच्या छेदबिंदूवर सिटी बँकेजवळ यायला सांगितले आणि आम्ही तिथे पोचेपर्यंत श्री व सौ मुवि आणि भाते हजर झाले.
मंडळी नाश्ता-चहा करुन आली होती, संस्थळाच्या नावाला जागुन सकाळीच मिसळ्पावाचा नाश्ता झाला होता. सोबत मुविंनी आणलेल्या इडल्याही होत्या. (त्यांनी आल्याच्या वड्याही आणल्या होत्या, त्या पुढे सत्कारणी लागल्याच).
मग मंडळींनी आम्हाला नाश्त्याला साथ दिली. खास रामदासांच्या फर्माईशीनुसार आम्ही त्यांच्या कचेरीसमोरच्या स्वागत मध्ये गेलो. तिथली तमाम प्रजा रामदासांना ओळखत होती हे सांगायला नको. तिथला खास रसमवडा आम्ही मागवला. मुळात रसम सगऴ्यांनाच जमते असे नाहे, ते इथे उत्तमच होते शिवाय वडेही अगदी मऊसूत होते. पाठोपाठ पोहे झाले आणि कॉफीने सांगता झाली.
आता आम्ही ताजेतवाने होऊन आतल्या बाजुने मुंबई समाचार मार्गे निघालो. मुंबई समाचार हे सर्वात जुने मुंबईतले गुजराती वर्तमानपत्र. तिथुन जाताना त्या लाल ईमारतीची छबी टिपावीशी वाटली.
समोर थोडे पुढे जाताच हॉर्निमन सर्कल आले. 'सगळी जुनी इंग्रजी नावे बदलली पण हे नाव अजुन का बदलले नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, मात्र हॉर्निमन हे बदललेलेच नांव आहे हे त्यांना माहित नाही' - रामदासांनी माहिती पुरविली. मूळचे एल्फिन्स्टन सर्कल भारतिय स्वातंत्र्यलढ्यास पाठिंबा देणार्या बेंजामिन गाय होर्निमन या इंग्रज पत्रकाराच्या स्मरणार्थ 'हॉर्निमन सर्कल' झाले. इथुन समोर हॉर्निमन सर्कल कडे तोंड करुन उभे राहिले असता उजवीकडे 'एल्फिन्स्टन बिल्डिंग' अजुनही उभी आहे, मात्र पूर्वीच्या चर्च रस्त्याचे नाव आता वीर नरिमन मार्ग आहे.
सहजच लक्ष समोरच्या चर्चच्या उंच पांढर्या मनोर्याकडे गेले. हेच ते सुप्रसिद्ध सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च, ज्यामुळे पश्चिमेच्या परिसराला चर्चगेट हे नाव पडले. हे चर्च १७१८ सालचे म्हणजे तब्ब्ल २९६ वर्षे जुने आहे.
एकीकडे या भव्य एमारती पाहत असता रामदासांनी आमचे लक्ष एका अगदी लहानश्या बैठ्या वास्तुकडे वेधले. ही हॉर्निमन सर्कलची पाणपोई, कुण्या माणकुवरबाईने १८७३ साली बांधली होती. या पाणपोईच्या परिघातले जमिनीचे चीरे मूळचेच असावेत.
मुविंना गुप्तधनाचा लाभ
हा पिण्याच्या पाण्याचा तांब्याचा हंडा, ज्यातुन वाट्सरुंना पिण्याचे पाणी घेता येत असे.
रामदास जैयत तयारीत
रामदासांनी स्थापत्या विषयक निरनिराळ्या बांधकाम शैली दाखविणारे पुस्तक आणले होते. सर्वजण माहिती ऐकण्यासाठी गोळा झाले.
त्या पुस्तकात दाखविल्याप्रमाणे काही चेहेरे समोरच्या इंमारतींवर कोरलेले दिसले.
ते टिपत असता पुन्हा एकदा वेगळ्या अंगाने सेंट थॉमस चर्च दिसले आणि अर्थातच ते टिपले.
खरेतर हा काळाघोडा महोत्सव कट्टा पण इतके रंगलो होतो, की क्षणभर पुढे काळ्याघोड्याला लवकरात लवकर पोचायचे आहे हेही विसरलो. तसे आपण या भागातुन जातो येतो पण असा निवांतपणा आणि हातात कॅमेरा नसतो, बरोबर असे मुवि दांपत्य, रामदास, भाते वगैरे नसतात.
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 1:14 am | अत्रुप्त आत्मा
ओपनिंग जोरदार जाहलेली आहे.. :BRAVO: आणी अर्थातच पुढील भागाचीही वाट बघतो आहे.
11 Feb 2014 - 11:11 am | दिपक.कुवेत
हेच बोल्तो....आता थांबु नका! गाडि जौ दे सुसाट......
11 Feb 2014 - 1:50 am | राघवेंद्र
पु. भा. प्र.
11 Feb 2014 - 1:59 am | प्यारे१
खूपच छान सुरुवात!
11 Feb 2014 - 2:23 am | खटपट्या
वरून पाचवे, वडा प्लेट चे चित्र पाहून प्रचंड जळजळ झाली आहे.
11 Feb 2014 - 4:10 am | रेवती
भारी चाललीये सहल! क्रमश: वाचून बरे वाटले.
मागल्या वर्षीच्या भ्रमंतीमध्ये एक जुनी बेकरी दाखवली होती. तीच की आणखी कुठलीतरी जुनी बेकरी आता नाहीये असे ऐकले.
11 Feb 2014 - 4:37 am | मदनबाण
मस्त ! पुढचा भाग सुद्धा लवकर टाका.
पाणपोइच्या कोनशिलेवर कोणीतरी थुकुन ठेवल्याचे दिसते आहेत, साल्या ह्या थुंक्याना चांगले बदडुन काढले पाहिजे !
11 Feb 2014 - 9:07 am | पाषाणभेद
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. लवकर टाका.
>>>> पाणपोइच्या कोनशिलेवर कोणीतरी ......
बाणा, आपण फार विचार करतो अन त्रासही आपल्यासारख्यांनाच होतो.
11 Feb 2014 - 7:11 am | नंदन
झकास उतरलाय पहिला भाग. और भी आने दो!
+१
11 Feb 2014 - 7:57 am | मुक्त विहारि
आवडला.
आम्ही गेलो होतो काळा घोडा फेस्टिवलच्या निमीत्ताने,
पण रमलो होतो, ह्या सुंदर इमारती बघण्यात आणि गुंगलो होतो रामदासकाकांच्या रसाळ शैलीत सांगत असलेल्या माहितीत.
11 Feb 2014 - 8:23 am | प्रमोद देर्देकर
काळा घोडा उत्स्व कधीच बघितलेला नाहिये त्यामुळे पुढिल भाग लवकर येवुद्यात.
11 Feb 2014 - 8:49 am | अजया
मस्त झालेला दिसतो आहे कट्टा! पु.भा.प्र.!
11 Feb 2014 - 9:25 am | सुधीर कांदळकर
माझ्या मनाचा हळवा कोपरा असलेली मुंबई दाखवताय धन्यवाद. इमारतींची प्रकाशचित्रे आवडली. ओल्ड कस्टम हाऊससमोरचे मारिओ मिरांडा ने काढलेले अप्रतिम चित्र लावलेले इराण्याचे हॉटेल बहुधा बंद होणार म्हणून बोलवा होती, झालेही असेल.
मी ५७ वर्षे मुंबईत काढली. मुंबईत असतांना दर डिसेंबर जानेवारीत आम्ही सुटी घेऊन भटकंती करीत असू त्याची आठवण झाली. म्यूझियम प्रवेश अजूनही मंगळवारी विनाशुल्क असते का? तिथली भलीमोठी पेंटींग्ज, जपानी कलावस्तू सुंदर आहेत.
पुढील खेपेस मुंबईबाहेरील मित्रांना मलबार हिल, वाळकेश्वर, राजभवन जरूर दाखवा. हल्ली राजभवनावर फारच कडेकोट बंदोबस्त असणार. प्रवेश तरी आहे की नाही कोण जाणे. पूर्वी कुंपणही नव्हते आणि आम्ही टेकडीवरून उतरून झाडोर्यातून आत जात होतो. ‘धन साक’ वगैरे मिळणारे पारशाचे ‘कफे नाझ’ मात्र कायमचे बंद झाले आहे.
चौपाटीच्या क्रीम सेंटरचे तसेच वरळीच्या क्वालिटीतले ‘ट्रिपल संडे’ देखील आठवले.
11 Feb 2014 - 9:37 am | चिप्लुन्कर
माझ्या दुर्दैवानी मी हे सर्व मिसवल … ;(
11 Feb 2014 - 9:56 am | पैसा
पुढचा भाग लौकर येऊ द्यात!
मुवि धडाक्यात असे कट्टे आयोजित करत आहेत आणि सगळ्यांना लिहायला लावत आहेत त्यासाठी धन्यवाद!
11 Feb 2014 - 10:05 am | मुक्त विहारि
आणि आम्ही सगळ्यांनी ह्या सुचनेला पाठिंबा दिला.
11 Feb 2014 - 10:16 am | डॉ सुहास म्हात्रे
कट्टा नेहमीप्रमाणे जोरदार झालेला दिसतोय ! सुंदर सुरुवात. फोटोही मस्तच ! पुभाप्र.
11 Feb 2014 - 10:22 am | यशोधरा
वाचतेय..
11 Feb 2014 - 10:44 am | मृत्युन्जय
वा. सुंदर. कट्ट्ञाचा वृत्तांत २ भागांत् येतो आहे यातच सग्ळे आले.
11 Feb 2014 - 11:02 am | सुहास झेले
जबरी... फोटो तर एकसोएक आलेत... :)
पुढचे भाग लवकर येऊ द्यात... कट्टा चुकल्याचे इनो घेतो एकत्र :-| :) ;-)
11 Feb 2014 - 11:03 am | सूड
सहीच जमलाय वृत्तांत!! पुभाप्र.
11 Feb 2014 - 11:15 am | दिपक.कुवेत
मी कॉलेजला जाताना रोज पहायचो पण कधी त्यावरील मजकुर वाचला नव्हता. फोटोतल्या ईमारतीहि ओळखीच्याच आहेत पण त्यामागचा ईतिहास आज नव्याने कळला.
11 Feb 2014 - 11:26 am | पिलीयन रायडर
रामदास काकांसोबत कट्टा..!!! भाग्यवान आहात!! फार छान लिहीलय..!
11 Feb 2014 - 2:26 pm | भाते
रामदासकाकांबरोबर अनुभवलेला हा माझा पहिलाच 'मुंबई दर्शन' कट्टा होता. रामदास काका प्रत्येक इमारतीचा आधीचा संपुर्ण इतिहास, त्याची रचना, कलाकुसर, सध्याची परिस्थिती याची सविस्तर माहिती देत होते. सर्वसाक्षी माहिती ऐकत असतानाच त्या इमारतींचे सुरेख फोटो काढत होते.
या अगोदर मी काळा घोडा फेस्टिवल कधीही पाहिला नसल्याने त्याचे अप्रुप असले तरी रामदास काकांकडुन इतकी सुरेख माहिती मिळत असताना खरचं त्या फेस्टिवलचे काहीही कौतुक वाटत नव्हते. पण काळा घोडा फेस्टिवल मुळे हा कट्टा आटोपता घ्यावा लागला याचे नक्कीच वाईट वाटले.
धन्यवाद मुक्तविहारि, कट्टा आयोजित केल्यापद्धल.
सर्वांच्या सोयीने, एखाद्या रविवारी, पुन्हा एकदा रामदास काका आणि सर्वसाक्षी यांच्या बरोबर आणखी एक फक्त सविस्तर 'मुंबई दर्शन' कट्टा आयोजित करावा हि मागणी. आता विनंती नाही तर मागणी करतो आहे. :)
11 Feb 2014 - 3:55 pm | अजया
ये हुई ना बात! र वि वा र !!
11 Feb 2014 - 5:35 pm | चिप्लुन्कर
या मागणीला माझा पाठींबा आहे .
11 Feb 2014 - 7:23 pm | सुबोध खरे
+ १००
11 Feb 2014 - 2:51 pm | सानिकास्वप्निल
कट्टा जोरदार झालेला दिसतोय, फोटो व माहिती आवडली :)
पुभाप्र
11 Feb 2014 - 3:24 pm | शिद
मस्त वृत्तांत... फोटो पाहुन जुन्या आठवणी उजळल्या... माझे डिप्लोमाचे कॉलेज कुलाबा ला होते तेव्हा हा सगळा परिसर अगदी पिंजून काढला होता ३ वर्षांत.
11 Feb 2014 - 6:05 pm | बंडा मामा
छान! लेखकाचे मराठी शब्द वापरण्याचा आग्रह वखाणण्याजोगा आहे. अगदी इस्टर्न फ्रिवेला पण मराठी शब्द योजिला आहे. असे असताना शिर्षकात मात्र 'फेस्टीवल' हा इंग्रजी शब्द खटकला. काळा घोडा 'उत्सव' असे करु शकाल का?
11 Feb 2014 - 7:54 pm | मुक्त विहारि
अनुमोदन
11 Feb 2014 - 8:08 pm | सर्वसाक्षी
धन्यवाद मामा
मूळ घोषणा ज्या नावे झाली तेच शिर्षक म्हणुन वापरले आहे, लेखात शेवटच्या परिच्छेदात उल्लेख आपण म्हणालात तसाच उल्लेख झाला आहे. आपले मराठीप्रेम पाहुन बरे वाटले. उगाच प्रत्येक शब्दाला अट्टाहासाने भाषांतरीत करु नये पण शक्य तिथे मराठी शब्द अवश्य वापरावेत. उगाच सॅन्ड्विचला भरलेले पाव म्हणायचा अट्टाहास नको पण एअरपोर्ट ऐवजी विमानतळ म्हणायला हरकत नसावी. मात्र दुर्दैवाने मराठी संकेतस्थळांवरच अनेकांना मराठी शब्द वापरलेले खटकतात, मराठीचा वापर आग्रहाने करणार्यांवर कर्मठपणाचा आणि भाषेला प्रवाही होण्यापासुन वंचित करुन तिचे डबके केल्याचा आरोप होतो.. असो आपण आपल्याला योग्य वाटते आणि आवडते ते अवश्य करावे.
पुन्हा एकदा आभार.
कलोआ
साक्षी
11 Feb 2014 - 8:27 pm | भाते
मुळ शब्द 'काळा घोडा आर्ट फेस्टिवल' असा आहे. तेव्हा शब्दश: नामांकरण करायचे झाले तर 'काळा घोडा कला उत्सव' असा करावा लागेल.
त्यामुळे शिर्षक 'काळा घोडा कला उत्सव कट्टा - वृत्तांत (१)' असे करावे लागेल.
काय करणार? मिपाचा परिणाम आहे हा! मिपावर इतके शुध्द मराठी वाचुन मला ही (चांगली/वाईट) सवय लागली आहे.
सर्वसाक्षी,
काही चुकले असेल तर अवश्य सांगा. चुक नक्की सुधारण्यात येईल.
11 Feb 2014 - 6:33 pm | मोक्षदा
रामदास काका ,
तुम्ही मुंबई दर्शन दाखवले, फोटो चांगले आल्याने आम्हालाही थोडक्यात घरी बसून मुंबई दर्शन घेता आले अर्थात खरे बघण्यात जास्त आनंद होतो, आम्ही येऊ शकलो नाही परत असा कट्टा झाला तर घरातील सगळेच नक्की भेट देऊ
11 Feb 2014 - 9:28 pm | सुवर्णमयी
वृत्तांत आणि फोटो दोन्ही आवडले.
12 Feb 2014 - 10:07 am | ऋषिकेश
छानच!
12 Feb 2014 - 11:50 am | नितिन थत्ते
मस्त
13 Feb 2014 - 5:20 pm | अनन्न्या
दोन्ही भागातील फोटो मला दिसत नाहीयेत.